IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ३)

भाग २

द पोर्ट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर

The Portrait of a Lady on Fire (2019)

हा बायकांचा सिनेमा. अर्थात, पुरुषाने काढलेला बाईचा सिनेमा नाही. बाईने बनवलेला सिनेमा. बाई‘माणसा’चा सिनेमा. यात पुरुष पात्राला वावच नाही. आणि ते जराही खटकत, जाणवत नाही. बाई-पुरुष या नात्यातल्या ताणतणावांचं दर्शनच नाही, ही गोष्ट खटकत नाही कारण बाईतल्या माणसाचा हा सिनेमा आहे. एरवी जग पुरुषांचं असतं आणि स्त्रीवादी, वगैरे धरून बहुतेक सगळ्या बायका स्वत:ची जागा, स्वत:ची भूमिका पुरुषाच्या संदर्भचौकटीतच ठरवत असतात. (असो. असो!) इथे तसं नाही.

प्रत्येक बाईला ‘ओपनिंग’ आहे. कोऱ्या कागदावर चित्रासाठी मारल्या जाणाऱ्या रेघोट्यांच्या आवाजात आणि त्या रेघोट्या चाचरत, थबकत मारणाऱ्या बोटांच्या दृश्यात नावं येतात. चित्रपट सुरू होतो तेव्हा आपल्यासमोर एक तरुण मुलगी येते. तिच्यासमोरच्या कागदावर ती चित्र काढणार असते. तिला सूचना देणारा आवाज आपल्याला ऐकू येतो; पण लगेच लक्षात येतं की हा आवाज या मुलीचा नाही. मग मुलगी बदलते; तोच आवाज चालू राहतो. चार मुली होतात. यात आपली आवाजाच्या मालकिणीबद्दल उत्सुकता ताणली जाते. शेवटी ती दिसते. एक रेखीव, सडसडीत, ताठ बसलेली मुलगीच; पण समोरच्या विद्यार्थिनींना शिक्षण देण्याचा अधिकार तिला आहे. हे जाणवून देणारी. त्यांच्यापेक्षा थोडी मोठी. गंभीर. ‘मी कशी बसले आहे, ते बघा,’ असं म्हणताना ती तिच्या विद्यार्थिनींचं, पर्यायानं प्रेक्षकांचं लक्ष तिने हात कसे ठेवलेत, याकडे वेधते. ते आपण लक्षात ठेवायचं असतं.

इतक्या सविस्तरपणे सांगावंसं वाटतंय, याचा अर्थ चित्रपट लक्षवेधी आहे, हे समजलं असेलच. पुढच्या फ्रेममध्ये ही मुलगी दिसते ती समुद्राच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर. ती एका मोठ्याशा होडीत आहे जिला तीनेक नावाडी वल्हवत आहेत. एकजण सुकाणू धरून आहे. उतारू एक तीच. होडी प्रचंड हेलकावे खाते आहे. होडीशी स्थिर असलेला कॅमेरा तसाच हेलकावे खाते आहे. परिणामी तिची छबी सतत हलते आहे. आणि मागे सतत समुद्राची घनगंभीर गर्जना. एका हेलकाव्यात तिच्यासमोरचा लाकडी खोका घसरून पाण्यात पडतो. कसलाही विचार न करता ती कपड्यांनिशी पाण्यात उडी घेऊन खोका कवटाळते. शेवटी एका निर्मनुष्य किनाऱ्यावर उतरते. डोंगराळ वाटेवरून वरवर चढते. चालत एका वाड्याशी जाते ...

भलतंच प्रभावी. पुढे काय होणार ही उत्सुकता चाळवताना काहीच्या काही अपेक्षा निर्माण करणारं. शब्दांपेक्षा चित्रावर, आवाजावर जास्त भर देणारं.

पुढे दिसणाऱ्या प्रत्येक स्त्रीपात्राचं दर्शन असंच, अपेक्षा वाढवत नेऊन घडवलेलं आहे. अर्थात, या बिल्डअपची सवय होते आणि त्यामुळे दर पुढचं स्त्रीदर्शन अधिकाधिक नाट्यपूर्ण करण्याची जबाबदारी दिग्दर्शकावर येते. पहिल्या चित्रकार बाईनंतर समोर येते ‘सोफी’. वाड्याचं दार उघडणारी. ही जणू वाडयाचा भाग. शांत, सुंदर, मोठ्या डोळ्यांनी थेट बघणारी आणि आवाज सदा खालच्या पट्टीत ठेवणारी नोकराणी. तारुण्यात प्रवेश केलेली. हिच्याकडून अपेक्षा निर्माण होता होता ती आणि चित्रकार मुलगी यांच्या बोलण्यात वाड्याच्या मालकिणीचा उल्लेख येतो. तोही ‘कशी असेल ही मालकीण?’ असा प्रश्न मनात उभा करणारा. चित्रकार मुलीला मालकीण सांगते की तिला तिच्या मुलीचं चित्र काढून हवं आहे. अडचण अशी, की ती मुलगी चित्रासाठी बसतच नाही. म्हणजे चित्र तिच्या नकळत काढायचं आहे! ती मुलगी म्हणजेच ‘लेडी ऑन फायर’. जिचं पोर्ट्रेट या सिनेमाचा विषय आहे.

चित्रपटाचा काळ जुना, विजेचा शोध लागण्यापूर्वीचा आहे. सोफी हातात मेणबत्ती घेऊन जिने चढते उतरते. तिच्याबरोबर हलणारा मऊ, मंद उजेड. वाड्याचा कानाकोपरा आपल्याला त्या उजेडात दिसतो. वाडा भव्य आहे. गूढ असला तरी घाबरवणारा नाही. लाबरुंद स्पेसची जाणीव होत रहाते. उंच भिंती माणसांना लहान करतात. लाकडी जमिनीवर चालताना होणारा आवाज घुमतो. सगळेजण खालच्या पट्टीत बोलून वाड्याच्या अस्तित्वाविषयी आदर व्यक्त करतात. कॅमेरासुद्धा सावकाश हलतो. सावल्यांमधून खोली दाखवतो. चित्रकार मुलगी राहते, तिथे फक्त छत उंच नाही. तिथे होणाऱ्या संवादांना वाड्याच्या भारदस्त लांबरुंदपणाची चौकट नाही. कधीतरी सिनेमा वाड्याबाहेर जातो. तिथे समुद्र. प्रचंड लाटा. वारा. झाड नसलेला डोंगर आणि निर्मनुष्य किनारा. सिनेमात आवाजाचाही भरपूर सहभाग. समुद्र, वारा यांच्याबरोबर पियानो आणि लोकगीत गाणाऱ्या बायकांच्या उंच आवाजातला कोरस.

अशा सगळ्या वातावरणनिर्मितीमुळे आपल्यासमोर काहीतरी महाकाव्य सादर होणार आहे, अशी मनाची तयारी होते. चित्रकार मुलगी तेजस्वी, बुद्धिमान दिसतेच. सोफी शांत, साधी दिसली तरी वाड्याच्या गूढपणाचा भाग ठरते. मालकिणीची मुलगी हसत नाही. तिच्या मोठ्या बहिणीचा मृत्यू कसा झाला, हे आणखी एक गूढ. गोष्ट पूर्णपणे बायकांची आहे. लग्न, सेक्सचा अनुभव, गरोदरपण, अशा गोष्टींकडे बाईच्या नजरेतूनच बघितलेलं. पण प्रत्यक्ष कथानक तेवढी उंची गाठत नाही, असं वाटतं. पण मग ज्याप्रमाणे विषयाचे मार्क कलाकृतीला देऊ नयेत; तसंच मिळालेला विषय कसा सादर केला आहे, इतकंच बघावं, असं का म्हणू नये? ‘पोर्ट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर’ हा एक भारावून टाकणारा अनुभव देणारा चित्रपट आहे, हे नक्की.

(या चित्रपटाला कान महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार होता.)
---***---

Sorry, we missed you (2019)

‘सॉरी, वी मिस्ड यू’ या चित्रपटाचा कर्ता आहे, केन लोच. शहरात पार्सल पोचवणाऱ्या कुरियर सेवेत सामील होणाऱ्या एका टेम्पो ड्रायव्हरची आणि त्याच्या कुटुंबाची ही गोष्ट. पात्रांविषयी आणि प्रेक्षकांविषयी जराही दयामाया न दाखवता समोर मांडली जाते. सर्वसामान्य कष्टकरी पुरुष, त्याची सालस आणि कामसू पत्नी आणि त्यांची दोन मुलं. मोठा मुलगा ‘मोठा’ होतो आहे आणि त्यामुळे बंडखोरी करू बघतो आहे. लहान मुलगी समंजसपणे जमेल तसा भार उचलू बघते. आपल्याकडे कष्टकरी वर्गातल्या बायका जशा जास्त देवभोळ्या असतात, तशी ही बायको. तिच्या नोकरीमध्ये प्रत्येक रुग्णाची प्रेमाने सेवा करणारी.

या सगळ्यांच्या जगण्याची चाकोरी बघताना आपल्याला त्यातल्या अडचणीसुद्धा दिसतात. त्या सोडवताना त्यांची होणारी ससेहोलपट लक्षात येते. हे कुटुंब कधीही सुखवस्तू होणार नाही, हे कळतं. एकामागोमाग एक घटना घडत जातात आणि गोष्ट उलगडत जाते. पण गोष्टीकडे, घटनांकडे प्रेक्षकाला अमुक एका पात्राच्या नजरेतून बघता येत नाही. या अर्थाने चित्रपटाला प्रोटॅगॉनिस्ट - मध्यवर्ती पात्र - नाही. याचा परिणाम असा होतो की कुण्या एकाच्या सुखदु:खांशी समरस होत आपण स्वत:लाही प्रतीकात्मकरीत्या का होईना, अन्यायाचा बळी मानून घेतो; ती मुभा मिळत नाही. यात भर म्हणजे कुणालाही खलनायक ठरवता येत नाही. प्रत्येकाच्या वागण्याला त्याची त्याची कारणं आहेत. आणि ती पटण्यासारखी आहेत.

गोष्ट तर सरळसरळ दु:खाची कहाणी आहे. अशा वेळी त्या दु:खाचा दोष कोणाला द्यावा, याचं काहीतरी सूचन सादरीकरणात असावं, अशी अपेक्षा प्रेक्षकच धरतो, असं नाही; तसं बहुधा दिग्दर्शकच सांगतो. इथे नाही. चित्रपटाच्या शेवटी कुणी लहान मुलगी जमीनदाराच्या घरावर दगडही मारत नाही. कोणालाच बोल लावला जात नाही. जे चाललंय ते बरोबर नाही, ते बदलायला हवं; असा आग्रह संवेदनशील मनात उमटतो, पण त्या आग्रहाचा कोंडमारा होतो. याचं उत्तर काढण्याचं काम दिग्दर्शक प्रेक्षकावर सोडतो. केन लोच असंच करतो. तो दाखवतो ते शहर क्रूर भासत नाही, माणसं निष्ठुर भासली तरी दुष्ट वाटत नाहीत, अडचणी दारुण वाटल्या तरी मुद्दाम उभ्या केल्यासारख्या दिसत नाहीत. त्यामुळे चित्रपटाचा शेवट असमाधानकारक वाटला तरी त्याला इलाज नाही, हे कळतंच.

चित्रपट विचारात टाकतो आणि मनात रेंगाळतो. थोड्या वेळाने आपणही तशाच एका व्यवस्थेचा भाग आहोत आणि तसाच अन्याय करत असताना अन्याय भोगतही आहोत, या अटळ निष्कर्षाकडे यायला होतं. जराही प्रचारकी नसलेल्या असल्या चित्रपटांच्या कर्त्याला ‘समाजवादी’ हे लेबल लावणं बरोबर आहे का?

---***---

‘हॅपी बर्थडे’

Happy Birthday (2019)

एका आजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जमलेलं कुटुंब. दोन मुलगे आणि एक मुलगी. एका मुलाची पत्नी आणि त्यांचे दोन मुलगे, दुसऱ्याबरोबर एक गर्लफ्रेंड आणि तिसरी बेबंद भरकटललं जगणारी मुलगी. या मुलीची मुलगी आजीकडेच वाढते आहे.

भरपूर खोल्या असलेलं घर. घराभोवती झाडी. वातावरण प्रसन्न. भावंडांचे, सगळ्यांचेच आपापसांतले संबंध मोकळे. पण हसतखेळत चाललेल्या संवादातून कधी भांडणाचा अंगार फुटेल, सांगता येत नाही. क्लेअर ही मुलगी आजीच्या पहिल्या नवऱ्याची. त्या बापाने मागे ठेवलेल्या पैशातून हे घर घेण्याला हातभार लागला आहे. तिला पैशांची गरज आहे. दोन नंबरचा भाऊ अजून स्थिरावलेला नाही. अनेक उद्योग करून झाल्यावर सध्या कॅमेरा घेऊन शूटिंग करतो आहे. क्लेअरची मुलगी आईविषयीच्या रागाने धुमसते आहे. मनाने अस्थिर, असुरक्षिततेने ग्रासलेली क्लेअरच बहुधा ठिणगी टाकते आणि आग लावते.

हा चित्रपट वातावरणाचा नाही. यात घर हे ‘पात्र’ म्हणून काम करत नाही. यातल्या पात्रांचे कपडे डोळ्यात भरत नाहीत, रूपाने सगळेच सर्वसामान्य. ही गोष्ट माणसांची आहे. माणसं ओरडतात, किंचाळतात, नाटक करतात. खूप गुंतागुंत आहे. लोकांच्या बोलण्यातून कळणाऱ्या घटनांच्या सत्यतेविषयी निश्चित विधान करता येत नाही आणि हा खोटा, ती खरी; असा निर्णय देता येत नाही. क्लेअर चंचल आहे, स्वत:वर संकट ओढवून घेणारी आहे, हे दिसतं पण तिचा गैरफायदा दुसरं कुणी घेतच नाही, असं म्हणता येत नाही. माणसांच्या चागंलेवाईटपणाविषयी, घटनांच्या खरेखोटेपणाविषयी संदिग्धता, हा या चित्रपटाचा मोठा गुण आहे. नात्यानं घट्ट बांधलेली माणसं स्वार्थ सोडत नाहीत; असं म्हणावं की स्वार्थ हीच माणसाच्या वागण्यामागची प्रेरणा असली तरी त्यामधून नाती तुटत नाहीत, असं हे प्रेक्षकाच्या मनोवृत्तीवर ठरणार! सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंगवून टाकणारा हा चित्रपट निश्चितच एक लक्षात ठेवण्यासारखा अनुभव ठरतो. ‘सॉरी, वी मिस्ड यू’मध्ये समाजाचं चित्र आहे, तिथली पात्रं समाजातली प्रातिनिधिक पात्रं आहेत. त्याच्या उलट ‘हॅपी बर्थडे’मध्ये केवळ एक कुटुंब आहे. ज्यात प्रत्येकाला स्वतंत्र स्वभाववैशिष्ट्य आहे. ‘सॉरी, वी मिस्ड यू’ आपल्याला समाजाविषयी, समाजव्यवस्थेविषयी काहीतरी सांगतो. ‘हॅपी बर्थडे’ आपल्याला माणूस आणि माणसांची नाती, याविषयी.

---***---

‘डिव्हाइन लव्ह’

Divine Love (2019)

धार्मिक सिनेमा प्रॉब्लेम निर्माण करतो. भारतातल्या गोवा, या राज्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात तर विशेष. म्हणजे कसं, तर भारतात जेव्हा महाभारत, रामायण किंवा आणखी काही पौराणिक कथानक दाखवलं जातं; तेव्हा ते कथानक, त्यातली पात्रं आणि त्यांच्या मागचं-पुढचं बरंच काही सगळ्या प्रेक्षकांना माहीत असतं, एका पातळीवर मान्यही असतं. संस्कृतीमध्ये हा धार्मिकपणा झिरपलेला असतो आणि समोर येणारे विविध संदर्भ चटकन ध्यानात येतात. ‘डिव्हाइन लव्ह’ या चित्रपटात ख्रिस्ती धर्माविषयी बरंच काही गृहीत धरलेलं आहे. त्यातले धार्मिक संदर्भ प्रेक्षकाच्या मनात झिरपलेले आहेत, असं मानून चित्रपट बनवलेला आहे. भारतात बघणाऱ्याला हे लागू होत नाही. त्यामुळे चित्रपटाचा आस्वाद घेण्याच्या क्रियेवरच परिणाम होतो. उदाहरणार्थ, आपण कोणापासून गरोदर राहिलो आहोत याचा थांग लागत नाही म्हटल्यावर या बाईला उत्तर देणारं यंत्रच तपासावंसं का वाटत नाही, असा साधा प्रश्न इथल्या प्रेक्षकाला सुचू शकतो. कारण चित्रपटातल्या बाईसमोर उभा ठाकलेला पेचप्रसंग तेवढ्या तीव्रतेने आपल्याला जाणवतच नाही!

चित्रपट २०२७ साली घडतो. आज जसं चौकटीतून पलीकडे जाताना खिशातलं शस्त्र उघड होतं, तसंच या चित्रपटात नुसत्या दरवाजातून प्रवेश करताना बाई गर्भवती आहे की नाही, याची सूचना मिळते. अत्यंत धार्मिक मनाची एक बाई घटस्फोटाची प्रकरणं तपासण्याचं काम करत असते. हे काम करताना शक्यतो लग्न वाचवण्याचा प्रयत्न करते. त्यातून तिला समाधान मिळतं. आपण इतकं पुण्यकर्म करत असताना, ईश्वरावर गाढ श्रद्धा ठेवून असताना आपल्याला अपत्य का नाही, याचा तिला त्रास वाटत असतो. पण ती आणि तिचा नवरा एका कुठल्याशा धार्मिक गटाचे सभासद असतात आणि तिथला नेम म्हणून चमत्कारिक वाटणाऱ्या कृती करत असतात. संपूर्ण नागवेपणाने केलेल्या त्या कृतींमागची धार्मिक भावना जरी जाणवली तरी त्याचं पुरेसं समर्थन झाल्यासारखं वाटत नाही. याचा खुलासा कदाचित भविष्यातल्या बदलामध्ये असेल किंवा ख्रिस्ती धार्मिक विचारात असेल किंवा या दोन्हींच्या संयोगातून होत असेल.

पण जे काही समोर येतं, ते पटत नाही. त्यातला संथपणा कंटाळा आणतो. मात्र संभोगाचं उघड आणि सुस्पष्ट दर्शन चेतावणारं होत नाही याला संगीताप्रमाणे संथपणा आणि पात्रांचे धार्मिक भाव कारणीभूत होतात. म्हणजेच चित्रपट जरी कंटाळवाणा वाटला, त्यातल्या धार्मिक आशयाने जरी भारून व्हायला झालं नाही; तरी हा चित्रपट ‘चित्रपट महोत्सवी’च होय, यात शंका नाही!

(भाग ४)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet