IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ४)

भाग ३

‘माय नेम इज सारा’

My Name is Sara (2019)

युरोपातून येणार्‍या चित्रपटांमध्ये किमान एक चित्रपट तरी दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर हवा, असा जणू नियम आहे. महायुद्ध संपून सत्तर पंचाहत्तर वर्षं उलटली तरी तो इतिहास युरोपियन लोकांच्या स्मृतीमधून बाद होत नाही. सुरुवातीच्या काळात दोस्त राष्ट्रांनी जर्मनांना /जपान्यांना कसं शूरपणे पराभूत केलं, या विषयावर चित्रपट निघत. नंतर युद्धातल्या गुंतागुंती दिसू लागल्या. मग ज्यू लोक, पूर्व युरोपातली जनता, यांचे हाल आणि शेवटी युद्धाची भयानकता, युद्धातला अन्याय यांचं दर्शन होऊ लागलं. पण अजूनही युद्धपट थांबलेले नाहीत. सगळे प्रकार एकाच वेळी निर्माण होत असतात!

‘माय नेम इज सारा’ ही एका ज्यू मुलीची कहाणी आहे. पण पश्चिम युरोपातल्या नाही, पोलंड-युक्रेन यांच्या सीमेवरच्या एका गावातली मुलगी. जर्मन गावात येताहेत, असं कळल्यावर ती आणि तिचा भाऊ पळ काढतात. एकमेकांपासून वेगळ्या दिशेने जातात. तिला आसरा मिळतो; पण ज्यूपण लपवून. एक शेतकरी कुटुंब केवळ डोक्यावर छप्पर आणि दोन वेळ जेवण, या बोलीवर स्वीकारतात. मग तिचं तिथलं आयुष्य सुरू होतं. वय तेरा. तरी जमेल तसे कष्ट उचलते. शेतकरी घरात त्याला इलाज नसतो. नवरा-बायको आणि त्यांचे दोन मुलगे इतकंच कुटुंब. आपल्याला त्यांचं गाव दिसतं, त्या शेतकर्‍याचे कुटुंबीय दिसतात, जर्मन सैनिक दिसतात. शेतकर्‍याचा भाऊ दारुडा आणि दुष्ट. जर्मन सगळेच्या सगळे दुष्ट. पुढे रशियन बंडखोर येतात, तेही दुष्टच वागतात. या दुष्टपणाला तोंड देता देता साराला कष्ट तर उचलावे लागतातच; शिवाय स्वत:ची खरी ओळख उघड होऊ द्यायची नसते. कारण गावातल्या लोकांना मुळात ज्यूंबद्दल प्रेम नसतं आणि ज्यूला लपवणार्‍याला जर्मन सरळ फाशीच देत असतात.

खरं तर हा चित्रपटासाठी पुरेसा थरारक विषय आहे. तो थरार आपल्याला पार्श्वसंगीतातून सतत जाणवून दिला जातो. पण पडद्यावर उलगडणार्‍या कथानकात हवा तेवढा दिसून येत नाही. मग वाटतं, ज्याप्रमाणे पडद्यावर (किंवा रंगमंचावर) घडणारं सगळं शब्दांमधून समजावणं चूक आहे, त्याचप्रमाणे ‘आता भीती वाटून घ्या, आता आनंद, आता प्रेम,’ अशा सूचना पार्श्वसंगीतातून मिळणेसुद्धा चूकच होय. एकूण, चित्रपटात संगीताचं कार्य काय, हा एक घनघोर संशोधनाचाच विषय आहे!
सगळे प्रसंग तुटक वाटतात. एका प्रसंगातून दुसरा उलगडतो आहे, प्रसंगांच्या साखळीतून कथानक पुढे जातं आहे, असं फार होत नाही. उदाहरणार्थ, सारा ज्या गावातून आली असल्याचं खोटं सांगते, तिथली एक म्हातारी तिला भेटते. अर्थात म्हातारी तिला मुळीच ओळखत नाही (मागे टेन्शन व्यक्त करणारं संगीत!). उपस्थित लोकांपैकी काहींना हे खटकतं; पण त्यातून पुढे काहीच होत नाही. पुढे रशियन बंडखोरांना ती सांगते, मलासुद्धा तुमच्यात सामील व्हायचं आहे. त्याचंही पुढे काही होत नाही. ती आणि शेतकरी पुरुष किंवा ती आणि त्याची बायको यांच्यातल्या नात्याचा विकासदेखील समोर येत नाही. ‘मी काय करू शकते, याचा तुम्हाला अंदाज नाही,’ असं ती एकदा म्हणते; पण या उद्गारांना कृतीची जोड मिळत नाही. दुसर्‍या एका ज्यू मुलीशी वाईट वागणार्‍याच्या मानेवर तो झोपला असताना ती सुरा अडकवते, हा प्रतिशोध पोरकट झाला!

शेतकर्‍याच्या बायकोचं गुपित ती उघड करत नाही. का? ते स्पष्ट होत नाही.

मुळात पोलंड-युक्रेन सीमेवर घडणारा हा चित्रपट इंग्रजीतून का, हेसुद्धा समजत नाही. इंग्रजी प्रेक्षकांसाठी बनवला म्हणून हे असं, हे उत्तर पटत नाही. कारण चित्रपटात रशियन लोक रशियन बोलतात आणि जर्मन लोक जर्मन. ‘रशियन, जर्मन परके; इंग्रजी बोलणारे आपले’ ही क्लृप्ती सोयीस्कर वाटते. अशा अनेक गोष्टींचा नीटसा खुलासा होत नाही. खुलासा न होता नाती पुढे सरकली असती, त्यांचा गुंता झाला असता; तरी चाललं असतं. तेही होत नाही. बरंचसं रूढ झालेल्या संकेतांनुसार होत जातं. उदाहरणार्थ, जर्मन क्रूर का? त्याच्यातल्या एकालाही दयामाया का नाही? अशा ठरीव साचेबंद रस्त्याने सिनेमा समोर येतो. शेवटी ‘सत्य घटनेवर आधारित’ असे शब्द येतात. खर्‍या साराचे फोटोही येतात. म्हणून चित्रपटाचे मार्क वाढवायचं काहीच कारण दिसत नाही.

---***---

‘पॅट्रिक’

Patrick (2019)

हा खास फेस्टिवलचा सिनेमा!

गोष्ट लहानशीच. एका न्यूड कॅम्पच्या मालक संचालकाचा मृत्यू होतो आणि त्याच्या (अडतीस वर्षे वयाच्या) हुन्नरी पण मंद मुलाचं काय होतं, याची गोष्ट. मुलाच्या, म्हणजे पॅट्रिकच्या दृष्टीने जास्त महत्त्वाची घटना म्हणजे त्याचा एक हातोडा हरवणे. पॅट्रिकलाच जोडून काही उपकथानकं. बहुतेक सगळे लोक सतत नागडे फिरतात. ते आरंभी बोचतं; पण थोड्याच वेळात त्याची सवय होऊन जाते आणि तिथे लक्षही जात नाही. त्याकडे मुद्दाम लक्ष वेधण्याचा प्रयत्न कॅमेरा करत नाहीच, उलट त्याकडे दुर्लक्ष करण्याच्या सूचना (कॅमेर्‍याद्वारे) मिळत रहातात. पॅट्रिक मंद असला तरी तिथे रहाणारे बाकीचे कुणी देखणे, शरीरसौष्ठव असलेले असे नाहीत. एक प्रसिद्ध गायक येतो, तो माणूस म्हणून साधासुधा. एक सुंदर बाई येते, तर तिची कहाणी तिच्या सुंदरतेला धरून नाही.

चित्रपट ‘विनोदी’ नाही. बाप जाण्यापेक्षा हातोडा हरवणं पॅट्रिकला जास्त लागतं, हा एक विचित्रपणा. त्या हातोड्याचा शोध पॅट्रिकला कुठे कुठे घेऊन जातो; पण त्यात पुनरुक्ती नाही. मुळात हे सगळं इथेच, उन्हाळ्यात नागडं रहाण्याची मुभा देणार्‍या ठिकाणी का घडतं, याला उत्तर ‘इथे का घडू नये?’ हे आहे. नागडेपणात काहीतरी प्रायोगिक, प्रतीकात्मक शोधता येईल; पण त्याची गरज नाही. नागवेपणा मुळीच महत्त्वाचा नाही, हे तर लवकर लक्षात येतं.

कथानक लहानसं असलं आणि कथनाचा वेग संथ असला तरी चित्रपट कंटाळवाणा होत नाही, रेंगाळत नाही. जे घडतं ते रंजकतेसाठी ओढून ताणून रचलेलं आहे, असं मुळीच होत नाही. कॅम्प जंगलात असल्याने वृक्षराजी भरपूर. रंगही शांत, डोळ्यांना सुखवणारे. संवाद जरुरीपुरते. पॅट्रिक तर बोलतच नाही. तरी त्याच्याशी संवाद न झाल्यासारखं कोणाला वाटत नाही. एकच जण पॅट्रिकच्या अबोलपणाचा गैरफायदा उचलू बघतो.

हा चित्रपट बघून आनंद मिळतो. आणि हे फेस्टिवलमध्येच बघायला मिळणार, हे नीट जाणवतं. पण म्हणून चित्रपटात दोष दिसत नाहीत, असं नाही. चित्रपटाची सुरुवात होते, ती घनदाट जंगलाच्या विहंगम दृश्यामधून. दृष्य संपतं, ते पाण्यावर उताणा तरंगणार्‍या पॅट्रिकवर. यातून जगाविषयी, पॅट्रिकविषयी काही सूचन होतंही; पण चित्रपटभर जणू संकटाची वर्दी देत असल्यासारखं जे संगीत मागे वाजतं, त्यातून टेन्शन व्यक्त करण्याची गरज नक्कीच नाही. सुंदर बाई वकील असणे आणि त्याचा नेमका संबंध पॅट्रिकच्या अडचणीशी लागणे, हा योगायोगही घडवलेला. पण या लहान गोष्टी. एकूण अनुभव सुखद, विचारांना सौम्य चालना देणारा. सांकेतिक आशय हुडकायला प्रवृत्त करणारा. पण तसं करण्यापेक्षा जे समोर येतं, तेच किती सुंदर आणि शहाणपणा शिकवणारं आहे, यात समाधान मानावं आणि चित्रपटावर मनची आशयघनता लादून सोप्या सुंदरतेतली मजा पातळ करू नये.

---***---

‘द गोल्डन ग्लोव’

Golden Glove (2019)
हासुद्धा फेस्टिवलचाच सिनेमा; पण दुसर्‍या टोकाचा. एक ओंगळ दिसणारा मनुष्य एका मेलेल्या स्त्रीचं काही करून बघतो आहे, अशी सुरूवात. अगोदर तो ते प्रेत प्लास्टिकच्या पिशवीत कोंबण्याचा प्रयत्न करतो. ते जिन्यावरून गुपचुप उतरवणं अशक्य आहे, हे लक्षात आल्यावर प्रेताचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावतो. हा खून पचवल्यावर तो रेडलाइट एरियातल्या एका बारमधून आणखी एका बाईला घरी आणतो. ते दारू पितात. मग तिच्या जिवंत देहाची जमेल तशी आणि तितकी विटंबना तो करतो. त्याचा भाऊही तसाच. त्यांची भविष्याकडून अपेक्षा अशीच.

ओंगळ दिसणार्‍या, ओंगळ मनाच्या माणसाची गोष्ट. सतत शिसारी आणते. हे कशाला बघावंसं वाटेल? चित्रपटाचा दिग्दर्शक फती अकिन नामवंत आहे. हा त्याने केलेला एक प्रयोग आहे, इतकं म्हणून सोडून द्यावं. ज्यांना हे बघायची इच्छा आहे त्यांनी बघावं. बाकीच्यांनी सोडून द्यावं.

(भाग ५)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet