IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (समारोप)

कसा झाला महोत्सव?

Spring, Summer, Autumn, Winter... and Spring (2003)

१.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकडून काय अपेक्षा ठेवावी?

एका देशाच्या दर वर्षी होणार्‍या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी जगभरच्या चित्रपटांमधून निवड करणे, हे कठीण काम तर आहेच; शिवाय निवड कशीही केली तरी जगभर निर्माण होणार्‍या चित्रपटांची संख्या आणि त्यातलं वैविध्य पहाता चिकित्सक जाणकार, समीक्षक आणि जगभरच्या चित्रपटांचं भान बाळगणारे रसिक यांपैकी फारच कमी लोकांचं समाधान होणार, यात शंका नाही. अशा वेळी काही किमान निकष सांभाळलेले जाणवावेत, ही माफक अपेक्षा पूर्ण झाली तरी निवड योग्य ठरेल. हे किमान निकष कोणते? एक म्हणजे चित्रपट ‘नवे’ असावेत. म्हणजे, महोत्सवात एखाद्या नामवंत चित्रपट दिग्दर्शकाच्या वा नटाच्या/नटीच्या कलाकृतींचं किंवा एखाद्या देशातल्या चित्रपटांचं प्रातिनिधिक दर्शन असतं; तसले प्रकार सोडता ताजेपणा, हा एक निकष मानला जावा. कारण चित्रपट ही तंत्रावर अधिकाधिक विसंबत गेलेली कला आहे आणि तंत्रज्ञानात इतक्या झपाट्याने बदल, सुधारणा होत आहेत की पाचेक वर्षांपूर्वीच्या चित्रपट कलाकृती जाणकारांना जुन्या वाटण्याची शक्यता आहे. त्यांची आणि बदललेल्या नव्या तंत्राद्वारे बनवलेल्या चित्रपटांची परस्परांमध्ये तुलना त्यांना समान पातळीवर मानून करता येत नाही.
समाजमूल्यंसुद्धा बदलत जातात. चित्रपट जरी जुन्या किंवा पुराण्या काळात घडणाऱ्या घटनांवर आधारलेला असला; तरी त्या घटनांचा अन्वय वर्तमान मूल्यांवरच लावला जात असतो. उदाहरणार्थ, आजच्या जमान्यात सतीचं उदात्तीकरण करणारा चित्रपट कोणी काढला, तर त्याचा सरळ अर्थ ‘प्रेक्षकांमध्ये अजून सतीला उदात्त मानणारी मूल्यव्यस्थाच रुजलेली आहे,’ असा काढता येतो. माणसामाणसातल्या संबंधांचं दर्शन दिग्दर्शक ज्या दृष्टिकोनामधून दाखवतो आहे, त्यापेक्षा चित्रपटाचा अनुभव घेणार्‍या प्रेक्षकाचा दृष्टिकोन भिन्न असण्यामागे दोघांच्या समकालीनत्वातलं अंतर, हे कारण असू नये. तरच तो काळ आणि हा काळ, यामधल्या दृष्टिकोनांमधल्या फरकामागे वर्ग, परंपरा, वगैरे कारणं शोधण्याला काही अर्थ राहील.

या निकषावर २०१९ चा हा महोत्सव ‘पास’ होतो. चित्रपट एकदम नवे होते. त्यांमध्ये दाखवण्यात आलेली कला ‘आजची’ होती. त्यातल्या दर्शनाशी मतभेद व्यक्त करायचे झाले, तर कालानुरूप भिन्न जाणिवा, हे कारण देता येणार नाही.

वैविध्य हा आणखी एक निकष चित्रपटाच्या निवडीसाठी सुचतो. वैविध्य अनेक प्रकारचं असू शकतं. भौगोलिक वैविध्य (युरोप, लॅटिन अमेरिका, पूर्व आशिया, आफ्रिका, ...), विषयांचं वैविध्य (धार्मिक, आध्यात्मिक, गुन्हेगारी, सांगितिक, ... या वैविध्याची तर मांडणीदेखील विविध पातळीवरून करता येईल), तंत्रामधील वैविध्य, वगैरे. याही बाबतीत हा महोत्सव कमी पडला, असं वाटत नाही. मी कोणी समीक्षक नाही, अभ्यासू निरीक्षकही नाही. कुतूहल आणि स्वीकारशील मोकळं मन घेऊन काही वर्षं इथे येतो आहे, एवढाच माझा अधिकार, हे लक्षात असू द्यावं.

बाकी व्यवस्थापनाच्या बाबतीतील अपेक्षांमध्ये मात्र महोत्सव नापास झाला. महोत्सवाचं हे पन्नासावं वर्ष. पन्नास वर्ष व्यवस्थापनात जरी तीच माणसं राहिलेली नसली तरी संस्था म्हटल्यावर कामकाजात एक सलगता, अनुभवांचं संचित पुढे नेणारी परंपरा असण्याची अपेक्षा चुकीची नाही. पण अजूनही व्यवस्थापनात अनुभवातून अपेक्षित असलेली सफाई जाणवली नाही. चित्रपट महोत्सव प्रेक्षकाविना अस्तित्वातही येऊ शकत नाही; त्यामुळे नियम करताना, त्यांची अंमलबजावणी करताना प्रेक्षकाचा विचार केंद्रस्थानी असायला हवा. तसं झालं, असं म्हणवत नाही. एक निगेटिव घटक दुरुस्त करण्यासाठी केलेला बदल दुसर्‍या निगेटिव घटकाला जन्म देत असेल, तर व्यवस्थापनात लवचिकता नाही, तत्परता नाही, असंच म्हणावं लागेल.

महोत्सव गोव्यात होतो. आयोजक म्हणून जरी केंद्र सरकारच्या सूचना-प्रसारण मंत्रालयाचं नाव असलं तरी गोवा एंटरटेनमेंट सोसायटीसुद्धा महोत्सवातील भागीदार आहे. संपूर्ण पणजी शहर या महोत्सवाच्या निमित्ताने नटलेलं असतं. समोरच्या फूटपाथवर विविध प्रकारचे स्टॉल्स लागतात, ज्यांमध्ये स्थानिक कलागुणांचं दर्शन घडतं. अशा वेळी त्या कलेबरोबर गोव्याच्या खाद्यसंस्कृतीची झलक अनुभवायला मिळावी, ही अपेक्षा वावगी म्हणता येणार नाही. काही वर्षांपूर्वी हा अनुभव मिळत होता. या वर्षी कठीण झाला. सकाळी आठ-साडेआठपासून रात्री साडेबारा-एकपर्यंत चित्रपट चालू असतात. सगळे चित्रपट बघणे शक्य नसलं तरी दिवसाला तीन-चार-पाच चित्रपट बघणारे काही पठ्ठे असतात. राष्ट्रीय पातळीवरच्या या महोत्सवाला दुरून आलेले असतात. त्यांना सोबत खाणं ठेवणं सर्ववेळ शक्य नसतं. अशा वेळी आयोजकांनी त्यांना सवलतीमध्ये खाणं उपलब्ध करावं, असा आग्रह धरला नाही तरी खाद्यवस्तूंच्या किंमती बाहेर आहेत, त्यापेक्षा फार जास्त असू नयेत. यावेळी आयोजकांनी महोत्सवाला हजेरी लावणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येबाबत दिशाभूल केल्याची तक्रार काही स्टॉलधारकांकडून ऐकू आली. स्टॉलचं भाडं वसूल होणंही शक्य नाही, असा त्यांचा एकूण सूर होता. दर वर्षी स्टॉलधारक नवे दिसतात, कारण मागचे पुन्हा येऊ धजत नाहीत, असं तर नाही?

२.
महोत्सवाला हजेरी लावण्याचा अर्थ 'गोवा एन्जॉय करणे, हा नसतो. चित्रपट बघणे, हाच असतो. महोत्सवातले जे चित्रपट पाहणं झालं, त्यावरून सुचलेली ही काही निरिक्षणं.

१. महोत्सवी चित्रपटांमध्ये नग्नता असणे, यात सांगण्यासारखं काही नाही. पण अजूनपर्यंत समोरून नग्न पुरुषदर्शन क्वचित झालं होतं. यावेळी ते मुबलक होतं. नग्नता म्हणजे मनुष्याची नग्नता; केवळ स्त्रीची नग्नता नव्हे, हे लक्षात आलं. तरी चित्रपटांमध्ये नग्न पुरुष बघण्याची डोळ्यांना सवय (अजून झालेली) नसल्याने हा मुद्दा आवर्जून सांगावासा वाटला! सांगण्यासारखी आणखी एक गंमत आहे. ‘डिव्हाइन लव्ह’ या चित्रपटात स्त्री आणि पुरुष, अशा जोड्यांची नग्नता आहे. ते एकमेकांशी जे करतात, ते ठळक करण्यासाठी ही नग्नता काम करते. ‘सिनॉनिम्स’ मध्ये नायक नग्न आहे. त्याचं व्यक्‍तिमत्व, त्याचं मन, हाच चित्रपटाचा विषय आहे आणि विषयाच्या मांडणीसाठी त्याला नग्न दाखवलं आहे. ‘पॅट्रिक’ची बाब वेगळी आहे. या चित्रपटाची गोष्ट एका न्यूडिस्ट कँपमध्ये घडते. जवळ जवळ सगळे सदासर्वदा नग्न. पण कथानकातल्या तपशिलांमध्ये त्या नग्नतेचा सहभाग नाही. ‘पॅट्रिक’मधल्या नग्नतेमधून तुम्ही हवं तर सांकेतिक आशय शोधू शकता. पण एक बाई नवी येते आणि काउंटरच्या मागून बाहेर आलेल्या पॅट्रिकला बघून म्हणते, ‘यू आर नेकेड!’ यावर तो उत्तरतो, ‘हूं!’ इतकंच. तिला जेव्हा कळतं, की हा न्यूडिस्ट कँप आहे तेव्हा ती त्याला विचारते, मीसुद्धा नागडंच फिरायला हवं का? ज्यावर तो म्हणतो, ‘तशी अट नाही. तुला नसेल नागडं व्हायचं तर नको होऊस!’

हे पॅट्रिकचं उत्तर चित्रपटाच्या आशयाच्या जास्त जवळ आहे, असं मला वाटतं. शरीर नागडं असणं नसणं हे बिनमहत्त्वाचं आहे!

२. नग्नतेप्रमाणे पुरुषांपुरुषांचे आणि दोन स्त्रियांमधले शारीरिक संबंध दिसणे, हीसुद्धा महोत्सवी चित्रपटांच्या संदर्भात लक्षणीय गोष्ट नव्हे. यावेळचा (मला जाणवलेला) वेगळेपणा असा, की असा संबंध त्या चित्रपटाच्या केंद्रस्थानी होताच, असं नव्हतं! नायकाचा एकाशी समलिंगी संबंध असतो आणि ते जेव्हा अनेक वर्षांनी भेटतात, तेव्हा कडकडून मिठी मारून एकमेकांच्या ओठांचं खोल चुंबन घेतात. पण तेवढंच. त्यातून चित्रपटाला दिशा मिळत नाही, किंवा अगोदर घडलेल्या ठसठशीत घटनांची परिणती म्हणून ते चुंबन घडतं, असंही नाही. चित्रपट त्याच्या गतीने, दिशेने जात रहातो. नायकाच्या व्यक्‍तिमत्वाला आणखी एक पैलू या चुंबनामुळे मिळतो.

हे जाणवलं. समलिंगी संबंध ‘नॉर्मल’ असतात, हे मूल्य प्रस्थापित झालं आहे, अशी घोषणा जणू ऐकू आली!

३. महोत्सवी चित्रपट हा गंभीर, खळबळजनक, हादरून टाकणारा अनुभव असायलाच हवा, असं मुळीच नाही. तो थिल्लर, गंमतीदार असू शकतो. असं आवर्जून दाखवणारे चित्रपट दर वर्षी बघायला मिळाले; या वर्षी एकही मिळाला नाही. कदाचित माझ्या बघण्यातून सुटला असेल; पण निखळ विनोद, प्रस्थापित मूल्यांची मजेमजेत टर उडवणारा चित्रपट महोत्सवात उठून दिसतो. तसं यावेळी अनुभवायला मिळालं नाही. ‘पॅरासाईट’ त्या रस्त्याला जातो आहे, असं वाटता वाटता आपल्याला भलतीकडे नेऊन घालतो.

४. महोत्सवातले चित्रपट ‘वेगळे’ असतात म्हणजे त्यांचे विषय वेगळे असतात, त्यांचं म्हणणं वेगळं असतं, ते जास्त धीट असतात, वगैरे खरं असतं; त्याचप्रमाणे त्यांची निवेदनशैली वेगळी असू शकते. काही वेळा ती प्रचंड कंटाळवाणी होऊ शकते. चित्रपट या कलामाध्यमाचा अभ्यासक असा चित्रपटसुद्धा मन लावून, डोळ्यांवर झापड येऊ न देता बघू शकतो. मी अजून त्या कोटीचा सदस्य झालेलो नाही. त्यामुळे डोळ्यांवर झापड येत असताना हट्टाने प्रेक्षागृहात बसून रहाण्यात मला काही अर्थ दिसत नाही. दर वर्षीप्रमाणे याही वर्षी असे चित्रपट सापडले. दर वर्षीप्रमाणे त्यांचं प्रमाण फार कमी होतं आणि ते वाईटच होते, असा निर्णय मी देऊ शकत नाही. 'द सेव्हन लास्ट वर्डस' या चित्रपटाचं नाव ख्रिस्ताच्या अंतिम घटिकांशी संबंधित आहे, हे माहीत नसल्याने (आणखी नीट मांडायचं तर त्या अंतिम घटकांचा ठसा मनात खोलवर रुजलेला नसल्याने) हा चित्रपट कदाचित नीटपणे बघता आला नसेल. पण प्रतीकात्मक अर्थ फार वेळ (निदान मला तरी) काढत बसता येत नाही.

५. महोत्सवात नवीन काहीतरी आस्वादून बघायचं असतंच. उलट, जे बघण्यासाठी इतर वेळी रस्ता वाकडा करावाच लागेल, असं महोत्सवात आयतं समोर येत असताना, ते टाळणं चुकीचं ठरतं. पण वाकड्या वाटेने वारंवार गेल्यास ती वाट वाकडी रहात नाही; तसंच ‘नवीन’ फार काळ नवीन रहात नाही. त्यातून ठोकताळे बनतात. कोणाकडून काय मिळेल, याचा अंदाज करता येतो. लागोपाठ दोन वर्षं ऋतुपर्ण घोष या दिग्दर्शकाचे चित्रपट इतके टुकार निघाले की पुन्हा त्याच्या वाटेला जायचं नाही, असा कानाला खडा लावायला झालं. कोरियन, चिनी, फिलिपिनो (जपानी नाही) चित्रपटात फार रक्‍तपात असतो. याला आतापर्यंत फक्‍त एक अपवाद सापडला आहे; तो म्हणजे ‘स्प्रिंग, समर, ऑटम, विंटर’ हा अप्रतिम चित्रपट. पण त्याच किम किडुक या दिग्दर्शकाचा पुढल्या वर्षीचा चित्रपट (बहुधा 'मदर') कोरियन पठडीतला निघाला! रक्‍ताने माखलेला चित्रपट बघणे जर त्रासदायक होत असेल, तर या देशांपासून लांब राहिलेलं बरं.

पण या वर्षी ‘व्हाय डोण्ट यू जस्ट डाय’ या रशियन चित्रपटाने बर्‍यापैकी टपलीत मारली. या चित्रपटात भरपूर रक्‍तपात आहे; तरी मी तो मजेत बघितला. महोत्सवात रक्‍तपात बघून माझी नजर मेली आणि आता त्रास होईनासा झाला, असा अर्थ यातून काढता येईल. पण मी हा अर्थ टांगून ठेवला आहे. पुढच्या वर्षीच्या अनुभवावरून तो स्वीकारायचा की नाही, हे ठरेल. तोपर्यंत रशियन लोकांची विनोदबुद्धी उच्च कोटीची असते आणि रक्‍तपातातही ते नीट विनोद करून दाखवू शकतात, असं म्हणणार.

नेटफ्लिक्स, वगैरे येण्यापूर्वी परदेशी चित्रपट, याचा ढोबळ अर्थ अमेरिकन चित्रपट, हॉलिवुडचे चित्रपट असा होता. त्यामुळे युरोपियन, अगदी ब्रिटीश चित्रपटही वेगळे असतात, असं मत प्रथमदर्शनी होण्याची शक्यता असते. पण महोत्सवात युरोपियन चित्रपट पुष्कळ बघायला मिळतात. ते पाहत गेलं की त्यांचं 'वेगळेपण' बाजूला राहून अमेरिकन चित्रपटच कसे वेगळे असतात, हे पक्‍कं होतं! अमेरिकन चित्रपटाला स्मार्ट असल्याशिवाय चैनच पडत नाही. त्यातलं सादरीकरण, त्यातला आशय, त्यातल्या पात्रांची देहबोली, सगळं कसं स्मार्ट. म्हणजे ते वाईटच असतं असं नाही. पण ‘कला म्हणजे जीवन नव्हे, कला म्हणजे जीवनाचं प्रतिबिंब’ हे कितीही घोकलं तरी अमेरिकन चित्रपटातल्या, वास्तवाशी फारकत घेणाऱ्या, ‘प्रातिनिधिक’ व्यक्‍तिरेखा नंतर नंतर चक्‍क बोअर होतात. महोत्सवात युरोपियन (आणि इतर) चित्रपटांच्या गर्दीत एखादा अमेरिकन चित्रपट खपून जातो; पण ‘गर्दीत एखादा’. तेवढंच. ‘हनीबॉय’ मुळीच वाईट नव्हता. पण अमेरिकेत सर्वसामान्य असणं दिसणं इतकं तुच्छ मानलं जातं का?

याउलट युरोपियन चित्रपटात ‘माणसं’ असतात. त्यांची देहबोली जगात वावरणार्‍या जिवंत, खर्‍या माणसांची असते. त्यात कुणी सुंदर, वेगळा(ळी) असू शकतं; पण देहबोली माणसाची असते. अमेरिकन नसते. नको ती अमेरिका, असं महोत्सवात असताना ठामपणे वाटतं.

इराणी, पूर्व युरोपातले चित्रपट यांच्यातही स्वत:ची अशी वैशिष्ट्यं आहेतच. आशिया म्हणजे भावनांचा जास्त ओलावा, हे विधान सरसकट वाटलं, तरी खरं आहे.

६. हे माझं आठवं की नववं वर्ष. इतकी वर्षं आंतरराष्ट्रीय महोत्सवाला येऊन आणि आठेक दिवसांत वीस ते तीस 'चांगले', 'वेगळे', चित्रपट पाहून माझी अभिरुची किती उंचावली कल्पना नाही; पण चित्रपटाकडून धक्‍का खाण्याची शक्यता खूप कमी झाली. त्यामुळे असेल कदाचित पण या वर्षी ज्याला धक्‍कादायक म्हणता येईल, असा चित्रपट पहायला मिळाला नाही.

असो. इतक्या वर्षानी आता कुठे चित्रपटाच्या निवेदनात रंगून गेलं असताना संगीत, प्रकाश, वातावरण अशा घटकांकडे लक्ष जाऊ लागलं आहे. चित्रपटाचा आस्वाद घेत असताना त्यांची नोंद थोड्याफार प्रमाणात करता येऊ लागली आहे. तरी घोटाळे होतात. ‘माय नेम इज सारा’ हा चित्रपट मला फार काही थोर वाटला नाही. ‘सत्य घटनेवर आधारित!’ असं म्हणून खोटे मार्क मिळवण्याचा प्रकार खटकला. चित्रपटांचा दर्दी असलेला एक मित्र भेटला, तो या चित्रपटाने भारावून गेला होता. ‘जवळ जवळ सगळा चित्रपट नॅचरल लाईटमध्ये शूट केला आहे!’ असं म्हणाला आणि मला खजील करून गेला. पण एक ‘पॅरासाइट’ येतो आणि ‘तंत्राने कितीही बढाई मारू दे; आशय इज किंग!’ यावर शिक्‍का मारून जातो.

IFFI च्या मागोमाग केरळ, मुंबई, पुणे, असे महोत्सव होत असतात. IFFIत आवडलेला, लक्षणीय वाटलेला चित्रपट पुन्हा बघण्याची संधी तिथे मिळू शकते. त्यातून रियल टाईममध्ये घेतलेल्या अनुभवातून गोळा केलेलं चित्रपटाविषयीचं मत. इम्प्रेशन दुरुस्त करणं, त्याला दुजोरा मिळणं शक्य असतं. पण त्यासाठी चित्रपट माध्यम, हा मनात रेंगाळणारा प्रमुख छंद असावा लागतो. किंवा हाताशी भरपूर मोकळा वेळ लागतो. इतक्या वेळी ठरवून मला हे अजून जमलेलं नाही. हे जमवलं तर लिहिण्यात जास्त अधिकार येईल!

(समाप्त)

(मागील भाग - भाग ९)
(भाग पहिला)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet