मलानाच्या गोष्टी - भाग १

त्याच्या खांद्याला भलीमोठी ट्रेकर्सची सॅक होती. ती त्याने गाडीच्या डिकीत ठेवली. ATM मधून पैसे काढले. समोरच्या दुकानातून चार चॉकोलेट चिप कूकीस विथ एक्सट्रा चॉकोलेट सॉस उचलल्या आणि गाडीत पुढच्या सीट वर येऊन बसला. ड्रायव्हरने गाडी सुरु केली. तो स्थिरावला. कूकीजचा डब्बा त्याने डॅशबोर्डवर ठेवला. लेदर जॅकेटच्या डाव्या खिशातून सिगारेटचं पाकीट काढलं. त्यात रोलिंग पेपर होते. हलक्या हाताने त्यातला एक त्याने वेगळा केला. त्याच पाकिटाचा एक जाडसर तुकडा घेऊन त्याचा रोच तयार केला. सिगरेटच्या पाकिटातली एक अर्धी सिगरेट होती त्यातला तंबाखू त्या रोलिंग पेपर वर पसरवला. उजव्या खिशातून नुकताच घेतलेला स्टफ काढला. अस्सल खवय्याने मसालेदार मटणाचा गंध घेऊन नुसतीच मान हलवून पसंतीची पावती द्यावी तसं काहीसं त्याने केलं. उजव्या हाताच्या दोन बोटांनी त्यातला थोडा स्टफ काढून , मळून त्याने तो रोलिंग पेपरवर घातला. एखाद्या हलवायाने जितक्या सराईतपणे बुंदीचे लाडू वळावे तितक्याच सहजपणे त्याने रोलिंग पेपर रोच भोवती गुंडाळला आणि रोल तयार केला. लाईटरने रोल पेटवत पहिला कश घेतला आणि तो उद्गारला , "ओह मलाना स्टफ मॅन". दुसरा कश हवेत सोडता सोडता, टिपिकल मल्याळी अक्सेंट मध्ये मागे वळून म्हणाला, "हेय ब्रो , यु वॉन्ट अ पफ आ?". अर्थातच बायकोसमोर मी स्टफ मारणार नव्हतोच. त्यामुळे चेहऱ्यावर शक्य तितके "मी नाही मारत ब्वा " असे भाव ठेवून मी नाही म्हणालो. एव्हाना आमची गाडी कसोलच्या चुंगुल मधून बाहेर पडत खडबडीत आणि वळणावळणाच्या रस्त्यावरून मलानाच्या दिशेने निघालेली होती.
तर मलाना!!!! बरंच काही ऐकलेलं या गावाबद्दल. माणूस जनरली सिमला , कुल्लू , मनाली करतो हनिमूनला. आम्ही सिमला , कुल्लू गाळलं आणि कसोलला पोहोचलो. तरीसुद्धा मलानाला जाऊ असं वाटलं नव्हतं. जमदग्निंच्याच मनात असणार पण बहुदा. नाहीतर रात्री रौंराव वाहणारी नदी सकाळी कशी दिसते हे बघायला नदीकाठाशी उतरावं काय , मग त्याच काठाने एका बाजूला टुमदार घरं आणि दुसऱ्या बाजूने उंच पाइनची झाडं बघत चालावं काय, चालता चालता आणि नदीच्या अंगावर बांधलेल्या झुलत्या लाकडी पुलांवरून कधी या काठावर तर कधी त्या काठावर करता करता दोनेक किलोमीटर दूर यावं काय , मग हमरस्त्याशी पोहोचल्यावर हात दाखवताच एका अल्टोवाल्याने थांबावं काय , तो मलानाला चाललाय ऐकल्यावर आम्ही दोघांनी चलो फिर हमें भी ले चलो म्हणत क्षणार्धात हॉटेल ऐवजी मलानाचा रस्ता पकडावा काय. माझ्या डोळ्यांसमोरून मागचा अर्धा तास तरळला. "वैसे शादीशुदा लोग ज्यादा नहीं आते यहांपे." ड्रायव्हरच्या शब्दांनी मी भानावर आलो. "ओह यु गाईझ आर मॅरीड ? ग्रेट" समोरच्या सीट वरचा अचानक आयुष्याच्या सत्याची जाणीव झाल्यासारखा म्हणाला. एव्हाना त्याचा जॉईंट संपला होता. त्याने कूकीज काढल्या आणि मला एक ऑफर केली. मी नाही म्हणणार नव्हतोच. बाहेर नजर टाकली आणि मलाना जलविद्युत प्रकल्पा अंतर्गत चाललेलं काम दिसलं. विकासाच्या खाणाखुणा मागे टाकत आम्ही पुढे निघालो. डोंगर पोखरून काढलेले वळणावळणाचे खडबडीत रस्ते, त्या वळणांना "कॉम्प्लेक्स" देत तितक्याच वळणावळणाच्या पात्रातून खळाळत वाहणारी पार्वती नदी यांच्या संगतीनं आम्ही चाललो होतो.
सोबत ड्रायव्हरची कॉमेंट्री होतीच. ड्रायवर तिथलाच कसोल जवळच्या गावातला. मलाना बद्दल , तिथल्या लोकांबद्दल, तिथल्या स्टफबद्दल तो सांगत होता. त्याला ते नेहमीचंच असावं. "अब देखो ये जो लोग हैं अपने आप को पवित्र मानते हैं. देखा जाये तो हम भी ब्राह्मण हैं लेकिन ये खुदको हमसे भी उंचा मानते हैं."

मला आमच्याकडचे चित्पावन आठवले. हे मलानावासी म्हणजे तर थेट चित्पावनांच्या आजोबांचेच वंशज म्हणा. आमचा ड्रायव्हर तसा शिकलेला. आई वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक. कुल्लू मधल्या एकमात्र मोठ्या डिग्री कॉलेजातून इंग्लिशमध्ये BA केलेला. पण नोकरी नाही म्हणून कॅब चालवायला घेतली. कसोल , कुल्लू, मलाना , पार्वती वॅली सगळीकडे टूरिस्ट्सना फिरवायचं आणि फिरवत फिरवता गप्पा मारत मन मोकळं करायचं. अर्थातच कॅब चालवण्यातून पैसे बऱ्यापैकी मिळतोच पण हिमाचलच्या त्या निसरड्या , वळणदार रस्त्यांवरून गाडी चालवायची म्हणजे रिस्कच. त्याला ते हि सवयीचंच झालेलं. त्यामुळे आम्ही पार वाकून वाकून निसर्गाची उधळण पाहत असताना त्याच्या चेहऱ्यावर मात्र , "बचपनसे येही देख राहा हूं" असेच भाव असायचे. साधारण दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका कमानीपाशी पोहोचलो. त्यावर लिहिलं होतं , "मलाणा गांव के लिये रस्ता". आम्ही खाली उतरलो. समोरच्या सीट वर बसलेल्या मल्याळी मित्राची अवस्था , "आजि म्या स्वर्ग पहिला" अशी झाली होती. दोन दिवस मलाना मध्ये राहायचा प्लॅन होता त्याचा. आम्ही मात्र गावात चक्कर टाकून परत येणार होतो. आमच्या मित्राने पूजे आधी अगरबत्ती लावावी तसं एक रोल तयार केला आणि पहिला पफ मारून पुढे निघाला. मी नजर टाकली. एका छोट्याश्या टेकडीवर दोन तीन घरं होती. खास हिमाचलच्या "काथ कुनी " पद्धतीने बांधलेली. फक्त दगड आणि लाकूड यांचा वापर करून. बाकीचा गाव त्या टेकडीच्या कुशीत लपलेला होता. आम्ही कमानीसमोर उभे होतो आणि छोटीशी पायवाट आम्हाला बोलवत होती. मलानाकडे. इथली माणसं , इथली संस्कृती, इथलं जगणं याबद्दल ऐकलेलं होतं, वाचलेलं होतं आणि तेच अनुभवायला मलाना आम्हाला बोलवत होतं. पायवाटेवरून आम्ही निघालो तेव्हा दुपारचा एक वाजला होता. (क्रमश:)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नुसतं वाचूनच बुंगल्यासारखं झालं.
येऊद्या अजून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. आणतोय पुढचा भाग लवकरच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभिषेक राऊत

छान!

>>>
अस्सल खवय्याने मसालेदार मटणाचा गंध घेऊन नुसतीच मान हलवून पसंतीची पावती द्यावी तसं काहीसं त्याने केलं
>>>
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0