सोमा टक्रीकर -- एक कालवश मर्मस्पर्श

Touch

(बॉल्टिमोर मराठी मंडळाच्या दिवाळी २०१९ अंकात मूळ प्रकाशित अद्भुत-भविष्य-रम्य कथा, जालावर अन्यत्र सहप्रकाशित)

… (T)ouch … gives us our sense of 'reality'… rainbows, reflections in looking glasses, and so on (cannot be touched) … our whole conception of what exists outside us is based on the sense of touch. -- Bertrand Russell in ABC of Relativity

-------

बॉल्टिमोर, सोमवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०३५.

मागच्या शनिवारी, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सोमा टक्रीकर विलीन झाले, परंतु जालविश्वात या बातमीचे पाच लाखापेक्षा कमी पुनःस्पर्श झाले. सहस्रावधी अनुयायी असलेल्या एकाही मतनेत्याने बातमी पुढे ढकलली नाही. त्यामुळे इथल्या वाचकांना टक्रीकरांच्या अंताबाबत कुणकुणही नसेल. प्रस्तुत लेखक ओळखतो की आजच्या बहुतेक जालनागरिकांना मागमूस नसणार की टक्रीकर हेच फील-द-फ्लो इन्कॉर्पोरेटेड वि. (अलाबामाचे अटोर्नी जनरल) कुचेली या सर्वोच्च न्यायालयातल्या महत्त्वाच्या केसच्या मुळाशी होते. थोरल्या पिढीच्या शब्दभांडारालाही जुनाट आणि बुरसट म्हणणारी आजची पिढी स्वहितार्थ तरी या लेखाकडे लक्ष देईल, अशी बारीक आशा अजून तग धरून आहे, म्हणून हा लेखनप्रपंच.

टक्रीकरांच्या एकाकी लढ्यामुळे आज स्पर्श-तंत्रज्ञानाच्या बाजारपेठेतल्या सोयी आणि कलाकृतींची रेलचेल सुकर झाली. ती बिकट वाट काढत असताना बघ्यांनी टक्रीकरांना गलिच्छ नावे ठेवावी, आणि पुढे तिथेच बनलेल्या राजरस्त्यावरून चालणाऱ्यांनी टक्रीकरांचे नाव स्वच्छ विसरावे, यास दैवदुर्विलास न म्हणावे, तर काय म्हणावे?

प्रस्तुत लेखक कोण्या एका टक्रीकरांकरिता आदरार्थी बहुवचन वापरतो असे वाचकांना वाटणे वावगे नाही. तरी सोमा टक्रीकर म्हणजे म्हणजे नेमके कोण आणि किती हे आपल्याला आजही ठाऊक नाही. त्यांच्या पहिल्या वकिलाने अफवा पसरवली होती, की ट.क्री.क.र. म्हणजे 'ट'च 'क्री'एटर्स 'क'लेक्टिव्ह ('र'जि.) संघटनेच्या नावाचे लघुरूप आहे. पण या वकिलाच्या सनसनाटी खोटेपणाबाबत बभ्रा झाला तेव्हापासून त्याच्या कुठल्याही वक्तव्यावर विश्वास ठेवणे कठिण आहे. अशा नावाच्या संघटनेची नोंदणी यू. एस.मधल्या कुठल्याही राज्याच्या कार्यालयात कोणाला सापडलेली नाही. टक्रीकरांनी स्त्री आणि पुरुष स्पर्शरूपे वठवली होती, म्हणून टक्रीकर कमीतकमी दोन व्यक्ती असण्याबाबत आपण खात्री बाळगू शकतो, इतकेच -- दोनपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास किती, ते आपल्याला ठाऊक नाही.

काही अभ्यासकांचे मत आहे, की टक्रीकरांच्या "सोमा" नावात आल्डस हक्सले(Aldous Huxley)च्या जुन्या विस्मृतप्राय कादंबरीचा संदर्भ आहे , ते ठीकच आहे. पण त्या कादंबरीतल्या Brave New Worldमध्ये समाजाला गुंगीत गुलाम करणारे नशेचे औषध "सोमा" होते, त्याच प्रमाणे टक्रीकरांच्या कामोत्तेजक स्पर्शकृती एका प्रकारची नशा चढवायचे, असा दुवा ते अभ्यासक पुढे ओढूनताणून जोडतात; प्रस्तुत लेखकाला हा संबंध बादरायण वाटतो. त्या कादंबरीतला वेगळाच, फीली (feelie)चा तपशील टक्रीकरांशी जास्त संलग्न आहे. आज “फीलीफ्लो” शब्द रोजच्या व्यवहारातला आहे, पण या शब्दाच्या व्युत्पत्तीचे मूळ त्या कादंबरीतला “फीली” शब्द होय. हक्सलेच्या काळात पारदर्शिकेतून प्रकाशित मूव्ही (movie, चलच्चित्र)च नवीन तंत्रज्ञान होते, त्या काळात खुर्चीचे हात घट्ट धरणाऱ्या मुठींना स्पर्शसुख देणाऱ्या फीलीची कल्पना हक्सलेने केली, ही त्याच्या प्रतिभेची दूरदृष्टी. परंतु तिथे त्याच्या कल्पनाशक्तीची परिसीमा होती -- उदाहरणार्थ, त्याच्या एका वर्णनानुसार मूव्हीच्या पडद्यावर दिसणाऱ्या संभोगाच्या दृश्यांना पूरक असा केसाळ अंथरुणा(fur rug)चा स्पर्श वळलेल्या मुठींना होत असे. त्याच्या फीलीमध्ये स्पर्शाचे स्थान इतके मर्यादित आणि गौण होते.

फीली कलात्मक कमी आणि कामोत्तेजक जास्त असणार, हे भाकित कादंबरीत केल्याबाबत मात्र हक्सलेचे विशेष कौतूक नाही. फक्त स्पर्श-तंत्रज्ञानाच्या उदयाच्या पायरीवर असा एकांगी कल असणार, पूर्ण विकसित तंत्राच्या काळात नसणार, हे त्याने त्याच्या काळात ठाऊक असलेल्या इतिहासावरून सुद्धा ओळखले नाही. शतकानुशतके हेच दिसते, की कुठलेही नवे माहिती तंत्रज्ञान प्रयोगशाळेबाहेर पडल्यापडल्याच्या अपरिपक्व स्थितीत जुन्या तंत्राशी स्पर्धा करू शकत नाही कारण जुने तंत्रज्ञान सहजप्राप्य आणि सोयीस्कर असते. पण जुन्या तंत्राच्या अतिपरिचयाने संवेदना बोथट झालेले कामुक ग्राहक “नव्या अनुभूतीचा स्रोत” म्हणून कच्च्या तंत्रज्ञानाच्या बदल्यात रोख पैसे देण्यास तयार असतात. छापखान्याच्या शोधानंतर उत्तान कथांची छपाई, छायाचित्रणाच्या शोधानंतर वेश्याचित्रण ("pornography") फोफावणे ही मध्ययुगीन वानगी होत; महाजालाच्या सुरुवातीच्या काळात बहुतेक जालव्यापार घाट्यात जात असताना उत्तान चित्रफितींचा जालव्यापार मात्र नफ्यात चालत होता, हा तर गेल्या ३० वर्षांतला आपला ताजा अनुभव आहे. (थोरल्या पिढीतल्या साक्षीदाराचे स्वानुभव आणि प्राचीन आख्यायिका यांच्यातला फरक न जाणणारे "३० वर्षांपूर्वी म्हणजे ताजे नव्हे, शिळे" असे म्हणोत बापडे, ती त्यांची गाजरपारख होय.)

फीली/फीलीफ्लोंच्या इतिहासाबाबत विचारावासा रास्त प्रश्न वेगळाच आहे : मूक दृश्य चित्रपटांना ध्वनी जोडण्याचा तंत्रज्ञानाचा प्रवास १८९६ ते १९२७ असा तीन दशकांत झाला, पण त्या अनुभावात स्पर्श गुंफायला जवळजवळ एक शतक का लागावे? याचे मुख्य कारण असे की ध्वनीचे तबकड्यांवर आणि चलच्चित्रांचे फितीवर अंकन करण्याचे तंत्रज्ञान त्या काळात समांतर विकसित झाले -- दोन्ही एकमिती स्रोत शेजारीशेजारी जोडून एकत्र करणे इतके कठिण नव्हते. मात्र अन्य ज्ञानेंद्रियांपर्यंत जाणाऱ्या माहितीचे अंकन करण्याचे तंत्रज्ञान त्या काळातच नव्हे, तर पुढची कित्येक दशके विकसित झाले नाही. होय, चित्रपटाबरोबर खुर्चीच्या जवळ नळीतून गंध सोडण्याचे फुटकळ प्रयत्न झाले -- ते तंत्रज्ञान सोपे होते, पण प्रेक्षकांना नकोसे होते म्हणून बंदही पडले. पण स्पर्श रसिकापर्यंत पोचवायचा तरी कसा? याची कल्पनाच त्या काळात लोक करू शकत नव्हते.

डोळे आणि कान या प्रत्येकी फक्त दोन-दोन वाहिन्या असतात. बायस्कोप आणि स्टीरियो द्वारा माहितीच्या या चार वाहिन्या पुरवता येतात. पण स्पर्शज्ञानाची इंद्रिये कातडीवर सर्वत्र विखुरलेली असतात. उदाहरणार्थ, झोपायची जागा मऊ की कडक इतके कळण्यासाठीही पाठीवर विखुरलेल्या स्पर्शाच्या शेकडो की हजारो माहितीवाहिन्या लागतात -- मऊ गादीवर झोपताना पाठीच्या उंचसखल भागावर सर्वत्र थोडा-थोडा दबाव असतो, फरशीवर झोपल्यास काही थोड्याच बिंदूंवर जास्त दबाब तर बाकी ठिकाणी शून्य दबाव असतो –- त्या हजारो वाहिन्यांचे अंकन करून अनुभणाऱ्यापर्यंत कशा पोचवायच्या? आणि एवढ्यावर स्पर्शाची गुंतागुंत संपलेली नाही -- कमीअधिक दबावाबरोबर शीतोष्ण संवेदना असते, वेदना असते, आणि सांध्यांची स्थिती जाणवल्यायामुळे डोळे बंद असून हातपाय कुठे आहेत ते कळते, ती संवेदना असते. हक्सलेने सुचवल्याप्रमाणे फक्त मुठीतून स्पर्श पुरवून काही साधेल असे मानणे केवळ हास्यास्पद आहे, ते तेव्हाही समजत होते, पण तंत्रज्ञानाच्या वेशीवर विकास अडकून कुंठित झाला होता.

म्हणून २०००च्या नंतर मनुष्याच्या कातडीपर्यंत संवेदना पोचवण्याऐवजी वेगळ्याच आडवाटेने विकास झाला : मनुष्याच्या डोक्या -हाता-पायाची स्थिती उलट्या दिशेने संगणकाला पुरवून मग त्यानुसार मनुष्याला डोळ्यासमोर वेगवेगळी दृश्ये दाखवणारे मुखवटे (visors) तयार होऊ लागले. त्यातून दिसणाऱ्या बदलत्या दृश्यांना भासमान सत्य (virtual reality) म्हणत. हाताच्या हालचालीवरून संगणकाला संकेत देऊन भासमान दृश्यात चेंडू टाकता येत असे, भासमान व्यक्तीशी भासमान तलवारीने लढता येत असे. या प्रकारचे खेळ काही प्रमाणात लोकप्रिय झाले, पण भासमान मिथ्या असल्याचे नेहमीच स्पष्ट होते : चेंडू टाकताना हाताला चेंडूचे वजन जाणवत नसे. तलवारीने राक्षसावर वार केल्यावर आघातामुळे हाताची गती अडून थांबत नसे. त्यामुळे परिपूर्ण अनुभव म्हणून हे भासमान दृश्य कधीच पटण्यासारखे नव्हते.
स्पर्शाद्वै सत्याचा आभास आणण्यासाठी अंगभर चुस्त बसणारा सूट आणि सूटभर दबाव-उष्णता-स्पर्श देणारे सहस्रावधी बिंदू, हा कल्पनाविलास बऱ्याच जणांनी केला. तरी सुटाचा प्रत्येक बिंदू स्वतंत्रपणे वेगवेगळा दबाव देऊ शकेल, वेगवेगळे उष्णतामान देऊ शकेल, याकरिता भरपूर ऊर्जा लागते. आणि अंगभर विजेच्या तारांचे जडजंबाल नको, तर सूक्ष्म हलक्या वजनाच्या बलशाली विद्युत्कुप्या (batteries) लागतात, हे आपल्याला आज दिसतेच. म्हणून कल्पनाविलास प्रत्यक्षात उतरण्यासाठी ऊर्जेचे तंत्रज्ञान पुष्कळ विकसित व्हावे लागले. आणि म्हणूनच सुरुवातीला सूटमध्ये पूर्ण शरिरावर स्पर्शबिंदू नसायचे, तर केवळ हातांवरच, एखाद्याच इंद्रियावर स्पर्शबिंदू असायचे.

अशा सुटाने चालते-फिरते आयुष्य वठवता येत नसले, तरी एकाच इंद्रियापर्यंत कामोत्तेजक अनुभवांचे प्रेषण करायला या नव्या तंत्राचा लगेच उपयोग झाला, त्यात आश्चर्य ते काय? आणि पूर्वीच्या उत्तान चित्रफितींसारखेच व्यापारी तत्त्व लागू झाले -- शोषित वेश्यांना किंवा बेनाम नटसंचाला नाममात्र शुल्क आणि शून्य हक्क देणारे फीलीफ्लो मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागले. स्पर्शाने सत्यतेचा अनुभव खरा झालेले ग्राहक डोळे बंद करत, किंवा त्यांना डोळ्यांपुढे हलती रेखाचित्रे (animations) पुरत. फीलीफ्लोंमधील संगणकीय रेखाप्राणकां (computer animators)चे नाव होई, त्यांना स्पर्धात्मक कंत्राटे मिळत याबाबत तक्रार नसली, तरी स्पर्शनटांचे नामोनिशाण नसे, हे तितकेच अन्याय्य होते.

व्यापाराच्या पसरट आणि निर्मम ओघात स्पर्शकर्मी शेवाळ्यासारखे बकाल आणि खुरटेच राहिले असते. पण मग २०२५ साली अलाबामा राज्य सरकारने स्वतःहून फीलीफ्लो काढून लढण्याकरिता टक्रीकरांना एक बलशाली पण ठोस प्रतिस्पर्धी दिला. त्याच्या मुळाशी असलेले अलाबामामधील एबहार्ड-जुस्टीना-कांड त्या काळात दोन आठवड्यांच्या प्रचंड कालावधीकरिता सनसनाटी होते. एबहार्ड आणि जुस्टीना ही जोडगोळी सरकार आणि औद्योगिक क्षेत्रातील मोठमोठ्या असामींना कोवळा लैंगिक माल पुरवत असे. त्यांच्या अटकेनंतर अनेक कंपन्या आणि सरकारे गडगडत खाली येणार असे पुष्कळांना वाटत होते, पण प्रत्यक्षात त्यांनी एकाच साऊथ डाकोटाच्या राज्यपालाचे नाव घेऊन त्याला गोत्यात आणले.

त्या एका गौप्यगोत्यामुळे “सावधान! आमच्यापाशी तुमचा नायनाट करायचे अस्त्र आहे -- आम्हाला कणभरही तसदी झाली तर याद राखा!” अशी धमकी जणू उंची दालनांमध्ये आणि भ्रमणयंत्रांमध्ये दुमदुमली असावी. एबहार्ड आणि जुस्टीनाची सात महिन्यांची शिक्षा म्हणजे एका अलिशान नजरकैद होती. अर्थात कैदमहालाच्या सुखसोयींचे हे तपशील गुप्त होते, नंतर टक्रीकरांच्या खटल्याच्या कागदपत्रांतून आपल्याला कळलेले आहेत. नजरकैदेच्या काळात लैंगिक भुकेने व्याकूळता येऊ नये, म्हणून अलाबामा राज्याने एबहार्ड-जुस्टीना यांना फीलीफ्लोंचा पुरवठा केला. परंतु ही फीलीफ्लो सेवा केवळ खाजगी कंपनीकडून विकत घेतली नाही; तेवढेच केले असते, तर व्यापार पूर्वीसारखाच चालू राहिला असता. स्पर्शकर्मीं एबहार्ड आणि जुस्टीना यांच्यासाठी व्यक्तिगत विशेष कृती तयार करत असल्यामुळे त्यांना या ऐशपूर्ण कैदेचे ज्ञान असणार, त्याचा गौप्यस्फोट टाळण्यासाठी अलाबामा राज्याने व्यक्तिशः स्पर्शकर्मींकडून गुप्ततेचा करार (non-disclosure agreements) करून घेतले. आणि येथे चलने-दो (laissez-faire) व्यापारावर त्यांनी नकळत परिणाम केला.

अलाबामा राज्यांने ज्यांच्याकडून करार करून घेतले, तेच आपल्या स्मृतिलेखाचे लक्ष्य सोमा टक्रीकर होत. टक्रीकरांनी जो दुहेरी कायदेशीर डावपेच खेळला तो यशस्वी होऊ शकेल असे कोणालाही वाटले नव्हते. एकीकडे फीलीफ्लो निर्मात्यांवर, म्हणजे फील-द-फ्लो इन्कॉर्पोरेटेडवर, त्यांनी खटला चालवला की अलाबामा राज्याने जेणेकरून आम्हांकडून व्यक्तिशः करार केले आहेत, तेणेकरून आम्ही या कृतीत हुकुमाचे ताबेदार नोकर नाही, तर भागीदार आहोत : भागीदार म्हणून आम्हाला उत्पन्नाची टक्केवारी हवी. दुसरीकडे अलाबामा राज्याविरुद्ध त्यांनी खटला चालवला, की आम्ही केवळ आमच्या कंपनीचे नोकर आहोत, तर आमच्याशी थेट केलेला गुप्ततेचा करार रद्दबातल ठरतो, आम्ही एबहार्ड-जुस्टीनाबाबत आमचे अनुभव प्रकाशित करून उत्पन्न मिळवू शकतो. दोन्ही खटले परस्परविरोधी तत्त्वांवर उभे असल्यामुळे एकाच न्यायाधीशाच्या सुनावणीखाली असते तर फेकून दिले गेले असते -- पण दोन वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये असल्यामुळे दोन्ही खटले पुढच्या पायरीपर्यंत गेले. आणि अशा तऱ्हेने राज्य सरकार आणि फीलिफ्लो निर्मात्यांमध्ये चुरस लागली की पलीकडच्या न्यायालयात टक्रीकरांचा विजय होऊन आपोआप आपल्याविरुद्धचा खटला नाहीसा व्हावा. शेवटी अली-पलीकडच्या खटल्यांमध्ये टक्रीकरांची बाजू घेऊन दोन्हीकडे अलाबामाचे अटोर्नी जनरल कुचेली आणि कंपनी एकमेकांचे प्रतिद्वंदी झाली. म्हणूनच अपील कोर्टात दोन्ही खटले एकत्र जोडण्यात आले, तेव्हा त्या खटल्याचे नामकरण फील-द-फ्लो इन्कॉर्पोरेटेड वि. कुचेली असेच प्रसिद्ध झाले.
खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला, तसे अलाबामाच्या बाजूने चार अन्य राज्यांनी आणि फील-द-फ्लो इन्कॉर्पोरेटेडच्या बाजूने त्यांच्या व्यापारातल्या स्पर्धक टच-द-मॅजिक कंपनीने साहाय्यक युक्तिवाद (friend of the court, amicus curiae brief) प्रस्तुत केले. सर्वोच्च न्यायालयाने कधी नव्हे तर ८-१ असा निकाल दिला, तो कंपनी वा राज्य सरकार कोणाच्या विरोधात आणि कोणाच्या बाजूने दिला हे मोठे कोडेच आहे. बहुमतातल्या न्यायाधीशांनी पाच वेगवेगळे युक्तिवाद दिले, त्यामुळे कायद्याचे कुठले तत्त्व मुख्यतः लागू होत होते, त्याबाबत आजही वकिलांमध्ये एकवाक्यता नाही. न्यायालयाच्या निर्णयानुसार स्पर्शकर्मी फील-द-फ्लोचे नोकर नसून फील-द-फ्लो व्यासपीठाचा वापर करून स्पर्शकृती पुरवणारे स्वतंत्र लोक आहेत. म्हणूनच अलाबामा राज्य सरकार त्यांच्याकडून स्वतंत्रपणे गुप्ततेचा करार करू शकते. मात्र अलाबामा राज्याने फील-द-फ्लो व्यासपीठाच्या सेवेकरिता शुल्क दिले होते, त्यांचे टक्रीकरांना काही देणे लागत नाही. टक्रीकरांना फील-द-फ्लो व्यासपीठ म्हणून उपलब्ध आहे, तर टक्रीकर हे कंपनीचे भागीदार नाहीत.

अशा प्रकारे कंपनीने टक्रीकरांना पैसे देण्याचे वाचले आणि राज्य सरकारचा गुप्ततेचा करार झुगारूनही टक्रीकर पैसे मिळवू शकणार नव्हते -- म्हणजे सरकार आणि कंपनी दोघेही जिंकले असे म्हणायला जागा होती. दोघेही हरले म्हणायलाही जागा होती. गुप्ततेचा करार पुरावा म्हणून दाखल झाल्यामुळे उघडकीस आलाच -- अलाबामा राज्याला तो लपवून ठेवता आला नाही. आणि कंपनीचे म्हणावे, तर स्पर्शकृतींची मालकी सदाकरिता त्यांच्या हातातून गेली. व्यासपीठ म्हणून फील-द-फ्लो कंपनी फायदेशीर राहिलीच, म्हणा. निर्विवाद पराभूत झाले ते टक्रीकर : दोन्हीकडून मोबदला मिळाला नाही. पण अपयशाच्या गळवावरती अपमानाचा ठसठसणारा फोड असा, की विसरले जाण्यापूर्वी "खडे-लडे-पडे टक्रीकर (KLPT)" असे फजितीचे मीम म्हणून टवाळांनी त्यांना टोचे दिले.

टक्रीकरांच्या वकिलांचे ऋण फेडण्याकरिता दान जमा करण्यासाठी टक्रीकरांचे खाते खटल्यानंतर जिवंत राहिले. मात्र टक्रीकरांचे ऋण आजच्या सर्व स्पर्शकर्मींच्या डोक्यावर आहे, ते फेडायला कोणीच पुढे येत नाही. विचार करा -- आज आपण आधुनिक सुधारित तंत्रज्ञानाच्या स्पर्शसूटमधून बाळपणापासून म्हातारपणापर्यंत कितीतरी लहानमोठ्या सेवा प्राप्त करतो. आपल्या बाळाला जी दूरस्थ स्पर्शकर्मी दाई जोजावते, रांगत्याला चालायला शिकवते, ती निनावी नसते, तर कुठल्यातरी अंबेगाव खुर्द गावातील कोणी विवक्षित ऐश्वर्याताई असते. तंतोतंत मापाच्या आणि हावभावाच्या पण समंजस अशा कोण्या विजूबाळाने सुटाच्या दबावामार्फत वळण लावलेली आपली मुले नेहमीच शिस्तीत असतात. "कळतं पण वळत नाही" या जुन्या म्हणीचे व्यस्त विधान "वळतं म्हणून कळतं" हेच स्पष्ट प्रचितीमुळे आता वापरात आहे. म्हाताऱ्या विकलांगांची शुश्रुषा टांझानियामधले स्पर्शकर्मी परिचारक करतात, त्यामुळे तिथे टांझानियामध्ये नोकऱ्या मिळतात आणि इथे आपल्याकडे पूर्वीसारखे परके आगंतुक (immigrant) लोंढे सशरीर यावे लागत नाहीत.

सेवक-परिचारक वगैरे निम्नश्रेणीचे स्पर्शकर्मी सोडा. आपण निवडलेले एरोबिक्स किंवा योग-प्रशिक्षक रोजचा व्यायाम सुटाकरवी आपल्याला करवतात. आपल्यापैकी साहसप्रेमी लोक घरबसल्या शेरपा स्पर्शकर्मींच्या अंगातून पर्वत चढतात, म्हणूनच तर गेल्या दहा वर्षांत एकाही हौशी गिर्यारोहकाचा एव्हरेस्ट चढाईत मृत्यू झालेला नाही. ज्यांना परवडते असे थोडे लोक स्पर्शकर्मी अंतराळवीरांबरोबर शून्यगुरुत्वात बागडतात.

स्पर्शतंत्रज्ञानामुळे कलेचे आस्वादक म्हणूनही आपण बदललो आहोत. आज आपण संग्रहालयातली दुर्मिळ आणि नाजूक शिल्पे फक्त दुरून बघत नाही, तर स्पर्शमुद्रणाद्वारे मूळ संग्राहकाच्या हातांतून शिल्पे हाताळतो. मुद्रित कथानकांचे फीलीफ्लो आता जुने झाले आहेत. पण जिवंत नाटके आज आपण रंगकर्मीच्या कायेतून अनुभवतो. कोण्या एका काळी शेक्सपियरचे "जूलियस सीझर" नाटक लोक रंगभूमीपासून कमीतकमी दहा ते शंभर फूट लांबून बघत आणि ऐकत. परंतु आज आपण सीझरच्या अंगातून अवतीभवती सुरे भोसकायला येणारे खुनशी सिनेटर बघतो, तेव्हा एखाद्या नटाच्या आकलनानुसार अंग चोरून घाबरतो, दुसऱ्या एखाद्या नटाच्या आकलनानुसार छाती फुलवून गद्दारांना सामोरे होतो. आपले हे सर्वांगानी घेतलेले अनुभव नसलेले जुन्या काळचे रसिक काय ते बधिर आणि लुळे नाट्य आस्वादत असतील!

टक्रीकरांनी स्पर्शकर्मींना स्वत्व दिले, म्हणूनच तर हे सर्व स्पर्शकर्मी स्वतंत्रपणे या सर्व सेवा पुरवू शकतात, खेळाडू आणि कलाकार स्वतःच्या हिमतीवर रसिकांचे तन-मनोरंजन करू शकतात. टक्रीकरांच्या आठवणीखातर फूल ना फुलाची पाकळी ठेवण्यासाठी प्रस्तुत लेखकासह काही थोडे जण टक्रीकरांचे दानखाते अधूनमधून तपासत होतो. मागच्या शुक्रवारी खाते दिसत होते, शनिवारी बंद पडून नाहीसे झाले. नव्या स्पर्शविश्वाची स्फुल्लिंगाने प्राणप्रतिष्ठा करणारी मिणमिणती ज्योत तेलाअभावी विझून गेली. सोमा टक्रीकरांना सादर प्रणाम.

-------

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

कथा फार आवडली. पण पाणी खोल आहे, त्यामुळे थोडे दिवस जाऊ देऊन पुन्हा वाचण्याचा मानस आहे. बोर्हेसची आठवण झाली: त्यानेही असे पूर्ण ‘बनावट’ गृह्यसंस्कार लिहिलेले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

बरोबर ओळखले : बोर्हेसचा "Pierre Menard, Author of the Quixote" गृह्यसंस्कार - या इथल्या कथेचा विषय अगदीच वेगळा असला तरी काही वाक्यांच्या हरकती तिथल्यासारख्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समजायला जड गेलं त्यामुळे प्रतिसाद नाही देत.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुरुवातीला वाचताना तुझ्या तोंडून हे ऐकू येतंय असं वाटत होतं. कदाचित हा विवक्षित वाक्यरचनेचा परिणाम असावा.

अजूनही फार उजेड पडलेला नाही. पुन्हा वाचल्यावर कदाचित आणखी समजेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अजूनही फार उजेड पडलेला नाही. पुन्हा वाचल्यावर कदाचित आणखी समजेल.

भलत्याच बाई आशावादी तुम्ही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडेफार उमगले निदान तसे वाटले :). परत वाचल्यास अधिक कळेल असा कयास. वेगळीच संकल्पना आहे.
बाकी एल ए मध्ये एका थिएटरमध्ये हा माफक स्पर्शानुभव घेतलेला आहे. त्रिमितीय, पडद्यावरती उंदीर सैरावैरा आपल्या अंगावरती येतात व त्याच वेळी, पायाखाली वाऱ्याचे झोत सोडले जातात. खरोखर असे वाटते की ते उंदीर आपल्या पायाखालून पळत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

बरोबर आहे.

काही ठिकाणी (डिस्नी पार्क, म्यूझियम, बॉल्टिमोर नॅशनल अक्वेरियम या ठिकाणी असे ४-डी-पट अनुभवले आहेत :
https://en.wikipedia.org/wiki/4D_film

वरील कथेत त्यांचे थोडेसे वर्णन आहे (म्हणजे त्यातील "स्मेलोव्हिजन" भागाचा तरी, स्पष्ट नाव न घेता). काल्पनिक निवेदकाच्या मते हे प्रकार काही फार चालले नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0