'उरा'तली सर

नेमेचि येतो मग पावसाळा. पाऊस आला की मान्सूनइतकाच मुसळधार बरसणार्‍या वर्षाकवितांच्या पाऊसातच आपली माझी एक बारकीशी सर. परवा मुंबईत मान्सूननं आगमनाची वर्दी दिल्याचं वाचलं. मागोमाग विविध सोशल नेटवर्क्सवर उष्म्यानं जीवाची काहिली झालेल्या तमाम मुंबैकरांनी नि:श्वास टाकल्याचंही वाचलं. मनात पाऊसकवितांची उजळणी सुरू झाली. आणि बोरकरांच्या एका द्विपदीवर मन येऊन अडलं ते तिथंच उरलं. त्यातून निर्माण झालेली ही 'उरातली' सर! (अर्थात, यातल्या बोरकरांच्या ओळी ओळखालच.)

पाहुन जळता धरेस ग्रीष्मानलदाहें निष्ठूर
दाटुन येई मनी नभाच्या कृष्णमेघकाहूर

तहानलेला चातक कोठे आर्त आळवी सूर
कैवल्याने वरूणाचे का भरू नये मग ऊर?

बरसे रस पिकल्या अम्भोदांतुन टापूर-टुपूर
सुगंधमृण्मय अभिनव नाजुक पसरे सर्वदूर

दिशादिशांतुन आषाढाच्या श्यामघनांना पूर
तृणाप्रमाणे मनेंहि होती चंचल तृष्णमयूर

कुडा सुरंगी कवळा मुसळी पुंगळी संकासूर
पेव फुलांचे फुलता उमले भूवर सौख्यांकुर!

इंद्रधनू-वर दृष्टिस पडता नभोमंडपी दूर
हरितवनश्रीलेपित सृष्टी वधू लाजुनी चूर!

सोनसळी लेऊन नव्हाळी साळि नर्तनातूर,
शेतांमधुनी फुले तृप्तिचा पीत वर्ण भरपूर!

भद्र भादवा घेऊन ये सौभाग्याचा सिंदूर
निरोप देती वर्षाराणी हासे मधुरमधूर!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

बाबा रे!!!! सोबत पायाचा फोटु देखील टाकायचास!
धन्य आहेस! तुस्सी ग्रेट हो!!
ग्रीष्मानलदाहें, कृष्णमेघकाहूर, अम्भोद, टापूर-टुपूर, सुगंधमृण्मय, तृष्णमयूर वगैरे काय फक्कड बसले आहे! दिन बन गया!

इंद्रधनू-वर दृष्टिस पडता नभोमंडपी दूर
हरितवनश्रीलेपित सृष्टी वधू लाजुनी चूर!

इथे तर शिसान!!!

असेच लिहित रहा.. आता खरा पावसाळा सुरू झाल्यासारखा वाटला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!