आगरी समाजाचे भारतीय संस्कृतीवर फार मोठे उपकार आहेत. कारण त्यांनी मीठाचा शोध लावला. या समाजाचा इतिहास मीठाइतकाच जुना म्हणजे किमान सात हजार वर्षे एवढा प्राचीन आहे. आपण सर्वांनीच त्यांचं मीठ खाल्लंय. इतिहास हा फक्त राजा-महाराजांचाच नसतो तर ज्यांनी संस्कृती घडवली अशा निर्माणकर्त्यांचाही असतो. म्हणून आपण आगरी समाजाच्या ऋणात राहायला पाहिजे…
मीठ नसतं तर काय झालं असतं, तर जेवणच नाही तर सगळं आयुष्यच अळणी झालं असतं. त्यामुळंच मीठाचा शोध हा मानवी संस्कृतील क्रांतीकारी टप्पा मानला जातो. मनुष्य लाखो वर्षांपूर्वी शिकारी मानव होता. त्या काळात शरीरातल्या मीठाची गरज भागवण्यासाठी तो शिकार केलेल्या प्राण्याचं प्रथम रक्त पित असे किंवा लवणयुक्त माती खात असे. पुढं खनीज मीठ (सैंधव) वापरात आलं. अशा मीठाच्या नैसर्गिक खाणी मुळात कमी असत. त्यामुळं हे मीठ प्रचंड महाग असे. एके काळी या मीठाला सोन्यापेक्षाही अधिक किंमत असे. मीठामुळं जगात अनेक युद्धं झाली. साम्राज्ये उभी राहिली किंवा गडगडली.
आजचा सॅलरी (साल्ट) हा शब्द त्यामुळंच वापरात आला. मीठानं खाद्य संस्कृती तर घडवलीच पण मानवी आरोग्यही सुदृढ करायला मदत झाली. ज्याचं मीठ खाल्लं आहे, त्याच्याशी बेईमानी करणं हा नैतिक गुन्हा मानला जाऊ लागला. धर्मकार्यातही मीठ हा महत्त्वाचा घटक बनला.
मीठानं जागतिक इतिहास व्यापलाय. इंग्रज सरकारला हादरवून सोडणारा भारतातला महात्मा गांधींचा मीठाचा सत्याग्रह कोण विसरेल? मीठ हे मानवी संस्कृतीच्या अत्यंत प्राथमिक काळात कर बसवलेलं एकमेव उत्पादन आहे.
भारतात मीठाचा शोध कोळी समाजानं लावला. सर्वप्रथम हा शोध लागला तो कच्छ प्रांतात. मग हळू हळू जिथं अनुकूल किनारे आणि वातावरण आहे तिथं हा मीठशेतीचा उद्योग विस्तारत गेला. कोळी समाजातली जी कुटुंबं मीठशेतीकडं वळली त्यातूनच आगरी समाजाचा उदय झाला. आगर या प्राकृत शब्दाचा सरळ अर्थ आहे बाग किंवा शेत. नारळी-पोफळींच्या बागांसोबतच जिथं मीठ पिकवलं जातं ती मीठाची बाग किंवा मीठागर. या आगर शब्दातूनच आगरी या शब्दाचा उगम झाला. याचाच दुसरा अर्थ असा की कोळी आणि आगरी हे मूळचे एकच! कोळी आणि आगरींचे मूळचे ऐक्य सांगणारी एक पुराणकथाही येते. अगस्ती मुनीच्या आंगले आणि मांगले या दोन पुत्रांपासून क्रमशः आगरी आणि कोळी समाज निर्माण झाले, असं ही कथा सांगते.
कोळी समाज देशभर आढळतो. या समाजाचे मूळ हे कोलीय या भारतातील अतिप्राचीन अशा मानवगणाकडे जाते. भारतात प्राचीन काळापासून अनेक मानवगण वावरत होते, त्यापैकी हा एक. हा पुरातन मानवी घटक देशभर विखुरलेला होता. भारतात कोलीय (कोलीयक) नावाची अनेक गावं नेपाळ, राजस्थान, झारखंड, ओरीसा ते केरळ-तमिळनाडूपर्यंत आढळतात. कोलीय हे फक्त मासेमार नसून ते वीणकामआणि शेतीही करणारे होते. त्यातले समुद्रकिनारी वसलेल्यांनी पहिल्या नौका बांधल्या आणि मासेमारी सुरु केली. जाळ्यांचा शोध त्यांना उपयुक्त ठरला. कारण ते कुशल वीणकरही होते. हे शोध त्यांच्या अन्नाच्या, भरणपोषणाच्या निकडीमुळंच लागले. पुढे काही शतकांतच त्यांना समुद्राच्या खारट पाण्यापासून मीठाचा शोध लागला. या शोधांतून अन्नोद्योग तर सुरु झालाच, पण त्यांच्याच नौकाशास्त्रातून पुढं विदेश व्यापार सुरु झाला. अर्थात प्रथम निर्यात होणारं उत्पादन होते ते मीठ आणि खारवलेले मासे. पुढं त्यातून बलाढय़ अशी भारतीय आरमारे उभी राहिली. मुळात हा समाज दर्यावर्दी असल्यानं नौकानयनाच्या शोधाचं श्रेयही याच समाजाला द्यावं लागतं.
सह्याद्रीच्या कडय़ांमधून जे घाट निर्माण केले गेले ते पुरातन मीठमार्गच होते. वंजारी समाज या मार्गांनी मुख्यत्वाने मीठच जनावरांवर लादून घाटावर आणत असे. सर्वत्र भटकून मीठ विकत असे.
सिंधू संस्कृतीपासूनच (इसपू 4200) भारताचा जागतिक व्यापार सुरु झाला होता. लोथल या कृत्रिम बंदराची सिंधूकाळातील पुरातन निर्मिती हा कोलीय समाजानं निर्माण केलेला आश्चर्याचा अद्भुत असा नमुना आहे. कोकणातली चेऊलसारखी अनेक प्राचीन बंदरं (इसपू 223) आजही या समाजाच्या सागरव्यापाराची आणि विजिगिषु वृत्तीची साक्ष देतात. इजिप्त, सुमेर, अरबस्तान आणि अन्य युरोपीय देशांशी त्यांचा व्यापार होत होता. मीठ हे अर्थातच महत्त्वाचं उत्पादन होतं. त्याचबरोबर अन्य भारतीय वस्तूही आपसूक निर्यात होऊ शकल्या. यामागं कोळी-आगर्यांची अपार कल्पकता होती. साहस होतं. या अनुषंगानंच भारतातून सोन्याचा धूर निघत होता, असं म्हटलं जातं. ते सत्यही होतं.
कोकणातल्या आरंभीच्या सत्ता याच समाजाच्या होत्या. कुडा-मांदाड इथल्या लेण्यातील शीलालेखात तत्कालीन स्थानिक सत्ताधार्यांचा उल्लेख येतो. ते आगरी कोळीच आहेत. इसवीसनाच्या सहाव्या शतकात तर आगरी-कोळी आणि महार यांची कोकणावर संयुक्त सत्ता होती. किंबहुना नंतरच्याही सत्ता यांच्या मदतीखेरीज या भूभागावर राज्यच करु शकल्या नाहीत, असंच इतिहास सांगतो.
सातवाहन काळापासून (इसवीसन पूर्व 220) महाराष्ट्राचे लष्करी आरमारही बलाढय़ बनल्याचं दिसतं. यात खरा हातभार कोळी-आगरी लोकांचाच होता. हे आरमार एवढं बलाढय़ होतं की, सातवाहनांनी आगरी-कोळी बांधवांच्या मदतीनं श्रीलंकेचाही पराभव करत तेथवर सत्ता पोहोचवली. एवढंच नव्हे तर सातवाहनकालीन आणि आजच्या मराठीचं मूळ असलेल्या महाराष्ट्री प्राकृताच्या मूळ रुपाला आगरी बांधवांनी आपल्या आगरी भाषेत कटाक्षानं जपलेलं दिसतं.
वैदिकांनी जरी पुढं सिंधुबंदी नामक अत्यंत अनिष्ट प्रकार पुढं आणला, तरी या समाजान नौकानयन सुरुच ठेवलेलं दिसतं. त्याचाच उपयोग सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं आरमार उभारायला झाला. याचा दुसरा अर्थ असा की हा समाज वैदिक संस्कृतीच्या प्रभावात कधीच आला नाही. त्यांनी समुद्रबंदीचा फतवा मान्य केला नाही. पुढं सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या रुपानं इतिहासाला एक महानायक मिळाला. आगरी-कोळी समाजाचं आरमारी युद्धतंत्र त्यांच्या काळात कळसाला पोहोचलं. पुरातन काळापासून समुद्राचीच संगत असल्यानं सागरी किल्ल्यांची संकल्पनाही याच समाजानं खूप आधी विकसीत केली. हे आधीचे सागरी किल्ले बनवले गेले ते सागरी चाच्यांना तोंड देण्यासाठी आणि व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी. त्यांचा उपयोग स्वराज्याला केवढा झाला हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. आजच्या सर्वच सागरी किल्ल्यांच्या निर्मितीचं खरं श्रेय आगरी-कोळी समाजालाच द्यावं लागतं ते यामुळंच. पुढं नानासाहेब पेशव्यानं आंगरे यांचं आरमार बुडवण्याची घोडचूक केली आणि इंग्रज-पोर्तुगीजांना मोकळं रान मिळालं, हा दुर्दैवी इतिहासही इथं विसरता येत नाही.
कोलीय वंश हा मूळचा शैव मातृसत्ताक पद्धती पाळणारा समाज. त्यांची स्वतंत्र गणराज्ये होती. ती त्यांच्या वंशाच्या नावानेच ओळखली जात असत. मूळचे कोलीयच असल्यानं आणि विशिष्ट भागातच एकवटल्यानं पुरातन मातृसत्ताक पद्धतीचे अंश आजही आगरी समाजानं जतन केलेले आहेत. अन्य समाजगटांपेक्षा वैदिक संस्कृतीचा पगडा दूर ठेवण्यात त्यांना यश आलं ते यामुळंच! त्यांच्या देवता प्रामुख्यानं मातृदेवताच आहेत. उदाहणार्थ एकवीरा, मंबाई, गोराई, इत्यादी. त्यांच्यात हुंडा देणं-घेणं पूर्णतः अमान्य आहे. एवढंच नव्हे तर समाजाची पंचायत ही फक्त देवीमंदिरासमोरच भरते. घरातले आर्थिक व्यवहार हे आजही सर्वस्वी स्त्रीयांच्याच हाती असतात. गणसत्ताक पद्धतीचंही त्यांनी अगदी अलीकडच्या काळापर्यंत जपलेलं वैशिष्ट्य असं की, आगरी खेडय़ांत आगरी सोडून अन्य माणूस औषधालाही सापडत नसे. आगरी पंचायतच सामाजिक निर्णय एकत्रीतपणे घेत असे. बाह्य सत्तांना त्यात जवळपास प्रवेशच नव्हता.
कोलीय लोक हे कोल या मानवीवंश गटाचे आहेत , असं मानववंशशास्त्रज्ञांचं मत आहे. हा मानवी गट भारताबाहेरही आढळतो. कोकणात या मानवी गटाचं आगमन इसवीसन पूर्व 7 ते 8 हजार वर्षांपूर्वी झालं असावं असं पुरातत्वीय पुराव्यांवरुन दिसतं. नदी-तळ्यांमधली मासेमारी मानवाला अगदी पाषाणयुगापासून येत होती. पण समुद्रातली मासेमारी अत्यंत धाडसाची होती. ज्या कोलीय गणानं सामुद्रिक मासेमारीचा शोध लावला आणि अन्नाची गरज भागवली तो सागरकिनारीच वास्तव्य करणार हे उघड आहे. मीठाचा शोध लागल्यानंतर जो भाग मीठशेतीस योग्य आहे तिथं त्यांनी वस्ती केली. त्यामुळंच महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये त्यांच्या प्राचीन अस्तित्वाचे पुरावे आढळतात. तिथंच ते आजही एकवटलेले दिसतात. बिंब राजानं कोकणात आक्रमण केलं. सैनिकांची लढाईची गरज संपल्यानंतर त्यांना मीठागरं बनवून दिली. तोच हा आगरी समाज, हे मत मांडलं जातं. पण कोणत्याही पुराव्यांवर टिकत नाही.
महत्वाचं म्हणजे तथागत गौतम बुद्धाची माता महामाया आणि पत्नी यशोधरा हीसुद्धा कोलीय वंशाची होती. कदाचित त्यामुळंच की काय इतिहासात असं दिसतं, की कोकणातल्या कोळी-आगरी लोकांवरही बुद्ध धर्माचा प्रभाव होता. कोकणात बुद्ध धर्माचे अस्तित्व प्रबळ असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. नालासोपारा अथवा कुडे-नांदाडची बौद्ध लेणी ही आगरी समाजाचं प्राबल्य असणार्या भागातच आहेत. देवी एकवीरेचे कालौघात बदलले गेलेलं कार्ला इथलं मंदिर हेही मूळचं महामायेचं असू शकेल, असे पुरावे आता मिळू लागले आहेत. म्हणजेच कोलीय गणाने एके काळी बौद्ध धर्माची पाठराखण मोठय़ा प्रमाणावर केली होती हे सिद्ध होते. कारण त्या महनीय धर्माचा संस्थापक त्यांच्याच गणात जन्माला आलेला होता.
आगरी समाजाचे मानवी संस्कृतीवर फार मोठे उपकार आहेत. हा खरा संशोधक आणि निर्माणकर्ता समाज होय! मीठाचा इतिहास म्हणजे आगरी समाजाचा इतिहास होय. या समाजाचा इतिहास वैदिक संस्कृतीपेक्षाही पुरातन म्हणजे किमान सात हजार वर्षे एवढा प्राचीन आहे. आपण सर्वांनीच त्यांचं मीठ खाल्लंय. इतिहास हा फक्त राजा-महाराजांचाच नसतो तर ज्यांनी संस्कृती घडवली अशा निर्माणकर्त्यांचाही असतो, हे या निमित्तानं लक्षात यावं!