‘योग उद्योगा'तील पैशाचे नियमन हवे

योगगुरू रामदेव बाबा यांच्या संस्थांनी धर्मादाय कार्याच्या नावाखाली केलेली कोट्यवधी रुपयांची करचुकवेगिरी समोर आली आहे. कुठल्याही धर्मादाय संस्थेला पैसा साठवून ठेवता येत नाही. एकूण उत्पन्नाच्या ८५ टक्के रक्कम त्या त्या वर्षी खर्च करणे आवश्यक असते. रामदेव बाबांच्या टड्ढस्टमध्ये या नियमाची सर्रास पायलमल्ली होत असल्याचे आरोप होत होते. गेल्या १० वर्षांत रामदेव बाबांच्या संस्थांनी किमान ११ हजार कोटींची (११० अब्ज रुपये) माया गोळा केली आहे, असे बोलले जाते. हा आकडा कमीच आहे, असे बाबांनी एका मुलाखतीत सांगितले होते. यापैकी शेकडो कोटी रूपये नियमांची पायमल्ली करून कमावलेले असू शकतात, असा संशय आता व्यक्त होऊ लागला आहे. सरकारी संस्थांनी त्यात लक्ष घातल्याने वस्तुस्थिती समोर येईलच. खरे म्हणजे सरकारी संस्थांनी याआधीच यात लक्ष घालायला हवे होते. पण तसे झाले नाही. उशिरा का होईना, बाबांची करचुकवेगिरी आता सरकारी संस्थांच्या रडारवर आली आहे, हे महत्त्वाचे. या देशातील एक मोठा वर्ग हा धर्म आणि धर्मादाय संस्थांना फार पूर्वीपासूनच पैसे कमावण्याचे साधन म्हणून वापरत आला आहे. रामदेव बाबांच्या निमित्ताने हा मुद्दा नव्याने चर्चेत आला एवढेच.

धर्म, योग आणि आयुर्वेद यान्चे असरदार रसायन
धर्म, योग आणि आयुर्वेद यांचे भूल पाडणारे रसायन ही रामदेव बाबांची स्पेशल युएसपी आहे. या रसायनाला राष्टरभक्तीची थोडीशी फोडणी त्यांनी दिली. हे रसायन इतके असरदार झाले की, त्यातून बाबांचा अब्जावधींचा उद्योग उभा राहिला. भारतात हा फॉरम्युला यशस्वी होतो म्हटल्यानंतर बाबांनी विदेशातही आपला उद्योग वाढविला. आज पाच-पन्नास देशांत बाबांचे काम चालते. टाटा बिर्ला, अंबानी यांसारख्या नावाजलेल्या औद्योगिक घराण्यांच्या तोडीचे साम्राज्य बाबांनी उभे केले आहे. फरक एवढाच की, या घराण्यांना यश मिळविण्यासाठी पिढ्या खर्ची घालाव्या लागल्या. बाबांनी ते अवघ्या १० वर्षांत करून दाखविले. मारक्सने धर्माला अफूची गोळी का म्हटले होते, त्याचे उत्तर हे असे आहे. योगाचा उद्योग करणारे रामदेव बाबा हे काही एकटे नाही. बाबांच्याच तोडीचे साम्राज्य आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्रीश्री रविशंकर यांनीही उभे केले आहे. दोघांची युएसपी इकच आहे. रामदेव बाबा कपालभाती असा शब्द वापरतात, श्रीश्री रविशंकर त्यालाच सुदर्शनक्रिया म्हणतात. श्रीश्री यांचा उद्योगही देश विदेशात पसरलेला आहे.

पण पैसा बाजूला ठेवायचा असेल, तर योग शिकवायचा कशासाठी?
योग हा मूळचा संस्कृत शब्द आहे. योग म्हणजे जोडणे. महर्षि पतंजलीच्या योगशास्त्राने माणसाला इश्वराशी जोडण्यासाठी ‘योग' हा शब्द वापरला. रामदेव बाबा आणि श्रीश्री रविशंकर यांनी योगाला पैशाशी जोडले! पतंजलीच्या योगशास्त्राची त्यांनी आपल्या पद्धतीने मोडतोड केली. पतंजलींचे मूळचे योगशास्त्र आठ टप्प्यांचे आहे. यम, नियम, ब्रह्मचर्य, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा या टप्प्यांनी येऊन ते ‘समाधी'वर स्थिरावते. रामदेव बाबांनी मधले ‘आसन आणि प्राणायाम' हे दोन टप्पे उचलले. संपूर्ण अष्टांग योग बाबांना मुळीच पेलवणारा नाही. संपूर्ण योगशास्त्र स्वीकारायचे म्हटले तर पैशाला बाजूला सारावे लागते! पैसे घेऊन योग शिकवू नका, असे पंतजलींनीच लिहून ठेवले आहे. पण पैसा बाजूला ठेवायचा असेल, तर योग शिकवायचा कशासाठी?

भाकरी कमावण्याचा सुलभ योग कोण शिकविणार
योगशास्त्र आणि सामान्य माणूस यांचे या देशात कधीच नाते नव्हते. आजही नाही. राजघराणी आणि उच्चभ्रू समाजाभोवतीच योग फिरत आला आहे. म्हणूनच असेल कदाचित ‘राजयोग' असेही त्याचे एक नाव आहे. स्वतंत्र भारतात योगाचे पुनरुज्जीवन करण्याचे श्रेय धीरेंद्र ब्रह्मचारी यांना जाते. ते तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे योग शिक्षक होते. १९७० च्या दशकात ते दुरदर्शनवर योग शिकवित. ‘योगाच्या बळावर मी १०० वर्षे निरोगी आयुष्य जगून दाखवीन', असा दावा धीरेंद्र बाबांनी केला होता. मात्र वयाच्या ७० व्या वर्षी एका विमान अपघातात त्यांचे निधन झाले. थेट नेहरु-गान्धी घराण्याशी नाव जोडले गेल्यामुळे त्याकाळी योगाला अचानक झळाळी मिळाली. ८० च्या दशकात अभिनेत्री रेखाने आपल्या सौंदर्याचे श्रेय योगाला दिले आणि योग ग्लॅमरस झाला. ग्लॅमरमुळे संस्कृत ‘योग'चे रूपांतर इंग्रजी ‘योगा' असे केव्हा झाले ते कळलेच नाही. या सर्व कारणांनी या देशातील उच्चभ्रू वर्गाला योगाचे खास आकर्षण वाटत आले आहे. त्याचा लाभ रामदेव बाबांसारख्या चाणाक्ष योग शिक्षकांनी करून घेतला. रामदेव बाबांच्या योग शिबिरांच्या व्हिआयपी पासची किम्मत माणसी २१०० रुपये आणि ११०० रुपये अशी आहे. श्रीश्री रविशंकर यांचे दर यापेक्षाही मोठे आहेत. रोजगार हमीवर दिवसाला ६८ रूपये कमावणा-या माणसाला अशा महागड्या योगाचे अप्रुप कसे राहील? रोजच्या भाकरीचा योग जुळवून आणण्यासाठीच त्याची सर्व शक्ती खर्ची पडते. खरे म्हणजे त्यांना भाकरी कमावण्याचा सुलभ योग शिकविण्याची गरज आहे.

बाबा-बुवांच्या योगवर्गाचे दुसरे मोठे गि-हाईक आहे उच्च मध्यम वर्ग. भारतातील मध्यम वर्ग सातत्याने भूतकाळात रमत आला आहे. भारतीय विद्या जगात सर्वश्रेष्ठ आहेत. किम्बहुना आज जगाने जी काही भौतिक प्रगती केली आहे, पाश्चात्यांनी जे काही वैज्ञानिक शोध लावले, ते भारतात आधीच अस्तित्वात होते, अशी या वर्गाची ठाम समजूत आहे! पाश्चात्यांनी शोधलेल्या टिव्हीसमोर बसून हा वर्ग बाबांच्या योगाची नक्कल आपल्या घरात करीत असतो. हे सर्व करीत असताना पाश्चात्यांना शिव्याही मोजत असतो. या वर्गाला आकर्षित करण्यासाठी रामदेव बाबांनी आपल्या रसायनाला राष्टरप्रेमाची फोडणी दिली. बाबा जेव्हा योग शिकवितात तेव्हा राष्टरभक्तीचे ओजस्वी विचार सातत्याने मांडीत असतात.

बिनभांडवली धंदा
या देशात साधे किराणा दुकान काढायचे असले तरी दुकाने व व्यापारी संस्था अधिनियमान्वये परवाना काढावा लागतो. कोट्यवधी रुपये कमवून देणा-या योगाचे वर्ग चालविण्यासाठी मात्र अशा कोणत्याही परवान्याची गरज लागत नाही! हा पूर्णतः बिनभांडवली धंदा आहे. रामदेव बाबांच्या यशानंतर हा धंदा आता देशभर पसरला आहे. मोठ्या आणि उच्चभ्रू वसाहतींमध्ये योग वर्ग हमखास सापडतात. पाच-दहा हजार लोकांना एकत्र बसून योग करता येईल, अशी शिबिरे भरविण्याचे प्रमाणही वाढले आहे. योग हे शास्त्र न राहता आता इंडस्टड्ढी बनला आहे. त्यामुळेच योग वर्गांना नियमांच्या कक्षेत आणण्याची वेळ आता आली आहे. भारताप्रमाणेच अमेरिकेतही योगाची भरभराट आहे. मात्र तेथील प्रांतिक सरकारांनी योग वर्गांना नियम आणि करांच्या कक्षेत आणायला सुरूवातही केली आहे. न्यूयॉर्कमध्ये योग वर्गांसाठी तीन-तीन खात्यांकडून परवाने घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय दोन आठवड्यांपूर्वीच आंमलात आला. भारतातील योग इंडस्टरी अमेरिकेच्या तुलनेत किमान ५० पट मोठी आहे. कित्येक अब्जांची उलाढाल त्याद्वारे होते. या पैशाचे नियमन होणे आवश्यक आहे.

सूर्यकांत पळसकर

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

पळसकर साहेब लेखाशी पुर्णतः सहमत आहे. लोकांच्या श्रद्धा हेच यांचे भांडवल. श्रद्धा अंधश्रद्धा अश्रद्धा या बाबी पुर्वीपासून चालत आलेल्या आहेत. आताही चालूच राहतील. लोकांची ती जगण्याची नशा आहे. अंधश्रद्धेचे बळी हेच अंधश्रद्धेचे वाहक असतात. जीवनातल्या अनिश्चिततेचे उत्तर देण्यासाठी अशा बाबींचा वापर केला जातो.
श्रद्ध ही माणसाला जगण्याचे बळ देते हे मात्र खर आहे. असो. जो पर्यंत जगण्यात अनिश्चितता आहे तोपर्यंत या गोष्टी चालूच राहणार आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

घाटपांडे साहेब, धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पळसकर साहेब,

लेखातील शब्दन् शब्द पटला. बाजार आणि गरज यांच्यातील तारतम्य कुठेतरी सरकार चालवणार्‍यांनीही ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर अशा गोष्टी घडणारच नाहीत.
ज्या दिवशी भारतातील प्रत्येक नागरीक भरल्या पोटी झोपू शकेल, तो दिवस भारतासाठी खरी प्रगती सुरु झाल्याचे सुचिन्ह असेन. जोपर्यंत मतांची लाचारी जपली जात आहे तोपर्यंत तरी देशातील लाखो (कदाचित करोडो) रिकाम्या पोटांत पोटभर अन्न दिसणे अवघडच आहे.

असो, या लेखाद्वारे पळसकर साहेब तुम्ही "ट्रस्ट" या करमुक्त प्रणालीवरच नेमके बोट ठेवले आहे. लेख आवडला. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही काही रामदेवबाबास पैसे दिले नाहीत... त्याने काही आमच्याकडून मागितले नाहीत... पण योग शिकवतो बरंका तो मस्त टीव्हीवरती...

आम्ही तर ऐकलं होतं की टीवी वर शिकवून शिकवून रामदेवबाबाने "योग" सारखी महान आणि अवघड प्रक्रिया "मामुली आणि स्वस्त " करून टाकली आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रद्धा वगैरे बाबतीत कोणी फसवावे.. व कोणी फसावे यावर (आता) माझा (फारसा) आक्षेप (राहिलेला) नाही. [कारण फसणार्‍याला फसतो आहे हे ठाऊकअसुन सुद्धा, बाकी काही उपाय आहे का? वगैरे मते बाळगून फसवून घेतो असे हल्ली दिसले आहे Sad ]

मात्र त्यासाठी कायद्याची ऐशीतैशी करणं, कर चुकवणं, प्रसंगी थेट खोटी माहिती प्रसारीत करून केलेली लुट मात्र चीड आणते. मग तो रामदेव असो, नाही तर बालाजी तांबे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगदी हेच म्हणतो मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

योग शिकायला हजारो रुपये देणारे लोक पाहिले की हसू येते.
कालनिर्णय क्यॅलेंडराच्या प्रत्येक महिन्याच्या मागच्या पानावर दररोज करायची आसने छापलेली असत.
किंवा अगदी सूर्यनमस्कार घातले तरी निदान आठ आसने तरी होतात.

बाकी प्राणायामात शिकण्यासारखे काय आहे ते कळलेले नाही.
आमच्या गावात दर महिन्याला पाच हजार रुपये घेऊन दररोज एक तास 'पॉवर योगा' शिकवणारे मल्टीसेंट्रिक बाबा सापडतात.
त्यांची सेंटरे ए.सी. आहेत.सहासहा महिने तिथे जाऊनही एक ग्रॅमही वजन न उतरलेले आणि डायबीटीज कंट्रोल न झालेले लोक पाहिले आहेत.

एकीकडे गॅस्ट्रिक ट्रबल झालेल्या माणसाच्या हृदयात तीन-तीन स्टेंट खुपसणारे हृदयरोगतज्ञ डॉक्टर आणि दुसरीकडे कॅन्सर बरा करण्याचा दावा करणारे बुवाबाज बाबा.
एक रिसर्च सेंटरच्या नावाखाली औषध कंपन्यांकडून आलेला काळा पैसा पांढरा करणार आणि दुसरा त्यासाठी संजीवन ट्रस्ट काढणार. दोघेही खोर्‍याने पैसा ओढणार. लोक विनातक्रार लुबाडून घेणार.
असल्या परिस्थितीत कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणाची अंधश्रद्धा धुडकावायची? कोण कुणाला उपदेश करणार? आणि तो कोण मानणार?
लहरी राजा - प्रजा आंधळी - अधांतरी दरबार... उद्धवा, अजब तुझे सरकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0