जेम्स प्रिन्सेप आणि ब्राह्मी लिपीचा शोध

हेस्टिंग्जच्या काळामध्ये हिंदुस्तानात भरपूर पैसा जोडून १७८७मध्ये इंग्लंडात परतलेल्या जॉन प्रिन्सेप ह्यांना एकूण सात मुलगे होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरभरतीमध्ये ओळखी, वशिले आणि पुतणेगिरी भरपूर होती. तिचाच लाभ घेऊन सातही प्रिन्सेप भाऊ हिंदुस्तानात आले. त्यांपैकी दोघांनी विशेष कर्तबगारी दर्शविली. एक सर हेन्री थॉबी प्रिन्सेप आणि दुसरा म्हणजे जेम्स प्रिन्सेप.

१७९७ साली जन्मलेला जेम्स १८१९च्या सप्टेंबरात हिंदुस्तानात पोहोचला आणि १८३८च्या ऑक्टोबरात प्रकृतीच्या कारणासाठी परत जाईपर्यंत तो हिंदुस्तानातच राहिला. परतल्यानंतर काही महिन्यातच मेंदूच्या काही विकाराने एप्रिल १८४० साली त्याचा मृत्यु झाला. हिंदुस्तानातील एकूण १९ वर्षांच्या वास्तव्यात अनेक क्षेत्रामध्ये त्याने आपल्या बुद्धीची आणि सततोद्योगाची चुणूक दाखविली. आज त्याची आपल्याला उरलेली मुख्य आठवण म्हणजे ब्राह्मी लिपी, जी हिंदुस्तानात संपूर्ण विस्मरणात गेली होती, तिचे पुनरुज्जीवन करून हिंदुस्तानच्या जवळजवळ अज्ञात झालेल्या प्राचीन इतिहासावर प्रकाशझोत टाकणे हे काम त्याने मुख्यत्वेकरून १८३४ ते १८३८ ह्या काळात केले. ह्या कामात प्रिन्सेपला महत्त्वपूर्ण साहाय्य हिंदुस्तानभर वेगवेगळ्या जागी आपापल्या नोकर्‍या करणार्‍या अनेक उत्साही ब्रिटिश अधिकार्‍यांनी केले तसेच अनेक एतद्देशीय पंडितांचा देखील ह्या कार्याला वेळोवेळी हातभार लागला. ह्या सर्व प्रयत्नांना एका दिशेने चालू ठेवणे आणि ह्या प्रयत्नांचे नेतृत्व करणे हे जेम्स प्रिन्सेपचे प्रमुख काम आणि अशा अर्थानेच त्याला ’ब्राह्मी लिपीचा संशोधक’ असे मानले जाते. १८२२ साली रोझेटा लेखाचे वाचन करून शांपोलियॉंने इजिप्तच्या प्राचीन इतिहासाचे दालन उघडले तशाच प्रकारचे कार्य प्रिन्सेप आणि त्याच्या सहकार्‍यांनी भारताच्या प्राचीन इतिहासासाठी केले. ब्राह्मी आणि त्याबरोबरच वायव्य भागात विशेष प्रचलित असलेल्या खरोष्ठी लिपीच्या वाचनामुळे हिंदुस्तानभर पसरलेल्या शेकडो-हजारो शिलालेखांचे आणि ठिकठिकाणी सापडणार्‍या जुन्या नाण्यांचे वाचन शक्य झाले आणि प्राचीन भारताच्या इतिहासाचे अनेक दुवे पुन: जोडणे शक्य झाले.

अशोक, चन्द्रगुप्त, विक्रमादित्य असे प्रतापी सम्राट आणि त्यांचे कार्य, इतकेच नव्हे तर त्यांची नावेदेखील हिंदुस्तानात संपूर्ण विस्मरणात गेली होती. अशोकाचे नाव केवळ विष्णुपुराणातील एका यादीमधल्या त्रोटक उल्लेखापुरते मर्यादित होते पण त्याच्याबद्दल अन्य काहीच माहीत नव्हते. गुप्त सम्राटांचीही आठवण पूर्ण नष्ट झाली होती. अशा नष्टप्राय झालेल्या स्मृति त्याने पुनः जागवल्या हे जेम्स प्रिन्सेपचे भारतावर मोठेच उपकार आहेत. हे कार्य त्याने आणि त्याच्याप्रमाणेच हिंदुस्तानभर पसरलेल्या हौशी आणि उत्साही संशोधकांनी कसे केले ह्याचा घटनाक्रम Asiatic Society of Bengalच्या १८३४ ते १८३८ सालांच्या जर्नल्समध्ये छापल्या गेलेल्या अनेक शोधनिबंधांवरून जुळवता येतो. त्या घटनाक्रमाचा संक्षिप्त आढावा ह्यापुढे दिलेला आहे.

इतके मूलगामी संशोधन करणारा जेम्स प्रिन्सेप कोणी गाढा विद्वान प्राध्यापक असावा असे वाटेल पण तो होता एक सर्वसामान्य तरुण. उपजीविकेपुरती नाणेपारखीची विद्या लंडनमध्ये शिकल्यावर त्याच क्षेत्रातील नोकरी करण्यासाठी १८१९मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी तो हिंदुस्तानात आला. १८३०पर्यंत तो बनारसमधील टांकसाळीत प्रमुख धातुपारखी (Assay Master) ह्या जागेवर होता आणि तेथेच त्याने स्थापत्य, रसायनशास्त्र, नाणेव्यवस्था सुधारणे अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत महत्त्वाचे कार्य करून आपल्या चतुरस्र बुद्धीचा पुरावा दिलाच होता. बनारसची टांकसाळ कंपनी सरकारने १८३० साली बंद केल्याने जेम्स कलकत्त्याच्या टांकसाळीत प्रमुख धातुपारखी असलेल्या होरेस हेमन विल्सन ह्यांच्या मदतनिसाच्या जागेवर आला. विल्सन ह्यांनी हिंदुस्तानातील वास्तव्यात संस्कृत भाषा उत्तम शिकून घेतली होती आणि आद्य संस्कृत अभ्यासक विल्यम जोन्स ह्यांनीच सुरू केलेल्या Asiatic Society of Bengalचे सचिवपदही त्यांच्याकडे होते. त्यांनी जेम्सला प्राच्यविद्येमध्ये रस घ्यायला मार्गदर्शन केले आणि त्याला Asiatic Societyचे सदस्यत्वही दिले. १८३२मध्ये विल्सन इंग्लंडात परतले आणि कालान्तराने ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृत विषयातील ’बोडेन प्रोफ़ेसर’ हे स्थान भूषविणारे ते पहिले संस्कृत अभ्यासक झाले. त्यांनी मोकळी केलेली टांकसाळीतील जागा आणि Asiatic Societyचे सचिवपद ही दोन्ही स्थाने त्यांच्याच सूचनेवरून जेम्सला मिळाली. तो स्वत: १८३८ साली इंग्लंडात परतेपर्यंत त्याने ह्या दोन्ही जबाबदार्‍या सांभाळल्या. आर्थिकदृष्टया नाजूक अवस्थेत असलेल्या सोसायटीला सरकारी सूत्रांचा फारसा पाठिंबा नसतानाही त्याने तगविले आणि विद्येच्या क्षेत्रात तिला मानाचे स्थान मिळवून दिले. १८३८ साली प्रकृतीच्या कारणाने तो इंग्लंडला परतला आणि तदनंतर लवकरच १८४०च्या एप्रिल महिन्यात मेंदूच्या विकाराने वयाच्या अवघ्या ४१व्या वर्षी त्याचा अंत झाला. (योगायोग असा की शांपोलियॉंलाही ४२ वर्षांचे अल्प आयुष्यच मिळाले होते.)

१८३० सालापर्यंत हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यात कंपनीची प्रत्यक्षाप्रत्यक्ष सत्ता पोहोचली होती. कंपनीच्या नोकरांपैकी काही जणांना हा अपरिचित देश आणि त्याची प्राचीन संस्कृती काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असे आणि अशा हौसेपोटी पुष्कळजण आपला फावला वेळ आणि पैसा खर्च करून नाना प्रकारचे अभ्यास करीत असत. काही जणांना नाणी गोळा करणे, शिलालेखांचे ठसे घेणे, जुन्या मंदिरांचे, राजवाडे-किल्ल्यांचे संशोधन करणे असे छंद असत. त्यांच्या संशोधनाचे फलित ते Asiatic Societyकडे संग्रहालयात जमा करण्यासाठी पाठवून देत असत. अशा मार्गाने १८३४पर्यंत सोसायटीकडे अनेक संग्राह्य गोष्टी जमा झाल्या होत्या आणि न समजणार्‍या लिपींमध्ये लिहिलेल्या शिलालेखांचे ठसे, तशाच प्रकारची शेकडो जुनी नाणी त्यांमध्ये होती.

भारतीय विद्वानांपैकी फार थोडया लोकांना असले काही संशोधन करण्याचा नाद होता आणि ब्राह्मीसारख्या काही लिपींचे ज्ञान तर त्यांमध्ये कोणाकडेच नव्हते. विद्या म्हणजे मुख्यत्वेकरून घटपटादि चर्चा अशीच बहुतेक एतद्देशीय पंडितांची समजूत होती. त्याचा परिपाक म्हणजेच असे शिलालेख, नाणी हा काही अभ्यासाचा विषय असू शकतो आणि हिंदुस्तानच्या इतिहासावर त्यातून प्रकाश टाकता येतो हे त्यांच्या ध्यानीही नव्हते आणि कोणाला अशी रूची असलीच तरीही एव्हांना राज्यतन्त्र परकीयांच्या ताब्यात गेल्यामुळे राजाश्रय आणि आधार मिळणे दुरापास्त झाले होते.

अशा वातावरणात जेम्स Asiatic Societyमध्ये आला. पुस्तकी पुरातत्त्वविद्येपेक्षा जागेवर जाऊन उत्खनन करून वस्तुनिष्ठतेकडे वळण्याचा काळ आता आला होता.

१८३०च्या दशकाच्या सुरुवातीस अलेक्झॅंडर बर्न्स (Bokhara Burnes) ह्याने बोखारापर्यंत पायी प्रवास करून त्या भागाची बहुमूल्य माहिती गोळा केली होती. तेथील ग्रीक, बॅक्ट्रियन आणि इंडो-स्किथियन राजवटींची शेकडो नाणी गोळा करून त्याने ती Asiatic Societyकडे सुपूर्द केली होती. त्यांमधून उल्लेखिलेल्या काही राजांची नावे ग्रीक लिखाणांमधून आधीच माहीत होती. त्या नाण्यांचा अधिक अभ्यास करून जेम्सने ’कनिष्क’ ह्या राजाचे नाव जगापुढे आणले.

Journal of the Asiatic Society of Bengal, (ह्यापुढे JASB) Vol. III 1834 येथील मार्च महिन्याच्या भागाच्या पृ.१०५ वर ले.टी.एस.बर्ट ह्या हौशी अधिकार्‍याने सोसायटीकडे पाठविलेले एक वर्णन आणि लेखांचे ठसे छापण्यात आले आहेत. अलाहाबादमध्ये गंगेकाठी जो किल्ला आहे तेथे जमिनीवर भग्नावस्थेत पडलेल्या एका स्तंभाचे आणि त्यावरील काही शिलालेखांचे वर्णन त्यामध्ये आहे. असे दिसते की आठवत होते त्या काळापासून हा स्तंभ तेथे उभा होता आणि शाहअलम बादशहाच्या अम्मलाच्या ४६व्या वर्षाच्या पुढेमागे किल्ल्याची डागडुजी इंग्रज अधिकार्‍यांनी केली तेव्हा किल्ल्याच्या भिंतीच्या वाटेत येतो ह्या कारणासाठी तो जागेवरून काढून मोडक्या अवस्थेत शेजारीच टाकून देण्यात आला होता. स्थानिक जनता स्तंभाला ’भीमाची लाट (लाठ/लाठी) किंवा गदा’ अशा नावाने ओळखत होते. गोल आकाराच्या ह्या स्तंभाच्या पायाचा आणि मस्तकाचा व्यास अनुक्रमे ३ फूट २-१/४ इंच आणि २ फूट २ इंच, तसेच परिघ अनुक्रमे १० फूट १ इंच आणि ६ फूट ६-१/४ इंच होता. मस्तकावर एका बसलेल्या प्राण्याचे शिल्प असावे असे दिसत होते, यद्यपि तो भाग उपलब्ध नव्हता. प्राण्याचे शिल्प जागेवर धरून राहण्यासाठी लोखंडी आधार वापरला असावा असे सुचविणारे छिद्र मस्तकाच्या मध्यावर दिसत होते. स्तंभाची लांबी ३७ फूट असून ती जवळजवळ दिल्लीच्या फिरोजशाह कोटला येथील लाटेइतकीच होती. स्तंभाचे वजन १७ टन १२ हंड्रेडवेट किंवा ४९३ मण असावे असाही अंदाज बर्टने वर्तविला होता.

(सुलतान फिरोझशाह हा मोहम्मद तुघलकाच्या नंतर दिल्लीचा सुलतान झाला आणि १३५१ ते १३८८ ह्या काळात तो सत्तेवर होता. दिल्लीमध्ये यमुनेच्या काठी फिरोझशाह कोटला म्हणून सुलतान फिरोझशाहने बांधलेला किल्ला आहे आणि सुलतानाने दिल्लीच्या उत्तरेकडे यमुनेच्या काठी असलेल्या खिझराबाद नावाच्या गावातून उचलून आणून येथे उभा केलेला एक स्तंभ आहे. त्यावरही अज्ञात लिपीमध्ये लिहिलेला एक लेख होता आणि तो कोणासही वाचता येत नव्हता.)

अलाहाबाद किल्ल्यातील स्तंभावर एकूण चार लेख होते. त्यांना क्र.१, क्र.२, क्र.३ आणि पर्शियन अशी सोईसाठी नावे देता येतील. पर्शियन लेख जहांगिर बादशहाने पर्शियन लिपीत कोरलेला असून तो आणि त्याच्या पूर्वीच्या ८ पूर्वजांची नावे त्यात दिली आहेत. हा लेख क्र.१ लेखाच्या ओळींच्या मधल्या जागेत कोरला गेला आहे.

बर्टच्या वर्णनावर जेम्स प्रिन्सेपची टिप्पणी पृ. ११४ पासून सुरू होते. चारांपैकी क्र.३ चा लेख देवनागरीमध्ये लिहिलेला असून सर्वात दीर्घ आहे. तरीही त्यामध्ये मुख्यत्वेकरून अनेक नावे आणि तारखाच नोंदविलेल्या असून महत्त्वाचे काहीच दिसत नाही. क्र. २ चा लेख प्रिन्सेपने बनारस संस्कृत कॉलेजच्या पंडितांकडून वाचवून घेण्यासाठी त्या कॉलेजचा कार्यवाह कॅ. ट्रॉयर ह्याच्या हवाली केला आणि तेथील प्रमुख ग्रंथपाल माधव राय ह्यांनी महाबलिपुरम् आणि अन्य स्थानांहून मिळालेल्या लेखांच्या आधारे त्यामधून ’चन्द्रगुप्त',’समुद्रगुप्त’ आणि काही अन्य नावे वाचण्यात, तसेच अन्य बराचसा मजकूर वाचण्यात यश मिळविले. (पृ.११८). गुप्तांच्या प्रतापी घराण्याच्या साम्राज्याचा अशा मार्गाने प्राचीन इतिहासाच्या दालनात पुन:प्रवेश झाला. (ह्या पहिल्या वाचनानंतर अधिक अभ्यासामुळे पुढील काळात वाचनात बरेच बदल झाल्याचे दिसते.) विष्णुपुराणात उल्लेखिलेला नन्दवंशाशी संबंधित चन्द्रगुप्त हाच ग्रीक स्रोतांमधील अलेक्झॅंडरचा समकालीन 'Sandracottus' असावा असा ठोकताळा होताच. तो चंद्रगुप्त आणि अलाहाबाद क्र.२ मधील चंद्रगुप्त हे एकच का वेगळे असा प्रश्न निर्माण झाला. ह्या प्रश्नाला उत्तर मिळण्यासाठी अजून काही काळ जायचा होता..

आपल्या ११४ पृष्ठावरील टिप्पणीत प्रिन्सेपने काढलेले प्रमुख निष्कर्ष असे: अलाहाबाद क्र. १चा लेख स्तंभावर सर्वात प्रथम स्थानी आहे, त्यातील लिपी क्र. २शी मिळतीजुळती आहे तरीही क्र. २मधील लिपी क्र. १च्या लिपीचा पुढील अवतार आहे कारण तिच्यात अक्षरसंख्या अधिक दिसते आणि अक्षरे अधिक सुबक आहेत. ह्या कारणांनी क्र.१चा लेख क्र. २पेक्षा अधिक प्राचीन आहे. त्यातील अक्षरे आणि त्यांच्यात होणारे पाच बदल हे देवनागरीमधील बाराखडीमध्ये दिसतात त्या प्रकारचे आहेत म्हणजेच लेखाची भाषा ही संस्कृत-देवनागरी गटाशी नाते सांगणारी आहे, मग प्रत्यक्ष भाषा कोणतीही असो. विशेष म्हणजे अलाहाबाद क्र.१ आणि दिल्ली कोटला स्तंभाच्या लेखावर सुरुवातीसच येणारी आणि शेजारी चित्रात दाखविलेली पाच अक्षरे अगदी एकसारखीच आहेत म्हणजेच तो एकच मजकूर दोन्ही स्तंभांवर आहे.

ह्यापुढील महत्त्वाची पायरी म्हणजे JASB Vol.III च्या जून १८३४च्या भागातील रे. डब्ल्यू.एच.मिल, सोसायटीचे उपाध्यक्ष, ह्यांचा निबंध. माधव राय ह्यांच्या सोडवणुकीतील निश्चित वाटणारी अक्षरेच केवळ गृहीत धरून आणि गयेमध्ये सापडलेल्या देवनागरी-संस्कृतमधील एका लेखावरून आधार घेऊन मिल ह्यांनी अलाहाबाद क्र.२चे पुनर्वाचन केले आणि त्यातून पुढील निश्चित वंशावळ उभी केली : सूर्यकुलोत्पन्न राजा गुप्त - त्याचा पुत्र घटोत्कच - त्याचा पुत्र चंद्रगुप्त - त्याची पत्नी लिच्छविकन्या कुमारदेवी - त्यांचा पुत्र समुद्रगुप्त - संहारिकापुत्री (नाव अज्ञात) त्याची पत्नी.

अलाहाबाद क्र. १च्या वाचनाचे कोडे अद्यापि न सुटलेलेच होते आणि ते सुटायला तीन वर्षे बाकी होती, तरीही त्या दिशेने पुढचे पाऊल बी.एच.हॉजसन ह्यांच्या JASB Vol.IIIच्या ऑक्टोबर १८३४च्या भागातील लेखाने टाकले. हॉजसन हे नेपाळ दरबारात कंपनीचे रेसिडेंट म्हणून कामावर होते आणि जेम्सचा मार्च १८३४मधील निबंध त्यांच्या वाचनात आला होता. तो वाचून त्यांनी सोसायटीस कळविले की ८-१० वर्षांपूर्वी उत्तर बिहारमधील अशाच तीन स्तंभांबाबत त्यांनी सोसायटीला माहिती पुरविली होती. त्यांपैकी एक उत्तर बिहारमध्ये पश्चिम चंपारण जिल्ह्यातील लौरिया नंदनगढ ह्या गावाजवळ होता आणि त्या स्तंभावरील अशाच एका लेखाचा ठसाही त्यांनी सोसायटीकडे पाठविला होता. हिंदुस्तानच्या दूरदूरच्या भागांमध्ये असे हे एकसारखे लेख मिळत होते ह्याचा अर्थ असाच लावता आला असता की ते लेख काही प्रकारच्या देवनागरी-संस्कृतसमान लिपीत आणि भाषेत लिहिलेले असावेत.

हॉजसन ह्यांची ही टिप्पणी पाहून जेम्सच्या ध्यानात आले अलाहाबाद, फिरोजशाह कोटला आणि लौरिया नंदनगढ - ह्यालाच जवळच्या गावावरून बेटिया लेख असेही उल्लेखिलेले आढळते - ह्या तीनही लेखात साम्य आहे आणि पहिली पंधरा अक्षरे तीनही लेखांमध्ये समानच आहेत. (ही अक्षरे अशी होती:)

ह्यानंतर JASB Vol.IIIच्या नोव्हेंबर १८३४च्या भागात रे. जे.स्टीवनसन ह्यांचा कार्ल्याच्या लेण्यातील काही लेखांच्या वाचनाचा प्रयत्न असलेला लेख प्रसिद्ध झाला. हा लेख लिहिण्याच्या वेळी JASB Vol.III च्या मार्च १८३४ च्या भागातील अलाहाबाद स्तंभाविषयीचा लेख स्टीवनसन ह्यांच्या पाहण्यात आला होता आणि तो वाचल्यावर त्यांनी अलाहाबाद स्तंभातील पहिल्या १५ अक्षरांचे वाचन करण्याचा प्रयत्न केला (चित्र वर पहा) तो असा: द्वेधारं पिये पिय द्वमोभार्जनेवं. तसेच कार्ल्याच्या लेण्यातील काही लेखांचे त्यांनी केलेले वाचनही त्यांनी सोसायटीकडे पाठविले, अशासाठी की त्याचाही वापर करून अलाहाबाद लेखाचे पूर्ण वाचन सुकर व्हावे. मात्र स्टीवनसन ह्यांच्या ह्या लिखाणाचा व्हावा तसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. (ह्या कार्ल्यातील लिखाणाच्या वाचनाचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी पुण्यातील काही ब्राह्मणांची मदत घेण्याचा प्रयत्न केला होता. त्या ब्राह्मणांना ते लेख वाचता आले नाहीच पण लेख कन्नडमधील असावेत असा तर्क त्यांनी केला. तेव्हा कन्नड जाणणार्‍या काही ब्राह्मणांना विचारून पाहिले. त्यांनी लेख कन्नड नसून तमिळ असावेत असा तर्क लढविला!)

मधल्या काळत वायव्य भागातून कॉटली, जन. वेन्चूरा अशांसारख्या हौशी संशोधकांनी गोळा केलेल्या इंडो-स्किथियन आणि बॅक्ट्रियन नाण्यांचा ओघ सोसायटीकडे चालूच होता. जेम्सला असे दिसले की त्या नाण्यांपैकी काहींवर अलाहाबाद क्र. २ लेखासारखे शब्द होते. एका नाण्यावर त्याला ’श्रीमद्घवकचो’ असा शब्दही आहे असे वाटले. (हा शब्द वस्तुत: ’श्रीमद्घटोत्कचो’ असा होता, ते नंतर कळले - वर वंशावळ पहा.) काही नाण्यांवरील लेखनात अलाहाबाद क्र. १मधील अक्षरांसारखी अक्षरे त्याला आढळली. ह्या नाणेसंग्रहांच्या अभ्यासामधून त्या भागातील ग्रीक, बॅक्ट्रियन, कुशाण राजवंशातील राजांची नावे कळली. कनिष्काचे नावही अशाच अभ्यासामधून जेम्सच्या हाती लागले.

हौशी संशोधकांच्या प्रयत्नांनी नवनवे स्तंभ आणि लेख उपलब्ध होतच होते. बिहारमधील रांधिया गावी सापडलेल्या स्तंभावर कोटला, अलाहाबाद आणि लौरिया नंदनगढ स्तंभांवरील लिखाणाची चौथी आवृत्ती मिळाली. सोसायटीकडे येणारी अशी सर्व माहिती एकत्र गोळा करून आणि एकमेकांशी पडताळून त्यातून ह्या लेखांची अज्ञात लिपी सुसूत्रपणे वाचण्याचे जेम्सचे प्रयत्न चालूच होते. ह्याशिवाय हिस्सार आणि फतेहाबाद येथेही स्तंभ सापडले.

रांधिया स्तंभ. बाखरा स्तंभ.
बाखरामधील भग्न मूर्ति

ह्या सर्वांमध्ये पाटण्याच्या उत्तरेस २५ मैलावरील बाखरा गावानजीक सापडलेल्या प्राचीन अवशेषांची कथा मोठी मनोरंजक आहे आणि जे. स्टीफन्सन ह्यांच्या लेखातून ती JASB Vol.IVच्या जानेवारी १८३५च्या अंकात पृ. १२८-१३८ येथे उपलब्ध आहे. येथे स्टीफन्सन ह्यांना एका प्राचीन आणि संपूर्ण विस्मरणात गेलेल्या नगराच्या विस्तृत अवशेषांमध्ये एक उभा स्तंभ सापडला, ज्याच्या माथ्यावर एक सिंह होता. तेथे वस्ती करून राहिलेल्या एका फकीराकडून इतर संशोधकांना एका पद्मासनासनात बसलेल्या भग्न मूर्तीच्या पायांचा भाग मिळाला आणि त्या भागामध्ये अगदी तळाशी दोन सिंहांच्या प्रतिमांखाली एका ओळीचा एक लेख होता. ह्याच वेळेस योगायोगाने ले. कनिंगहम आणि अन्य सहकारी आपले खाजगी पैसे वापरून सारनाथ येथे उत्खनन करीत होते आणि तेथे त्यांनाही एका शिळेवरती एक लेख मिळाला होता.

ह्या दोन्ही लेखांच्या प्रती प्रिन्सेपकडे आल्या आणि त्याच्या ध्यानात आले की देवनागरीशी मिळत्याजुळत्या लिपीतील तो एकच लेख दोन्ही ठिकाणी आहे. (वरील चित्र पहा.) तिबेटी भाषेची लिपी ६व्या-७व्या शतकात देवनागरीपासून निर्माण झाली. तिच्याशी तुलना करून आणि तिबेटी ग्रंथांच्या आधारे असे दिसून आले की हा लेख म्हणजे बौद्ध प्रार्थनेमध्ये नेपाळ-तिबेटात सरसहा वापरल्या जाणार्‍या प्रार्थनेचा तो भाग आहे आणि त्याचे वाचन असे आहे:

ये धर्मा हेतुप्रभवास्तेषां हेतुं तथागत उवाच तेषां च यो निरोध एवं वादी महाश्रमण:

(ले.अलेक्झॅंडर कनिंगहम, जे पुढे जनरलच्या हुद्दयापर्यंत चढून पुरातत्त्व विभागाचे पहिले डिरेक्टर-जनरल झाले, त्यांची सारनाथ उत्खननाशी संबधित पुढील नोंद वाचण्याजोगी आहे. ते म्हणतात:

"I may mention also, on the authority of work-people, that the dilapilated state of the lower part of the Dhameka Tower, [the main structure ar Sarnath] is due entirely to the meanness of Jagat Singh, who, to save a few rupees in the purchase of new stones, deliberately destroyed the beautiful facing of this ancient tower. Each stone was slowly deliberately detached from the monument by cutting out all the iron cramps by which it was secured to its neighbours. The actual saving to the Babu would have been but little; but the defacement of the tower was very great, and, as the stones were removed at once, the damage done to the tower is quite irreparable."

जगत सिंह, बनारसच्या राजाचे दिवाण, ह्यांनी १७९३-९४मध्ये आपला वाडा आणि आपल्या नावाचा बाजार बांधण्यासाठी सारनाथमधील तयार विटा आणि दगड ह्यांची मुक्तहस्ते लूट केली होती ह्याची ही नोंद आहे.)

अशा मार्गाने सर्व हिंदुस्तानामधून गोळा झालेले शिलालेखांचे ठसे, नाण्यांवरील नावे इत्यादींचा अभ्यास अनेक हौशी संशोधकांनी करून करून आजवर अज्ञात राहिलेल्या लिपीच्या वाचनात काही प्रगती घडवून आणली होती. ह्याचेच फलित म्हणून गुप्त, वाकाटक असे अनेक संपूर्ण विस्मरणात गेलेले राजवंश प्रकाशात येऊन मुस्लिम राजवटीपूर्वीच्या आतापावेतो अज्ञात असलेल्या हिंदुस्तानचे चित्र स्पष्ट होऊ लागले होते.

जून ७, १८३७ ह्या दिवशी जेम्स प्रिन्सेपने सोसायटीपुढे एक महत्त्वाचा निबंध वाचून दाखविला. भिलसा (विदिशा) गावाजवळ सांची स्तूपाचे भग्न अवशेष होते आणि हौशी संशोधक त्यांचा अभ्यास करीत होते. कॅ. एडवर्ड स्मिथ ह्यांनी त्या अवशेषांमधून काही लेख शोधून त्यांचे ठसे सोसायटीकडे पाठविले होते. कॅ. स्मिथ ह्यांनी क्र. १ असा क्रमांक दिलेला लेख हा स्तूपाच्या पूर्व प्रवेशद्वारापासून मिळविला होता आणि सोसायटीमधील पंडित राम गोविंद ह्यांनी त्याचे वाचन करून जेम्सने त्याचे भाषान्तर केले होते. लेखात असे लिहिले होते की राजा चन्द्रगुप्ताच्या प्रसादाने ’अमुक’ नावाच्या कोणा व्यक्तीच्या पुत्राने श्रमणकांसाठी भूमि, पाच विहार आणि २५ दिनार इतके धन दान म्हणून दिले होते. एव्हांना गुप्त घराण्याचे चित्र दिसू लागलेले असल्याने हा चन्द्रगुप्त म्हणजे गुप्त वंशातील दुसरा चन्द्रगुप्त हे कळले, गुप्त घराणे बौद्ध होते काय असा संशयही निर्माण झाला पण कालान्तराने तो निवळला आणि गुप्त राजे जरी वैदिक परंपरेतील असले तरीही ते बौद्ध धर्मालाही आश्रय देत होते असे स्पष्ट झाले. ह्या लेखाशिवाय कॅ. स्मिथ ह्यांनी क्र. ३ ते २५ असे क्रमांक दिलेल्या २३ छोटया लेखांचे ठसेही पाठविले होते. हे छोटे लेख सांची स्तूपाभोवतालच्या सुशोभित कुंपणवजा भिंतीच्या अवशेषांमधून उचललेले होते आणि त्यांवरून अखेर जेम्सला ब्राह्मी लिपीची अखेरची किल्ली सापडली. त्यांपैकी क्र. १० ते क्र. १४ नमुन्यासाठी येथे दाखवीत आहे.

हे कसे घडले हे त्याच्याच शब्दांत (JASB Vol VI, 1837, पृ. ४६०-६१.)

"In laying open a discovery of this nature, some little explanation is generally expected of the means by which it has been attained. Like most other inventions, when once found it appears extremely simple; and, as in most others, accident, rather than study, bas bad the merit of solving the enigma which has so long baffled the learned.

While arranging and lithographing the numerous scraps of facsimiles, for Plate XXVII. I was struck at their all terminating with the same two letters, Coupling this circumstance with their extreme brevity and insulated position, which proved that they could not be fragments of a continuous text, it immediately occurred that they must record either obituary notices, or more probably the offerings and presents of votaries, as is known to be the present custom in the Buddhist temples of Ava where numerous dwajas or flag-staffs images, and small chaityas are crowded within the enclosure, surrounding the chief cupola, each bearing the name of the donor. The next point noted was the frequent occurrence of letter sya, already set down incontestably as s, before the final word - now this I had learnt from the Saurashtra coins, deciphered only a day or two before, to be one sign of the genitive case singular, being the sa of the Palí, or sya of the Sanscrit. 'Of so and so the gift,' must then be the form of each brief sentence; and the vowel a and anuswara led to the speedy recognition of the word danam, (gift,) teaching me the very two letters, d and n, most different from known forms, and which bad foiled me most in mv former attempts.

Since 1834 also my acquaintance with ancients alphabets had become so familiar that most of the remaining letters in the present examp1e could be named at once on re-inspection. In the course of a few minutes I thus became possessed of the whole alphabet, which I tested by applying it to the inscription on the Delhi column."

दिल्ली स्तंभ (म्हणजे फिरोजशाह कोटला येथील स्तंभ), गिरनार-जुनागढ लेख, कटकजवळील धौली येथील लेख आणि उत्तर हिंदुस्तानात सापडलेले इतर लेख ह्या सर्वांमध्ये प्रारंभी असलेले वाक्य, थोडया अधिक अभ्यासाने प्रिन्सेपने असे वाचले: ’देवानांपिया पियादासी राजा एवम् आह’ (देवांचा आवडता प्रियदर्शी राजा असे सांगतो) आणि ह्या प्रसिद्ध वाक्याचा भारताच्या प्राचीन इतिहासात पुन:प्रवेश झाला. (JASB Vol VI पृ. ४६९.)

आता प्रश्न उभा राहिला की हा ’देवानांपिया पियादासी’ राजा कोण? जॉर्ज टर्नूर हे Ceylon Civil Service मधील एक अधिकारी. सिलोनमधील बौद्ध धर्म आणि पाली भाषा हा त्यांच्या व्यासंगाचा विषय. An Epitome of the History of Ceylon ह्या त्यांच्या ग्रंथातील एका उल्लेखामुळे ह्या उत्तराला प्रारंभास एक चुकीची दिशा मिळाली. त्या उल्लेखाप्रमाणे ’देवेनिपियातिस्स’ नावाच्या सिलोनी राजाने दंबद्वीपाच्या (जंबुद्वीपाच्या) अनेक भागांवर सत्ता असलेल्या आणि पत्तिलपत्त येथे राजधानी असलेल्या धर्मासोक नावाच्या राजाला विनंती करून त्याच्याकडून त्याचा मुलगा मिहिंदु, मुलगी संगमित्ता आणि अनेक भिख्खूंना बौद्ध धर्माची सिलोनमध्ये स्थापना करण्यासाठी अनुराधापुराकडे पाठविले. नामसादृश्यामुळे प्रिन्सेप आणि सर्व अभ्यासकांचा ग्रह झाला की सिलोनच्या देवेनिपियातिस्स राजानेच हिंदुस्तानात अनेक ठिकाणी सापडलेले स्तंभ उभारले आहेत आणि लेख कोरले आहेत. अर्थातच सिलोनमधील राजाचा उत्तर हिंदुस्तानात आणि हिंदुस्तानच्या अन्य भागात एव्हढा प्रभाव का असावा हा प्रश्न त्यामुळे उभा राहिला. ह्या कोडयाचे उत्तरही असेच अनपेक्षितरित्या मिळाले. जॉर्ज टर्नूर ह्यांच्याच हातामध्ये सयामहून आलेले एक महत्त्वाचे बौद्ध पुस्तक, दीपोवंसो, पडले. ते वाचताना त्यांची नजर पुढील वाक्यावर पडली, ज्याचे त्यांनी केलेले इंग्लिश भाषान्तर असे होते:

"Two hundred and eighteen years after the beautitude of Buddha, was the inauguration of Piyaadassi.....who, the grandson of Chandragupta, and own son of Bindusara, was at the time Viceroy of Ujjayini."

प्रिन्सेपच्या हातात हा नवा उल्लेख आल्यावर त्याने पुढील दुरुस्ती केली:

"I had ascribed the the foundation of these pillar monuments to a King of Ceylon because his was the nearest or the only approach to the name recorded in the inscription. I did so before I had read it through or perhaps I should have felt the difficulties of such a supposition....It was but the utter absence of such a name in our Indian lists that drove me to a neighbouring state....Mr. Turnour has [thus] most satisfactorily cleared up a difficulty that might have long proved to be stumbling blockto the learned."

उरलीसुरली शंकाही लवकरच दूर झाली कारण टर्नूरनाच पाली ग्रंथांमध्ये धम्मासोको आणि पियादसो ह्या एकच व्यक्ती आहेत हे उमगले आणि ती व्यक्ती म्हणजे अशोक.

मी हे लेखन तयार करीत असतानाच पुढील तक्ता माझ्यासमोर आला. त्याचा उद्देश निरनिराळ्या अक्षरांचा ’ब्राह्मी ते देवनागरी’ प्रवास कसा झाला ते दर्शविणे असा दिसतो. जेम्सने भरलेल्या पायावर पुढील संशोधकांनी वेळोवेळी भर घालून देवनागरी लिपीच्या उत्क्रान्तीचे हे स्वरूप निर्माण केले आहे.

प्राचीन भारताच्या इतिहासाचे असे अनेक दुवे उघडण्यात महत्त्वाचा भाग घेणार्‍या प्रिन्सेपची तब्येत १८३८ मध्ये ढासळू लागली आणि त्याला डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. २-३ वर्षांच्या विश्रान्तीसाठी आणि औषधोपचारासाठी ऑक्टोबर १८३८ मध्ये तो इंग्लंडला परतला. हिन्दुस्तानात परत येऊन संशोधकार्य पुन: हातात घ्यायची त्याची उमेद होती पण त्याची तब्येत ढासळतच गेली आणि २२ एप्रिल १८४० ह्या दिवशी अकालमृत्यूने त्याला गाठले.

ही बातमी कलकत्त्यात पोहोचली तेव्हा जेम्स प्रिन्सेपचे एक उचित स्मारक उभारण्याचे त्याच्या चाहत्यांनी ठरविले. त्याप्रीत्यर्थ सार्वजनिक वर्गणीतून हुगळी नदीवर कलकत्त्याच्या बाजूस एक जेटी आणि त्यामागे पलाडियन शैलीत एक पोर्चवजा इमारत उभारण्यात आली. हे स्मारक आजही कलकत्त्यातील एक प्रेक्षणीय स्थळ मानले जाते.

इंग्लंडमध्येही Colonial Office, Whitehall, Durbar Court येथे जेम्स प्रिन्सेपचे स्मारक आहे.

(फोटोस्रोत)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

मोठा आणि माहितीनी खच्चून भरलेला लेख असल्याने वाचून होईपर्यंत दम लागला. ही माहिती इतक्या ओघवत्या शैलीत तुम्ही प्रस्तुत केली आहे...धन्यवाद ! गेल्या एक दोन दिवसात वाचलेल्या जालावरच्या विविध दिवाळी अंकांनिमित्त आलेल्या लेखांत हा सर्वांत जास्त आवडला.
देवनागरी लिपीच्या उत्क्रांतीचं चित्र विशेष रोचक वाटलं.
एका 'स्कीमॅटिक' चित्रात जेम्स प्रिन्सेपच्या शोधयात्रेचा आढावा घेता येऊ शकतो. लेखाला पूरक म्हणून असं चित्र बनवायला हवं असं वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्री कोल्हटकरांनी याअधीही अनेकदा थक्क केले आहे. यावेळेही त्यांचे लेखन या अपेक्षेला पात्र ठरते.
अगदी अनवट विषय आणि त्यावर येणारी चतुरस्र माहिती वाचली की एकीकडे दम लागतो तर दुसरीकडे काहीतरी भरपूर 'सत्त्व' असलेले वाचल्याचे समाधानही मिळते.

श्री कोल्हटकरांचे ही भरपूर माहिती इतक्या उत्तम शैलीत आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भाषेच्या, लिपीच्या शोधातून इतिहासाचा पाठपुरावा करण्याच्या प्रयत्नाविषयीचा लेख अतिशय आवडला.

"द्वेधारं पिये पिय द्वमोभार्जनेवं."
हे पहिलं वाचन कसं आलं असा मला प्रश्न पडला आहे. पिये आणि पिय असे दोन उच्चार व्हावे इतकी चिह्नं वेगळी नाहीत. खरं तर प्रियदर्शी किंवा पियदास्सी मधलं चौथं अक्षरही पि च्या चिह्नाला सारखंच वाटलं. तुम्ही दिलेला तक्ता पाहून स आणि प यांच्यातलं साम्य दिसून येतं. पण पहिल्या वाचनात काही योग्य दिशा आहेत. म्हणजे दे च्या जागी द्वे वाचल्यावर द च्या जागी द्व वाचणं हे बरोबर आहे. पण मग एक पिये आणि दुसरा पिय असा गोंधळ कसा होतो याबद्दल कुतुहल आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"द्वेधारं पिये पिय द्वमोभार्जनेवं."
हे पहिलं वाचन कसं आलं असा मला प्रश्न पडला आहे. पिये आणि पिय असे दोन उच्चार व्हावे इतकी चिह्नं वेगळी नाहीत.

याबद्दल माझा अंदाज असा की शिलालेख वाचणारा माणूस केवळ यांत्रिकपणे अक्षरामागून अक्षर लावत न जाता, त्या भाषेच्या व्याकरणाचं स्वत:चं ज्ञान अापसूकच कामी अाणत असावा. त्यात हा शिलालेख बावीसशे वर्षं जुना, तेव्हा अक्षरं झिजलेली, अस्पष्ट झालेली असणार. त्यामुळे ही पाली, मागधी वगैरे जी काही भाषा असेल तिच्या व्याकरणाचा उपयोग करून नीट वाचता न येणाऱ्या मजकुराबद्दल तर्क करणं गैर नाही.

समजा अाणखी हजार वर्षांनी एखादा जीर्ण झालेला पिवळट कागद सापडला अाणि त्यावर 'राजेश ताडयामि' अशी अक्षरं दिसली, तर 'श' वरचा अनुस्वार पुसला गेलेला असावा असा तर्क सहजच कुणीही करेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

अप्रतिम लेख!

कित्येक गोष्टी आपण अध्याह्रुत धरून चालत असतो. सम्राट चंद्रगुप्त, विक्रमादित्य, अशोक, कानिष्क वगैरे आपल्या ऐतिहासिक परंपरेचा इतका अविभाज्य भाग बनून गेले आहेत कि, १५०-२०० वर्षांपुर्वी, त्यांची नावे व त्यांचे कर्तुत्व यांचा भारतिय समाजमनाला विसर पडला होता, यावर विश्वास बसत नाही. त्यामुळेच, या पार्श्वभुमीवर, ब्राम्ही लिपीचा शोध लावण्याचे जेम्स प्रिन्सेपचे कार्य अमुल्य ठरते. हे म्हणजे, 'योग्य व्यक्ती,योग्य जागी, योग्य वेळी' असण्याचे उत्तम उदाहरण आहे. अनेक ठिकाणांहून, अनेक लोकांनी पाठवलेल्या माहितीचे तुकडे चिकाटीने जोडवत बसणे, हे काम सोपे नाही. किंबहुना, वेगवेगळ्या ठिकाणांहुन गोळा होत असलेली नाणी, स्तंभांवरचे लेख, उत्खननात सापडणारे अवशेष, या सगळ्यांमधून काही एक समान धागा शोधून काढणे, हे आश्चर्यचकित करणारे कार्य आहे.

हे सारे तुम्ही इतक्या बारकाईने व समजेल अशा प्रकारे मांडले आहे कि तुम्हाला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे.

'ब्राम्ही ते देवनागरी' हा प्रवासही मोठा रोचक झाला आहे.

संजय सोनवणी या संशोधक, लेखकांच्या मते पुरातन भाषांपैकी पाली तसेच संस्क्रुत ह्या भाषांना कसलेही प्रादेशिक संदर्भ नाहीत. कारण, मुळात या दोन्ही भाषा क्रुत्रिम असुन त्या प्रयत्नपुर्वक ग्रंथनिर्मितीसाठी बनवल्या गेल्या होत्या (सध्याच्या संगणक भाषांसारख्या). भारतात जुन्यात जुना (वाचला गेलेला) शिलालेख हा इसपु १००० मधील असुन तो व्रज (शौरसेनी) भाषेतील आहे. इसपु ३२२ पासुन पाली, अर्धमागधी, मागधी, तमिळ भाषेतील शिलालेखांची मात्र रेलचेल आहे. हे लेख लिहिले गेले कारण त्या भाषांना स्वत:ची लिपी होती हेही उघड आहे. आश्चर्याची गोष्ट अशी कि संस्क्रुत भाषेतील (तोही प्राक्रुत-संस्क्रुत मिश्रीत...धेदगुजरी) शिलालेख गिरनारला सापडतो तो इसवी सनाच्या १५० चा. तोही ब्राह्मी लिपीतला, ज्यात तत्पुर्वीच इसपु १००० पासुन असंख्य प्राक्रुत शिलालेख कोरले गेलेले होते. सहाव्या शतकापासुन मात्र संस्क्रुत शिलालेखांचे प्रमाण वाढलेले दिसते. याचा अर्थ असा आहे कि मुळात संस्क्रुतला स्वत:ची कसलीही आणि कधीही लिपी नव्हती....

तुमचा या विषयावरचा अभ्यास/ व्यासंग गाढा दिसतो, म्ह्णून, तुमचे यावरचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

एक व्यासंगपूर्ण, आशयघन, उत्क्रुष्ट लेख लिहील्याबद्दल मनःपुर्वक आभिनंदन. अश्याच लेखांची आपल्याकडून भविष्यात अपेक्षा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा इंग्रजी ब्लॉग : http://countrysideamerica.blogspot.com/

<सहाव्या शतकापासुन मात्र संस्क्रुत शिलालेखांचे प्रमाण वाढलेले दिसते. याचा अर्थ असा आहे कि मुळात संस्क्रुतला स्वत:ची कसलीही आणि कधीही लिपी नव्हती.>

ह्या विधानातील पहिल्या भागाशी माझी सहमति आहे. बहुतेक सर्व प्राचीन शिलालेख हे Classical Samskrit व्यतिरिक्त अन्य, सर्वसामान्य लोकांना सहज समजणार्‍या भाषेत लिहिलेले आढळतात. त्याचे कारणहि उघड आहे. हे लेख, उदा. अशोकस्तम्भांवरील लेख, येणार्‍याजाणार्‍या कोणालाहि वाचता येऊन त्याने त्याचे पालन करावे अशा हेतूने लिहिले आहेत.

मात्र ह्याचा अर्थ असा नाही की 'सोपी' (pre-classical अशा अर्थाने) संस्कृत भाषा अस्तित्वात नव्हती. उदा. महाभारत हा ग्रंथ इ.स.पूर्व कालापासून निर्माण होऊन वाढत गेलेला आहे आणि तो आपण सर्वसाधारणतः ज्याला संस्कृत म्हणू अशा भाषेत लिहिला गेला आहे. तरीहि ते संस्कृत कालिदासाचे संस्कृत नाही हेहि आपणास जाणवते. कालिदास आणि अन्य ख्यातनाम लेखकांचे सन्धि-समासबहुल संस्कृत नंतरच्या काळात अधिक वापरात येऊ लागल्याचे दिसते. डॉ. रा.ना दांडेकरांच्या मते हे 'अभिजात' म्हणता येईल असे संस्कृत गुप्त कालापासून, म्हणजे चौथ्या-पाचव्या शतकापासून दिसू लागते. गुप्त कालात हिंदु देवदेवता, धार्मिक आचार, भक्तिमार्ग, अभिजात संस्कृत ह्यांचा विकास झाला आणि तितक्याच प्रमाणात बौद्ध धर्माची पीछेहाट झाली, गुप्त कालापासून शिलालेख 'अभिजात' म्हणता येईल अशा संस्कृतात लिहिले जाऊ लागले असे विचार त्यांच्या A History of the Guptas' ह्या ग्रंथात पाहण्यास मिळतात. संस्कृतच्या ह्या विकासाबरोबरच त्याच काळापासून बौद्ध साहित्यहि संस्कृत भाषेत लिहिले जाण्याची प्रथा बळावली.

मात्र संस्कृत भाषा होती पण तिला लिपि नव्हती असे मात्र म्हणता येणारा नाही. का की, भाषेला स्वतःची स्वतन्त्र लिपि हवी हा विचारच मुळात अग्राह्य आहे. लिपि हे केवळ भाषेचे उच्चरण दृष्टिगम्य खुणांमध्ये पकडण्याचे साधन आहे. कोठलीहि भाषा सहज उपलब्ध अशा कोणत्याहि लिपीत लिहिली जाऊ शकते. उदा. आजहि जालावरील पुष्क्ळ मराठी रोमन लिपीत लिहिलेले आढळते ते अशासाठी नाही की मराठीला स्वतःची लिपि नाही, तर अशासाठी की संगणकावर लिहिण्यासाठी रोमन लिपि सहज उपलब्ध आहे.

आपण असे पाहतो की आजमितीस देवनागरी लिपि हिंदी, मराठी आणि नेपाळी ह्या भाषा समाईकपणे वापरतात. रोमन लिपि युरोपातील काही डझन भाषांना समाईक आहे. प्राचीन काळी जेव्हा संस्कूत लिखाण करण्याची आवश्यकता निर्माण झाली तेव्हा उपलब्ध लिपि ब्राह्मी होती म्हणून ती वापरली गेली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0