मूल्य आणि किंमत

कॉस्ट, प्राइस, व्हॅल्यू या तीनही शब्दांसाठी मराठीत बहुतेक वेळा 'किंमत' हा एकच शब्द वापरला जातो. परंतु प्रत्यक्षात हे तीन शब्द वेगवेगळे अर्थ ध्वनित करतात.

त्यापैकी 'प्राईस' या शब्दाने मुख्यत्वे विक्रीची किंमत दर्शवली जाते किंवा दोन व्यक्तींमध्ये जो खरेदी-विक्रीचा व्यवहार होतो त्याची किंमत दर्शवली जाते.

'कॉस्ट' या शब्दाने जी किंमत दर्शवली जाते त्यात खरेदीची किंमत दर्शवली जाते. किंवा उत्पादकाने वस्तू बनवली असेल तर उत्पादकाचा उत्पादनाचा खर्च दर्शवलेला असतो. उत्पादनाच्या खर्चात कच्च्या मालाची खरेदीची किंमत, त्या कच्च्या मालाचे तयार वस्तूत रूपांतर करण्यासाठी लागलेली मजुरी, ऊर्जा, इतर साहित्य यांचा खर्च तसेच प्रशासकीय आणि वाहतूक खर्च, कर्मचाऱ्याचे वेतन व इतर खर्च यांचा समावेश असतो. या किंमतीला अर्थशास्त्रात अंगभूत मूल्य (Intrinsic Value) असेही संबोधले जाते.

खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत या दोन्ही वास्तव किमती असतात. म्हणजे त्या प्रत्यक्ष घ्याव्या-द्याव्या लागतात.

याखेरीज तिसऱ्या प्रकारची किंमत अस्तित्वात असते तिला इंग्रजीत 'व्हॅल्यू' या शब्दाने आणि मराठीत 'मूल्य' या शब्दाने ओळखले जाते. मूल्य किंवा व्हॅल्यू ही काहीशी अमूर्त संकल्पना आहे. कधी कधी आपण मराठीत "त्याला माणसांची किंमत नाही" असा वाक्यप्रयोग करतो त्यात हीच मूल्याची अमूर्त संकल्पना अध्याहृत आहे.

अर्थशास्त्रानुसार एखाद्या वस्तूला मूल्य असण्यासाठी एक तर ती वस्तू ग्राहकासाठी उपयुक्त असायला हवी आणि दुसरे म्हणजे ती मर्यादित प्रमाणात उपलब्ध असायला हवी. मुबलक प्रमाणात (एकूण गरजेपेक्षा जास्त प्रमाणात उपलब्ध असलेल्या वस्तूंना किंमत नसते किंवा जिचा कुणाला उपयोग नाही त्या वस्तूला किंमत नसते).

बाजारव्यवस्थेत ही मूल्याची संकल्पना फार महत्त्वाची असते. मूल्य म्हणजे ग्राहकाला वस्तूची जी योग्य किंमत वाटते ती किंमत. ही किंमत ग्राहकाच्या मनात असते आणि ती स्थिर नसते. ती अनेकविध घटकांच्या एकत्रित परिणामांतून ग्राहकाच्या मनात साकार होते. अर्थशास्त्रानुसार एखाद्या वस्तूला मूल्य असण्यासाठी एक तर ती वस्तू ग्राहकासाठी उपयुक्त असायला हवी आणि दुसरे म्हणजे ती मर्यादित प्रमाणात उपलब्ध असायला हवी. मुबलक प्रमाणात (एकूण गरजेपेक्षा जास्त प्रमाणात उपलब्ध असलेल्या वस्तूंना किंमत नसते किंवा जिचा कुणाला उपयोग नाही त्या वस्तूला किंमत नसते).

वस्तूच्या उत्पादकाच्या दृष्टीने पाहिले तर जोवर ग्राहक द्यायला तयार असलेली किंमत खरेदीच्या किंवा उत्पादनाच्या खर्चापेक्षा जास्त असते तोवर उत्पादक ती विकायला तयार असेल. डील विल बी मेड.

ग्राहकाच्या मनातले मूल्य जोवर विक्रीच्या किंमतीपेक्षा जास्त आहे तोवर ग्राहक ती वस्तू खरेदी करायला तयार असेल. डील विल बी मेड.

ग्राहकाच्या मनातले मूल्य जाणणे ही मार्केटिंग क्षेत्रातली एक कठीण गोष्ट आहे. ग्राहक जेव्हा एखाद्या वस्तूचे किंवा सेवेचे मूल्य ठरवतो तेव्हा तो वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. आणि प्रत्येक ग्राहकाच्या मनातले अग्रक्रम (Priorities) वेगवेगळे असल्याने तो कोणत्या गोष्टीवर मूल्य ठरवेल हे सांगता येत नाही.
उदाहरणादाखल आपण गाण्याच्या सीडीचे उदाहरण घेऊ. बाजारात दोन गायकांनी सीडी प्रकाशित केली. त्यापैकी एक भीमसेनजींची आहे आणि दुसरी अन्य गायकाची आहे. सीडीचा उत्पादन खर्च दोन्ही बाबतीत जवळजवळ सारखाच असेल. तरीही भीमसेनजींच्या सीडीसाठी ग्राहक ५०० रुपये द्यायला तयार असेल तर अन्य गायकाच्या सीडीसाठी १५० ते २००च रुपये द्यायला तयार असेल. म्हणजेच ग्राहकाच्या मनातले भीमसेनजींच्या सीडीचे मूल्य जास्त आहे. त्याचबरोबर असेही लोक असतील ज्यांना शास्त्रीय संगीत आवडत नसेल. त्या लोकांना भीमसेनजींचे गाणे काय आणि दुसऱ्याचे काय; सारखेच वाटेल. पहिल्या उदाहरणातल्या ग्राहकाच्या मनातले भीमसेनजींच्या सीडीचे मूल्य ५०० रुपये असेल (कदाचित ती सीडी तो अमूल्यही समजेल. म्हणजे त्याच सीडीसाठी १०००/२००० रुपये जरी मागितले तरी तो ते द्यायला तयार होईल).

आणखी एक उदाहरण घेऊ. आपण हे जाणतोच की आपल्या घराजवळच्या कोपऱ्यावरचा भाजीवाला भाजी महाग देतो आणि मोठ्या मंडईत गेलो तर भाजी स्वस्त मिळू शकते. पण आपण कोपर्‍यावरच्या भाजीवाल्याला अधिक किंमत द्यायला तयार असतो. याचे कारण आपल्या मनातले घराजवळ भाजी मिळण्याचे मूल्य अधिक असते. मंडईत जायला लागणारा वेळ, त्रास आणि खर्च याचे गणित करून त्याची तुलना आपण कोपऱ्यावरचा भाजीवाला जितकी अधिक किंमत मागतो त्याच्याशी करतो आणि कोपऱ्यावरून भाजी आणण्याचे (वाढीव) मूल्य भाजीवाला मागत असलेल्या अतिरिक्त किंमतीपेक्षा अधिक आहे असा निष्कर्ष काढतो. या तुलनेत विचारात घेतलेले वेळ, त्रास हे घटक पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ (subjective) असतात. त्यामुळे प्रत्येक माणसाचे तुलनात्मक गणित वेगवेगळे होते आणि कुणी कोपऱ्यावरून भाजी घेतात तर कुणी मात्र मंडईतून भाजी आणतात.

मूल्यवर्धन (Value Addition):
एखाद्या वस्तूचे ग्राहकाच्या मनातले मूल्य वाढवणे म्हणजे मूल्यवर्धन.

एखाद्या वस्तूवर काही प्रक्रिया करून ती अधिक उपयुक्त/वापरण्यास सुलभ करणे हा मूल्यवर्धनाचा एक प्रकार आहे. भाजी निवडून, चिरून उपलब्ध केल्याने मूळ भाजीच्या मूल्यात वृद्धी होत असते. हे वास्तव मूल्यवर्धन होय. आता हे मूल्यवर्धन करण्यासाठी अर्थातच विक्रेत्याला काही अधिक खर्च येतो किंवा काही श्रम करावे लागतात. परंतु विक्रेत्याला त्यासाठी आलेल्या खर्चाची रक्कम किती यावर त्या वस्तूचे वाढलेले मूल्य मुळीच अवलंबून नसते. ते वाढलेले मूल्य ग्राहक त्याचे किती मूल्य ठरवतो त्यावर अवलंबून असते. सहसा ग्राहक यासाठी बरीच जास्त किंमत द्यायला तयार होतो. म्हणजेच ग्राहकाच्या मनातले मूल्य बरेच वाढते.

कधीकधी ग्राहकाच्या मनातले वाढीव मूल्य हे अमूर्त असते. वर सीडीचे उदाहरण दिले आहे. त्यात जे अतिरिक्त मूल्य ग्राहक ठरवतो त्यातले काही प्रमाणात वास्तव असते तर काही अमूर्त असते. जे वास्तव मूल्यवर्धन असते ते भीमसेनजींच्या गाण्याने जो आनंद मिळतो त्यामुळे असते तर काही प्रमाणात ते आभासी असते. असे आभासी मूल्यवर्धन वेगवेगळ्या मार्गांनी केले जाते.

ब्रॅण्डिंग आणि जाहिरात हे असे आभासी मूल्यवर्धन करण्याचे मुख्य मार्ग असतात. ब्रॅण्डिंग म्हणजे एखाद्या वस्तूला किंवा वस्तूंच्या समूहाला विशेष गुणवत्ता आहे असा समज ग्राहकांच्या मनात निर्माण करणे. यात एक वस्तू बाजारात बर्‍याच काळापासून उपलब्ध असते. आणि ती चांगल्या गुणवत्तेची आहे असे बाजारात सिद्ध झालेले असते. अशा वस्तूचे उत्पादक दुसरी वस्तू त्याच वस्तूच्या नावाने बाजारात आणतात. अशा वेळी ही नवी वस्तू त्याच गुणवत्तेची आहे असे ग्राहक (नव्या वस्तूची चाचणी न करताच) ठरवतो/मान्य करतो/गृहीत धरतो आणि त्याआधारे त्या वस्तूची अधिक किंमत द्यायला तो तयार होतो.

वरच्या भीमसेनजींच्या सीडीच्या उदाहरणात भीमसेनजींच्या गाण्याविषयी एक गृहीतक (ब्रँड व्हॅल्यू) ग्राहकाच्या मनात असते. भीमसेनजींची सीडी म्हणजे चांगलीच असणार असे समजून त्याची वाढीव किंमत द्यायला ग्राहक तयार असतो.

काही वेळा हे ब्रॅण्डिंग सामाजिक/पारंपरिकरित्या झालेले असते. याचे एक उदाहरण म्हणजे आपट्याची पाने. ही पाने दसर्‍याला एकमेकांना द्यायची असतात असे परंपरेने ठरवलेले असते. त्यामुळे एरवी काहीही मूल्य नसलेल्या आपट्याच्या पानांना काहीतरी मूल्य प्राप्त होते. त्यांचे मूल्य शून्य वरून शून्यापेक्षा काही अधिक असे वाढते. असेच उदाहरण अक्षयतृतीयेला सोने घ्यायचे असते किंवा व्हॅलेन्टाइन डेला (लांब देठाचे) गुलाबाचे फ़ूल आपल्या मैत्रिणीला द्यायचे असते या परंपरांचे आहे. अक्षयतृतीयेला सोने घ्यायचेच या कल्पनेमुळे ग्राहक त्यादिवशी काहीशा अधिक किंमतीला सोने घ्यायला तयार होतो.

ग्राहकांच्या मनातल्या फॅण्टसीजना साद घालून वस्तूचे मूल्य वाढवले जाते. गोरेपणा (किंवा गोरे असल्यास व्यक्तिमत्व उठावदार होऊन यशस्वी होता येईल) ही अशी एक फॅण्टसी आहे. तर काही वेळा पारंपरिक प्रतीकांचा वापर मूल्यवर्धनासाठी केला जातो. उदाहरणार्थ ट्रकच्या जाहिरातीत गेंडा, रेडा वगैरेसारखी प्रतीके वापरली जातात तर सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातीत मखमल, फ़ुले यांसारखी.

मूल्यवर्धनाचा उद्देश नेहमी विक्रीची किंमत वाढवणे हाच नसतो. येथे व्हॅल्यू फॉर मनी असा शब्दप्रयोग केला जातो. तितक्याच किंमतीत आपल्याला काहीतरी अधिक मिळत आहे असा ग्राहकाचा समज होणे हा मूल्यवर्धनाचा उद्देश असतो.

मूल्याचा आणखी एक प्रकार पाहून आपण हा लेख संपवू. हे मूल्य म्हणजे प्रतिष्ठामूल्य. एखादी वस्तू आपल्याकडे असणे याला एक अतिरिक्त मूल्य असते. आपल्याकडे बूट असण्याला जेवढे मूल्य असते त्यापेक्षा नाइकेचे किंवा रीबॉकचे बूट असणे याला अधिक मूल्य असते. याचे कारण नाइकेचे किंवा रीबॉकचे बूट घातल्याने प्रतिष्ठा वाढते असा ग्राहकाचा समज झालेला असतो. यात नाइकेच्या बुटाचा दर्जा इतर बुटांपेक्षा "थोडासाच" चांगला असला तरी त्यापेक्षाही प्रतिष्ठेचे मूल्य यात वरचढ असते.

समारोप

 • मूल्य ही किंमतीपेक्षा वेगळी कल्पना आहे.
 • मूल्य हे ग्राहकाच्या मनात असते आणि ते मूल्य ठरण्यात खूप घटकांचा परिणाम होतो.
 • वस्तू बनवण्यासाठी येणार्‍या खर्चाचा मूल्याशी काही संबंध नसतो.
 • वस्तूच्या विक्रीची किंमत मूल्यापेक्षा कमी असेल तरच ग्राहक ती खरेदी करतो.

अधिक चर्चा प्रतिसादांमधून करू.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

या गोष्टी मला मेज्जर कन्फ्युज करतात ,
आता मोबाईल मध्ये बघयला गेले तर एखादी कंपनी पूर्ण रिसर्च करते (उदा. samsung ,sony, apple म्ह्णु)आणि एखादी कंपनी रिव्हर्स इंजिनिअरिंग करून जवळपास तसेच प्रोडक्ट कमी खर्चात आणते (micromax ) ग्राहक म्हणून मला लागणारे सर्व काम दोन्ही फोन करतात.....तर दुसऱ्या कंपनीचा रिसर्च खर्च पूर्ण वाचलाच म्हणायचा ,तर याचा विचार किंमत ठरवताना कसा होतो?

प्रतिष्ठामूल्याने फरक पडत नाही असे मला वाटायचे म्हणून साताऱ्याजवळ एक कारखाना आहे आणि त्यांचेच बुटआणि लेदर प्रोडक्टचे शो रूम आहे ,मजबूत गर्दी असते तिथे तर तिथून खरेदी केली,अशक्य फालतू क्वालिटी आणि कम्फर्ट मिळाला.अश्या वेळी गेले पैसे तर जाऊ देत पण क़्वलिटी मिळाली पाहिजे असेच वाटते ..

प्रतिष्ठामूल्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे रोल्स रॉएस कार कंपनी ,आता माणूस रोबोटच्या accrucy ,repeatblity च्या जवळपास तरी फिरकणार का? तरी यांचे आपले आमच्या गाड्याना handmade गोष्टी आहेत ,आम्ही हाताने रंग देतो...,..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रिव्हर्स इंजिनिअरिंग करून "त्याच तंत्रज्ञानाने" मोबाईल बनवणे हे (बहुधा) बेकायदेशीर असते. तरीही अशी उत्पादने बाजारात येतातच.

म्हणून मूळ उत्पादनाच्या कंपन्या प्रतिष्ठामूल्याचा वापर करतात. "मायक्रोमॅक्स? ह्यॅ: " असे प्रतिष्ठित ग्राहकाला वाटावे अशा प्रकारे जाहिरात केली जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एखादी मोठी कंपनी बाकीच्या नवजात स्पर्धकांना खतम करण्यासाठी आपले उत्पादन कॉस्टपेक्षा कमी किंमतीला विकू लागते तेंव्हा त्यांच्या प्रतिष्ठामूल्याचे काय होते ?
एखाद्या महान संगीतकाराला संपवण्यासाठी त्याच्या निर्मिती असलेल्या रेकॉर्डस बाजारातून एकगठ्ठा खरेदी करुन त्या समुद्रकिनार्‍यावर फोडून टाकण्याच्या कृतीत त्या महान संगीतकाराचे बाजारमूल्य कमी झाल्याच्या घटना जुन्या सिनेसृष्टीत घडल्या आहेत असे म्हटले जाते. त्यांत त्या अमूल्य संगीतकाराचे बाजारमूल्य कसे कमी होते ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिष्ठामूल्य हा एक महत्त्वाचा घटक आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत केवळ नावासाठी पैसे खर्च करतील लोक. पण जर त्यांना कॅननचा कॅमेरा आणि कुठल्यातरी उल्हासनगर सिंधी असोसिएशनचा कॅमेरा यात काहीच आकर्षक फरक दिसून आला नाही, तर ते कॅनन या नावासाठी दीडपट पैसे द्यायला तयार होणार नाहीत.

एक ऐकीव किस्सा आहे. लेक्ससने जेव्हा लक्झरी कार्स बाजारात आणल्या तेव्हा ती कॉंपिटिशन मर्सिडीजला मारक ठरत होती. कारण त्याच क्वालिटीच्या गाड्यांच्या किमतीत प्रचंड फरक होता. त्यावर मर्सिडीजच्या गाड्यांच्या किमती कमी कराव्या अशी एक शक्यता होती. पण किंमत कमी केल्याने आपण प्रतिष्ठामूल्य कमी करू अशी त्यांना शंका आली. 'मर्सिडीज परवडते हे दाखवता येणं' हे मर्सिडीजच्या ग्राहकांना महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्यांनी वारंट्या, सर्व्हिसेस वगैरे जास्तीचं देऊन किंमत वाढवली! म्हणजे मर्सिडीज आणि लेक्ससमध्ये इतका फरक केला की लेक्सस परवडणं आणि मर्सिडीज परवडणं या दोन वर्गांत निश्चित वेगळेपण दिसेल. मग त्यासाठी विक्री कमी करून प्रतिकार नफा वाढवणं त्यांनी स्वीकारलं.

तर दुसऱ्या कंपनीचा रिसर्च खर्च पूर्ण वाचलाच म्हणायचा ,तर याचा विचार किंमत ठरवताना कसा होतो?

यासाठी काही गोष्टी रीसर्च करणाऱ्या कंपनीला फायदेशीर ठरतात. एक म्हणजे फोन बाजारात आल्यानंतर रिव्हर्स इंजिनिअरिंग वगैरे करून नवीन फोन तयार करता येतो. त्यासाठी किमान काही महिने तरी जातात. इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या बाजारपेठेत या काही महिन्यांनी प्रचंड फरक पडतो. कारण 'अत्याधुनिक' मॉडेल हे काही महिन्यात सर्वसाधारण होतं. रिव्हर्स इंजिनिअरिंग होवो वा न होवो, वर्षा-दीड वर्षांनी दुप्पट मेमरी, दुप्पट फीचर्स असलेलं मॉडेल तीच कंपनी बाजारात आणते. दहा वर्षांपूर्वी तुम्ही वापरत असलेला फोन किंवा कॉंप्युटर आठवून पहा. त्यामुळे सध्या एखादा सिनेमा जसा सत्तर टक्के धंदा पहिल्या आठवड्यात करतो तसंच इलेक्ट्रॉनिक वस्तूंबाबत हे पहिले महिने असतात.

दुसरी गोष्ट अशी की कॉपीराइट कायद्यांप्रमाणे प्रच्छन्न कॉपी करण्याची परवानगी नसते. याला चोरवाटा आहेत हे मान्य. पण राजमार्ग बंद आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मायक्रोमॅक्स कंपनी सॅमसंगचं नाव लावूच शकणार नाही. शिवाय औषधांच्या बाबतीत -जिथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंप्रमाणे काही महिन्यांनी फरक पडत नाही - एक विशिष्ट काळपर्यंत एकाधिकारशाही मिळते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिष्ठामूल्य हे पुढच्या टप्प्यात किंमत असते, असे म्हणता येईल ना? म्हणजे, मी मर्सिडीज वापरतो याचे प्रतिष्ठामूल्य आहे. मर्सिडीजमधून जाऊन मी एखादी सेवा १०० अधिक मर्सिडीजचा वापरखर्च या किंमतीला विकतो. पुढे या किंमतीची सेवा घेणाऱ्या ग्राहकाचे प्रतिष्ठामूल्य ठरते, आणि हे चक्र असेच चालू राहते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरोबर. ’बिस्लेरीच्या पाण्याने बनवलेली पाणीपुरी’ यात बिस्लेरीच्या ब्रॆण्ड मूल्याचा वापर केलेला असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अत्यंत सोप्या शब्दातले विवेचन आवडले. कित्येक वस्तूंचे मुल्य हे त्यांच्या 'जुने' असण्यावर वाढते तर अनेकांचे 'नवे' असण्याने.

व्यावसायिक कंपन्या आपल्या वस्तुंच्या किमती ठरवताना या 'मूल्या'ला महत्त्व देत असतीलच. तर हे मुल्य काढण्याच्या पद्धती (जसे सर्वेद्वारे जमवलेला विदा कोणते/कसे स्टॅटिस्टिकल फॉर्मूली वापरून, त्यातून अनुमाने काढतात) किंवा विविध काळात आणि विविध सामाजिक/आर्थिक व्यवस्थांमध्ये (जसे भांडवलशाही, समाजवाद, राजेशाही इत्यादी) "मुल्य" या संकल्पनेच्या व्याखेत करावे लागणारे बदल वगैरे या लेखात आले असते तर लेखाचे मुल्य अधिक वाढले असते Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अतिशय सरळसोप्या भाषेत मूलभूत संकल्पना समजावणारा लेख.

इतकं सहजपणाने शिकवणारे शिक्षक भेटले असते तर अर्थशास्त्र या विषयाची, फॉर दॅट मॅटर गणितापासून भूगोलापर्यंत कोणत्याही विषयाची गोडी लागली असती.

राजीव साने यांच्या युगांतर या पुस्तकातल्या अत्यंत स्पष्ट आणि मुद्देसूद मांडणीची या लेखावरुन आठवण झाली. राजीव साने यांचा मी फॅन आहेच, आता थत्तेचाचांचाही..

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-चितळेंची बाकरवडी ठराविक वेळेतच आणि रांग लावूनच घ्यावी लागणे
-अमुक ज्वेलर किंवा पंचे डेपो आदिसदृश्य व्यवसायांचा "आमची कोठेही शाखा नाही" असा क्लेम टू फेम असणे
-वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे आमची कार हाताने रंगवतो, ठराविक मनुष्यच रोल्सरॉईसची ती ट्रेडमार्क व्हाईट (बॉडी)लाईन आखण्याचं काम वर्षानुवर्षं करतो (एका सलग ब्रशस्ट्रोकमधे पुढपासून मागपर्यंत सलग रेष काढतो..)
-हार्ले डेव्हिडसन बाईक्स (किंवा तत्सम) या ऑर्डरीप्रमाणे पूर्ण हँड असेंबल्ड असतात.
-तमुक अँड सन्स यांच्या दुकानी एक किलोच चक्का एका माणसाला मिळेल.
-अमुक भोजनालयाची मेंबरशिप ओळखीशिवाय मिळत नाही.

ही सर्व वरवर प्रतिगामी / ग्राहक फ्रेंडली नसावीत असं वाटणारी टेक्निक्स (!?) किंवा पॉलिसीज म्हणा, याही लॉजिकच्या विपरीत जाऊन कुठेतरी मूल्यवर्धनच करत असतात असं वाटतं. हे खरं आहे का? अशा गोष्टी "धोरण" म्हणून मुद्दाम जपल्या जाऊ शकतात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. आमची कोठेही शाखा नाही हे वाक्य थट्टेचा विषय असले तरी खरे तर ती कस्टमर कमिटमेंट आहे. आमचे नाव वापरून कोणी व्यवसाय करत असेल तर सावध रहा असे सुचवणे हे ग्राहक फ़्रेण्डलीच आहे.
२. रोल्स रॉईसच्या हाताने रंगवण्याबरोबरच त्यांच्या गाडीच्या इंजिनाचा दर्जा तितका चांगला नसेल तर हाताने रंगवलेल्या पट्ट्याचाठी ग्राहक एवढी किंमत देईल असे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेख आवडला.

थोडा 'सिलॅबस'च्या बाहेरचा प्रश्न आहे. गाडी, फोन यांचा उपयोग आपण रोजच करतो. हिरे, सोनं वगैरे वस्तूंची उपयुक्तता तशी नाहीच. तरीही या वस्तूंना प्रचंड किंमत आहे. मुळात या गोष्टींना किंमत कशी आली असेल? युरोपिय लोक अमेरिकेत आले तेव्हा स्थानिक अमेरिकन लोकांना या युरोपीय लोकांचं पिवळ्या धातूबद्दल असणारं प्रेम समजलं नव्हतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

डायमंड वॉटर पॅराडॉक्स हा अर्थशास्त्रातला प्रसिद्ध शब्दप्रयोग आहे. पाण्याची उपयुक्तता सर्वाधिक आहे तरी त्याला किंमत नाही. (ते लेखात सांगितलेल्या "मुबलक उपलब्ध असलेल्या वस्तूंना किंमत नसते" या तत्त्वाशी धरूनच आहे).

हिरा आणि सोने यांना मुळात सौंदर्यमूल्य आहे. ती त्यांच्यातल्या विशिष्ठ गुणधर्मामुळे आहे. हिर्‍याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स २.४ इतका जास्त आहे (काच १.५, पाणी १.३) . त्यामुळे हिर्‍याला काच किंवा इतर पारदर्शक वस्तूंच्या/खड्यांच्या मानाने जास्त चमक असते. सारख्याच शेपच्या काचेच्या खड्यापेक्षा हिरा जास्त चमकतो. तसेच सोन्याचे आहे. केमिकली इनर्ट असल्याने सोन्याची चमक हवेच्या किंवा इतर पदार्थांच्या परिणामाने कमी होत नाही*. डक्टाइल असल्याने त्याची बारीक तार काढून /वळवून त्याचे विविध आकार बनवता येतात. या अंगभूत गुणधर्माखेरीज त्यांच्या दुर्मिळतेमुळे** त्यांना अधिकच मूल्य आले आहे. त्यामुळे त्यांची किंमत जास्त आहे. किंमत जास्त असल्याने ते स्वतःजवळ असणे याला प्रतिष्ठामूल्यही आले आहे. म्हणून फारशी उपयुक्तता नसलेल्या या पदार्थांची किंमत जास्त आहे.

*याच गुणधर्मामुळे सोन्याला विनिमयाचे साधन (नाणी) म्हणूनही मूल्य आहे.
** इतक्याच प्रमाणात दुर्मिळ असलेल्या अजूनही काही वस्तू असतीलही पण त्यांना सौंदर्यमूल्य नसेल तर त्यांना अधिक किंमत मिळत नसेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आपल्याकडे फार नाही, पण गोर्‍या वर्णाच्या लोकांचं प्राबल्य आहे अशा देशांमधे चांदी आणि प्लॅटीनमचे दागिने अधिक वापरले जातात. त्यांच्या त्या गोर्‍या वर्णावर पिवळेधम्मक दागिने फार चांगले दिसत नाहीत, पांढर्‍या (आणि दुर्मिळ) धातूंचे दागिने वापरले जातात. प्लॅटीनम महागही आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

साध्या सोप्या भाषेतला लेख आवडला.
मूल्याच्या (Value) वेगवेगळ्या प्रकारांबरोबरच किंमतीच्या (Cost) वेगवेगळ्या प्रकारांबद्दल वाचायला आवडले असते. उदा. संधीची किंमत (Opportunity Cost), विलंबित किंमत (Deferred Cost).
विशेषतः Deferred Cost बद्दल अतिशय कमी बोललं जातं आणि जेव्हा ती किंमत चुकवायची वेळ येते तेव्हा कठीण परिस्थिती उद्भवू शकते.
कित्येकवेळा वस्तूची Deferred cost उत्पादकापेक्षा ग्राहकाला वा ज्याचा काही संबंध नाही अशा इतर कोणालातरी भरावी लागते. ही विलंबित किंमत विक्रीकिंमतीला ग्राहकाच्या मनातल्या मूल्यापेक्षा कमी ठेवण्यास मदत करते असे वाटते. त्यावर विवेचन झाल्यास वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साध्या भाषेतील पण माहितीपूर्ण लेख आवडला. ननि यांच्याप्रमाणे मलाही थोडा विस्तारीत लेख आणखी आवडला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक.

यावरून हा गेम आठवला

https://en.wikipedia.org/wiki/Lemonade_Stand

यात आपल्याला बदलते हवामान लक्षात घेऊन रसाची योग्य प्राइस ठरवायची असते.

(मोबाइल वर सुद्धा मिळेल.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0