शेवट नसलेली कथा

एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली गोष्ट. अनेक शतके कैलासाच्या बाहेर पाउल न टाकल्यामुळे पार्वतीमातेचा जीव अगदी उबून गेला होता. तीच ती हिमाच्छादित पर्वतशिखरे, तेच ते धूसर करडे आकाश, त्याच त्या गणादिकांच्या लीला, तीच ती कार्तिकेय अन गणेशाची कौतुके अन तीच ती पतीराज शिवशंभूंची धीरगंभीर तपोमुद्रा ! कुठलंही च्यानल लावलं तरी एकच सिरीयल लागावी तसं काहीसं जगन्मातेला वाटत होतं. आदिमायेला आता जरा पृथ्वीतलावर जाऊन मनुष्यामात्रांची नखरेल रेलचेल पहावीशी वाटू लागली. त्यांच्या सुखदु:खांची दखल घ्यायची उर्मी तिच्या कोमल मनात दाटून आली. नुकतेच नवरात्र सुरु झाले असल्यामुळे पृथ्वीतलावरून आळवली जात असलेली तिची स्तुतिस्त्रोत्रे सप्तलोकांचे पदर भेदून कानावर येत होती. ती ऐकून तिच्या हृदयातला, मनुष्यामात्रांबद्दलच्या करुणेचा झरा दुथडी भरून वाहू लागला होता. तसेही, ऋद्धि अन सिद्धी या सुना कर्त्या झाल्यामुळे आदिमातेची जबाबदारी बरीच हलकी झाली होती. म्हणून पृथ्वीतलाची सफर करायचे तिने ताबडतोब मनावर घेतले.
हिमशिखरावर पद्मासन घालून ध्यानस्थ बसलेल्या महादेवांच्या समीप जाऊन आदिमातेने आर्जवी साद दिली,
‘नाथ...’
महादेवांचे एक नाही अन दोन नाही.
अंमळ थांबून तिने दोन तीन सप्तके वर चढून पुन्हा साद घातली, ‘आर्य भोलेनाथ...’
त्यासरशी भोलेनाथांचे कमलसदृश नयन अर्धोन्मीलित झाले.
‘देवी, आपण ? सुप्रभातीच आज आमची स्मृती कोणे कारणे झाली बरं ?’
‘किनई, आपण आता योगनिद्रेला काही काळ दूरच ठेवावे, गडे..’
‘का बरे देवी ?’
‘आम्हाला किनई, आपल्यासोबत पृथ्वीतलाची यात्रा करण्याची इच्छा झाली आहे.’
आता मात्र शंभूनाथांचे तिन्ही नयन खाडकन पूर्णपणे उघडले.
‘काय वदला देवी ? पृथ्वीतलाची यात्रा ? काल संध्यासमयी आपण, देवी अवदसा यांच्याकडे हळदीकुंकवाला गेला होतात काय ?’
‘नाही हो नाथ ! या कैलासाचा शुभ्र रंग रोज रोज पाहून बधीर झालेले आमचे नेत्र, पृथ्वीचे विविध रंगांनी नटलेले रूप अवलोकण्यास अधीर झाले आहेत. तसेही आपण पृथ्वीयात्रेस जाऊन किती बरं युगे लोटली ?’
‘युगे ? हे दुर्गे, चारच शतकांपूर्वी नाही का तू शिवबारायाला तलवार देण्यासाठी भूतलावर गेली होतीस ?’
‘इश्श ! ते काय मेलं पाहुण्या कलाकारासारखं दोन पळे रंगभूमीवर डोकावलेलं ! आता नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने माझी लेकरे मला विविध पूजाविधी अर्पून साद घालत आहेत. मी त्यांचा समाचार अवलोकण्यास इतकी उत्सुक झाले आहे ना.. !’
‘देवी, दुरून पर्वत साजरे ही मुखोक्ती आपणास विदित नाही काय ? हे आपले भक्त वरून आर्त दिसतात खरे पण अंतर्यामी कसे नाना पाप-कामनांनी अवगुंठीत आहेत हे तुज शुद्धमानसीस कसे उमगावे ? इथे कैलासावर असीम शांतता अन निर्मल स्नेह मिळत असता, पृथ्वीतलावर जाऊन मनुष्यमात्रांचे कलह अन दुर्वचने अवलोकण्याची बुद्धी आपणास कोठून झाली ? ’
‘नाथ, आपण आता माझा मानस दुर्बल करण्याचा यत्न करू नये. कोट्यावधी प्राणीमात्रात एक तरी शुद्ध अंत:करणाचा निस्सीम भक्त मला अवश्य भेटेल. आपण आता त्वरित यात्रेची तयारी करावी !’ जगज्जननीचा निर्धार अभंग होता.
आता मात्र महादेवांचा नाईलाज झाला. त्यांनी नंदीस सिद्ध होण्याचा आदेश दिला अन स्नानाच्या प्रबंधास लागले.
*****
यथावकाश महादेव अन गौरी नंदीवर स्वार होऊन आकाशमार्गाने भूतलावर संचार करू लागले. काही काळ नगरांमधून फेरफटका केल्यावर आदिमायेच्या लक्षात आले की सर्व भक्त अन भक्तिणी दांडिया, गरबा, अन इतर पूजाविधींच्या कर्मकांडामध्ये इतके मग्न आहेत की मातेच्या हाकेला प्रतिसाद देण्याचे त्यांना भानच नाहीये. डॉल्बीच्या अन दांडियाच्या गदारोळाने जगन्मातेचे मस्तक इतके कलकलू लागले की अखेर त्यांनी नंदीला शहराबाहेरच्या आयटी उद्यानात कूच करण्याची आज्ञा केली.
त्या हिरवळीने सुशोभित केलेल्या कृत्रिम उद्यानात आल्यावर आदिमातेला जरा हायसे वाटले. तिथल्या एका चतु:चक्र वाहनविश्रामस्थळावर नंदीस थांबण्यास सांगून महादेव अन अंबामाता एका सिमेंटच्या बाकड्यावर अंमळ विसावले. इतक्यात एका मनुष्याच्या रुदनाचा करूण स्वर तिच्या कानावर पडला. लगेच ती कळवळून महादेवांना म्हणाली,
‘स्वामी, सर्वत्र नवरात्राचा जल्लोष सुरु असताना या निबिड माहिती-अरण्यात या समयी शोक करणारा हा कोण प्राणी हे पाहण्यास माझे नेत्र उत्सुक झाले आहेत.’
‘आर्ये, या माहिती-अरण्यात असलेल्या अनेक संगणकांपैकी एकावर बहुधा येथील एखाद्या चुकार कार्य-योजकाने कार्याच्या निमित्ताने थांबून, दूर-चित्रवाणीची कौटुंबिक मालिका लावलेली दिसते. तू व्यर्थ चित्तास शीण करून घेऊ नको...’
‘नाथ, प्रत्यक्ष समाचार न घेता तर्क-वितर्कावर आधारून निष्कर्ष काढून अप्रसंगाचा प्रसंग आणणे, या आपल्या वृत्ती-विशेषाचा मला गणेश-जन्मापासून अनुभव आहे. तेव्हा आता सत्वर उठा अन या रुदन स्वराचा उगम शोधा..’
महादेव कुरकुरत उठले अन दोघे समोरच्या उंच इमारतीच्या पलीकडल्या दालनात, जेथून रडण्याचा स्वर येत होता, तिकडे गेले. मात्र जाण्यापूर्वी, त्या दोघांनी आपला पारंपारिक वेश बदलून एकविसाव्या शतकातील मध्यमवयीन जोडप्याप्रमाणे वेशभूषा करण्याची दक्षता घेतली.
दालनाच्या मध्यभागी एका काचेच्या बैठकीवर एक संगणक ठेवलेला होता. त्याच्या समोर बसून एक अत्याधुनिक पोशाखातील तिशीचा युवक रुदन करीत होता. संगणकाच्या निर्देशकावर एका खोल गर्तेचे चित्र दिसत होते.
‘हे युवका, तू कोण आहेस अन येथे एकटाच बसून असा रडत का आहेस ?’ जगन्मातेने ममतेने विचारले.
‘आं ? तुम्ही कोण अन एकदम आत कसे आला ?’ युवक भांबावून म्हणाला.
‘आम्ही येथील केअरटेकर असून सुरक्षा फेरी मारत असताना तुझा स्वर ऐकू आल्यामुळे येथे डोकावलो.’
‘हां हां, केअरटेकर.. मग काय उपयोग नाय. माझा प्रॉब्लेम तुम्ही नाही सोडवू शकणार.’
‘वत्सा, आम्ही प्रयत्न करून पाहण्यास तर तुझी काही हरकत नाही ना ?’
युवकाने आता जरा निरखून दोघांकडे पाहिले. त्या दोघांच्या सरळपणामुळे, त्याला आपली समस्या सांगण्यास हरकत नाही असे वाटू लागले. तो साश्रू-नयनांनी म्हणाला,
‘काय सांगू काका, मी व माझी पत्नी संजना या कार्यालयात नोकरी करतो. माझे नाव सौमित्र. माझी प्रिय पत्नी संजना , जी एक कुशल संगणक अभियंती आहे, काही वेळापूर्वी याच संगणकातील किडे काढण्याचे काम करत असताना अचानक एका किड्यांनी बुजबुजलेल्या संगणक-डोहात पडली अन दिसेनाशी झाली आहे. मीही एक कॉम्प्युटर प्रोग्रामर असल्याने मी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण तिचा काहीच थांगपत्ता लागेना. माझी एकुलती एक अन आवडती पत्नी आहे हो ती ! का होती म्हणू ...? काय करावे काही समजेना मला..’
असे म्हणून तो युवक पुन्हा करूण स्वरात रुदन करू लागला.
अंबामातेच्या हृदयात त्या युवकाविषयी करुणा, दया, ममता इ.इ. ची गर्दी दाटली. ती महादेवांकडे वळली अन म्हणाली,
‘हे आर्य, हा युवक सच्छील असून कट्टर पत्नीव्रत आहे, हे तर दिसतेच आहे. याजवर कृपा करावी अन याची हरपलेली पत्नी यास परत मिळवून द्यावी. आपण असे केले तर माझी पृथ्वीयात्रा सुफळ होऊन माझ्या भक्तगणांमध्ये माझी कीर्ती उदंड वाढेल.’
‘हे शुभे, तू या कृतीचा हट्ट धरू नयेस असा माझा तुला प्रांजळ सल्ला आहे. काळाच्या मार्गात आपण हस्तक्षेप करणे योग्य नव्हे. ‘
‘ते काही मला सांगू नका. स्वपत्नी-वियोगाचा शोक म्हणजे काय ते तुमच्यासारख्या, स्व-पत्नी सोडून भलतीलाच मस्तकावर चढवून ठेवणाऱ्या भोळ्या नाथास काय समजावे ?’ गंगेबद्दलची मळमळ गौरीने संधी साधून व्यक्त केली.
या तीराने मात्र महादेवाची वाणी कुंठीत केली.
‘ठीक आहे, पाहतो प्रयत्न करून...’
अन महादेवांनी पाहता पाहता संगणकावरील गर्तेत सूर मारला.
युवक ‘आ’ वासून पहातच राहिला.
‘ओ काकू, काका कुठे गेले हो , आता तर समोरच होते की..!’
‘काळजी करू नकोस, मुला. ते दोन पळातच परत येतील...’
अन खरोखर समोरच्या संगणकावरील घड्याळात मोजून दोन मिनिटे झाली तोच भोलेनाथ पुन्हा दालनात उपस्थित झाले. मात्र एकटेच नाही, त्यांच्यामागे लाखो दिलोंकी धडकन करीना सस्मित वदनाने उभी होती.
‘हे युवक , हीच ना तुझी पत्नी ?’ महादेव हसून विचारते झाले.
युवक डोळे फाडून पाहत होता. मग सावरून तो म्हणाला.
‘नाही नाही, महाशय, ही नव्हे माझी पत्नी. ही तर सिनेतारका करीना.’
‘अस्सं काय..’
महादेव पुन्हा संगणकात प्रवेश करते झाले. करीना शालीनपणे अंबामातेच्या डाव्या हाताला उभी राहिली.
दोन मिनिटे होतात न होतात तोच महादेव पुन्हा एकवार उपस्थित झाले.
याखेपी त्यांच्या बाजूस नवयौवना कॅटरीना लोभस अविर्भावात उभी होती.
‘ही घे, युवकां. हीच ना तुझी पत्नी ?’ महादेव पुन्हा विचारते झाले.
‘अहो, नाही, हो ! ही तर विश्वसुंदरी कॅटरीना. माझी संजना ही नव्हे.’
‘नीट निरखून पाहिलेस ना युवकां ? ही खरेच तुझी पत्नी तर नव्हे ?’
‘नाही हो महाराज, ही नव्हे माझी पत्नी.’ सौमित्र पुन्हा म्हणाला.
अम्बामातेने साभिप्राय भोलेनाथांकडे पाहिले.
कॅटरीनाला पार्वतीच्या हवाली करून पुन्हा महादेव संगणकात गडप झाले.
दोन मिनिटांनी ते परत आले तेव्हा त्यांच्याजवळ सौमित्राची खरीखुरी पत्नी संजना व्याकुळ मुद्रेने उभी होती. ‘आता पहा बरे, युवकां. हीच का तुझी पत्नी ?’ महादेव हसून म्हणाले.
‘होय हो , हीच माझी बायको संजना. ‘ असे म्हणून सौमित्र हर्षोल्हासाने धावत गेला अन त्याने संजनाचे हात प्रेमभराने आपल्या हातात घेतले.
महादेवांनी अन अम्बामातेने आता छद्मवेष टाकून आपले खरे रूप धारण केले.
आदिमाता मनोमन प्रसन्न होऊन युवकास म्हणाली,
‘हे युवका, तुझ्या पत्नीपेक्षा कितीतरी सुंदर अशा दोन अप्सरांसमान युवतींना प्राप्त करण्याची संधी मिळूनसुद्धा तू एकनिष्ठपणे व प्रामाणिकपणे स्व-पत्नीलाच स्वीकारलेस. या तुझ्या प्रामाणिकपणावर मी प्रसन्न झाले आहे अन तुला पुरस्कार म्हणून या तिघींनाही तुझ्या पत्नी म्हणून तुझी सेवा करण्याची आज्ञा देत आहे.’
सौमित्र ओरडला, ‘नको नको, देविमाते, या भारत देशात एकपेक्षा जास्त पत्नी केल्या तर माझी रवानगी तुरुंगात होईल हे मी तुला सांगावे लागतेय काय ?’
‘त्याची नको तुला काळजी. या तिघीही तुला ‘नो ऑब्जेक्शन‘ देतील अशी मी जातीने व्यवस्था करते ना !’
‘पण माते, या तिघींचे निर्वाह मी कसे चालवू ? या नव्या दोघींचा रोजचा मेक अपचाच खर्च माझ्या महिना पगारापेक्षा जादा असेल...!’ सौमित्र.
‘मी तुला तिसरा अंबानी बनवते !’
अम्बामातेने सौमित्रावर कृपा करण्यासाठी आता पदरच बांधला.
आणखी काही कारणे-निमित्ते सौमित्रला प्रयत्न करूनही सापडेनात.
तेव्हा विजयी मुद्रेने अंबामाता अन मिश्कील मुद्रेने महादेव अंतर्धान पावले.
---******---
या कथेचा अंत मला माहिती नाही. सांगणाऱ्याने मला अशीच सांगितली.
सूज्ञ वाचकांनीच सल्ला द्यायचा आहे, की याचा शेवट कसा करावा ?

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

सपशेल ठ्ठो!!
तुफान मजा आली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

किमान तीन वेगवेगळे समूह तुमच्या घरावर निषेधाचा मोर्चा घेउन येणार अशी शक्यता आहे Smile
शेवट सुचवला मी, तर त्यातला एक मोर्चा माझ्याही घरावर येईल.
त्यामुळे गोष्ट वाचून निवांत हसत बसणं - एवढंच करु शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय वदला देवी ? पृथ्वीतलाची यात्रा ? काल संध्यासमयी आपण, देवी अवदसा यांच्याकडे हळदीकुंकवाला गेला होतात काय ?

इथे पर्यंत अगदी सिरीअसली वाचत होतो मग प्रचंड हसत सुटलो..:)
मजा आली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा ROFL तूफान!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा
लेखिकेने शेवट न केली तेच बर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile