आपला कलाव्यवहार आणि आपण

आपला कलाव्यवहार आणि आपण

- ऐसीअक्षरे

'आजचं जग कसं आहे?' ह्या प्रश्नाची अनेक उत्तरं संभवतात. 'आपला कलाव्यवहार आणि आपण' ह्या, म्हणजे दिवाळी अंकाच्या विषयाच्या, चौकटीतून पाहिलं, तर आजचं जग गदारोळाचं आहे असं एक उत्तर पटकन सुचतं. हा गदारोळ अनेक प्रकारचा आहे. वेगवेगळे राष्ट्रीय किंवा धार्मिक सण, जयंत्या-मयंत्या, झालंच तर - लग्नं, निवडणुका, गल्लीतल्या भावी गुंडांची बारशी अशा अनेक कारणांनी आणि डॉल्बी भिंती, वाहनांचे कर्णे, पोलिसांच्या शिट्ट्या, फटाके वगैरे अनेक गदारोळी साधनांनी आपला परिसर गजबजलेला असतो. दृश्यपातळीवरही असाच गदारोळ आहे. वारांगना ज्याप्रमाणे गिऱ्हाइकाला आकृष्ट करण्यासाठी विभ्रम करते, त्याप्रमाणे हलते-लखलखते विभ्रम करणारे जाहिरातींचे फलक, फ्लेक्स, मॉल्सचा झगझगाट वगैरे गोष्टी आपला दृश्य अवकाश गदारोळानं व्यापून टाकतात. आपल्या सार्वजनिक परिसरातल्या, डोळे निवतील अशा, सर्व जागा बिल्डर्स आणि राजकारण्यांनी संगनमतानं गिळंकृत केल्या आहेत. सिनेमा पाहायला गेलं, तर पॉपकॉर्नचा आणि इतर अनेक खाद्यपदार्थांचा वास, ठणठणाटी संगीत आणि मग अखेर अंधारात थ्री-डी सिनेमाचा अंगावर धावून येणारा अनुभव हाही गदारोळच आहे. रेडिओ मिरची किंवा तत्सम तिखट स्टेशनवरचे वचावचा बोलणारे डीजे, किंवा चोवीस तास गळणाऱ्या वृत्तवाहिन्यांवरचे, समोरच्याला बोलण्याची संधीच न देणारे, सतत हातवारे करत घसा खरवडून ओरडणारे अँकर हेदेखील ह्या गदारोळात भर घालतात. अंतिम सत्य आपल्याला गवसलंच आहे आणि जगाची प्रगती आपणच करू शकतो असा दावा करणाऱ्या नेत्यांचा आणि साधूंचा तर आपल्याकडे सुकाळच आहे.

अशा गदारोळी आसमंताचं एकदा व्यसन लागलं की माणसं शांत राहायला भिऊ लागतात. बस किंवा लोकलच्या गर्दीमधून प्रवास करणाऱ्याला शांतता परवडत नाही. ए.सी. कारमधून ऑफीसला जाणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला खरंतर ती परवडू शकते, पण कार चालू केल्या केल्या डी.जे.च्या वटवटीपासून 'स्वामी समर्थ' किंवा गायत्री मंत्राच्या अखंड आवर्तनापर्यंत काहीही लावून शांततेला पळवून लावलं जातं. जागेपणीचा सर्व वेळ 'कनेक्टेड' राहून गदारोळाचं सुरक्षाकवच स्वत:भोवती असं काही लपेटलं जातं की, काय बिशाद आहे त्या मसणवटी शांततेची आपल्याजवळ येण्याची!

जेव्हा सगळा परिसरच असा एक्सायटेड असतो, तेव्हा कलास्वादसुद्धा तसाच घेतला जातो. थिएटरमध्ये अंधार झाला रे झाला की चुळबुळ सुरू होते. फोटो काढणं, आपण कुठे काय पाहायला आलो आहोत त्याची फोर-स्क्वेअरवरून अपडेट्स टाकणं वगैरे सुरू होतं. एखादा सिनेमा चांगला आहे असं कुणीतरी सुचवण्याचा अवकाश, की लगेच तो नेटफ्लिक्स किंवा टॉरंटच्या नळातून घरच्या ओसंडणाऱ्या बादलीत ओतला जातो आणि ओरपला जातो. 'ह्यात गैर काय आहे? आधीच्या अभावाच्या वातावरणापेक्षा आज आपण जगतोय ती अवस्था प्रगतच आहे' असा युक्तिवाद केला जाऊ शकतोच. 'मुळात कलेचं प्रयोजनच काय? आम्ही कलेशिवायही आनंदीच आहोत' असाही प्रतिवाद केला जाऊ शकतो. 'चांगली कला म्हणजे काय ह्याची व्याख्या आधी करा पाहू' वगैरे आंतरजालीय वादविवादांतले हुकुमी एक्के तर आमच्या हाताशी नेहमीच असतात.

'जिंदा है तो प्याला पूरा भर ले' हा आजचा मंत्रघोष आहे. तुमचा पेला पूर्ण भरता येत नसेल, तर तुम्ही जगायला नालायक आहात असाही त्याचा अर्थ लावता येईल. गंमत म्हणजे ऑलिंपिक शर्यतीत ऐन मोक्याच्या वेळी पदक मिळवण्यात ज्याला अपयश आलं होतं, त्या मिल्खा सिंगच्या गोष्टीसाठी ह्या घोषाचं अवगुंठन वापरलं जात आहे. ह्यातला विरोधाभास किती जणांना दिसत असेल? माहीत नाही. अशा जगात 'कहाँ आ गये हम? कहाँ जा रहे थे?' असे अस्तित्ववादी प्रश्न विचारणाऱ्या मन्ना डेला फारसं महत्त्वाचं स्थान नसणार; फारतर 'एक चतुर नार'मधला गदारोळी मन्ना डे लोकांना लक्षात राहील, एवढंच. शोधलं तर 'यूट्यूब'वर दोन्ही सापडतात. पण जे अपरिचित आहे त्याच्यापर्यंत पोहोचायचं कसं?

ह्या सगळ्यावर अखेरचा शब्द ठरतील अशी उत्तरं 'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकात आहेत असा दावा इथे अजिबात केला जाणार नाही. कारण हे प्रश्न गहन आहेत आणि त्यांची उत्तरं ही अखेर प्रत्येकाला स्वत:मध्येच शोधावी लागणार आहेत. खजिन्याच्या शोधात असताना जसे ठिकठिकाणी काही खरेखोटे 'क्लू' पेरलेले असतात, तसे काही 'क्लू' मात्र इथे सापडू शकतील. एकेका कथेचा जर्म अनेक दिवस मनात मुरवणारे आणि हळूहळू त्याला आकार देणारे; कथा लिहून कधीच्या तयार आहेत, पण पुस्तक प्रकाशित व्हायला अनेक वर्षं लागली तरी त्याची खंत न बाळगणारे लेखक सतीश तांबे इथे भेटतील. आपला पुणेरी उर्मटपणा बाजूला सारून आपण कशापुढे नम्र होतो ह्याचा कबुलीजबाब देणारे सचिन कुंडलकर इथे भेटतील. 'नॅशनल जिऑग्राफिक' पाहून जंगलातल्या प्राण्यांचे फोटो काढावेत असं वाटत असताना माणूस नावाच्या प्राण्याच्या मोहात अडकणारे अवधूत डोंगरे एक दिवस फोटोग्राफीच सोडून देतात त्याची गोष्ट इथे वाचायला मिळेल. गायतोंड्यांच्या चित्राकडे पाहून ज्याच्या डोळ्यांत पाणी येतं अशा माणसाचे पाय धरायला तयार असणाऱ्या शुभा गोखले इथे भेटतील. समकालीन भारतीय कलेचं प्रदर्शन घेऊन ज्येष्ठ चित्रकार सुधीर पटवर्धन महाराष्ट्रभर फिरले होते. त्याचा उल्लेख इथे सापडेल. रुची ह्यांचा डब्लिनला जाऊन डब्लिनर होण्याचा मनोहर प्रवास अनुभवायला मिळेल. ह्याशिवाय आणखीही पुष्कळ काही मिळेल. ह्यातलं जे काही वाचून तुम्हाला स्वत:बरोबर काही काळ शांततेत घालवण्याची गरज भासेल, ते आसमंतातल्या गदारोळावरचं तुम्ही तुमच्यापुरतं शोधलेलं उत्तर असेल. तो तुम्ही शोधलेला खजिना असेल, म्हणून तो तुमच्यासाठी खरा असेल. असा तुमचा खजिना तुम्हांला सापडो ही 'ऐसी अक्षरे'तर्फे सदिच्छा.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

या अंकातील मौलिक ऐवजामुळे लेखाच्या शेवटी व्यक्त केलेली सदिच्छा प्रत्यक्षात येवो या सदिच्छेसह सर्व वाचकांना ह्याप्पी दिवाळी! Smile
मला अंक अतिशय आवडला आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!