रोड मूव्ही - एक सशक्त, अभिजात विधा

Don Quixote on the way with Sancho Panza - Gustave Dore
एका चित्रपटाची ओळख करून देण्यापेक्षा या लेखात एका चित्रपटप्रकाराची (पक्षी: विधा उर्फ genre) ओळख करून दिलेली आहे. ‘रोड मूव्ही'ची सोपी व्याख्या म्हणजे कथेतला बराचसा भाग प्रवासानं व्यापलेला आहे असा चित्रपट. प्रवासातल्या पात्रां/घटनांद्वारे किंवा त्यांच्या अनुषंगानं काही विचार चित्रपटात मांडता येतात. म्हणजे इथे प्रवास हा एक निमित्त म्हणून येतो. अधिक उकलून सांगायचं तर –

 • प्रवासात वेगवेगळी माणसं भेटत जातात. काही तात्पुरत्या भेटीनंतर पुन्हा न भेटण्यासाठी, तर कधीकधी आयुष्यभर एकत्र राहण्यासाठीही. कधी रोजच्या सहवासातली माणसं प्रवासात सोबती म्हणून लाभतात तेव्हा त्यांचं वेगळं रूप दिसतं.
 • छोट्या कालखंडात खूप वेगवेगळ्या (आणि अगदी आयुष्य बदलून टाकणाऱ्यासुद्धा) घटना दाखवायला प्रवास हे एक उत्तम साधन आहे.
 • प्रवासात अनपेक्षित गोष्टी घडण्याची शक्यता वाढते.
 • एखाद्या गोष्टीच्या शोधात माणूस प्रवासाला बाहेर पडतो असं दाखवून त्या शोधाला काही तत्वचिंतनात्मक बैठकीत बसवता येतं. कधीकधी दिशाहीन भटकण्यातून जे अनुभव येतात त्यामुळे आयुष्याला काही दिशा मिळते असं दाखवता येतं.
 • प्रवासात येणाऱ्या अनुभवांती माणसं अधिक प्रगल्भ झालेली दाखवता येतात. म्हणजे हे एक प्रकारे (मानसिक) वयात येणं असू शकतं.
 • प्रवास करता येणं म्हणजे स्थानबद्धतेपासून स्वातंत्र्य मिळणं असं म्हणता येतं. ही स्थानबद्धता म्हणजे निव्वळ नित्य रुटीन असू शकते, किंवा अगदी नाझींच्या छळापासून स्वत:ला वाचवण्यासाठी पळून जाणारे ज्यूसुद्धा आयुष्याला वेगळं वळण देणाऱ्या प्रवासात असतात.

‘प्रवास' ही एक विधा म्हणून अगदी अभिजात साहित्यातदेखील आढळते. होमरची ओडिसी किंवा रामायणातला वनवासाचा भाग हा असाच आहे. डॉन किहोते ही त्याच परंपरेतली कलाकृती म्हणता येईल. आधुनिक कादंबऱ्यांत जॉन स्टाईनबेकची ग्रेप्स ऑफ रॉथ किंवा हेमिंग्वेची ‘ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी’ यासुद्धा या विधेत मोडतील. हिप्पी किंवा 'बीट जनरेशन'ला प्रिय असणारी जॅक केरूअ‍ॅकची 'ऑन द रोड' ही आत्मचरित्रात्मक कादंबरीही या प्रकारात समाविष्ट होईल. ‘विझर्ड ऑफ ऑझ’, ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’, ‘अ‍ॅलिस इन वंडरलँड’सारख्या लोकप्रिय साहित्यकृतीही या प्रकारात मोडतील. थोडक्यात, निव्वळ चित्रपटांपुरती ही विधा मर्यादित नाही. तरीही रोड मूव्हीला काही विशेष स्थान आहे का? आधुनिक तंत्रज्ञानानं चित्रपट माध्यमाला जन्म दिला त्या सुमाराला रेल्वे, मोटार, विमान, मैलच्या मैल पसरलेले हायवे अशी नवी प्रवासाची साधनंसुद्धा मानवजातीला दिली. एकंदरीत आधुनिक माणूस अधिकाधिक प्रवास करू लागला. त्यामुळे चित्रपटात प्रवासाला अधिक महत्त्व लाभलं असा एक प्रवाद आहे.

असो. तर आता चित्रपटांकडे वळूया. आंतरजालावर शोधलं, तर या विधेत उत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या अनेक चित्रपटांचे उल्लेख आढळतात. त्यातल्या काही मला आवडलेल्या आणि या विधेची वैशिष्ट्यं दाखवणाऱ्या चित्रपटांचा थोडक्यात उल्लेख इथे करतो.

टीपः यादीला कोणताही विशेष क्रम नाही. ज्यांच्याविषयी स्वतंत्र लेखच नाही तर पुस्तकंदेखील लिहिता येतील (किंवा लिहिली गेली आहेत) असे अनेक चित्रपट या यादीत आहेत. जगभरातल्या दिग्दर्शकांनी या प्रकारच्या कथानकाचा आधार घेऊन त्यातून अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या शक्यता कशा आजमावल्या आहेत याचा अंदाज यावा इतपतच, म्हणजे काहीसा धावता आणि त्रोटक असा हा आढावा आहे. त्यातल्या काही चित्रपटांविषयी पुढे कधीतरी सविस्तर लिहिता येईल.

इतरांनी आपल्या आवडीनुसार यात भर घातली आणि त्या चित्रपटात आपल्याला काय भावलं हे सांगितलं तर आवडेल.

Easy Rider Poster

इझी रायडर (१९६९) - रोड मूव्ही प्रकाराला जन्म देणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक मानला जातो. दोन तरुण मोटारसायकलवरून भटकंती करतात आणि त्यांना वेगळ्या अमेरिकेचं दर्शन होतं. साठच्या दशकात व्हिएतनाम युद्धाच्या विरोधात वातावरण तापत असताना तेव्हाच्या तरुणांच्या संवेदनांवर अचूक बोट ठेवणारा चित्रपट. मोटारसायकलप्रेमींना ज्याची भक्ती करावीशी वाटते अशा अनेक प्रतिमा या चित्रपटानं रुढ केल्या. हॉलिवूडमध्ये (त्या काळात) सहसा न दिसणारी अमेरिका यात दाखवून दिग्दर्शक डेनिस हॉपर यानं एक नवा पायंडा पाडला. जॅक निकोलसन हा पुढे अतिशय गाजलेला नट एका छोट्या भूमिकेत इथे दिसतो. ‘अमेरिकन मिथक’ म्हणता येईल असं या चित्रपटाचं आज स्थान आहे.

बॉनी अँड क्लाईड (१९६७) - रोड मूव्ही प्रकाराला जन्म देणाऱ्या चित्रपटांपैकी हा अजून एक. चित्रपटातल्या घटनांना १९३०च्या दशकातल्या मंदीचा संदर्भ आहे, पण साठच्या दशकातल्या दिशाहीन तरुणांना त्यातल्या बंडखोरीच्या घटकामुळे तो आपला वाटला. वॉरन बीटी, फे डनवे आणि जीन हॅकमन हे नंतर बडे स्टार झालेले नट यात आहेत. १९५९पासून अस्तित्वात आलेल्या ‘फ्रेंच न्यू वेव्ह’चा प्रभाव यात स्पष्ट जाणवतो. दोन गुन्हेगारांची ही कथा आहे. त्यांनी घातलेले दरोडे, त्यांच्या मागावर असणारे पोलीस आणि त्यांना चकवत घडलेला प्रवास अशी याची रचना आहे. त्याला तत्त्वचिंतनात्मक डूब आहे ती मंदीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या हताशपणाची आणि आयुष्यात फारसा अर्थ दिसत नसतानाही आपलं माणूसपण जपून ठेवू पाहणाऱ्या पण समाजानं जगायला नालायक ठरवलेल्या माणसांची. आपल्याकडच्या ‘अँग्री यंग मॅन'चं मूळ आणि अधिक सशक्त रूप असं याला मानता येईल.

Priscilla - Queen of the Desert

प्रिसिला, क्वीन ऑफ द डेझर्ट (१९९४) किंवा थेल्मा अँड लूईज (१९९१) या चित्रपटांनी अनुक्रमे ड्रॅग क्वीन आणि दोन स्त्रिया यांचा प्रवास दाखवून रोड मूव्हीच्या काहीशा पुरुषप्रधान विश्वाला वेगळं परिमाण आणि पार्श्वभूमी दिली. कुटुंबातली लहान मुलगी सौंदर्यस्पर्धेत भाग घ्यायला निघते तेव्हा तिच्याबरोबर प्रवास करणारं एक गमतीशीर अमेरिकन कुटुंब लिटल मिस सनशाईन (२००६) या चित्रपटात दाखवलंय. कुटुंबातल्या प्रत्येकाला आयुष्यात समस्या आहेत आणि त्यांचे स्वभाव परस्परविरोधी आहेत. ते एकत्र येतात तेव्हा करमणूक होते खरी, पण शिवाय आजच्या अमेरिकेविषयी आणि त्या विश्वात माणसं कशी, का आणि कशाच्या बळावर टिकाव धरतात याबद्दल हा चित्रपट टिप्पणी करतो.

आता काही भारतीय चित्रपट:
तीसरी कसम (१९६६) – एक भोळा गाडीवान नौटंकीत काम करणाऱ्या एका स्त्रीला जत्रेच्या गावी पोचवायला निघतो आणि हळूहळू दोघं एकमेकांत अडकतात. त्यांचं सामाजिक वास्तव त्यांना एकत्र येऊ देणार नसतं, पण या निमित्तानं आपल्या नित्य आयुष्याहून एका वेगळ्या विश्वाची दोघांना जाणीव होते. लोकसंगीत, लोककथा यांचा प्रभावी वापर करून भारतीय दार्शनिकतेत अंतर्भूत असलेली करुणा आणि उब अधोरेखित केलेली आहे. गीतकार शैलेन्द्र आणि दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांनी जीव ओतून केलेला वेगळ्या जातकुळीचा हिंदी चित्रपट. राज कपूर-वहीदा रहमान, शंकर-जयकिशन यांचं संगीत असं सगळं रसायन असूनही ते चित्रपटाला तारू शकलं नाही. त्याच्या अपयशानं खचून शैलेन्द्र मेला असं म्हणतात.

भुवन शोम (१९६९) – नव्या भारतीय सिनेमाची सुरुवात मानला जाणारा मृणाल सेन यांचा चित्रपट. सरकारी नोकर शिकार करायला म्हणून आपल्या नागरी विश्वाबाहेर पडतो. अचानक भेटलेल्या एका गावंढळ मुलीमुळे त्याला आपल्या मर्यादा दिसून येतात आणि त्याची जाणीव प्रगल्भ होते. उत्पल दत्त आणि सुहासिनी मुळे आपापली भूमिका समरसून साकारतात.

पुढच्या भागात इतर भाषांमधले काही वेगळ्या वाटेचे चित्रपट.
(क्रमश:)

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

केवळ चित्रपटाबद्दल लिहिणे वेगळे आणि चित्रपटाच्या जातकुळीविषयी आणि त्या अनुषंगाने पडलेल्या पायंड्याबद्दल असे लिहिण्याने वाचकाला चित्रपटातील कथानकापेक्षा त्याच्या सादरीकरणाचे गम्य काय आहे हे समजायला फार मदत होते. श्री.चिंजं. यानी लेखात उल्लेख केलेल्या चित्रपटांपैकी एक प्रिसिला वगळता सारे चित्रपट मी अगदी माझ्या कॉलेज-जीवनात असताना थिएटरमध्येच पाहिले होते, शिवाय नंतर डिव्हीडीचा जमाना आल्यानंतर पुनःप्रत्ययाचा आनंद घेतला आहे.

१. "ईझी रायडर" बद्दल लिहिताना लेखकाने लिहिलेल्या आठवणींला पुढे नेताना असे म्हणेन की, यंग टर्क्स, जिप्सी लाईफ, हॅपी गो लकी यांची प्रभावळ आणि मोटार सायकल यांच्या अभेद्य नात्याची सुरुवात ईझी रायडरने केली. त्यावेळेच्या पीटर फोंडाची ती 'दुनिया गई जहन्नमे' स्टाईलची त्या खास बांधून घेतलेल्या मोटार सायकलवरील ऐटदार पोझ सार्‍या पोस्टर्समधून तरुणाईला भावली होती. [पीटर फोंडा हा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईटच्या जमान्यातील एक आघाडीचा अभिनेता हेन्री फोंडाचा मुलगा तर उत्कृष्ट अभिनेत्रीसाठीची दोन ऑस्कर्स मिळविणार्‍या जेन फोंडाचा धाकटा भाऊ.]. जॅक निकोल्सनच्या दुय्यम भूमिकेचा उल्लेख आलाच आहे, पण दिग्दर्शक डेनिस हॉपरबद्दलही लिहिले पाहिजे की याना भारतीय प्रेक्षक चटकन ओळखतो ते त्यानी "स्पीड" चित्रपटात रंगविलेला व्हीलन या नात्याने. (गेल्या वर्षीच हा गुणी कलाकार ख्रिस्तवासी झाला.)

२. 'वॉनी अ‍ॅण्ड क्लाईड" तर अमेरिकेतील आर्थिक मंदीच्या काळातील एक (कु) प्रसिद्ध जोडपे आणि त्यांच्या जीवनशैलीवरच त्याच नावाचा वरील चित्रपट. रोड मूव्ही परंपरेतील हा एक प्रधान चित्रपट मानला जातो. चित्रपटाच्या शेवटी दाखविण्यात आलेली बॉनी व क्लाईड यांच्या शरीरांची बंदुकीच्या गोळ्यांनी झालेली चाळण हे सिनेफोटोग्राफीमधील तंत्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून आजही फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना दाखविला जातो. ['फ्रेन्च कनेक्शन' मुळे सर्वतोमुखी नाव झालेल्या जीन हॅकमनने क्लाईडच्या भावाची यात भूमिका केली होती.]

श्री.चिंजंच्या दोन हिंदी उदाहरणापैकी 'तिसरी कसम' या गटात स्वीकारता येईल पण 'भुवन शोम' स्वीकारणे जड जाते. श्रीयुत शोम आठवड्याची सुट्टी घेऊन त्या वाळवंटातील खेडेगावात पक्षी शिकारीसाठी येतात आणि तेथील एक ग्रामकन्या त्याना त्या संदर्भात 'गायडन्स' देते. इतके अल्प कथानक. [चित्रपटाने इतिहास घडविला ही गोष्ट वेगळी, पण 'रोड मूव्ही' गटात त्याला बसविणे ठीक वाटत नाही.]

{तिसरी कसमबद्दल लिहिताना लेखकाने - कदाचित अनवधानाने - "शैलेन्द्र मेला" असे लिहिले ते खटकले. चित्रपटातील दुनियेतील पैशाचा लेखाजोखा त्या कवीला, राज कपूरने योग्य ती वॉर्निग देवूनही, करता आला नाही आणि 'मारे गये गुलफाम' म्हणत त्याने विषण्णतेने या जगाचा निरोप घेतला. फार प्रतिभावंत कवी होते शैलेन्द्र. त्यामुळे त्यांच्याविषयी 'अपयशाने मग शैलेन्द्र यांचा मृत्यु झाला' असे वाचायला आवडले असते.}

रोड मूव्हीजबद्द्ल माझी अल्पशी भर :

१. "ड्युएल' ~ वयाची अजून पंचविशीही पूर्ण केली नव्हती त्यावेळी आजचा जगप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक स्टीव्हन स्पीएलबर्गने तयार केलेला हा एक जबरदस्त रोड मूव्ही. या चित्रपटाचा नायक रुढार्थाने 'माणूस' नसून एक महाकाय ऑईल टॅन्कर आहे आणि त्याच्या जोडीला तासनतास चिटपाखरूदेखील दिसणार नाही असा अखंड रस्ता. या रस्त्यावरून एक इलेक्ट्रॉनिक्स सेल्समन आपली कार घेऊन कामाला बाहेर पडला आहे आणि हाय वे ला आल्यानंतर त्याच्यापुढे ते ऑईल टॅन्करचे अजस्त्र धूड. त्याला ओव्हरटेक करून पुढे जाताना मोठ्याने हॉर्न वाजवित काहीतरी पुटपुटणे एवढ्याच कारणावरून टॅन्करवाला आणि हा कारवाला यांच्यात सुरू होते ती जीवघेणी ओढाताण. या रोड मूव्हीचे वैशिष्ट्य म्हणजे यात नायिकाही नाही आणि टॅन्करचा तो व्हिलन ड्रायव्हर एकदाही पडद्यावर अवतरत नाही. दोनतीन प्रसंगात दिसतात ते त्याचे गुढ्घ्यापर्यंतचे चामडी बूट. दीड तासाच्या या चित्रपटात नायक आणि खलनायक एकदाही समोरासमोर येत नाहीत. फक्त त्यांचा वावर त्या त्या ड्रायव्हिंग सीट्सवर, त्यातही खलनायकाचा चेहरा दिसतच नाही. संवाद फारतर एकदोन पानाचे होतील. स्टीव्हन स्पीएलबर्गची चित्रपट दिग्दर्शनातील कौशल्य या त्याच्या पहिल्याच रोड मूव्हीत नोंदविले गेले आहे.

२. "शुगरलॅण्ड एक्स्प्रेस" ~ परत स्टीव्हन स्पीएलबर्गच. यावेळी त्या रोडवर आहे गोल्डी हॉन आणि तिचा प्रियकर. एका पोलिस व्हॅनला किडनॅप करून पोलिसासह ही जोडी चालली आहे अनाथालयात ठेवलेल्या आपल्या मुलाला आणण्यासाठी. त्या पोलिसाला वाचवणे गरजेचे आहे म्हणून शेरीफ व्हॅनवर थेट गोळीबार न करता सोबत पाचपंचवीस गाड्यांचा ताफा घेऊन रस्त्याला लागलेल्या गोल्डी हॉनचा पाठलाग करतो. अथपासून तिथंपर्यंतचा हा विलक्षण वेगाचा रोड मूव्ही. शेवटही चटका लावणारा आहे.

(अजून खूप उदाहरणे आहेत, पण लेखापेक्षा प्रतिसाद मोठा नको म्हणून थांबतो)

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थेल्मा अँड लुईस आणि लिटल मिस सनशाइन मस्तच आहेत. स्टीव कॅरेलचे विलक्षण शारिरिक, शांत आणि उदास-विनोदी अभिनय मला खूप आवडले.
रॉबर्ट डि नीरो आणि चार्ल्स ग्रोडिन चा "मिडनाइट रन" रोड मूवी होऊ शकेल का? एका फरार आरोपीला पकडून त्याचे जामिन पत्र भरलेल्याकडे परत आणायला नीरो न्यू यॉर्कहून एल.ए. पर्यंत प्रवास करतो. मजेदार सिनेमा आहे.
हिंदीत एवढे दोनच आहेत? बाँबे-टू-गोवा?
आजकाल याच थीमवर बरेच नवीन आहेत असे वाटते - प्रोमोज वरून - एकही पाहिलेला नाही.
हॅरळ्ड अँड कुमार गो टू व्हाइट कासल? बर्‍यापैकी विनोदी, आणि अमेरिकन ड्रीम च्या नेहमीच्या मांडणीला दिलेले एक वेगळेच वांशिक वळण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रंजक दिसते आहे. हॉलिवूडबद्द्ल फारशी माहिती अजूनही मजकडे नाही. पण ह्या सांगितलेल्या धाटणीवर काय काय आठवले ते सांगतो:-
जशी अ‍ॅलिस इन वंडरलँड आठवली, तसे "सिंदबादच्या सात सफरी" ह्या जगप्रसिद्ध लोककथाही आठवल्या.
जी एं ची "प्रवासी" ह्याच नावाची कथाही आहे. त्यातला काचेच्या जंजाळात राह्णारा क्रूर,आंधळा शिकारी; विचित्र नावाडी; एक घाणरडे तडफडणारे कुत्रे, सहस्र डोळ्यांचा कवी हे सर्व आठवले.

रामगोपाल वर्मा ह्या विक्षिप्त प्राण्याचा "रोड" नावाचा दळभद्री बॉलीवूडपट आठवला.

अमिताभचा "बॉम्बे टू गोवा" आठवला.

कोलंबसच्या जीवनावर "सरखेल कोलंबस" नावाचे पुस्त्क, चरित्रात्मक कादंबरी(राउ,छावा,श्रीमन योगी च्या धाटणीची) फार लहानपणी वाचले होते, तेही आठवले.

बादवे, Waiting For Godot मधील ते दोन येडे(भासणारे) कथानायक म्हणजे प्रवास चुकलेले किंवा कुठलाच प्रवास न करणारे प्रवासीच दाखवलेत ना बेकेट् ने?
"बेबीज डे आउट" ह्या नितांतसुंदर चित्रपटात बालकाच्या नजरेतून शहराचा प्रवासच तर घडवून आणलाय की.
कधी झू, तर कधी गार्डन तर कधी बांधकामाची साइट्.सगळच निरागस नजरेतून कसं दिसेल ते दाखवलय.
प्रवास मानवी जीवनात वैयक्तिक महत्वाचा असतोच. पण समूहच्या समूह असे प्रवास करतात तेव्हा ते एक नव्या संस्कृतीचे जन्म घेणे ठरते, किंवा जुन्याच संस्कृतीचे नव्याने अभिसरण घडते. पूर्वी प्रवास आजच्या मानाने कमी होइ, त्यामुळे त्याचे कौतुक फार असावे. म्हणूनच मध्यपूर्वेत अत्यंत महत्वाचा मानला जाणारा प्रवास म्हणजे मोझेसने इजिप्शियन राजांपासून सोडवून समस्त कष्टकरी ज्यूंना त्यांच्या स्वतःच्या भूमीत आणले, आज्च्या इस्राइलमध्ये, तो प्रवास. ह्याच्या शेवटच्या टप्प्याला चाळिस वर्षे लागली म्हणतात.
दुसरा प्रवास म्हणजे जगप्रसिद्ध "हिजरत".मक्का सोडून मदिनेला प्रेषित मुहम्मदाने केलेले प्रयाण.
ह्या दोन्ही प्रवासावर फारसे चित्रपट नसले, तरी असंख्य माहितीपट बनलेत.
असो. हे अवांतर होत आहे. मानवी मनावर,कथांवर प्रवासाचा असलेला ठसा सांगावासा वाटला, म्हणून टंकले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा प्रतिसाद श्री.मन यानी जी.एं.च्या 'प्रवासी' बद्दल उल्लेख केला आहे तेवढ्यापुरताच सीमित आहे.

ज्ञानप्राप्तीनंतर आयुष्य असणं भाग्याचं अशी समजूत असणार्‍या 'प्रवासी' नायकाला आपल्या सारा प्रवास म्हणजे एक खुळचटपणा असून नियतीनेच घडविलेला तो खेळ होता हे शेवटी उमजते आणि त्याला ज्ञान मिळते ते "इतरांचे प्रवास संपतात, रस्ता राहतो; पण आपला मात्र आता रस्ता संपून गेला, आणि प्रवास मात्र चालूच राहणार आहे." जबरदस्त ताकदीची ही कथा आहे.

काही दुरुस्ती : १. त्यातला काचेच्या जंजाळात राहणारा क्रूर, आंधळा शिकारी : काचेच्या नाही, "आरशांच्या"
२. विचित्र नावाडी : तो विचित्र नसून प्रवाशाला अंतिमत: ज्ञानाची व्याख्या प्रदान करणारा 'महाकाल' च असतो. ज्याने जाणीवपूर्वक प्रवाशाला रुद्रकालीच्या मंदिरात ते हिरवे रत्न मिळविण्यासाठी नावेतून आणलेले असते.
३. एक घाणरडे तडफडणारे कुत्रे : नाही, ते घाणेरडे नसून अगदी एका मुठीएवढेच पिल्लू असून दोरी गळ्यात अडकल्याने ते झुडपाभोवतीच तडफडत फिरत असते. प्रवाशी त्याला दोरीसह आपल्यासोबत पुढील प्रवासात घेतो आणि पिल्लू आणि त्याच्या गळ्यातील दोरी प्रवाश्याला शिकार्‍याच्या त्या वाड्यातून सुटका करून घेण्यास सहाय्यभूत ठरतात. त्यात शिकार्‍याच्या एका सुरीने ते पिल्लू मारले जाते आणि मग शिकारी आपली शंभरावी शिकार एक कुत्र्याचे पिल्लू व्हावे या वस्तुस्थितीने वेडापिसा होऊन आत्महत्या करून घेतो, अशी कथानकाची वाटचाल आहे.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गलिव्हर ट्रॅवल्स!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

आवडता विषय, जाणकार लेखक, उत्तम धागा.

लेखनाचा मुख्य विषय "रोड मूव्ही" असला तरी "प्रवास" अशा अधिक मोठ्या विषयाला स्पर्श केलेला आहे असं दिसतंय. त्यामुळे "मन" यांच्या प्रतिसादांमधेही तसे मुद्दे आलेले आहेत असं दिसतंय.

"रोड मूव्ही" वर मूळ धाग्यात आलेले आणि प्रतिसादात आलेले सर्व चित्रपट संस्मरणीयच म्हणायला हवेत. त्या सर्वांची पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल आनंद होतो आहे.

या जॉन्रा मधले इतर काही चित्रपट आठवतात. ते त्यात पूर्णपणे बसतील की नाही, कल्पना नाही.

"साईडवेज" या चित्रपटाची आठवण येते. म्हण्टलं या चित्रपटातलं रिकरिंग थीम वाईन आहे; परंतु त्या निमित्ताने रोड वर घडलेला प्रवास हा घटक अपरिहार्य. चित्रपटाबद्दल एक स्वतंत्र धागा काढावा इतपत हा प्रिय आहे.

सिनेमा या प्रकाराचं नावच "मोशन पिक्चर्" अर्थात "चलत् चित्रपट" असं असल्यामुळे , गतिमान अशा चित्रमालिकांचा प्रभाव अगदी सुरवातीपासूनच सिनेमाच्या कलेवर पडणे अपरिहार्य असणार. हॉलिवूड्पटांबद्दल मला माहिती नाही पण भारतात अगदी "हंटरवाली" सारख्या मूक चित्रपटापासून घोडेस्वार नायक-नायिका इत्यादिंचा प्रभाव होता आणि आहे. त्यामुळे "रोड मूव्ही" हा जॉन्रा विकसित होणे अपरिहार्यच होते असे काहीसे मला वाटते. या प्रकारामागचं तंत्र क्रमाक्रमाने कसं विकसित झालं हे जाणून घेणं रोचक ठरेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

लेखन कसं करावं याविषयीच्या एका पुस्तकात कथा किंवा कादंबरी हा एक जर्नी असतो, प्रवास असतो हे त्यात वारंवार लिहिलेलं होतं. तुमच्या कथेतदेखील तो जर्नी येऊ द्यात, कुठूनतरी कुठेतरी प्रवास झालेला दिसू देत हे लेखकाने अधोरेखित केलेलं होतं. हा प्रवास म्हणजे अर्थातच रस्त्याचा प्रवास नाही तर काळाचा आणि घटनांचा आहे. पण निव्वळ घटनाक्रम महत्त्वाचा नाही तर त्या प्रवासातून कथानायकाच्या मनाचा झालेला प्रवास दाखवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

या पार्श्वभूमीवर जीवनाचा, किंवा मानवी मनाचा प्रवास दाखवण्यासाठी प्रत्यक्ष प्रवासाचीच पार्श्वभूमी घेणं उपयुक्त ठरतं. 'अबाउट श्मिड्ट' या चित्रपटात कंटाळवाणी नोकरी संपल्यानंतर आणि बायको गेल्यानंतर आयुष्य रिकामं झालेल्या व्यक्तीचा प्रवास दाखवला आहे. हा आत्मशोधाचा प्रवास आहे.

प्रवास तसा अनेक प्रकारचा असतो. त्यात कसलातरी शोध असू शकतो (श्मिड्ट). कशापासून तरी दूर पळून जाणं असतं (थेल्मा ऍंड लुइस). किंवा सुरचित रस्त्याचा कंटाळा येऊन तात्पुरतं आडवळणाने जाणं असू शकतं (साइडवेज). जीवनांना किंवा जीवनातल्या काही टप्प्यांना हे प्रवासाचं रूपक अगदी फिट्ट लागू होतं. त्यामुळे कलाकृतींमध्ये ते जान्र म्हणून अस्तित्वात यावं इतपत वापरलं जाणं साहजिकच आहे.

चिंतातुर जंतूंनी अशा वेगवेगळ्या विधांची किंवा जान्रंची (यापैकी कुठच्याच अनेकवचनाच्या शुद्धतेविषयी खात्री नाही) ओळख होईल अशी आशा आहे. त्या त्या प्रकारातले काही महत्त्वाच्या चित्रपटांची नोंद झाली की नवीन चित्रपटांकडे बघण्याच्या दृष्टिकोनाला एक नवीन परिमाण प्राप्त होईल.

थोडं साइडवेज - मुक्तसुनीत यांना साइडवेज विषयी लवकर लिहावं, नाहीतर मी लिहीन, अशी धमकी देण्यात येत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>दोन हिंदी उदाहरणापैकी 'तिसरी कसम' या गटात स्वीकारता येईल पण 'भुवन शोम' स्वीकारणे जड जाते. श्रीयुत शोम आठवड्याची सुट्टी घेऊन त्या वाळवंटातील खेडेगावात पक्षी शिकारीसाठी येतात आणि तेथील एक ग्रामकन्या त्याना त्या संदर्भात 'गायडन्स' देते. इतके अल्प कथानक.

मला हा रोड मूव्हीमध्ये गणावासा का वाटला याची थोडक्यात मीमांसा:
प्रमुख पात्र आपलं नागरी विश्व सोडून जंगलात शिकारीसाठी बाहेर पडतं. आपल्या 'कम्फर्ट झोन'मध्ये उच्चशिक्षित, अधिकारपदी असण्याची एक गुर्मी या पात्रात असते. त्या तोर्‍यात शिकारीसाठी बाहेर पडणं यामध्ये 'जंगलातसुद्धा मी मूक प्राण्यांवर सत्ता गाजवेन' असा ताठा असतो. त्या मानानं जंगलात भेटणारी मुलगी साधीसुधी आणि त्यामुळे यःकश्चित असते. प्रमुख पात्राचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुरुवातीला तसाच असतो. नंतर हळूहळू या पात्राची फजिती होत जाते आणि त्या कस्पटासमान मुलीचं शहाणपण पदोपदी दिसत जातं. हे शहाणपण फक्त जंगल तिच्या परिचयाचं असल्यामुळे तेवढ्यापुरतंच नसतं; सत्तेच्या गुर्मीहून अनेक मैलच काय, तर अनेक युगं दूर असणार्‍या एका वेगळ्या जीवनदृष्टीतून येणारं ते शहाणपण असतं. 'तीसरी कसम'मध्ये मी जसा भारतीय दार्शनिकतेचा उल्लेख केला तसाच या मुलीच्या व्यक्तिरेखेशी त्याचा संबंध लावता येईल. त्यामुळे प्रमुख पात्र हळूहळू अंतर्मुख होत जातं. जंगलात शिकार धुंडत घालवलेला तो एक छोटा काळ त्याचा आयुष्याविषयीचा दृष्टिकोनच उलटापालटा करून टाकतो.

'ड्युएल' हा माझ्याही यादीत होता, पण अमेरिकन चित्रपट फार होऊ लागले म्हणून मी तो वगळला. मैलच्यामैल पसरलेले हायवे हे आता जगभर दिसतात, पण ते अमेरिकेचं व्यवच्छेदक लक्षणच मानता येईल अशी परिस्थिती एका काळापर्यंत होती. अशा निर्मनुष्य हायवेवर एका अजस्र टँकरलाच एका पॉवरबाज व्हिलनसारखं दाखवणारा आणि श्वास रोखून आपल्याला ते पाहायला भाग पाडणारा हा चित्रपट म्हणजे मानव-यंत्र यांच्यातलं नातं वेगळ्या प्रकारे मांडणारा एक अनोखा प्रयोग आहे. यापुढे स्पिलबर्गचे नंतरचे अनेक चित्रपट फार किरकोळ वाटतात.

'साइडवेज' हाही माझा एक आवडता 'रोड मूव्ही'. दोन परस्परविरोधी व्यक्तिरेखा ('ऑड कपल') एकत्र आणून त्यांना एकत्र प्रवास करायला लावणं ही हॉलिवूडमध्ये एक मळलेली पायवाट आहे, पण इथे त्याला थोडी वूडी अ‍ॅलन शैली म्हणता येईल अशा शैलीची खमंग फोडणी आहे. आयुष्यात फसलेला, निराशावादी पण हुशार आणि रसिक लेखक आणि लग्न होऊन संसारी होण्याच्या आधी एकदा बॅचलरपणाची मजा घ्यायला उत्सुक सर्वसामान्य पुरुषी 'हंक' यांची जोडगोळी 'कॅलिफोर्निया वाईन रूट'वर फिरते आणि दोघंही अधिक परिपक्व होऊन परत येतात. गंमतीशीर पण अंतिमतः गंभीर असा हा चित्रपट जरूर पाहावा अशी शिफारस करेन. नंतर 'मर्लो' कधी तोंडाला लावणार नाही असं मात्र होऊ देऊ नका हा एका 'पिनो न्वार'प्रेमी जंतूचा सल्ला Wink

इतर अनेक जणांनी उल्लेख केल्याप्रमाणे अनेक भारतीय-परदेशी लोकप्रिय चित्रपटांची उदाहरणंदेखील ग्राह्य आहेत. फक्त त्यात तत्त्वचिंतनात्मक किंवा आयुष्य बदलून टाकणारं काय आहे त्याचा खुलासा करा अशी विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मला वाटलं मध्यंतरी आलेला 'रोड, मुव्ही' चं परिक्षण आहे. याच पठडीतला अगदी वेगळा, उठावदार (काहिसा आधुनिकोत्तर Wink ) असा हा भारतीय चित्रपटही शक्य झाल्यास जरूर बघावा ही शिफारस! सतीश कौशिक आणि अभय देओल या दोघांच्याही भुमिका मस्त आहेत.

बाकी लेखातील चित्रपट बघेनच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पाहिलेल्या सिनेमांची आठवण काढायला लावण्यासारखा आहे आढावा. एकेका चित्रपटावरच्या लेखांबरोबरच असे विध्यांची ओळख करून देणारे लेख अधिकाधिक येवोत.
या लेखामुळे डोक्यात आलेल्या काही विस्कळीत गोष्टी:
- रोड मूव्ही या प्रकारच्या सिनेमात (बरेचदा) कॅमेरा समोर पसरलेल्या रस्त्यांवर रोखलेला असतो. रस्ता बाजूनी न दिसता, आपण रस्त्यावर चालतो आहोत आणि रस्ता आपल्या पुढे पसरलेला आहे असा भास त्यामुळे प्रेक्षकाला होतो असं एक लक्षण ऐकलेलं आहे. अर्थात हे व्यवच्छेदक लक्षण नव्हेच.
- 'पोस्टमन इन दी माउंटन' नावाचा एक चिनी सिनेमा पाहिला होता. तो बहुधा या प्रकारात समाविष्ट व्हावा.
चीनच्या एका दुर्गम डोंगराळ गावात पोस्टमनचं काम करणारा एक म्हातारा आपल्या नोकरीतल्या शेवटच्या ड्यूटीवर निघालेला आहे. सोबत त्याचा तरुण मुलगा - त्याला बापाच्या जागी चिकटवणार असावेत बहुधा. म्हणून म्हातारा त्याला वरकरणी काम समजावून सांगायला घेऊन निघाला आहे. पण प्रवासात म्हातारा त्याहून अजून बरंच काही उलगडून सांगतो पोराला. त्या डोंगरांशी, गावाशी, गावकर्‍यांशी जुळलेलं त्याचं नातं; पोटासाठी निसर्गाशी झगडताना आलेलं शहाणपण; जगणं कठीण असतं - जबाबदारीचं असतं, पण मजेचंही असतं - हे पोराला शिकवण्याची त्याची धडपड; आपल्यामागे पोरगा जपेल ना हे अशी हुरहुर. जोडीला पोराची कोवळी उत्सुकता, त्याचा तारुण्याच्या उंबर्‍यावरचा पोरकटपणा आणि बापाचं ओझं घेण्याची ओढ. बापाकडून पोराकडे सोपवला जाणारा ज्ञानाचा ठेवा. या प्रवासामधे जणू एक पूर्ण वर्तुळ आपण चालून येतो.
फार देखणा, काव्यात्म होता तो सिनेमा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'रोड मूव्हीज' प्रकारच्या चित्रपटांची ओळख करून देणारा लेख आवडला. पुढचे भाग वाचायला उत्सुक आहे. या प्रकारातले पटकन आठवणारे अजून दोन चित्रपट म्हणजे - द मोटरसायकल डायरीज् आणि बकेट लिस्ट. पुस्तकांतले अलीकडचे म्हणजे 'लाईफ ऑफ पाय'.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे अजून दोन.
मराठीत असे एक उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे 'मुंबई पुणे मुंबई' त्याच्याआधीचा असा मराठीतला 'रोड मुव्ही' आठवत नाही.
बादवे, लेख आवडला. प्रतिसादही आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडक्यात चांगला लेख. आभारी आहे. पुढील लेखाची वाट पाहतो आहे.

अवांतर:
'रोड मूव्ही' ही सशक्त विधा असेलही. किंबहुना आहेच. पण अभिजात विधा म्हणजे काय? पण 'अभिजात' हा शब्द मला आवडतो. त्यामुळे 'अभिजात' आणि 'विधा' हो दोन शब्द एकत्र वाचून मी भारावून, सुखावून गेलो हे निश्चित. काहीतरी महत्त्वाचे वाचल्याचे समाधान मिळते आहे असे वाटले हे निश्चित. असो. दुसरे म्हणजे 'अमेरिकन मिथक' म्हणजे काय? 'रोड मूव्ही' म्हटल्यावर 'अमेरिकन लेजेन्ड' म्हणायला हवे होते की. हे खरे की 'रोड मूव्ही'ला समजा कुणी 'रस्तापट' म्हटले सशक्तही वाटत नाही आणि अभिजातही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धागा आवडला आणि बरेचसे प्रतिसादही.

एकूणच माझा या विषयाचा अभ्यास कमी आणि समज, जाण त्याहूनही तोकडी असल्यामुळे जंतू, पाटील, मेघना, रोचना यांच्यासारखे अभ्यासपूर्ण प्रतिसाद देऊ शकत नाही. मला अशा प्रकारचा एक हिंदी चित्रपट आठवला तो म्हणजे 'एक चालीस की लास्ट लोकल'. शेवटची लोकल ट्रेन चुकते म्हणून स्टेशनाबाहेर येऊन एकुलती एक रिक्षा पकडणार्‍या अभय देओलला तिथेच नेहा धुपिया भेटते. अडकलोच आहोत तर थोडा वेळ गप्पा मारू, एखादं पेय्य घेऊ आणि घरी जाऊ, असं म्हणत ते दोघे एका बारमधे शिरतात. मित्रांबरोबर पबमधे दारू पिणे आणि नाचणे इतपत असभ्यपणा करू शकणार्‍या अभयला भेटलेली नेहा चालू असली तरी ते समजत नाही. सकाळी अभयला पहिली लोकल मिळते तेव्हा मुंबईतले काही माफिया, पोलिसांचं जग आणि धारावीच्या झोपडपट्टीतला हिजडा अशा विविध प्रकारच्या लोकांच्या कचाट्यातून तो सुटलेला असतो आणि काही कोटी रूपये असतात.

कॉल सेंटरमधे नोकरी करणार्‍या इग्नरंट (मराठी शब्द?) आणि आजूबाजूच्या वास्तवाशी फटकून रहाणारा अभय देओल सकाळी लोकल ट्रेन पकडतो तेव्हा किती आणि कसा बदललेला असतो हे पहाण्यालायक आहे. (एक-दोन सीन्स वगळता एकूण चित्रपट पकड घेतो. गाणी नाहीत, मुख्य स्त्री पात्र सुंदर असलं तरी कुलीन दाखवण्याचा सोस नाही, तिच्या तोंडात चिक्कार शिव्या असणं, इ, गोष्टींमुळे मला तो चित्रपट अधिकच आवडला.) एकंदर आजचा भारतीय चित्रपट म्हणावा असा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. उपस्थित झालेल्या काही शंकांची माझ्या मगदुरानुसार उत्तरं:

या विधेला अभिजात म्हणावं का?
पुढच्या भागात याविषयी काही विवेचन करण्याचा इरादा होता, पण आता शंका उपस्थित झालेली आहे म्हणून स्पष्टीकरण देतो. चित्रपटमाध्यमाचा जन्म होण्यापूर्वीच्या कलाकृतींशी (ओडिसी, डॉन किहोते वगैरे) एकीकडे या विधेचं नातं लावता येतं; तर शंभरेक वर्षांचा इतिहास असलेल्या चित्रपटमाध्यमात गेली जवळपास पन्नास वर्षं या विधेचा आधार घेत विविध प्रकारच्या अभिव्यक्ती जगभरात सातत्यानं होत आल्या आहेत असं दिसतं. वर आलेल्या प्रतिसादांत 'पोस्टमन इन द माउंटन'सारखा चिनी पर्वतराजींत खेडवळ पिता-पुत्राचं नातं खुलवणारा आबाल-वृद्धांना भावलेला चित्रपट आहे; शिवाय अभय देओल अभिनीत 'रोड, मूव्ही' किंवा 'एक चालीस की लास्ट लोकल'सारखे तरुण नागरी मल्टिप्लेक्स-प्रेक्षकांना आकर्षित करणारे चित्रपटही आहेत. नुकत्याच झालेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'लास आकासिआस' हा अनेक पारितोषिकं मिळालेला अर्जेंटिनी चित्रपट दाखवला गेला. रासवट भासणार्‍या एका एकलकोंड्या ट्रक ड्रायव्हरच्या व्यक्तिमत्वाची हळुवार बाजू उलगडून दाखवणारा हा २०११चा चित्रपटदेखील याच विधेत मोडणारा होता. एकंदरीत, इतक्या वर्षांनंतरही या विधेविषयीचं आकर्षण आणि त्या चौकटीत बनणार्‍या चित्रपटांतलं वैविध्य संपलं आहे असं वाटत नाही. जुन्या परंपरांशी नातं आणि दिग्दर्शकांच्या नवीन पिढीला वाटत राहणारं आकर्षण; लोकप्रिय-रसिकप्रिय अभिव्यक्तींत सातत्यानं होत राहिलेलं वैविध्यपूर्ण दर्शन अशा कारणांमुळे या विधेला अभिजात म्हणता येईल असं वाटतं.

अमेरिकन मिथक म्हणजे काय? 'इझी रायडर' अमेरिकन मिथक का आहे?
आपलं अस्तित्व किंवा नवी ओळख सिद्ध करण्यासाठी अनेक समाजांना मिथकं निर्माण करावीशी वाटतात. उदाहरणार्थ, पाकिस्तानचा फाळणीतून जन्म झाल्यावर इस्लामी राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी भारतीय संस्कृतीत असणारी मुळं तिथं नाकारली गेली आणि मध्यपूर्वेशी असणारं सांस्कृतिक नातं अधोरेखित केलं गेलं. हिटलरला नवीन जर्मनी घडवताना युरोपिअन संस्कृतीतलं ज्यूंचं योगदान नाकारून 'आर्यन वंशश्रेष्ठत्वा'ची मांडणी करावीशी वाटली. युरोप, भारत, चीन, मध्यपूर्व यांच्या हजारो वर्षांच्या संस्कृतींच्या मानानं अमेरिका फारच नवा देश आहे. अमेरिकेनं तिथल्या मूळ रहिवाशांची संस्कृती नाकारली आणि आपल्या युरोपिअन मुळांहून वेगळी ओळख निर्माण करण्याचीही मनीषा बाळगली. 'बॉस्टन ब्राह्मिन्स'सारख्यांच्या युरोपिअन उच्चभ्रूपणाकडे हेटाळणीनं पाहणार्‍यांना नव्या अमेरिकेला साजेशी मिथकं निर्माण करावीशी वाटणं साहजिक होतं. त्यासाठी वाङ्मय वगैरे जुन्या कलामाध्यमांपेक्षा चित्रपटासारखं नवं माध्यम हेही या अमेरिकनांना नव्या भूभागासारखं आकर्षक वाटलं. आपली मिथकं खास अमेरिकन वाटण्यासाठी काही अमेरिकन वैशिष्ट्यांचा त्यासाठी वापर होणंही साहजिक होतं. त्यातलं एक म्हणजे काउबॉय - नवीन भूभाग पादाक्रांत करताना परकीयांपासून (खरं तर नेटिवांपासून) रक्षण करणारे आणि वेळप्रसंगी कायदा मोडून न्याय प्रस्थापित करणारे एकांडे शिलेदार या नव्या अमेरिकेचे 'हीरो' बनले आणि 'लकी ल्यूक', 'शोले' किंवा टेक्सास गायकवाडपर्यंत निर्यात झाले. मूळ लेखात उल्लेख केल्याप्रमाणे मैलोमैल पसरलेले हायवे हेसुद्धा प्रामुख्यानं दुसर्‍या महायुद्धाच्या आसपास एक अमेरिकन वैशिष्ट्य बनले. 'इझी रायडर'नं हे हायवे आणि मोटारसायकलवर स्वार होऊन त्या हायवेंवर फिरणारे हॅट-लेदर-जॅकेटधारी तरुण यांना 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' (लार्जर दॅन लाइफ) असं स्वरूप दिलं.
Dennis Hopper in Easy Rider

अमेरिकन सरकारविषयीची तरुण पिढीची नाराजी, उद्वेग यांना त्याद्वारे एक वाट मिळाली. “A man went looking for America. And couldn’t find it anywhere…” या टॅगलाईननं उत्सुकता ताणली गेली; “This used to be one helluva good country. I can’t understand what’s gone wrong with it” यासारख्या संवादांनी तरुणांच्या भावना व्यक्त झाल्या; तर “You do your own thing in your own time. You should be proud.” किंवा “ What the hell is wrong with freedom? That's what it's all about.” यांसारख्या वाक्यांनी अमेरिकन घटनेतल्या मूल्यांविषयीचं आणि पर्यायानं देशाविषयीचं त्यांचं प्रेम तरीही अबाधित आहे हे लक्षात आणून दिलं. रुढ पायवाट नाकारून आपलं अस्तित्व असं विखरून देणारे हे गोंधळलेले तरुण नव्या अमेरिकन पिढीचे प्रतिनिधी बनले. त्यांनी एका नव्या अमेरिकन सिनेमाला जन्म दिला असंही आता मानलं जातं. उदाहरणार्थ, 'इझी रायडर्स, रेजिंग बुल्स' या पुस्तकातून पीटर बिस्किंड या समीक्षकानं तशी मांडणी केली आहे. १९६९चा 'इझी रायडर' आणि १९८०चा 'रेजिंग बुल' या दोन चित्रपटांच्या दरम्यान अमेरिकन चित्रपटानं वेगळ्या वाटा चोखाळल्या; त्यांची समीक्षा असा त्या शीर्षकामागचा संदर्भ आहे. हे पुस्तकही आता अमेरिकन चित्रपटसमीक्षेतलं एक महत्त्वाचं पुस्तक मानलं जातं.

जाताजाता: 'रोड मूव्ही' हा शब्द इंग्रजी असला तरी ही संकल्पना जशी इतरत्र निर्यात झाली तद्वत हा शब्दही निर्यात होऊन सुपरिचित झालेला दिसतो. उदाहरणार्थ, स्वभाषेचा अभिमान बाळगणार्‍या स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालिअन, जर्मन आणि फ्रेंच भाषांच्या विकीपिडिआंमध्ये या विधेसाठी 'रोड मूव्ही' हाच मूळ इंग्रजी शब्द वापरलेला दिसतो. अर्थात, नवा सक्षम मराठी शब्द घडवायची इच्छा आणि क्षमता ज्यांच्यापाशी आहे ते खुशाल तो घडवू शकतात आणि रुढ करू शकतात. या लेखाचा तो उद्देश नाही. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चित्रपट

माध्यमाचा जन्म होण्यापूर्वीच्या कलाकृतींशी (ओडिसी, डॉन किहोते वगैरे) एकीकडे या विधेचं नातं लावता येतं;

नातं लावता येणं हा निकष काही पटला नाही. ओडिसी आणि डॉन किहोतेचा तसा 'रोड मूव्ही' ह्या विधेशी संबंध ओढून-ताणून जोडल्यासारखा वाटतो आहे. त्यामुळे रोड मूव्ही ह्या विधेला ठरवून अभिजात केल्यासारखे वाटले. अशाप्रकारे तर प्रत्येक विधा ही अभिजातच ठरवता येईल. किंबहुना असावीच. 'कमिंग-ऑफ-एज', 'ब्लॅक कॉमेडी' वगैरे वगैरे विधांबाबतही, त्या विधा असल्याच तर, असेच म्हणता येईल.

बाकी प्रतिसाद आवडला. विशेषतः मिथकाचे स्पष्टीकरण. पाकिस्तानाचे उदाहरण पटले. ही नवी ओळख घडवण्यापायी खुणा (हिंदू नव्हे) पुसण्याचा आटोकाट प्रयत्न पाकिस्तानात झाला. अगदी रागांची नावेही त्यांनी बदलली. असो. तो मोठा विषय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"पाकिस्तानाचे उदाहरण पटले. ही नवी ओळख घडवण्यापायी खुणा (हिंदू नव्हे) पुसण्याचा आटोकाट प्रयत्न पाकिस्तानात झाला."

~ ही "नवी ओळख" घडवून आणण्याची (राजकीय हेतूने प्रेरित झालेली) सामाजिक चळवळच झाली आहे आणि मग पाकिस्तानच काय तर आपल्या मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशातदेखील घडले/घडत आहेच याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. 'व्हीटी' चे नाव बदलणे, मरीन ड्राईव्हला नेताजी बोस मार्ग म्हणणे, पूना चे पुणे करणे, औरंगाबादला संभाजीनगर नावे देणे, ब्रिटिश साम्राज्याच्या खुणा म्हणून पुतळे उतरविणे तर होत होतेच पण त्यांच्या काळात सुरू झालेल्या, वसलेल्या, ग्रंथालये, म्युझिअम्स, अभ्यासकेन्द्रे यांची नव्या ओळखीखाली मनगटाच्या जोरावर वाट लावणे, आपल्या राजकीय ईप्सितासाठी दडपणाने इतिहास बदलणे; आदी घटना होत आहेतच.

बॅ.जिना पाकचे म्हणून त्यांच्या नावे मुंबई इलाख्यात सुरू असलेल्या शाळा-कॉलेजीसची नावे बदलणे हे समजू शकतो. पण यशवंतराव चव्हाणांशी 'गट्टी फू' म्हणून शालिनीताई पाटलांनी सत्तेत आल्यावर सर्वप्रथम काय केले असेल तर 'यशवंतराव चव्हाण' या नावाच्या शैक्षणिक संस्थांची नावे प्राधान्याने बदलली. पुणे विद्यापीठाला 'छ.शाहू महाराज विद्यापीठ' नाव द्यावी ही घोषणा तर जुनीच झाली पण आता ऐरणीवर येऊ पाहात असलेला विषय म्हण़जे 'पुणे' नाव बदलून 'जिजाऊनगर' करा. असो.

श्री.भट म्हणतात तसा हा विषय मोठा आहेच. [थोडक्यात "नवी ओळख" अक्षरांसाठी रंग आणि ब्रश फक्त पाकिस्तानच्याच हातात आहे, असे नाही.]

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बॅ.जिना पाकचे म्हणून त्यांच्या नावे मुंबई इलाख्यात सुरू असलेल्या शाळा-कॉलेजीसची नावे बदलणे हे समजू शकतो.

हे समजू शकत असाल तर बाकिचे देखिल त्याच विचारधारेतले नाही काय? विकीचे नाव रेल्वेस्थानकाला देणे हा स्मरणरंजनाचाच एक भाग आहे आणि बदलणे हा तथाकथित अस्मितेचा एक रंग आहे. खरे पहाता बदल आठवणींशी निगडित मनाच्या कप्यात होतो, त्यामुळे बदल चांगला कि वाईट हे खुप सापेक्ष होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा आवडता रोड मुव्ही म्हणजे रॅट रेस... (स्टार: रॉन अ‍ॅटकिन्सन) आणि ब्रेकडाउन, इझी रायडर पण आवडीचे.. अप इन द एअर, कास्ट अवे हे रोड मुव्ही मध्ये येईल की नाही माहित नाही पण 'प्रवासावर फोकस' हा निकष धरल्यास ते सर्वोत्तम ठरावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>ओडिसी आणि डॉन किहोतेचा तसा 'रोड मूव्ही' ह्या विधेशी संबंध ओढून-ताणून जोडल्यासारखा वाटतो आहे. त्यामुळे रोड मूव्ही ह्या विधेला ठरवून अभिजात केल्यासारखे वाटले. अशाप्रकारे तर प्रत्येक विधा ही अभिजातच ठरवता येईल.

विधेची वैशिष्ट्यं उकलून सांगताना ज्या गुणवैशिष्ट्यांची यादी मी मूळ लेखात दिलेली आहे, ती दिल्यावर लगेचच ओडिसी आणि डॉन किहोतेचा संदर्भ दिला आहे. या दोन कलाकृती आणि दिलेली वैशिष्ट्यं यांत काही नातं दिसतं, की त्या यादीतले मुद्दे या दोन कलाकृतींच्या संदर्भात ओढूनताणून आणावे लागतात असं वाटतं यावर तुमच्या मताचं वजन अवलंबून आहे असं म्हणेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

विधेची वैशिष्ट्यं उकलून सांगताना ज्या गुणवैशिष्ट्यांची यादी मी मूळ लेखात दिलेली आहे, ती दिल्यावर लगेचच ओडिसी आणि डॉन किहोतेचा संदर्भ दिला आहे.

ओडिसी आणि डॉन किहोते ह्या अभिजात कलाकृती आहेत. प्रवास ह्या विधेची गुणवैशिष्ट्ये समजावून सांगितल्यावर त्या कलाकृतींचे नाते रोड मूव्हींशी जोडल्याने रोड मूव्ही ही विधा साहजिकच अभिजात ठरते असे तुम्हाला म्हणायचे आहे असे मला वाटले. तसे तुम्हाला म्हणायचे नसल्यास रोड मूव्ही ही विधा अभिजात का आहे ह्या प्रश्नाचे उत्तर, लेखात किंवा प्रतिसादांत, मला अजूनही मिळालेले नाही. दुसरे म्हणजे प्रवास ही विधा असल्यास अभिजात असू शकते. पण रोड मूव्ही कशी काय अभिजात ठरते ते मला अजूनही कळलेले नाही. ही बहुधा माझ्याच आकलनातील उणीव असावी. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>

याच न्यायाने देव आनंद (ले़खन / दिग्दर्शन / निर्मीती व अभिनय)यांचा हीरा पन्ना हा चित्रपट देखील रोड मूवी म्हणून गणला जाईल काय? त्या काळी चित्रपटांच्या शीर्षकात टॅग लावायची प्रथा नव्हती. आजकाल सर्रास असे टॅग लावले जातात. आजच्या प्रथेप्रमाणे या चित्रपटाच्या शीर्षकाला टॅग लावायचा ठरविले तर हीरा पन्ना: जर्नी कंटिन्यूज फ्रॉम मैसूर टू बॉम्बे वाया बेंगलोर (बेंगलोर मार्गे मैसूर ते मुंबई पर्यंतचा एक न संपलेला प्रवास)असे शीर्षक ठेवावे लागेल इतका या चित्रपटाचा मोठा भाग प्रवासाने व्यापलेला आहे. बरे हा प्रवास फक्त नायकाचाच नसून त्याच्या वाहनाच्या इंधन टाकीत लपविलेल्या हाराच्या मागावर असलेल्या वेगवेगळ्या टोळक्यांचा देखील आहे (ज्यात नायिकादेखील सामील आहे).

असो. आपल्याला हा चित्रपट त्या जातकुळीतला वाटत असेल तर नक्कीच त्यावरही आपला अभिप्राय लिहावा. मला तरी हा चित्रपट खूपच आवडला. आतापर्यंत सात वेळा पाहिलाय. पुन्हा आपल्या चष्म्यातून पाहण्यास आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

सशक्त विधा आहे खरी.

लेख आणि प्रतिसाद आवडले.

इंग्रजी चित्रपटांमध्ये "ओ ब्रदर व्हेअर आर्ट दाऊ" हादेखील मोजायला हवा. याचे कथानक ओडिसी या महाकाव्यावर बसवलेले आहे. "ओ ब्रदर" चित्रपट मला आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडता चित्रपटप्रकार. बरिच नविन माहिती मिळाली.

मला आवडलेले काही चित्रपट.
द मोटरसायकल डायरीज (2004)
ईन टु द वाईल्ड (2007)
पोश्टमन इन द माउंटेन (2002)
रोड मुव्ही
अवे वी गो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0