तुम्हाला कोणत्या (प्रमाणेतर) मराठी बोलीभाषा येतात अथवा परिचय आहे? सोबत बोलीभाषांमधील शब्दार्थ चर्चा

मोकळेपणाने सांगावयाचे झाल्यास मला स्वतःला एकही बोलीभाषा येत नाही. परंतु मराठी विकिपीडियाच्या मराठी विक्शनरी या (ऑनलाईन शब्दकोश) बन्धू प्रकल्पासाठी

१) मराठीच्या बोलीभाषांमध्ये असलेल्या पण प्रमाण मराठीत न वापरल्या जाणार्‍या शब्दार्थांची नोंद घेणे.
२) एखाद्या (कोणत्याही) शब्दास प्रमाण मराठीत वापरात नसलेला पण बोलीभाषेत असलेल्या समानार्थी शब्दांची नोंद घेणे

* किमान शब्दार्थ तर नोंदवावेतच पण शक्यतोवर वाक्यात उपयोगाची उदाहरणे आणि जाणकार असल्यास व्याकरण विषयक अधीक माहितीही आवर्जून नमुद करावी.

*हे या धाग्याचा मुख्य उद्देश आहेत. धागा महाराष्ट्र आणि बृहनमहाराष्ट्रातील सर्व बोलीभाषा आणि तदनुषंगिक भाषा विषयक चर्चेसाठी आहे. तेव्हा एखाद्या बोलीभाषेचे नाव यादीत नसलेतरीही चर्चा करता येऊ शकेल तसेच यादीत जोडण्यासाठीही आपण सुचवू शकता.

**खालील यादीत नसलेली या बोली भाषांची नावे मिळाली काणकोणी, नंदीवाले, नाथपंथी देवरी, नॉ लिंग-मुरूड-कोलाई-रायगड,पांचाळविश्वकर्मा, गामीत, ह(ल/ळ)बी, माडीया, मल्हार कोळी, मांगेली, मांगगारुडी, मठवाडी, मावची, टकाडी, ठा(क/कु)री, 'आरे मराठी', जिप्सी बोली(बंजारा), कोलाम/मी, यवतमाळी (दखनी), मिरज (दख्खनी), जव्हार, पोवारी, पावरा, भिल्ली, धामी, छत्तीसगडी, भिल्ली (नासिक), बागलाणी, भिल्ली (खानदेश), भिल्ली (सातपुडा), देहवाळी, कोटली, भिल्ली (निमार),कोहळी, कातकरी, कोकणा, कोरकू, परधानी, भिलालांची निमाडी, मथवाडी, मल्हार कोळी, माडिया, वारली, हलबी, ढोरकोळी, कुचकोरवी, कोल्हाटी, गोल्ला, गोसावी, घिसाडी, चितोडिया, छप्परबंद, डोंबारी, नाथपंथी डवरी, पारोशी मांग, बेलदार, वडारी, वैदू, दखनी उर्दू, महाराष्ट्रीय सिंधी, मेहाली, सिद्दी, बाणकोटी यातील नावे यादीत जोडावी वाटल्यास प्रतिसादात नोंदवावे. (बोलीभाषांची नावे बोलीभाषा या नात्याने आंतरजालावरील जाणत्यांच्या नोंदीतून घेतली आहेत. काही ठिकाणी अपरिहार्यतेने जातींची/समाजांची नावे दिसत असलीतरी येथील उल्लेख केवळ भाषिक उद्देशाने आहेत जातीय उद्देशाने नाहीत.)

*धाग्याचा मुख्य उद्देश विकिप्रकल्पासाठी असल्यामुळे या धाग्यावरील आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त समजले जातील.

* एक पेक्षा अधिक बोलीभाषा येत असल्यास आपणास ज्या बोलीची माहिती अधिक आहे ती नोंदवावी

* सूची:मराठी बोलीभाषांमधील शब्द अद्याप स्वतंत्र सूची तयार न झालेल्या बोलींकरताची सामायीक सूची.

* सूची:कोल्हापूरी_बोली

* सूची:कोकणी भाषा

* सूची:चित्पावनी बोलीभाषा

* सूची:कादोडी बोली/ सामवेदी बोली

* सूची:वाघ्ररी बोलीभाषा/वाघरी

* सूची:कोलामी बोलीभाषा

*एथनालॉग कोड कोकणी [knn], वर्‍हाडी-नागपुरी [vah], गौळण [goj] सामवेदी [smv] अहिराणी [ahr], Bhalay [bhx], Far Western Muria [fmu], गोवळी [gok], Indo-Portuguese [idb], कतकरी [kfu], खानदेशी [khn], कोरकु [kfq], Korlai Creole Portuguese [vkp], Lambadi [lmn], Mawchi [mke], Nihali [nll], Noiri [noi], Northern Gondi [gno], Northwestern Kolami [kfb], Palya Bareli [bpx], Pardhan [pch], Pauri Bareli [bfb], Powari [pwr], Rathwi Bareli [bgd], Seraiki [skr], Tulu [tcy], Vaagri Booli [vaa], Varli [vav], Vasavi [vas], Waddar [wbq].

प्रतिक्रिया

छान कलेक्शन
यातील बहुतांश शब्द अजूनही व्यवस्थित वापरात आहेत (झळंबणे फारा दिवसांत ऐकलेला नाही. बोळू कधीच प्रत्यक्षात ऐकलेला नाही फक्त वाचलाय)
डोण वगैरे आता उत्तर कोकणात दिसत नै फारशसोडलेजस जसे खाली जाऊ दिसू लागते.

ठाकुली, कापा, बरका, जनावर, कस्रुंडं वगैरे शब्दतर माझ्या पिढीच्याही उपयोगात आहेत.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मंडळी आपल्या उपचर्चा अशाच चालू ठेवा. मला 'आहे' या क्रियापदासाठी मराठीच्या बोलीभाषातील पर्यायी शब्द हवे आहेत. गूगलवर देवनागरीत शोध देताना मी मराठी रिझल्ट यावेत म्हणून आहे या शब्दा सहीत शोध घेत असतो. जसे मालवणीत मी या शब्दास मियां हा शब्द वापरला जातो त्या शब्दाचे आंतरजालावर वाक्यात उपयोग शोधून विक्शनरीत नोंडवण्यासाठी मी केवळ मियां शब्दावर गूगलशोध दिल्यास कदाचित हिंदी रिझल्ट अधीक येतील अशी शंका वाटते पण सोबत क्रियापद असेल तर इतर भाषांशिवाय हवीती भाषा शोधणे सोपे जाते असा अनुभव आहे. (किंवा इतर भाषात नसलेला खूप वापरले जाणारे ज्या शिवाय सहसा भाषा चालणार नाही शब्द सूचवलेत तरी चालेल)

आहे हा शब्दाच्या समानार्थी शब्दाबद्दल चर्चा करून उर्वरीत सर्वनामांच्या चर्चेकडे पुन्हा जाऊयात.

आहे ला हाय असाही एक समानार्थी

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

हांव म्हणजे "मी" की "आहे" ?

हांव म्हणजे मी. हे थोडेसे गुजरातीच्या हूं शी साधर्म्य दाखवते!

तरीच.. म्हणजे अर्धवट ज्ञानावर गोव्यात गाणी ऐकताना

मोगा जाले ते जांव माजो गोडाचो पाव.. माका सोडशी तर जीव दितलो हांव (किंवा आंव काहीही उच्चार म्हणावा..)

यापैकी हांव म्हणजे "मी" अशी शंका होतीच. कारण जीव देतो "हाय" (आहे) (जीव देईन) असे मनात प्रथमश्रवणी आले तरी ते खटकत होते.

धन्यवाद्स..

शे. (अहिराणी)

उदा:

तुन्हं नांव काय शे भो? (आहे भाऊ?)

तठे एक हाड्या बठेल शे. (तिथे एक कावळा बसलेला आहे.)

भाकरी बनाडेल शेतस. (बनविल्या आहेत. अवांतरः १ भाकर. अनेक भाकरी. खूपच कधी कधी भाकर्‍या.)

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

"येडोळका अदरांटी बसल्तो." हे वाक्य आमच्या उदगीरच्या मराठीत आहे. म्हणजे "यावेळी अधांतरी (बिनकामाचा) बसलो होतो."
"अंगी धीवलालाव मन?" म्हणजे "शर्ट धुत आहात का म्हणे?"

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

येडोळका

आमच्याकडे 'इदूळा' म्हणतात. अर्थ बराच वेळ, लवकर, किंवा यावेळी वाक्यानुसार बदलतो.

१. पावणं इदूळा आलं!
२. इदूळचा वाट बघतूय..
३. उद्या इदूळा/इदूळका येऊ का?

याचं 'वाढूळ' हे नाटकांमधून अपरूप वाचलंय. पण तो शब्द अनोळखी असल्यानं ग्राम्य शब्दाला शहरी बेगड लावल्यासारखं नाटकी वाटतं.

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

@ अरुणजोशी, आपण म्हणता ते उदगीर मराठवाड्यातीलच का ? तसे असेल तर मराठी विक्शनरीवर मराठवाडी बोली सूची बनवतो आणि त्यात अ‍ॅडवतो, आढळ कोणत्या प्रदेशात आहे त्या कॉलम मध्ये उदगीरचे नाव जोडता येईलच.

@ मस्त कलंदर, आपण दिलेले शब्दार्थ कोल्हापूरी बोलीभाषा सूचीत जोडले.

अजून एक महत्वाची माहिती हवी, ऐसी अक्षरेवरील विशीष्ट प्रतिसादाचा दुवा कसा द्यावा. कारण काही प्रतिसाद दुवे संदर्भ म्हणून विक्शनरीत जोडावयाचे आहेत.

आपणा दोघांनाही धन्यवाद

१ अ‍ॅडवतो (सहज सूचल म्हणून, या बोलीला काय इंमराठी हे नाव कसे राहील ?) = जोडतो

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

प्रत्येक प्रतिसादाला वर जिथे वेळ, तारीख दिसते तिथेच बाजूला उजवी कडे लिंकचा आयकॉन आहे. त्यावर क्लीक केले की त्या विंडोच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये युआरेल येईल.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छे, काय मी पण ! माझे एक परिचीत यास ऑब्झर्वेशन डेफिसीट अथवा लॉस म्हणत.

मार्गदर्शनासाठी धन्यवाद.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

कोल्हापूरची म्हणून एकच भाषा आहे असं मला वाटत नाही.
उदा. मायंदाळ, बक्कळ हे जास्तीकरून कोल्हापुरात
लै - हे सगळीकडे
काही शब्द जसे सपलं (संपलं) फक्त इस्लाममुराकडे, आणखीही शब्द आहेत पण पटकन आठवत नाहीयेत.
समदं, झाड्याला जाणे(प्रात:विधी)- -आटपाडी-माणदेशकडे.

खताच्या रिकाम्या पोत्यांच्या शिवलेल्या अंथरूणाला तासगांवात तळवट म्हणतात, त्यालाच इस्लामपुरात भट्यार म्हणतात, कुठे बारदान म्हणतात आणि बहुतेक त्यालाच औरंगाबादला तरट म्हणतात. (तिथलं तरट म्हणजे नक्की काय आहे हे अजून पाहायला मिळालेलं नाही) . दर दहा कोसांवर भाषा बदलते म्हणतात तसं आहे हे..

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

भाषातज्ञांच्या लेखनातून वाणी आणि बोली असा एक सूक्ष्मफरक वाचण्यात आला आहे. केवळ उच्चार भेद (मुख्यत्वे प्रादेशिक) आहे त्या भाषेच्या वाणी आणि उच्चारांसोबत शब्दसंग्रहात मोठा फरक पडतो त्या बोली असे काहीसे अर्थात हि सीमारेषा पुसट असते वगैरे .

माझ्या व्यक्तीगत मतानुसार खासकरून सर्वनामे आणि क्रियापदे भाषेत अधीक स्थीर असतात; शब्दसंग्रह बराचसा सारखा आहे आणि सर्वनामे आणि क्रियापदांमध्ये फरक पडत असेल तर वेगळी बोली समजावी (याला माझ्या व्यक्तीगत मताशिवाय आधार नाही)

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

सपलं हे कोल्लापुरातही ऐकले आहे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मंडळी, मराठी विक्शनरीवर (शब्दकोशात) बनवलेली हि (शब्दार्थ सारणी/टेबल) " सूची:कोल्हापुरी" येथे पाहून अभिप्राय/सुधारणा सुचवाव्यात म्हणजे इतर बोलीभाषांकरताही अशीच सूची बनवता येईल.

अजून एक छोटीशी विनंती, बर्‍याचदा शब्दार्थ माहित असले तरी एक विश्वकोशीय विश्वासार्हता म्हणून चान्सेस घेण तीतकसं योग्य होत नाही म्हणून शक्यतोवर शब्दार्थ अथवा समानार्थी शब्द नमुद आवर्जून करावा म्हणजे गोंधळा (कन्फ्यूजन्स) ची शक्यता कमी राहील.

हा धागा कौल विभागात बहुधा सर्वाधीक प्रतिसाद मिळवणारा होण्याची शक्यता पाहून छान वाटते आहे. आपले सर्वांचे माहितीपूर्ण प्रतिसाद असेच येत राहूद्यात धन्यवाद.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

अजुन काही कोल्लापुरी शब्द-
डांब (खांब). ढांपी (फांदी).
वडाप (शेअर्ड पब्लिक ट्रांसपोर्टसाठी वापरला जाणारा शब्द). तराट/ऐंशीच्या स्पीटनं (सुसाट).
आंबा पाडणे (बढाई मारणे/खोटे सांगणे)
डबरा (खड्डा). मोळा (खिळा). वरकी (बटर - चहात बुडवून खातात तो).
चक्कीत जाळ/खत्र्या/नाद खुळा/काटा किर्रर्र (लै भारी)
शायनर (रोमिओ). पुंगी टाईट (घाबरणे),
आमास्नी/त्यास्नी/तुमास्नी/त्येला/तेज्यायला (आम्हाला,त्यांना,तुम्हाला,त्याला,त्याच्या आईला, )
पाक ईस्कूट बाजार (वाट लावणे). तंगणे (दमणे)
घेता काय इस्कटू (विक्रेता माल विकताना असे ओरडतो)
गंडीव फशीव (फसवणे).
येशीला कनी मं (याल की नाही मग)
आबा कावतोय गा (आबा ओरडतोय रे)
पिंडकं (दारुडा).
खुट्टाएवडं न्हाईस आनी मला शिकिव्तोस? (खुंटाएवढा नाहीस आणी मला शिकवतोस?)
हाग्या मार (बेदम चोप)
पायतानानं केसं काडीन (चपलाने केस काढीन). पायतान तुटस्तवर हानीन आनी तुटलं का म्हनुन परत हानीन.
लडतर झाल्या (भानगड झाली आहे)
आssव्व्वाss (एखाद्याने आंबट ज्योक सांगीतला की पोरी असे ओरडतात).
---
अजुन अ‍ॅडवतो.

या लिष्टेस कोल्लापुरी भाषेचे पीरिऑडिक टेबल म्हणून किताब दिल्या जावा अशी 'शिप्पारस' करतो. हीच मूलद्रव्ये वापरून कोल्लापुरी रसायनांची संयुगे बनतात.

हे एक लँथॅनाईड राहिलेसे दिसते Wink

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या लिष्टेस कोल्लापुरी भाषेचे पीरिऑडिक टेबल म्हणून किताब दिल्या जावा अशी 'शिप्पारस'१ करतो. हीच मूलद्रव्ये वापरून कोल्लापुरी रसायनांची संयुगे बनतात.

बॅटमनरावांच्या उपरोक्त मतास आमचा + १ आणि लै भारी; लिष्टीतल्या कोल्लापुरी शब्दांची विक्शनरीवरील सूचीत नोंद घेतली.

*(आमचं कोल्लापुरास फारसं येण होत नसल्यामुळे) खालील नेमके लक्षात आले नाही

**वरकी (बटर - चहात बुडवून खातात तो) चहात बुडवून खातात तो एवढे लक्षात आले; वरकी = बटर = ?
**पाक ईस्कूट बाजार (वाट लावणे) इथे 'पाक' असेच लेखन हवे आहे ना ? (जस्ट टू कन्फर्म अगेन)
** घेता काय इस्कटू - विक्रेता माल विकताना असे ओरडतो हे लक्षात आले; ईस्कूट आणि इस्कटू एकच का काही वेगळे ? आणि इस्कटू म्हणजे नेमके काय ?

वाचताना कोल्लापुरी लै भारी वाटते आपण अजून अ‍ॅडवा आम्ही आतूरतेने वाट बघतो आहोत.

आपल्या माहितीपूर्ण प्रतिसाद आणि सहभागा साठी धन्यवाद

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

वरकी = बटर = ?

मराठीत ज्याला 'बटरबिस्कीट' म्हणतात, तो प्रकार असावा काय? (इफ आय अ‍ॅम नॉट मिष्टेकन, एका बाजूने चप्पट आणि दुसर्‍या बाजूने फुगीर, आणि ओव्हरऑल कडक असतोसे वाटते.)

इस्कटू म्हणजे नेमके काय ?

विक्रीपूर्वी निवडण्याकरिता दाखविण्याकरिता कापडाची (उदा. साडी, किंवा कापडाचा तागा, वगैरे) घडी विस्कटणे, असे काही असावे काय?

मराठीत ज्याला 'बटरबिस्कीट' म्हणतात, तो प्रकार असावा काय? (इफ आय अ‍ॅम नॉट मिष्टेकन, एका बाजूने चप्पट आणि दुसर्‍या बाजूने फुगीर, आणि ओव्हरऑल कडक असतोसे वाटते.)

ह्याला चमच्याने छोटे छिद्र पाडून चहात बुडवायचे. थोड्या वेळाने ते टम्म फुगते. मग ते बशीत काढून घ्यायचे आणि थोडे नरम-थोडे कडक असे भिजलेले बटर खायचे! एका कपात तीनेक बटरे तरी व्ह्यायचीच!

हो. इस्कटू=विस्कटणे.
-
@माहितगार-
इस्कटू/ईस्कटू एकच.( माझंच व्याकरण कच्चं आहे )
रस्त्यावरचा विक्रेता अगदी व्यवस्थित माल मांडून बसतो, आणी म्हणतो, काक्काय आलयं बगा, काक्काय आलयं बगा, घेता काय इस्कटू??
-
अस्मि यांनी बटरचा फोटो खाली दिलाच आहे.
-
अजुन अ‍ॅडवतो-
तिन तुला रिस्पॉन्स द्याय न्हाई न्हवं? मं इशय कट. कडं-कडंन सुटायचं न्हाईतर गड्डा गार करीन (त्या मुलीने तुला नकार दिलाय ना? मग विषय संपला. जा घरी आता नाहीतर गड्डा गार करीन)
गड्डा गार करणे- (अवघड जागेवर लाथ घातल्यावर जे काही होईल त्याला 'गड्डा गार करणे' म्हणतात)
म्हुतूर (मुहुर्त)
आल्तो/गेल्तो/चाल्लोतो/याल्तो/बलवाल्तो (आलो होतो/गेले होतो/चाललो होतो/येत होतो/बोलवत होतो.)
पुण्यास्नं/तवापास्नं= पुण्याहुन/तेंव्हापासुन (उन-हुन)
ते पक्या/ते गन्या ("तो" ऐवजी "ते" चा वापर करणे)
ष्टंपा/टीमा/रना- क्रिकेटमधील स्टंप/टीम/रन यांचे अनेकवचन.
हच्च्याला जाशील- (वर जाणे अर्थात मरणे- हो तोच तो, गणितातला हच्चा) Smile
त्वॉन्ड बंद- तोंड/आवाज बंद कर.
झांग-प्यांग (झगमगीत)
आगायाया
बार्डी/बाल्डी- (बादली/बकेट)
हासालैस काय त्वांडच तसं हाय? (हसतो आहेस का तोंडच तसं आहे?) Wink आणी याचंच पुढचं व्हर्जन- हागालैस काय **च तशी हाय?

आगायाया, पाक रडिवलंस भावा!! शन्वारी खेळाय येतंयस न्हवं ग्राउंडावर? सग्ळी पोरं यायलीत, अज्या, पव्या, संज्या. रव्या म्हनलंतं येनार पन आलंच न्हाई. परवा लय बेक्कार मॅच झाली, काय रप्पाटं घुमीवला मेस्सी, अगायाया!! बघिटलो अन कळायचं बंद!!!!

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हंजे काय? येनार की भावा.. आनी ते अज्या, पव्या न्हवं?, त्यास्नी लाव घो*, मस्ती आल्या रां*च्यास्नी. मेस्सी कसंलं खेळालतं मर्दा.. खत्र्याच!!
आनी तू म्हाईला का आलं न्हाईस?

घो*च लावतू, खटक्यावं बोट जाग्यावं पल्टी!!!!!

म्हाईला आलू न्हाई, हिकडं कामं होती म्हणताना यायला झालं न्हाई..

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निव्वळ नॉस्टाल्जिक केलेत दोघांनीही..

बाकी एक अतिसूक्ष्म बदल सुचवतो:

रव्या म्हनलंतं येनार पन आलंच न्हाई.

ऐवजी

रव्या म्हनलंतं येनार, खरं आलंच न्हाई.

अगदी अगदी!!!!!!!!

पाक इसारलोच बगा. Smile

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे बघा बटर www.kumarsreceipe.com/images/img/jeera_butter.jpg ब्रेडचे टोस्ट किंवा रस्क तसे छोट्या बनचे बटर.

>>ब्रेडचे टोस्ट किंवा रस्क तसे छोट्या बनचे बटर.

"टोस्ट हे ब्रेडपासून* बनवत नाहीत" एवढे बोलून मी माझे दोन पाच शब्द संपवतो.

*तद्वतच बटर हे छोट्या बनपासून बनवत नसावेत अशी शंका आहे.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मध्यंतरी चित्पावनी (चित्तपावनी) बोलीचा एक नमुना मिळवून तो मिपा किंवा मायबोलीवर दिला होता. तोच इथे डकवीत आहे. मला ह्या नमुन्यावर मराठीचा जास्त प्रभाव जाणवला. ह.मो.मराठे,(बालकांंड), महादेवशास्त्री जोशी (आत्मचरित्र), चित्तपावन (संकलित लेख) या पुस्तकांतील नमुने अधिक चित्तपावनी वाटले होते. शिवाय हा नमुना या बोलीची जास्तीत जास्त वैशिष्ट्ये किंवा व्याकरण दाखवण्याइतपत प्रातिनिधिक नाही. त्यासाठी वेगळी वाक्ये निवडली जायला हवी होती. 'चित्तपावनी' या शब्दाचा आग्रहसुद्धा माझा नाही.
खालीलपैकी आधीचे वाक्य मराठीत आणि नंतरचे चित्पावनीत आहे.
१)म.- मी तुम्हांला चित्तपावन बोलीचा एक नमुना दाखवतो. चि.- मँ तुमला चित्तपावन भाषाचो एक नमुनो दाखयसां.
२)म.- माझा मुलगा आय-टी शिकतो. चि.- मझो/माझो बोडयो आय-टीत शिकसे.
३)म.- त्याला आमची ही चित्तपावनी भाषा जरासुद्धा येत नाही. चि.- तेला ही आमची चित्तपावनी भाषा अजिबात येत नाय.
४)म.- पुढच्या पिढ्यांना कळायला हवी म्हणून चित्तपावन बोलीतली थोडी तरी वाक्ये लिहून ठेवायला हवी. चि.- पुढले भुरगेंना कळे हवी म्हणी चित्तपावन भाषांत्लीं थोडी तरी वाक्यां लिवनी ठेवें हवीं.
५)म.- माझी आई चित्तपावनी छान बोलते. चि.- माझी आई चित्तपावनी भाषा बरीsss बोलसे.
६)म.- माझ्या बायकोलाही चित्तपावनी बोलता येते. चि.- माझे बायलालासुद्धा चित्तपावनी भाषा बोले येसे.
७)म.- आम्ही तिघे चित्तपावनीत बोलू लागलो की माझा मुलगा आ वासून आमच्याकडे बघत रहातो. चि.- आमी तिघांय चित्त्पावनी बोलों लागलों कीं माझो बोडयो तॉण उघडां घालनी आमचेकडां बघीत र्‍हेसे.
८)म.- तसे बघू गेल्या ही भाषा समजायला कठीण नाही. थोडीशी संस्कृत आणि थोडीशी मराठी भाषा ज्याला येत असेल त्याला ही भाषा पटकन कळेल. चि.- तसां बगे गेले ही भाषा तितकीशी कठीण . नाय. ईवळां संस्कृत अणी ईवळी मराठी जेनां येत सयेल तेनां ही भाषा रोकडीच कळेल.
९)म.- ही भाषा ऐकायला गोड आणि समोरच्याला आपलेसे करणारी आहे. चि.- ही भाषा आयकेय बरी अणी पुढेत्लेला आपलोसो करणारी से.
१०)म.- ही भाषा आता कुठेतरी लोप पावत चालली आहे असे वाटते म्हणून माझा हा प्रयत्न. चि.- ही भाषा ऐतां कें तरी नायशी होत चायलीसे असां दिसलां म्हणीन माझो हो वावर.

९)म.- ही भाषा ऐकायला गोड आणि समोरच्याला आपलेसे करणारी आहे. चि.- ही भाषा आयकेय बरी अणी पुढेत्लेला आपलोसो करणारी से.

चित्पावनांशी संबंधित काहीही हे (१) ऐकायला गोड, किंवा, त्याहीपेक्षा, (२) समोरच्याला आपलेसे करणारे असू शकते, हे पचायला अंमळ जड जाते. (उद्या 'हत्ती हाडकुळा असतो' म्हणाल!)

किंवा, यदाकदाचित चुकून जर हे खरे असेलच (फॅट चान्स), तर मग ही बोली नामशेष का झाली असावी, याची अंधुकशी कल्पना येऊ लागते. It was an aberration that simply could not have survived.

असो चालायचेच.

ह्या बोलीवर उघड उघड कोंकणी छाप आहे. यावरून ती पुण्याची बोली नसावी असा तर्क करण्यास जागा आहे. पुणेरी चित्पावन वायले आणि गोव्याकडचे वायले.

पुणेरी चित्पावन वायले आणि गोव्याकडचे वायले.

पण... पण... पुणेरी चित्पावनसुद्धा शेवटी मूळचे कोंकणातलेच ना?

कोंकणीतला गोडवा

ह्या बोलीवर उघड उघड कोंकणी छाप आहे. यावरून ती पुण्याची बोली नसावी असा तर्क करण्यास जागा आहे.

चित्पावन जर गोंयकारच्या संपर्कात खरोखरच आले असते, तर गोंयकारांची भास खवट कुजकट झाली असती, काय समजलेत? ती 'ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या' की काय ती म्हण ऐकली आहेत ना?

'नेव्हर अण्डरएष्टिमेट द पॉवर ऑफ अ चित्पावन.'

- (बिगरचित्पावन) 'न'वी बाजू.

विक्शनरीवर सूची:चित्पावनी बोलीभाषा बनवली आहे काही इतरत्रचे शब्द सुद्धा सूचीत जोडले पण उपरोक्त परिच्छेदातून प्रातिनीधीक नसण्याची शंका व्यक्त केल्याने शब्द/वाक्यांश अद्यापतरी घेतले नाहीत.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

खाली हांव शब्दाविषयी चर्चा झाली आहे. हांव म्हणजे मी हे कोंकणीमध्ये. पण उत्तर रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात हांव म्हणजे आहोंत. 'आमी हांव जातीच्ये कोली' हे ऐकले असेलच. या ठिकाणच्या बोलींमध्ये अनुस्वार जागच्याजागी राखून ठेवले आहेत. प्रमाणित मराठीसारखे उचकटून फेकून दिलेले नाहीत. त्यामुळे 'मी येतो'साठी मींव येताँव', 'आम्ही जातों'साठी आमी जाताँव (जातों-जातोन्-जातोंव्-जाताँव्) अशी रूपे होतात. मालवणीमध्ये मीं चे मींय-मियां होते. अलीकडे मात्र या भागाच्या प्रमाणित मराठीशी वाढत्या संपर्कामुळे अनुस्वार अनुच्चारित रहाण्याचे प्रमाण वाढले आहे. मालवणीतली 'मियां आसंय' 'माकां व्हयां' 'तुमी गेल्ललांस' 'आमकां जाउंक व्हयां' 'तुमचां कसां चल्लहां? बरां आसां मां?' 'तेणा मुंबय्सून धाडल्यान' 'त्येकां वांगड गावलो ना (गावंक ना) म्हूण तां अ‍ॅक्टांच गॅलां' ही सगळी वाक्ये अनुस्वारविरहित झाली आहेत. या वाक्यांचे मराठीत भाषांतर अनुक्रमाने : मी आहे, मला पाहिजे, तुम्ही गेलां होतांत, आम्हांला जायला हवे, तुमचे कसे चालले आहे? बरे आहे ना?, त्याने/तिने मुंबईहून पाठवले आहे, त्याला/तिला सोबत मिळाली नाही म्हणून तो/ती एकटीच /एकटाच गेला/गेली.(इथे 'तें' हे सर्वनाम नपुंसकलिंगी असते. म्हणजे ते पोर, ते मूल, ते चेडूं इत्यादि. आपल्यापेक्षा अतिलहान व्यक्तीस 'तें' म्हणतात.) याशिवाय कोंकणीची छाप असलेले काही खास अ‍ॅकार आणि ऑकार नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची जागा मराठीतले सपाट अकार आणि आकार घेत आहेत.
[(पुढे कधी तरी) चांगला नमुना मिळाला तर वारली, पांचाळविश्वकर्मा बोली आणि ईस्ट इंडिअन बोलीचे नमुने टाकण्याचा मानस आहे. बघू कसे जमते ते]

(जो पर्यंत अर्थाचे अनर्थ होण्याची शक्यता नसते तोपर्यंत सर्व व्यवहारात बोंलींचा वापरही प्रमाण भाषेच्या बरोबरीने करावा असे माझे व्यक्तीगत मत आहे. असे आसूनही आंतरजालावर एक वेगळीच अडचण भेडसावते ती म्हणजे शोध यंत्रातून शोध घेताना बेळगाव आणि बेळगांव या दोन्हीचे रिझल्ट मला एकत्रीत पहावयस आवडेल पण सरावाने केवळ बेळगाव वरच शोध दिला जातो बेळगांव वर म्हणजे अनुस्वारीत पर्यायांवर शोध देऊन माहिती मिळवण्याचे राहून जाते. याला काहितरी उपाय निघावयास हवा.)

* पांचाळविश्वकर्मा बोली हे नाव मी वर लिहिलेल्या धागा लेखात नाही तेव्हा हि वेगळी बोली धरून वरील धागा लेखात जोडली तर चालेल का

* ठाकरी आणि ठाकुरी बोली नावाने एक पेक्षा अधिक बोली प्रचलत असाव्यात असा अंदाज आहे त्या बद्दल काही माहिती उपलब्ध झाल्यास स्वागत असेल.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

अनुक्रमे सूची:कोकणी भाषा आणि सूची:मालवणी बोलीभाषा या विक्शनरी सूचींमध्ये या प्रतिसादातील शब्दार्थ आणि वाक्यांशांची नोंद घेतली. मला स्वतःला या बोली अवगत नसल्यामुळे आपण आणि इतर जाणकारांनी विक्शनरी सूचींमधील नोंदी तपासून सुधारणा केल्यास/सुचवल्यास स्वागत असेल.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

कोंकणीची छाप असलेले काही खास अ‍ॅकार आणि ऑकार नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

हा बहुत प्राचीन बंगाली प्रभाव असावा की कसे, याबद्दल विच्यार करितो आहे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बरेच दिवस हे वाचत होतो. तेव्हापासूनच खाली दिलेलं इथे टाकायचा विचार करत होतो. पण विश्लेषनाच्या अंगाने चाललेली चर्चा पाहून हा उतारा अस्थानी ठरेल की काय असं वाटल्याने कंटाळा केला होता.
पण आजचे काही प्रतिसाद वाचल्यावर,पूर्वी इतरत्र लिहिलेलं इथे टाकतो आहे.

ह्या बोरीबंद्रावं येऊन गाडी पकडीपोत इथंच गडाद पडलं. आता कव्हा सरवोदेला पोहोसायचा आन कव्हाशीक जीपडं घावायचं.घराला पोचस्तव्हर तं तांबडं फुटंन.जितराबांच्या धारा कव्हाशीक निघायच्या आन कव्हाशीक दुधं घालायची.

लोकलमधल्या शीटावं बस्ताबस्त्ता आस्लं काय्काय मनात दाटत व्हतं.समद्या सकाळपुन निर्‍हा पिट्टा पल्डा व्हता.

ह्या मंबयीत यायाचं म्हयी निस्ता डोक्याचा गोयंदा व्हतोय. मोर्‍हल्या दिसाच्या कामाची पार वाट लागऽती. आन तिधं कोरटातबि ती वकीलं काय सुदरून देती नाय.कव्हा केस निकालावं निघंऽन आसं झालंय आत्ता.निर्‍ही टायमाची खोटी न पैशाचा मुडदा.ह्याच्यापरास हाती काह्यीसुधील नाय.

यळंमाळं काह्यी खायाला बी झालं न्हव्हतं.
’चाट्कनी दोन घास खावून येतो’
वकीलाला म्हंगालो तं त्ये गाबडीचं आयकत आस्तंऽय का?

’क्येस कव्हाबी बोरडावं येऊ शक्ती’ म्हून सारखंच भेवडीत व्हता.

येळभर पोटात दाना न्हाय.पार तव्हारी याया लाग्लि .आता सरवोदेला गेल्यावं जीपडं सुटसत्व्हर येखांदोन रोट्या न आंडाकरी हादाडल्याबिगार व्हायाचं नाय.आन वर एखांदी म्याक्डॉल नाह्यतं बीपीची कॉटर लावली तं एकच लंबर काम व्हईन.पर नकं तेच्यायला.सण्कष्टी चतुर्थीचीबी प्येला म्हनून मंडळी लयीच औदान करीन उद्याच्याला.आख्ख्या दिवसाची आय्झेड व्हऊन जाती तिच्या बडबडीनी. नवरा प्येला म्हंगालं का तिच्याइक्त्या घान तोंडाची बाई न्हायी गवसायची कुढंयबी.
च्यायला तिलायबी केंधूळ फोन करायचा व्हता. पार भुस्काट झालंय मस्ताकाचं. पह्यला फोन लावाय पायशेन. पॉर्‍हसुदील वाट पघत आस्तीन ना.येळभर टायीमच नाय घावला त्येला म्या तरी काय कर्ण्हार.पॉर्‍हान्नापन काह्यतरी कापडंचॉपडं नाह्यतं निदान खायाला तरी काही घ्ययाला पायशेन व्हतं.ह्या वकिलान्च्या लफड्यात तेसुधील राहूनच ग्यालं च्यायला.

आता फोनवं तरी त्यान्च्याबराबर बोलावा असा इचार करीत पँडीच्या खिशात हात घातला तं काय. आत्त्यायला, मोबायीलचं डबडं कुढं घावातंय.दुसर्‍या खिशात ह्ये का काय म्हनून तिधं हात घालितो तं तिधंय काय हे? ..घंटा?? बंडीच्या खिशात्बी कुढं गवसातंय ते डबडं. आयला. झालंक्काय याचंबी वाटुळं. मागल्या आखिदीला तं घ्येतला व्हता.जुनं डबडं वावरात रातच्या वक्ती कांद्याला बारं द्येतानी कुढं उलाथलं कळालंबी नाय.आत्ता ह्येयबी डबडं ग्यालं तं आटापलंच म्हंगायचं न काय.

पर एवढ्यात काय पघतोऽऽ... हा सामनीच्या शीटाव्हर्ला बांडा खाली वाकूवाकू काह्यीतरी चापशीत होता.मी पघऽतोय, तव्हर तं बांड्यानी मोबाईल उचाल्लासुधील. आत्याह्यला मिव्हं. नदरंसामनी वाटमारी. लयीच बाराबोड्याचं ब्याणं दिसातयं कनी. आत्ता चिप राहून चालातं काय. ’ओ भाऊ वो मेरा फोन का चोरी किव कर्ता है रे तू. नीच्ये पडा व्हता वो मेरेवाला फोन हये. गपचित रिटन करनेका,नाह्यतं इद्दरच र्‍हाडा कर्ता की नाय मय द्येक बे तू!’ म्या त्याच्यावं डाफार्लो.

’च्यल ये, तेरा कायका फोन रे? ह्ये तं माव्हाच फोन हे.उगं डोक्याची कल्हयी नाय पायशेन पग.' त्ये बी बांडगुळ माह्यावं आराल्डं.

च्यायला आपलाच दिसाऽऽतंय बाण्ड्गुळ... आसून्दे मरुन्दे. मोबायील चोरितो म्हन्जी काय.
'बापाची पेंड ह्ये काय रं? इक्डं आन पह्यला मोबायील. मोबायील माव्हा ह्ये सांगऽऽतोय पग तुला गैबान्या. डोक्यात शिरातय ना बॉल्लिलं. का दिव येक ठुण उल्ट्या हाताची मुस्काडावं .. सुक्काळीच्या. पानीबी मागाय्च्या लाय्कीचा र्‍हायचा न्हाईस पग.' बोलाय लागलो मंग मी कोन्च्याच बापाचा न्हाय.
''गप ये किडंपड्या. ईजार पिवळी करुन घ्याय्ची हावस सुट्ली न क्काय तुला भूसनाळ्या.जाव्दें जाव्दें म्हणितोय तं ह्ये तं लयीच उगीरवानी बोलातंय.'' सोंड्या काय बोलाय कमी करित न्हव्हता.

आपल्याच्यानि हा काय आघत नाय आत्ता. माव्ही तं पार अक्कालच गुल व्हया लाग्ली न काय. आत्ता चिप बसनं म्हयी गोट्या कपाळात जायची बारी.
"ये यड्याभोकाच्या नाय तुला इधं उल्टा टांगुन मिर्चीच्या धुर्‍या दिल्या ना,तं म्याबी येकाच बापाचा न्हाय."

तरी ते आराल्डंच "ह्ये पग तुला लाष्टचं सांगतो. ह्यो मोबायील माव्हा हे. म्हन्जी म्हाव्हाच ह्ये.म्होरं जर का बोल्लास ह्येंबाड्या आत्ता तं समदं बत्तीस्च्या बत्तीस नरढ्यात ग्येलंच म्हून पग तुपलं,आन त्येय बि येकाच फैटीत. "

"आरं नकं नकं. आसं कुढं करीत आस्त्यात का राव." म्या आप्ला हाळुस रिवस ग्येर टाखुन ठुला.

तं जखाळं काय म्हणितंय.."कस्सा बराबर आण्हला का ल्हायनीवं."

"न्हाय त्ये आसं ह्ये पग. तु मस समदं दात नरढ्यात घालशिन. पर त्ये काल्च्या बाजार्ला मंडळीनी नयीनच्या नयीन कोल्गेट्ची टूप आनुन ठुली, ती काय माव्ह्या ढुंगावं घसरित बसु का काय रोज सकाळ्च्याला. आरं शंबर रुपय जातिन ना माव्हं निस्कारन वायाला"
म्या ह्ये बोलाय्ची खोटी, समदा रागबीग ईसरुन त्ये बांडं लागलं कनि, दाताड काढाय मोट्मोठ्यानि.
मेंदुत जरा कमिऽच दिसातंय.

काल्हडा नं भावड्यानि मोबायील खिशातुन, आन जव्हा मला दाखावला.

"माउली माउली येवढया बारिला चुकी झाली पगा माव्ही. माफी करा राव. समदी गडबडच झाली राव्. यळंमाळं निस्तं उल्टंच व्हतय पगा आज्. लयी वायीटवंगाळ बोल्लो राव तुम्हाला. त्वांड झोडाय्चि बारी आली पगा माह्यावं."
मोबायील आप्ला नाह्यिच म्हंगाल्यावं आता दुसरं कर्तो तरी काय म्या बाबुराव.

त्यान्हीबी माव्ही समजुत घातली,"पाव्हणं चालायचं राव. जाऊंदया वले. व्हती मिश्टिक येखाण्द्या टाय्माला.पह्यला तुमचा मोबायील घावतोय का नाय ते पगा"

आन्मंग आत्ताशि माव्ही टुप लागली. "आवं कोरटात वकिलानि त्ये डबडं सायलिन्स करुन पिश्वितच ठु म्हनुन सांगातलं व्हतं, न्हायतं त्ये जजडं फायीन मारितंय म्हनुन हाग्या दम धिल्ता पगा. हाए वले पिश्वितच ह्ये त्ये डबडं."

त्ये इच्राय लागलं "कोरटात आल्थं काय तुम्ही?कुढुल्ल्लं ह्येत तुम्ही? "

"वाड्याचा ह्ये पगा मी. तिक्डं भिमाशंक्रापं ह्ये आम्चं वाडं." म्या सांगातलं.

"आन मी बी घोड्याचा ह्ये ना राव. मला वाटत व्हतंच ..सोयरं आपलंच दिसातंय म्हनुन. कापडं न बॉलणं श्येमच ह्ये न काय." त्ये म्हंगालं .

''आत्याह्य्ला मजाच झाली न क्काय समदीच.तुम्ही मंबयीत काय करत्या? सरव्हीस ह्ये का काय?" म्या म्होरं चालु ठुलं .

त्ये,''नाह्यी वो वाशिला मारक्येटला आल्थो.बट्ट्याचि पट्टि न्ह्यायचि पल्डि व्हती. लयी दी झाल्तं.तव्हा ती घित्लि न मण्ग आत्ता जरा लाल्बागला साडूपं जावून आलो जराशिक.त्येच्या पोरिच्या सोयरिकीचि गडबड चाल्लीय जरा,तव्हा गेल्थो जरा बोल्चाली कराया.''
तुम्ही कोरटात काह्याला. काय वाटपाचा लफ्डा ह्ये का काय? आपल्याभोति ती लयीच _टंउपट आस्ती पगा."
"न्हाय वो. पुनरवसनाचं रखाडलंय ना आमचं ईस वर्सापून्.तव्हा मारितोय चक्रा न काय ह्ये.पार कम्रंचा काटा ढील्ला पल्डा पगा ह्येल्पाटं घालुघालु.काम सुचानि का धाम सुचानि ह्या क्येशिपाई" मलाय्बी मन हाल्कं कराय लयी दी झाल्तं कोनच घावलं न्हव्हतं.

"चालाय्चंच वले.क्यालं तं पाय्शेनंच."त्यांन्हैबी माला आंजार्लं.

''त्ये जावून्दे वले टिप्रित.गाय छाप तं आसनंच ना तुमच्यापं.द्या यखांदा इडा न काय ह्ये.कोरटात जाय्चं म्हयी लयीच मुस्क्या आवळुन घ्याय्ची धन ह्ये न काय्.मोबायील नका न तम्बाखु खाउन थुकु नका.बोलु नका न खोलु नका.आन मंग कराय्चं तरी काय आम्ह्या तिधं जाऊन्.काय भिताडाला धडका घ्यायाच्या क्काय?'' म्हायी गाडी तं ढाळानि शम्भ्रानि सुटलि नं काय.

कोपरितुन पुडि काढित तो म्हंगाला,''ही घ्या चुना न पुडि.बाकि बिजंचि जत्रा कशि काय झालि औन्दा?मला त काय जाया झालंच नाय पगा बिजलां.''

''आवं धरणात गाव उठल्यापुन श्योच गेला ना समदा जत्रंचा.उगंच आप्लि द्येवासाठि कराय्चि नं काय"म्या म्हंगालो.

"फुर्मोळ तं रेटला आसंन ना दाबुन?"त्यान्हं इचार्लं.

"त्ये सोडितो का राव्.म्येथिचि भाजि,आंबिल, मलिदा नं घुगर्‍या. चार दि निस्ता धुराळा पग्.यळंमाळं रेमटित व्हतो." फुर्मोळांचं तं आपल्याला आझुकय्बि लयी आप्रुक.

"म्होर्ल्या बिजंला या आमच्यापं फुर्मोळाला" म्या आवातनं दिउन ठुलं.

''नक्किच यानं कर्तो पगा बिजंला.'' त्यान्हैबी हामि धिलि. "सोय्रं, तुम्हियबि या कनि आमच्यापं येखान्दिशि.घर्च्याच कोम्ड्या ह्येत्.धसरु दोन्तिन आलं तुम्हि तं,पर वशाट चालातं नं तुम्हालां? नाह्यंतं शेंगुळि मास्वड्याच्या ब्येत उड्वुन दिउ तुमच्यासाठि. "

वशाट म्हंगाल्याव तं आप्ल्या मुखात तं लाळंचा पूरच पूर सुटाया लागतोय निर्‍हा."चालातं म्हयी काय पळातंय. बोंब्यील सुकाट आन्डी चिकाण मटान मछ्छि समदंच हानितो नं काय्ह्ये."

"मण्ग तं झालिच पगा बारि येत्या आखाडात आप्ल्या घराला."तोयबि मला घरि न्ह्येयाला लयीच घायीवं आल्था.

मण्ग आम्ह्या एक्मेकाण्णा लाव्-लम्बर दिउन ठुलं. निरोपय्बि घ्येतला. घाट्कोपर ठेसण तव्हर आलंय्बि.म्या आप्ला खालि उत्रुन भट्वाडिच्या आण्गानि पावलं टाखाया सुर्वात क्येली.

रोचक ! अर्थात तरीही हे लेखन कोणत्या बोली मोडते ?

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

कोल्लापुरी ऑफकोर्स.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

I doubt.

पण कैक शब्द तसेच वाटताहेत. अ‍ॅट लीस्ट पच्चिम/दक्षिण म्हाराष्ट्र सोडून ही बोली कुठे जाणे अशक्य. काही सोलापुरी शब्द आहेत, मेबी थोडे सातारी. पण रीजन तोच. रौंडबौट.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला तर काही शब्दांतून अहिरणीच्या आसपास असल्याचा भास झाला.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हो, तसे शब्द काही आहेत खरे. पण बोली खान्देशी वाटत नाही.

ऑन अ सेकंड थॉट, मावळ साईडची बोली वाटते. काही शब्द इकडचे, काही तिकडचे. उदा. येड्याभोकाच्या ही सोलापुरी शिवी, 'आसुंद्या वले' हा खास मावळी वाक्प्रचार, पण जण्रल स्टाईल मावळीच वाटतेय.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण बोली खान्देशी वाटत नाही.

+१
मी खान्देशी, अहिराणी खूप जवळून ऐकत आलोय लहानपणापासून त्यामूळे ह्या लेखातली भाषा तशी नक्कीच वाट्त नाही.

येड्याभोकाच्या ही सोलापुरी शिवी

याच्याशी थोडी असहमती कारण बर्‍याच खान्देशी मित्रांकडूनही ही शिवी ऐकली आहे ('येडगांड्या' ही शिवी तर अगदी "मेल्या मुडद्या" प्रमाणे सर्रास वापरतात ते लोक)

याच्याशी थोडी असहमती कारण बर्‍याच खान्देशी मित्रांकडूनही ही शिवी ऐकली आहे ('येडगांड्या' ही शिवी तर अगदी "मेल्या मुडद्या" प्रमाणे सर्रास वापरतात ते लोक)

धन्यवाद. मी खान्देशी लोकांच्या संपर्कात असलो तरी एक्स्टेन्सिव्ह संपर्क नव्हता त्यामुळे ही शिवी जास्तीतजास्त सोलापूर ग्याङ्गकडूनच ऐकली आहे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यड्याभोकाच्या बावळाटभोकाच्या
यड्यागान्डिच्या बावळाटगान्डिच्या

दुनिया गोल है रे बाबा..

च्यायला मिव्हं
हये इथं टाकून दोन दी झालं पर समदं बबं न बाया
काय आम्चयांकं पगानिं..
निर्हा दोन दोन मिन्टानि पगून जात व्हतो..
पर कुनिबी आम्ह्या लिव्हलील्या वळींकं ध्यान द्याया माघानी..
म्हन्गालो जाउन्दे कनि गाढवाच्या गां_त..
आज एळभर काय टायिम गवासला नाय इथं पग्हाय..
(त्ये म्या औंदा आमच्या इथुल्ल्य्या रोट्री कलपचा आध्धेक्श झालो कनि.
तव्हा आज्च्याला आम्ह्या रक्तदान शिबिराचि आरास्मेन्ट केल्थी.
मोकार लान्डा गोळा झालिला..निर्ही जत्रा उलाथ्लेलि.समदं रेकाड ब्यरेक झालं...
साडेसोळाशे बाटल्या गोळा केल्या कनि.)
तं सवंसान्चा येऊन पगातलं तं निर्हा धुराळा..
कोन सोलापुर तं कोन सातारा तं कोन खान्देश
च्यायला जाळ न धुर सन्गच..
आर पर तुम्ही वाचित्याय का का्य करित्याय??
गाव कुढुल्लं हये पुसल्यावं त्ये बांडं सान्गातं कनी म्यी भिमाशंक्रापसल्या वाड्याचा तं दूसरा सांगतो म्यी घोड्याचा.
एवढ्यावं तुम्ह्या वळखाय पाय्शेन व्हतं..
हां म्हयी आदर्निय श्री.ब्याट मणभावू समदिकं फिरुफिरू बराबर आमच्या भ्यीमाशंक्राच्या पिण्डीवं पोहोच्ल्येलें ह्येत. आम्हि त्यान्चे मण:पुर्वक हार्दिक स्वागत करतो आभार मान्तो..
तव्हा या समदी आमच्या मावळात.. म्हयी ख्येड आम्बेगाव जूण्णर न शीरुळ
तालुक्यात..
अवांतर
१ कंसातली वाक्ये ही सत्य परिस्थिती आहे.

२ यात उल्लेख केलेल्या चार पैकी तीन तालुक्यांचा पश्चिम भाग बराच आदिवासीबहुल आहे.
ही बोली त्यांची नाही. ही त्या पट्ट्यातील पूर्व भागातील बहुजनांची बोली आहे.
रादर होती.सांपत्तिक,सामाजिक,शैक्षणिक उन्नयनाने हे असेच्या असे संभाषण सांप्रत काळी आढळणे अवघड आहे.

३ नेहमीप्रमाणे राराब्याटन यांचे भाषाविषयक पांडित्य अनूभवून मान आदराने कलली आहे.

ना
राराब्याटमन
आयसा पढो रे बाबा तुम सब..

लैच धन्यवाद बगा भीडस्तसो|!!!

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नेहमीप्रमाणे राराब्याटमन यांचे भाषाविषयक पांडित्य अनूभवून मान आदराने कलली आहे.

@ पंडित रा.रा. ब्याटमनराव यांस आदरपुर्वक --/\-- . आम्ही भीडस्तरावांशी १०१ टक्के सहमत आहोत, मजकुरावरून बोली तीही काळाच्या मागे गेलेली ओळखणे किती कठीण असेल याची मी केवळ कल्पनाच करू शकतो ते काम आपण अत्यंत अलगद पणे पार पाडलेत. आपल्या बॅटमन या टोपण नाव आणि त्या नावाला अनुभव देणारे नाव या दोन्ही मागील व्यक्तीस पंडित शब्दाने संबोधण्याने पंडित शब्दास पुन्हा एकदा महती प्राप्त होईल याची मनोमन खात्री आहे. आदराने पंडित हि उपाधी देताना मला कृतज्ञता वाटते.

@ रा.रा. भीडस्त आपली मावळची हो बोली वैशीष्ट्य पूर्ण आणि वेगळेपण असणारी आहे या बोलीस आधी पासून काही नाव आहे का 'पूर्व मावळी बोली' हे नाव चालू शकेल. पूर्व हा शब्द दोन्ही अर्थानी वापरला जाईल एक पूर्व दिशा आणि दुसरे सध्या पेक्षा आधीच्या काळातील (कारण आपल्या बोलीतील शब्दांची/वाक्यांशांची विक्शनरी प्रकल्पांतर्गत सूची बनवली आहे :सूची:पूर्व मावळी बोलीभाषा , आणि लेख शीर्षकासाठीही नामःकरण निश्चितीची आवश्यकता आहे)

दुसरे पश्चिम मावळातील आदिवासी कोणत्या बोलीभाषा वापरतात/वापरत या वरही या निमीत्ताने काही प्रकाश टाकता आल्यास पहावे ही विनंती

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

१) कोंकणीमध्ये (दीर्घ स्वर सोडून) १६ स्वर आहेत ते कोणते ?

२) कोंकणी भाषेचे एक वैशिष्ट्य असे आहे की कोंकणीतला अचा उच्चार मराठीतल्या अ च्या उच्चारापेक्षा वेगळा आहे. मराठीत वापरतात त्या ’अ’साठी IPA चिन्ह आहे ə (unrounded mid vowel), तर कोंकणीतला ’अ’ ɵ(rounded Close-mid central vowel) ने दाखवतात. या बाबत उदाहरणे हवीत

३) कोंकणीत ’ए’ या स्वराचे तीन उच्चार आहेत. :e, ɛ आणि æ. या बाबत उदाहरणे हवीत

कोंकणीत वापरला जाणारा æ स्वर IPA च्या æ (Near-open front unrounded vowel) या प्रमाण स्वरापासून वेगळा आहे. कोंकणीत वापरतात तो स्वर ɛ आणि æ यांच्या मधला आहे, आणि प्रमाण æ पेक्षा लांब आहे. प्रमाण æ फक्त युरोपियन भाषांतून आलेल्या तत्सम शब्दांसाठी वापरला जातो.


: नेहमीच्या के या एकारा शिवाय देवनागरीकरता कॆ हा वेगळा एकार सुद्धा वापरण्याची सोय युनिकोडात आहे, या सोईचा कोकणीतील काही एकार उच्चारणे दाखवण्यासाठी उपयोग होऊ शकेल का ?

४) सध्याच्या देवनागरीत कोकणीतील इतर कोणती उच्चारणे दाखवणे अवघड जाते असे तुम्हाला वाटते ? नेमकी कोणती

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

ह्या धाग्यावर पाहिलं आणि मग विकीपीडियावरही जाऊन पाहिलं :
सूची:कोल्हापूरी बोली

प्रमाण मराठीत 'कोल्हापूर'चं विशेषण 'कोल्हापुरी' होईल; कोल्हापूरी नव्हे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सुधारणा करतो, सुचवणी साठी धन्यवाद. असेच अजूनही सूचवावे (आधी कोल्हापुरी' लिहिले पण माझे स्वत:चे शुद्धलेखन बरोबर नसल्याने, आपण चुकलो समजून कोल्हापूरी असे केले, आता बदलतो ! पुन्हा एकदा धन्यवाद)

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

सुचवणी प्रमाणे बदलले. अर्थात कोल्लापुरी हे लोकभाषेतील उच्चारणच प्रमाण म्हणून का स्विकारू नये हा ही विचार मनाला स्पर्षून गेला.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

पानावर दोन्ही शब्द दिसले की गूग्गलपंडीतांचं काम सोपं होईल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पानावर दोन्ही शब्द दिसले की गूग्गलपंडीतांचं काम सोपं होईल.

एकदम चांगली कल्पना आहे. (आणि ओघाने त्यासाठी धन्यवाद सुद्धा) पानावर सर्व पर्यायी नावे देता येतीलच. शीर्षकातही नावाची शीर्षकातही दोन रूपे घेता येतील पण विकि आशयव्यवस्थापन प्रणालीत शीर्षकात / हे चिन्ह वापरल्यास / नंतरच्या वाक्यांशाचे (उपशीर्षकाचे) वेगळे शीर्षक पान तयार होते पण कंस वापरून दोन्ही नावे शीर्षकात वापरता येतील. जसे की कोल्लापुरी (कोल्हापुरी) बोलीभाषा अथवा कोंकणी (कोकणी) बोलीभाषा मला वाटते बोलीरुप आधी घ्यावे आणि प्रमाणरूप कंसात घ्यावे.

या चर्चेच्या निमीत्ताने: खर म्हणजे मराठी शोध सोपे करण्या साठी गूग्गल कंपनीत काम करणार्‍या पंडीतांचं साहाय्यही हव आहे इंग्रजी गूग्गलात Define हि पॅरामीटर जशी काम करते तसे मराठी म्हणजे या शब्दा करता करून मिळणे. त्या शिवाय गूग्गलचा मराठी शोध निवडल्यावरही सध्या हिंदी आणि नेपाळी शोध येतात, गूग्गलचा मराठी शोध निवडल्या नंतर 'आहे', 'म्हणजे' असे हिंदीत नसलेले पण मराठीत शब्द वांरंवारता अधीक असलेल्या शब्द पॅरामीटर ने फिल्टरहोऊन मराठी शोध आधी यावेत आणि हिंदी नेपाळी नंतर दिसावेत अशा सुविधेची गरज आहे. अशी विनंती गूग्गल कंपनीतल्या पंडितांपर्यंत कशी पोहोचवायची याचा मार्ग कुणास ठावे असल्यास मार्गदर्शन करावे हि विनंती

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

>> कोल्लापुरी हे लोकभाषेतील उच्चारणच प्रमाण म्हणून का स्विकारू नये हा ही विचार मनाला स्पर्षून गेला. <<

(ह्यात लोकभाषेला कमी गणण्याचा मुद्दा नाही, पण) लोकभाषा ही सहसा प्रमाण मानली जात नसते. उच्चाराप्रमाणे लिहिणं हेदेखील प्रमाण असेलच असं नाही. मराठी विकीचं काम प्रमाण भाषेत होणं अपेक्षित असावं. शब्दाचं नक्की कोणतं रूप प्रमाण ह्याविषयी शंका असल्या, तर अरुण फडके ह्यांचा 'मराठी लेखन कोश' संदर्भासाठी घेऊ शकता.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

डॉ. आश्रु जाधव यांच्या नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात मांगाची गुप्तभाषा-पारसी फेसबुक दुवा असे काही विश्लेषण असावे असे दिसते. कुणाच्या वाचण्यात आल्यास दाव्याच समीक्षण करून दुजोरा देणे शक्य असल्यास नमूद करावे.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

कोल्लापुरी बोली बाबत विकिपीडियाचा लेख बनवण्याच्या दृष्टीने गूगल शोध न्याहाळताना, सोशल मिडीयात बोली भाषांचा वापर कमी का असावा ? ह्या प्रश्नाची चिकित्साकरण्याचा प्रयत्न करणारा सोशल मीडियावर वर्चस्व मुं-पु मराठीचंच! हा प्रसन्न जोशी, मुंबई असो. सिनिअर प्रोड्युसर-अँकर एबीपी-माझा यांचा लेख अनुषंगिक वाटला म्हणून या धाग्या सोबत नोंदवतो आहे.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

प्राचीन काळातला ग्रीस सोडला (आयोनियन, डोरियन, आर्केडो-सिप्रियॉट, अ‍ॅटिक, एइओलियन, इ.इ. व्हरायट्या) तर अशा बोलीभाषांबद्दल इतके जागरूक क्वचितच कोणी असतील. युरोपात असतीलही, पण तेही किती असतील माहिती नाही. अ‍ॅज़ इन, प्रत्येक भाषेची वैशिष्ट्ये इ. खाचाखोचा माहिती असतीलही, मात्र प्रत्यक्ष त्यांचा वापर क्वचितच कुणी करत असेल. खुद्द ग्रीक विश्वातही नंतरनंतर 'कोईन' अर्थात अथीनियन कोअर(अ‍ॅटिक ग्रीक)वर आधारलेली एक स्टँडर्ड व्हर्जनच पापिलवार जाहलेली दिसते.

असं कै नै की लिखाणात कुणी बोलीभाषा वापरू नयेत, जष्ट येक प्याटर्न साङ्गितला एवढेच.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नमस्कार,

मराठी विकिपीडियावर उपलब्ध टायपींग पद्धती बद्दल माहिती देणारी नुकतीच एक विडिओ क्लिप (ड्राफ्ट व्हर्शन) बनवून मिळाली आहे. सध्या मराठी, इंग्रजी शिवाय अहिराणी, कोंकणी आणि संस्कृतातून सबटायटल्स देणे शक्य असेल. (इतर बोलींकरता शक्य झाल्यास इथे कळवेनच). सध्याचा मराठी आणि इंग्रजी सबटायटल्सचा संच या दुव्यावर उपलब्ध आहे. या सबटायटल्सचे कोंकणी, अहिराणी आणि संस्कृत भाषातील अनुवाद करून मिळाल्यास ते व्हिडिओ क्लिप मध्ये जोडण्याचा मानस आहे. कोंकणी, अहिराणीची व्यवस्था कोणत्या दुव्यावर करावयाची याची मी माहिती घेत आहे. संस्कृत सबटायटल्स TimedText:Marathi Wikipedia ULS.webm.sa.srt या दुव्यावरून तुम्हालाही जोडून सेव्ह करता येतील. या मुळे विक्शनरी या शब्द कोश प्रकल्पातून अथवा संस्कृत विकिपीडियातील मराठी लोकांना या सबटायटल्सचा लाभ होईल अशी आशा आहे. धन्यवाद.

* खालील तीन वाक्यांचे अनुवाद हवे आहेत.

१) "मराठी विकिपीडियात मराठी कसे टाईप करावे"

२) "शोध अथवा संपादन खिडकीत (उजव्या वरच्या कोपऱ्यात) टिचकी मारा"

३) "इन्स्क्रिप्ट साठी मराठीलिपी"

* knn - कोंकणी
* vah - वऱ्हाडी
* smv - कादोडी
* ahr - अहिराणी
* khn - खानदेशी
* sa - संस्कृत

* सोबतच कोल्लापुरी , बेळगांवी, मालवणी साठी सुद्धा अनुवाद देऊन ठेवावेत. अनुवाद मिळाल्यास मी माझ्या परीने प्रयत्न करेन.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

पाने