शिनुमा : श्री फारएण्डराये देखियले

शिनुमा : श्री फारएण्डराये देखियले
लेखक - फारएण्ड

चिंतातुर जंतू : चित्रपटसमीक्षादेवीसाठी दीपप्रज्वलन आणि स्मरण करत, नमस्कार फारएण्ड.

फारएण्ड : नमस्कार, नमस्कार.

चिंतातुर जंतू : तुमच्या समीक्षकी कलाप्रवासाबद्दल अधिक जाणून घेण्यापूर्वी आम्हांला तुमच्या नावाबद्दल समजून घेणं इष्ट वाटतं. तुम्ही तुमच्या नावाचं अर्थनिर्णयन कसं कराल?

फारएण्ड : काही लोकांचं असं म्हणणं आहे, की एन्ड व्हावा असं फारफार वाटणारे सिनेमे मी खूप बघतो, म्हणून मी हे नाव घेतलं आहे. तसं मुळीच नाही. क्रिकेटमध्ये पूर्वी, म्हणजे प्लेअर्सपेक्षा कॅमेरे फारफारच कमी असण्याच्या काळात, एक पॅव्हेलियन एण्ड असायचा, आणि दुसरा फार एण्ड. नेहमीचे यशस्वी कॉमेंटेटर पॅव्हेलियनमध्ये बसून समालोचन करायचे. प्रस्थापित समीक्षक टीका करतात तसे. मी त्यांच्या बरोब्बर उलट्या व्ह्यूपॉइंटने गोष्टी बघतो, म्हणून मी फारएण्ड हे नाव घेतलं.

चिंतातुर जंतू : सर्व पाश्चात्त्य भाषांमध्ये, विशेषतः फ्रेंचमध्ये, समीक्षेचीसुद्धा समीक्षा होते. मेटासमीक्षा वा अधिसमीक्षा असं त्याला म्हणता येईल. आपल्या मराठीत हा प्रकार तसा अनोखा आहे, पण तरीही तुमच्या समीक्षाकलेच्या समीक्षेकडे आपण वळावं असं मला वाटतं. तुम्ही लहानपणापासूनच L'enfant terrible असण्याचं स्मरण तुम्हांला तुमच्या परिसरातून करून दिलं जातं का?

फारएण्ड : मी शाळेत जाऊ लागलो आणि आता 'अमर अकबर अँथनी' रिलीज करायला हरकत नाही असं मनमोहन देसाई ('मनजी') यांनी ठरवलं. सगळा समाज अगदी नाही, तरी काही समीक्षक त्यासाठी तयार आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. मात्र या चित्रपटातील लॉजिक सगळ्या समीक्षकांना कळत नसे. बॉलिवूडमधल्या चित्रपटांत लॉजिक हे बघणार्‍याच्या डोक्यात असतं हे त्यांच्या काही केल्या गळी उतरत नसे. सगळं लॉजिक समोरच्या सीनमध्येच दाखवून प्रेक्षकांना 'स्पून फीडिंग' देणार्‍यांतले दिग्दर्शक 'मनजी' नव्हते. उदाहरणार्थ, तिघे जण निरूपा रॉयला एकत्र रक्तदान करत असतात तो सीन. "हे कसं शक्य आहे?" असं लोक म्हणत. मग मी त्यांना सांगत असे, की "आधी नोट करा, निरूपा रॉयचे नाव 'भारती' आहे. त्यामुळे हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन लोक भारतमातेसाठी आपले 'खून' देत आहेत याचे ते प्रतीक आहे." इथे जर एखाद्या प्रतीकबंबाळ दिग्दर्शकाने हाच सीन रडके-उदास लोक करत आहेत असं दाखवलं असतं, तर सीनमध्ये पाहण्यासारखं काही न उरल्यामुळे लोकांना थेट मागचं प्रतीक दिसलं असतं. पण मनजी सीन इंटरेस्टिंग करत व लोकांना ते उथळ वाटे. तुमच्या लक्षात असेल, की या सीनआधी नीतू सिंग ऋषी कपूरला "तुम्हारा ब्लड ग्रूप आर-एच है ना?" असं विचारते. ती 'ए पॉझिटिव्ह', 'बी निगेटिव्ह' वगैरे काही विचारत नाही. सगळ्यांचं रक्त एकच आहे हाच संदेश मनजींना त्यातून द्यायचा आहे. यात सर्वधर्मसमभाव तर आहेच, पण सर्वरक्तसमभावही आहे.

यावरूनच मग 'अ. अ. अॅ.'मधलं, आणि एकूणच 'करमणूकप्रधान' म्हणून हिणवल्या गेलेल्या सर्व चित्रपटांतलं, लॉजिक समाजाला उलगडून दाखवणं ही माझी जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन मी ते काम सुरू केलं.

मग चिमुकला फारएण्ड लोकांना सारं नीट समजावून सांगत असे. नीट लक्ष न देता पिक्चर पाहणार्‍या अनेकांना प्रश्न पडत. उदाहरणार्थ, 'परदा है, परदा है' गाण्यात एकटा अमिताभच मधल्या आइलमध्ये का बसलेला असतो? मग मी दर्शवून देत असे, की आधीच्या सीनमध्ये तो निरूपा रॉयला आपलं तिकीट देऊन आलेला असतो. मग तो कुठे बसणार? म्हणून तो आइलमध्ये बसलेला दिसतो. नंतरच्या एका सीनमध्ये ऋषी कपूर प्राणला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. तेव्हा सगळे बेड्स फुल आहेत हे त्याला कळतं. मग फक्त १० नंबरचा बेड उपलब्ध असल्याचं त्याच्या लक्षात येतं. हे त्याच्या कसं लक्षात येतं? तर - तो काही वेळापूर्वी त्याच बेडवरून पळून गेलेला असतो. त्यामुळे त्याच्या ते ताबडतोब लक्षात येतं. अशी सगळी ’मेथड इन मॅडनेस’ लोकांना समजली, तेव्हा चित्रपट सुपरहिट झाला.

चित्रपटांमध्ये लॉजिक कसं असावं याचा जो ट्रेण्ड 'अ. अ. अँ.'नं सुरू केला, तो अनेक वर्षं टिकला. थेट नंतर 'गुंडा'नं नवीन लॉजिक आणेपर्यंत.

चिंतातुर जंतू : सर्व महान कलाकार आपल्या अंगभूत कलागुणांशी बांधिलकी ठेवत, काही नवीन मूल्यांशी तडजोडही करतात. तद्दन व्यावसायिक पातळीवर यश मिळवणाऱ्या, सध्याच्या प्रसिद्धिसंस्कृतीशी इमान राखणाऱ्या, जॉन अब्राहमसारख्या जन्मजात सर्वस्नायूसम्राटांनाही 'नो स्मोकिंग'सारखे सामाजिक-राजकीय भाष्य करणारे चित्रपट करण्यासारखी कृती करावीशी वाटते. तर असा समन्वय साधण्यासाठी समीक्षक म्हणून तुम्ही कोणत्या प्रकारची तडजोड केलीत?

फारएण्ड : जन्मजात देणगी जरूर आहे. पण त्यावर प्रचंड मेहनतही घ्यावी लागली. अडीच वर्षांचा असताना सचिनने बॅट घेतलेला तो फोटो काढून घेतला असता आणि नंतर काहीच केलं नसतं, तर तो एवढा मोठा झाला असता का? तसंच हे आहे. या चित्रपटांतून लॉजिक बाहेर काढून लोकांना दाखवायचं, म्हणजे सोपं काम नाही. गुर्‍हाळातल्या उसाच्या कांडीप्रमाणे तो चित्रपट पुन्हा पुन्हा टीव्हीरूपी चरकात घालावा लागतो. कारण कोणत्या राउंडला त्यातून खरं लॉजिक बाहेर येईल, ते सांगता येत नाही. त्यात अनेक वेळा प्रयत्न वाया जातात. कारण काही चित्रपट 'समीक्षकी अर्थानं चांगले' निघतात. म्हणजे त्यातलं लॉजिक लोकांना सहज समजेल असं उलगडून दाखवलेलं असतं. आळशी लोकांसाठी बनवलेल्या अशा चित्रपटांनी जनतेचं आणि समीक्षकांचं खूप नुकसान केलेलं आहे.

झालंच तर, दिलीप कुमार, नासीर, संजीव कुमार इत्यादी लोकांच्या चित्रपटांपासून जपून राहावं लागतं. आपलं नशीब चांगलं, म्हणून अमिताभने फक्त सलीम-जावेदसारख्या तद्दन लॉजिकल लेखकांबरोबरच काम केलं नाही. पुढे कादर खानपासून इतर अनेक नव्या लेखकांबरोबरही काम केलं. त्यामुळे अमिताभच्या चित्रपटांतून बरंच काही मिळू शकतं.

चिंतातुर जंतू : तुमच्या प्रवासाबद्दल काही तपशील जाणून घ्यायचे आहेत. जॉर्ज बर्नार्ड शॉ 'The Picture of Dorian Gray'मध्ये म्हणतो, “The devil lies in the details.” मराठीत सांगायचं तर, सैतान तपशीलात पहुडलेला असतो. तुमची जीवनदृष्टी प्रतिबिंबित करणारे असे काही गुलदस्त्यात दड‌वलेले सैतान (हा हा हा!) आहेत का?

फारएण्ड : माझ्या लहानपणी 'शोले'सारखे चित्रपट असल्यामुळे ही सगळी लॉजिकल चित्रपटांची चळवळ मुळात सुरूच होते की नाही, अशी भीती मला वाटायला लागली होती. पण मनजी व इतर लोकांनी ही चळवळ सामान्यांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवलंच. तरीही समीक्षक व सामान्य लोक यांच्यात खूप दरी होती. 'सुहाग'मधल्या अमिताभच्या चपलेप्रमाणे समीक्षकांना ६ नंबरची दिसणारी गोष्ट लोकांना ९ नंबरची दिसत असे. कारण तेव्हाची समीक्षणं दिग्दर्शकाला चित्रपटातून काय सांगायचं आहे याबद्दल सखोल विचार न करता लिहिलेली असत.

मनमोहन देसाई, मनोज कुमार, सुभाष घई, फिरोज खान यांपासून ते कांती शाह, अनिल शर्मा यांपर्यंत अनेक लोक इतके दर्जेदार चित्रपट काढत... पण समीक्षकांना ते समजतच नसत. त्यामुळे यांतले बरेच चित्रपट सुपरहिट होऊनसुद्धा त्यांना भारतीय चित्रपट इतिहासात योग्य तो मान मिळाला नाही, अजूनही मिळत नाही. पण हे दिग्दर्शक, त्यांचे चित्रपट, संवादलेखक यांच्या प्रतिभेने मी मात्र दिपून गेलो. शाळेत माझं लक्ष वर्गात लागत नसे (कॉलेजमध्येही लागत नसे. पण ते चित्रपटांमुळे नव्हे. तो एक वेगळा विषय आहे.). शाळेत लोहचुंबकाचे गुण शिकताना माझ्या डोळ्यांसमोर 'फरिश्ते'मधल्या रजनीकांतने लावलेला 'सिलेक्टिव्ह मॅग्नेटिझम'चा शोध येत असे; आणि ही शाळेतली पुस्तकं अजूनही १९व्या शतकातल्या शोधांबद्दलच शिकवत आहेत हे बघून मला त्यांची कीव येत असे. धातूच्या गोष्टी लोहचुंबक ओढून घेतं हे सर्वांना माहीत आहे. पण एका महामानवाने एका ओपन आउटडोअर सीनमध्ये असं एक चुंबक धरून तिथल्या असंख्य लोखंडी गोष्टींमधून फक्त त्याला ओढायच्या असलेल्याच गोष्टी तेवढ्या ओढून घेतल्या आणि एक क्रांतिकारक शोध लावला, याचा त्यांना पत्ताही नसे. तसंच 'फरिश्ते'मध्ये हीरोचे रोलर स्केट्स आधी खाली पडतात व हीरो नंतर खाली पडतो, हे पाहून 'गुरुत्वाकर्षणामुळे हवेतून खाली पडणार्‍या विविध वजनांच्या गोष्टी एकाच वेगात खाली पडतात हे गृहितक चुकीचं आहे', हेसुद्धा सिद्ध होतं, हेही कुणालाच माहीत नसे. झाडाखाली आरामात बसून, स्वतः काहीही न करता, आपोआप वरून खाली पडणारं फळ पाहून, आपल्याला सगळं पदार्थविज्ञान कळाल्याच्या थाटात लिहिणारे शास्त्रज्ञ आणि त्यांचीच री ओढणारे शिक्षक - हे स्वतः रोलर स्केट्स पायात घालून हवेतून तरंगत कधी खाली उतरलेच नाहीत, तर त्यांना ते कळणार तरी कसं? चित्रपट नावाच्या बाह्य शक्तीने प्रेरित न केल्यामुळे त्यांची स्थिती आणि संथ गती तशीच राहणार यात मला शंका नव्हती. काय तर म्हणे, अ‍ॅक्शन व रिअ‍ॅक्शन समप्रमाणात असते! काय बोलायचं यावर! असं असेल, तर तो ’सिंघम्‌’मधला अजय देवगण किंवा इतर कोणत्याही चित्रपटातला सलमान खान ऍक्शन म्हणून एखाद्याला पाच फुटांवरून खाली टाकतो आणि मग तो माणूस रिअ‍ॅक्शन म्हणून हवेत पन्नास फूट उंच उडतो, हे कसं शक्य आहे? प्रत्यक्षातली अ‍ॅक्शन आणि रिअ‍ॅक्शन ही 'अ‍ॅक्टर'नुसार बदलते ही लेटेस्ट माहिती कोणत्याच पुस्तकात नव्हती.

त्यामुळे शोधांबद्दलचा 'पाया' पक्का करण्यासाठी शाळेत जरूर शिकावं, पण त्या त्या क्षेत्रातले लेटेस्ट शोध मात्र हिंदी चित्रपटातच पाहायला मिळतात. हे मला इतरांपेक्षा लवकर कळालं. याकरता या वर उल्लेख केलेल्या दिग्दर्शकांचा मी कायमच ऋणी राहीन. भौतिकशास्त्राप्रमाणेच जीवशास्त्राबद्दलसुद्धा मला अशीच नवीन माहिती मिळाली, ती पुण्यातल्या 'श्रीकृष्ण', 'श्रीनाथ', 'विजयानंद' वगैरे सात्त्विक नावांच्या थिएटर्समधल्या चित्रपटांतून. पण तो एक स्वतंत्र विषय आहे. आपण पुन्हा कधीतरी बोलू त्याबद्दल.

चिंतातुर जंतू : ते सगळं भौतिकशास्त्र वगैरे पुरेसं रोचक आणि उद्बोधक आहे. परंतु भारतात त्याजागी थोर अशा विश्लेषणाच्या समीक्षकी सुर्‍यांची समृद्ध कोरडीठाक परंपरा आणि त्या समवेत विरोधाभासी असा ऐंद्रिय अनुभवांचा ओलावा आहे. अशा संगमांच्या काही हृद्य आठवणी तुमच्याकडे आहेत का? उदाहरणार्थ शिरीष कणेकरांसारख्या अतिअस्सल समीक्षकांमुळे तुमचं चित्रपटांकडे बघण्याचं परिप्रेक्ष्य कसं बदललं?

फारएण्ड : परिप्रेक्ष्य पूर्णपणे बदललं असं मी नाही म्हणणार. पण त्यांनी मला एक दिशा मात्र नक्की दिली. चित्रपट समीक्षणाच्या दर्जाच्या काही पायऱ्या आहेत. तो चित्रपट उचलायचा आहे की आपटायचा आहे याचा आदेश 'कॉर्पोरेट'कडून आल्यावर त्यानुसार लिहिणार्‍यांना इथे आपण वगळू. पण बाकीचे सिन्सिअरली समीक्षा लिहीणारे जे लोक आहेत, त्यांत खालील प्रकार आहेत:

लेव्हल क्रमांक १: चित्रपटाच्या कथेची थोडक्यात कल्पना देणे, पण सगळे आधीच सांगून न टाकणे. लोकांच्या कामाबद्दल स्वतःचे मत; गीत, संगीत, छायाचित्रण आदींची वस्तुनिष्ठ माहिती; इत्यादी अजिबात न सांगणे. कारण हे कोणीही करू शकते. ते फारच बेसिक आहे. यात एक गट असा आहे, जो त्या दिग्दर्शकाचे किंवा लेखकाचे आधीचे चित्रपट पाहून त्यामानाने हा नवीन चित्रपट कसा आहे हे सांगतो. आणखी एक वेगळा गट त्यातल्या व्यक्तिरेखांच्या ’प्रवासा’वर किंवा चित्रपटातल्या चित्रपटात त्या व्यक्तिरेखांच्या होणार्‍या विकासावर भर देतो. एकूणच जर वेळ जात नसेल, तर हे असले प्रकार करावे लागतात.

लेव्हल क्रमांक २: वरच्या #१ ला जरा खमंग करण्याकरता 'भूमिकेत गहिरे रंग भरले', 'संयत अभिनय', 'अमुकमुळे सुसह्य', 'व्हल्नरेबिलिटी दाखवली', 'तो अमुक पिढीचा प्रतिनिधी आहे' वगैरे छापाची वाक्ये वैचारिक कढईतून तळून त्यात टाकावी लागतात. ती योग्य ठिकाणीच वापरली पाहिजेत असे काही नाही. समीक्षेत आली म्हणजे झाले. आपोआप #१ पेक्षा वरचा दर्जा प्राप्त होतो.

लेव्हल क्रमांक ३: ही तिसरी लेव्हल म्हणजे, चित्रपटातले लॉजिक लोकांना दिसले नाही, तर ते आपणही शोधायचा प्रयत्न करायचा नाही. चित्रपट वाईट आहे हे सरळ घोषित करून टाकायचे. याला मी 'आळशी समीक्षा' असे म्हणीन. सिंघमचे नाव बाजीराव कसे, नायक भरधाव रेल्वेच्या इंजिनापुढे उभा राहून रुळावर आडव्या असलेल्या व्यक्तीला कसा उचलू शकेल, व्हिलनने पकडलेला नायक डायरेक्ट मारून न टाकता आधी बांधून कशाला ठेवावा लागतो, वगैरे प्रश्न आपण न सोडवता तसेच्या तसेच समीक्षणातून पुन्हा विचारणे, वगैरे वगैरे या लेव्हलचे समीक्षक करतात.

लेव्हल क्रमांक ४: चौथी आणि त्यापुढची लेव्हल म्हणजे खरी समीक्षा. माझी लेव्हल चौथी आहे असे मी अभिमानपूर्वक, किंवा खर्‍या मराठीप्रमाणे 'गर्वपूर्वक', सांगू शकतो. लोकांना समजायला अवघड असलेला चित्रपट घेऊन त्यातील लॉजिक लोकांना समजावून सांगण्याचे महत्कार्य या समीक्षेतून होते.

लेव्हल क्रमांक ५: ही सगळ्यांत ग्रेट लेव्हल. यात चित्रपटाशी संबंधित नसलेल्या व अजाण लोक ज्याला पाचकळ म्हणतात अशा कोट्या; कलाकारांवर केलेली वैयक्तिक चेष्टेखोर टीका (’तिच्यासमोर हा बटाट्यासारख्या चेहर्‍याचा xxx’ वगैरे वाक्ये); चित्रपटाशी संबंधित नसलेले विनोद; एक उपमा, मेटॅफोर धरून पुढची अनेक वाक्ये त्याच मेटॅफोरमध्ये लिहिणे (म्हणजे नायिकेला चवळीच्या शेंगेची उपमा देऊन, नायकाला किंवा व्हिलनला त्याच पठडीतली एखादी उपमा देणे. तिथेच अनेक होतकरू समीक्षक थांबतात, आणि पुन्हा मूळ विषयाकडे वळतात. पण खरे थोर समीक्षक तिथेच थांबत नाहीत. त्यापुढे जातात. उदाहरणार्थ नायिकेला चवळीची शेंग म्हटल्यावर, नायक बटाटा, व्हीलन सुरणाचा कांदा, कॅब्रे डान्सर म्हणजे फटाकडी कोलंबी… अशा मंडईविश्वातल्या सुचतील त्या सगळ्या उपमा वापरून वाचकांच्या डोक्याची मंडई केल्याखेरीज ते थांबत नाहीत.); इत्यादी गोष्टींची रेलचेल असते.

ही पाचवी लेव्हल गाठणे हे प्रत्येकाचं अंतिम ध्येय हवं. मी अजून तिथवर पोचलेलो नाही. मला माझ्या मर्यादांची जाणीव आहे. पण इतर समीक्षकांचे लेख वाचून हळूहळू ते जमेल याची मला खातरी आहे.

चिंतातुर जंतू : स्वतःला समीक्षक समजणारे अनेक जालीय लेखक चित्रपटांच्या फक्त कथा उतरवून थांबतात. दृष्टीआड टाकावं असं हे लेखन प्रतिसादखेचक असलं, तरीही तुमच्यासारखी जीवनदृष्टी देणारी साक्षेपी समीक्षा त्यात नसते. विशेषतः तद्दन कलात्मक चित्रपटांची भलावण करून तथाकथित गल्लाभरू चित्रपटांना तुच्छ लेखण्याकडे त्यांचा कल असतो. समीक्षा आणि वास्तव यांच्यातले नातेसंबंध त्यात मोडून पडतात; त्यातून समीक्षा लोकाभिमुख राहत नाही. अशा सुजीर समीक्षेमुळे आणि कोडग्या समीक्षकांमुळे समीक्षा या कलेची अपरिमित हानी होते. या वृत्तीला आळा घालण्यासाठी काय करावं? प्रशासन आणि कायदा पातळीवर काही करावं का? आणि विचारवंतांचं काय?

फारएण्ड : विचारवंतांचं काय काय? काय विचारवंतांचं? आपण सहसा वापरत नसलेले कपडे घालून पन्नास आदिवासी नाचले तर ती लोककला, आणि आपण सहसा वापरत नसलेले कपडे घालून पन्नास एक्स्ट्रॉज्‌ नाचले तर तो मात्र फालतू डान्स काय? हा तद्दन उच्चभ्रू, फसवा युक्तिवाद आहे. 'ज्यात लोक नाचतात ते लोकनृत्य’ या बेसिक व्याख्येवर आपण पुन्हा यायला हवं. जातिवंत 'रोती सूरत’ कलाकार घेऊन अर्धवट अंधारात बनवलेल्या चित्रपटांची 'वाहवा’ करणार्‍या समीक्षकांनीच या कलेची अपरिमित हानी करून ठेवलेली आहे. कारण त्यांनी केलेली तारीफ वाचून लोक चित्रपट बघायला जातात; आणि 'एवढी तारीफ केलेला चित्रपट जर इतका अगम्य असेल, तर बाकीचे काय, बघायलाच नकोत!' असं म्हणून लोक चांगल्या कमर्शियल चित्रपटांच्याही वाट्याला जात नाहीत.

यासाठी सरकार, प्रशासन, एन्जीओज व समाज अशा सर्व पातळ्यांवर उपाय करणं गरजेचं आहे. लहान मुलांना 'बॉटनी छोडेंगे, मॅटिनी देखेंगे, हिस्टरी लेक्चर है, मिस्टरी पिक्चर है' हे गाणं रोज शाळा सुरू व्हायच्या वेळी म्हणायला लावावं. हिस्टरीमध्ये एकदा मेलेला माणूस मेलेलाच राहतो. उलट मिस्टरी पिक्चरमध्ये पहिल्या शोला मेलेला माणूस पुढच्या शोला परत जिवंत होतो. त्यामुळे ते नक्कीच जास्त भारी आहे.

नवीन शोध लावणारे चित्रपट मास्तर लोकांना पाहायला लावून त्या शोधांची वर्गात दखल घ्यायची सक्ती करणं, हाही उपाय करता येण्यासारखा आहे. हे शोध फक्त शास्त्राबद्दलच मर्यादित नाहीत. अनेक विषयांबद्दल आहेत. उदाहरणार्थ:

  • इतिहास: सम्राट अशोकाची इतिहासातली कथा बर्‍यापैकी गंभीर होती. पण त्या काळातल्या स्त्रिया झर्‍याजवळ 'सन सननन सन, सनन सन' अशी गाणी म्हणत ही सनसनाटी-विरहित माहिती आम्हांला त्यातून कधीच कळली नसती.
  • भूगोल: चीनमधून पळून जाताना वाटेत विमानाला अपघात झाला आणि विमान हिमालयात पडले, तर तिथून एका तराफ्यावर तरंगत भारतात येणं शक्य आहे हा 'इंडियाना जोन्स'मधला शोध खैबर खिंड, लुईस व क्लार्क एक्स्पीडिशन यांच्याइतकाच महत्त्वाचा आहे. तसंच वेगासवरून मेक्सिकोला जाताना मध्ये एक रेन फॉरेस्ट लागतं, हाही.

गणिताबद्दलही सांगण्यासारखं बरंच आहे. पण त्याबद्दल आपण स्वतंत्र कधीतरी बोलू.

हे शाळेतल्या विषयांचं झालं. दुसरी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, मध्यंतरी एका विशिष्ट शहरातल्या काही लोकांनी एक वेगळंच फॅड चालू केलं. केवळ जास्त मेहनत घेऊन तयार केलेलं आहे म्हणून ज्या संगीताला उच्च दर्जाचं म्हटलं जातं, त्या संगीताच्या कार्यक्रमाला शालीबिली पांघरून, झब्बेबिब्बे घालून जायचं आणि कार्यक्रमातला जवळजवळ अर्धा वेळ नुसतं खात बसायचं; हे ते फॅड. त्यातून एक वेगळीच वर्णव्यवस्था चालू झाली. ‘मृगनयना रसिक मोहिनी' म्हटलं की श्रेष्ठ; आणि 'ये काली काली आँखे, ये हिरनी जैसी चाल' असं म्हटलं की कनिष्ठ. तर्‍हेवाईक मेकअप करून, लटक्या रागाची पोज घेऊन, स्टेजवर दुसरं कुणीही नसताना निरर्थकपणे पियाला उद्देशून म्हटलेलं, 'जा रे जा रे पिया, तोसे मैं ना बोलू' असं हिंदीसारखं ‘वाटणारं’ गाणं दर्जेदार; आणि 'तेरे प्यार का रस नही चखणा, ओय मखणा' असं समोरच्याला स्पष्टपणे बजावणारी आधुनिक स्त्रीवादी नायिका मात्र फालतू? पंतप्रधानांच्या ’पेशन्स ट्रेनिंग सेंटर’मध्ये कोणत्याही परिस्थितीत जागं राहू शकण्याचं कौशल्य टेस्ट करणारी एक परीक्षा असते. रात्री १० वाजता 'नॅशनल प्रोग्रॅम ऑफ डान्स अ‍ॅण्ड म्युझिक' पाहायचा आणि तो पाहताना पूर्ण वेळ जागं राहायचं, असं त्या परीक्षेचं स्वरूप असतं. ती परीक्षा म्हणजे गाण्याचा खराच कार्यक्रम आहे, असं समजून दूरदर्शन गाण्याचा कार्यक्रम या नावाखाली ती प्रसारित करू लागलं. असल्या प्रकारांमुळेच अभिजात कला मागे पडली.

हे दुरुस्त करायचं असेल, तर लहान मुलांना (आणि मोठ्यांनाही) ‘फूड पिरॅमिड’सारखा एक गानपिरॅमिड शाळाशाळांमधून वाटावा. त्यात 'हे पाहिजे तेवढं खा' या पायरीऐवजी 'हे पाहिजे तेवढं ऐका’ ही पायरी असावी. त्या पायरीवर ही अभिजात चित्रपटगीतं, उदाहरणार्थ, “जंगल में बोली कोयल कुक्कूकू कुक्कूकू... कुकुकूऽऽऽ”, "हाय हुकू हाय हुकू हायहाय, हाय हुकू हाय हुकू हायहाय”, वगैरे असावीत. मग पुढच्या पायरीवर मर्यादित प्रमाणात ऐकण्यासाठी लोकप्रिय समजली गेलेली इतर गाणी असावीत. तरी त्यात चवीला थोडी “लुई शमाशा उई” वगैरे गाणी असावीत. 'हे अधूनमधून क्वचितच खा' या पायरीला समांतर असलेल्या 'अधूनमधूनच ऐका' पायरीवर ती 'पिया तोसे नैना लागे रे' छाप अतिशास्त्रीय गाणी असावीत. म्हणजे लोकांचं कलास्वास्थ्य नीट राहील.

चिंतातुर जंतू : उदारीकरणानंतर इतर सगळ्या कला-साहित्याचं आणि एकंदर मानवी आयुष्याचं भणंगीकरण झाल्याचं चित्र दिसतं. मात्र चित्रपटांमध्ये आणि पर्यायाने चित्रपट-समीक्षेमध्ये, विशेषतः गुंडोत्तर काळात, पडद्यावरच्या वास्तवाचा पोत अधिक भणंग दिसल्यामुळे समीक्षा मात्र अधिक वास्तववादी आणि रेखीव होत जाताना दिसते. हा वारसा पेलणारे ताज्या दमाचे नट, दिग्दर्शक, निर्माते कोण आहेत असं तुम्हांला वाटतं? जुन्या काळातली – गाईडोत्तरी काळातली – कुणाची नावं अजूनही मिरवावीशी वाटतात…

फारएण्ड : एक एक एक मिनिट, मी बोलू का? मुलाखत माझी चालू आहे की तुमची? 'गाईडोत्तर' असा काही काळ होता आणि 'गाईड' हा दुसर्‍या पायरीवरचे समीक्षक मानतात तितका मोठा मापदंड होता यावर माझा अजिबात विश्वास नाही. हवं तर तुम्ही IMDB बघा. तिथेही 'गुंडा' तुलनेनं नवीन असून त्याला 'गाईड' इतकंच रेटिंग देऊन लोकांनी न्याय केलेला आपल्याला दिसतो. तर - गुंडोत्तर काळात एक अतिशय चांगला ट्रेण्ड मला दिसतो. तो म्हणजे सुरुवातीला सोपं लॉजिक असलेले चित्रपट बळंच काढणारे दिग्दर्शक 'पिकले' की मात्र अत्यंत दर्जेदार चित्रपट काढू लागतात. 'कर्ज'सारखे सुरुवातीचे दुर्लक्षणीय चित्रपट सोडले, तर नंतर 'सौदागर', 'परदेस’, 'त्रिमूर्ती', 'युवराज' असे चित्रपट काढून सुभाष घईंनी माझ्यासारख्या समीक्षकांना खूप स्कोप दिला. गुंडोत्तर काळात असे अनेक बदल झाले. रामगोपाल वर्मा अगदी शेवटी शेवटी सुधारला. आधी तो 'सत्या', 'कंपनी', 'शिवा' यांसारखे, साधंसोप्पं लॉजिक असणारे, जे सांगायचं आहे ते सगळं उलगडून सांगणारे, जे दाखवायचं आहे त्याचं प्रतीक शोधण्यासाठी काहीही मेहनत न घेता थेट ती गोष्टच दाखवणारे - थोडक्यात रटाळ - चित्रपट काढत असे. पण या निष्प्रभ यशाच्या पलीकडेही काही आहे याची जाणीव अनेकांना 'गुंडा'मुळे झाली. व्हिलन हा अजागळच दाखवायला पाहिजे, ही 'गुंडा'मधून रामूला उमगलेली ट्रिक. मग 'आग'पासून रामूची जी काही भट्टी जमली, तिला तोड नाही. हॉटेल्समध्ये दाढी करण्याकरता एक आरसा असतो, बघा. त्यात लोकांचे चेहरे जसे दिसतात, तसे चेहरे 'मॅक्रो' मोडमध्ये दाखवणं ही त्यानं नंतरच्या काळात वापरलेली एक कलात्मक ट्रिक. एकच सीन खुर्चीच्या खालून, सीलिंग फॅनवरून किंवा भिंतीच्या बाजूने जाणार्‍या एखाद्या उंदराच्या कोनातून दाखवून त्यानं कमाल केली आहे. जे लॉजिक साध्या कॅमेर्‍यातून दिसत नाही, ते अशा ऑड अँगल्समुळे लगेच सापडतं.

हिमेश रेशमियाचं मात्र तसं नाही. त्याचे चित्रपट सुरुवातीपासूनच तसे असत.

एकूण सध्या चौथ्या पायरी असलेल्या समीक्षकांना फार चांगली संधी आहे. ज्यांना चित्रपट बघून असं लॉजिक-मायनिंग करायचं आहे, त्यांना या क्षेत्रात खूप वाव आहे.

चिंतातुर जंतू : उदारीकरणानंतर व्यावसायिक चित्रपटांनाही काही काळ भणंगीकरण टाळता आलं नाही; पण ते त्यातून सावरले. कलात्मक चित्रपटांच्या बाबतीत हे का घडलं नाही, कलेची जोपासना करणारे आपल्या कार्यक्षेत्रात मागे का पडले?

फारएण्ड : तद्दन कलात्मक सिनेमांचं एक सोपं असतं. जे दाखवायचं आहे ते दाखवायचं. ते कोणी पाहिलं न पाहिलं, तरी काही फरक पडत नाही. अरेच्चा! जे दाखवायचं ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं तर पाहिजे? बरं, पोहोचवायचं, पण इतक्या साध्यासोप्या पद्धतीनं नाही, की एका नजरेत प्रेक्षकाला कळेल. हेच तर खरं चॅलेंज आहे. जे दाखवायचं आहे, ते कुणालाही पैसे देऊन पाहावंसं वाटेल, इतकं इंटरेस्टिंग करणं आणि तरी प्रेक्षकांपर्यंत पोचवणं हे कमर्शियल सिनेमाचं कौशल्य. पण हे कमर्शियल चॅलेंज समांतर सिनेमाने कधी स्वीकारलंच नाही. मध्यंतरी काही कलात्मक सिनेमावाले, काही कमर्शियल सिनेमावाले, काही नाटकवाले आणि काही टीव्ही सिरीयलवाले एकत्र आले होते. एकमेकांची स्तुती करून झाल्यावर नंतर रात्री जेव्हा ’जास्त’ झाली, तेव्हा त्यांतले काही जण एकदम कॅण्डिड मुलाखती देऊ लागले. त्यातल्या एकाने मला कलात्मक आणि कमर्शियल यांच्यामधला फरक फार सुरेख पद्धतीने समजावून सांगितला होता. आपण एकाच स्टोरीतून एक कलात्मक सिनेमा, एक कमर्शियल सिनेमा, एक नाटक व एक टीव्ही सिरीयल कशी बनवली, ते त्याने मला सांगितलं होतं. यांच्याकडून कमर्शियल सिनेमानं शिकलं पाहिजे.

चिंतातुर जंतू : गेल्या वर्षीच्या ’ऐसी अक्षरे’च्या दिवाळी अंकात एका साक्षेपी समीक्षकाने <जाहिरात मोड सुरू> म्हणजे मीच <जाहिरात मोड बंद> हिंदी चित्रपटसृष्टीत इंग्लिश चित्रपटांची नक्कल होते’ असा आरोप केला होता. थोडी सहिष्णुता बाळगून असंही म्हणता येईल, की हिंदी चित्रपट हा भारतीय संस्कृती आणि त्यातली सर्वसमावेशकता यांची जपणूक करतो. तुमचं त्याबद्दल काय मत आहे?

फारएण्ड : पाश्चात्त्य चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपट काळाच्या बरेच पुढे आहेत. काही तथाकथिक आर्ट फिल्म्स पाश्चात्य सिनेमांची नक्कल करतात याची मला कल्पना आहे. उदाहरणार्थ - एक गरीब माणूस घे, त्याचे प्रश्न दाखव व शेवटी ते न सोडवता तसेच ठेव, ही मध्यवर्ती कल्पना असलेले अनेक पाश्चात्त्य चित्रपट होते. त्यातून ही कल्पना ढापून आपल्याकडच्या समांतर सिनेमाच्या लाटेत असे अनेक चित्रपट केले गेले. पण पण हे समांतर दिग्दर्शक प्रेक्षकांना समजतात, तेवढे काही प्रेक्षक मूर्ख नसतात. प्रेक्षक अतिशय चाणाक्ष असतात. ते अशा सिनेमांकडे फिरकलेही नाहीत.

याउलट मेनस्ट्रीम हिंदी चित्रपट. एका शास्त्रज्ञाने लावलेल्या शोधाचा बेसिस वापरून दुसरा शास्त्रज्ञ पुढचा शोध लावतो, तशीच आपल्याकडे पाश्चात्त्य कथा, कल्पना व सीन्स घेऊन त्यांची समृद्ध आवृत्ती तयार केली गेली. याला जर नक्कल म्हणायचं असेल, तर गाडीचा शोध लावणार्‍याने चाकाचा शोध लावणार्‍याची नक्कल केली असं म्हणावे लागेल. उदाहरणार्थ, 'टर्मिनेटर-२'मध्ये तो एलियन स्वतःची रूपं कशीही बदलतो. फरशीच्या कव्हरमधून उठून एलियन उभा राहतो हा त्यातला मूळ शोध. मग त्यापासून आपल्याकडे भुतांपासून ('जानी दुश्मन'. नवा.) अनेक अमानवी व्यक्तिरेखांपर्यंत ते तंत्र विकसित केलं गेलं. माणूस हवेत तरंगत वरच्या वर वळू शकतो व हवेचाच सपोर्ट घेऊन फाईट मारू शकतो हे 'मेट्रिक्स'मध्ये शोधलं गेल्याचाच अवकाश, लगेच तो शोध पुढे नेऊन आपल्याकडचा मुख्यमंत्रीसुद्धा तशी मारामारी करू शकतो (पाहा: 'नायक'). 'कॅट पीपल'मध्ये फक्त वाघ आहे, इतर अनेक चित्रपटांत फक्त भुतं आहेत. पण 'जुनून'मध्ये वाघाचं भूत करून त्याची पुढची आवृत्ती निर्माण केलेली आहे. याचं श्रेय द्यायचं सोडून हिंदी चित्रपटांवर नक्कल केल्याचा आरोप केला जातो, हे मेलोड्रामा करून निषेध नोंदवण्याएवढं खेदजनक आहे.

चिंतातुर जंतू : आजच्या बहुतांश पुरुषप्रेक्षकांत आणि काही प्रमाणात आधुनिक स्त्रीप्रेक्षकांत अमेरिकन संकटपटाला काही प्रमाणात लोकप्रियता आहे. हा तुमचाही आवडता जाँर (genre) आहे, असं म्हणता येईल का? हेच वेगळ्या शब्दांत मांडायचं झालं, तर हिंदी चित्रपटसृष्टी वयात येण्यामागे अमेरिकन संकटपटांची महत्त्वाची भूमिका आहे, असं तुम्ही म्हणाल का?

फारएण्ड : नाही, असंच काही नाही. दोघांनीही एकमेकांपासून शिकण्यासारखे खूप आहे. आपण त्यांच्याकडून हॉरर कथा घेतली असली, तर त्यांनी आपल्याकडून ठळकपणे दिसणारे भावभावनांचे कंगोरे घ्यावेत. आपल्या चित्रपटातल्या भुताच्या मेकअपमधूनही आतला माणूस स्वच्छ दिसतो, ते फसलेल्या कॉश्च्यूममुळे नव्हे. भूतसुद्धा आतून एक माणूसच असतं व त्यालाही भावभावना असतात हे आपले चित्रपट शिकवतात. तसंच बॅटरी संपत आलेल्या रोबोप्रमाणे हात हलवत व 'खिस्स-फिस्स' असे वैशिष्ट्यपूर्ण आवाज काढत ८-१० फूट अंतर जायलाही भूत कधीकधी बराच वेळ लावतं, तर कधी हातात दिवा घेऊन हवेलीच्या या बाजूला गाण्याची एक ओळ म्हणतं आणि हीरो त्या बाजूला गेला, की लग्गेच हवेलीच्या त्या बाजूने गाण्याची पुढची ओळ म्हणू शकतं. या तंत्राचा नीट अभ्यास करून अडचणींवर कशी मात करावी हेही त्यांनी आपल्याकडून शिकावं.

तांत्रिक गोष्टींचा वापर स्वतःला वाचवण्यासाठी कसा करावा हे आपण त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. उदाहरणार्थ, 'टेक' हा चित्रपट. संकट येणार असलं, तर त्यात अडकलेल्या प्रमुख व्यक्तींच्या घरातील लहान मुलं नक्की हॅकर्स असतात व ती सर्वांना संकटातून सहज सोडवू शकतात, ही माहिती बहुमोलाची आहे. तसंच इंग्रजी चित्रपटांमध्ये उगाचच शास्त्रीय प्रयोग केले जातात आणि त्यातून अचाट म्युटेटेड प्राणी निर्माण होतात, ही माहितीसुद्धा. त्यामुळे पाश्चात्यांना प्रयोग करू द्यावेत हेच चांगलं. उगाच शोधाबिधांचं पाश्चात्त्य फॅड आपल्याकडे नको.

हां, एक मात्र आहे. जिथे आपला संबंध नाही, तिथे नाक खुपसायला जाऊ नये. एलिअन्स पृथ्वीवर उतरले, तर ते अमेरिकेतच उतरतात, गॉडझिला आला तर न्यू यॉर्कमध्येच येतो, शार्क्सचा पाऊस एल.ए.मध्येच पडतो. ते भारतात काही येत नाहीत. मग आपण उगाच त्यांच्यावर पिक्चरबिक्चर काढून त्यांच्या वाटेला कशाला जायचं?

चिंतातुर जंतू : खरंतर माझी जिज्ञासा आणि ज्ञानपिपासा आता भागलेली आहे. पण दिवाळी अंक अधिक खपावा म्हणून, रंजनलोलुप लोकांना काही फुटकळ करमणूकही हवी असते म्हणून, काही रॅपिड फायर उर्फ बहुपर्यायी प्रश्न:

१. आवडता हिंदी नट - धर्मेंद्र, का जितेंद्र?
मिथुन चक्रवर्ती. सायकलच्या मागे 'लपण्या'पासून ते गोळीने ब्रेन ट्यूमर काढून टाकण्यापर्यंत अनेक कौशल्यं आत्मसात केलेला. रजनी - क्लोज सेकण्ड.

२. आवडती हिंदी नटी - जयाप्रदा, का हेमामालिनी?
पूजा भट. लग्नाच्या पहिल्याच रात्री "घुटन सी हो रही है" म्हणून बाहेर निघून जाणार्‍या नवर्‍याला स्वतःची एक स्पेस हवी हे ओळखणारी चाणाक्ष व्यक्ती. रिस्पेक्ट.

३. आवडता हिंदी दिग्दर्शक - के. राघवेंद्र राव, का चंपक जैन?
प्रत्येक दिग्दर्शक कधी ना कधी आवडणार्‍या कॅटेगरीत आलेला आहे. पण समीक्षेयोग्य माल पुरवण्याच्या बाबतीत सुभाष घईंचा हात धरणारा व, मनोज कुमारने स्वतःच्या तोंडावरून काढला तर, त्याचा हात धरणारा दुसरा कोणीही नसेल.

४. आवडता हिंदी चित्रपट - 'द बर्निंग ट्रेन', का 'क्रांती'?
'परदेस' पहिल्या १ ते १० मध्ये. मग 'तिरंगा', 'फरिश्ते', 'क्रांती', 'ओम जय जगदीश', याच क्रमाने.

५. आवडता समीक्षक - कणेकर का फारएण्ड?
चित्रपट पाहून ताबडतोब सोशल साईट्सवर त्याबद्दल घाईघाईत लिहिणारा कोणीही.

६. आवडता साउंड इफेक्ट - ढिशुम, का ढिशक्यँव?
'तिरंगा'मधली राजकुमारची एण्ट्री. त्या सीनमध्ये उपस्थित लोक मागे पाहतात ते केवळ साउंड इफेक्टमुळे. त्यांनी मागे पाहण्यासारखं सीनमध्ये काहीच घडलेलं नसतं. एवढी पॉवर असलेला साउंट इफेक्ट माझा फेवरिट असल्यास काय आश्चर्य!

७. आवडतं वाक्य - 'मेरे पास माँ है', का एखादं राखी-बहीण-भाऊ-वाक्य?
"बाँध दो इसे" हे वाक्य. हीरोची आई, बहीण, प्रेयसी, आजोबा, इत्यादी लोक, जे मोकळे सोडले तरी काही करू शकणार नाहीत, त्यांनाच का बांधून ठेवतात हे लॉजिक खालच्या पायरीवरच्या समीक्षकांना कळत नाही. पण हे वाक्य सर्वांत अर्थपूर्ण असतं. नायक व नायिका दोघे मोकळे असले, तर ते ज्या पद्धतीने अचकट-विचकट नृत्य करतात त्याचा वीट येऊन व्हिलनने ते म्हटलेलं असतं.

८. आवडता हिरोचा छळप्रकार - बापाला बदनाम करणे, का बहिणीवर बलात्कार?
हीरोपेक्षाही माठ दिसणार्‍या व्यक्तीबरोबर हीरॉइनचं लग्न ठरल्याचं जाहीर करून त्याच मैफिलीत त्याला गायला लावणे.

९. आवडती अाई - निरूपा राॅय, का निरूपा राॅय?
राखी. मुले मोठी होऊन बदलाक्षम होईपर्यंत व्हिलनने आपल्याला (आपल्याला म्हणजे तिला. आपल्याला नाही.) त्रास देऊ नये, म्हणून भेटेल त्याला बोअर करणे हा क्रांतिकारक उपाय तिने शोधून काढला.

१०. आवडता स्पेशल इफेक्ट: एकाच्या जागी सात चेहेरे दिसणं, का आकाशातून देवाने विजेचा लोळ पाठवणं?
सुपरमॅन व बॅटवूमन एकत्र गाणं गात आकाशातून विहार करत आहेत हा.

११. आवडतं खलनायकाचं नाव - अजगर जुर्राट, का दुर्जनसिंह?
बहुतेक दादा कोंडक्यांच्या एका चित्रपटात डाकूंच्या टोळीमधल्या डाकूंची आडनावे 'जोशी', 'कुलकर्णी' वगैरे होती, ते मला प्रचंड आवडलं होतं. क्लोज सेकण्ड, तात्या विंचू.

चिंतातुर जंतू : तुम्ही व्यक्त केलेले हे विचार चांगलेच चिंतनीय आहेत. आंतरजालावरच्याच नाही, तर छापील माध्यमांमध्येदेखील (उगीचच) लोकप्रिय आणि रसिकप्रिय होऊन बसलेले अनेक चित्रपटसमीक्षक आता खडबडून जागे होतील आणि तुमच्या ह्या महनीय विचारांच्या मननाअंती आपापल्या निर्मितिप्रक्रिया तपासून पाहतील असा अतीव विश्वास मला आता वाटतो आहे. चित्रपटसमीक्षेच्या इतिहासात अशा रीतीनं ह्या ठिकाणी एक मैलाचा दगड ठोकून दिल्याबद्दल आणि तुमच्या ह्या हृद्य प्रवासाशी आम्हांला जोडून घेतल्याबद्दल मी 'ऐसी अक्षरे'तर्फे आपला जन्मोजन्मीचा ऋणी आहे. (स्वगत : अरे कुणी पाणी देता का पाणी? नको, नको, त्यापेक्षा हुंगायला कांदाच आणा, माझी शुद्ध हरपते आहे… Déjà sa dernière expression écrite cassait pas des briques, mais celle-ci, elle est carrément nulle à chier!)

हुच्चभ्रू विचारजंती समीक्षक : यांचे परिप्रेक्ष्यच वेगळे!

चित्रकल्पना व रेखाटन - अमुक

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

field_vote: 
4.833335
Your rating: None Average: 4.8 (12 votes)

प्रतिक्रिया

ह्या अशा खर्याखुर्या समीक्षकाची मुलाखत घेणं ही काळाची गरज होय. चित्रपटांचे हे पैलू उलगडून दाखवल्याबद्दल फारएण्डाला धन्यवाद.
(तेवढ्या लिंका मात्र गंडल्या आहेत..)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला एक फार मोठी उत्सुकता वाटते की फारएन्ड हे रामसे बंधुंच्या हिंदी चित्रपटांचे विश्लेषण कसे करतील ? अनेक चित्रपट डोळ्यासमोर तरळत आहेत व मनातल्या मनात तुलना करतोय की फारएन्ड होते तो क्या कहते ? फारएन्ड होते तो क्या सोचते ? फारएन्ड होते तो इस फिल्म की और कैसा देखते ? ( म्हणजे आहे त च फारएन्ड आपल्यात मला तसे काही सुचवायचे नाही) काही हिंदी चित्रपटातील साच्यांविषयी लिहण्याची बरेच दिवस इच्छा होती जसे करण जौहरी साचा, पालेकरी साचा, सत्त्तरी साचा, भट्टी साचा पण हा लेख वाचल्या नंतर दिल के अरमॉ आसुओमे(खुशी के) बह गये. इतक्या प्रखर समीक्षासुर्या समोर मज सारख्या काजव्याने काही लिहु लिहु म्हटले तरी लेखणी धजत नाही.
आता तुम्हीच असा एक प्रकल्प घ्यावा अशी विनंती
आणि एक आपण एकदा तरी कृपया रामसे बंधुंच्या चित्रपटांवर लिहीण्याचा विचार करावा ही कळ कळी ची आग्रहा ची नम्र विनंती, कारण ही काळाची गरज आहे. कारण रामसेंच्या अनेक अभिजात हिंदी चित्रपटांना समीक्षकीय लॉबींनी अनुल्लेखाने मारलेले आहे त्यांना आपण पुन्हा जिवंत करावे.
लेख अतिशय आवडला अप्रतिम लेख !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही ते साच्यांचे वर्णन केलेले आहे ते इंटरेस्टिंग दिसते. लिहाच त्याबद्दल. आम्हाला वाचायला आवडेल. तुम्ही म्हणता तसे साचे नक्कीच आहेत (कदाचित नवीन २०० कोटी वाल्या पिक्चरचा साचा, मराठी अतिकलात्मक चित्रपट साचा असेही असतील Smile ), त्यामुळे मजा येइल वाचायला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारएण्डचा निषेध. निरुपा रॉयला सर्वश्रेष्ठ आई न ठरवण्याबद्दल त्याचा कचकून निषेध.

(अस्वला, आभार. लिंका दुरुस्त केल्या आहेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा हा हा! भारी! आवडत्या दिग्दर्शकात कांती शहाचा ऑपश्न नाही हे पाहून वाईट वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

खपलो हसुन हसुन. फार एन्ड याना मनापासुन धन्यवाद : )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

तु हु फा हा न ह!!!

प्रश्न नी त्यांची उत्तर सगळेच कहर आहे! अमुक यांची अर्कचित्रेतर क्या कहने!
जंतू आणि फारेण्ड हे कॉम्बिनेशन कसलं खत्तरनाके!
दिन बन गया! Smile

फारेण्ड यांनी चित्रपटसमीक्षेत आपला असा खास विधा तथा जॉनर निर्माण केलाय! आपली भुमिका इतकी छान मांडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन नी आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ROFL :D> मस्तच खुसखुशित सुरुवात दिवाळीची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ. हा घरातला माऊस शिंचा बललायला हवाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हसून हसून खपल्या गेले आहे ROFL ROFL ROFL ROFL _/\_

तेवढं ते डोरियन ग्रे मध्ये बर्नार्ड शॉ न्हवे तर ऑस्कर वाईल्ड पायजे फक्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बट्टमण्णराय, विचारवंत समीक्षकांना कुठले तुमच्याआमच्याएवढे अचूक रेफ्रन्स ठाऊक असायला? तोंडाला येईल ते ठोकून देतात अहो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शालजोडीतला मारायचा तर बूट दिसता कामा नये. इथे सरळ सरळ दाखवून मारता की ओ ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोण म्हणालं तुम्हांला, बूट लपवायचावता म्हणून?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ळॉळ. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नव्हे, चकलात.
बर्नार्ड शाॅचे "प्राईड यांड प्रेज्युडिस" हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा ROFL

रैट्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गांधी म्हणालेच होते - what's in a name? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“We all know what to do, we just don’t know how to get re-elected after we’ve done it.” Jean-Claude Juncker

मराठी माणूस इथेच मागे पडतो. त्या प्रश्नातल्या चुका काढत रहा, उत्तरं वाचू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ROFL भन्नाट आहे हे!
अमुकने काढलेली अर्कचित्रेपण मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडता प्रश्न - ढिशुम की ढिशक्याओ? Smile
निव्वळ थोर मुलाखत. हसून हसून दमले.
"सर्वस्नायुसम्राट" हे नाव भयानक आवडले.
फारएण्ड, माझी खूप दिवसांपासून फरमाइश आहे - हुच्चभ्रू मराठी सिनेमांवर खास लेख येऊ द्यात. "समांतर पाहिलायत की नाही? त्यातील लॉजिक समजावून सांगायची तातडीने गरज आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हसून हसून पुरेवाट झाली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

आवडता समीक्षक - कणेकर का फारएण्ड?
चित्रपट पाहून ताबडतोब सोशल साईट्सवर त्याबद्दल घाईघाईत लिहिणारा कोणीही.

ROFL
_____________

मनोज कुमारने स्वतःच्या तोंडावरून काढला तर, त्याचा हात धरणारा दुसरा कोणीही नसेल.

ROFL
______________
त्या 'नमस्कार नमस्कार" पासूनच अगदी औपचारीक आव आणलाय अन आतून चाललीये मिष्कीली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाय नाय, तुमची चित्रपटाची समिक्षा अधिक भन्नाट असते, हि मुलाखत फारशी जमली नाही.

Déjà sa dernière expression écrite cassait pas des briques, mais celle-ci, elle est carrément nulle à chier!

रिअली? चिंतातुर जंतू?

मुलाखत आवडली नसली तरी फारएन्डा तुमच्यासाठी खालच्या लायनी -

In many ways, the work of a critic is easy. We risk very little, yet enjoy a position over those who offer up their work and their selves to our judgment. We thrive on negative criticism, which is fun to write and to read. But the bitter truth we critics must face is that, in the grand scheme of things, the average piece of junk is probably more meaningful than our criticism designating it so. But there are times when a critic truly risks something, and that is in the discovery and defense of the new.
-Anton Ego

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रिअली? चिंतातुर जंतू?

या समीक्षकांना नुस्ती शाईन मारायची असते हो, फ्रेंच-व्याकरण वगैरे काही येत नाही आणि फक्त चोप्य-पस्तेगिरी करतात. स्त्रिलिंगी का पुल्लिंगी शब्द आहे न पाहता वापरून टाकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ROFL
मस्त! मजा आली. चित्रं पण भारी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सलाम, सलाम.... अक्षरशा: कोटी कोटी सलाम … हे फ़ारच अफ़ाट आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिश्कील मुलाखत. भारीच !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलाखत फारच आवडली,

जे लॉजिक साध्या कॅमेर्यातून दिसत नाही, ते अशा ऑड अँगल्समुळे लगेच सापडतं.

असे आयकॉनिक उत्तरे देणार्या फारएन्ड बरोबरच 'सर्वस्नायूसम्राट', 'गुंडोत्तर काळ' वगैरे शेलक्या संज्ञा देणार्या चिंतातूर जंतूंचेही आभार.

पण फारएन्डना अजून काही प्रश्न विचारायचे होते पण कोणत्याही उच्चभ्रू समिक्षकांप्रमाणे ते सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात असा अनुभव आहे पण तरी विचारून घेते,

१) तुमच्या शैलीवरची तुमची पकड आणि तुमचा तुमच्या विषयातला प्रचंड अभ्यास लक्षात घेऊन अनेक लोक तुम्हाला वेगवेगळ्या चित्रपटांवर समीक्षा लिहायला सांगतात (जसे इथेच रोचना यांनी 'समांतर' या अतिशय महत्वाच्या चित्रपटाची सुचवणी केलीय) त्याकडे तुम्ही दुर्लक्ष का करता? आपण सामान्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा केला तर रंजनलोलुप जनतेसाठी लिहिणारा सेलआउट अशी आपली संभावना होईल अशी भिती आपल्याला वाटते काय? की प्रेरणा आतून मिळाल्याशिवाय लिहायचे नाही असा शिरस्ता आहे?
२) एखादा सिनेमा "फारएन्ड बरोबर पाहिला असता किंवा त्यांनी त्यावर लिहिलं असतं तर समजला असता आणि त्याचा खरा आनंद घेता आला असता" अशी जी काही लोकांची समजूत असते त्याला तुम्ही विभूतीपूजा म्हणाल की सगळं काही रेडीमेड मिळवू पहाणारी मानसिकता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादा सिनेमा "फारएन्ड बरोबर पाहिला असता किंवा त्यांनी त्यावर लिहिलं असतं तर समजला असता आणि त्याचा खरा आनंद घेता आला असता" अशी जी काही लोकांची समजूत असते त्याला तुम्ही विभूतीपूजा म्हणाल की सगळं काही रेडीमेड मिळवू पहाणारी मानसिकता?

ROFL

आमच्या लाडक्या रुची यासुद्धा लवकरच जालावर नाव काढणार याची चिन्हं दिसायला लागली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपण सामान्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा केला तर रंजनलोलुप जनतेसाठी लिहिणारा सेलआउट अशी आपली संभावना होईल अशी भिती आपल्याला वाटते काय? की प्रेरणा आतून मिळाल्याशिवाय लिहायचे नाही असा शिरस्ता आहे?

मुलाखतकार म्हणून पुढच्या वेळेस रुची ला नेमण्यात याचे अशी आमच्याकडून जोरात मागणी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज हापिसातल्या सर्व कामुक जंतुंनी मला वेडा ठरवले असेल, पण त्यांनातरी कसे सांगू की स्वतःला चिंतातुर जंतू म्हणवणारे महाभाग आणि फारएण्ड नावाचे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ समीक्षक एकत्र येतात तेव्हा वेडे होणे किंवा लोकांनी वेडा ठरवण्याइतपत एकटेच हासत राहणे हेच नशीबी असते Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून सगळा दिवाळी अंक हाती लागायचा आहे. इतक्यात निकाल जाहीर करणं खरं नव्हे. पण हा लेख या दिवाळी अंकाचा मुकुटमणी का काय तो आहे, असं मी तरीही घायकुतेपणानं जाहीर करून टाकतेय. किती जणांना फॉर्वर्ड केला, किती जणांना वाचून दाखवला, अनेक वार वाचला, तरी त्यातली गंमत कमी व्हायला तयार नाही!

चष्म्याच्या काचेवरून रागारागानं रोखून बघणारे जंतू आणि उत्तरागणिक त्यांची विकेट घेणारा फारएण्ड डोळ्यांसमोर येऊन येऊन हसू येत राहिलं. त्यात आणि अमुकच्या चित्रांची भर.

बादवे अमुक, तुझ्या फारएण्डाच्या गालात तंबाखूची गोळी सारलेली आहेसं वाटतंय! आहे का खरंच?

आणि सगळ्यांत महत्त्वाचं: उत्सवमूर्ती फारएण्डराव आहेत कुठे? त्यांनी एकदा येऊन दर्शनतरी देऊन जावं की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

काय ते वाचताना धाप लागणारे प्रश्न, त्यांची महान..... उत्तरे, आणि 'अमुक'ची रेखाटनं. चार वेळा वाचला तरी प्रत्येक वेळेला तेवढंच हसतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद लोकहो. जबरी प्रतिसादाबद्दल! मजा आली. मेघना - तुला आणखी धन्यवाद. मात्र लेख आल्यानंतर निदान काही दिवस लोकांना प्रतिक्रिया देउ द्याव्यात. नाहीतर मग दर चांगल्या प्रतिक्रियेवर "आभार" व टीकात्मक प्रतिक्रियेवर आपला लेख 'डिफेन्ड' करणे करण्यात काय अर्थ आहे? म्हणून Smile गेले २-३ दिवस फक्त वाचून जात होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकहो, वेळ मिळेल तेव्हा लिन्क्सवरच्या क्लिप्सही आवर्जून पाहा. बरीच मेहनत घेऊन, शोधून, त्यातील हव्या त्या सीनला "पॉइंट" करून दिलेल्या आहेत. यू ट्यूब मधे जाहिरात पाहायला लावेल आधी, पण तेवढा पेशन्स ठेवलात तर क्लिप तुमची निराशा नक्कीच करणार नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुपरमॅन-बॅटवूमन ही क्लिप दिली नसती तर हा माणूस थापा मारतोय असं वाटलं असतं मला...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थापेमध्ये माझ्या कल्पनेची भरारी त्यांच्या भरारीएवढी गेली नसती. सत्य हे कल्पनेपेक्षा कधीकधी थरारक असते असे म्हणतात. पण हिन्दी चित्रपटातील अनेक सीन हे सत्य, थापा व कल्पना या सर्वांपेक्षा थरारक असतात, हे आता पटावे. (या सगळ्या गोंधळात समीक्षेत आवश्यक असणारा "पटावे" हा-भावे की काय म्हणतात तोच असावा- प्रयोग राहिला होता. तो वापरायची संधी मिळाली).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय. तुमच्या आमच्याथापेहून हे शिनुमे हुच्चच असतात.(लिंका अजून पाहिल्या नाहित)
परवा चेपुवर एक विडियो फिरत होता.
विडियो मध्ये हिरो - व्हिलनची मारामारी सुरु असते. व्हिलन हिरोला कोणते तरी हार्ट
ट्रान्सप्लांटला लागणारे हृदय रुग्णालयात नेण्यापासून अडवत असतो.
मग हिरो काय करतो ?
खालून जोर्रात ते हृदय रुग्णालयाच्या काचेच्या भिंतीवर फेकून.
हृदय बहुदा पोलादी माणसाचं असावं. ते बरोब्बर ती काच फोडून आत शिरतं आणि
बरोब्बर ज्याचं ऑपरेशन सुरु आहे त्याच्या हृदयाच्या जागी जाउन बसतं!
हाकानाका.
.
.
अजून एक विडियो.(हा भुतेक तुम्हीच पूर्वी दिला होतात)
अशोक कुमार हा वृद्ध स्वातंत्रय्सैनि आजारी आहे. डो़टर उपलब्ध नाहियेत.
तो काही काळात गचकणार आहे. अशोक कुमारचा मुलगा मनोज कुमार "कदम कदम बढाये जा"
हे गाणे लावतो; आणि हे बुढऊ ताडकन् उठून बसतात की राव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अशोक कुमारचा व्हिडो नंद्यानं शेअर केला होता. (मला अजुनी तो दिवस आठवतो... मी तो व्हिडो पाहिला आणि नंतर सुमारे तास-दीड तास मी एकटीच बावळटासारखी हसत बसत असले होते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हॉय रे हॉय. मी पाहिल्यात सगळ्या क्लिपा. आधी लेख वाचून प्रभावित झाले नसते, तर क्लिपा बघून केवळ तुझ्या अभ्यासानं नक्की भारावले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

फारएंडा, गंमतीशीर मुलाखत आहे. पण खरी गंमत परदेसचं रसग्रहण वाचण्यात आहे ! :-):-)

मेघना, वाचलं नव्हतं हे आधी. लिंकबद्दल परत एकदा धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

आमच्या गुरुवर्यांची मुलाखत याचि डोळा वाचता आल्याने , ते म्हणजे गदिमा आणि मी म्हणजे जगदीश खेबुडकर, असा भास होऊ लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महान! ती स्पाय्डरवूमन आहे बॅटवुमन नाही, बाय द वे. बॅट्याला राग येईल हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.

पण आमची ही म्हणजे कॅटवुमन आहे, बॅटवुमन नाही.

बॅटवुमन म्हणजे आमच्यावरनं इन्स्पायर होऊन आमच्यागतच राडे करणारी म्हैला. तिचा आमच्याशी तादृश संबंध नाही.

http://en.wikipedia.org/wiki/Batwoman

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जबरा!!!!

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

चिंतातुर जंतुंनी खरंच कॉन्ट्रिब्युट केलंय का या मुलाखतीसाठी? मला तर चिंतातुर जंतूंचीही रेवडी उडवल्यासारखे वाटले. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असंच, आटवन झाली म्हणून!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

फारएण्ड, बरेच दिवस झाले. 'समांतर'बद्दलही काही लिहिलेलं नाहीत. जरा मनावर घ्या बघू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भन्नाट म्ह्णून एकेक वाक्य काढायला सुरूवात केली, मग कळले जवळजवळ सगळीच मुलाखत उतरवावी लागेल. जबरदस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुन्हा धन्यवाद. आदिती - समांतर बघतो लौकरच.

बाय द वे, रॅपिड फायर मधल्या #२ मधला "घुटन सी हो रही है" म्हणून हनीमूनच्या रात्री बाहेर जाणारा राहुल रॉय व तो तसा अस्वस्थ अवस्थेत बाहेर जात असताना त्याच्या सोबत जाण्यापेक्षा त्याला स्वतःची स्पेस हवी आहे हे जाणून जाउ देणारी पूजा भट, सापडली :). स्पॉईलर देतो, कारण मधेच तो वाघ का दिसतो असा तुम्हाला प्रश्न पडेल - तर ती बहुधा पौर्णिमेची रात्र असते, आणि... पुढचे लिहायलाच हवे का? Smile
https://www.youtube.com/watch?v=HPfLgKyXFHs&t=1h0m45s

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0