अमेरिकेतील चळवळी : धागे उभे-आडवे, आडवे-तिडवे

अमेरिकेतील चळवळी : धागे उभे-आडवे, आडवे-तिडवे

लेखक - धनंजय

पुरोगामी अशा नावाची कोणतीही एकसंध विचारसरणी नसते. कित्येकदा त्यातील वेगवेगळे धागे घट्ट, मजबूत उभ्या-आडव्या विणीऐवजी आडवे-तिडवे गुंततात. उदाहरणार्थ, समलिंगी लोक, स्त्रिया आणि अल्पसंख्याक वंश यांच्या हक्कांसाठीच्या तिन्ही चळवळी पुरोगामी मानल्या जातात, तरी (यू. एस.) अमेरिकेच्या इतिहासात या चळवळींमध्ये आपसांतील कलहांचे आणि समेटींचे गुंतागुंतीचे राजकारण दिसते.

ताज्या घडामोडींपैकी काही बघूया: ‘समलिंगी विवाहास मान्यता’ हा नागरी कायद्यांमधील बदल २००० सालानंतर अमेरिकेत मोठ्याच झपाट्याने होत आहे. या झपाट्यातही टप्पे आहेत: शतकाच्या पहिल्या दशकात जी काय मान्यता मिळाली, ती न्यायालयात मिळाली, विधिमंडळांत किंवा सार्वजनिक निवडणुकांत नव्हे. या काळात कितीतरी राज्यस्तरीय निवडणुकांमध्ये बहुमताने समलिंगी विवाहनोंदणीच्या विरोधात निकाल लागले होते. म्हणूनच २०१२ साली जेव्हा अनेक राज्यांत लोकांनी समलिंगी विवाहांना बहुमताने मान्यता दिली, तेव्हा ती नव्या पर्वाची सुरूवात होती. ही राज्ये सामाजिकदृष्ट्या पुरोगामी कलाची होती हे खरे आहे, परंतु त्यापूर्वी २००८ च्या निवडणुकांत पुरोगामी कलाच्या कॅलिफोर्निया राज्यात मतदारांचे बहुमत समलिंगी विवाहाच्या विरोधात आले होते.

कोणी म्हणेल, की या तपशिलांत उगाच का घुटमळावे? एकूणच गेल्या काही दशकांत समलिंगी संबंधांबाबत तरुण पिढीमध्ये समर्थन वाढत चालले आहे. आधीची पिढी अस्तंगत होत चालली आहे, त्याचे परिणाम दिसणारच. समलिंगी विवाहांचे समर्थन आधी अल्पमतात असणार आणि नंतर कधीतरी बहुमतात असणार. हे खरे असले, तरी २००८ सालची कॅलिफोर्निया राज्यातली निवडणूक लक्ष देण्यालायक आहे. कारण २००८ पर्यंत कॅलिफोर्नियात सर्वेक्षणांमध्ये बहुमत समलिंगी विवाहाच्या बाजूने झाले होते, तरी निवडणुकीचा निकाल मात्र उलट दिशेला गेला. हे कसे झाले?

कॅलिफोर्नियामधील ही निवडणूक समजण्याइतपत त्रोटक पार्श्वभूमी अशी: समलिंगी विवाहाच्या समर्थनासाठी केलेली छोटेखानी चळवळ जशी बातम्यांमध्ये येऊ लागली, तसा पुराणमतवादी आणि धर्मकर्मठवादी लोकांनी विरोधही चालू केला. जर राज्याच्या नागरी संहितेत समलिंगी विवाहाविरुद्ध सुस्पष्ट शब्दांत कायदे नसले, तर तसे कायदे पारित केले जाऊ लागले. २००० सालच्या निवडणुकांमध्ये कॅलिफोर्नियात जनमताने असा कायदा संमत झाला. परंतु समलिंगी लोकांच्या हक्कांचे समर्थन करणार्‍या सान फ्रान्सिस्को शहराच्या महापौराने २००४ साली ठरवले, की आपल्या शहरातील कार्यवाहीकरिता हा राज्यस्तरीय कायदा लागू नाही. तत्कालीन महापौर गॅविन न्यूसम याच्या मते कॅलिफोर्निया राज्याच्या घटनेतल्या मूलभूत समान हक्कांमुळे हा २००० सालचा कायदा घटनाविरोधामुळे जात्याच रद्द होता. तसे ठरवून महापौराने शहराच्या आखत्यारीत समलिंगी जोडप्यांकरिता विवाहाची नोंदणी खुली केली. या विवाहनोंदणी धोरणाविरुद्ध राज्यस्तरीय कोर्टात खटला दाखल झाला, आणि मजल दरमजल करत २००८च्या मे महिन्यात राज्यातील उच्च न्यायालयाने हा कायदा राज्यघटनेशी सुसंगत नसल्याचा निकाल देत कायदा रद्द केला. कॅलिफोर्नियात जनमताने कायदेच नव्हेत तर घटनादुरुस्तीदेखील करता येते, म्हणून २००८ सालच्या नोव्हेंबरमधील निवडणुकांत समलिंगी विवाहांना प्रतिबंध करणारी राज्यस्तरीय घटनेतील थेट दुरुस्तीच जनमताकरिता ठेवली गेली. मात्र २००० साल वेगळे, आणि २००८चे वातावरण वेगळे: या पुरोगामी राज्यातील बरेच लोक, जे आधी तटस्थ किंवा किंचित विरोधात होते, ते आतापर्यंत समलिंगी विवाहांच्या बाजूला कलले होते. सर्वेक्षणांत किंचित बहुमतही दिसत होते. तर मग निवडणुकीत काय झाले?

सर्वेक्षणात बहुमत, निवडणुकीत मात्र अल्पमत, याचे कारण म्हणजे बराक ओबामाची उमेदवारी, आणि तदनुषंगाने कृष्णवर्णीय मतदारांना वाटणारा जोश होय. एरव्ही कृष्णवर्णीय लोक आणि कृष्णवर्णीय धार्मिक पंथ हे पुरोगामी धोरणांच्या समर्थनात असतात, परंतु हा समाज पुरोगामी समलिंगी हक्कांच्या विरोधात कसा, याचे स्पष्टीकरण गुंतागुंतीचे आहे. कृष्णवर्णीयांवर अमेरिकेत अन्याय झाला हा एक ऐतिहासिक भाग, आणि कृष्णवर्णीय समाज हा नैतिक अधःपतन झालेला आहे हे रूढ झालेले मत, हा दुसरा भाग. अमेरिकन समाजमनातील या दोन विसंवादी घटकांच्या मिश्रणाची सांगड कृष्णवर्णीय कार्यकर्ते अशी घालतात: जर अन्यायामुळे कुटुंबांची वाताहात झाली असेल, तर परिणामस्वरूप काहींचा नैतिक अधःपात झाला असेल - ही तर अगतिकता झाली; पण वंशद्वेष बाजूला केला, तर मात्र आम्ही नैतिक मुद्द्यांबाबत कमालीचे कर्मठ आहोत. इतकेच काय, कृष्णवर्णीय धार्मिक पंथांच्या धुरिणांच्या मते स्वेच्छेने, स्वैर, धर्मविरुद्ध, अनैतिक लैंगिक आचार ही श्रीमंत गौरवर्णीयांची ऐशखोरी आहे. आणि एकदा का एखाद्या मागणीला अनैतिक स्वैराचार म्हटले, की त्या मागणीला हक्क मानणे अशक्य होते.

सामान्यपणे पुरोगामी कृष्णवर्णीय मतांमधील हा प्रमुख प्रवाह समजला की जनमतात झालेली वजाबाकी स्पष्ट होते. आता व्यक्तिशः बराक ओबामा हा उमेदवार समलिंगी हक्कांबद्दल सहानुभूती राखून होता. परंतु त्याला फक्त पुरोगामी कॅलिफोर्नियात नव्हे, तर धर्मकर्मठ बहुमताच्या अन्य राज्यांतही निवडणूक लढवायची होती. उमेदवार म्हणून त्याने “कॅलिफोर्नियामधील घटनादुरुस्तीही पटत नाही, आणि विवाहसुद्धा पटत नाहीत" असे गुळमुळीत धोरण अंगीकारले. बराक ओबामा हा पुरोगामी उमेदवार कृष्णवर्णीयांचे हक्क पुढे करेल असा प्रचार होता, म्हणून गौरवर्णीय पुरोगाम्यांपेक्षा कृष्णवर्णीय पुरोगामी मतदार मोठ्या टक्केवारीने मतदानाकरिता हजर झाले. त्यामुळे पुरोगामी मतदारांपैकी समलिंगी विवाहाच्या समर्थनात असलेल्या लोकांचे प्रमाण काहीसे कमी झाले. सर्वेक्षणांत समलिंगी विवाहांच्या बाजूने टक्केवारी ५०%पेक्षा थोडीच अधिक होती, ती निवडणुकीत हजर मतदात्यांपैकी टक्केवारी ५०%पेक्षा थोडी कमी भरली. अशा प्रकारे, समलिंगी विवाहांविरुद्धची राज्यस्तरीय घटनादुरुस्ती बहुमताने स्थापित झाली.

अन्यायाने गांजलेले लोक आपल्या आयुष्याच्या मर्यादेत कल्पना करतात, तेव्हा त्यांच्याकरिता "आपलेच नव्हे, तर सर्वांचे दमन टळो" असे उदात्त ध्येय अगम्य असते, अव्यवहार्य असते. उलट आपल्यावर होणारा जुलूम थांबवायचा असेल, तर वेगळा दृष्टिकोन सुगम आणि व्यवहार्य वाटतो. "काही नीच लोकांचे दमन होते ते न्याय्यच आहे, परंतु आम्ही तसे नीच नव्हत. उलट आमचे अन्याय्य दमन थांबले, तर खर्‍या नीच लोकांचे दमन करण्यात आम्हीसुद्धा हातभार लावू," असा प्रामाणिक दृष्टिकोन असल्यास समाजातील बलवान आणि न्यायप्रिय घटकांना आपल्या बाजूने करता येईल, असे चळवळकर्त्यांना मनोमन पटू शकते.

कोणी म्हणेल की हे उदाहरण क्षुल्लक आहे, कॅलिफोर्नियामधील त्या जनमत निकालाचा दीर्घकालीन परिणाम असा काही झाला नाही: अमेरिकेच्या केंद्रीय सर्वोच्च न्यायालयाने जनमताने स्थापित झालेली ही घटनादुरुस्ती रद्द ठरवली. तरी लक्ष देण्याजोगा विशेष भाग हा, की काही दशकांच्या घडामोडींचा अर्क एका निवडणुकीत उतरला, आणि तोही सर्वेक्षणे आणि मतमोजणीमुळे तोललामोलला गेला. म्हणून हे उदाहरण त्यातल्या त्यात सहजपणे अभ्यासाच्या आवाक्यात येणारे आहे. तसे ते आवाक्यात आल्यानंतर आपण अन्य चळवळींमधले कलहसुद्धा समजून घेऊ शकतो.

१९व्या शतकाच्या शेवटापासून २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत अमेरिकेत दोन महत्त्वाच्या समांतर चळवळी चालू होत्या - एकीकडे कृष्णवर्णीयांकरिता आणि दुसरीकडे स्त्रियांकरिता मतदानाचा हक्क मिळवणे. १८७० मध्ये अमेरिकेत कृष्णवर्णीय पुरुषांना मतदानाचा हक्क देणारी केंद्रीय घटनादुरुस्ती झाली. हा हक्क केवळ सैद्धांतिक होता, आणि प्रत्यक्षात क्वचितच कोण्या कृष्णवर्णीय पुरुषाला मतदान करता येई, ही बाब अलाहिदा. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा असे म्हणणार्‍या चळवळकर्‍यांपैकी अनेकांना कृष्णवर्णीयांबाबत सहानुभूती होती, तरी स्त्रीमतदान चळवळीतला मोठा प्रवाह कृष्णवर्णीयांच्या विरोधात होता. दारूबंदी वगैरे नीतिमत्ताप्रधान धोरणे जर राबवायची असतील, तर नीतिमत्ता असलेल्या स्त्रियांना मतदान करता आले पाहिजे, अधःपतित कृष्णवर्णीय पुरुषांचा तर धोकाच आहे, अशी ही प्रबळ विचारधारा होती.

१९२० साली अमेरिकेत सर्व स्त्रियांना मतदानाचा हक्क देणारी केंद्रीय घटनादुरुस्ती झाली. गौरवर्णीय स्त्रियांकरिता लवकरच हा हक्क केवळ सैद्धांतिक नव्हे, तर प्रात्यक्षिक झाला. कृष्णवर्णीयांचा मतदानाचा हक्क सर्व राज्यात प्रात्यक्षिक व्हायची मोठी चळवळ होईपर्यंत १९६०चे दशक उगवले. मध्यंतरी गौरवर्णीय स्त्री-मतदार कृष्णवर्णीयांच्या हक्काच्या विरोधात मोठ्या प्रमाणात होत्या, ही बाब आता समजून घेता येईल: आपल्यावरील जुलूम तो अन्याय्य आणि अन्य कोणाचे होणारे दमन मात्र न्याय्य असा मिश्र दृष्टिकोन अपवाद नव्हे, तर एक अपेक्षित सूत्र म्हणून आपल्याला ओळखू येते.

हा मिश्र दृष्टिकोन रुळलेला वा सार्वत्रिक असला, तरी अपरिहार्य नाही, ही आशेची बाब आहे. अगदी चळवळीच्या सुरुवातीला १८४८ साली भरलेल्या अमेरिकेतील पहिल्या स्त्रीवादी परिषदेत सदस्यांनी स्त्रिया आणि कृष्णवर्णीय दोहोंच्या हक्काचे समर्थन केले होते. १९६०च्या नागरी हक्क चळवळींमध्ये स्त्रीवादी आणि कृष्णवर्णीय हक्कवादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकमेकांचे समर्थक होते.

आपल्या पहिल्या चळवळ-जोडीचे म्हणावे, तर उमेदवार बराक ओबामाने २००८ सालचे ’नरो वा कुंजरो वा’ धोरण २०१२ पर्यंत त्यागले होते. नेत्याचे समर्थन एकटे जनमानस बदलू शकत नाही, परंतु आपसूख - तरी हळूहळू - बदलणार्‍या जनमानसाची पार्श्वभूमी असल्यास नेत्याच्या वक्तव्यामुळे डळमळीत मताचे लोक अधिक लवकर बदलतात. २०१२ साली मेरीलँड व वॉशिंगटन राज्यांत समलिंगी विवाहांच्या कायद्यांबाबत जनमत निवडणुकी होत्या. राष्ट्रपती बराक ओबामा समर्थन देतो म्हणून सर्व कृष्णवर्णीय धर्मगुरूंनी री ओढली नाही, हे खरेच. तरी कित्येक धर्मगुरू "आपणही या बाबतीत न्याय-अन्याय काय तो सारासार विचार करीत आहोत" असे म्हणू लागले. धार्मिक भावनांमुळे मोघम विरोध करणारे एरव्ही तटस्थ कृष्णवर्णीय लोक आता पुरोगामी विचारास मोघम समर्थन देण्यास मोकळे झाले. जनमतात कॅलिफोर्नियाचा २००८चा निकाल एका दिशेने, तर मेरीलँडचा २०१२चा निकाल दुसर्‍या दिशेने गेला, याचे पायाभूत कारण कालौघात बदलणारा समाज आहे, परंतु हे नैमित्तिक कारणही हिशोबात घ्यावे लागते: उमेदवार वा राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे कृष्णवर्णीय हक्क विरुद्ध समलिंगी हक्क या कलहाऐवजी सहयोग झाला.

चर्चेतील उदाहरणे अमेरिकेतील असली, तरी हे राजकीय तत्त्व सार्वत्रिक आहे. दलितांच्या हक्कांकरिता लढताना ब्रिटिश जुलमाविरोधी असलेल्या स्वातंत्र्य चळवळीचे समर्थन करावे की विरोध? याबाबत भी. रा. आंबेडकरलिखित विवेचन विपुल आहे. आज वेगवेगळ्या उपसमाजांवरील अन्याय दूर करण्यास झटणार्‍या चळवळी एकमेकांचे समर्थन करतातच असे नाही. तरी सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून या कलहांचा पाया जाणून आणि त्यांचे निराकरण करणारे, सहयोग घडवून आणणारे ते खरे यशस्वी पुढारी होत.

field_vote: 
4.8
Your rating: None Average: 4.8 (5 votes)

प्रतिक्रिया

लेख चांगलाच. एका प्रकारचा शोषित दुसर्‍या प्रकारच्या शोषिताला सहानुभूती देइलच असं नाही हे दिसलं.
अमेरिकेत एका कायद्यासाठी लोकांचं मतदान होतं ही नवीन माहिती मिळाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

माहितीपूर्ण लेख. अनिर्बंध लैंगिक आचरण ही गोर्‍यांची मक्तेदारी वगैरे मते टिपिकल ब्रिगेडी/मूलनिवासी नायक छापाची वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहितीपूर्ण लेख. आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परत वाचते आहे. लेख अभ्यासपूर्ण व व्यामिश्र आहे. रोचक तर आहेच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला आणि हे राजकीय तत्त्व सार्वत्रिक आहे याच्याशी सहमत आहे.

काही नीच लोकांचे दमन होते ते न्याय्यच आहे, परंतु आम्ही तसे नीच नव्हत. उलट आमचे अन्याय्य दमन थांबले, तर खर्‍या नीच लोकांचे दमन करण्यात आम्हीसुद्धा हातभार लावू,"

हे वाचून फार मौज वाटली, विस्थापितांवरील अन्न्यायाच्या चळवळीं संदर्भात काही पूर्व-विस्थापितांचीच मते ऐकल्यामुळे त्यातली सत्यता मनोमन पटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्यावर अन्याय करणारी व्यवस्था अन्यायकारक आहे का, ती कितपत अन्यायकारक आहे या मुळांपर्यंत न जाण्याचा विचार वाचून मलाही मौज वाटली. खरंतर ही गोष्ट सकारात्मक नाही, पण हे आकलन समजल्यामुळे, काहीतरी नवीन शिकल्यामुळे मौज वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुरोगामी अशा नावाची कोणतीही एकसंध विचारसरणी नसते. कित्येकदा त्यातील वेगवेगळे धागे घट्ट, मजबूत उभ्या-आडव्या विणीऐवजी आडवे-तिडवे गुंततात.

ही सुरूवातीची मांडणीच आख्ख्या लेखाची पार्श्वभूमी छान उभी करते. एकाच शत्रूविरुद्ध - परंपरावादी विचारप्रवृत्तीविरु्द - लढणारे वेगवेगळे घटक एकमेमकांना मित्र मानतीलच असं नाही. एकाच शिडीवर चढताना आपण पहिल्यांदा पुढे जावं म्हणून दुसऱ्याचे पाय खेचावे तसं काहीसं होताना दिसतं.

कधीकधी 'माझं शोषण हेच खरं शोषण, बाकीचं जे आहे ते समर्थनीय' अशी विचारपद्धतीही दिसते. उदाहरणार्थ, दलित चळवळ आणि स्त्रीवादी चळवळ या दोन्ही विशिष्ट रूढींविरुद्धचाच झगडा आहे. या दोन्ही प्रकारच्या शोषणाचे धागे एकाच कपड्यातले. मात्र जे दलित चळवळीला सक्रीय पाठिंबा देतात त्यांच्या घरीही स्त्रियांचं शोषण चालू असू शकतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी आजपर्यंत एकाही स्त्री मुक्ती चळवळीच्या कार्यकर्तीने (आधुनिक काळातील खास करुन महाराष्ट्रातील) एखाद्या दलित चळवळीला पाठींबा दिलेला म्हणजे फुलफ्लेज पाठींबा दिलेला बघितलेला नाही. दुसर म्हणजे लेखात धनंजय यांची जी अलिखीत अपेक्षा बराक ओबामा या नेत्याकडुन केलेली दिसते ती अजिबात पटली नाही. म्हणजे ओबामा च मत स्वीकार वा नकार वा धोरण हे इतक महत्वाच कस बनु शकत ? म्हणजे तेथील जे कोण कृष्णवर्णीय आहेत ते ओबामानिरपेक्ष विचार चिंतन निर्णय घेउच शकत नाही का ? आणी जे कोणी डळमळीत मनाचे अशा नेत्याच्या विशीष्ट भुमिकेमुळे बदलतात तर असे उथळ बदलणारे तर अन्य कुठल्याही फोर्सेस ने बदलु शकतात. मग कीमान ते तरी आपल्या बाजुने या निमीत्त्तने बदलले तर बरे असा विचार असे समर्थन मिळविण्यासाठी करणे कितपत योग्य आहे. म्हणजे त्याने चळवळीचे कुठले नैतिक हित साध्य होईल की व्यावहारीक रणनीतीचा भाग म्हणुन अशी अपेक्षा केलेली आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगला लेख. एकंदरीतच, सामाजिक विकासाच्या संदर्भात मोठा मासा छोट्या माशाला खातो ही analogy निरनिराळ्या संदर्भात जशी लागू होते तशीच, गर्दी असलेल्या गाडीतून प्रवास करताना जी धक्काबुक्की होते, त्यात एकमेकांवर पाय देऊन पुढे जाण्याची शिकस्त असते हीदेखील इथे लागू होते असं मला वाटलं.

एका संदर्भात "प्रागतिक" समजल्या जाणार्‍या संघटना, लोकसमूह, अन्य बाबतीत प्रतिगामी असतात याची अनेक उदाहरणे सर्व देशांत सर्व काळात पहायला मिळतात. दलित चळवळीतल्या कार्यकर्ते/नेत्यांनी त्यांच्या घरातल्या स्त्रियांना दिलेल्या वागणुकीबद्दलच्या कहाण्या आठवतात. मलिका अमरशेख यांचं "मला उद्ध्वस्त व्हायचंय" हे आठवतं. नास्तिकांच्या बैठकींमधून, चळवळींमधून स्त्रीद्वेष जोपासला जाताना दिसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

विचार करायला लावणारा लेख आहे. अशाच आणखी दोन जोड्या आठवल्या.

१. व्यक्तीला अभिव्यक्तिस्वातंत्र्य असावं. यात बऱ्याच गोष्टी येतात, पण विशेषत: पोर्नोग्राफीवर कायद्याचा बडगा असू नये.
२. स्त्रीसमतेचा पुरस्कार करणाऱ्यांच्या मते पोर्नोग्राफी ही स्त्रियांना भोगवस्तू मानते, आणि अप्रत्यक्षपणे स्त्रियांच्या हक्कांवर गदा आणते. तेव्हा तिला मुभा नसावी.

अर्थात दोन्ही मुद्दे मी ढोबळपणे मांडलेले आहेत, आणि तपशिलात जाऊन गुंतागुंत बरीच वाढवता येईल. पण हे दोन्हीही परस्परांविरुद्ध जाणारे पुरोगामी विचार आहेत इतकं मान्य व्हावं. (पुरोगामी म्हणजे काय अशा 'अजोळी' वादात पडण्यात अर्थ नाही. या दोन्ही भूमिका तशा मानल्या जातात इतकं इथे पुरेसं आहे.)

सध्या कॅनडामध्ये चालू असलेल्या वादात असेच दोन पुरोगामी पक्ष एकमेकांविरुद्ध आहेत.

३. व्यक्तीला इच्छामरणाचा हक्क असावा. विशेषत: जिला (असाध्य आजारामुळे वगैरे) जगणं नको झालं असेल तिला आत्महत्या करण्यासाठी वैद्यकीय मदत मिळावी.
४. अपंगांना सन्मानाने जगता यावं, आणि त्यांच्या आयुष्याला दुय्यम लेखलं जाऊ नये. या पक्षाला अशी भीती वाटते की जर इच्छामरणाला कायदेशीर मान्यता मिळाली, तर जे कमालीचे विकलांग आहेत त्यांच्यावर आत्महत्या करण्याचं किंवा किमान आपल्या आयुष्याला किंमत नाही असा समज करून घेण्याचं अप्रत्यक्ष दडपण येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

१. व्यक्तीला अभिव्यक्तिस्वातंत्र्य असावं, व्यक्तिगत धार्मिक पद्धतींवर कायद्याचा बडगा असू नये.
२. बुरखा घालण्याची प्रथा स्त्रियांना खालच्या दर्जाची मानते, आणि अप्रत्यक्षपणे स्त्रियांच्या हक्कांवर गदा आणते. तेव्हा बुरखा घालण्यास बंदी असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजच ही बातमी वाचनात आली.
The Ohio Sperm-Bank Controversy: A New Case for Reparations?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अभ्यासपूर्ण लेख - आवडला. धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वांचे आभार. प्रतिसादकांनी काही मुद्दे खुलवले आहेत, आणि चांगली उदाहरणेही दिली आहेत.

प्रतिसादक मारवा यांनी काही मुद्दे मांडले आहेत, त्यांच्याबाबत स्पष्टीकरण.
> लेखात धनंजय यांची जी अलिखीत अपेक्षा बराक ओबामा या नेत्याकडुन केलेली दिसते ती अजिबात पटली नाही.
लेखात अपेक्षा अलिखित आहे, कारण तशी अपेक्षा मुळातच नाही. बराक ओबामाच्या बदललेल्या वक्तव्यांची केवळ नोंद आहे. आणि ती वक्तव्ये आणि धोरणे घडलेल्या जनमतांच्या व निवडणुकींच्या संदर्भात बसवलेली आहेत.

> म्हणजे ओबामा च मत स्वीकार वा नकार वा धोरण हे इतक महत्वाच कस बनु शकत ?
लेखातील वाक्ये अशी : "जनमतात कॅलिफोर्नियाचा २००८चा निकाल एका दिशेने, तर मेरीलँडचा २०१२चा निकाल दुसर्‍या दिशेने गेला, याचे पायाभूत कारण कालौघात बदलणारा समाज आहे, परंतु हे नैमित्तिक कारणही हिशोबात घ्यावे लागते: उमेदवार वा राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे कृष्णवर्णीय हक्क विरुद्ध समलिंगी हक्क या कलहाऐवजी सहयोग झाला."
पायाभूत कारण : कालौघात बदलणारा समाज
नैमित्तिक कारण : उमेदवार वा राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे सहयोग
त्यामुळे मारवा यांचे "इतके महत्त्वाचे कसे बनू शकते" ही बाब कळली नाही. नैमित्तिक कारणे जितपत महत्त्वाची असतात, तितकेच महत्त्वाचे हे धोरण आहे. (शीर्षकातले रूपक पुढे चालवायचे तर, तयार कापडात गुंतलेले घागे नसतात. आणि माग चालवला नाही, तर रिळातले चांगले धागे आपोआप विणलेही जात नाहीत. धागे आणि माग या गोष्टी कापड बनवण्याकरिता मूलभूत आहेत. धाग्यातले गुंते सोडवणे हे नैमित्तिक आहे. पण प्रयत्नपूर्वक गुंते सोडवणारे कोणी असले, तर कापड विणायची सोय होते, आणि थोडे लवकर विणले जाते.)

> म्हणजे तेथील जे कोण कृष्णवर्णीय आहेत ते ओबामानिरपेक्ष विचार चिंतन निर्णय घेउच शकत नाही का ?
हा विचार समजला नाही. कालौघात जो समाज बदलतो आहे, त्यात कित्येक जणांनी ओबामानिरपेक्ष विचार चिंतन निर्णय घेतला असणार, हे लेखात पुरेसे स्पष्ट व्हायला हवे होते.

> आणी जे कोणी डळमळीत मनाचे अशा नेत्याच्या विशीष्ट भुमिकेमुळे बदलतात तर असे उथळ बदलणारे
> तर अन्य कुठल्याही फोर्सेस ने बदलु शकतात.
"डळमळीत" आणि त्याहीपेक्षा "उथळ", हे शब्द काहीसे निंदाव्यंजक वाटतात. काळाच्या ओघात (म्हणजे चळवळींमुळे जनजागृती हळूहळू होत आहे, त्या ओघात) जनमत बदलत असताना काही लोक विचारांच्या प्रवासात असणार, हे अपेक्षित असले पाहिजे. एखादा समज वा गैरसमज फार खोलवर असला, तर तो बदलायला वेळ लागणार, आणि मध्ये काही काळ विचार कुठल्याच बाजूला ठाम नसणार. असा प्रवास करणारे लोक त्या वेळी डळमळीत असले, तरी उथळ असतीलच असे काही म्हणता येत नाही. अधिकाधिक ज्ञान, अनुभव साचण्याच्या प्रक्रियेमुळे ज्यांचा पूर्वीचा समज ढिला झाला आहे, ते लोक दोन्ही बाजूला समप्रमाणात डोलत नसतात. नैमित्तिक कारणामुळे ते एका बाजूकडे अधिक ठाम होतील पण दुसर्‍या बाजूकडे कमी. मी आपल्या स्वतःमध्ये झालेल्या मतांतरांकडे बघतो, तेव्हा मला असा प्रवास दिसतो. तुमचा वैयक्तिक अनुभव काय आहे?

> मग कीमान ते तरी आपल्या बाजुने या निमीत्त्तने बदलले तर बरे असा विचार असे समर्थन मिळविण्यासाठी
> करणे कितपत योग्य आहे. म्हणजे त्याने चळवळीचे कुठले नैतिक हित साध्य होईल की व्यावहारीक रणनीतीचा
> भाग म्हणुन अशी अपेक्षा केलेली आहे ?
या ठिकाणी नैतिक हित आणि रणनीती या दोन्ही गोष्टी साधतात. लोकांचे समर्थन उशीरा मिळण्याऐवजी लवकर मिळाले, ही रणनीती असू शकेल. त्यामुळे एखादा विवक्षित कायदा एखाद्या विवक्षित तारखेला पास झाला, तर तोही कदाचित "तात्पुरता डावपेच" म्हणता येईल. परंतु लोकांचे मतपरिवर्तन झाले आणि एखाद्या न्याय्य मागणीला पूर्वी विरोध करणारे लोक आता विरोध करत नाहीत, ही बाब त्या समाजाच्या कायमच्या हिताची सुद्धा आहे. (एका ठिकाणून दुसर्‍या ठिकाणी प्रवासात असल्यामुळे जे डळमळीत आहेत, ते लोक अशाच नैमित्तिक कारणाने झपाट्याने मागे फिरणार नाहीत, हा मुद्दा पुन्हा सांगत आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>"डळमळीत" आणि त्याहीपेक्षा "उथळ", हे शब्द काहीसे निंदाव्यंजक वाटतात. काळाच्या ओघात (म्हणजे चळवळींमुळे जनजागृती हळूहळू होत आहे, त्या ओघात) जनमत बदलत असताना काही लोक विचारांच्या प्रवासात असणार<<
हे पटले.
आणि हायसे वाटले. हा गोंधळ एक सकारात्मक पाऊल वाटते कारण तो बदलाचा भाग आहे.
कायद्याच्या बाजूच्या नैमित्तिक कारणांत अजुन काय जोडता येईल?
जॉर्ज ताकाइ, HIMYM सारख्या मालिकेतला हेटेरोसेक्सुअल काहीश्या स्टेरियोटाईप पुरुषी मनोवृत्तिचा प्रतीक असणारा बार्नी
आणि त्याचा खरा सेमसेक्स्स विवाह, ऑस्करच्या शर्यतीत असणारे मिल्क, नॉर्मल हार्ट, असे चित्रपट अशी अनेक नैमित्तिक कारणे मला सुचतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0