जेवणं : एक आद्य शत्रू

जेवणं : एक आद्य शत्रू

लेखक - अस्वल

परवा ‘देनिसच्या गोष्टी’ वाचताना त्यातला देनिसच्या जेवणाचा भाग वाचून चिकार दिवसांनी माझ्या एका पुराण्या शत्रूची आठवण झाली - जेवणं. म.टा.च्या मराठीत ‘eating’ म्हणतात ते.

अस्मादिकांचा जेवणाबद्दलचा लौकिक फारसा चांगला नव्हता. (म्हणजे फार वाईट होता, हे चाणाक्ष वाचकांनी ताडलंच असेल!) म्यारेथॉन हा शब्द जेव्हा मी पहिल्यांदा ऐकला, तेव्हा मला माझ्या जेवणसोहळ्याची आठवण झाली. दीड-दोन तास सहज चालणारा तो सोहळा असे. आधी तर मी काही खायलाच तयार नसायचो. हजार विनवण्या आणि चित्रविचित्र युक्त्या केल्यावर मोठ्या मिन्नतवारीनंतर तो घास माझ्या तोंडात प्रवेश करायचा. नंतरची लढाई म्हणजे तो पोटात ढकलणं. वर्षानुवर्षे एखाद्या पोष्टात चिकटलेल्या सरकारी कारकुनासारखा तो घास बराच वेळ मी गालात ठेवून द्यायचो. मग आईच्या "चाव रे.. खा रे जरा.." अशा विनवण्यांनंतर मला दयेचा पाझर फुटे आणि तो घास पोटात जाई. आई आणि मी, दोघेही, ‘हुश्श्’ म्हणून पुढल्या घासाच्या तयारीला लागत असू.

लहानपणी मी खाल्लेला सर्वाधिक ओरडा हा न खाण्याबद्दल होता!

आमच्या ओळखीतील एक आज्जी एकदा घरी आल्या होत्या. बराच वेळ माझ्या आज्जीशी गप्पा मारून त्या
परत जायला निघाल्या, तेव्हा जवळपास साडेनऊ झाले असावेत. माझी मॅरेथॉन जवळपास संपत आली होती. त्या शेवटच्या टप्प्यात मी टीव्हीसमोर बसून जेवत होतो. मी नियमबाह्य वर्तन तर करत नाही ना, हे आई एखाद्या अंपायरप्रमाणे डोळ्यांत तेल घालून पाहत होती.

आज्जींनी माझ्या (बर्‍याचशा भरलेल्या) ताटाकडे नापसंतीचा एक कटाक्ष टाकला आणि माझ्या आईला म्हणाल्या,

"अगं, मुलांना लवकर वाढत जावं जेवायला. नाहीतर मग त्यांना त्रास होतो."

"किती लवकर वाढावं आज्जी?" आईनं शांतपणे विचारलं.

"आठ -साडेआठला तरी वाढावं गं..." आज्जींनी विजयी मुद्रेनं सांगितलं.

"त्याला साडेसातलाच दिलंय जेवायला." आईनं विनिंग पॉइंट घेतला.

आजींची कवळी बहुधा निसटली असावी. "हॅ हॅ हॅ, जेव रे पटापट." असं म्हणून त्या निघून गेल्या.

आता नाही जेवता येत मला पटापट, काय करू मी? बरं, ह्या बाबतीत कुणाकडूनही मला सपोर्ट मिळत नसे. मोठे तर सगळे कट्टर शत्रू. पण माझी काही चुलत-मामेभावंडंही शत्रुपक्षाला जाऊन मिळायची.

एखाद्या घरगुती समारंभात बरीचशी पोरं एखाद्या भयानक भाजीकडे बघून तोंडं वेंगाडायची. पण एखादं छोटंसं पोर तिथेही मिटक्या मारीत सपासप ती भाजी संपवी. हेच ते फितूर लोक! कितीही नावडती भाजी, आमटी असली किंवा एखादा कितीही भयाण नवा पदार्थ असला, तरी हे असे फितूर लोक मिटक्या मारत आनंदाने जेवत. आणि मग "तो बघ कसा पटापट खातोय. शीक जरा काहीतरी त्याच्याकडून. ताट कसं स्वच्छ केलंय बघ." हे मला ऐकावं लागे.

त्यात जर हा फितूर एखादा लहान भाऊ असला, तर खेळ खल्लास.

मोठ्या लोकांपैकी एखादे काका किंवा मावशी ह्यांनी लहान मुलांमध्ये आपला वचक निर्माण केलेला असे. "सो जा, नही तो गब्बर आ जायेगा" हे ऐकून टरकणारं रामगढवासी मूल आणि "जेव पटापट, नाहीतर लतामावशीला बोलावीन." ह्या उद्गारांनी भेदरलेला मी, ह्यांत तत्त्वतः काहीच फरक नाही. फरक असला तर इतकाच, की गब्बरचं नाव ऐकूनच रामगढवासी मूल झोपी जाई. पण लतामावशीचं नाव ऐकूनही ती अळूची पातळ भाजी माझ्या घशाखाली काही उतरत नसे. त्यानंतर जर लतामावशी स्वतः तिथे आलीच, तर मात्र माझी हवा टाईट होई. "काय? जेवण कुठपर्यंत आलंय?" असला मावशीचा साधा प्रश्नसुद्धा भीतिदायक वाटे. बागुलबुवा हा शब्द पहिल्यांदा ऐकला तेव्हा असेच ‘जेवण-सैतान’ असलेले माझे काका माझ्या डोळ्यांपुढे उभे राहिले होते.

हे सर्व लोक कमी पडले म्हणून की काय, आमचे ‘बाबा’ होतेच. मला वाटतं, ते बहुधा लहान मुलांना ‘सगळं-सगळं’ खायला घालायची कन्त्राटं घेत असावेत. आमच्या नात्यातली कित्येक मुलं शेवटला उपाय म्हणून आमच्या घरी दाखल होत आणि त्यांची पुढली वाटचाल मी अश्रूभरल्या नजरेनं बघत असे. असाच प्रसाद लहानपणी एकदा उपभोगल्यावर माझा एक मामेभाऊ जेवणाच्या वेळी आमच्या घरी चुकूनही फिरकेनासा झाला. खरंतर आई आणि आज्जी अतिशय चविष्ट मासे बनवत, पण ‘आमचे बाबा’ हा एक यक्षप्रश्न होता. एखादी अवघड पालेभाजी खायला घातली तर काय घ्या? त्यापेक्षा विषाची परीक्षा नकोच. शक्य असतं, तर माझ्या कित्येक चुलत-मावस भावंडांनी दुपारी १२ ते २ आणि रात्री ८ ते १० आमच्या घराला बाहेरून कुलूप लावलं असतं. ‘माझ्या आयुष्यातील पहिली पालेभाजी’ किंवा ‘मी चाखलेला पहिला _____’ (गरजूंनी आपापल्या नावडत्या पदार्थाचं नाव घालावं) अशा निबंधांत आमच्या बाबांचं नाव नक्की झळकेल.

एकदा नेहमीप्रमाणे त्यांनी मला सांगितलं, "ताटात वाढलेलं सगळं संपवलंच पाहिजे."

"पण ही अमुकतमुक वाटी ताटाबाहेर आहे, मग ती कशाला संपवायची? हॉ हॉ हॉ..." मी विनोदाचा क्षीण प्रयत्न करून पाहिला.

विरोधी पक्षाचा चेहरा तसाच कठोर होता. मग मी दु:खाबरोबर निमूटपणे तो घास गिळला.

पानात पडलेलं सगळं संपलंच पाहिजे हा नियम. आणि पानात काय काय पडायचं? भाज्यांमध्ये अनेक चित्रविचित्र पालेभाज्या आमच्या घरी मोठ्या आनंदाने खाल्या जात. उदा. ‘बोक्याची भाजी’ अशा हिंस्र नावाची भाजी ऐकून मी टरकलो होतो. घरी मासे-मटण आणत असले, तरी बोक्यासारख्या पाळीव प्राण्यावर ही वेळ यावी हे काही मला बरं वाटलं नाही. पण प्रत्यक्षात, मिशा फेंदारलेल्या बोक्याऐवजी एक मेंगळट दिसणारी, अगम्य पाल्याची भाजी पानात पडल्यावर माझा कमालीचा विरस झाला.

केळ्याची अशीच एक भयाकारी भाजी मी कित्येक वर्षं खाल्ली आहे. ते हिरव्या कळकट रंगाचे (जी.एं.च्या भाषेत ‘मांजर ओकल्यासारखा रंग’) घनाकृती ठोकळे बहुधा अंदमानातल्या जेवणात देत असावेत. ही भाजी वाढून झाल्यावर "एकदा खाशील तर परत मागशील!" असा एक क्रूर विनोदही आमचे बाबा करत. नवलकोल किंवा अलाकोल अशा काहीशा नावाच्या, एखाद्या गिळगिळीत साबणासारख्या लागणार्‍या भाजीचाही फार उपद्रव होता. शेपू वगैरे केमिकल प्रयोगही अधूनमधून होत.

घराणं गोव्याच्या दिशेचं असल्याने वर्षातून एकदा मणगणं, खतखतं वगैरे राक्षसी नावांचे पदार्थ बनत. ते खतखतं बनवायच्या आधीची धडपड मला अजूनही आठवते. आमचे बाबा वेचून वेचून कुठल्या कुठल्या भाज्या घेऊन येत. आणि मग एखाद्या शिकार्‍यानं भिंतीवर लटकणार्‍या आपल्या विजयचिन्हांकडे नजर टाकावी, तशा कौतुकानं त्या भाज्यांकडे बघत. मग यथावकाश तो भाज्यांचा अजस्र चिखल शिजायला जाई. ‘खतखतं’ म्हटल्यावर अजूनही ‘उरल्यासुरल्या भाज्यांचा एक ढीग एका भल्या मोठ्या कढईत शिजतोय आणि त्याकडे बुभुक्षित नजरांनी गावकरी लोक बघताहेत’ असली काहीतरी प्रतिमा माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते.

त्याखालोखाल त्रास देणारा कोकणी प्रकार म्हणजे पेज. बरं, आमचे आजोबा कोकणातले असल्यामुळे पोरानं भात खाल्ला नाही म्हणजे पोरगा वाया गेला, अशी त्यांची धारणा. इतर वेळी माझ्या अन्नान्नदशेला कारणीभूत नसणारे आजोबा रविवारी सकाळी मात्र आपला हिसका दाखवून जात.

"पेज घे रे थोडी तरी, प्रकृतीला बरी असते." आजोबा.

"पण मला नको आहे." बुद्धाच्या गांभीर्याने मी.

"फटके देईन बरोबर. घे ती पेज, आणि सगळी संपायला हवी." मधूनच बाबा. आता मी आजोबांशी बोलतोय ना, मग मध्ये कशाला उगाच? पण नाही!

"मी सांगतोय ना, घे. अरे, पेजेत खूप सत्त्व असतं. भात जेवला पाहिजे..." अशी सुरुवात करून आजोबा मला पेजेचं महत्त्व पटवून देत. त्यात जर ते कोकणातले उकडे तांदूळ असतील, तर त्या पेजेला चव तरी असायची. पण नेहेमीचे तांदूळ? छ्या! मग शेवटी त्या पेजेवर ती जाडसर साय यायची. त्या सायीची आठवण जरी आली, तरी मला कससंच होतं.

"एकदा खाऊन तर बघ-" या सदरात मोडणारे पदार्थ हे बहुधा आईचे स्वयंपाकाचे प्रयोग असावेत असा संशय मला कित्येक वर्षं होता! त्यातल्या काही गोष्टींच्या बाबतीत हे खरंही होतं - म्हणजे बिटाचे लाडू वगैरे. ह्या असल्या गोष्टी मला बळजबरीनं खाऊ घालण्याइतक्या महत्त्वाच्या का होत्या देव जाणे! अलीकडेच मी आईला हा स्वयंपाकाच्या प्रयोगाबद्दलचा संशय सांगितल्यावर तिनं मिश्किल नजरेने माझ्याकडे पाहिलं!

बाबा , ‘जेवण-सैतान’ काका, ‘जेवण-सैतान’ मावश्या आणि मुख्य म्हणजे आई - अशा जालीम शत्रूंशी लढण्यासाठी मीसुद्धा उत्तरोत्तर नवनवे डावपेच शोधून काढत असे.

उदाहरणार्थ: जेवताना आईनं एखादा नावडता पदार्थ वाढला, तर तो माशांच्या काट्यांखाली लपवून ठेवणे हा साधा उपाय. पण नेहमीच मत्स्यावतार कामी येत नसे. मग शेवटला घास नावडत्या पदार्थाचा घेऊन तो गालांत कोंबून ठेवणे आणि चूळ भरायच्या निमित्ताने तो पाण्याच्या आधीन करणे हा प्रगत उपाय. हा उपाय काही वेळा केल्यानंतर ‘आपल्या वॉशबेसीनमधे पाणी तुंबतं कसं?’ ह्या प्रश्नाचं उत्तर आईला सापडलं आणि हा उपाय बंद झाला. मग गनिमी कावा करून मी माझं कार्यक्षेत्र वाढवलं. कचरा रोज जरी काढला, तरी कार्पेट तितक्याश्या वेळा उचललं जात नाही, हे ध्यानी घेऊन मी घरातल्या कार्पेटकडे मोर्चा वळवला. कित्येक पदार्थांना त्या कार्पेटनं उदार आश्रय दिल्यानंतर कधीतरी एका टप्प्यावर हाही उपाय संपला.

शेवटी युद्धात सगळं क्षम्य असतं हे लक्षात घेऊन मी जालीम उपाय वापरू लागलो. नको असलेले पदार्थ दुसर्‍या मजल्यावरून खाली भिरकावून देणे हा तो उपाय. काही काळ माझी ही युक्ती आमच्या इमारतीमागच्या झाडांमध्ये लपून गेली. पण एकदा दुपारी झाडांना पाणी घालायला आलेल्या एका आज्जींवर अचानक हा ‘अन्नवर्षाव' झाल्यानंतर हे फार काळ गुप्त राहणं अवघड होतं.

सणासुदीला आम्ही भावंडं एक्स्चेंज ऑफर वापरायचो. "तुला मुगाची उसळ नकोय आणि मला ते गोड पंचामृत नकोय, बरोबर ना?". उत्तर - अदलाबदली. मग जवळपास एखादे धोकादायक काका नाहीत असं पाहून चटकन ताटातले पदार्थ उड्या मारत. कधी कधी अदलाबदलीच्या वेळी नको असलेला पदार्थ नको तितक्या प्रमाणात ताटाबाहेर भिरकावला जाई. या फेकाफेकीचे पुरावे नष्ट करणं हा फार धाडसी प्रयत्न असे.

मात्र आईच्या फाजील चौकशांपुढे सगळे उपाय व्यर्थ ठरत. आपला मुलगा शाळेत नेलेला डबा रोज पूर्ण चकाचक करून घरी परत आणतो, हे ऐकून कोणीही खूष होईल असं तुम्हांला वाटतं की नाही? पण तुम्ही चुकताय. आई हा भयंकर लक्ष ठेवणारा प्राणी असतो. मी शाळेतून रोज डबा संपवून येतो म्हटल्यावर तिनं मला प्रेमानं जवळ वगैरे घेतलं नाहीच, उलट शाळेत जाऊन चौकशी केली, की “हा मुलगा डबा खातो का?” मग तिला समजलं, की ‘हा मुलगा’ आपल्या डब्यातली भाजी वाटून टाकतो आणि वेफर्स, चिवडा अशासारख्या क्षुद्र गोष्टी आनंदानं चापतो.

असो. एवढ्या सगळ्या प्रसंगांनंतर खरं म्हणजे मी शहाणा बाळ वगैरे होऊन फुकटच जायचा, पण परमेश्वराने मलाही एक संधी दिली. आज्जी हा एक परममित्र जर मला लहानपणी लाभला नसता, तर कुणी सांगांवं, मी चुकून एखादा गुणी बाळही झालो असतो. मी ‘सग्गळं सग्गळं खाणारा, पानात काहीही न टाकणारा, निमूटपणे तोंड वर न करता पटापट जेवणारा, आदर्श बाब्या’ झालो नाही ह्याचं एकमेव कारण म्हणजे आज्जी.

कारण सोप्पंय! बाकी कुठेही आज्जीचं काही चाललं नाही, तरी नातवांच्या बाबतीत आज्जी ह्या सर्वोच्च न्यायालयापुढे अपील नसतं!

***

field_vote: 
4.18182
Your rating: None Average: 4.2 (11 votes)

प्रतिक्रिया

Biggrin आमची बोर्नव्हीटा पितानाची रडारड बोंबाबोंब आठवली. बाकी शेपूची भाजी कशी काय नाय आवडत लोकांना Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही हा प्रश्न सतत पडतो. हातावर घेतलेल्या ज्वारीच्या भाकरीवर लसूण चेचलेली शेपूची भाजी ज्याने खाल्ली नाही तो आनंदाला मुकलाय असा माझा ग्रह आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लसणाची फोडणी दिलेली, शेपूची भाजी खासच लागते. एकदम सुरेख.
पण नंतर जे ढेकर येतात ते जाम बोअर होतात Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा. भारी!!! प्रचंड आवडला लेख.

शीक जरा काहीतरी त्याच्याकडून. ताट कसं स्वच्छ केलंय बघ.

आणि

एकदा खाशील तर परत मागशील!

आणि

एकदा खाउन तर बघ-

हे संवाद आमच्या घरातूनच घेतले आहेत असं वाटलं. नावडती भाजी पाण्याबरोबर गिळून टाकणे, डबा वाटून टाकणे मित्रांना हेही तंतोतंत. आईनी केलेल्या व्हेजिटेबल सूपला पात्तळभाजी म्हणल्याबद्दल रोषही ओढवून घेतलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अस्वला, लहानपणी मधतरी पटापट खायचास का रे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी लहान असताना का-ही-च पटापट खायचो नाही. now that I think of it- रवंथ करण्याच्या स्पर्धेत मी पहिल्या पाचांत नक्की आलो असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्तासुद्धा सुरू करा. एका मिनिटांत जास्तीत जास्त कोण खातंय अशा स्पर्धा असतातच. तुम्ही रवंथ स्पर्धा सुरू करा. आपण ऐसीवर दणक्यात जाहीरात करू त्याची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ROFL ROFL ROFL

हे अस्वल अशा शाब्दिक गुदगुल्या करून मारून टाकणारे एक दिवस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाहाहा खरच आहे. मी परवापासून अस्वलांचा म्हणून या लेखाची वाट पहात होते. प्रतीक्षेस, न्याय झालेला आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहानपण आठवले. आमचेही मॅरेथॉन असेच चालायचे. त्याच्या आठवणीने लैच हळवा झालो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझी एक मावशी अशीच 'जेवणसैतान' मानली जात असे - जाते. तिच्या घरी गेल्यावर आसंमतातल्या कुठल्याच पोराची पानात काही टाकायची टाप नसे. कुठलीही भाजी असो, 'थोडी खायचीच' असं म्हणून ती ताटात त्या भाजीचा लपका वाढी आणि वर समोर ढालगजपणे उभी राही. आता तिच्या नातवानं मात्र तिची पार शेळी करून टाकली आहे. त्याला आवडणारा पदार्थ असला, तरीही तो 'ऑन प्रिन्सिपल' पानात काहीतरी टाकतो आणि मावशी त्या गावचीच नसल्याप्रमाणे दुर्लक्ष करते, तेव्हा नियतीचा न्याय दिसतो. Biggrin

लेख आवल्डा, हेवेसांनल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

असंच पाहिजे. लहान मुलांना शेपू खायला घाल्ता.. कुठे फेडाल रे ही पापं?
(बाकी आई/मावशी -> आजी हा एक metamorphosis आहे! )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(बाकी आई/मावशी -> आजी हा एक metamorphosis आहे! )

दुर्दैवाने, metamorphosis म्हटले, की आम्हांस फक्त कथेच्या सुरुवातीच्याच वाक्यास प्रचंड नि गलिच्छ किडा होऊन पडलेला ग्रेगॉर साम्साच आठवतो.

काश!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी एक मैत्रिण, तिची आई आंघोळीला गेली की पोळी बाल्कनीतून सरळ फेकून द्यायची. तिचा फार हेवा वाटायचा कारण प्रामाणिकपणामुळे असं काही करण्याची माझी टाप नसायची Biggrin
तेव्हा बळच भरवल्याने चढलेलं बाळसं अता उतरायचं नाव घेत नाहीये.
_______
ROFL वेफर्स , चिवडा अशा क्षुद्र गोष्टी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला लहानपणी जेवतानाच्या चेंगटपणावरून किती बोलणी बसायची ते आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहानपणी ते 'सगळं खायचं' वालं प्रकरण खूप भोगलं.

जरा मोठा झाल्यावर आमच्याकडे एक बोका होता. त्याचे उदाहरण देत असे. तो बोका सुद्धा त्याला न आवडणार्‍या गोष्टी कधीही खात नाही (आणि तुम्ही त्याला त्याखायला लावू शकत नाही) असे सांगून सुटका करून घेऊ लागलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हा लेख हुकला होता वाटतं. मस्त लेख. लहानपणापासूनच मला 'निमूटपणे सगळं खायची' सवय आहे. लग्नानंतर या गुणाचा फार फायदा झाला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0