दैत्यपटांतील रूपके
लेखक - अमोल
(डिस्क्लेमर - या लेखात संबंधित चित्रपटांचा मुख्य कथाभाग आणि काहींबाबत रहस्यभेद आहे.)
"The problem of people who say monsters don’t really exist is that they are almost never saying it to monsters." - Senan Maguire
दैत्य, राक्षस अशा कित्येक नावांनी ओळखली जाणारी एक संकल्पना तुमच्या-आमच्या काळजाचे ठोके कायम चुकवत आली आहे. अगदी आदिम काळापासून, जेव्हा माणसाचं रूप हे अक्राळविक्राळ निसर्गासमोर एखाद्या हतबल, दुबळ्या सजीवाएवढंच होतं तेव्हादेखील, निसर्गाचा कोणताही रुद्रावतार त्याच्या दृष्टीने दैत्याचा अवतारच होता. त्याच्या मनात डोकावणारी प्रत्येक भीती, त्याच्यातल्या साऱ्या असुरक्षितता ह्यांचं काहूर ह्या दैत्य संकल्पनेला कुठेतरी खतपाणी घालून जाई. तत्पश्चात माणसाने प्रयत्नाने आपल्या भोवतालचा अंधार कमी करत नेला, आपल्या भोवतालचं प्रकाशवर्तुळ ज्ञानाच्या उजेडाने विस्तारत नेलं. पण ह्या ज्ञात जगापलीकडे असणारा अज्ञाताला सामावून घेणारा अंधार आणि त्यात अलगद जाऊन सामावलेली त्याची सगळी असुरक्षितता, यांबद्दल त्याला सतत कुतूहल, भीती आणि आकर्षण राहिलं. जेव्हा जेव्हा माणसाने कोणतीही कला आविष्कृत केली, तेव्हा तेव्हा त्याच्या मनात कायम दडून बसलेल्या ह्या संमिश्र भावनांचं प्रतिबिंब ह्या कलाविष्कारात पडलेलं आपल्याला दिसून येतं. मग चित्रपटनिर्मितीसारखी साऱ्या संवेदनांना साद घालणारी कला त्याला अपवाद कशी असेल? ‘मॉन्स्टर मूव्हीज़्’ ह्या नावाने बनवल्या गेलेल्या चित्रपटांची मालिका हेही ह्याचेच द्योतक आहे.
१९१५ सालीच पॉल वेग्नर नांवाच्या दिग्दर्शकाने आपल्या 'द गोलेम्' या चित्रपटात दैत्याचा पहिल्यांदा वापर केला. परदेशी चित्रपटांत दैत्यांची सुरुवात जरी १९१५ नंतरच झाली असली, तरी इथेही एका अर्थाने द्रष्ट्या दादासाहेब फाळक्यांनी आपला पहिला क्रमांक पटकावलाच! 'राजा हरिश्चंद्र'च्या यशानंतर फाळक्यांनी आपल्या दुसऱ्याच मूकपटाचा हिरो म्हणून चक्क भस्मासुरालाच आणलं. 'मोहिनी भस्मासुर' ह्या १९१३ साली प्रदर्शित झालेल्या मूकपटात सर्वसामान्य भारतीयाला परिचित असणारी भस्मासुराची कथा फाळक्यांनी ट्रिकसीन्ससोबत मांडली. हे करताना, भारतीयांच्या पुराणांतील रोचक आणि मनोरंजक मिथककथांना पडद्यावर आणणे, एवढाच मर्यादित विचार फाळक्यांनी केला नव्हता. 'मोहिनी भस्मासुर' पाहताना, त्या काळातल्या ब्रिटिश राजवटीचा भस्मासुर, त्यापायी एतद्देशीयांच्या भवितव्याची होणारी राखरांगोळी आणि त्यातून अपरिहार्य बनत चाललेले ह्या भस्मासुराचे पारिपत्य ह्या गोष्टी सहजी समोर येत जातात. दैत्यकथांचा साचा हाताळत असलेले फाळके आपल्या ह्या चित्रभाषेतून भावी चित्रकर्त्यांना एक नवा गुरुमंत्र देऊन गेले. भयपटांतून किंवा विशेषतः दैत्यपटांतून, प्रेक्षकाला जे पडद्यावर दिसतंय, त्यापलीकडे जाऊन बरंच काही सांगता येतं, हा तो गुरुमंत्र!
भयपटाची रचना आजही पहिल्या फळीतल्या प्रत्येक चित्रपट दिग्दर्शकाला खुणावते, कारण ह्या चित्रपटांतील सूचकतेचं मोठं सामर्थ्य. अर्थाच्या अनेक पातळ्या सुचवणे, त्यातून तत्कालीन सामाजिक-आर्थिक-राजकीय अवकाशाचा वेध घेणे व त्यावर भाष्य करणे ह्या पद्धतीच्या चित्रपटांत शक्य झालं आहे. भयपट, थरारपट, हिंसापट किंवा दैत्यपटांना 'गल्लाभरू' म्हणून हिणवून त्यांकडे काणाडोळा करणं म्हणजे ह्या शक्यतांना नाकारण्यासारखं आहे.
दैत्यकथा असो की भयकथा; ती मानवी मनातल्या आदिम भीतीच्या बस्तानावरच आपली गुजराण करत असते. श्रोत्याला धक्का देणे, दचकवणे, हा मूळ हेतू असला तरी त्याच्या मनावर परंपरांनी, धार्मिक कल्पनांनी, अतींद्रिय शक्तींविषयीच्या त्याच्या कल्पनांनी जो प्रभाव टाकलेला असतो, त्याचाच वापर दैत्यकथा/भयकथा आपल्या प्रभावनिर्मितीसाठी करत असतात. दैत्य/राक्षस म्हणजे आपल्या मनात दडून बसलेलं सारं किल्मिष, असुंदर, त्याज्य, अशिव. मग त्या त्या संस्कृतीची स्वतःची म्हणून जी जडण-घडण होते, ती तिच्या दैत्यात, राक्षसांत तशीच्या तशी प्रतिबिंबित झालेली दिसते.
भुतं, परग्रहावरील जीव, रक्त शोषणारे व्हॅम्पायर्स्, झॉम्बीज्, पशू-मानव ह्या विविध दैत्यप्रवृत्तीच्या स्वरूपांना जोडणारा सिनेप्रकार म्हणजे दैत्यपट. काही दैत्यपट हे दैत्यावर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी असले, तरी बहुतांश दैत्यपटांत मात्र त्यांचं ’दैत्य असणं' साजरं झालं आहे. दैत्याची दिग्दर्शकाने केलेली हाताळणी सजग चित्रपटप्रेक्षकासाठी मेजवानी ठरली आहे. दैत्यपटांत ज्याला अग्रपूजेचा मान द्यावा अशा 'नोस्फरातू' ह्या चित्रपटापासूनच दैत्यपटांच्या अर्थगर्भ प्रवासाची सुरुवात होते.
'नोस्फरातू - पुनरुत्थानाची कहाणी'
ब्रॅम स्टोकर ह्यांनी १८९७ साली लिहिलेली 'ड्रॅक्यूला' ही कादंबरी प्रचंड लोकप्रिय झाली आणि चित्रपटाचं माध्यम उपलब्ध होताच त्यावर चित्रपट बनवण्यासाठी जणू स्पर्धाच लागली. त्या सर्वांतला पहिला उपलब्ध आणि लक्षणीय चित्रपट महणजे 'नोस्फरातू'. १९२२ साली जर्मनीतल्या 'प्राना फिल्म्स्' ह्या स्टुडियोतर्फे हा प्रदर्शित झाला. मजेची बाब म्हणजे या स्टुडियोची ही एकमेव निर्मिती ठरली, कारण नोस्फरातूच्या वितरणानंतर काही वर्षांतच त्यांच्यावर नादारी पत्करण्याची वेळ आली! मुळात निर्मात्यांना आपला पहिलाच चित्रपट एखाद्या दंतकथेवर बनवायचा होता. एफ्. डब्ल्यू. मुरनाव ह्या दिग्दर्शकाने त्यासाठी 'ड्रॅक्यूला' कादंबरी निवडली.
'ड्रॅक्यूला'चा लेखक स्टोकर ह्याच्याशी कादंबरीच्या हक्कांसंदर्भात संपर्कही करण्यात आला होता, पण स्टोकरच्या पत्नीने मात्र ते हक्क द्यायला नकार दिला. मुरनावने त्यातून आडमार्ग शोधला आणि मूळ कथानकाचा ढाचा तोच ठेवून आणि फक्त नावं बदलून 'ड्रॅक्यूला'चा 'नोस्फरातू' झाला. स्टोकरच्या नाराज झालेल्या पत्नीने मग 'प्राना फिल्म्स्'लाच कोर्टात खेचले. प्रदर्शित झाल्यानंतर फारशी प्रसिद्धी न मिळालेला हा चित्रपट अजूनच संकटात सापडला. पुढे कोर्टाने स्टोकरच्या पत्नीचा कथानकावरील संपूर्ण हक्क मान्य करून 'नोस्फरातू'च्या उपलब्ध असणाऱ्या साऱ्या प्रिन्ट्स् जाळून टाकण्याचा निर्णय दिला. आधीच मोडकळीस आलेला 'प्राना फिल्म्स्'चा स्टुडियो ह्या तडाख्यातून काही वाचू शकला नाही. प्रिन्ट्स् नष्ट झाल्या, स्टुडियो विकला गेला आणि 'नोस्फरातू'ची कहाणी तिथेच खुंटली.
पण एवढं घडून सारंच थांबलं असतं, तर ती नियती कसली? नष्ट करायच्या प्रिन्ट्सपैकी अमेरिकेत प्रदर्शित झालेली एक प्रिन्ट बचावली. ती जिथे जिथे वितरित झाली तिथे तिथे त्याच्या अवैध प्रती निघत राहिल्या. 'नोस्फरातू'ची ख्याती हळुहळू पसरत चालली. त्या एका प्रिन्टमधून ’नोस्फरातू’ पुनरुज्जीवित झाला! ड्रॅक्यूलाप्रमाणे दिवसभर शवपेटीत आडवा पडून राहणारा आणि रात्री तीतून बाहेर येणारा 'नॉस्फरातू'देखील 'प्राना फिल्म्स'च्या 'शवपेटीतून' बाहेर पडून संचार करू लागला! त्याचा हा पुनर्जन्म आणि नंतरचा प्रवास हादेखील एखाद्या चित्रपटात शोभावा असाच आहे. पहिल्या प्रदर्शनात धड प्रसिद्धी वा यश पाहून न शकणारा हा चित्रपट आज 'कल्ट' चित्रपटांत पहिल्या क्रमांकाचा म्हणून ओळखला जातो. 'नोस्फरातू'चं अप्रतिम छायालेखन, छाया-प्रकाशाचा खेळ, स्टॉप-मोशन पद्धतीने चित्रित केलेले प्रभावी ट्रिक-सीन्स्, कथनासाठी वापरलेल्या इन्टरकटिन्ग्, मॉन्टाज ह्यांसारख्या पद्धती, ह्यांमुळे हा चित्रपट चित्ररसिकांसाठी थरारक चित्रनिर्मितीचा वस्तुपाठ ठरला आहे.
'नोस्फरातू'ची कथा सर्वपरिचित रक्तपिपासू 'ड्रॅक्यूला'च्या मिथकाची असली, तरी भयपटाच्या पेहरावातून दिग्दर्शक-पटकथाकारांनी त्याच्या कालखंडाचा रंग प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सूचित केला आहे. पहिलं महायुद्ध संपलेलं - त्यात काही पिढ्याच नष्ट झाल्याने गडद झालेलं मृत्यूचं सावट - त्यापाठोपाठ आलेल्या 'स्पॅनिश फ्ल्यू'मुळे बहुतांश युरोप गारद झालेला - जगाची जवळपास १/५ लोकसंख्या काही वर्षांत गायब करणारा तो रोग आणि त्याच्या छायेत भयग्रस्त झालेला सामान्य माणूस.. 'नोस्फरातू' पाहणाऱ्या प्रेक्षकाच्या मनात खरे दैत्य होते ते अचानक कधीही, कुठेही गाठू शकणारा हा दुर्धर आजार आणि बदलत्या सीमांसोबत येणारे परदेशी लोंढे. ह्या दैत्यांना अधोरेखित करत मुरनाव त्याच्या 'नोस्फरातू'चं भयजाल विणत जातो.
इथे 'नोस्फरातू'चं नाव ठरवण्यामागेदेखील दिग्दर्शकाचा विचार लक्षात घेणं महत्त्वाचं ठरेल. त्या शब्दाचा एक अर्थ 'रक्तपिपासू' किंवा 'मृत्यूनंतर पुन्हा जन्मलेला' असा असला तरी काही ग्रीक तज्ज्ञांच्या मते दुसरा अर्थ प्लेग पसरवणारा (उंदीर) असाही आहे. चित्रपटात 'नोस्फरातू'चा वावर हा बराचसा मानव-पशूच्या सीमेवरला आहे. त्याच्या हालचाली मानवी न भासता बऱ्याचदा उंदरासारख्या भासतात. त्याचं तीव्र नाक, सडसडीत शरीरयष्टी पाहून थोडीशी किळसच वाटावी असा आविर्भाव हे सारं त्याच्या उंदीर असण्याच्या प्रतिमेला पुष्टी देणारं. 'नोस्फरातू' हळुहळू आपल्या सावजांचा जीव घेतो आणि त्याचा दोष गावात आलेल्या प्लेगला दिला जातो. समाजाला जडलेल्या अनेक व्याधींबाबतही 'रोग एकीकडे आणि उपचार भलतीकडे' हे जे होत असतं, त्यावर 'नोस्फरातू' भाष्य करत जातो.
आज जवळपास एका शतकानंतर पाहताना ह्या चित्रपटातील काही गोष्टी खुपतातही. १९२० च्या आसपास ज्यूंच्या स्थलांतरामुळे अस्वस्थ असणाऱ्या जर्मनीच्या वंशभेदी जाणिवा त्यात स्पष्ट सापडतात. पहिलं महायुद्ध आणि रशियातील क्रांती ह्यांमुळे जर्मनीच्या दिशेनं निघालेले ज्यूंचे तांडे, ही पार्श्वभूमी मुनरावने चित्रपटात सांकेतिक रूपात का होईना, पण पेरली आहे. 'नोस्फरातू'चं जे रुपडं मुनरावनं मोठ्या मेहनतीने चितारलं, त्याचं प्रतिबिंब त्या काळच्या ज्यू व्यक्तींच्या इतर ठिकाणी केलेल्या चित्रणातही सापडतं. राजसत्तेने, तसंच काही माध्यमांनी ज्यूंना चिकटवलेले सारे दुर्गुण 'नोस्फरातू'च्या चित्रणात आढळतात. 'प्लेग आणणारे, 'उंदरासारखे', 'अशुभ', 'संकट आणणारे', इ. सारी विशेषणे त्या काळी ज्यूंसाठीही वापरली गेली आहेत, हे लक्षात येण्यासारखं आहे.
'नोस्फरातू' बनवताना दिग्दर्शकाला एक वंशवादी चित्रपटच बनवायचा होता, असं म्हणणं कदाचित धाडसाचं होईल. त्याच्या कलात्मक अस्सलतेवर आणि माध्यमाच्या सशक्त वापरावर त्यामुळे सावट येईल. पण तरीही, दिग्दर्शकाला त्या काळात लोकांच्या मनात दडून बसलेला दैत्य, लपवून छपवून का होईना पण, सर्वांसमोर आणण्याची संधी 'नोस्फरातू'नं दिली. शवपेटीतून यंत्रवत उभा ठाकणारा 'नोस्फरातू' कालांतरानं दुसऱ्या महायुद्धात नरसंहाराच्या रूपात प्रकटला, हे जगानं पाहिलंच.
एकाकी दैत्याची कहाणी : किंगकाँग
दैत्यपटांच्या इतिहासात एक कायमची दंतकथा बनून राहिलेला दुसरा दैत्य म्हणजे किंगकाँग. ह्याची लोकप्रियता फार थोड्या खलनायक भासणाऱ्या दैत्यांच्या वाट्याला आली असेल. चित्रपटापाठोपाठ चित्रपट, कार्टून्स, गेम्स, अनेक टी.व्ही. शोज्, रंगमंचावरची सादरीकरणं - किंगकाँगची पावलं कुठल्या माध्यमाकडे वळली नाहीत, असं नाहीच. १९३३ साली 'मेरियन सी कूपर'ने दिग्दर्शित केलेला 'किंगकाँग' हा किंगकाँग मालिकेतील आद्य चित्रपट. पॅसिफिक समुद्रात 'स्कल आयलंड' नावाच्या एका अज्ञात बेटावर एक चित्रपट बनवणारं पथक पोहोचतं. ह्या बेटावर काँग नावाचा एक महाकाय गोरिला राहत असतो. काँगसोबत असणाऱ्या इतर महाकाय प्राण्यांनाही काँगचं दास्यत्व जणू मान्य केलं असल्याने त्याचं नांव आपसूखच 'किंग काँग' पडतं.
किंगकाँगची दास्तान जसजशी उलगडत जाते तसतशी आपल्यालाही, वन्य पशू असलेल्या पण, एका सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेल्या प्रेमवीराविषयी आस्था वाटू लागते. किंगकाँगच्या कथारचनेत जगाच्या हस्तक्षेपापासून दूर असलेलं बेट आणि तिथे निसर्गतः नांदणारे महाकाय जीव आहेत. डार्विनच्या सिद्धांताला अनुसरून असलेले हे जीव मानवी लालसेची शिकार होतात. माणसाच्या येण्यातून सुरू झालेली ही शोकांतिका किंगकाँगच्या मृत्यूने संपते. तरुण अभिनेत्रीच्या प्रेमात असलेला हा अजस्रकाय जीव तिच्यासाठी जिवाची बाजी लावतो. इतकंच काय, तर सापळ्यात सापडून सर्वांसमोर त्याचा तमाशादेखील होतो. प्रकाशझोतांच्या प्रखर प्रकाशाने आपल्या प्रेयसीस इजा होईल की काय ह्या भीतीने ग्रासलेला किंगकाँग चक्क तिला घेऊन एम्पायर स्टेट बिल्डिंगवर चढून बसतो. अखेर विमानं त्याचा वेध घेतात, तेव्हा चित्रपटातलंच पात्र "It wasn't airplanes...It was beauty that killed the beast!", असं म्हणतं.
किंगकाँगचं दैत्य असणं आपण चित्रपटाच्या सुरुवातीला अनुभवतो. पण कथा पुढे सरकताना आपल्या मनातल्या दैत्याची जागा ही किंगकाँगवरून त्याला वापरून घेणाऱ्या, निसर्गात ढवळाढवळ करणाऱ्या मानवाने घेतलेली असते. ज्याचं बाह्यरूप आपल्याहून वेगळं, त्याला दैत्य ठरवणारा मानव स्वतःच त्याहून मोठा दैत्य ठरतो ही 'किंगकाँग'मधून अधोरेखित होणारी ठळक बाब आहे.
अलीकडच्या काळात २००५ साली 'लॉर्ड ऑफ द रिंग्स्' ह्या चित्रत्रयीच्या दिग्दर्शनामुळे प्रसिद्धीस आलेल्या पीटर जॅक्सन ह्यांनी 'किंगकाँग' पुन्हा एकदा बनवला. पीटरने किंगकाँगच्या रूपात काही बदलही केले. १९३३ चा किंगकाँग बराचसा काल्पनिक होता. नवा किंगकाँग हा अधिक शास्त्रीय माहितीवरून बेतण्यात आला. त्याचं शाकाहारी रूप लक्षात घेऊन त्याचं पोट मोठं केलं गेलं. चाल पूर्णपणे दोन पायांवरची (मानवी पद्धतीची) न दाखवता हातापायांचा वापर करणारी चाल ठरवण्यात आली. त्याच्या शोकात्मतेत भर घालणारे घटक वाढवले गेले. किंगकाँग म्हातारा होत चाललेला, १०० ते १२० वर्षांचा, फर पांढरी पडत चाललेला असा दाखवण्यात आला. दररोजचं जगणं हा संघर्ष असणाऱ्या बेटावर १०० ते १५० वर्षांचं आयुष्य सोपं नसणार. त्यानुसार, त्याच्या खुणा जखमांच्या रूपात अंगभर वागवणारा, जबडा वाकडा झालेला किंगकाँग दाखवला गेला. लढत लढत जगत राहणाऱ्या किंगकाँगच्या आयुष्यात अखेर आलेल्या प्रेमामुळे होत जाणारी त्याची अनिवार्य शोकांतिका त्यामुळे जास्त गडद झाली. किंगकाँग म्हातारा झाला, पण त्याची वेदना मात्र तरुणच राहिली!
गॉडझिला - नक्की दैत्य कोण?
१९५४ साली जपानमध्ये प्रदर्शित झालेला 'गॉडझिला' हा चित्रपट जपानी दैत्यपटांमधला पहिला सर्वाधिक यशस्वी दैत्यपट म्हणून ओळखला जातो. 'किंगकाँग'सारख्याच अमाप लोकप्रियतेचं भाग्य 'गॉडझिला'ला लाभलं. अशा स्वरूपाच्या चित्रपटांना जपानमध्ये 'कायजू' चित्रपट म्हणून ओळखलं जातं. कायजू म्हणजे कोणतीही विचित्र वा सामान्येतर अशी प्रजाती. 'गॉडझिला' चित्रपटाचा नायक असणारा गॉडझिला हा आण्विक प्रारणांमुळे समुद्रातल्या सर्वसामान्य जिवात जनुकीय बदल होऊन महाकाय बनलेला. 'गॉडझिला' हे जरी परदेशी पद्धतीने उच्चारलेलं नाव असलं तरी त्याचं मूळ जपानी रूप आहे - 'गोजिरा'. 'गोजिरा' हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. गोरिया (गोरिला) आणि कुजिरा (व्हेल मासा). समुद्रात झालेल्या अणुस्फोटातल्या प्रारणांमुळे जन्मलेला गोजिरा हा समुद्रातून बाहेर येऊन हाहा:कार माजवतो, अशी ह्या दैत्यपटाची मूळ कल्पना. 'गॉडझिला' साच्यातले चित्रपट जपानी भाषेत 'तोकसत्स' पद्धतीची करमणूक म्हणून ओळखले जातात. तोकसत्स म्हणजे ज्यात हाणामारी, स्पेशल इफेक्टस् खच्चून भरलेले आहेत, अशा पद्धतीचे चित्रपट / कार्यक्रम (दूरदर्शनवर ८०-९०च्या दशकात आलेली 'जायंट रोबो' ही मालिकाही त्यातलीच). तोकसत्स पद्धतीची करमणूक ही जपानी संस्कृतीत रुजलेली आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे पारशी रंगमंचाने ट्रिकसीन्स् व संवादफेकीच्या संदर्भात मराठी नाटकं प्रभावित केली, तशीच जपानी रंगमंचावरील कळसूत्री बाहुल्या व त्यांसोबतचे स्पेशल इफेक्टस् ह्यांनी तोकसत्स करमणुकीचा पाया घातला.
जपानच्या 'गॉडझिला'च्या धर्तीवर बनलेल्या अनेक कायजू दैत्यपटांत मूळ कायजू आपली बाजू 'सत्-असत्'च्या आदिम लढाईत कायम बदलताना आढळून आला आहे. कधी सैतानाचा उजवा हात असलेला कायजू सत्प्रवृत्तींकडून समूळ नष्ट होतो तर कधी तो सैतानाची बाजू न घेता नुसताच विध्वंस करताना दिसतो. काही वेळा तर खलप्रवृत्ती सोडून कायजू सत्प्रवृत्तीच्या मदतीला आल्याची उदाहरणंही जपानी चित्रपटात आहेत. 'गॉडझिला'च्या संदर्भात नक्की कायजू कोण आहे ते ठरवण्यासाठी चित्रपटाची जन्मकथा पाहणं मनोरंजक ठरेल.
मार्च १९५४ चा काळ. ट्युना माशांच्या मासेमारीसाठी गेलेली एक जपानी नाव मार्शल आयलन्डस् ह्या अमेरिकेच्या आधिपत्याखालील बेटांजवळ पोहोचली. त्या वेळेस अमेरिका थर्मोन्यूक्लिअर पद्धतीच्या अणुबॉम्बची चाचणी त्या बेटांवर करत होती. चाचणीतील किरणोत्साराने भरलेली राख अस्ताव्यस्त वाऱ्यामुळे ह्या जपानी बोटीवर पसरली. बोट ज्या वेळेस परतली, त्या वेळी त्यातून आलेले सर्व नाविक व मासे तीव्र किरणोत्साराने ग्रस्त असल्याचं अनुमान काढण्यात आलं. त्यांतील एक नाविकही कालांतराने मृत्यू पावला. ह्या घटनेनं जपानी जनमानसात खळबळ उडाली. १० वर्षे आधीच जपानने हिरोशिमा-नागासाकीत किरणोत्साराची धग अनुभवली होती. 'अणुबॉम्ब' आणि 'किरणोत्सार' हे त्यांचे नवे 'कायजू' होते. हे सारं पाहणाऱ्या 'इशिरो होन्डा'च्या मनात वेगळाच विचार घोळत होता. अशाच किरणोत्सर्गाने जर समुद्रातील कोण्या जिवाचा 'कायजू' केला आणि तोच जपानच्या किनाऱ्यावर आला तर काय हाहाकार उडेल, ही कल्पना त्याच्या मनात आली आणि त्यातूनच ’गॉडझिला’चं कथानक आकार घेत गेलं.
आज गॉडझिला’ पाहताना खरा कायजू कोण हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाला पडतो. ’गॉडझिला’चं यश हेच, की खरा कायजू कोण, ह्याविषयी आपण तर्क बांधत राहतो. महाकाय आकाराचा प्रत्यक्ष गॉडझिला हे तर कायजूचं थेट दृश्य स्वरूप. आण्विक क्षमता, जिच्या साह्याने गॉडझिला बनला आणि मानवजातीला गिळंकृत करू पाहू लागला, ती कायजूचं आणखी एक रूप. तिसरं, महत्त्वाचं रूप आहे - स्वतः जपान. आपल्या महत्त्वाकांक्षेला बळी पडून स्वतःच कायजू बनलेलं राष्ट्र! जपानच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला तर स्पष्ट दिसेल, की धनधान्य असोत वा खनिजं, जपानच्या बाबतीत निसर्गाने हात जरा आखडताच घेतला आहे. पूर्ण देशात जमिनीचा फक्त थोडाच हिस्सा शेतीयोग्य आहे. असा देश स्वयंपूर्ण होणं अशक्यप्राय आहे. कच्चा माल, खनिजं, ह्यांसाठी जपानला ज्या आशियाई व युरोपीय देशांवर अवलंबून राहावं लागत होतं, त्याच देशांच्या समुद्रमार्गांवर पाश्चिमात्य भांडवलशाही सत्तांनी आपली पकड निर्माण केली होती. स्वतःचा गळा असा आवळला जात असताना १९४१ साली अमेरिकेने जपानच्या तेल आयातीवर संपूर्ण निर्बंध लादून जपानची अभूतपूर्व कोंडी केली. त्यानंतर जवळपास बळजबरीने युद्धात उतरलेला जपान हा प्राथमिक यशानंतर कोलमडतच गेला. हजारो वर्षं एकही युद्ध न हरलेलं राष्ट्र, हिरोशिमा-नागासाकी घटनेनंतर संपूर्ण शरण आलं. गॉडझिलाचं पाण्यातून बाहेर येणं, ड्रॅगनप्रमाणे किरणोत्साराचे फुत्कार टाकणं आणि शेवटी गलितगात्र होऊन निघून जाणं बऱ्याच प्रेक्षकांना जपानच्या स्वरूपातच पाहावंसं वाटलं.
पण ह्या सर्व कायजूंच्या पलीकडे 'गॉडझिला'चा अजून एक कायजू आहे. चित्रपटाच्या भाषेत पाहू गेलं तर हा दैत्य खऱ्या अर्थाने 'गॉडझिला'तला दैत्य बनतो. तो दैत्य आहे अमेरिका. दिग्दर्शक इशिरो होन्डा स्वतः जपानी सैनिक म्हणून चीनविरुद्ध लढला आहे. 'गॉडझिला'चे गाजलेले स्पेशल इफेक्टस् सांभाळणारा एनी त्सुबुराया हा जपानी माणूस नाविक दलाचे जाहिरात/प्रसारपट (propaganda films) बनवायचा. त्याने छोट्या प्रतिकृतींसह बनवलेले प्रसारपट इतके जिवंत भासत की युद्धानंतर ते जेव्हा शत्रूच्या हाती पडले तेव्हा त्यांनी ते युद्धाचं खरंखुरं चित्रण आहे असं मानायला सुरुवात केली. 'गॉडझिला'ला पार्श्वसंगीत देणारा संगीतकार जपानच्या पायदळ आणि नाविक दलासाठी 'मार्चिन्ग सॉन्ग्स्' रचत असे. 'गॉडझिला'च्या निर्मितीमागचे हे तीन प्रमुख शिलेदार अशा पद्धतीने संपूर्णपणे सैनिकी पार्श्वभूमीचे होते. साहजिकच या तिघांनी घडवलेली संकेतात्मक युद्धनीती चित्रपटातून स्पष्ट दिसत राहते. इशिरो होन्डाला गॉडझिलात दिसली अमेरिकेची अनिर्बंध सत्ता. 'गॉडझिला'च्या पटकथेतील घटनाक्रम विशेष सूचक आहे. चित्रपटात गॉडझिला दिसण्याआधी काही बुडालेल्या जहाजांची आणि नौकांची दृश्ये आहेत. जपानवर प्रत्यक्ष हल्ला करण्याआधी अमेरिकेच्या पाणबुड्यांनी जपानी नौका बुडवल्या होत्या आणि तिथूनच अमेरिका गॉडझिलाप्रमाणे अरिष्ट म्हणून उभी राहिली, हेच दिग्दर्शकाला सुचवायचं असावं.
दुसऱ्या महायुद्धाच्या अभ्यासकांच्या मते, जपानी नाविक दलाचा हा पराभव दाबून टाकण्याचा प्रयत्न जपानी सैन्यप्रमुखांनी केला होता. चित्रपटातही बुडलेल्या जहाजांच्या बातम्या दाबून टाकण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे दाखवले आहे. गॉडझिलाचा जपानच्या भूभागावरचा प्रवास आणि महायुद्धातली अमेरिकन सैन्याची आगेकूच ह्यांतही साम्यस्थळे आहेत. गॉडझिलाने शेवटी तोक्योवर केलेलं आक्रमण हे अमेरिकेच्या तोक्योवरील हवाई हल्ल्याचं द्योतक आहे. गॉडझिला उभा करताना त्यात व्हेल आणि गोरिलाचं मिश्रण करत दिग्दर्शकाने संपूर्ण पौर्वात्य अशा ड्रॅगनच्या संकल्पनेचीही सरमिसळ केली आहे. ड्रॅगन आगीचे लोळ ओकतो, तर गॉडझिला आण्विक प्रारणं. ती प्रारणं पाहून, अणुशक्तीच्या माजाने अंध होत विरोधकांना भस्मसात करणाऱ्या अमेरिकेची आठवण होणं अटळ आहे. 'गॉडझिला'च्या जपानी प्रेक्षकांनी अजून एक सूक्ष्म फरक दाखवला आहे. जपानी भाषेच्या दोन लिप्या - 'काताकाना' आणि 'हिरागाना'. यांमधील काताकाना ही कटाक्षाने परदेशी शब्दांसाठी वापरतात. 'गोजिरा' हे चित्रपटाचं मूळ नांव पोस्टरवर लिहिताना ते काताकानामध्ये लिहून गॉडझिला परदेशी असल्याचं दिग्दर्शक सुचवतो.
'गॉडझिला' प्रदर्शित होण्याच्या खूप आधी स्टॉप-मोशन पद्धतीने चित्रित केलेला अमेरिकन 'किंगकाँग' जगभरात प्रदर्शित झाला होता. स्टॉप-मोशन वेळखाऊ आणि खर्चिक असल्याने 'गॉडझिला'च्या निर्मात्यांनी काटकसरीचा उपाय म्हणून गॉडझिलाचा पोषाख (सूट) बनवला. त्यात एका स्टंटमॅनला बसवून इतर स्थळं व इमारतींच्या त्या प्रमाणात प्रतिकृती तयार करून चित्रण केलं गेलं. ही पद्धत एवढी चालली की पुढे 'सूट मोशन' या नावाने ती प्रसिद्ध झाली. पण हा बनवलेला सूट इतका घट्ट नि जड होता, की त्यात स्टंटमॅनला धड शिरणं वा हालचाली करणंही मुश्किल होई. मग बऱ्याच बदलांनंतर नीट हालचाली करता येऊ लागल्या. पण त्यात शिरलेला माणूस घामाच्या धारांनी डिहायड्रेशन होऊन बेशुद्ध होई. ३ मिनिटांहून अधिक काळ चित्रण करणं अशक्य होई. अक्षरशः तोटी लावून त्या सूटमधून निथळणारा घाम बाहेर काढावा लागे. मानवनिर्मित गॉडझिलाच्या नुसत्या सूटची ही गाथा! प्रत्यक्षातल्या गॉडझिलाचा आण्विक पराक्रम पाहिलेली पिढी कशातून गेली असेल, ह्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.
जपानमध्ये 'गॉडझिला' प्रचंड यशस्वी झाला. यथावकाश अमेरिकेतही तो प्रदर्शित झाला. अमेरिकन नागरिक पडद्यावरील गॉडझिलाच्या हालचाली पाहून हसू लागले. स्टॉप-मोशन हालचालींना सरावलेल्या अमेरिकनांना सूट-मोशन मधील मानवी हालचाली गमतीशीर वाटत होत्या! पण त्याच प्रेक्षागृहात बसलेल्या जपानी नागरिकांचे डोळे मात्र डबडबले होते. त्यांच्या दृष्टीने त्याच हालचाली 'मानवी' होत्या. त्याचं चवताळणं 'मानवी' होतं. एकाच दैत्याच्या दैत्यभावनेला दिलेली ती व्यक्तिनिष्ठ, संस्कृतिनिष्ठ पावतीच होती.
जपानी भुतं - अमेरिकन भुतं
देशोदेशींच्या दैत्यकथा आपल्या संस्कृतीतल्या भुता-राक्षसांच्या कहाण्या मनोरंजकपणे पडद्यावर मांडत असतात. अमेरिकेत भयपट बनवण्यात हातखंडा असलेली एक संपूर्ण इंडस्ट्री आहे. हॉलिवूडच्या ह्या भयपटांना एक विशिष्ट चाकोरी आहे. ७०च्या दशकापासून 'स्लॅशर फिल्म्स्' नामक भयपटांनी तर उच्छाद मांडला आहे. तरुणांची टोळकी, त्यातल्या एकेकाचा खून होत जाणं, जो पापी आहे त्याचा खून आधी होणं आणि सर्वात शेवटी सत्त्वशील व्यक्ती जिवंत राहणं, हे ह्या चित्रपटांचं कळीचे सूत्र. स्त्रीदेहाचं प्रदर्शन, भरपूर रक्तपात, उबग आणणारी हिंसा आणि किळसवाण्या पद्धतीने केलेले मृत्यूचे प्रदर्शन ही ह्या चित्रपटांची वैशिष्ट्यं होती. त्यांत एक मोठा बदल ९० नंतरच्या दशकात झाला. 'रिंग', 'पल्स', 'ग्रज', 'डार्क वॉटर' असे अनेक भयपट हॉलिवूडमध्ये आले ते मूळचे जपानी होते. 'जे हॉरर’ (जॅपनीज़् हॉरर) हा प्रकार अमेरिकन प्रेक्षकांनी रीमेकच्या स्वरूपात पाहिला. त्यांनी प्रभावित होऊन अनेक प्रेक्षकांनी मूळ जपानी चित्रपटही आवर्जून पाहिले. मात्र त्यांना जपानी भुतांची संकल्पना समजून घ्यायला वेगळे प्रयत्न करावे लागले.
जपानी संस्कृतीतलं भुताचं स्थान आणि जपानी मनोवृत्ती समजून घेतल्याशिवाय जपानी दैत्य/भयपट पूर्णपणे कळणं अशक्य आहे. जपानी माणसाच्या वागण्याच्या दोन तऱ्हा असतात. 'आमोटे' म्हणजे सार्वजनिक जीवनात तो कसा वागतो आणि 'उरा' म्हणजे खासगी जीवनात - म्हणजे मित्रांसोबत, नातलग-कुटुंबीयांसोबत तो कसा वागतो. जपानी शाळांतून 'आमोटे' आणि 'उरा'चं पालन कसं करायचं ह्याची शिकवण अगदी लहानपणापासून दिली जाते. एका सज्ञान जपान्याला आपल्या खासगी भावना एका विशिष्ट ठिकाणी / विशिष्ट वेळीच व्यक्त करण्याची सवय करून दिली जाते. सुख-दु:खाचं जाहीर प्रदर्शन त्यांना करता येत नाही. त्यामुळे आयुष्यात बऱ्याचदा तणाव निर्माण होतो. ज्यांना हे नियम जुलमाचे, बळजबरीचे वाटतात त्यांना बहिष्कृततेची भावना ग्रासू शकते. मानसिकदृष्ट्या कुटुंबापासून तुटत चाललेल्या व्यक्तीच्या दु:खाचं उत्तर कुटुंब हेच आहे अशी जपानी मानसिकता आहे. समाजाच्या नियमांना मोडून टाकणाऱ्या व्यक्तीचं काय करायचं ह्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. ह्या प्रश्नाला थेट भिडणं जपानी समाजाने टाळलं आहे. त्याचा थेट परिणाम म्हणून जगात सर्वाधिक आत्महत्या जपानमध्ये होत असताना दिसतात.
मानसिक ताणतणाव, सामाजिक बंधनं ह्यांच्यातून तयार झालेले दैत्य जपानच्या समाजमनाला पछाडत असतानाच दंतकथा, समजुती, कहाण्या ह्यांच्या माध्यमातूनही जपानने आपल्या दैत्यांचं साम्राज्य उभं केलं आहे. त्या भयपटांत दिसणारं वातावरण समजून घेण्यासाठी हे सांस्कृतिक संदर्भ सहाय्यकारी ठरतील. जपानमध्ये मुख्यत्वे बौद्ध आणि शिंतो हे दोन धर्म पाळले जातात. सामान्य जपानी व्यक्तीच्या आयुष्यात ह्या दोन धर्मांच्या चालीरीतींची सरमिसळ आढळते. उदा. लग्नाच्या पद्धती शिंतो असल्या तरी मृत्यूविषयक साऱ्या अंतिम क्रिया बौद्ध पद्धतीने होतात. बौद्ध शिकवणीत मृत्यू आणि जन्म ह्यांचं चक्र अविरत असल्याचा उल्लेख आहे. त्यातून सुटण्यासाठी ह्या चक्राचं ज्ञान हीच मुक्ती समजली जाते. शिंतो मात्र मृत्यूपर्यंतच्या घटनांपर्यंतच मर्यादित राहिला असून मृत्यूनंतरच्या जगावर त्याचं भाष्य फार नाही.
जपानच्या ह्या धार्मिक सांस्कृतिक पार्श्वभूमीत 'यूरेई'चं स्थान सर्वात महत्त्वाचं आहे. यूरेई म्हणजे आत्मा किंवा भुतं. जपानी समजुतींच्या मते भुतं वा आत्मे त्या जगात अडकून पडण्याची दोन कारणं असतात. एक - कोणती तरी अतृप्त इच्छा किंवा दोन - एखादी अतिशय प्रखर अशी भावना! युरेई झालेली व्यक्ती ज्या प्रखर भावनांमुळे ती मुळात युरेई झाली, त्या भावना विसरू शकत नाही, असा समज आहे. युरेईंना सहसा पांढऱ्या कपड्यात व मोकळ्या केसांसह दाखवण्याचा प्रघात आहे. जपानी परंपरेत पांढरे कपडे सहसा मृत्यूप्रसंगीच्या कार्यक्रमांत तर मोकळे केस सोडणे हे अशुभ प्रसंगात करतात. अमेरिकन भयपटांत अभावानेच स्त्री ही भुताच्या रूपात दाखवली जाते. याउलट जपानी भयपटांत हटकून स्त्रीच भुताचं पात्र असते. स्त्रिया भावना प्रखरपणे समजून घेऊ शकतात आणि त्या जास्तीत जास्त वेळ त्यांना कवटाळून बसू शकतात, हे त्यामागचं कारण आहे.
जपानच्या तत्त्वज्ञानात असुरक्षितता हे महत्त्वाचं तत्त्व आहे. जपान्यांच्या मते, जग हे काही नियमांवर चाललेलं असलं, तरी हे नियम समजून घेणं मानवी शक्तीपलीकडचं आहे. त्यातच तंत्रज्ञान आणि विज्ञान हात जोडून उभे असले, तरीही जपानी मानसिकता त्यामुळे सुरक्षित होत नाही. आधुनिकतेमुळे भुतं किंवा युरेई नष्ट होऊ शकत नाहीत, ह्यावर त्यांचा विश्वास आहे. ह्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भयपटांतल्या कल्पना व विशिष्ट प्रसंग कळण्यास मदत होते.
अमेरिकेत 'रिंगू' नावाच्या जपानी चित्रपटाचा 'द रिन्ग्' नावाने रीमेक करण्यात आला. हा चित्रपट जपानी दैत्यपटाचं प्रातिनिधिक उदाहरण ठरेल. हा चित्रपट एका दंतकथेभोवती फिरतो. एक चित्रफीत, ज्यात काही विचलित करू शकणारी दृश्ये आहेत, ती पाहिल्यानंतर 'तुमचा ७ दिवसांत अंत होईल', असं सांगणारा एक फोन तुम्हांला येतो, अशी ती दंतकथा. कथेची नायिका ती चित्रफीत पाहते. आपण ७ दिवसांत मरणार असे कळल्यावर, नायिका ती फीत कुठून आली ह्याचा शोध घेते. शोधात तिच्या असं लक्षात येतं, की एका छोट्या गावात एका सधन कुटुंबात दत्तक म्हणून गेलेल्या एका मुलीच्या येण्याने अचानक संकटे येऊ लागली. प्राण्यांचा मृत्यू, इतरांना होणारे दृश्यभास, ह्या साऱ्यांमुळे त्या मुलीला पहिल्यांदा डांबून ठेवण्यात येतं आणि नंतर मनोवैज्ञानिकांकडे पाठवलं जातं. तिला नंतर विहिरीत ढकलून मारण्यात आलं हे कळल्यावर नायिका त्या विहिरीतून तिचा सापळा मिळवते व तिला 'मुक्त' करते. आता आपण वाचलो, अशी नायिकेची समजूत होते, पण प्रत्यक्षात चित्रफीत पाहिलेल्या नायिकेच्या प्रियकराला मात्र ती मुलगी त्या फितीतून बाहेर येऊन 'मारते'. अखेर नायिकेला लक्षात येतं, की जिवंत राहण्यासाठी त्या फितीची एक प्रत करून घेणं आवश्यक आहे. ती तसं करते आणि ही दंतकथा सुरू राहण्यासाठीची तयारी जणू पूर्ण करते.
'रिंगू'च्या कथेतली युरेईदेखील स्त्रीच आहे. स्वतःच्या आईवर अत्यंत प्रेम असणारी, पण आईकडूनच विहिरीत ढकलली गेलेली ही युरेई दु:ख आणि सूड ह्यांच्या सीमारेषेवरच्या प्रखर भावनांनी वेढली जाते. तिने बनवलेली चित्रफीत लोक पाहतात आणि विहिरीत पडूनही ही युरेई तिथून तिच्या शापाचा प्रभाव लोकांपर्यंत पोहोचवते.
टीव्हीत दिसणाऱ्या विहिरीतून बाहेत पडत, निथळत्या अंगाने आपल्या भक्ष्याकडे वाटचाल करणारी, टीव्हीतून बाहेर पडणारी युरेई पाहणे, हा एक रक्त थिजवणारा अनुभव आहे.. ती चित्रफीत पाहणारी व्यक्ती सात दिवसांत मरते, पण फितीची नक्कलप्रत बनवणारी व्यक्ती मात्र जिवंत राहते. असं का, ह्या प्रश्नाचं उत्तर चित्रपटात नाही. पण आधी म्हटल्याप्रमाणे, जपानी प्रेक्षकांना त्या प्रश्नाच्या उत्तराची जरूरदेखील नाही, कारण त्यांच्या विश्वाच्या आकलनात विश्वाच्या रचनेचे नियम हे मानवाच्या समजण्यापलीकडचे आहेत. साहजिकच तिथे अशा प्रश्नाला थारा नाही.
पण एक दैत्यपट म्हणून 'रिंगू'ने उपस्थित केलेले प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. रिंगूच्या युरेईला युरेई बनण्यासाठी प्रवृत्त करण्यामागेदेखील जपानी समाजाच्या दगडी समजुती आहेत. एकसंध समाज बनवताना वेगळं, फटकून वागणाऱ्याला इलाज करण्यासाठी नेणं, त्याला समाजापासून वेगळं करणं वा त्याचा थेट जीव घेणं ह्या प्रवृत्तीतच युरेईची बीजं आहेत. जपानी भयपटांमध्ये बऱ्याचदा युरेई नेहमीच्या वापरातील वस्तूंचा आसरा घेतात. त्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूही आल्याच; जसे 'रिंगू'मध्ये युरेई माध्यम म्हणून चित्रफीत वापरते. भौतिक प्रगती व सुखाच्या लालसेपायी माणसाने उपकरणं निर्माण केली खरी, परंतु ती त्याच्या आदिम भीतीवर प्रभावी उतारा ठरू शकली नाहीत, हा 'रिंगू'चा गर्भित संदेश आहे. टीव्हीचा पडदा भेदून बाहेर येणारी युरेई हा जपानी समाजमनाला दाखवलेला आरसा आहे. केवळ तांत्रिक प्रगती आणि सुख-चैनीत रममाण राहिल्याने आत चालू असलेला अंतर्विरोधाचा संघर्ष दाखवता येणार नाही. त्या प्रश्नांना तोंड द्यावंच लागेल. नायिकेने स्वतःपुरता स्वतःच्या जगण्याचा संपवलेला प्रश्नदेखील तात्पुरता आहे, कारण त्या चित्रफितीची प्रत करतान दुसऱ्या कुणीतरी ती पाहण्याची शक्यता तिथे तयार केली आहे. तिचा अस्तित्ववादी निर्णयही युरेईचा विजय आहे. या प्रश्नांना भिडल्याशिवाय 'युरेई'चे उच्चाटन अशक्य आहे.
काही दृश्य, काही अदृश्य दैत्य
दैत्यपटांचा आढावा घेताना अलीकडच्या काही चित्रपटांचा उल्लेख करावाच लागेल. २००६ साली दक्षिण कोरियात बनलेला 'द होस्ट्' हे एक ताजे उदाहरण. 'बॉन्ग् जॉन हू' ह्या ताज्या दमाच्या दिग्दर्शकाने त्यात द. कोरियासाठी अतिमहत्त्वाच्या मानल्या गेलेल्या 'हान' नदीची पार्श्वभूमी घेतली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीस हान नदीत अमेरिकेच्या सैन्यातील पॅथॉलॉजिस्ट २०० बाटल्या फॉर्मल्डिहाईड रसायन हान नदीत फेकून देतात. त्याच्या परिणामाने 'लॉकनेस'सारखा दिसणारा एक मोठा समुद्री जीव तयार होतो. नदीकाठी छोटेखानी हॉटेल चालवणारा 'गन्ग्-डू' हे चित्रपटाचे मुख्य पात्र. तो महाकाय समुद्री प्राणी किनाऱ्यावर येऊन लोकांना जखमी करत असताना त्याच्या तडाख्यात गन्ग्-डूची मुलगी सापडते. हा प्राणी एखाद्या विषाणूने ग्रस्त झाला असून विषाणूसाठी तो 'होस्ट' बनला असल्याची सरकारची समजूत होते. ह्या होस्टच्या संपर्कात आलेला गन्ग्-डूच्या संपूर्ण परिवाराला वेगळे करण्यात येते, त्यांची कसून तपासणी होते. त्या दरम्यान गन्ग-डूचा परिवार स्वतःची सुटका करून घेतो व अखेरीस 'होस्ट्'ला परतवून लावून गन्ग्-डू आपल्या मुलीची सुटका करण्यात यशस्वी होतो. पुढे प्रेक्षकांना कळतं, की ज्या विषाणूला सरकार इतकं घाबरत होतं, तो अस्तित्वातच नाही. मग 'द होस्ट्' नावाचं प्रयोजनच काय? जर तो महाकाय प्राणी होस्ट् नव्हता, तर मग चित्रपटातला होस्ट् कोण?
'द होस्ट्' पाहताना केवळ एक दैत्यपट म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर फार महत्त्वाचं ठरत नाही, परंतु ज्या परिप्रेक्ष्यात चित्रपट घडतो, त्याचा विचार करू जाता ह्या नावामागचं रहस्यही उलगडतं. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातली युद्धसदृश्य परिस्थिती जगाला नवीन नाही. अमेरिकेने ह्या संघर्षात उघडपणे द. कोरियाची बाजू घेतलेली आहे. इतकंच नव्हे, तर द. कोरियात गेली कित्येक वर्षं अमेरिकेचे सैन्य तळ ठोकून आहे. सुरुवातीस संरक्षण करण्यास आलेले हे पाहुणे आता मर्यादेपलीकडे राहिल्याने कोरियन जनतेला नकोसे झाले आहेत. अमेरिकन सैन्याच्या वसाहतीसोबतच आलेली भोगवादाची संस्कृती कोरियन जनतेस बेचैन करते आहे. तिथल्या संस्कृतीचा, सांस्कृतिक मानचिन्हांचा अनादर त्यांना खुपतो आहे. कोरियन स्त्रियांच्या अमेरिकन सैन्याच्या मनोरंजनासाठी केलेल्या वापरामुळे त्यांना दुखावल्यासारखे झाले आहे. म्हणूनच चित्रपटाच्या सुरुवातीस अमेरिकन सैन्याने हान नदीचे केलेले प्रदूषण दाखवून दिग्दर्शकाने विषाणू कोण हे सूचित केले आहे. त्यायोगे, ह्या विषाणूला थारा देणाऱ्या, होस्ट् असणाऱ्या, द. कोरियाने केलेला हा सणसणीत निषेध आहे.
ब्रिटनमध्येदेखील 'नील मार्शल' ह्या दिग्दर्शकाने एका गुंतागुंतीच्या विषयावर असणाऱ्या शक्यता दैत्यपटांद्वारे मांडल्या आहेत. त्याच्या 'द डीसेन्ट्' [The Descent] (२००५) ह्या चित्रपटाची 'सारा' ही नायिका. नवरा आणि ५ वर्षांची मुलगी हे तिचे कुटुंब. चित्रपट सुरू होताना सारा तिच्या ज्यूनो आणि बेथ या मैत्रिणींसह 'रिव्हर राफ्टिन्ग'चा थरार अनुभवताना दिसते. सुरुवातीच्या काही मिनिटांत साराच्या मैत्रिणींचा धाडसी स्वभाव आणि कोणत्याही अनुभवास थेटपणे भिडण्याची त्यांची वृत्ती दिसते. सोबत, सारा आणि तिच्या नवऱ्यातला संवाद तुटत चालला आहे, तो तिच्या नकळत तिच्या जिवलग मैत्रिणीशी जवळीक साधतो आहे असं दिसतं. पुढे साराचं कुटुंब घेऊन जाणाऱ्या गाडीला जीवघेणा अपघात होतो. इस्पितळात सारा शुद्धीवर येते, तेव्हा तिचा पती व मुलगी तिला सोडून गेल्याची जाणीव तिला होते. तिला दु:खातून बाहेर काढण्यासाठी ज्यूनो आणि बेथसह तिच्या आणखी दोन मैत्रिणी तिला अमेरिकेतील अॅपलेशियन पर्वतरांगातल्या एका गुहेत नेण्याची मोहीम आखतात. पण ठरवलेल्या गुहेत न नेता, दुसऱ्या एका कुणीच तोवर न गेलेल्या गुहेत ज्यूनो त्या सगळ्यांना घेऊन जाते. त्या गुहेत पहिल्यांदा उतरल्यामुळे, ती गुहा त्या चमूच्या नावाने ओळखली जावी, अशी तिची इच्छा असते. परंतु, प्रत्यक्षात गुहेत उतरल्यावर सारा एका कपारीत अडकते. तिला बाहेर काढलं जाताना, गुहेचा एक भाग जमीनदोस्त होतो. मिळणारी वाट पकडत ते सारे खाली उतरू लागतात. साराला अंधारात कुणीतरी दिसल्याचा भास होतो. नंतर हळुहळू प्रत्येकाला कळत जातं, की त्या गुहेत मानवसदृश पशूंची वस्ती आहे. ज्या प्राचीन काळात माणूस गुहेत वास्तव्य करत होता, त्या वेळपासून बाहेरच्या जगात न गेलेले हे जीव तशाच रानटी आदिम अवस्थेत तिथे राहत आहेत. त्यांची पाहण्याची शक्ती पूर्ण नष्ट झाली असली तरी त्यांची घ्राणेंद्रिये तीक्ष झाली आहेत. माणसांची शिकार करण्यात ते पटाईत झाले असले, तरी ह्या दैत्यांचा मुकाबला करणे अशक्य नाही. साराच्या काही मैत्रिणी त्यांच्या सहज शिकार होतात, तर एक मैत्रीण ज्यूनोकडूनच अजाणतेपणी जखमी होते. ही मैत्रीण मग साराला, ज्यूनोवर विश्वास टाकू नको, असा सल्ला देते. सारा आणि ज्यूनो एकत्रितपणे गुहेतल्या दैत्यांशी मुकाबला करतात आणि ज्यूनोला मागे सोडून सारा घरंगळत खाली येते. साराला वाट सापडली की काय, असे आपल्याला वाटतानाच सारा तिच्या मृत मुलीसोबत सहावा वाढदिवस साजरा करताना दिसते. क्षणभर कॅमेरा मागे जातो आणि मुलीसोबत राहणारी सारा प्रत्यक्षात गुहेतल्याच हाडांच्या ढिगावर झोपली आहे, असे दिसते. गुहेतल्या दैत्यांचे आवाज जवळ येत जातात आणि चित्रपट संपतो.
चित्रपट संपल्यावर प्रश्न उभा राहतो, की साराचं गुहेत येणं, तिच्या मैत्रिणींचं मारलं जाणं, हे आपल्या डोळ्यासमोर दिसलं, पण ते तसंच खरं घडलं का? चित्रपट पुन्हा पाहिला तर अर्थाच्या नव्या शक्यता दिसू लागतात. ढोबळपणे पाहता, गुहेत एक चमू शिरला आणि गुहेतल्या दैत्यांनी त्यांना ठार केलं, अशी गोष्ट दिसते. पण नीट पाहू जाता दिग्दर्शकाने जाणीवपूर्वक पेरलेल्या संकेतांचं दर्शन होत जातं. मोहिमेवर जाण्याआधी सारा औषधाच्या काही गोळ्या खाते. मानसिकदृष्ट्या खचलेली सारा उभारी येण्यासाठी वैद्यकी सल्ला घेत असणार हे स्पष्ट होते. पुढे ज्यूनो गुहेत उतरताना काय काय होऊ शकतं, त्या शक्यतांची यादी वाचते. त्यात दिशाहीन वाटणं, गुंगी येणं, भास होणं, ऑक्सिजन कमी पडल्याने चक्कर येणं, ह्या साऱ्यांचा समावेश असतो. त्या गुहेत दैत्य प्रथम दिसतात फक्त साराला. ती आधीच प्रचंड धक्क्यात आहे, त्यात औषधांचा प्रभाव, त्यात तिला गुहेत अडकावं लागलं आहे. ह्या साऱ्याचा एकत्रित परिणाम होऊन तिच्या डोक्यातच तर ते दैत्य तयार झाले नसावेत? मानसिक तणावात साराच ते दैत्य मनात बनवते आणि भासाच्या भरात आपल्याच मैत्रिणींचे खूनही पाडते. चित्रपटाच्या शेवटी तिला दिसलेलं तिच्या मुलीचं रुपडं आणि सोबत तिच्या मनातच रुंजी घालणारे दैत्यांचे आवाज, हेच खरं वास्तव असावं. प्रेक्षक म्हणून जरी तिच्या प्रत्येक मैत्रिणीवर ती हल्ला करताना दिसली, तरी खरा हल्ला हा भीती आणि तणावाने सारासार विचारशक्तीवर केलेला आहे.
'The Descent' ह्या नावातलं खाली जाणं हे गुहेत, विवरात खाली जाणं नसून साराच्या अंतर्मनात खोल जाणं आहे. तिथून भीतीच्या आणि वेडाच्या गर्तेत उतरण्यासारखं आहे. किंबहुना गुहेचं प्रतीक हे साराच्या मनातल्या खोल दडलेल्या किल्मिषांचं प्रतीक आहे. प्रेक्षकाला दैत्यकथा म्हणून दाखवताना, त्याला संपूर्णपणे चकवून एक मानसिक नाट्य मोठ्या कौशल्याने दिग्दर्शकाने विणलं आहे.
आंतरराष्ट्रीय दैत्यपटांचा धांडोळा घेताना तुलनेने रिकामी असणारी आपली झोळी आपल्याला अजून दु:खी करून जाते. भारतीय भयपट हे मुख्यत: भूत ह्या कल्पनेशी खेळणारे होते. आपल्या पुराण कथांमध्ये दैत्याना असलेलं सामायिक स्थान भारतीय चित्रपटांत मात्र अभावानेच दिसत राहिलं. खरं पाहता रावणासारख्या दैत्यासुरालादेखील सन्मानाने आपलं असं स्थान देणारी भारतीय संस्कृती, पण भारतीय चित्रपटकारांनी मात्र दैत्यपट तितकासा आपला केला नाही. परदेशी दैत्यपटांची लाट लोकप्रिय झाल्यानंतर मात्र त्यांची अतिभ्रष्ट नक्कल / आवृत्ती काढण्याचं काम रामसे बंधूनी १९७० नंतर मोठ्या इमानेइतबारे केलं. 'तहखाना', 'डाक बंगला', 'पुरानी हवेली', 'शैतानी इलाक़ा', 'बंद दरवाज़ा' अशी त्यांची गिरणी सुरूच राहिली. ह्या साऱ्या चित्रपटांतील एकमेव सामायिक तत्त्व म्हणजे कैद झालेला दैत्य, त्याचं अचानक मोकाट सुटणं, आणि अखेर त्याचा नि:पात. रामसे बंधूच्या सेट्स आणि मेकअपप्रमाणेच त्यांच्या कथाकल्पना आणि वातावरणनिर्मिती अगदीच बेगडी आणि परभृत होत्या, त्यामुळे दैत्य संकल्पनेचा भारतीय तत्त्वज्ञानातील विकास, ह्या चित्रपटांत अभावानेही दिसला नाही. मजेची गोष्ट म्हणजे ह्यातल्या कित्येक चित्रपटात अखेर दैत्याला मारण्यासाठीदेखील त्यांना 'क्रूस' आठवावा लागला आहे! स्वस्तात, लवकर बनणारा आणि हमखास विशिष्ट प्रेक्षकवर्गाला आवडेल ह्या दृष्टिकोनातून बनलेला दैत्यपट बनवणं, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे चित्रपट बनवले गेले, त्यामुळे त्यात 'नसलेल्या' गोष्टी शोधण्याची धडपड व्यथाच जायची म्हणा!
भारतीय तत्त्वविचारसरणीत द्वैतवाद आणि अद्वैतवाद ह्यांचं जे स्थान आहे, तेच पाश्चात्त्य विचारसरणीत मानव आणि दैत्य ह्यांतल्या द्वैत-अद्वैताचं आहे. भारतीय विचार मुख्यत्वेकरून मानवाला मोक्षाकडे नेणारा, मोहापासून त्याला दूर ढकलणारा, आसक्तीला नियंत्रित करणारा आहे. दैत्यरूपाचं दमन हा तो भारतीय स्वभाव आहे. पाश्चात्त्य विचार मुळातच माणसाचं स्खलनशील असणं मान्य करून चालला आहे, आणि क्षमायाचनेतून तो त्याच्या मानवी, स्खलनशील रूपाकडून 'आकाशातील बापाशी' एकरूप होण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच असेल कदाचित, पण आपल्यातल्या दैत्याला मान्य करणं, त्याला अधिक डोळसपणे पाहणं त्याना शक्य झालं आहे. ज्या वेळेस भारतीय चित्रपट दिग्दर्शक देशी तत्त्वज्ञानाच्या भक्कम आधारावर दैत्यपट हाताळतील, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या मातीतले दैत्यपट आपल्याला पाहायला मिळतील!