पॅरिसच्या (स्वातंत्र्य)देवता

पॅरिसच्या (स्वातंत्र्य)देवता

लेखक - चिंतातुर जंतू


जान आव्रिल, भित्तिचित्र - तूलूज लोत्रेक (१८९३)

‘वेश्याव्यवसाय हा जगातला सर्वात प्राचीन व्यवसाय आहे’ हे वाक्य घासून गुळगुळीत झालेलं आहे. तरीही, हा प्राचीन व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या इतिहासाबद्दल अनेक गोष्टी आजही लोकांना माहीत नसतात. अनेकांच्या मते ह्या व्यवसायातल्या स्त्रिया शोषित असतात आणि त्या नेहमीच शोषित होत्या; किंवा, हा व्यवसाय जाणूनबुजून पत्करणं म्हणजे नैतिक अध:पतन, असं मानणारे लोकही पुष्कळ आहेत. नाही तर 'ही आमची बावनखणी, काय तिथल्या लावण्यखणी; गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी' अशा प्रकारचे उमाळे काढणारे लोकही खूप असतात. वेश्याव्यवसायाचा इतिहास पाहिला, तर त्यात शोषण आणि शौक दोन्ही आढळतात हे खरंच आहे; पण सांगण्यासारखं आणखी वेगळं त्यात काही सापडेल का?

भारतात गणिकांची मोठी परंपरा आहे. त्या सुशिक्षित असत. काव्य-कला-शास्त्रादि विद्यांत त्या निपुण असत. त्यामुळे निव्वळ देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांपेक्षा त्या वरच्या दर्जाच्या असत. त्यांना समाजात प्रतिष्ठा होती. मंगल कार्यं, सणसमारंभ अशा प्रसंगी त्यांची उपस्थिती शुभ मानली जाई. चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र परतले आणि भरताला भेटले, तेव्हा 'घोडे, हत्ती आणि गणिका ह्यांचा क्रीडेकरिता वापर करत होतास किंवा नाही?' असा प्रश्न त्यांनी भरताला विचारला होता (संदर्भ : ‘बावनखणी’ - द. ग. गोडसे). रतिक्रीडा ही अखेर क्रीडा असते; त्यामुळे त्यात काही वावगं समजलं जात नसे. पुरुषांना वश करण्याच्या गणिकांच्या क्षमतेमुळे गुप्तचर म्हणूनही त्यांचा वापर केला जाई. कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार हा व्यवसाय वंशपरंपरागत नव्हता; तर त्यात प्रवेश करण्याआधी पुष्कळ प्रशिक्षण घ्यावं लागत असे. गणिकांच्या वर्तनावर शासकीय नियंत्रण असे. त्यांनी नियमबाह्य वर्तन केलं तर त्यांना कठोर शिक्षा किंवा दंड होई. एखाद्या पुरुषाला रिझवण्याविषयीच्या राजाज्ञेविरोधात जाऊन गणिकेनं जर ते करायला नकार दिला, तर तिला शिक्षा होई. गणिकांना कर भरावा लागे. थोडक्यात, इतर स्त्रियांपेक्षा त्या स्वतंत्र आणि प्रतिष्ठित होत्या, तरीही त्या राजसत्तेच्या अधीन होत्या. तत्कालीन सत्ताधारी वर्गाच्या मर्जीनुसार वेगवेगळ्या काळांत भारतीय गणिका कमीअधिक प्रमाणात स्वतंत्र होत्या.


मारी बूलिआर : अॅस्पेझिया (आत्मचित्र), १७९४.

ग्रीक संस्कृतीत वेश्यांचे जे विविध प्रकार होते, त्यांत भारतीय गणिकांप्रमाणे 'हिटाईरा' (hetaíra) हा वर्ग अतिशय प्रतिष्ठित होता. त्या सुशिक्षित असत. त्यांना आपली मालमत्ता राखण्याचं स्वातंत्र्य होतं. (वेश्यांना किंवा गरती स्त्रियांना हे स्वातंत्र्य नव्हतं.) ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात अथेन्समधल्या अॅस्पेझिया नावाच्या हिटाईराकडे विविध क्षेत्रांतले महत्त्वाचे लोक येत असत. सुशिक्षित असल्यामुळे ती सार्वजनिक वादविवादांत भाग घेत असे. पेरीक्लीज ह्या अथेन्समधल्या एका महत्त्वाच्या मुत्सद्द्याची ती सखी होती. ज्या काळात स्त्रियांचं समाजातलं स्थान फारसं महत्त्वाचं नव्हतं, अशा काळातही पेरीक्लीजसारख्या प्रभावशाली माणसावर तिच्या विचारांचा प्रभाव होता. तत्त्वज्ञ सॉक्रेटिस आणि नाटककार सोफोक्लीजही तिच्याकडे चर्चेसाठी येत असत. तिचं घर हे अथेन्समधलं एक प्रमुख सांस्कृतिक आणि वैचारिक केंद्र होतं. त्या काळात अथेन्समधल्या प्रतिष्ठित स्त्रियांनाही एक 'पालक' असणं बंधनकारक होतं; इतर अनेक स्त्रिया तर गुलामच असत. त्यामुळे अॅस्पेझिया अशा काळातली एक स्वतंत्र स्त्री होती हे विशेष लक्षात घेण्याजोगं आहे.

रोमन संस्कृतीतही प्रतिष्ठित, सुशिक्षित आणि बहुश्रुत गणिका आढळत. त्यांपैकी थिओडोराची कहाणी विलक्षण आहे. तिच्या सौंदर्यावर आणि बुद्धिमत्तेवर रोमन राजपुत्र पहिला जस्टिनिअन भाळला. त्याला तिच्याशी विवाह करायचा होता. यथावकाश तिनं आपला व्यवसायही सोडून दिला होता. मात्र, तिच्या गणिका असण्याच्या पूर्वेतिहासामुळे ते तत्कालीन कायद्यात बसत नव्हतं. जस्टिनिअन सम्राट झाला, तेव्हा तिच्याशी रीतसर विवाह करता यावा म्हणून त्यानं कायदा बदलून घेतला. सम्राज्ञी म्हणून राज्यकारभारात तिला अधिक आणि प्रत्यक्ष सहभाग घेता आला. स्त्रियांविषयीच्या कायद्यात तिच्यामुळे काही महत्त्वाचे बदल घडले. स्त्रियांना जबरदस्तीनं वेश्याव्यवसायात ढकलण्यावर तिनं बंदी घातली. पूर्वाश्रमीच्या वेश्यांना आधार देणारं एक धर्मगृह तिनं बांधलं. घटस्फोट आणि मालमत्तेच्या मालकीसारख्या बाबींत तिनं स्त्रियांना अधिक व्यापक हक्क दिले. विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या स्त्रीला ठार मारण्याचा हक्क तिच्या पतीला असे; तो तिनं रद्दबातल ठरवला. काहींच्या मते तर राज्यकारभार चालवण्यात तिचाच पुढाकार होता आणि राजा मुख्यत: तिच्या सल्ल्यानं वागत असे.


म्हाताऱ्याला लुभावणाऱ्या कूर्तिझान - ल्यूकास क्रॅनाक थोरला (सुमारे १५३७नंतर)

मध्ययुगीन युरोपातल्या प्रतिष्ठित वेश्यांना Courtesan ही संज्ञा रूढ होती. सोळाव्या शतकात व्हेनिसमधली व्हेरोनिका फ्रँको ही कूर्तिझान विशेष प्रसिद्ध होती. तिचा विवाह एका धनाढ्य डॉक्टरशी झाला होता, पण विवाहबंधनात ती रमली नाही. तिनं घटस्फोट घेतला आणि आर्थिक स्थैर्यासाठी आपल्या आईप्रमाणे ती गणिकाव्यवसायात शिरली. एके काळी फ्रान्सचा राजा तिसऱ्या हेन्रीशी तिचे संबंध होते. ती कवयित्री होती. तिच्या नावावर दोन कवितासंग्रह आहेत. शिवाय, इतर लेखकांच्या निवडक लेखनाचे संग्रहही तिनं प्रकाशित केले. वेश्या आणि त्यांच्या मुलांसाठी तिनं धर्मादाय संस्था उभारल्या. स्त्रियांविषयीचं तिचं मत - ‘जेव्हा आमच्यापाशीही शस्त्रं असतील आणि आम्हालाही जेव्हा शिक्षण मिळेल, तेव्हा आम्हालाही तुमच्याप्रमाणे हात, पाय आणि हृदय आहे हे आम्ही पुरुषांना दाखवून देऊ. आम्ही नाजूक असू; पण काही पुरुष नाजूक असूनदेखील कणखर असतात, तर काही राकट आणि कठोर पुरुष भित्रे असतात. स्त्रियांच्या हे अद्याप लक्षात आलेलं नाही.


ला कूर्तिझान - व्हॅन गॉग (१८८७)

देहविक्रय करून किंवा संगीत-नृत्यादि कलाविष्कारांतून पुरुषांना रिझवणाऱ्या स्त्रिया इतर संस्कृतींतही सापडतात. जपानमधल्या गेशा ह्या पारंपरिक जपानी स्त्रियांपेक्षा खूप वेगळ्या होत्या. पुरुषांसमोर नमतं घेण्याची लग्नाच्या स्त्रीकडून अपेक्षा असे, पण गेशाकडून तशी अपेक्षा नसे. आपल्याकडे आलेल्या पुरुषांना रिझवणं हा तिचा मूळ हेतू असला, तरीही ती यजमान असे आणि आलेला पुरुष तिचा पाहुणा असे. यजमान म्हणून तिनं कसं वागावं आणि वागू नये ह्यावर आलेल्या पाहुण्याचं नियंत्रण नसे. शिवाय, गेशा मातृसत्ताक पद्धतीत राहत. त्यांचं शिक्षण स्त्रियांकडून होई आणि व्यवसायात गुंतलेला पैसाही स्त्रियांच्याच मालकीचा असे. पुरुषप्रधान जपानी संस्कृतीतच ही समांतर परंपरा राजरोस चालू होती.

राजसत्तेचा आणि धर्मसत्तेचा जोवर युरोपियन समाजावर पगडा होता, तोवर ह्या सत्तांनी कूर्तिझान व्यवसायातल्या स्त्रियांचा काही वेळा छळही केला. पेरीक्लीजचा प्रभाव कमी झाल्यावर अॅस्पेझियावर धर्मभ्रष्ट असल्याचा खटला भरला गेला होता. स्पॅनिश इन्क्विझिशनच्या काळात व्हेरोनिका फ्रँकोवर ती चेटकीण असल्याचा आरोप ठेवून खटला भरला गेला होता. युरोपवरचा हा धर्मसत्तेचा आणि राजसत्तेचा पगडा जसजसा सैल होत गेला तसतसा हा गणिकावर्ग अधिकाधिक स्वतंत्र होत गेला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीचा काळ ह्याचा कळसाध्याय होता.


‘ला गूल्यू’ : ‘मूलॅं रूज’मध्ये येताना - तूलूज लोत्रेक (१८९२)

आधीच्या प्रबोधनकाळातल्या आणि फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यानच्या स्वातंत्र्य आणि समता ह्या तत्त्वांनुसार युरोपमध्ये एक उदारमतवादी विचारप्रवाह निर्माण झाला. त्याचं प्रतिबिंब समाजात आणि सरकारी धोरणांत पडलं. १८७०-७१च्या फ्रेंच-जर्मन युद्धापासून पहिल्या महायुद्धापर्यंतचा हा काळ तसा शांततेत गेला. औद्योगीकरणामुळे आणि वसाहतींच्या लुटीमुळे आर्थिक सुबत्ताही तेव्हा वाढली. ह्या काळात युरोपचं सांस्कृतिक नेतृत्व फ्रान्सकडे होतं आणि त्याचं केंद्र पॅरिसमध्ये होतं. Belle Époque (बेल एपोक - 'सुंदर कालखंड’) ह्या नावानं तो काळ ओळखला जातो. चित्रकला, साहित्य, नृत्य, नाट्य अशा कलांमध्ये तर पॅरिस तेव्हा अग्रेसर होतंच; पण फ्रेंचांची रसिकता तेवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती. कलावंतिणी आणि नाट्यशाळा हादेखील ह्या सांस्कृतिक राजधानीचा अविभाज्य भाग होता. भोगविलासाचं शहर म्हणूनही पॅरिसची ख्याती होती. पॅरिसच्या ह्या विख्यात निशाजीवनाच्या जडणघडणीत अनेक घटकांचा सहभाग होता. 'पॅरिसच्या सम्राज्ञी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कूर्तिझान स्त्रिया हा त्यातला एक महत्त्वाचा घटक होता.


‘ला पाईव्हा’

फ्रेंच उदारमतवादी धोरणांमुळे परदेशातून फ्रान्समध्ये आलेल्या आणि कूर्तिझान झालेल्या ज्यूवंशीय एस्थर लाकमान उर्फ 'ला पाइव्हा'चं (१८१९-१८८४) उदाहरण पाहिलं, तर काही गोष्टी स्पष्ट होतात. युरोपमधल्या इतर अनेक देशांच्या तुलनेत फ्रान्समध्ये ज्यूंना कायद्याचं संरक्षण आणि हक्क अधिक होते. रशियातल्या एका ज्यू घेटोमध्ये एस्थरचा जन्म झाला होता. तिचं लग्न झालं होतं आणि तिला एक मूलही होतं. संसारातल्या पारतंत्र्याला कंटाळून ती वयाच्या एकोणिसाव्या वर्षी पतीचा आणि मुलाचा त्याग करून पॅरिसला आली. हळूहळू तिनं पॅरिसमध्ये आपलं बस्तान बसवलं. काही काळ तिनं एका वेश्यागृहात काम केलं, पण स्वातंत्र्याची आस असल्यामुळे ती लवकरच तिथून बाहेर पडली. यथावकाश एक कूर्तिझान म्हणून तिनं नाव कमावलं. तब्बल सात तास वेगवेगळ्या पुरुषांशी रत होण्याचं कसब तिच्यापाशी होतं. हेन्री हर्झ ह्या तेव्हाच्या एका विख्यात पियानोवादकाशी तिची मैत्री झाली. फ्रान्झ लिझ्ट, रिचर्ड वाग्नर अशा मोठ्या संगीतकारांशी तिचा परिचय झाला. थिओफील गोतिए ह्या प्रख्यात लेखकाशीही तिची मैत्री झाली. खानदानी वाटणारं नाव ‘कमवावं’ म्हणून तिनं मार्की द पाइव्हा ह्या पोर्तुगीज उमरावाशी लग्न केलं. ह्या लग्नामुळे 'मार्कीज द ला पाइव्हा' हे अभिधान तिला प्राप्त झालं. पण ह्या लग्नात उमराव पतिराजांना काय हवंय ह्यापेक्षा त्यांच्या पत्नीची मर्जी महत्त्वाची होती. पॅरिसमध्ये स्वतंत्र राहून आणि आपला व्यवसाय चालू ठेवण्याची अट घालूनच तिनं हे लग्न केलं. तिच्या ह्या नव्यानं कमावलेल्या नावावरून पॅरिसमध्ये ‘qui paye y va’ (‘कि पाय इ व्हा’ - ‘जो पैसे अदा करेल तो तिथं जाईल’) अशी शाब्दिक कोटी रूढ होती. प्रचंड पैसा खर्चून शॉन्जेलीजे (Champs-Élysées) ह्या मध्यवर्ती आणि प्रतिष्ठित ठिकाणी तिनं आपला भव्य प्रासाद बांधला. ‘Le Louvre du cul’ असा त्याचा गमतीत उल्लेख केला जाई. (आता ‘क्यूलचं लूव्र’ म्हणजे नक्की कशाकशाचं लूव्र ह्याचं अरसिक प्रमाण मराठीत एका शब्दात भाषांतर करणं अशक्य आहे. आणि कामाच्या ठिकाणी ‘cul’वर गूगल करायला जाऊ नका, कारण त्यानं तुमच्या वेबसेन्स, ब्लूकोट वगैरे नेटआज्ज्या उर्फ नेटनॅनींना झीट येईल. हवं असल्यास घरी जाऊन http://fr.wiktionary.org/wiki/cul हे पान उघडा आणि गूगलला ट्रान्सलेट करायला सांगा. तर ते असो.)


लिआन द पूजी

पुढे कूर्तिझान झालेली लिआन द पूजी (१८६९-१९५०) एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली स्त्री होती. एका नौदलातल्या अधिकाऱ्याशी तिचा विवाह झाला होता. त्यांना एक मूलही होतं. नवऱ्याच्या हिंसेला कंटाळून ती पॅरिसला पळून आली. फ्रान्समध्ये नव्यानं झालेल्या कायद्यानुसार तिनं घटस्फोट घेतला. ‘फोली बेर्जेर’ ह्या सुप्रसिद्ध कॅबरेमध्ये ती नृत्य करू लागली. लवकरच तिची ख्याती इतकी पसरली, की तिला विवस्त्र पाहण्यासाठी लोक प्रचंड पैसे देऊ लागले. केवळ दहा मिनिटांच्या तिच्या ‘तश्या’ दर्शनासाठी आजच्या काळातले सुमारे १.५ मिलियन युरो लोक मोजत! ‘कुणालाही भुरळ घालणारी, पण कुणालाच वश न होणारी’ अशी तिची ख्याती होती. पुरुषांना रिझवणं हा तिचा व्यवसाय होता; पण तिला शारीरिक आकर्षण स्त्रियांविषयी वाटे. अनेक स्त्रियांशी तिचे प्रेमसंबंध होते आणि त्यात काही लपवाछपवी नव्हती. लेखिका होण्याची तिची आकांक्षा होती. नाताली बार्नी ह्या तिच्या प्रेमिकेबरोबरच्या सहजीवनावर तिनं लिहिलेली Idylle saphique (१९०१) ही कादंबरी चांगलीच लोकप्रिय झाली होती.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला छायाचित्रणाचं तंत्रज्ञान सर्वांना उपलब्ध झालं होतं. छपाईचं तंत्र तर कधीच विकसित झालं होतं. सरकारच्या प्रयत्नांमुळे फ्रेंच जनतेची साक्षरताही वाढलेली होती. ह्या सगळ्या माध्यमक्रांतीचा पुरेपूर फायदा लिआनसारख्या कूर्तिझान उठवत असत. ‘Le Petit Journal’ (ल पती जूर्नाल) हे त्या काळचं एक आघाडीचं दैनिक होतं. त्याचा रोजचा खप सुमारे दहा लाख प्रतींचा असे. त्याच्या रविवार पुरवणीच्या मुखपृष्ठावर आपलं चित्र आणि आत आपल्याविषयीचा मजकूर प्रकाशित होण्याचा बहुमान लिआनला मिळाला होता. आपल्याबद्दल नियमितपणे लिहून यावं ह्यासाठी लिआन पत्रकारांशी मैत्री करत असे. पत्रकारांच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळते हे लक्षात घेऊन ती त्यांना विनामोबदला सहवाससुखही देत असे. तिचं पाहून इतर कूर्तिझानांनीही हा मार्ग अवलंबला. म्हणजे, तेव्हाच्या 'पेज थ्री' किंवा 'पेड न्यूज' (किंवा ‘न्यूड पेज’) संस्कृतीच्या जडणघडणीत कूर्तिझानवर्गाचा असा सक्रिय सहभाग होता.


पिक्चर पोस्टकार्ड (ला बेल ओतेरो)

पिक्चर पोस्टकार्डं त्या काळात लोकप्रिय झाली होती. आपली छायाचित्रं काढून त्यांची पिक्चर पोस्टकार्डं लिआन बनवून घेत असे. पोस्टकार्ड हे तेव्हाच्या सोशल मीडिआप्रमाणे होतं असं म्हणता येईल : लोक पॅरिसला भेट दिल्यावर आपल्या आप्तस्वकीयांना ही कार्डं पाठवत असत, आणि त्याद्वारे युरोपभर लिआनची ख्याती पसरत असे. लिआन द पूजीसारख्या कूर्तिझान त्यामुळे जगासमोरचा फ्रान्सचा चेहरा बनल्या. 'युनिव्हर्सल एक्स्पोझिशन'सारख्या निमित्तानं पॅरिसमध्ये येणाऱ्या लोकांसाठीही तिथल्या सुपरस्टार कूर्तिझान हे एक प्रमुख आकर्षण असे. त्यांच्यासह केवळ फेरफटका मारण्यासाठी उच्चभ्रूंची रांग लागे, कारण त्यांच्यासोबत सार्वजनिक स्थळी दिसणं ही स्वत:च्या संपत्तीची आणि प्रतिष्ठेची जाहिरात असे. थोडक्यात, सिनेमा किंवा टेलिव्हिजनसारखी माध्यमं येण्यापूर्वीच्या काळातल्या माध्यमसंस्कृतीचा हुशारीनं वापर करून ह्या स्त्रिया आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटी किंवा स्टार झाल्या होत्या.


ला बेल ओतेरो

‘ला बेल ओतेरो’ (१८६८-१९६५) ह्या तेव्हाच्या एका विख्यात कूर्तिझानला गंमतीत ‘पॅरिसची परराष्ट्रमंत्री’ म्हटलं जात असे, कारण परदेशातून पॅरिसभेटीला येणाऱ्या सर्व राष्ट्रप्रमुखांच्या, सम्राटांच्या आणि अमीरउमरावांच्या वेळापत्रकात तिची भेट समाविष्ट असे. तिच्या डायरीत त्यांच्याविषयीची परखड मूल्यमापनं सापडतात (उदा : ‘इराणचा शहा : उत्कृष्ट, पण आंघोळ करत नाही.’) कान शहरातल्या सुप्रसिद्ध कार्लटन हॉटेलच्या घुमटांना तिच्या पुष्ट उरोजांनी प्रेरणा पुरवली असं म्हणतात. तिच्या मदमस्त सौंदर्यानं घायाळ झालेले लोक म्हणजे अक्षरश: 'हूज हू' होते. ही एक यादी पाहा : इंग्लंडचा राजा सातवा एडवर्ड, ड्यूक अॉफ वेस्टमिन्स्टर, मोनॅकोचा प्रिन्स अल्बर्ट, बेल्जियमचा राजा लेओपोल्ड दुसरा, रशियाचा ग्रॅन्ड ड्यूक निकोलस... पॅरिसच्या अनेक सुप्रसिद्ध रेस्तरॉंमध्ये खास तिच्यासाठी एक आडोशाची खोली असे. तिथे ती प्रतिष्ठित व्यक्तींना भेटत असे. Lapérouse (लापेरूज) ह्या सुप्रसिद्ध रेस्तरॉंमध्ये आजही तिची खोली पाहायला मिळते. फ्रेंच सिनेटर आपलं दिवसभराचं कामकाज आटोपून (किंवा मदनज्वर अगदीच असह्य झाला तर काम दूर सारूनदेखील) तिथे तिला भेटायला येत. सिनेटपासून त्या खोलीपर्यंत येण्याचा एक गुप्त मार्गच त्यासाठी बनवलेला होता! तिच्या प्राप्तीसाठी कित्येक पुरुष द्वंद्व खेळत. तब्बल सहा पुरुषांनी तिच्यापायी आत्महत्या केल्या होत्या. खलाश्यांना आपल्या गाण्यानं मोहित करणाऱ्या आणि त्यांची जहाजं खडकाळ भागाकडे वळवून त्यांना ठार मारणाऱ्या ‘सायरन’ (फ्रेंचमध्ये sirène) नावाच्या स्त्रिया ग्रीक मिथकांमध्ये असतात. त्या धर्तीवर तिला ‘sirène des suicides’ असं म्हणत.


इंग्लिशमन अॅट द मूलॅं रूज - तूलूज लोत्रेक (१८९२)

युरोपची सांस्कृतिक राजधानी हा दिमाख मिरवणाऱ्या पॅरिसच्या उच्चभ्रू वर्तुळांत केवळ धनिकवणिक नसत; तर वेगवेगळ्या सांस्कृतिक क्षेत्रांतले निर्मितिक्षम लोक असत. आणि हे कलाकार लोक कलावंतिणींवर भाळणार नाहीत असं कसं होईल? त्यामुळे कलावर्तुळांत ह्या स्त्रिया सुपरिचित, किंबहुना अतिपरिचित होत्या. त्यांपैकी काही तर कलाक्षेत्रांतल्या विविध लोकांना एकत्र आणण्यात सक्रीय सहभाग घेत असत. Salons (सालों) ह्या नावानं हे उपक्रम प्रसिद्ध होते. 'मादाम बोव्हारी'चा लेखक ग्युस्ताव फ्लोबेर आणि कवी बोदलेर असे विख्यात लोक त्यात सहभागी असत. संध्याकाळी एकत्र येणं, गप्पा मारणं, संगीत किंवा काव्यवाचनासारखे सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणणं, त्यांवर चर्चा करणं अशा गोष्टी त्यात होत असत. अनेक कलाकारांच्या जडणघडणीत ह्या सालोंचा मोठा वाटा होता. सालोंमध्ये वावर असणाऱ्या एमिल झोला, बाल्झाक, कोलेत, मोपासॉं, मार्सेल प्रूस्त अशा अनेक लेखकांनी ह्या स्त्रियांचं आणि त्यांच्या विश्वाचं चित्रण केलं आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये ह्या स्त्रियांच्या ख्यातीत भर पडली आणि हे लेखकही अधिक लोकांपर्यंत पोहोचले. अनेक चित्रकारांनीही त्या स्त्रियांची मोठ्या तन्मयतेनं चित्रं काढली. कूर्तिझान स्त्रियांकडे जडजवाहिरांचा ढीग असे; पण त्यांपैकी काही स्त्रियांचा कलासंग्रहसुद्धा वाखाणण्यासारखा होता. पॅरिसच्या कलावर्तुळात प्रवेश करण्यासाठीही अनेक होतकरू कलाकार ह्या स्त्रियांशी मैत्री वाढवत असत. म्हणजे प्रभावशाली पुरुषांशी संग करून आपला फायदा करून घेणाऱ्या स्त्रिया हे पुरुषप्रधान संस्कृतीचं एक अंग इथे ह्या स्त्रियांनी उलटंपालटंच करून ठेवलं होतं. त्या काळचं हे एक भक्कम सोशल नेटवर्क होतं आणि कूर्तिझान त्याच्या सम्राज्ञीपदी विराजमान होत्या.

पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली आणि पॅरिसच्या इतिहासातलं हे सुवर्णयुग अस्तंगत झालं. पुरुषांकडचा पैसा संपला; किंवा, पुरुष युद्धभूमीवर गेले आणि कूर्तिझान स्त्रियांच्या उत्पन्नाचा स्रोत नाहीसा झाला. पण त्या स्त्रियांचं कर्तृत्व दृष्टीआड झालं नाही. सर्वसामान्य स्त्रियांसाठी जेव्हा नोकरीव्यवसाय करून आर्थिक स्वातंत्र्य ही अप्राप्य गोष्ट होती तेव्हा कूर्तिझान कमावत्या होत्या; आपल्या संपत्तीचं व्यवस्थापनही त्यांच्या हातात होतं. उत्पन्नाचा स्रोत म्हणून पुरुषांची त्यांना गरज होती खरी, पण कुणा एकावरच सगळं आयुष्य अवलंबून नसणं हा ह्या स्त्रियांचा मूलभूत गुणधर्म होता. विवाहसंस्था एक जोखड झाल्यामुळे समाजाच्या सुखाच्या गरजेतून हे विवाहबाह्य संबंध ठेवले जात होते. वंशसातत्य हे विवाहसंस्थेचं काम होतं. शरीरसुखाला त्यात जागा उरली नव्हती. ‘चांगल्या घरातल्या’ बाईनं आपल्या पतीसोबतच्या शरीरसंबंधांत रस दाखवणं हेदेखील तेव्हा अप्रस्तुत मानलं जाई. ह्याउलट, कूर्तिझान आपले जोडीदार निवडायला स्वतंत्र असत. विवाहसंबंधांत मिळू न शकणारं सुख त्या जोडीदाराला देत असत. त्यामुळे समाजात त्यांना अन्योन्य स्थान मिळत होतं. स्त्री-पुरुषांमधलं अवलंबित्वाचं नातंच त्यांनी उलटंपालटं करून टाकलं होतं. त्यांचे संबंध समाजापासून लपवलेले नव्हते, तर उलट सर्वज्ञात होते. एखाद्या ट्रॉफीप्रमाणे लब्धप्रतिष्ठित पुरुषांना त्या मिरवत. पुरुष त्यांच्या सहवासासाठी पैशावरच नाही, तर आपल्या जिवावरही उदार होत. मुलं होऊ देणं त्यांना परवडत नसे (कारण त्यामुळे काही काळ त्या व्यवसाय करू शकत नसत) आणि विवाहसंस्थेच्या बाहेर असल्यामुळे तशी सक्तीही त्यांच्यावर नसे. छोट्या छोट्या गोष्टींतही त्या उपभोगत असलेलं स्वातंत्र्य लक्षणीय होतं. आपल्याच स्नानगृहात स्नान करताना पूर्ण नग्न होण्याचं खाजगीतलं स्वातंत्र्यदेखील तेव्हाची स्त्री उपभोगू शकत नसे, कारण ते अप्रस्तुत समजलं जाई. कस्तुरी किंवा पाचूलीसारखे काही सुगंधही त्यांच्या मादकपणामुळे गरती स्त्रियांना वर्ज्य होते. कस्तुरीमृगाची मादकता ज्यांच्यात होतीच, अशा कूर्तिझान स्त्रियांवर मात्र अशी बंधनं नव्हती.

लैंगिक स्वातंत्र्य हा स्त्रीमुक्तीकडे नेणारा एक मार्ग आहे हे कूर्तिझान स्त्रियांमुळे इतर स्त्रियांच्या लक्षात येऊ लागलं. ‘झोपून श्रीमंत होता येतं; फक्त एकट्या झोपू नका’ असं तेव्हा म्हटलं जाई. त्यात गंमतीचा भाग असला, तरीही त्या काळात युरोपातल्या सर्वात सधन स्त्रिया कूर्तिझान होत्या हेसुद्धा खरंच होतं. आणि तरीही, पॅरिसच्या ह्या सम्राज्ञींनी आपल्या धनाच्या बळावर नाही, तर आपल्या स्वतंत्र अस्तित्वाद्वारे पॅरिसवर अधिराज्य गाजवलं असंही म्हटलं जातं. आर्थिक स्वातंत्र्य आणि लग्नाच्या जोखडातून मुक्तता ह्यांचा स्त्रीस्वातंत्र्याशी आणि स्त्रीवादी विचारांशी ठोस संबंध नंतर लावला गेला, पण त्याचा पाया घालणाऱ्या ह्या गणिकावर्गातल्या स्त्रियांचा फ्रेंचांना विसर पडला नाही. आजही त्यांच्याविषयीच्या कथा चवीचवीनं सांगितल्या जातात.

गणिकांचा इतिहास आपल्यालाही होता; पण त्यांच्या स्वातंत्र्याविषयी आज आपल्याकडे पुरेशी जाणीव आहे असं म्हणता येणार नाही. एकविसाव्या शतकात स्त्रियांच्या परिस्थितीत अनेक बदल झाले आहेत. तरीही ह्या मुद्द्यांचं महत्त्व कमी झालेलं दिसत नाही. वैयक्तिक आर्थिक आकांक्षांना महान तत्त्वज्ञान मानणाऱ्या आजच्या काळात स्त्री कमावती असणं पुरुषाला अपेक्षित असतं; पण, आपली स्त्री आपल्याहून अधिक मिळवती मात्र आजही नको असते, असं अगदी पुण्यातल्या पुढारलेल्या ब्राह्मणांसाठी विवाहनोंदणी संस्था चालवणारे लोकही कबूल करतात. बलात्कारांविषयी चर्चा करताना मुलींचे कपडे, त्यांचं उशीरापर्यंत बाहेर राहणं, किंवा दारू पिणं हे मुद्दे चघळले जाऊ लागतात, तेव्हा स्त्रीची लैंगिक स्वायत्तता अद्यापही आपल्याला मान्य नसल्याचंच ते एक चिन्ह असतं. देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांचं शोषण होतं आणि त्यांचं पुनर्वसन करणं ही समाजाची जबाबदारी आहे अशी मांडणी करण्यात अडचण नाही, कारण ते एक वास्तव आहेच. मात्र, तेवढंच वास्तव नाही. स्त्रीच्या लैंगिक स्वायत्ततेविषयी समाजाला वाटणाऱ्या भीतीमुळेच कदाचित आजही अशी ढोबळ आणि सोयीची मांडणी होत असेल. कारण, ह्या मुद्द्याचा अधिक मूलगामी शोध घेतला, तर ते कदाचित आजही गैरसोयीचं ठरू शकेल. आर्थिक उदारीकरणामुळे भारतीयांच्या हातात पैसा खुळखुळू लागला आहे. निव्वळ सुटी घालवण्यासाठी परदेशवारी त्यांना सहज परवडू लागली आहे. पॅरिस-अॅमस्टरडॅम किंवा बॅंकॉक-पट्टायाचं नाइटलाइफ त्यांना खुणावू लागलं आहे. भोगविलासी आणि रोमॅन्टिक पॅरिसच्या सुवर्णकाळातल्या रंगलेल्या रात्रींमागच्या स्वतंत्र स्त्रियांच्या साम्राज्याचा हा इतिहास सांगायची गरजही म्हणूनच आज अधिक भासते आहे.

***

(चिंतातुर जंतूकडून थेट पॅरिसहून तमाम ऐसीकरांसाठी दिवाळीनिमित्त सस्नेह.)

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.75
Your rating: None Average: 4.8 (8 votes)

प्रतिक्रिया

लेख दोनदा वाचला! शेवटाचा मुक्तचिंतनात्मक परिच्छेद तर या अत्यंत माहितीपूर्ण लेखाचा मुकुटमणी ठरावा.
मी काही बाबतीत जपलेल्या/संस्कारित दृष्टीकोनाला आव्हान देणारा लेख आहे. अनेक गोष्टींवर मुळातून विचार करायला लावणारा!

अत्यंत आवडला! अनेकानेक आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पहिल्या परिच्छेदानंतरची प्रतिक्रिया: हंऽऽ आले तथाकथित पुरोगामी... सनसनाटी काही लिहिल्याशिवाय आपण विद्वान आहोत हे यांना सिद्ध करता येत नाही...

दुसर्‍या परिच्छेदानंतरची प्रतिक्रिया: हं, इंट्रेष्टिंग.

तिसर्‍या परिच्छेदानंतरची प्रतिक्रिया: वा, थ्रूआउट चित्रंबित्र दिलीयेत आणि लिंका चालतायत की चक्क...

पुढे: भलताच शौकीन माणूस दिसतो हा जंतू. समीक्षक काय...

अजून पुढे: 'म्हणे' घुमटांना उरोजांची प्रेरणा.. काय? बर्रं...

शेवटचा प्यारा चालू असतानाची प्रतिक्रिया: खुर्चीतल्या खुर्चीत एकदम सावरून बसणे. नवीन अँगल मिळाल्यामुळे विचारात पडणे. त्या दृष्टीने वरचा सगळा लेख पुन्हा एकदा वाचणे आणि वेश्या या सनसनाटी-घिश्यापिट्या-उत्तेजक विषयाबद्दल इतकं अभिनिवेशरहित आणि वेगळंच कसं काय लिहू शकतं कुणी, असं वाटून अवाक होणे.

मजा आली.

अवांतर: एरवी खडूसपणे भाव खाणार्‍या जंतूंना दिवाळी अंकाच्या निमित्ताने लिहिते करणार्‍या संपादकांचे आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जिथे तिथे हा मोड इन्व्होकवणे कामाचे नाही, इतकेच दर्शवून खाली बसतो.

बाकी लेख अतिशय माहितीपूर्ण आहे. आमच्या पेरिक्लेस आणि अस्पासियाच्या उल्लेखामुळे विशेष आवडला. माहिती म्हणून खूप आवडला. भाष्य म्हणावे असे यात जास्त काही नाही, अन जे आहे त्याच्याशी असहमत होण्यासारखेही काही दिसत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फारच मस्त. पॅरीसमधले फॅशन, सेक्स आणि कला यांचे अनेक धाग्यांनी विणले गेलेले वातावरण आपल्याला अडकवत नाही उलट मुक्त करते, अजूनही.
पंधराव्या लुईच्या दरबारी बाहरवालीचा- मादाम पॉम्पिदूचा उल्लेख राहिला.
ती पण एक मस्तच बाई होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मादाम पॉम्पिदू ही स्वतः अ‍ॅरिस्टोक्रॅटिक घराण्यातील बाई होती ना? तिचे स्वतःचे 'सॅलॉन' होते. व्हॉल्टेअर त्या सलॉनमधूनच फेमस झाला असे विल ड्यूरांटच्या 'एज ऑफ व्हॉल्टेअर' मध्ये वाचल्याचे आठवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> पंधराव्या लुईच्या दरबारी बाहरवालीचा- मादाम पॉम्पिदूचा उल्लेख राहिला.
ती पण एक मस्तच बाई होती.

मादाम द पोंपादूर मस्त बाई असण्याविषयी सहमत, पण ती राजाची रखेल होती, राजाकडे राहायला होती आणि राजाच्या मर्जीवर अवलंबून होती. 'कुणा एकावरच अवलंबून नसणं' आणि 'जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य असणं' ह्या कलमांमुळे ती ह्या लेखाच्या संदर्भात योग्य ठरत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लेख आवडला, पण स्त्रीची स्वायत्तता तपासताना पॅरिस मधे लैंगिक स्वायत्ततेपासुन ते 'आज' नक्की फ्रेंच स्त्री कशी 'प्रगत' झाली आहे हे ही लेखात आले असते तर शेवटच्या परिच्छेदाला अधिक धार आली असती, त्याचप्रमाणे ह्या फ्रेंच गणिका काळाची आणि (पुरुष प्रधान) परिस्थितीची निर्मिती होती त्यामुळे स्वायत्तता मर्यादीतच राहते असेही म्हणायला वाव असावा.

स्त्रीच्या लैंगिक स्वायत्ततेविषयी समाजाला वाटणाऱ्या भीतीमुळेच कदाचित आजही अशी ढोबळ आणि सोयीची मांडणी होत असेल. कारण, ह्या मुद्द्याचा अधिक मूलगामी शोध घेतला, तर ते कदाचित आजही गैरसोयीचं ठरू शकेल. आर्थिक उदारीकरणामुळे भारतीयांच्या हातात पैसा खुळखुळू लागला आहे. निव्वळ सुटी घालवण्यासाठी परदेशवारी त्यांना सहज परवडू लागली आहे. पॅरिस-अॅमस्टरडॅम किंवा बॅंकॉक-पट्टायाचं नाइटलाइफ त्यांना खुणावू लागलं आहे. भोगविलासी आणि रोमॅन्टिक पॅरिसच्या सुवर्णकाळातल्या रंगलेल्या रात्रींमागच्या स्वतंत्र स्त्रियांच्या साम्राज्याचा हा इतिहास सांगायची गरजही म्हणूनच आज अधिक भासते आहे

ह्या परिच्छेदातून समाजावर(पक्षी: पुरुषांवर) टिका करताना जाणिवपुर्वक आजच्या स्त्रीयांना (निदान स्वातंत्र्य मिळवलेल्या) वगळण्यात आले आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या लेखाच्या संदर्भात तरी हा प्रतिसाद अनाठायी छिद्रान्वेषी वाटला.

दिवाळी अंकाच्या लेखात अवांतर होतं आहे. पण कुठेही कुणीही 'स्त्रियांवर अन्याय होतोसं दिसतंय' असं कुठल्याही संदर्भचौकटीत म्हणायची खोटी, की मग त्या संदर्भात सार्वकालिक सत्याची आवश्यकता असो वा नसो, 'त्या तिकडच्या शेवटच्या माळ्यावरची वरून तिसरी स्त्री आहे की स्वतंत्र. तिचा नाही तो उल्लेख केलात?'छाप प्रतिसाद द्यायला हा पाहिजेच! मज्जाच आहे एकेक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

रोमन संस्कृतीतही प्रतिष्ठित, सुशिक्षित आणि बहुश्रुत गणिका आढळत. त्यांपैकी थिओडोराची कहाणी विलक्षण आहे.

हॅट्स ऑफ टू हर!!! फार छान व्यक्तीमत्व वाटत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा! मस्त लेख! आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुस्थित आणि बुद्धिमान स्त्रियांबद्दल/साठी लिहिलेला लेख फारच आवडला.

(उगाच 'बिफोर सनराईज' (का 'बिफोर सनसेट'?) मधला एक संवाद आठवला. चित्रपटांत दोनच महत्त्वाची पात्रं, फ्रेंच सेसिल आणि अमेरिकन जेसी. सेसिल त्याला खट्याळपणे म्हणते, मला तर वाटतं पुरुषांना उपभोग घेता यावा म्हणून हे स्त्रीमुक्तीचं खूळ त्यांनी काढलं असणार. जेसीला त्यावर धड उत्तरही देता येत नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सेसिल त्याला खट्याळपणे म्हणते, मला तर वाटतं पुरुषांना उपभोग घेता यावा म्हणून हे स्त्रीमुक्तीचं खूळ त्यांनी काढलं असणार. जेसीला त्यावर धड उत्तरही देता येत नाही.)

आयला, स्त्रीमुक्ती ही पुरुषप्रणीत संकल्पना आहे या स्त्रीद्वेष्ट्या विचाराला विरोध करायचं सोडून हे काय चाललंय? असिमॉनियम्!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जमतं हो काही मुक्त स्त्रियांना स्त्रीवादाबद्दलही विनोद करायला! तुम्ही नका त्याचं लोड घेऊ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जमतं हो काही मुक्त स्त्रियांना स्त्रीवादाबद्दलही विनोद करायला!

हो, आणि सारखं ओरडून ओरडून अन्य लोकांबद्दल क्राय फाउल करणार्‍यांनाही ते जमतं हा एक नवीनच शोध वगैरे लागला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं