मल्लिकाचा किस

मल्लिकाचा किस

लेखक - प्रणव सखदेव

बाहेर ऊन तळपत होतं, जणू ते घट्ट गोठल्यासारखं वाटत होतं. खिडकीतून झळा आत येत होत्या. पडदे सारून घेतल्यावर खोलीत थोडंसं अंधारलं. मी खुर्चीवर बसून माझं आयपॅड सुरू केलं.

परवाच मला कळून चुकलं की, आता आपण म्हातारे झालो आहोत, आपल्या हातात फार दिवस नाहीयेत. झालं असं की, परवा माझ्या शेजारच्या खोलीत असलेले माझे सोबती रात्री झोपेतच गेल्याचं सकाळी कळलं. पुढचा नंबर आपलाही असू शकेल अशी शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली. आणि म्हणूनच मी ठरवलं की, मेल लिहायचा – विहानला – माझ्या नातवाला. योगायोगाने उद्या तो पंधरा वर्षांचा होणारही आहे, तेव्हा हीच वेळ योग्य आहे त्याला ही गोष्ट सांगण्याची.

विहान आणि त्याचे आईबाबा मुंबईत राहतात. आणि मी इथे लोणावळ्याच्या राखीव जंगलात बांधलेल्या एका केअर सेंटरमध्ये. मुंबईत मला आवडत नाही, नुसती गर्दी, धावपळ आणि आवाज. जरा कुठे जावं म्हटलं किंवा मोकळी हवा घेण्यासाठी खिडकीची काच उघडावी म्हटली की, सगळी गर्दी, वाहनं आणि त्यांचे प्रचंड आवाज भसकन् अंगावर धावून येतात प्रचंड सैन्यासारखे. कंटाळा येतो खूप आणि त्यामुळे वैतागही. इथे लोणावळ्याला या जंगलात कसं शांत वाटतं, निवांत. हे जंगल खास राखीव ठेवण्यात आल्याने इथे कोणालाही येता-जाता येत नाही. कारण त्यासाठी खास परवनागी घ्यावी लागते.

महिन्यातून दोन-तीन वेळा तिघे जण मला भेटायला येतात आणि त्या निमित्ताने आउटिंगही होतं. शिवाय आम्ही दररोज व्हिडिओ चॅट करून गप्पा मारतो, सोशल साइट्सच्या चॅटिंगमार्फत 24 X 7 कनेक्टेडही असतो एकमेकांशी. आर्यन आणि रेवा – माझा मुलगा आणि सून – कामनिमित्त दिवसभर बाहेर असतात, कधीकधी कित्येक आठवडे परदेशातही. त्यामुळे बरेचदा विहान एकटाच असतो घरी. म्हणून त्याच्याशी जास्त चॅटिंग होतं माझं. मी त्याला त्याच्या ‘स्कूल’बद्दल, अभ्यासाबद्दल, मित्र-मैत्रिणींबद्दल विचारतो. तो मला त्यांच्या शाळेतल्या इव्हेंटचे स्नॅप्स-व्हिडिओ दाखवतो, गंमतीजंमती सांगतो. फारच छान गट्टी आहे आमची, पण काही गोष्टी अशा असतात ज्या प्रत्यक्ष सांगता येत नाहीत. मग अशा वेळी ई-मेल, म्हणजे लिहिलेले शब्द, फार सोयीचे वाटतात मला. एक प्रकारची आपुलकीही वाटते त्यामुळे, गेल्या पिढीतला असल्याने निदान मला तरी वाटते.

---

प्रिय,

---

मी टाइप केलं. मग पडदा किंचित बाजूला सारून खिडकीतून बाहेर दिसत असलेल्या बोगनवेलीकडे पाहिलं. काही क्षण मी वेल पाहिली, मग एकेक सुटं पाहू लागलो. फुलं – गुलाबी, रसरशीत. पानं – हिरवी. त्यावर पडलेलं ऊन आणि नागमोडी वळणं घेत झाडावर चढत गेलेली वेल. जणू त्या झाडाला आपल्यात सामावू पाहणारी.

मी विचारात बुडलो. आठवणींचे धागे जुळू लागले. पॉप अप्ससारख्या आठवणी भूतकाळाच्या बॉक्समध्ये बंदिस्त असतात. गतिमान वर्तमान थोडंसं शांतवलं की, त्या सपासप वर येऊ लागतात.

मी लिहू लागलो –

---

मी तुला जे सांगणार आहे ते खरं आहे का खोटं, हे मला माहिती नाही. खरंतर खरं-खोटं ठरवण्याच्या फंदात तूही पडू नकोस, पण कदाचित मी जे सांगणार आहे ते वेगळ्या प्रकारे तूही अनुभवत असशील किंवा कदाचित पुढे अनुभवशील. म्हणून मला तुझ्याशी हे शेअर करावसं वाटतंय. मी तुला सांगणार आहे माझ्या आयुष्यात आलेल्या मल्लिकाबद्दल.

मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मला कळलं की, ती जणू मल्लिका शेरावतच आहे. शंभर टक्के. डिट्टो मल्लिका शेरावत.

आता, ही मल्लिका शेरावत कोण असा प्रश्न तुला पडेल. साहजिकच आहे ते. मल्लिका शेरावत म्हणजे मी शाळेत असताना – तुझाच शब्दात सांगायचं तर – ‘हॉटेस्ट अक्ट्रेस’ होती. तुला तिची आणखी माहिती गुगलवर किंवा विकिपिडीयावर मिळेल. पण ती नाही मिळाली तरी फार काही फरक नाही पडणार. कारण ते फारसं महत्त्वाचं नाहीये. महत्त्वाची आहे ती माझी आणि मल्लिकाची गोष्ट.

2004 साल. तेव्हा मी नववीत होतो. 13 जून, शाळेचा पहिलाच दिवस होता. पहिलाच तास आणि बाहेर पाऊस पडत होता. तेव्हा मुंबईत पडणारा पाऊस साधासुधा नसायचा, तर धुंवाधार – मुसळधार असायचा नुसता! चार-चार दिवस सूर्य दिसायचा नाही. छत्री घ्या, रेनकोट घाला किंवा आणखी काही करा, तो तुम्हांला भिजवणार, म्हणजे भिजवणारच!

अशा धुंवाधार पावसात चिंब भिजून आलेली मल्लिका पहिल्यांदा आमच्या वर्गात आली. सेम तशीच जशी टीव्ही स्क्रीनवर दिसायची. तसंच नाक, तसेच लांबसडक केस, तशीच मादक फिगर, तसाच गहूवर्ण. आणि अगदी तस्साच ब्यूटी स्पॉट गालाच्या इथे. सगळ्या वर्गाशी ओळख करून देण्यासाठी बाईंनी मल्लिकाला सगळ्यांसमोर बोलावून घेतलं. काहीशी अवघडलेली ती वर्गासमोर आली. सारखं या पायावरून त्या पायावर करत होती. आणि बाई सांगत होत्या, "मुलांनो, ही नवी मुलगी यंदाच्याच वर्षी आपल्या शाळेत आलीए बाहेरगावाहून. हिचं नाव आहे – "

तेवढ्यात मल्लिकाच्या नाजूक, पातळ ओठांतून हळुवारपणे शब्द बाहेर पडले – "मल्लिका." हे शब्द इतके हळुवार आणि नाजूक असतील, तर तिचे ओठ किती मऊ, मृदू असतील असा विचार माझ्या मनात आला होता तेव्हा.

"मुलींनो, मल्लिकाला काही हवं असल्यास तिला मदत करा, बरं. आणि मल्लिका, काहीही, केव्हाही लागलं की, लगेच मला भेटायला ये हां..."

मुलींनीच का मदत करायची, मुलांनापण हक्क आहे मदत करायचा, मनातल्या मनात मी चरफडलो. पण आत्ता तुमच्या इतका मोकळेपणा नव्हता आमच्या वेळी. तरी आमची शाळा मुला-मुलींची होती म्हणून बरं. नाहीतर कॉलेजमध्ये गेल्यावर झालेले माझे कित्येक मित्र मुलींशी बोलताना अक्षरशः थरथरायचे आणि त्यांना इतका घाम फुटायचा की, त्यांचे हाताचे तळवे ओले होऊन कपाळावरही घामाचे थेंब जमायचे! कदाचित तू आता हसशील यावर, पण तसं होतं खरं.

आमच्या वर्गाचे दोन भाग होते, पहिल्या भागात चार रांगा मुलांच्या, तर तीन रांगा मुलींच्या. टॉक टॉक हिल्स वाजवत मल्लिका आपल्या जागेवर जाऊन बसली. मी तिच्याकडे एकटक पाहत होतो – चालताना ती कमरेला देत असलेला ठुमका, किंचित वर-खाली होणारी छाती... इतकं कसंतरी वाटलं ना मला तेव्हा, वाटलं – आपण पाप करतोय! पण शेवटी हार्मोन्सना कसलं कळतंय पापबिप! माझी नजर काही तिच्यावरून हटत नव्हती.

मल्लिकाने आमच्या शाळेत, म्हणजेच माझ्या आयुष्यात येण्याचा अगदी बरोब्बर मुहूर्त साधला होता किंवा असं म्हणू या की, अगदी मुहूर्तालाच तिची एंट्री झाली होती माझ्या आयुष्यात. आता मी जे सांगणार आहे ते फक्त आपल्यातच राहील बरं का - एकदम टॉप सीक्रेट!

हे सीक्रेट असं की, मी तेव्हा नुकताच पंधरा वर्षांचा झालो होतो. (तुझ्यासारखाच!) नुकतेच माझ्या ओठांवर बारीक केस उगवायला लागले होते. काखेत, जांघेत आणि छातीवर केस फुटू लागले होते. त्यामुळे मी हरखलो होतो. कारण आमच्या वर्गात दोन ग्रुप्स होते. एक केस आलेला आणि दुसरा तुळतुळीत. केस आलेल्या ‘मर्द’ ग्रुपमध्ये तर काही जण दाढीदेखील करायला लागले होते. मर्द ग्रुप संख्येने मोठा होता, त्यामुळे ते तुळतुळीत ग्रुपला तुच्छ तर लेखायचेच, पण चिडवायचेही. त्यामुळे तुळतुळीत ग्रुपमधला ‘उकडलेला बटाटा’ असलेला मी आता केस फुटलेल्या ‘मर्द’ ग्रुपमध्ये सामील झालो होतो. मर्द ग्रुपमध्येही जास्त केस असलेल्यांना जास्त अभिमान असायचा, तर कमी असलेल्याच्या नशिबी तुच्छता आणि चिडवणं असल्या गोष्टी यायच्या. पण निदान आता मी मर्द ग्रुपमध्ये सामील तरी झालो होतो, याचाच मला काय आनंद झाला होता म्हणून सांगू.

केस फुटल्याच्या साक्षात्कार झाल्यानंतरच्या दोन दिवसांनी मी घरात एकटाच होतो. टीव्ही पाहत लोळत होतो. तेव्हा एक गाणं पाहत असताना त्या गाण्यातल्या हिरॉइनचे हावभाव आणि तिच्या ड्रेसच्या खोल गळ्यातून दिसणारे अर्धेमुर्धे आकार यांमुळे माझं लिंग ताठ झालं. मी उताणा झोपून मान थोडी वर करून पाहिलं – चड्डीच्या मध्यभागावर उंचवटा आला होता, चित्रात डोंगर काढताना कसा त्रिकोणी आकार काढला जातो तसा. मी भांबावलो. कारण असं याआधी कधीच झालं नव्हतं. घाबरत मी हळूच माझा हात माझ्या चड्डीतून आत घातला. लिंगाच्या मधोमध बुळबुळीत, थोडासा चिकट पदार्थ होता. मग मी माझ्याही नकळत लिंगावरची त्वचा वर-खाली केली, हे मला कसं जमलं ठाऊक नाही. कारण मी हे पहिल्यांदाच करत होतो. मी हे कधीही पाहिलं नव्हतं किंवा मला कोणी सांगितलंही नव्हतं. माझं मन त्या नटीला कल्पू लागलं. मी डोळे बंद केले. श्वास वाढले आणि क्षणात बुळबुळीत द्रव बाहेर आला. चड्डी ओली झाली. त्या मागोमाग हवाहवासा, नकोनकोसा वास आला. मी हडबडलो. आता काय करायचं ते कळेना, घरच्यांना कळलं तर? मी टरकलो. संडासात गेलो आणि हातावर पाणी घेऊन चड्डी धुवायला लागलो. खूप नर्व्हस वाटत होतं मला. मग तशीच ओली चड्डी घातली – चड्डी बदलली, तर उगाच घरच्यांना कळायचं या भीतीने.

तेव्हा जरी मला अपराधी वाटलं, तरी नंतर कोण आनंद झाला म्हणून सांगू! कारण वर्गात ‘मर्द’ ग्रुपमधल्या ‘जिंदादिल मर्द’ या सबग्रुपमधली मुलं चवीने ‘तसल्या’ (ज्याला आता तुम्ही ‘पॉर्न’ म्हणता त्या) सीड्या पाहायचे, मासिकं चोरून वाचायचे. एकमेकांना द्यायचे. इतकंच काय, पण वर्गातल्या मुलींची किंवा अगदी बाईंचीदेखील कल्पना करून किती मजा येते, हे बडेजावाने सांगायचे. वर्गात या ग्रुपचं वर्चस्व सर्वाधिक होतं. इतके दिवस मी त्यांच्या चर्चा नुसत्याच एेकायचो, आता मात्र मी एकदम ‘जिंदादिल मर्द’ झालो होतो.

नंतर मला ‘ते’ सगळं आठवताना ती नटी मल्लिका नव्हती, याचा फारच आनंद झाला! कारण मल्लिकाच्या बाबतीत मी ‘तसा’ विचार करू शकणार नाही, असं मला वाटायचं. तिच्यासाठी माझ्या मनात एक हळवा कोपरा होता. या सगळ्या गोष्टींपासून वेगळा. प्लॅटॉनिक. पण आता तो सगळाच एक भास होता, माझ्या मनाने तयार केलेला, असंही वाटतं कधीकधी.

पहिल्यांदा जेव्हा मी मल्लिकाला पाहिलं ना आमच्या वर्गात तेव्हाच तिने माझ्या मनात घर केलं. तेही साधंसुधं नाही, तर चांगलं थ्रीबीएचकेचं. मुंबईकरांसाठी फारच मोठं, बंगलाच जणू. त्या फ्लॅटमध्ये ती दिवस-रात्र राहायची. कधी या खोलीतून त्या खोलीत जायची, तर कधी टेरेसमध्ये उभी राहत वारा अंगावर घ्यायची. मग अचानक पाऊस सुरू व्हायचा. मुंबईचा मुसळधार पाऊस. तिने पांढरेशुभ्र कपडे घातलेले असायचे. ती चिंब व्हायची. अजूनही तिची ती ओलेती प्रतिमा मी माझ्या मनाच्या लाकडी फ्रेममध्ये घट्ट बसवून ठेवली आहे. ती प्रतिमा अगदी तशीच दिसते जशी ती पहिल्यांदा आमच्या वर्गात आली होती - चिंब भिजलेली. पांढरा, अंगाशी घट्ट असलेला कुडता आणि निळसर सलवार – म्हणजे आमचा शाळेचा गणवेश. ओले कपडे अंगाला चिकटलेले. काळेभोर केस भिजल्याने थोडेसे कुरळे झालेले. मी तिला नीट न्याहाळलं तेव्हा मला कळलं की, ती वयात आली आहे. कारण तिचे स्तन पुष्ट होते. आईने आणलेली बायकांविषयीची मासिकं मी चोरून वाचायचो. त्यात मी वाचलं होतं की, मुली वयात आल्यावर, म्हणजेच त्यांची मासिक पाळी – एमसी सुरू झाल्यावर, त्यांची छाती वाढू लागते, स्तनांना उभारी येते आणि ढुंगणाला, कंबरेला गोलाकार येतो. अगदी तशीच दिसत होती ती, आणि ओलेत्या अंगी ही सगळी वैशिष्ट्यं अधिकच स्पष्ट दिसत होती. कोरीव, मादक. मी तेव्हा जर मायकलँजेलो असतो ना, तर डेव्हिडसारखंच मल्लिकाचं शिल्प तयार केलं असतं संगमरवरात.

ती इतर मुलींसारखीच नव्हतीच. म्हणजे इतर मुलीही वयात आलेल्या होत्या, आणि त्यामुळे टेचात असायचा. पण हिच्यासारखं कोणीच नव्हतं, जणू एकमेवाद्वितीय, निदान माझ्यासाठी तरी. ती इतर मुलींसारखी सॅक आणायची नाही कधी, तर पर्स आणायची. चामड्याची. ब्रँडेड, महागाची. त्यातच वह्या-पुस्तकं ठेवायची. तिच्या ड्रेसचा गळाही इतर मुलींपेक्षा वेगळा होता, थोडा खोल, फॅशनेबल, वेगवेगळ्या पॅटर्न्सचा. इतर मुलींसारखी ओढणी तर घ्यायचीच नाही कधी ती. पण कधीतरीच स्टोल घ्यायची, त्यावर बारीक नाजूक नक्षीकाम केलेलं असायचं. बरेचदा केस मोकळे असायचे, तर कधीतरी पोनी टेल किंवा डोक्यावर फुगा काढून मागे मोकळे सोडलेले. मला ते फार आवडायचे. माझ्या मनातल्या त्या थ्रीबीएचकेमध्ये मी कितींदीतरी ’मी उताणा झोपलो आहे, आणि ती माझ्या छातीवरून चेहर्‍यावर तिचे काळेभोर रेशमी केस फिरवते आहे आणि त्याने मला हव्याहव्याशा गुदगुल्या होताहेत’ अशा कल्पना करकरून त्या रंगवायचो.

तिच्या नखांना नेहमी नेलपेंट लावलेलं असायचं, तर डोळ्यांना रेखीवपणे लाय-लायनर आणि आयशॅडो. ओठांवर अगदी नीट, थोडीही बाहेर येऊ न देता लिपस्टिक लावलेली असायची – लाल भडक रंगाची. ती लिपस्टिक पाहून वाटायचं की, पीटीच्या तासाला किंवा प्रयोगशाळेत गेल्यावर काहीतरी करून हिला बाजूला घ्यावं आणि आपल्या गालावर... किंवा काहीच नाही तर, निदान शर्टावर तरी तिचे ओठ टेकवावेत. म्हणजे मग ‘जिंदादिल मर्द’ गटात फुशारक्या मारता येतील. पण नंतर वाटायचं नकोच मुळी, जर का त्या मुलांना ही ‘आपली’ मल्लिका कळली, तर ते तिलाही सोडणार नाहीत. आणि गप्पा मारताना तिची कल्पना करून कशी अधिक मजा आली, हे रंगवून रंगवून सांगतील आणि ते मला नाही सहन होणार! कारण मला तेव्हा तिच्याशीच लग्न करायचं होतं, हो तिच्याशीच, फक्त तिच्याशी! मनातल्या मनात मी ठरवून टाकलं होतं तसं. आणि पुढे असंही की, जर समजा बाबांनी विरोध केलाच, तर घरून पळून जायचं म्हणून!

---

मला माझंच खूप हसू आल्याने मी लिहायचा थांबलो. उठून स्वयंपाकघरात गेलो आणि पाणी उकळायला ठेवलं.

काय काय वाटत असतं ना आपल्याला त्या त्या वयात! मग नंतर कधीतरी मागे वळून पाहताना ते आठवलं की, इतकं बालीश, इतकं इमॅच्युअर वाटतं की, हसू येतं. खूप पुढे निघून आलेलो असतो आपण. हास्यास्पदच असतं ते. पण तरी ते त्या त्या वयात खरंखुरं वाटत असतं. मौज वाटत असते त्याची.

पाणी उकळून वरती येत होतं. गॅस बंद करून, पाणी मगमध्ये ओतलं. मगमध्ये टी बॅग आधीच टाकली होती. थोडा वेळ तशीच ठेवून मग टी बॅग सात-आठ वेळा वर-खाली केली. वाफाळलेल्या पारदर्शक पाण्यात हळूहळू चहाचा तपकिरी-काळा रंग मिसळला, एकजीव झाला. चहाचा आल्हाददायक सुगंध पसरला.

मीपण तर असाच होतो तेव्हा, या पाण्यासारखाच नितळ, पारदर्शक आणि वाफाळलेला, गरम. आणि मल्लिका होती टी बॅगसारखी. मला रंग देणारी. माझ्या वाफेला सुगंधित करणारी…

---

मल्लिकाला माहितीही नसेल की, वर्गात मी तिच्याकडे सतत एकटक पाहत असायचो. माझी जागा होती तिसर्‍या रांगेत. पण तिच्याकडे नीट पाहता यावं म्हणून काहीतरी कारण काढून ती बदलून घेतली मित्राकडून, आणि चवथ्या, म्हणजे मुलींशेजारच्या, रांगेत बसू लागलो. असाही मी आता जिंदादिल मर्द या वर्चस्व असलेल्या ग्रुपमध्ये गेलो होतो. आणि त्यात तो मित्र होता तुळतुळीत ग्रुपमधला. त्यामुळे त्यानेही फार कां कू केलं नाही, तोंडही बंद ठेवलं.

मल्लिका मुलींच्या दुसर्‍या, म्हणजेच मधल्या रांगेत, तिसर्‍या बाकावर बसायची. त्यामुळे मी तिला दोन-तीन मुलींच्या मधून कोणाच्या फार लक्षात येणार नाही, असं पाहायचो. तिला नीट न्याहाळायचो. बाई आल्या की, एकसाथ नमस्ते करायला उभी राहायची, तेव्हा ती कुडत्याची मागची - ढुंगणाकडची - बाजू ओढून नीट करायची. हसत हसत नमस्ते म्हणायची. पुन्हा खाली बसताना बाकावर काही नाहीये ना हे पाहून बसायची. मग बाकाखालून त्या त्या तासाची वही आणि पुस्तक काढायची. मध्येच ओठांवर ओठ दाबून लिपस्टिक सारखी करायची, तर कधी हाताने केस सारखे करायची. एखादा प्रश्न विचारला की, नेलपेंटने रंगवलेलं नख दोन दातांच्या मध्ये धरून विचार करायची. मग उत्तर आलं की, तेच बोट वर करायची. मग माझ्या मनात गुदगुल्या व्हायचा, हसू यायचं. तिच्या अशा कितीतरी गोष्टी, लकबी, अदा जपून ठेवल्या मी माझ्या मनात. लहानपणी कसं चॉकलेटची चांदी किंवा पिंपळाचं जाळीदार पान वहीत जपून ठेवायचो तसं. किंवा आत्ताच्या तुमच्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही कसं एखादा आवडीचा मित्राच्या किंवा मैत्रिणीचा बर्थडेचा व्हिडिओ किंवा डेटिंगचा सेल्फी क्लाउडवर कायमचा स्टोअर करता तसं.

एकदा संस्कृतच्या बाई वर्गात कोणतातरी शब्द कसा चालवायच्या हे शिकवत होत्या. मला मुळातच संस्कृतचा जाम कंटाळा. सारखं बिनडोकासारखं पाठांतर करा आणि स्कोअरिंग सबजेक्ट म्हणत पैकीच्या पैकी मार्क मिळवा, याचा वैताग यायचा. म्हणून मी माझं पूर्ण लक्ष मल्लिकाकडे वळवलं. ती मन देऊन बाईंचं एकत होती, आणि त्या सांगताहेत त्याप्रमाणे शब्द म्हणत होती. ‘कवयो’ म्हणताना शब्दाच्या शेवटी तिचा ओठांचा चंबू होत होता, तर ‘कवि:’ म्हणताना दोन्ही ओठ विलग होत होते. एकूणच तिला हे सगळं नवीन असल्याने मजा येत होती, हे तिच्या हसर्‍या चेहर्‍यावरून कळत होतं.

मी मनाच्या त्या थ्रीबीएचकेमध्ये. आम्ही दोघंच. टेरेसवर. रात्र झालीए. टेरेसवरून समोर शहरातले पेटलेले दिवे. लाल-पिवळे-हिरवट. गडद काळ्या कापडावरती वेगवेगळ्या रंगाच्या धाग्यांनी क्रॉसस्टिचने भरतकाम केलं की, त्या त्या कापडाच्या मागे कसे त्या त्या रंगाच्या धाग्यांचे गोळे दिसतात तसं दिसतंय समोर.

माझ्याशेजारी मल्लिका बसलीए. तिचे केस नेहमीसारखेच मोकळे. ओठांवर लाल लिपस्टिक. पांढरा टी-शर्ट घातलाय तिने. त्यातून तिचे वक्षोभार आकर्षक दिसताहेत. त्याखाली डेनिमची हॉट शॉर्ट. तिचे चमकदार नितळ पाय. वॅक्सिंग केलेले. चमकणारे. एका पायात अँक्लेट. त्यातल्या एका घुंगराचा मधूनच किणकिणता आवाज.
ती काहीतरी म्हणतेय. काय म्हणतेय –

रामः ...

संस्कृतचा शब्द चालवतेय ती. तिच्या चेहर्‍यावर लहान मुलीसारखे भाव आहेत, पहिल्यांदाच नवं काहीतरी शिकवल्यावर असतात तसे – उत्सुक, निरागस आणि आपल्याला काहीतरी कळलंय याचा आनंद झालेले.

रामस्य....

ती मोठ्याने म्हणते. तिचे ओठ विलग होतात.

रामौऽऽऽऽ

औ.... ओठांचा चंबू होतो आणि मी तिच्याकडे पाहत दोन बोटं बंदुकीसारखी रोखून धरत म्हणतो, स्टॅच्यू! तिच्या चेहर्‍यावर आश्चर्यचकित करणारे भाव. ओठांचा चंबू तसाच ठेवून ती स्तब्ध, पुतळ्यासारखी. तिचे लाल ओठ. मऊ, मृदू, लुसलुशीत.

पण तिचा औऽऽऽ अजून घुमतोय, मी त्याची लय बरोब्बर पकडतो आणि गाणं म्हणायला सुरुवात करतो – ओ ओ ओऽऽह...
भिगे होठ तेरे, प्यासा दिल मेरा

ती तशीच स्तब्ध, आणखीन आश्चर्यचकित. मी मनापासून गातोय, चेहर्‍यावर हावभाव आणत. तिच्या डोळ्यांना डोळे भिडवत. थेट खोलात पाहत, तिचा अंतरंगाचा ठाव घेत.

मी पुढे चालू ठेवतो –
लगे अब्र सा मुझे तन तेरा

हे म्हणताना मला तिच्या चमकदार नितळ मांड्यांवरून, पायावरून मग केसांतून हात फिरवायचा अनावर मोह होतोय.

तेवढ्यात आवाज येतो – "तिसरा बेंच, लक्ष कुठेय?’’

मी मोह आवरतो आणि पुढे म्हणतो -
कभी मेरे साथ...

‘साऽऽथ’ शब्दावर असणारी हरकत बरोब्बर घेतो.

कोणीतरी खेकसतं – "तिस्रा बेंचऽऽ?"

कोई रात गुजार तुझे सुबह तक मै करू प्याऽऽर
ओ ओ ओहऽऽऽ....

मला तिला मिठीत घ्यावसं वाटत असतं. आता मी घेणार, म्हणजे घेणारच. आता मोह आवरता घ्यायला नको. ती अजूनही स्टॅच्यूच. ओठांचा चंबू. ही संधी आहे, हीच... मी बाहू पसरून तिला कवेत घ्यायला जाणार –

तेवढ्यात खडूचा मोठ्ठा तुकडा माझ्या कपाळावर येऊन आपटला. मी भानावर आलो.

थ्रीबीएचकेतल्या पॉश टेरेसवरून खडूची पूड सगळीकडे पसरलेल्या काळपट भिंतींच्या वर्गात – जुन्या खडबडीत बाकावर.

अख्खा वर्ग हसत होता.

बाईंनी डस्टर जोरजोरात टेबलावर आपटलं आणि ’शांत बसा, नाहीतर सगळ्यांना शिक्षा करीन’ असं मुलांना दटावलं.

मग माझ्याकडे पाहत बाई नाकात म्हणाल्या, "कांय महाशय, लक्ष कुठेंय?"

मी कसाबसा उभा राहत म्हटलं, "मल्लि... माझं लक्ष आहे, बाई!"

"आहें, मग चालव पाहू शब्द..."

"शब्द... कुठला, शब्द. राम ना?"

"अरे, गधड्या आठवीतच आहेंस वाटतें अजून, राम आठवीत गेला वनवासाला तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमुळे. नव्हतं न लक्ष. आणि वर तोंड करून खोटेंही बोलतोस."

"बाई..." मी काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलं तेव्हा मला मल्लिकाची ती स्टॅच्यू झालेली प्रतिमा, तो ओठांचा चंबू आठवला. मला मनातल्या मनात गुदगुल्या झाल्या. मी एकदा मल्लिकाकडे ओझरतं पाहिलं. तोच बाई खेकसल्या, "इकडे यें आधी, समोर. चांगलींच अद्दल घडवतें तुला."

समोर गेल्यावर बाईंनी माझ्या दोन्ही तळव्यांवर उभ्या पट्टीने जोरात पाच-पाच फटके दिले, मी खूप कळवळलो तेव्हा. फटके देताना बाई म्हणत होत्या, "अभ्यास नकों करायला यांना, लक्ष नकों द्यायला वर्गात, मग नंतर नापास झालें की दोष आम्हांलाच. अद्दल घडवतें चांगली तुला."

मग मला सगळ्यांच्या समोर बाईंनी त्यांच्या टेबलावर उभं केलं आणि पायाचे अंगठे पकडायला लावले. मी वाकल्यावर माझ्या पाठीवर पुस्तक ठेवलं. पुस्तक पडलं की, पुन्हा एक फटका असं बाईंनी सांगितलं. मला खूप म्हणजे खूपच अपमानित झाल्यासारखं वाटलं, तेही मल्लिकासमोर असं उभं केल्याने जास्तच!

खरंतर आता तुला ही शिक्षा फार वाटेल. आत्ता जर असं कोण्या शिक्षकाने केलं तर तुझे आईबाबा त्याच दिवशी शाळेत जातील, आता हे अक्षम्य आहे. पण तेव्हा हे सर्रास व्हायचं. उलट आमच्या आईबाबांच्याही याच अपेक्षा असायच्या शिक्षकाकडून. चांगलं फोडून काढा त्याला म्हणजे समजेल त्याला, असंच सांगायचे आईबाबा.

मला मल्लिकाला न्याहाळायची इतकी सवय झाली होती की, गुडघ्यात वाकल्यावरही तिला पाहण्यासाठी मी मान वर करत होतो आणि त्यामुळे पुस्तक सारखं पडत होतं. ते पडलं की, सगळा वर्ग हसायचा. बाई चिडायच्या आणि जोरात पट्टी मारायच्या. मी कळवळायचो. शेवटी एकदाचा तास संपला आणि मी आणि बाई आम्ही दोघांनीही हुश्श केलं, मी उघड, तर बाईंनी मनातल्या मनात.

मुख्याध्यापकांकडेच तुझी तक्रार करते, असं म्हणून बाई गेल्या. मग मुख्याध्यापकांकडून माझ्या बाबांसाठी चिठ्ठी गेली आणि रात्री बाबांनी मला बडवलं. माझे हात पट्ट्यांच्या माराने सुजले होते, आता गालही सुजले अन् डोळेही.

त्यानंतर मी कोडगा झालो. त्या संस्कृतच्या बाईंच्या तासाला तर कधीच लक्ष दिलं नाही. त्याएेवजी मल्लिकानिरीक्षण सुरूच ठेवलं. नंतर नंतर त्या बाई मला ‘अस्वस्थ आत्मा’ म्हणू लागल्या. मग त्याही कोडग्या झाल्या, मी नाहीये वर्गात, असंच समजून शिकवू लागल्या…

---

पॅडची बॅटरी संपायचा मेसेज आल्यावर मी चार्जिंगसाठी वायर काढून लावली. ‘टिंग’ असा हळूच आवाज होऊन पॅडवरच्या बॅटरीचं चिन्हं वर-खाली होऊ लागलं.

खरंतर ते वय किती नाजूक असतं आणि अडनिडं. सगळं कळतंय असं वाटत असतं आपल्याला, टोकदार झालेले असतात आपले इगो. या बॅटरीसारखंच सारखं वर-खाली होणारं. कधी अचानक आनंदाने उचंबळणारं आणि तर कधी एकदम लो बॅटरी झाल्यासारखं, नर्व्हस, उदास. खरंतर या वयातल्या भावना समजून घेणारी सकारात्मक चार्जिंग वायर असायला हवी, पण... थोडा पडदा सारला. बाहेरचं ऊन थोडं कमी झालं होतं.

---

मी तुला खूप बोअर करत असेन या मल्लिकाप्रकरणाने. पण या म्हातार्‍या आजोबाचं म्हणणं अजून थोडा संयम ठेवून वाच, कारण आता हा आहे शेवटचा भाग.
त्या संस्कृत प्रकरणानंतर, बाबांनी कडक शब्दांत सांगितलं की, "शाळेत जायचं असेल तर वर्गात लक्ष दिलं पाहिजे. आपण काही सोन्याचा चमचा तोंडात घालून जन्माला आलेला नाहीत. कष्ट केल्याशिवाय काहीही साध्य होत नाही कळलं का? तेव्हा अभ्यास करा, अभ्यासात लक्ष घाला."

मी मान खाली घालून नुस्तंच हं-हं करत होतो.

"यंदाच्या वार्षिक परीक्षेत जर का कमी गुण मिळाले तर बघच, सोलूनच काढीन तुला, आणि कोणत्यातरी वाण्याच्या दुकानात लावून टाकीन. मग बस पोती उचलत, आयुष्य ओढत. या पुढे शाळेतून कोणत्याही तक्रारीची चिठ्ठी आल्याचं मला खपणार नाही. कळलं!"

माझ्या डोळ्यांत पाणी होतं, पण ते आपण चूक केली याचं नव्हतं, तर आता नुसताच अभ्यास करावा लागेल आणि मल्लिका आपल्यापासून दुरावेल याचं होतं. आणि झालंही तसंच.

नियमित शाळेत येणारी मल्लिका येईनाशी झाली. सारख्या दांड्या मारू लागली. आणि कधी आलीच तरी आता ती पूर्वीसारखी नसायची. केस विसकटलेले किंवा कसेतरीच बांधलेले असायचे, अंगासरशी असणारा ड्रेस ढगळ असायचा, नखं कापलेली आणि रंगवलेली नसायची, लिपस्टिकही गायब असायची.

नंतर नंतर मीही तिच्याकडे पाहणं कमी केलं. म्हणजे मला तसं करणं भागच होतं. कारण बाबांची वाक्यं सारखी कानात घुमायची. तरी अधूनमधून मी तिच्याकडे पाहायचो. पण आता मल्लिका आता मल्लिका राहिली नव्हती. आनंदी, हसरी मल्लिका आता अस्वस्थ असायची. ती सारखी भांबावलेली, भिरभिरत्या नजरेची झाली होती.
आमच्या त्या थ्रीबीएचके फ्लॅटलाही कोणीतरी मोठ्ठं टाळं ठोकलं होतं. मी वेगवेगळ्या चाव्यांनी शकला लढवून उघडायचा प्रयत्न केला, पण काही केल्या उघडे ना. एकदा मी मोठ्ठा दगड आणला ते फोडायला. मी त्यावर दगड मारणार, तोच त्या कुलपाला डोळे आणि तोंड फुटलं. चांगल्या जाडजूड मिश्या आल्या. त्याचे डोळे लाल, रागीट होते. ते माझ्या अंगावर जोरात ओरडलं – ‘वाण्याच्या दुकानात... मग बस पोती उचलत, आयुष्य ओढत. या पुढे शाळेतून कोणत्याही तक्रारीची चिठ्ठी आल्याचं मला खपणार नाही. कळलं!’

मी कधी म्हणालो होतो की, मला अभ्यास नाही करायचाय? मलापण अभ्यास करायचाय. खूप शिकायचंय. मोठं व्हायचंय. पैसे कमवायचेत. असाच एक फ्लॅट घ्यायचाय आणि मग मल्लिकाशी लग्न करायचंय. रीतसर मागणी घालून तिच्या बाबांना. माझ्या दादाने केलं ना तसंच अगदी. मग धडाक्यात लग्न होईल माझं. आम्ही इथे राहायला येऊ…

तोच ते कुलूप जोरात ओरडलं, ‘ऑर्डर, ऑर्डर, अभ्यास एके अभ्यास!’ आणि मग त्याचं तोडं, मिशा गायब झाल्या. मी आणलेला दगड जोरात हाणला त्यावर, पण ते काही तुटेना. माझा दगडच फुटायला लागला. मग मी गुपचूप कळकट भिंतीच्या, खडूची पूड पसरलेल्या वर्गात बसून लक्ष देऊ लागलो…

वार्षिक परीक्षा झाली आणि सुट्टी सुरू झाली, पण पुढच्या वर्षी दहावी असल्याने माझे दिवस-दिवसभर क्लासेस सुरू झाले. जोत्याला जुंपलेल्या बैलासारखा मी या क्लासमधून त्या क्लासमध्ये असा दिवसभर फिरत असायचो. सतत पाठांतर, नाहीतर टेस्ट सुरू असायच्या, घाण्यातून मार्कांचं तेल निघत असायचं.

कधीकधी वाटायचं की, काहीतरी करून मल्लिका एकदातरी दिसावी किंवा तिचा पत्ता शोधावा आणि जावं तिच्याकडे. पण नंतर वाटायचं नको. आपण उगाच काहीतरी करायला जायचो आणि नसतं काहीतरी व्हायचं, त्या संस्कृत प्रकरणासारखं. तिलाही त्रास आणि आपल्या त्रासात अजून वाढ, असं वाटून मी गप्प राहिलो. पण मी तिला विसरणं शक्यच नव्हतं, आणि ती जरी भेटत-दिसत नसली तरी मी तिला आठवू तर शकत होतोच मी. ती पूर्वीची उत्फुल्ल, टंच, टेचात राहणारी, आनंदी मल्लिका, तो ओठांचा चंबू... ते ’भिगे ओठ तेरे’ गाणं... ते सगळं सगळं आठवून माझ्या मनाला तजेला यायचा. त्या धकाधकीत थोडं बरं वाटायचं. मग मी आतुरतेने वाट पाहू लागलो, निकालाची. कारण त्या दिवशी मल्लिका नक्कीच येणार, याची मला खातरी होती.

अखेर तो दिवस उजाडला. एरवी क्लासला जाण्यासाठी कसाबसा तयार होणारा मी, भराभर तयार झालो शाळेत जायला. आमच्या वर्गात गेल्यावर आमच्या वर्गशिक्षिका बाईंनी निकालाचं वाटप केलं, पहिला-दुसर्‍या–तिसर्‍या क्रमांकाच्या मुलांचं टाळ्यांनी अभिनंदन करण्यात आलं. पुढचं वर्ष कसं महत्त्वाचं आहे, वगैरे बाई सांगत होत्या. माझी नजर भिरभिरत मल्लिकाचा शोध घेत होती. मी शोधलं, सगळीकडे, पण मल्लिका मला कुठेच दिसली नाही. चांगले मार्क्स मिळवून पहिल्या पंधरात येऊनही मल्लिका न आल्याने माझा हिरमोड झाला. कुठे गेली असेल ती, का आली नसेल, काही प्रॉब्लेम तर नसेल ना झाला तिच्या घरी किंवा आणखी काही... एक ना अनेक प्रश्नांनी मी भंजाळलो.

मला तिला पाहायचंय, एकदाच. नंतर हवंतर मी कध्धी-कध्धी तिला पाहणार नाही. मुकाट अभ्यास करेन. प्लीज... मला रडू फुटणार होतं. म्हणून मी वर्गातून बाहेर पडलो टॉयलेटमध्ये गेलो. डोळ्यांतून आलेलं पाणी मला कोणालाही दाखवायचं नव्हतं. मी फटाफटा तोंडावर पाणी मारलं, चेहरा धुतला. कदाचित आता मल्लिका कधीच दिसणार नाही अशी मनाची समजूत घातली. पण ते असह्य होतं, पुन्हा डोळ्यांत पाणी साचू लागलं. मी पाणी मारलं आणि स्वतःला सावरत टॉयलेटमधून बाहेर पडलो. तोच मला आवाज एेकू आला –

रामौऽऽऽ….

ओठांचा चंबू...

औऽऽऽ…

ओ ओ ओह...
भिगे होठ तेरे...

मी मागे वळलो. आवाज टॉयलेट शेजारच्या कोणत्यातरी वर्गातून येत असावा. मी पहिल्या वर्गात गेलो अन् मग दुसर्‍या, पण तिथे कोणीही नव्हतं. तिसर्‍या वर्गाच्या जवळ जाताच आवाज नीट एकू येऊ लागला. ती तिथेच असणार आत.

मी त्वरेने पुढे गेलो आणि आत डोकावलं. तीच होती ती –

मल्लिका – पूर्वीची. मोकळे केस. लाल लिपस्टिक... ब्यूटी स्पॉट... नेलपेंट... हाय हील्स...

"मल्लिका, कुठे होतीस तू? रिझल्टही घ्यायला आली नाहीस, किती शोधलं मी तुला!"

"मी? तिथेच होते, त्या थ्रीबीएचकेत. तूच ’स्टॅच्यू’ म्हणून गेलास आणि आलाच नाहीस पुन्हा."

"म्हणजे तुला तो थ्रीबीचएचके माहित्येय, मला वाटायचं ते फक्त माझंच सीक्रेट आहे."

"माहितेय म्हणजे मला सगळं माहितेय – तू माझ्याकडे तासन्‌तास कसा पाहायचास ते, माझी एकेक लकब टिपून घ्यायचास ते. सगळं... त्या नटीचं – त्या ओल्या चड्डीचंही!"

"तेही! शप्पथ! तू म्हणजे एकदम मनकवडी निघालीस की… बरं चल ना, आपण तुझा रिझल्ट घेऊ या, मग बोलू यात निवांतपणे."

"नको, मी घेतलाय रिझल्ट आधीच. मी ही शाळा सोडतेय. म्हणजे मला काढलंय या शाळेतून. सगळ्या शिक्षकांचं म्हणणंय की, अशा नटव्या मुलीला शाळेत ठेवणं धोक्याचं आहे. मुलांच्या अभ्यासावर याचा परिणाम होईल. म्हणून मला मुख्याध्यापकांनी शाळेतून काढून टाकलंय."

"म्हणजे तू आता यापुढे कधीच नसशील इथे?"

"कधीच नाही. तुझ्या बाबांनाही हेच तर हवं होतं ना?"

"पण, मला नकोय ना तसं. मला तू हवीएस. अटलिस्ट तुला नुसतं पाहायला तरी मिळायला हवं."

"नाही, मी कायमची जातेय इथून."

"मल्लिका, जर तू जाणारच असशील, तर माझी एक इच्छा आहे. प्लीज, ती पूर्ण करशील?" मी अत्यंत निरागसपणे विचारलं तिला. माझे डोळे मोठे झाले असावेत तेव्हा. ती माझ्याकडे पाहत होती. तिच्या नजरेत चमक होती – खेळकर, आनंदी आणि खोडकर अशी. कदाचित तिला माझी इच्छा आधीपासूनच माहीत असावी अशी.

"जाण्यापूर्वी... तुला एकदा किस करायचंय मला..."

तिने डोळे मिटले आणि हात पसरले. जणू मला मिठीत घेण्यासाठी, माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी ती तयार होती.
माझा घडत असलेल्यावर विश्वास बसेना.

मल्लिकाचा किस!

मी हळूहळू एकेक पाऊल टाकत तिच्याकडे गेलो. जसजसा तिचा जवळ जात होतो तिच्या डिओचा मंद सुगंध मला लपेटत होता...

तिचा चेहरा माझ्या चेहर्‍यासमोर. तिने ओठांचा चंबू केलेला. मीपण केला. तिला डोळाभर पाहिलं. आता ती जाणार होती, तिला यापुढे पुन्हा कधीही पाहता येणार नव्हतं.

मग आपोआप डोळे मिटले गेले, तिच्या ओठांवर ओठ टेकवण्यासाठी...

तिला गमावण्याच्या खेदाने तिला स्पर्श करण्याच्या माझ्या उत्कटतेचा प्रवाह अजूनच जोमाने वाहू लागला.

ओठांवर ओठ टेकले गेले. मी थ्रीबीचकेच्या टेरेसवर होतो, वर्गात तिला न्याहाळात होतो, पावसात भिजलेली ओलेती ती....

तो स्पर्श माझ्या आत, रंध्रारंध्रात झिरपला, माझ्यात सामावला, साठवला गेला...

दोन क्षणांनी स्पर्शाची जाणीव नाहीशी झाली. मी डोळे उघडले. समोर कोणीच नव्हतं. मी आजूबाजूला पाहिलं. ‘मल्लिकाऽऽऽ’ अशी हाक मारली. माझा आवाज वर्गात घुमला. मग बाहेर आलो, सगळा कॉरिडॉर सुनसान होता.

मी सुन्न झालो. वर्गात जाऊन बाकावर बसलो. किती वेळ गेला कुणास ठाऊक, पण शिपाईकाकांच्या आवाजाने मी भानावर आलो. "अरे, तू इथं काय करतसा? घरला जायायचं न्हाय व्हय? चल पळ..."

मी त्यांच्याकडे पाहिलं. ‘हं,’ इतकंच म्हणालो आणि निघालो. तोच ते म्हणाले, "आनि हे काय बायकी चाळे करतंसा, लिप्पस्टिक लावलीया...."

मी ओठांवर बोटं लावली. पाहिलं तर, बोटं लाल झाली होती…

मी पडदा उघडून बाहेर पाहिलं. ऊन उतरणीला आलं होतं. वितळून लालसर-पिवळं झालं होतं. समोरच्या नागमोडी बोगनवेलीने त्या झाडाला जरा जास्तच कवटाळल्यासारखं मला उगाचच वाटलं.

***
विशेषांक प्रकार: 
field_vote: 
1.875
Your rating: None Average: 1.9 (8 votes)

प्रतिक्रिया

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आहाहा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वाचनीय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुमारवयातील लैंगिकतेचे चित्रण चांगले जमले आहे. कथा आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'शाळा' मधली उपकथानके एकमेकांत मिसळून वर मसाला टाकल्यासारखे वाटते आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ठीक! मला कथा लांब(व)ल्यासारखी वाटली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दिवाळीच्या मंगलप्रसंगी लैंगिकतेचे चित्रण थोडक्यात आवरले असते, तरी चालले असते असे वाटले. (ललित लेखन म्हणजे काल्पनिकच असते हे ज्ञान इथे ऐसीवरच प्राप्त झाले आहे, त्यानुसार लेखन ठीक वाटले.) १० पैकी ६.५ गुण. लेख लिहिल्याबद्दल आभारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जुलै नि आगष्टात वाढदिवस असलेल्यांचे अस्तित्व कसे एक्स्प्लेन करावयाचे हा प्रश्न सदरहू मंगलप्रसंगी पडलेला आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो, दिवाळीत लैंगिकता नको असे म्हणत नाहीये, इतके डिट्टेलमध्ये वर्णन नसते तरी चालेल असे म्हणतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चालायचंच. काहींची चालुक्य शैली, तर काहींची होयसळशैली. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं