'मोदी हा संघाचा नाईलाज आहे!' - सुरेश द्वादशीवार
चंद्रपूर येथे १९९१ पर्यंत राज्यशास्त्र या विषयाचे अध्यापन करत असताना श्री. सुरेश द्वादशीवार 'गोंडवाना' या अर्धसाप्ताहिकाचे संपादक होते. १९६७ ते १९८० दरम्यान 'तरुण भारत' या दैनिकाचे प्रतिनिधित्व आणि त्यात स्तंभलेखन केल्यानंतर १९९२ ते २००२ मध्ये त्यांनी 'लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीच्या निवासी संपादकपदाची धुरा सांभाळली. त्यांनी एकूण १७ वर्षे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपद भूषवले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्षपद पाच वर्षे, तर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद एक वर्ष भूषवले आहे. अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेल्या द्वादशीवार सरांची सोळा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या 'हाकुमी' या कादंबरीवर 'लाल सलाम' हा हिंदी चित्रपट आणि 'तांदळा' या कादंबरीवर 'तांदळा' हा मराठी चित्रपट असे एकूण दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक श्री. द्वादशीवार महाराष्ट्रात सर्वाधिक खप असलेल्या 'लोकमत' या दैनिकाचे संपादक आहेत. दैनिक 'लोकमत'च्या अग्रलेखातून राजकीय आणि सामाजिक घडामोडींबद्दलची त्यांची डोळस आणि चिंतनशील निरीक्षणे वाचकांना नियमित वाचायला मिळतात. नागपुरात 'तरुण भारत' या संघाच्या मुखपत्रात काम केल्याने द्वादशीवार सरांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सखोल अभ्यास आहे.
'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकासाठी कल्पना जोशी यांनी त्यांची घेतलेली मुलाखत.
कल्पना जोशी: रा. स्व. संघाला चळवळ म्हणावं का इतर उजव्या संघटनांसारखीच ही एक संघटना असं समजावं?
सुरेश द्वादशीवार : चळवळ नाही, संघटनाच.
मुळात माणसाच्या जीवनात दोन प्रकारच्या निष्ठा असतात. एक जन्मदत्त निष्ठा. त्याला primordial loyalty म्हणतात. ह्या जन्मत: प्राप्त होतात. त्या मिळवाव्या लागत नाहीत. त्या आपोआप चिकटतात. आपल्या कुळाविषयीचं, घराविषयीचं, कुटुंबाविषयीचं, जातीविषयीचं, नावाविषयीचं, धर्माविषयीचं आणि देशाविषयीचं प्रेम ह्या जन्मदत्त निष्ठा आहेत. दुसऱ्या निष्ठा आहेत त्यांना मूल्यनिष्ठा म्हणतात. लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी मूल्यं आहेत, त्यांवर असलेल्या निष्ठा या मूल्यनिष्ठा आहेत. त्या मिळवाव्या लागतात. त्यांसाठी कष्ट करावे लागतात. त्या अंगात रुजवाव्या लागतात आणि ज्याला प्रगती किंवा प्रबोधन म्हणतात, ते प्रबोधन म्हणजे जन्मदत्त निष्ठांकडून मूल्यदत्त निष्ठांकडे जाणे. जन्मदत्त निष्ठा ह्या मुळातच प्रतिगामी असतात. त्या तुम्हांला तुमची जात देतात, तुम्हांला वर्ग देतात, तुमचा वंश देतात, तुमच्या मर्यादा देतात. त्या प्रेरणादायी असतात, पण त्या तेव्हढ्यापुरत्याच असतात. त्या त्याच्यापुढे जात नाहीत. जन्मदत्त निष्ठा कधीही लोकशाही शिकवत नाहीत. जन्मदत्त निष्ठा ह्या त्याग शिकवत नाहीत. त्यागाची निष्ठा ही मूल्यांच्या निष्ठेतून येते. मूल्यनिष्ठा ही फार वरची निष्ठा आहे. संघ जन्मदत्त निष्ठा देतो असं मी म्हणतो, कारण तो धर्मही मानतो, देशही मानतो आणि जन्मानं दिलेल्या बाकीच्या सगळ्या निष्ठाही मानतो. जन्मदत्त निष्ठांशी जुळलेल्या सगळ्या संघटना ह्या प्रतिगामी मनोवृत्तीच्या असतात. मूल्यदत्त निष्ठांच्या मागे जाणाऱ्या संघटना ह्या पुरोगामी असतात. निदान त्यांना चळवळ असं म्हणता येतं. जन्मदत्त निष्ठा पुढे सरकतच नाहीत. त्यामुळे त्यांना चळवळही म्हणता येत नाही.
कल्पना : रा. स्व. संघ हा बराच काळ केवळ 'भटाबामणांची संघटना' म्हणून ओळखला जाई. त्यामुळे संघाच्या लोकप्रियतेला मर्यादा पडत. ही परिस्थिती गेल्या काही वर्षांत बदलली आहे असं तुम्हांला वाटतं का? विशेषत: मंडल आयोगानंतर संघानं आपल्यात सर्वसमावेशकता बाणवण्याचा प्रयत्न केला. तो तुमच्या मते कितपत यशस्वी झाला आहे?
श्री. द्वादशीवार : संघ ही भटाबामणांची संघटना नाही. ही जी संघटना आहे, ती एका ब्राह्मणानं सुरू केली. तिचे आरंभीचे सरसंघचालक ब्राह्मण होते. तिच्यामध्ये बहुसंख्य कुटुंबं ब्राह्मणांची होती. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण संघात होते. म्हणूनच संघाला ब्राह्मणांची संघटना म्हणायचे. ते एके काळी योग्य म्हणता आलं असतं. पण संघात इतर जातीचेही लोक मोठ्या प्रमाणात आले आणि संघानेही त्यांना सामावून घेतलं. तरीही संघानं आपल्यावर काही मर्यादा घालून घेतल्याच आहेत. संघामध्ये अहिंदूंना प्रवेश नाही. मुसलमानांना प्रवेश नाही, ख्रिश्चनांना प्रवेश नाही. फक्त हिंदूंनाच प्रवेश आहे. आणि हिंदू म्हटला की जात आलीच. जातीशिवाय हिंदू नाही. बाबुराव वैद्य हे जे संघाचे ideologue आहेत, ते म्हणायचे, ’हिंदू या नावाची कोणती गोष्टच नाही.’ किराणामालाच्या दुकानामध्ये किराणा नसतोच. वस्तू असतात. तसाच हिंदू समाजामध्ये हिंदू कोणीच नसतो. तो ब्राह्मण असतो, तेली असतो, माळी असतो, कुणबी असतो, महार असतो. हिंदू कोणीच नसतो. तर हिंदू धर्म एक किराणा मालाचं दुकान आहे, हे एक. त्याचबरोबर मला आणखी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, की संघाला भटाबामणांची संघटना ज्यांना म्हणायचं आहे, त्यांनी म्हणावं. संघानंही ते एके काळी जोपासलं. ब्राह्मणांचीच मुलं संघात आणायची हे संघानंही केलंय. संघाचे शिक्षक ब्राह्मणांच्या मुलांना तिथे ओढून आणत असत आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार होतात या भ्रमातून ब्राह्मण वर्गसुद्धा मुलांना संघात पाठवत असे. पण संघानं ब्राह्मणांचं नुकसानही फार केलं. गांधीजींच्या खुनाचा संघानं निषेध केला नाही. त्याच्यापायी महाराष्ट्रामधल्या हजारो ब्राह्मणांची घरं जाळली गेली. दुसरं, गांधीजींच्या खुनापासून ब्राह्मण समाजाचा बहुजन समाजाकडून होणारा द्वेष वाढला. याला संघ कारणीभूत आहे. संघांनं गोडसेचा निषेध केला नाही. ते त्याला अजूनही मनातल्या मनात ’धर्मात्मा’ वगैरे म्हणतच असतात. एका माथेफिरू माणसानं एका निःशस्त्र माणसाचा खून केला, यात यांना पराक्रम दिसतो. यांना काय म्हणायचं?
कल्पना : ’राष्ट्रवाद’ ही एक प्रकारची उजवी विचारसरणी आहे असं तुम्हांला वाटतं?
श्री. द्वादशीवार : राष्ट्रवाद ही उजवी विचारसरणी नाही. ही जन्मदत्त निष्ठा आहे. किंबहुना राष्ट्रवाद ही विचारसरणी नाहीच. ती निष्ठाच आहे. मी या देशात जन्माला आलो म्हणून माझं या देशावर प्रेम आहे. पाकिस्तानात जन्माला आलो असतो तर? हा जन्म काय आहे? जन्म हा शेवटी एक अपघात आहे. मला माझ्या देशावर प्रेम करण्याचा जेवढा हक्क आहे, तेवढा पाकिस्तानात जन्मलेल्या माणसाला पाकिस्तानवर प्रेम करण्याचाही हक्क आहे. त्यामुळे राष्ट्रवाद ही विचारसरणीच नाही. ती निष्ठा आहे आणि तीदेखील जन्मदत्त निष्ठा आहे. ती जन्मातून प्राप्त होणारी आहे आणि ती पुरोगामी आहे की प्रतिगामी आहे, उजवी आहे की डावी आहे, या तपशिलात न जाता ती प्रत्येक देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आहे हे मान्य केलं पाहिजे. तिला आपण डावी म्हणण्याचं कारण नाही, उजवीही म्हणण्याचं कारण नाही. जन्मदत्त निष्ठा स्वाभाविक असतात.
कल्पना : संघ परिवाराचा राष्ट्रवादाला पाठिंबा आहे. त्या राष्ट्रवादातून देशात काही होकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे का? तितकी त्या भूमिकेची आणि संघाचीही क्षमता आहे, असं तुम्हांला वाटतं का?
श्री. द्वादशीवार : अजिबात नाही. पॉझिटिव बदल घडत नाहीत त्यातून. संघ ही प्रतिगामी विचारांची, ‘आहे ते चांगलं आहे, जुनं ते चांगलं आहे, जे प्राचीन होतं ते चांगलं आहे,’ असं मानून इतिहासात रमणाऱ्यांची संघटना आहे. ती भविष्याकडे फारशी पाहत नाही, इतिहासाकडेच पाहते. ते छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतील किंवा त्याच्या अगोदरच्या कशावर बोलतील. त्यातसुद्धा हिंदूंचा इतिहास असेल, तर त्यावर बोलतील. इतरांवर बोलणार नाहीत. इतिहासाचं उदात्तीकरण करणारी अशी जी माणसं असतात, ती कधीही पॉझिटिव भविष्याचा फारसा विचार करत नाहीत. ती वर्तमानाचाच विचार करत नाहीत मुळात.
तुम्हांला एक उदाहरण सांगतो. साधी घटना आहे. आजपासून ३०-४० वर्षांपूर्वीची एक घटना आहे. कलकत्त्यामध्ये सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या चार मुलींनी बाळंतपणाच्या रजेसाठी अर्ज केला होता. त्या मुली कुमारिका होत्या आणि तेव्हाच्या सरकारी नियमाप्रमाणे कुमारिकांना बाळंतपणाची रजा देता येत नसे. त्यांच्या वरिष्ठांनी ती सुट्टी नाकारली. त्या मुली हाय कोर्टात गेल्या. हाय कोर्टाने त्यांच्याविरुद्ध निकाल लावला. मग त्या मुली सुप्रीम कोर्टात गेल्या. सुप्रीम कोर्टाने त्या मुलींच्या बाजूने निकाल लावला आणि निकाल देताना हे सांगितलं की, आई होणं हा स्त्रीचा अधिकार आहे, मग ती विवाहिेत असो किंवा नसो. आई होण्यासाठी विवाहाची पूर्वअट असता कामा नये. आता हा निकाल या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला. म्हणजे तो कायदा आहे या देशाचा. तो संघाला मान्य आहे का? नाही! त्यामुळे - पॉझिटिव-बिझिटिव काही नाही. ते अत्यंत प्रतिगामी विचारांचे लोक आहेत.
कल्पना : स्त्रियांना स्वातंत्र्य देण्याबद्दल संघाची काय भूमिका आहे? अजूनही ते मैत्रेयी, गार्गी या ज्या दोन-तीन स्त्रिया होऊन गेल्या, त्यांचीच नावं घेतात. ते काही आजच्या किरण बेदीचं नाव घेत नाहीत. समितीच्या स्त्रियाही का पुढे येत नाहीत?
श्री. द्वादशीवार : का येतील? अहो, पती हाच परमेश्वर असं म्हणणाऱ्या स्त्रियांकडून काय होऊ शकतं? तीच विचारसरणी आहे, तोच संस्कार आहे. या जगातला सर्वश्रेष्ठ पुरुष कोण, तर माझा नवरा! हीच जर भूमिका असेल तर मग कुठे राहिला मोदी? नाही का?
स्त्रियांना संघात प्रवेश द्यायचा नाही. जसा मुसलमानांना नाही, ख्रिश्चनांना नाही, तसा स्त्रियांना नाही. आणि समितीचं काम काय आहे? त्या काठ्या फिरवतात बिचाऱ्या, ड्रम वाजवतात, आणि संघाचे मोर्चे निघाले की रस्त्याच्या बाजूला रांगोळ्या काढायला जातात. म्हणजे तुम्ही पुन्हा त्यांच्याकडे राबायचीच कामं दिलीत की नाही? आणि त्यांच्याकडून किरण बेदी होण्याची अपेक्षा करायची! संघाच्या दृष्टीनं पराक्रम कोणाचे, तर झाशीच्या राणीचे! झाशीची राणी काय संघवाली होती काय?
कल्पना : आजच्या मराठी ब्राह्मण वर्गाची राहणी मोठ्या प्रमाणात आधुनिक झाली आहे. संघाच्या ह्या पारंपरिक पाठीराख्या समाजाच्या जीवनात आता संघाचं आणि संघविचारांचं स्थान काय आहे?
श्री. द्वादशीवार : मुळात गंमत अशी आहे, की गेल्या साठ वर्षांमध्ये आपल्या देशाची आर्थिक स्थिती सुधारलीय. पूर्वीच्या तुलनेत समाज श्रीमंत झालाय. मी जेव्हा शिक्षक म्हणून काम करायला लागलो, तेव्हा, माझ्या वयाच्या २२-२३ व्या वर्षी, मला ८५ रुपये पगार होता. आता माझ्या इथल्या चपराश्याला ४२,००० रुपये पगार आहे. हा फरक तुम्ही लक्षात घ्या. तेव्हा सुमारे ५% असलेला मध्यम वर्ग, आता ४०% झालेला आहे. दारिद्र्याचं स्वरूपच बदललेलं आहे. या देशामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एकदाही दुष्काळ पडला नाही. दुष्काळामध्ये हजारो - लाखो माणसं मरायची. १९४२ च्या दुष्काळामध्ये कलकत्ता शहरात ४० लाख माणसं रस्त्यावर मेली. स्वातंत्र्यानंतर या देशात दुष्काळ पडला नाही. नेहरूंनी लोकांना मिलो खाऊ घातलं, पण मरू दिलं नाही. त्यामुळे केवळ ब्राह्मणांचीच नाही, तर सगळ्याच समाजामधल्या लोकांची क्रयशक्ती वाढलीय, उत्पन्न वाढलंय. मध्यमवर्गातला घरटी एक पोरगा आज अमेरिकेत किंवा कॅनडामध्ये आहे. गडचिरोलीमधली आदिवासींची मुलंदेखील आता परदेशात आहेत. त्यामुळे ही प्रगती केवळ ब्राह्मणांची नाही. ही सगळ्यांची आहे. ब्राह्मणांची प्रगती दिसली, कारण त्यांच्या वाट्याला शिक्षणाच्या संधी अगोदर आल्या. त्यांच्या ज्ञानाच्या उपासनेला मर्यादा नव्हत्या. इतरांवर त्या मर्यादा होत्या. बहुजन समाज शिकायला लागला तो इंग्रजांच्या राजवटीत. ज्योतिबा फुले, सावित्री बाई ह्यांच्यानंतर बहुजन समाजातल्या मुली आणि पुरुषसुद्धा शिकायला लागले. त्याच्याआधी शिक्षण फक्त ब्राह्मणांपर्यंतच मर्यादित होतं. त्यांनी त्याचा फायदा घेतला आणि ते आणखीन पुढे आले. जेव्हा इतरांना संधी मिळाली, तेव्हा तेही पुढे आले. स्वातंत्र्यप्राप्तीच्यानंतर दलित शिक्षणामध्ये आले. त्यांनी तर ब्राह्मणांना आता मागेच टाकलंय सगळ्या क्षेत्रांमध्ये. आजच्या आय.ए.एस. अधिकार्यांमध्ये दलितांची संख्या ब्राह्मणांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. आय.पी.एस. मध्ये ते सर्वांत अधिक आहेत. सरकारी नोकर्यांमध्ये, वरिष्ठ जागांवर दलितांची संख्या जास्त आहे. संधी उशिरा मिळाली असली, तरी ब्राह्मणांपेक्षा ते तिचा वापर जास्त चांगला करतात. जिद्दच आहे त्यांच्यात. तुम्हांला एक उदाहरण सांगतो. तुम्ही कुठल्याही दलित साहित्यिकाचं हस्ताक्षर पाहा. मग तो आमचा ग्रेस असेल, लोकनाथ यशवंत, किंवा गंगाधर पानतावणे. त्याचं हस्ताक्षर रांगोळीसारखं रेखीव असेल. ह्याचं कारण ‘आम्ही पहिल्यांदाच लिहितो आहोत’ ही जाणीव आहे त्यांची. ही जी जिद्द आहे, की ‘मी शिकतोय, माझ्या घरात मीच पहिल्यांदा शिकतोय’ त्यातून हे सगळं आलंय. त्यामु्ळे फक्त ब्राह्मणांनी संधी घेतली हे खोटं. त्यांना संधी मिळाली, तिचा त्यांना साहजिक फायदा झाला. जसजशी इतर समाजांना संधी मिळत गेली, तसतसे तेही समाज पुढे आले. उलट ब्राह्मणांच्या तुलनेत ते जास्त जिद्दीनं आणि वेगानं पुढे आले.
ब्राह्मणाच्या जीवनात संघाचं स्थान काय आहे, या प्रश्नाचं उत्तर ‘चमत्कारिक’ असं आहे. या देशातल्या सर्वच राजकीय पक्षांचे नेते ब्राह्मण होते. काँग्रेसचे सगळे आघाडीचे नेते ब्राह्मण होते. टिळक, गोखले, गंगाधरराव देशपांडे, बापूजी अणे, जावडेकर हे सगळे ब्राह्मणच होते. समाजवादी पक्षामध्ये ना.ग.गोरे, एस.एम.जोशी हे सगळे ब्राह्मण होते. कम्युनिस्ट पक्षात डांगे, नम्बुद्रिपाद, ज्योती बसू हे सगळे ब्राह्मणच होते. ब्राह्मणांवर फक्त संघानं आपला हक्क सांगायचं तसं काही कारण नाही. त्या त्या काळात त्या त्या संस्थेत गेलेल्या पहिल्या व्यक्ती ब्राह्मण होत्या. नंतरच्या उत्तरेतल्या रा. स्व. संघात कुठे ब्राह्मण आहेत? बॅरिस्टर अभ्यंकर, अनसूयाबाई काळे हे ब्राह्मणच होते आणि ते कॉंग्रेसमध्ये होते. बर्धन कम्युनिस्ट झाला म्हणजे ब्राह्मण होत नाही किंवा हिंदू राहत नाही असंही नाही. शिक्षणाची संधी त्या समाजाला पहिल्यांदा मिळाली. त्यामुळे नेतृत्व करायची संधीही त्यालाच मिळाली. वैचारिक नेतृत्वही त्यांनीच केलं. एक काळ असा होता, की क्रांतिकारकांचे नेते सावरकर, जहालांचे नेते टिळक आणि मवाळांचे नेते गोखले, हे सगळे ब्राह्मण होते. हे ब्राह्मणांचं झालं. आता हिंदूंचं. या देशातली हिंदूंची सर्वात मोठी संघटना कोणती? ती काँग्रेस पार्टी आहे. संघ नाही. १९६७ पर्यंत भाजपला जनसंघाला ६ टक्क्यांच्या वर मतं मिळाली नाहीत. या देशात हिंदू ८५% आहेत. याउलट काँग्रेसला किती मतं मिळायची? ४५% ते ५०%. कॉंग्रेसला काय मुसलमान मत देत होते काय? म्हणजे कॉंग्रेस जर हिंदूंची संघटना नाही असं म्हटलं, तर मग तुम्ही बहुजन समाजाला हिंदू मानत नाही असा त्याचा अर्थ झाला. दत्ता मेघे कॉंग्रेसमध्ये असेल तर हिंदू नसतो आणि इकडे आला की हिंदू होतो असं आहे का? अतिशय बावळटपणा आहे हा. आता जनसंघाला किंवा भाजपाला जास्त मतं मिळाली त्यामुळे ‘आम्ही हिंदूंची संघटना’ असा दावा ते आता करू शकतात. पण ‘६७ च्याच नाही तर ‘८४ च्या निवडणुकीपर्यंत भाजपला मतं किती मिळायची? ८५% हिंदू असताना जर तुम्हांला ६% मतं मिळतात, तर तुम्ही स्वतःला भलेही हिंदूंची संघटना म्हणवून घ्याल; पण हिंदू तुमच्या सोबत आहेत का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जिच्यासोबत हिंदू आहेत, ती हिंदूंची संघटना. जिच्यासोबत हिंदू नाहीत, पण जी स्वतःला नुसतीच हिंदू म्हणवून घेते, ती हिंदूंची संघटना नाही होत ना! मुस्लिम लीग ही जशी मुसलमानांची संघटना आहे, तशी संघ ही हिंदूंची संघटना नाही. संघाला त्याच्या विचारांच्या हिंदूंची संघटना बनवायची आहे एवढाच त्याचा अर्थ होतो. बाकी मदतीच्या कामाबद्दल मान्य केलं पाहिजे. संघांनं आपद्ग्रस्तांना मदत केली आहे, ईशान्येच्या भागामध्ये त्यांचं काम चांगलं आहे, मी स्वतः पाहिलंय. मी स्वतः आसाममध्ये होतो.
कल्पना : संघाने सेवाभाव लोकांमध्ये रुजवला असं म्हणता येईल काय?
हिंदू धर्मामध्ये सेवा हा प्रकार नाही. हिंदू धर्मामध्ये आत्मोन्नतीनं उद्धार होतो. आत्मोन्नती म्हणजे बाहेर पाहायचं नाही, आत्म्याकडे पाहायचं. प्रभू रामचंद्रानं किंवा एखाद्या संतानं अपंगाची सेवा केली, असं दिसतं का कुठे? ज्ञानेश्वरांनी केली सेवा? आपल्या धर्मामध्ये सेवा हा प्रकार नाही. आत्मोन्नती हा प्रकार आहे. आत्मोन्नतीसाठी सेवेची गरज नाही. कारण सेवेमध्ये दुसऱ्यात लक्ष गुंततं. त्यामुळे आत्म्याकडे लक्ष जात नाही.
सेवा करणारी अपवादात्मक माणसं सगळीकडेच आहेत. ती दलितांमध्येही आहेत, रिपब्लिकन पक्षामध्येही आहेत. निष्ठेनं काम करतात. निवडून येत नाहीत, कुठे सन्मान होत नाही, तरीही पक्षाचा झेंडा घेऊन ५०-५० वर्षं काम करणारे लोक रिपब्लिकन पक्षात आहेत. ह्या देशातल्या कम्युनिस्टांना केव्हाच माहीत होतं, की आपण कधीच सत्तेवर येणार नाही. तरीही ५०-६० वर्षं काम करत आलेत ते. ते निष्ठेनं काम करणे वगैरे वेगळा मुद्दा आहे. त्याच्याशी संघाचा काही संबंध नाही. काँग्रेसकडे काम करणार्या कार्यकर्त्यांकडे तरी गांधीजींचा सेवाभाव कुठे आला? शेवटचा ख्रिश्चन येशू ख्रिस्ताबरोबरच मेला, असं म्हणतात ना? तसाच शेवटचा गांधीवादी गांधीसोबतच गेला. गांधीजींची सेवावृत्ती असलेली जी माणसं होती, ती ‘सर्वोदया’मध्ये आहेत. पण त्यातसुद्धा नंतरच्या काळात हा सेवाभाव संपत गेला. मुळात, सेवा हा प्रकारच नाहीये आपल्याकडे. फारतर वर्गणी देणे ह्यापुरताच आहे तो. तो शिकवणीचा भाग नाही. धर्माची शिकवण ही आत्मोन्नतीची असल्यामुळे बाहेरच्या जगाकडे कशाला लक्ष द्यायचं मग? आत्मा बघा म्हणजे स्वतःला बघा.
कल्पना : संघ परिवार काय किंवा ख्रिश्चन मिशनरी काय, कित्येक दुर्गम प्रांतात ते अनेकदा काहीतरी सकारात्मक कार्यक्रम करताना दिसतात. त्यांचा उद्देश जरी धार्मिक असला, तरी अंतिमतः असे कार्यक्रम लोकांच्या हिताचेच असतात. अशा कार्यक्रमांकडे तुम्ही कसं बघता?
श्री. द्वादशीवार : संघानं लोकोपयोगी कामं केली हे खरं आहे. पण दुर्गम भागात काम केलं हा मात्र एक भ्रम आहे. दुर्गम भागांमध्ये फक्त ख्रिश्चन मिशनऱ्यांनीच काम केलं. संघाचे वनवासी कल्याण आश्रम अत्यंत सुरक्षित भागात आहेत. ते भामरागडला नाहीत, ते वैनगंगेच्या अलीकडे आहेत किंवा मेळघाटात आहेत. सुरक्षित भाग आहे तो. रस्ते आहेत. ख्रिश्चन मिशनर्यांनी एकोणिसाव्या शतकात, रस्ते नसताना, जंगलं असताना, कोणतीही साधनं नसताना, दुर्गम भागात जाऊन काम केलेलं आहे. फादर एल्विन किंवा फादर ग्रीक्सन हे भामरागडला १९१० च्या सुमाराला गेले. तिथंच राहिले. तिथल्याच बायकांशी लग्नं केली. तिथेच संसार केले. तिथंच घरं केली. हे संघाचं काम नाही. ते फार कमी पडले. थोडक्यात सांगायचं म्हणजे लायन्स क्लब किंवा रोटरी क्लब जी ‘सोशल सर्विस’ करतात ना, तशी संघाची ‘वीकेण्ड सोशल सर्विस’ आहे. मोटारगाड्या घ्यायच्या, जाऊन थोडं औषधवाटप करायचं आणि परत यायचं. तिथे जाऊन मुक्काम करणारे अणि राहणारे आहेत का काही? फार नाहीत. त्यामुळे त्यांची आणि यांची तुलना नाही होऊ शकत. ईश्वराच्या नावानं करोत की आणिक कशासाठी करोत, पण मिशनरी खरोखर आदिवासींसाठी राबले. त्यामुळं त्यांनी सबंध आफ्रिका खंड ख्रिश्चन केला. ते त्यांच्यात राहिले, त्यांच्यात राबले आणि त्यांची खरोखर सेवा केली. अत्यंत वाईट अवस्थेत ते जगले.
कल्पना : भाजपला लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं आहे. केवळ सवर्ण हिंदूच नव्हे, तर इतर अनेक समाजघटक भाजपकडे आज मोठ्या अपेक्षेनं पाहत आहेत. संघाचं ह्यात काही योगदान आहे असं तुम्हांला वाटतं का? असं योगदान असेल, तर ते काय आहे?
श्री. द्वादशीवार : ह्या निवडणुकीमधल्या यशात संघाचा वाटा कमी आहे, मोदींचाच वाटा जास्त आहे. खरंतर संघाला मोदी नको होते. संघाच्या मनातला नेता नितीन गडकरी होता. संघांनं नितीन गडकरीना पक्षाचं अध्यक्षपद दिलं. ते पद मोदींना हवं होतं. ते त्यांना न देता नितीन गडकरीना दिलं गेलं. मोदी हा संघाचा नाईलाज आहे. नितीन गडकरींना संघानं संधी दिली होती त्यांचा करिश्मा तयार करायची.
भाजपचं अध्यक्षपद कोणातरी तरुण माणसाला द्यायचं होतं. त्यामुळे संघाच्या समोर दोन माणसं होती पक्षाध्यक्ष म्हणून. एक नितीन गडकरी होते आणि दुसरे मनोहर पर्रीकर. पण गडकरी हे जवळचे, नागपूरचे, म्हणून त्यांना त्यांनी पक्षाचं अध्यक्षपद दिलं. बांधकाम मंत्री म्हणून नितीननं चांगलं काम केलं होतं. त्यांची हुकूमत चांगली होती. त्यामुळे यांना संधी दिली तर येत्या वीस वर्षात हे पक्ष वाढवतिल अशी संघाची अपेक्षा होती. त्यामुळे संघानं त्यांना तिथे आणलं. त्यांचं अध्यक्षपद गेल्याबरोबर त्यांनी राजनाथ सिंगला आणलं. राजनाथ सिंग नेता नव्हेच. बिन चेहेऱ्याचा नेता आहे तो. मात्र नरेंद्र मोदींची हवा होती. त्यांनी सरळ डॉमिनेट केलं. त्यांनी नितीन गडकरीना अजून ऑफीस दिलं नाहीय दिल्लीत, अशी स्थिती आहे! मोदी काय ऐकणार आहे का ह्याचं? दोनदा नागपुरात येऊनसुद्धा दीड तास विमानतळावर बसून होते, पण संघात गेले नाही ते. त्यामुळे निवडणुकीतल्या यशात संघाचं योगदान कमी आणि मोदी नि मोदींनी तयार केलेल्या वातावरणाचं योगदान जास्त महत्त्वाचं होतं. भाजपच्या यशामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे. संघ आणि भाजप ह्या दोन गोष्टी वेगळ्या नव्हत्याच. कशा असणार? संघानं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्या संस्था निर्माण केल्या. वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, विद्यार्थी परिषद, शिक्षक परिषद... तसा राजकारणात काम करायला जनसंघ आणला. जनसंघ म्हणजे काय, तर संघ जन! स्वातंत्र्यवीर सावरकर गोळवळकरांना असं म्हणाले होते, की तुम्ही राजकीय पक्ष काढू नका. कारण एक दिवस तो तुमच्या डोक्यावर बसेल. याचं कारण असं, की तुम्ही संघात काम करता, संघ-स्थानावर काम करता आणि ते जनतेत काम करतात. जे जनतेत काम करतात त्यांची ताकद मोठी असते. ते जेव्हा मोठे होतील, तेव्हा तुम्हांला ते बाजूला बसवतील. हे सावरकरांचं अतिशय ऐतिहासिक असं वाक्य आहे. मोदी कुठे विचारताहेत ह्यांना? वाजपेयी विचारायचे तरी! ह्याचं कारण मोदी मोहन भागवतांमुळे निवडून आलेले नाही, इतकं साधं आहे. आपणच वाढवलेलं मूल आपल्यापेक्षा मोठं व्हावं, शक्तिशाली व्हावं, तशी आत्ताची स्थिती आहे. आताचा भाजप संघाला मोजणार नाही.
कल्पना : मर्यादित प्रमाणात तरुण वर्गालाही संघ आकर्षक वाटतो. त्यामागची कारणं काय असावीत?
श्री. द्वादशीवार : ब्राह्मणांधल्या काही तरुण मुलांना संघ आकर्षक वाटतो. साधारणतः स्वतंत्र विचार न करणारी जी मुलं आहेत, त्यांना संघ आवडतो. स्वतंत्र विचार करणार्यांना तो आवडत नाही, कारण तिथे आज्ञापालन आहे. तुम्ही स्वतंत्रपणे विचार करायचं काही कारण नाही. सांगतातच तुम्हांला. विचार करणारे वर बसलेत. तुम्ही फक्त आज्ञेचं पालन करायचं. खाली बस म्हटलं की खाली बसायचं, उभं राहा म्हटलं की उभं राहायचं. काठ्या फिरवा म्हटलं की काठ्या फिरवायच्या. आपली बुद्धी वापरायची नाही. दुसरी एक बाजू अशी आहे, की स्वतंत्र बाजूनं विचार करणारी माणसं मुळात कमी असतात. आपला समाज श्रद्धावादी जास्त असतो. मेणबत्त्या घेऊन जातात ते लोक आणि वारकरी म्हणून जातात ते लोक यांच्यात काही फरक नसतो. स्वतंत्रपणे विचार केला की स्वतः जबाबदारी घ्यावी लागते. नुसती जबाबदारीच नाही, तर वाळीत टाकण्यापर्यंतही पाळी येते. ती भीती असते. त्यामुळे आपल्या समाजाला शक्यतो दबून राहायचं, श्रद्धांना धरून राहायचं असं लोक करतात. जे स्वतंत्रपणे विचार करतात, मग तो सॉक्रेटीस असो की गांधी असो, ते मरतातच. दाभोलकरांना गोळ्या घातल्या. असा स्वतंत्र विचार करणार्यांना संघाच आकर्षण कधीच वाटलं नाही.
कल्पना : अटलबिहारी वाजपेयींच्या नेमस्त प्रतिमेमुळे आणि व्यासंग, साहित्याची आवड वगैरे इतर गुणांमुळे संघाच्या कार्यकर्त्यांत त्यांच्याविषयी अतीव आदर असे - अगदी ते पंतप्रधान होण्यापूर्वीही. भाजपमधल्या पंतप्रधानपदाच्या त्यानंतरच्या उमेदवारांबद्दल - आधी अडवाणी आणि नंतर मोदी - संघकार्यकर्त्यांत कशा भावना आहेत? मोदींना एकंदर भारतीय समाजात मिळालेली अभूतपूर्व लोकप्रियता वाजपेयींच्या किंवा अडवाणींच्याही वाट्याला आलेली दिसत नाही. सर्वसमावेशकतेच्या प्रयत्नांना मिळालेलं हे यश आहे, की मोदींच्या लोकप्रियतेत संघाचा फारसा वाटाच नाही? संघाला प्रिय असलेले नेमस्त वाजपेयी समाजात पुरेसे लोकप्रिय न ठरणं, नेमस्तपणा अंगी नसलेले मोदी लोकप्रिय होणं, पण तशी लोकप्रियता अडवाणींना न मिळणं ह्याकडे तुम्ही कसं पाहता? ही वाजपेयींची मर्यादा आहे, की ते ज्या मुशीत घडले त्या संघीय विचारांचीच ती मर्यादा आहे? की दरम्यानच्या काळातल्या सामाजिक बदलांचा त्यात प्रमुख वाटा आहे?
श्री. द्वादशीवार : वाजपेयींच्या बाबतीमध्ये असं आहे, की ते संघापेक्षा संघाबाहेरच जास्त लोकप्रिय होते. वाजपेयींची प्रतिमा नेहरूंच्या प्रतिमेसारखी होती. नेहरू कॉंग्रेसपेक्षा लोकप्रिय होते. याचं कारण असं की, त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक मार्दव होतं आणि मोठेपणा होता. व्यक्ती म्हणूनही ते फार मोठे होते आणि मुख्य म्हणजे ते एकारलेले नव्हते. एकारलेले नसल्यामुळे ते संघाच्या शिस्तीत फारसे बसत नव्हते. त्यामुळे संघाला वाजपेयी प्रिय वगैरे नव्हते. संघानं वाजपेयींचा छळ केला. त्यांचा अपमान केला. वाजपेयींची प्रतिमा संघाच्या चौकटीत बसणारी नव्हतीच. अडवाणी तसे त्या चौकटीत बसणारे होते. मोदी त्या चौकटीत बसणार नाही, उलट ते त्या चौकटीहून मोठे होण्याची भीती वाटायला लागली आहे. वाजपेयी मोदींपेक्षा जास्त लोकप्रिय होते. त्यांची लोकप्रियता मोठी होती आणि त्यांच्या लोकप्रियतेमध्ये एक प्रगल्भता होती. मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक आक्रमकता आहे. वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आक्रमकपणा नव्हता. त्यामुळे ते उत्तरेइतकेच दक्षिणेतही लोकप्रिय होते. करुणानिधीदेखील त्यांचं कौतुक करायचे. अजूनपर्यंत वाजपेयींसारखी मोदींना दक्षिणेत मान्यता नाही. मोदींच्या लोकप्रियतेत संघाचा वाटा नाही. त्यांना मिळालेला कार्यकर्त्यांचा वर्ग आहे. पण मोदींची लोकप्रियता त्यांना मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामातून मिळालेली आहे. त्यांनी स्वतःची जी स्वतंत्र प्रतिमा घडवली आहे, त्यातून मिळालेली आहे. संघामुळे त्यांना ‘ऑल इंडिला प्लॅटफॉर्म’ मिळाला. नाहीतर ते गुजरातचेच नेता राहिले असते. पण बस, तितकंच.
कल्पना : समाजवाद आणि संघ परिवार यांच्यात काही नातं आहे असं कितपत म्हणता यावे?
श्री. द्वादशीवार : समाजवाद आणि संघ यांत काही नातं नाही. संघाला समाजवाद मान्यच नाही. जे धर्मवादी असतात, त्यांना असे कुठलेच वादबीद मान्य नसतात.
जनसंघानं जयप्रकाशांच्या काळामध्ये ’गांधीप्रणित समाजवाद’ असा शब्दप्रयोग वापरला होता. गांधीप्रणित समाजवाद म्हणजे काय हे कधीच कुणीच स्पष्ट केलं नाही. सेवाभावाचा आणि समाजवादाचा काही संबंध नाही. समाजवाद ही आर्थिक व्यवस्था आहे. ती आर्थिक समता सांगणारी आहे व्यवस्था आहे. देशाचं सारं उत्पन्न हे देशाच्या मालकीचं असावं आणि ते देशाच्या वाट्याला यावं, त्याच्यावर खाजगी मालकी नसावी असा जो विचार आहे, तो समाजवाद आहे. त्याचा संघाशी काही संबंध नाही.
कल्पना : भारतीय समाजात गेल्या काही वर्षांत सामाजिक घुसळण चाललेली दिसते. पूर्वी मागास असलेल्या अनेक जातीजमातींना, स्त्रियांना आणि समाजातल्या इतर दुर्बल घटकांनाही पूर्वीपेक्षा अधिक संधी आज उपलब्ध आहेत. 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' ह्या पारंपरिक भारतीय दृष्टिकोनाकडून त्यांच्या आकांक्षा आता आर्थिक-सामाजिक प्रगतीच्या दिशेनं झेपावत आहेत. ही घुसळण आणि हा बदल कोणत्याही सामाजिक चळवळीशिवाय झाला आहे. संघ असो वा इतर डाव्या-उजव्या, पुरोगामी-प्रतिगामी संघटना असोत, ह्या घुसळणीत त्यांचं योगदान जवळपास शून्य आहे, हे तुम्हांला मान्य आहे का? ह्या पार्श्वभूमीवर उद्याच्या समाजाच्या दृष्टीनं संघाचं स्थान काय असेल? ते उंचावण्यासाठी संघाला आपल्यात काय बदल घडवून आणावे लागतील? ती क्षमता तुम्हांला संघात दिसते का?
श्री. द्वादशीवार : आपल्या समाजमध्ये सध्या सुरू असलेल्या घुसळणीचा राजकारणाशी आणि सामाजिक संघटनांशीही कमी संबंध येतो. आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या सामाजिक चळवळी झाल्या, त्या स्वातंत्र्यपूर्व काळात होत्या. मग ती ज्योतिबांची असेल, आगरकरांची असेल, राजा राममोहन रॉय यांची असेल किंवा आंबेडकरांची चळवळ असेल. अशा चळवळी स्वातंत्र्यानंतरच्या काळात फारश्या झाल्या नाहीत. आपल्या देशातल्या राजकीय पक्षांच्या कामगार संघटना आहेत, स्त्रियांच्या संघटना आहेत. पण त्या संघटना त्या त्या क्षेत्रातलं काम करत नाहीत. कम्युनिस्ट पक्षाची सिटू नावाची संघटना आहे, ती कामगारांमध्ये काम करते. भाजपची भारतीय मजदूर संघटना आहे, पण या क्षेत्रात काम करण्यापेक्षा ती भाजपच्या निवडणुकीत झेंडे लावायचं काम जास्त करते. समिती, संस्कार भारती या संघटना संघविचारांचेच कार्यक्रम करतात. थोडक्यात त्या त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या प्रचार आघाड्या आहेत. विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांचे प्रश्न नाही सोडवत, मोदींची सभा अरेंज करते. कॉंग्रेसची इंटक संघटना कामगारांमध्ये कॉंग्रेसचा प्रचार करते. निवडणुकीत कामगारांना सभांना बसवून गर्दी करते. या संघटना राजकीय पक्षांकडून कंट्रोल होतात. एके काळी संघाशी संबंधित संघटना संघाकडून कंट्रोल होत होत्या, आता त्या भाजपकडून कंट्रोल होतात, कारण संघाची कंट्रोल करण्याची क्षमताच नाही राहिलेली. या घुसळणीला एक महत्त्वाचं कारण आहे, ते आर्थिक आहे. १९९१ मध्ये आपल्या देशानं खुली अर्थव्यवस्था स्वीकारली, त्यामुळे देशाचं उत्पादन वाढलं. पूर्वी ३.५% असलेला वाढीचा दर ५% वर गेला. मनमोहन सिंगांच्या राजवटीत तो ९% वर आला. जर देशाचं उत्पन्न दर वर्षी सात टक्क्यांनी वाढलं, तर देश सहा वर्षांत दुप्पट श्रीमंत होतो. ९ टक्क्यांनी वाढलं, तर पाच वर्षांत दुप्पट श्रीमंत होतो. त्या हिशेबानं १९९१ पासून आजपर्यंत हा देश चौपट श्रीमंत झाला. लोकांचं उत्पन्न वाढलं, मध्यमवर्ग मोठा झाला. त्यातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक घुसळण झाली. श्रीमंत लोक आणखी श्रीमंत होत गेले, की त्या लोकांना जात, धर्म, यांचं काही वाटत नाही. आंतरदेशीय, आंतरराष्ट्रीय लग्नसुद्धा होतात. घरटी एक मुलगा आज परदेशात आहे. त्याच्यावर कुणाचे संस्कार असतात? आता आईबापाचे संस्कार वगैरे काही राहिलं नाही. मोठ्या प्रमाणावर माहितीचा स्फोट झाला. ज्ञानाचा स्फोट झाला, शिक्षणाचा प्रसार वाढला, साक्षर माणसांची संख्या वाढली. आधी ४३% लोक दारिद्र्यरेषेखाली होते, आता त्यांची संख्या १५% झाली आहे. येत्या पंधरा-वीस वर्षांत तीसुद्धा राहणार नाही. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम म्हणतात, येत्या वीस वर्षांत हा देश श्रीमंतच होईल. २०२५ पर्यंत हिंदुस्थान तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होईल आणि २०३१ मध्ये तो जपानला मागे टाकेल असं म्हटलं जातं. असं जर होणार असेल, तर सामाजिक घुसळण होणारच. सगळे मध्यमवर्गीय होतील, उच्च मध्यमवर्गीय होतील. सगळ्या सोयी-सुविधा येतील आणि मग आपल्या जन्मदत्त निष्ठा आपोआप गळून पडतील. लोकांना आता अमेरिका पूर्वीसारखी दूरची वाटत नाही आणि चीनही दूरचा वाटत नाही. ही सामाजिक घुसळण आर्थिक परिवर्तनातून आलेली आहे. ज्ञानाच्या स्फोटातून, शिक्षणाच्या प्रसारातून आलेली आहे. स्वातंत्र्य आणि लोकशाहीतून आलेली आहे. ब्राह्मण उमेदवार असेल, तरी दलितांची मतं मागण्यासाठी त्याला नम्र व्हावं लागतं. त्यामुळे लोकशाही हा माणसांची मनं घासून टाकणारा आणि त्याच्या कडा नाहीश्या करणारा प्रकार आहे. या देशाला गेल्या पन्नास-पाऊणशे वर्षांत चांगले नेते मिळाले. हिमालयाच्या उंचीचा नेहरूंसारखा नेता, इंदिरा गांधींसारखी अत्यंत खंबीर स्त्री, वाजपेयी, आंबेडकर यांच्यासारखे नेते या देशाला मिळाले. या नेत्यांनीसुद्धा समाजाची दृष्टी बदलली. आपल्या समाजाला अंतर्मुख करायला लावणारे आणि मुळातून आपल्यात बदल करायला लावणारे असे नेतेही पुष्कळ झाले.
या सगळ्या गोष्टींचं श्रेय संघाला नाही. असलाच तर त्यांचा खारीचा वाटा आहे. संघाबाहेर पुष्कळ चांगल्या प्रवृत्ती आहेत या देशामध्ये. कॉंग्रेसवाले तरी काय, सगळेच्या सगळे वाईट आहेत काय? सज्जन आणि दुर्जन माणसं सगळीकडेच असतात. पाच वर्षांत भाजपने भ्रष्टाचारात कोंग्रेसला मागे टाकलेच की नाही? सगळे सारखेच असतात. पैसे खाण्यात कोणीही कमी नाही. नितीन गडकरीजवळ पूर्वी काय होतं? पण यात नैतिक निकष आणण्यात अर्थ नाही. कारण त्यात सगळेच नापास होतात, आपल्यासकट.
कल्पना : परदेशात संघाची लोकप्रियता बरीच वाढलीय असं म्हणतात?
श्री. द्वादशीवार : ब्राह्मणांची पोर सगळ्यात जास्त परदेशात गेली म्हणून. मध्यमवर्गातले आणि उच्च मध्यमवर्गातले लोक तिथे गेले. त्यांनाच संघ जवळचा वाटत आलेला आहे. दुसरं असं, की दूर गेलेली माणसं स्वतःला असुरक्षित मानायला लागतात. तिथे त्यांना देव, धर्म जास्त आठवतो. देव-धर्म जवळचा वाटायला लागल्यामुळे असे लोक संघाच्या जवळ जातात. ती एक साधी मानसिकता आहे. परदेशात गेलेला दलित माणूस संघाच्या जवळ नाही गेलेला. ब्राह्मणच गेले. तिथेच वाढलेली तरुण मुलं आकर्षित होतात संघाकडे, तीपण असुरक्षिततेमुळे. हिंदुस्थानातले जे मुसलमान तिकडे गेले, त्यांना संघाविषयी काही वाटतं काय? आपल्याकडची सगळ्यात महत्त्वाची आणि चमत्कारिक गोष्ट 'जन्म' ही आहे. जन्मानं ज्या निष्ठा दिलेल्या असतात, त्याला चिकटून राहण्याची ही वृत्ती आहे. त्या वृत्तीचे लाभ आहेत आणि काही दोषही आहेत.
कल्पना : मोदींच्या प्रभावकाळात आणि बदललेल्या सामाजिक वास्तवात संघाच स्वरूप कसं असेल असं वाटतं?
श्री. द्वादशीवार : मोदी संघाकडे आताच दुर्लक्ष करू लागले आहेत. येत्या काळात ते दुर्लक्ष आणखी वाढेल, याचं कारण संघाकडून आपल्याला किती बळ मिळतं याविषयी त्यांच्या मनात संशय आहे. आपल्याला निवडणुकीत मदत करणारी संघटना म्हणून ते यांचा वापर करतील, यापेक्षा संघाला ते अधिक महत्त्व देतील असं मला वाटत नाही.
शब्दांकन - कल्पना जोशी, दीपा पाठक, चिंतातुर जंतू, ऋषिकेश
फोटो - जालावरून साभार
...
मुलाखत आवडली.
तूर्तास एवढीच पोच.
मोदी संघाकडे आताच दुर्लक्ष
मोदी संघाकडे आताच दुर्लक्ष करू लागले आहेत. येत्या काळात ते दुर्लक्ष आणखी वाढेल, याचं कारण संघाकडून आपल्याला किती बळ मिळतं याविषयी त्यांच्या मनात संशय आहे.
असे झाले तर ते स्वागतार्हच आहे. एनिवे संघ हा अत्यंत रिट्रोग्रेड विचारांचा पाईक आहे.
----
हिंदू धर्मामध्ये सेवा हा प्रकार नाही. हिंदू धर्मामध्ये आत्मोन्नतीनं उद्धार होतो. आत्मोन्नती म्हणजे बाहेर पाहायचं नाही, आत्म्याकडे पाहायचं. प्रभू रामचंद्रानं किंवा एखाद्या संतानं अपंगाची सेवा केली, असं दिसतं का कुठे? ज्ञानेश्वरांनी केली सेवा? आपल्या धर्मामध्ये सेवा हा प्रकार नाही. आत्मोन्नती हा प्रकार आहे. आत्मोन्नतीसाठी सेवेची गरज नाही. कारण सेवेमध्ये दुसऱ्यात लक्ष गुंततं. त्यामुळे आत्म्याकडे लक्ष जात नाही.
हान तेजायला. हे निरिक्षण आवडले हो.
जोडीला माझ्या मावशीचे निरिक्षण हे की स्त्रियांनी पतिची सेवा करायची (हे स्त्रियांना दिलेले मँडेट) हे मात्र चालते.
चांगली मुलाखत
चांगली मुलाखत, चांगले विश्लेषण, आवडले.
एकंदरीतच मुलाखत गंमतशीर आहे
एकंदरीतच मुलाखत गंमतशीर आहे .. मुलाखतकार आणि द्वादशीवार दोघेही एका मर्यादेनंतर गोंधळलेले वाटतायत .. वेळ मिळाल्यावर सविस्तर विचार मांडेनच .. तूर्तास फक्त पोच.
मुलाखत आवडली...
मुलाखत आवडली...
मेलोड्रामा
प्रश्न संघाची आणि मोदींची नकारात्मक प्रतिमा नकळत तयार करतात, उत्तरे तर बर्याच अंशी बायस्ड वाटतात, त्यामुळे थोडी भडक मुलाखत असे म्हणता यावे काय असा प्रश्न पडला.
उदा.
ह्यात तर प्रेज्युडिस आहे, अफ्रिका नव्हे तर उत्तर अफ्रिका हे बरोबर ठरले असते, आणि मिशनर्यांबद्दल कळवळा नसुन संघाची नकारात्मक छबी दाखवण्यासाठी हे वाक्य उत्तम ठरावे.
माहिती असल्यापेक्षा वेगळे काही सापडले नाही आणि अग्रलेख लिहिणारे असे मेलोड्रामॅटिक का लिहितात असा प्रश्न कायमच पडत आला आहे.
उत्तरे तर बर्याच अंशी बायस्ड
काही अंशी सहमत आहे. त्यांनीच दिलेल्या दोन उत्तरांमध्ये प्रसंगी किंचित विरोधाभासही जाणवला.
अर्थात या विषयावर दोन्ही बाजुंनी जे टोक गाठले जाते (संघ कित्ती कित्ती छान ते त्याच्या इतके वैट्ट काहिच नाही) त्या पार्श्वभूमीवर सदर मुलाखत व त्याच्या उत्तरातील काही भाग जरा वेगळ्या दृष्टीकोनामुळे वाचनीय + महत्त्वपूर्ण वाटली.
:)
छान... मुलाखत आवडली...
छान... मुलाखत आवडली... :)
श्री. द्वादशीवार यांची सारी उत्तरं मार्मिक वाटली...
त्यांचा "तगडा अनुभव" प्रत्येक वाक्यातून/उत्तरातून प्रतीत होतोय...
(...)
(अवांतर:)
नाइलाजाचे नाव हे पूर्वी केवळ राष्ट्रपित्याचे असायचे. आता काही गोटांत ते विद्यमान पंतप्रधानांचेही होऊ घातले आहे, हे शुभवर्तमान नवीन आहे.
(अतिअवांतर:)
नाइलाजाचे नाव हे दोन्हीं वेळी एखाद्या गुजराती व्यक्तीचेच असणे हा निव्वळ योगायोग असावा, की तसा काही नियम असावा?
>>हे शुभवर्तमान नवीन
>>हे शुभवर्तमान नवीन आहे.
शुभवर्तमान हा शब्द ऐकला की 'लवकरच येशू जन्म घेणार' असल्याचं शुभवर्तमान आठवतं.
'सुवार्ता' अधिक चपखल
येशुच्या बाबतीत शुभवर्तमानऐवजी सुवार्ता हा शब्द अधिक चपखल वाटतो!
सेवाधर्म
हिंदूंच्या सेवावृत्तीची चिकित्सा आवडली आणि अगदी पटली. हिंदूंची सेवा ही उपकारभावनेने लडबडलेली असते, सहसंवेदनेतून आलेली बहुधा नसते. शारीरिक श्रम अंतर्भूत असलेली सेवा तर आम्हांला वर्ज्यच. त्यामुळे कुण्या एखाद्या संताने कुणा अंत्यजाला पाणी पाजले तर ते मोठ्या कौतुकाचे ठरते. त्या काळाच्या चौकटीत ते महानच होते हा नेहमीचा युक्तिवाद. पण त्या काळी धर्माला इतर अनेक चौकटी होत्या पण सेवेची चौकट नव्हती, आणि अजूनही नाही हाच तर मुद्दा.
आज नर्सिंग व्यवसायात क्रिस्टिअन धर्मीय केरळी महिला मोठ्या संख्येने आहेत आणि इतरांच्या तुलनेत त्यांचे काम उजवे असते. इतर समव्यावसायिकांकडून व्यक्त होणारी चिडचीड, फणकारा, किळस त्यांच्या वागण्यात नसते.
प्रतिसाद आवडला.
प्रतिसाद आवडला.
अंशतः सहमत
अंशतः सहमत, परंतु नर्सिंग व्यवसायात क्रिस्टिअन धर्मीय केरळी खरोखर फक्त मनोभावे सेवा करतात का मिशनरी वृत्तीने बाटवण्याचे काम करतात ह्यावर विशेष माहिती मिळाली तर उत्तम. पण ह्याहून वेगळा अन्गल म्हणजे तो त्यांचा धंदा असावा का? म्हणजे नेपाळी गुरखा जसे मिलिट्री मध्ये जातात आणि नुसते भारतातच नव्हे तर इंग्लंड कडून अफगाणिस्तानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर जातात. तसेच हे केरळी असावेत अशी मला तरी घोर शंका आहे. शिवाय केरळात कितीही झाडे बिडे असली तरी सगळ्यांना रोजगार आहे का? केरळ भले १००% साक्षर वगैरे असो पण निम्मे लोक तरी अरबी राष्ट्रात जातात. ह्याचा पण काही संबंध आहे का ते तपासून नर्सिंग व्यवसायात ते कसे प्रोफेशनली वागतात हे बघितले पाहिजेल. म्हणजे बाहेरून आलेला बिहारी काय किंवा राजस्थानी सुतार काय कमी पगारत जास्त काम करतात. कारण एक तर गरज आहे आणि तोच त्यांचा धंदा आहे. असेहि असू शकेल. पण आपल्याला इतका अनुभव नसल्याने हे असेच असेल असे म्हणू इच्छित नाही.
बाकी माझे वडील २ वर्षे हंथरुणाला खिळून होते तेंव्हा भरपूर विचीत्र अनुभव घेतले आहेत आणि शेवटी शेवटी एक मेल नर्स मिळाला तो कोकणी होतात आणि भरपूर कष्टाळू आणि हरहुन्नरी निघाला.
मुलाखतकाराचे प्रश्न संघाची
मुलाखतकाराचे प्रश्न संघाची आणि मोदींची नकारात्मक प्रतिमा नकळत तयार करतात असे संपूर्ण मुलाखतीत जाणवतं अनेक ठिकाणी तर द्वादशीवार यांच्या उत्तरात काही एक प्रमाणात विसंगती आणि बर्याच अंशी संघकार्याबद्दलच्या प्राथमिक ज्ञानाचा अभाव जाणवतो. अर्थात हे संघाच्या कामाबद्दलचे खरोखरचे अज्ञान आहे किंवा मुद्दामहून घेतलेली नकारात्मक भूमिका आहे याचा निर्णय लावणे थोडेसे अवघड आहे.
मुलाखतीच्या पहिल्या प्रश्नापासून जाणविणार्या काही विसंगतीं मांडतो आहे -
द्वादशीवार यांचे चळवळ नाही संघटनाच हे मत मान्य करता येते पण त्यासाठी त्यांनी दिलेली कारणे थोडी विसंगत / गोंधळात टाकणारी वाटतात. संघ ही चळवळ नाही संघटनाच आहे या मताच्या समर्थनार्थ द्वादशीवार जन्मदत्त निष्ठा आणि मूल्यनिष्ठांविषयी बोलतात. जन्मदत्त निष्ठा मिळवाव्या लागत नाहीत त्या आपोआप चिकटतात असं म्हणतात आणि संघ जन्मदत्त निष्ठा देतो असं विरोधी विधान करतात. जर जन्मदत्त निष्ठा आपोआप चिकटतात तर संघ जन्मदत्त निष्ठा देतो हे कसे? याहीपुढे जाऊन द्वादशीवार "मूल्यनिष्ठांची व्याख्या लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी मूल्यं आहेत, त्यांवर असलेल्या निष्ठा" अशी करतात. संघात ही मूल्यं शिकवलीच जात नाहीत असे द्वादशीवार म्हणतात. संघाच्या प्रातःस्मरणीय व्यक्तींच्या यादीत ह्या सर्व मूल्यांचा उद्घोष करणार्या व्यक्तींचा समावेश आहे. अगदी वानगीदाखल बोलायचं झालं तर समता आणि बंधुता ही मूल्यं संघात "सामाजिक समरसता" या नावाने शिकवली जातात. याविषयी मात्र द्वादशीवार काहीच बोलत नाहीत. डॉ. हेडगेवारांसह अनेक स्वयंसेवकांनी १९३० मधे जंगल सत्याग्रहात भाग घेतला होता. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात संघाच्या स्वयंसेवकांचा सक्रीय सहभाग होता. यानंतर रामटेकचे संघाचे नगर कार्यवाह बाळासाहेब देशपांडेंना फाशीची शिक्षा झाली होती. या सर्वात स्वातंत्र्याची काहीच प्रेरणा नव्हती का? संघ ही भटाबामणांची संघटना नाही. संघात इतर जातीचेही लोक मोठ्या प्रमाणात आले आणि संघानेही त्यांना सामावून घेतलं असं म्हणताना समता आणि बंधुता सारखी मूल्य आचरणात आणली जात आहेत याकडे द्वादशीवार कानाडोळा करतात. द्वादशीवार, बाबुराव वैद्य यांचे "हिंदू या नावाची कोणती गोष्टच नाही.’ किराणामालाच्या दुकानामध्ये किराणा नसतोच. वस्तू असतात. तसाच हिंदू समाजामध्ये हिंदू कोणीच नसतो. तो ब्राह्मण असतो, तेली असतो, माळी असतो, कुणबी असतो, महार असतो. हिंदू कोणीच नसतो. तर हिंदू धर्म एक किराणा मालाचं दुकान आहे" हे वाक्य संदर्भाशिवाय देतात. मग नागपुरात 'तरुण भारत' या संघाच्या मुखपत्रात काम केल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सखोल अभ्यास असूनही द्वादशीवारांना "यह भारतीय राष्ट्रजीवन, अर्थात हिंदूराष्ट्र है | ‘हिंदू’ शब्द जातिवाचक नहीं है | अनादि काल से यहाँ का यह समाज अनेक संप्रदायों को उत्पन्न कर, परंतु एक मूल से जीवन ग्रहण करता आया है | उसके व्दारा यहाँ जो समाज स्वरूप निर्माण हुआ है, वह हिंदू है |" हा गुरुजींचा विचार ठाऊक नाही की आपल्या मताच्या विरोधी म्हणून ते तो मांडत नाहीत ?
"गांधीजींच्या खुनाचा संघानं निषेध केला नाही. त्याच्यापायी महाराष्ट्रामधल्या हजारो ब्राह्मणांची घरं जाळली गेली" हे विधान हास्यास्पद आहे. ह्याच न्यायानं इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने इंदिराहत्येचा विरोध केला नाही म्हणून हजारो शिखांचे हत्याकांड झाले असं म्हणावं लागेल. नपेक्षा गांधींवध करणारा नथूराम गोडसे ब्राह्मण होता त्यामुळे प्रतिक्रियास्वरूप ब्राह्मणांची घरं जाळली गेली असं म्हणण जास्त योग्य ठरावं. पण कुठल्याही प्रकारे संघावर दोषारोप करायचेच ठरवले असेल तर अशी हास्यास्पद विधानं करणं शक्य आहे.
संघ प्रतिगामी आहे असं म्हणताना द्वादशीवार कलकत्त्यामध्ये सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या मुलींच्या बाळंतपणाच्या रजेचे उदाहरण देतात. ह्यात सर्वोच्च न्यायालयाचा मुलींच्या बाजूने दिलेला निकाल संघाला मान्य नाही असं द्वादशीवार म्हणतात पण मुळात संघाचा या संपूर्ण घटनाक्रमाशी काय संबंध आहे ते स्पष्ट करत नाहीत तसचं आजपासून ३० - ४० वर्षापूर्वी असलेला सरकारी नियम, ज्यानुसार कुमारिकांना बाळंतपणाची रजा देता येत नसे तो नियम करण्यामागे संघाचा काही रोल होता किंवा कसे हे ही सांगत नाहीत. "पॉझिटिव-बिझिटिव काही नाही. ते अत्यंत प्रतिगामी विचारांचे लोक आहेत." असं नुसतं संघाला झोडण्यात काय अर्थ आहे ?
स्त्री स्वातंत्र्याबद्दल संघाची भूमिका कशी चूकीची आहे ते मांडताना द्वादशीवार "पती हाच परमेश्वर असं म्हणणाऱ्या स्त्रियांकडून काय होऊ शकतं? तीच विचारसरणी आहे, तोच संस्कार आहे." असा विचार मांडतात. "पती हाच परमेश्वर" ही भारतातील बहुसंख्य स्त्रियांची पूर्वापार असलेली (चुकीची) विचारसरणी आहे. हा काही संघाने मांडलेला विचार नाही तेव्हा त्यासाठी संघाला सरसकट दोषी कसे धरता येईल??
.
- संघाने कधीही मोर्चा काढलेला ऐकीवात नाही. शिस्तबद्ध पद्धतीनं होणारं पथसंचलन आणि मोर्चे ह्यातील फरक द्वादशीवारांना माहीत नाही की कळत नाही? आणि राबणार्या स्त्रिया आयुष्यात काहीच करु शकत नाहीत का? किरण बेदी किंवा मेधा पाटकरांसारख्या स्त्रिया घरगुती कामं करतच नाहीत का ?
संघ ही हिंदूंची संघटना नाही असं म्हणतात द्वादशीवार. अर्ध्याहून अधिक देश संघ हिंदुत्ववादी आहे म्हणून गळा काढत असताना, संघ हिंदूंची संघटना नाही तर काँग्रेस पार्टी आहे कारण देशातील बहुसंख्य हिंदू काँग्रेसला मत देतात असं म्हणायचं म्हणजे कमाल आहे. आणि त्यातही काँग्रेस स्वतःला निधर्मी म्हणते म्हणजे कसं????
या दोन विधानात द्वादशीवारांना काहीच विरोधाभास जाणवत नाही काय? आसाम आणि ईशान्य भारत, पूर्वांचल हा काय अतिशय सुगम भाग आहे की काय ? एक भामरागड काय तो दुर्गम आणि ईशान्य भारत, पूर्वांचलात काहीच अडचणी नाहीत ? मग हा भाग इतकी वर्षं विकासापासून वंचित का ? संघाच्या स्वयंसेवकांनी प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस प्रचंड मदतकार्य केलेलं आहे. भूज मधल्या भूकंपापासून ते विशाखापट्टणमच्या हुदहुद वादळापर्यंत प्रत्येक वेळी संघाच्या स्वयंसेवकांनी प्रचंड सेवाकार्य केलेलं आहे. नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त प्रदेश सहजसाध्य असतात की काय? वनवासी कल्याण आश्रमाच्या व्यतिरिक्तही संघाचे सेवाकार्य आहे. शिक्षण, जनजागरणापासून ते रक्तपेढ्यांपर्यंत. संघाच्या या "सेवा भारती" बद्दल द्वादशीवारांना किती माहिती आहे?
आत्मोन्न्तीचे कुठले मार्ग हिंदू धर्मामध्ये सांगितले आहेत?? एकनाथ, नामदेव, रामदास ह्या मंडळींनी दीनदुबळ्यांची सेवा न करता फक्त टाळ कुटले की काय ? द्वादशीवारांना संघाच्या इतिहासाबरोबर महाराष्ट्राच्या संतपरंपरेचापण अभ्यास करायला हवा ...
एकंदरीतच संघाच्या कामाबद्दल नकारात्मक भूमिका आणि काही एक प्रमाणात संघाच्या इतिहासाबद्दल आणि वर्तमानाबद्दल अज्ञान दाखविणारी मुलाखत वाटते ही. आता हे मुद्दामहून डोळ्यांवर ओढलेलं कातडं आहे, एकांगी संघविरोध आहे की खरोखरचं अज्ञान आहे याबद्दल मुलाखतकारांनी काही स्पष्टीकरण दिलं तर बरं....
जन्मदत्त निष्ठा मिळवाव्या
मला वाटतं संघ जन्मदत्त निष्ठा देतो असं म्हणायचं नसून संघ जन्मदत्त निष्ठांनाच बळकटी देतो असं म्हणायचं असावं.
किराणा मलाचाही मुद्दा तुमच्या लक्षात आलेला दिसत नाही. त्या दुकानात जो काही समृद्ध माल असतो त्या सगळ्याला एकगठ्ठा किराणा म्हटलं जातं. तुम्ही उद्धृत केलेल्या वचनांतही जवळपास तोच मतलब सांगितलेला आहे.
सरसकट संघाला दोषी धरलेलं नाहीच. द्वादशीवारांचं म्हणणं असं आहे, की पुरातन परंपरागत चौकटीच्या आतच राहण्याचा संदेश संघातर्फे बळकट केला जातो.
हे कीस काढणं वाटत नाही का? त्यांनी मुख्य मुद्दा असा मांडलेला आहे की संघाच्या कार्यात स्त्रियांची भूमिका दुय्यम आणि गौण असते. संस्कृत प्रतिशब्द वापरल्याने या मुद्द्याला बाधा येत नाही.
संघ जन्मदत्त निष्ठा देतो असं
आक्षेप संघ जन्मदत्त निष्ठांनाच बळकटी देतो मधील या "च" वर आहे. या अलिखित "च" मुळे संघ मुल्यनिष्ठांना महत्व देत नाही किंबहुना संघाकडे मुल्यनिष्ठा नाहीच अशाप्रकारचा सूर निघतो. वास्तविक पाहता संघाच्या वैचारिक बैठकीत जन्मदत्त निष्ठांइतकेच महत्व मुल्यनिष्ठेला आहे. खरं तर संघाच्या विचारधारेत परंपरागत चालत आलेल्या मुल्याधिष्टीत चौकटीला जपण्याचा प्रयत्न दिसतो पण त्याविषयी मात्र संघ परंपरागत चौकटीत राहण्याचा संदेश देतो म्हणजेच संघ प्रतिगामी आहे असं म्ह्णून द्वादशीवारांचा त्याला आक्षेप आहे.
द्वादशीवारांनी उद्धृत केलेल्या वचनांत ज्याप्रमाणे किराणामालाच्या दुकानात किराणा असं काहीच नसतं विविध वस्तु असतात तद्वतच हिंदू असं काही नसतंच, ब्राह्मण, तेली, कुंभार असतात असा अर्थ आहे. तर गुरुजींच्या वचनात हिंदू हा शब्द जातीवचक नाही तर ती एक जीवनपद्धती आहे हा विचार आहे. ह्या दोन विचारातला अंतर्विरोध द्वादशीवारांना जाणवतच नाही का? गुरुजींचं वचन उद्धृत करण्यामागे संदर्भरहीत वाक्यं उचलून स्वतःच्या मताच्या समर्थनार्थ मांडण्याचा द्वादशीवारांचा प्रयत्न दाखविण्याचा हेतू होता. दोनही व्यक्तींनी कुठल्या संदर्भात हे विचार मांडले होते हे लक्षात घ्यायला लागेल.
आक्षेप द्वादशीवारांच्या बोलण्यातील हिणवण्याच्या स्वराला होता. मी निव्वळ संस्कृत प्रतिशब्द वापरला नसून मोर्चा आणि पथसंचलन ह्यात काहीएक फरक आहे म्हणून तसा उल्लेख केला होता. अशांत भागामधे जेव्हा लष्कराचा फ्लॅग मार्च होतो त्याला मोर्चा म्हणाल का तुम्ही ? अर्थातच मोर्चा आणि पथसंचलन या दोनही बाबींमधे असणार्या फरकामुळे पथसंचलनाच्या आधी रस्ता सुशोभीत करणं हे दुय्यम काम म्हणता येणार नाही. एकाच कामाची प्राथमिकता ते काम कुठं केलं जातं यावरही अवलंबून असते इतकच मला म्हणायचं होतं.
मोर्चा आणि पथसंचलन या दोनही
दुय्यम काम का म्हणू नये, हा प्रश्न सध्या बाजूला ठेवू या. समितीच्या पथसंचलनाच्या वेळी संघाचे लोक रांगोळ्या काढताना कधी दिसले नाहीत ते! रांगोळ्या आणि पथसंचलनं सोडून, संघ आणि भाजप अशी घमासान चर्चा सातत्याने होत असते, समिती आणि भाजप अशी चर्चा का दिसत नाही?
निव्वळ जन्मानं आपली
निव्वळ जन्मानं आपली सांस्कृतिक-राजकीय व्यक्तीत्वं सिद्ध होत गेली - पुरुष/स्त्री, हिंदू/मुसलमान, ब्राह्मण/अब्राह्मण इत्यादी - तर आपण ह्या जन्म खुणा ओलांडून संवाद करूच शकणार नाही. माझ्या घरी जे सांस्कृतिक वातावरण आहे ते अश्या अनेक छोट्या छोट्या सांस्कृतिक विश्वांच्या महासमूहातलं एक छोटं विश्व आहे; माझे नैतिकता आणि योग्यतेचे मापदंड सापेक्ष आहेत आणि माझ्या जन्म खुणांनी मी डीटरमाईण्ड होणार नाही, माझ्या वाढीच्या अनेक शक्यता आजमावून पाहीन ही जाणीव माणसाला पुरोगामी (शब्दश: आपल्या व्यक्तीमत्वाला असलेल्या कुंपणाहून उंचावणं) करते, हा मला द्वादशिवारांच्या प्रतीपादनाचा रोख वाटला, जो व्यक्तिश: मला फार योग्य वाटतो.
पूर्वी एकदा मी पुरोगामित्वाच्या चर्चेत, "प्रतिगामी किंवा पुरोगामी हे दोघंही वसाहतकालीन ऐतिहासिक प्रक्रियेची फलितं आहेत, आणि आपण कुठल्या गोष्टींना होकार देतो किंवा नकार देतो केवळ ह्यावर आपलं पुरोगामित्व किंवा प्रतिगामित्व निश्चित होत नाही तर आपल्या वैचारिक जाणीवा कुठल्या प्रक्रियेतून घडतात आणि आपण त्यांबद्दल किती सजग आहोत हे ही फार महत्वाचं आहे" असं म्हटलं होतं. त्यात भर घालून - जन्मसिद्ध खुणांमुळे आपल्या व्यक्तिमत्वाची सिद्धता होऊ देण्यास विरोध करणं आणि वैचारिक चिकित्सेतून आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व साकारणं हे पुरोगामित्वाचं एक महत्वाचं लक्षण आहे; असं म्हणावसं वाटतं.
ह्या संघाच्या चर्चेत भाग घायचायं पण तूर्तास फार उद्योग मागे आहेत. फुरसतीत सविस्तर लिहितो. दरम्यान, रावसाहेब कसबेंचं संघावर लिहिलेलं झोत नावाचं पुस्तक आणि कुरुंदकरांच्या शिवरात्र पुस्तकातले संघ आणि गोळवलकर गुरुजींविषयी असलेले ३ लेख रेकमेंड करतो.
चांगली मुलाखत, विश्लेषण
चांगली मुलाखत, विश्लेषण आवडले. सध्या महाराष्ट्रात जे चालू आहे ते बघता मोदी हा संघाचाच नाही तर सर्वांचाच नाईलाज आहे असे दिसते
या कमेंटबद्दल तुमचा भर
या कमेंटबद्दल तुमचा भर गणेशविसर्जनाच्या गर्दीसमोर लकडी पुलावर वगैरे जाहीर ..... सत्कार का करण्यात येऊ नये तेवढं सांगा.
काळा विनोद वाटला म्हणून हसत
काळा विनोद वाटला म्हणून हसत नाही. (ज्यांना पांढरा वाटतोय त्यांनी खुशाल हसावं.)
सर्वांचाच नाईलाज आहे असे
अनिवासी भारतीयांचा देखील? :ऑ
हो. तर.... अमेरिकेच्या
हो. तर....
अमेरिकेच्या अध्यक्षांचासुद्धा नाइलाज आहे तर तिथल्या भारतीयांचं काय?
सही
छान मुलाखत. मोदींमुळे संघाला चाप बसणार असेल तर आपण फुल-टू मोदींना पाठिंबा द्यायला तयार आहोत.
छान मुलाखत. आवडली.
छान मुलाखत. आवडली.
मुलाखत आवडली. काही गोष्टी
मुलाखत आवडली. काही गोष्टी पटल्या, काही नाहीत. "हिंदूधर्मातील सेवाभाव" बद्द्लचे निरिक्षण पटले. "सत्पात्री दान" यावरून पूर्वी घातलेला वाद आठवला.
एका संपादकांकडून (अर्थात
एका संपादकांकडून (अर्थात संपादक राहिलेल्या) लेखकाकडून निष्पक्ष आणि तटस्थ भावाने केलेले विवेचन अपेक्षित होते. दिवाळी अंकात छापल्या जाण्या योग्य लेख नाही असे मला वाटते.
सुरेश द्वादशीवार यांची मुलाखत
'शतरंज के खिलाड़ी' जवळून बघितलेल्या या माणसाची मतं जाणून घ्यायला आवडले.
भंपक.
हा दिवाळी अंक आज वाचला. चळवळ हा विषय घेऊन केलेली दिवाळी अंकाची मांडणी आवडली. संघ ही देशातली एक मोठी संघटना असल्याने संघाबद्दलच्या लेखाचा अंतर्भाव होणे स्वाभाविक आहे. मात्र काही गोष्टी खटकल्या.
(१) इतर सर्व लेखांमध्ये त्या त्या चळवळीशी जवळून संबंध आणि बांधिलकी असलेल्या मंडळींचा सहभाग असतांना केवळ याच विषयासाठी मुद्दाम संघविरोधी leading प्रश्न विचारणार्या मुलाखतकार आणि मुलाखत देण्यासाठी प्रसिद्ध संघद्वेषी द्वादशीवार अशी योजना करण्यात संपादकीय अप्रामाणिकपणा दिसून येत आहे. हे म्हणजे भारताची ओळख करून देण्यासाठी हाफिज सईदची मुलाखत एखाद्या नवशिक्या तालिबान्याकडून करवून घेणे असा प्रकार झाला.
(२) विसंगती आणि असंबद्ध खदखद: द्वादशीवारांच्या प्रतिपादनात खूप विसंगती आहे आणि 'संघाच्या दृष्टीनं पराक्रम कोणाचे, तर झाशीच्या राणीचे! झाशीची राणी काय संघवाली होती काय?' असली असंबद्ध वाक्ये आहेत. अशी खूप उदाहरणे देता येतील, पण तेवढा वेळ खर्च करावा या दर्जाची ही मुलाखत नाही.
(३) मात्र द्वादशीवारांचा खोटारडेपणा उघड करणे मला भाग आहे. ते म्हणतात, 'पण संघानं ब्राह्मणांचं नुकसानही फार केलं. गांधीजींच्या खुनाचा संघानं निषेध केला नाही. त्याच्यापायी महाराष्ट्रामधल्या हजारो ब्राह्मणांची घरं जाळली गेली. दुसरं, गांधीजींच्या खुनापासून ब्राह्मण समाजाचा बहुजन समाजाकडून होणारा द्वेष वाढला. याला संघ कारणीभूत आहे. संघांनं गोडसेचा निषेध केला नाही. ते त्याला अजूनही मनातल्या मनात ’धर्मात्मा’ वगैरे म्हणतच असतात. एका माथेफिरू माणसानं एका निःशस्त्र माणसाचा खून केला, यात यांना पराक्रम दिसतो. यांना काय म्हणायचं?'
वस्तुस्थिती काय आहे ते आपण पाहूया. गांधीजींच्या खुनाची बातमी आली तेंव्हा सरसंघचालक गोळवलकर गुरुजी हे चेन्नईमध्ये एका प्रतिष्टित नागरीकांबरोबर चर्चेच्या कार्यक्रमात होते. बातमी ऐकताच 'देशाचे दुर्भाग्य' हे दोन शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले आणि कार्यक्रम रद्द करून ते विमानाने नागपूरला परतले. पण चेन्नई सोडण्याआधीच त्यांनी हत्येचा निषेध करणाररी तार पंतप्रधान व गृहमंत्र्यांना पाठवली. नेहरूंना पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात,'अशा महापुरुषाला मारणे ही केवळ त्या व्यक्तीशी केलेली कृतघ्नता नसून सगळया देशाशी केलेली कृतघ्नता आहे. आपण,अर्थात विद्यमान शासकीय अधिकारी त्या देशद्रोह्याला योग्य ती शिक्षा देतीलच, हे नि:संशय. ती शिक्षा कितीही कडक असली तरी देशाची जी हानी झाली आहे, तिच्या तुलनेत ती फार सौम्यच ठरेल.'
गांधीहत्येच्या दुखवट्यानिमित्त संघशाखा तेरा दिवस बंद राहतील असेही त्यांनी घोषित केले.
द्वेषाने खदखदणारा द्वादशीवारांसारखा तथाकथित विचारवंत खोटारडेपणाचा कसा कळस गाठू शकतो हे पुरेसे स्पष्ट झाले असावे. असले खोटे आरोप प्रकाशित करण्यापुर्वी त्याची शहानिशा करण्याची काही संपादकीय जबाबदारी असते याची जाणीव आहे की 'ऑनलाईन' आहे म्हणून सगळेच चालून जाईल असे संपादकांना वाटत आहे ?
अवांतर: निष्ठांमध्ये मालकनिष्ठा,पैसेनिष्ठा या पण पुरोगामी निष्ठा आहेत का हे द्वादशीवारांनी स्पष्ट करायला हवे होते म्हणजे मग सगळ्या देशात कोळसा घोटाळा गाजत असतांना लोकमतमधून मात्र तो गायब कसा होता आणि त्यांच्या जबरदस्त अग्रलेखातून तो कसा सुटला याचे समाधानकारक पुरोगामी स्पष्टीकरण मिळाले असते.
रोचक
बरोबर. एकवेळ द्वादशीवार खोटं बोलतील, पण सरसंघचालक खरंच बोलणार. 'रोचक' श्रेणी दिली आहे.
'कोण?' नाही, 'काय?'
अभ्यासाची दिशा ही 'कोण' खरे आहे असे नसून 'काय' खरे आहे ही असली पाहिजे असे मला वाटते. कोण खरे आहे ते त्यातून आपोआपच स्पष्ट होतेच.
द्वादशीवार म्हणतात, 'गांधीजींच्या खुनाचा संघानं निषेध केला नाही' आणि ते असेही म्हणतात की 'संघांनं गोडसेचा निषेध केला नाही'
मी संघाने गांधीजींच्या खुनाचा निषेध केला होता की नाही याचा शोध घेउन, संघाने निषेध केला होता, शोक पाळला होता आणि नथुरामचाही 'देशद्रोही' अशा स्पष्ट शब्दात निषेध केला होता हे दाखवून दिले आहे. द्वादशीवार खोटारडे आहेत हे यावरून सिद्ध होते. केवळ मला वाटते म्हणून नाही.
सदर पत्रव्यवहार व कागदपत्रे Archives of RSS, Keshav Kunj, Zandewalan Extn. New Delhi. येथे बघण्यासाठी उपलब्ध आहेत. केंद्र सरकारच्या archives मध्येही बघायला मिळतील.
असले खोटे आरोप प्रकाशित
एकतर इथे प्रकाशित झालेल्या लेखनाची जबाबदारी आणि प्रताधिकार दोन्ही लेखकाचा असतो. या संस्थळावर प्रकाशित झालेल्या लेखनाशी संस्थळाचे मालक, संपादक, मॉडरेटर्स इत्यादी सहमत असतीलच असे नाही.
दुसरे असे की, मुलाखत छापताना संपादकीय संस्कार म्हणून ज्याची मुलाखत घेतली आहे त्याची मते/वाक्य परस्पर गाळून टाकणे अनुचित वाटते. अगदी तुमचा खंडनाचा मुद्दा योग्य धरला, तरी संपादकांनी दुसर्याने मुलाखतीत केलेले विधान परस्पर गाळणे अयोग्य ठरले असते.
त्याउलट त्यांचे मत लेखात आहे व तुमचे खंडनही इथे कोणतेही बदल न करता तसेच प्रकाशित आहे. वाचक दोन्ही वाचत आहेत व यातूनच सकस चर्चा जन्माला येते. हेच तर अशा प्रकारच्या संस्थळाचे उद्दिष्ट आहे.
धन्यवाद
माहितीबद्दल धन्यवाद. तुमची भूमिका मला एक वाचक म्हणून पटण्यासारखी आहे. सर्व मते सामावून घ्यायचे आपले उद्दिष्टही स्वागतार्ह आहे. मते मतांतरे असू शकतात, अगदी खोटी माहितीही अनेक जण छातीठोकपणे देऊ शकतात. पण जेंव्हा एखाद्या व्यक्ती व संस्थेबाबत बदनामीकारक खोटी माहिती दिली जाते तेंव्हा ती माहिती खोटी होती हे लक्षात आणून दिल्यावर आपली काय भूमिका आहे ते जाणून घ्यायला आवडेल.
पण जेंव्हा एखाद्या व्यक्ती व
एखादी माहिती किती खरी आहे वा खोटी आहे याचा निवडा करण्यासाठी लागणारा पुरेसा विदा आणि जबाबदारी दोन्ही संपादक मंडळाकडे नाही. मात्र इथे प्रकाशित झालेल्या लेखातील मतांचे खंडन करण्याची पूर्ण मुभा प्रत्येक सदस्यास आहे. इथे कोणतेही मत व/वा माहिती कायदेभंग (जसे जातीवाचक शिवीगाळ, एखाद्याची खाजगी माहिती जाहिर करणे वगैरे) होत असल्याशिवाय संपादित न होण्याची खबरदारी घेतली जाते. इतकेच काय, अनेक संस्थळांवर पूर्ण धागे उडवले जातात किंवा सदस्यांना बॅन केले जाते तसे प्रकार सहसा न करण्याचा कल इथे असतो.
तुम्ही वर काही विदा दिला आहे तो छापिल आर्काइव्ह्जमधील आहे. त्याची शहानिशा करून मग लेखनात संपादन करण्याइतका वेळ व शक्ती (मनुष्यबळ + आर्थिक शक्ती) दोन्ही संपादक मंडळाकडे नाही (कारण संस्थळ हे हौशी सदस्यांनी चालवलेले स्थळ आहे. व्यावसायिक संस्थळ नाही). आणि जरी दुसरा एखादा पटकन शहानिशा करता येण्यासारखा पुरावा समोर असता तरी मुळ मुलाखतीत वाक्य बदलणे संपादकीय संस्कारात बसत नाही. मुलाखत ही एखाद्याची योग्य/अयोग्य खरी/खोटी कशीही असतील ती मते/माहिती लोकांपुढे मांडण्यासाठी असते. त्यातील प्रत्येक विधान खरेच असेल किंवा मुलाखत घेणारे किंवा ती प्रकाशित करणारे त्याच्याशी सहमतच असतील हा अट्टहास सुयोग्य वाटतही नाही नी तशी अपेक्षा वाचकांचीही नसते. वाचक समोर येणारी दोन्ही बाजुची माहिती वाचून आपापले मत बनवण्यास समर्थ असतात. आपण आपल्याकडील माहिती देत जावी हे उत्तम.
इथे नवे आहात. तुमच्याकडे बरीच माहितीही दिसते आहे. याच मुलाखतीचे खंडन करणारा किंवा संघाच्या कार्याबद्द्ल किंवा इतरही कोणत्या विषयांबद्दल दिर्घ लेखही वाचायला इथल्या वाचकांना नक्कीच आवडेल!
आभार!
द्वादशीवारद्वेष्टा प्रतिसाद
मुद्दा क्र १ मध्येच या प्रतिसादाचा खोटेपणा उघड होतो. या अंकात कामगार चळवळीचे अभ्यासक राजीव साने यांची मुलाखत आहे. ते म्हणतात, ''कामगार चळवळीने कामगारांचं हित पाहिलं नाही.'' यात कामगार चळवळीचा काय गौरव आहे?
वस्तुनिष्ठ टीका आणि द्वेष यांतला फरक न समजता आगपाखडच करायची असेल तर या 'भक्ती'समोर काही इलाज नाही.
?
"या प्रतिसादातील मुद्दे हे separate आणि severable आहेत" असा काही स्पष्ट severability clause लेखकाने मांडणे आवश्यक होते(च) काय?
अभिव्यक्तिस्वातंत्र्याखाली वस्तुनिष्ठ टीका आणि आगपाखड (द्वेषयुक्त ऑर अदरवाइज़) दोन्हीं सारखेच कव्हर व्हावेत, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
............................
सांगण्याचा मतलब, उपरनिर्दिष्ट प्रतिसादकाचे मुद्दे हे पूर्णतः untenable असतीलही (किंवा नसतीलही; त्याबद्दल कोणतेही विधान तूर्तास करू इच्छीत नाही.); मात्र, आपले आक्षेप अगदीच अस्थानी आहेत, असे नम्रपणे सुचवू इच्छितो.
खोटेपणा?
मुद्दा क्रमांक १ मध्ये मी इतर सर्व लेखात त्या त्या चळवळीचा गौरव केला आहे असे कुठे म्हटले आहे ? त्या चळवळीशी जवळून संबंध आणि बांधिलकी असलेल्यांचे लेख वा मुलाखत असे मी म्हटले आहे. राजीव साने हे कामगार चळवळीचे अभ्यासक आहेत आणि प्रत्यक्ष सहभाग घेतलेले, बांधिलकी असलेले आहेत.
द्वादशीवार यांचा खोटारडेपणा मी वस्तुनिष्ठपणे सप्रमाण सिद्ध केला आहे.
द्वादशीवार म्हणतात, 'गांधीजींच्या खुनाचा संघानं निषेध केला नाही' आणि ते असेही म्हणतात की 'संघांनं गोडसेचा निषेध केला नाही'
मी संघाने गांधीजींच्या खुनाचा निषेध केला होता की नाही याचा शोध घेउन, संघाने निषेध केला होता, शोक पाळला होता आणि नथुरामचाही 'देशद्रोही' अशा स्पष्ट शब्दात निषेध केला होता हे दाखवून दिले आहे. द्वादशीवार खोटारडे आहेत हे यावरून सिद्ध होते. केवळ मला वाटते म्हणून नाही
त्यांच्या खोटारडेपणाला तुम्ही वस्तुनिष्ठ टीका म्हणत आहात आणि वर मलाच ती समजत नाही असे म्हणत आहात. शिवाय 'भक्ती' समोर इलाज नाही वगैरे वैयक्तिक हेटाळणी करत आहात जरी मी संघाबद्दल एकही गौरव वा भक्तीपर ओळ लिहिली नसली तरी.
संघाचे अनेक वादग्रस्त मुद्दे आहेत. त्यावर सतत टीका, चर्चा होतच असते. पण धादांत खोटे आरोप करायचे. ते खोटे आहेत हे सप्रमाण दाखवल्यावरही ते मान्य करण्याचा किमान प्रामाणिकपणा न दाखवता वर ते दाखवणार्याचीच हेटाळाणी करायची हे योग्य आहे का ? ठीक आहे, इकडे तुमची टोळी आहे त्यामुळे सगळे मिळून विरोधी मताचा उपहास करणे, झुंडीने मिळून मुद्दाम वाईट श्रेणी देणे आणि 'जितं मया' म्हणून स्वतःच स्वतःची 'मार्मिक' वगैरे पाठ थोपटून घेणे चालू द्या.
पण इथल्या बहुसंख्य प्रामाणिक वाचकांनी, मग ते संघप्रेमी असोत वा संघविरोधी वा न्यूट्रल, तुमच्या झुंडशाहीमुळे उघडपणे इथे मत व्यक्त केले नाही तरी किमान मनात तरी नक्की काय बरोबर आणि चूक याचे वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन करतील अशी मला आशा आहे.
'तरुण भारत'मध्ये अनेक वर्षं
'तरुण भारत'मध्ये अनेक वर्षं नोकरी केलेल्या द्वादशीवारांचा संघाशी जवळून संबंध नाही?
कोणीतरी काहीतरी म्हणालं होतं, अशा अर्थाची विधानं करणं याला प्रमाण, पुरावे म्हणत नाहीत. संघिष्ट लोक गांधींचा किती दुस्वास करतात आणि संघाची कुजबूज कँपेन्स कशी चालतात, हे अनुभवाने माहित असणाऱ्या व्यक्तींसाठी तर नाहीच नाहीत.