लाकूडतोड्याची गोष्ट
लेखक - संजीव खांडेकर
एका संध्याकाळी
एक लाकूडतोड्याटाईप गरीब इसम
एका नदीकिनारी आपले कपडे धूत होता.
तो गरीब असल्यामुळे
त्याच्यापाशी कपड्यांचा एकच जोड होता.
तोही अनेक ठिकाणी फाटलेला.
तो एकच एक असल्यामुळे तो कपड्यांनाच 'स्किन' म्हणत असे
आणि कपडे धुण्यासाठी
अर्थातच
त्याला नागडे होऊल ते धुवावे लागत.
त्या दिवशीदेखील
तो असाच
नागड्यानेच कपडे धूत होता.
त्यामुळे
स्वाभाविकच
स्किन शरीरावर नसल्यामुळे
आतले लाल मांसल आवरण
तांबड्या निळ्या रक्तवाहिन्या,
इतकेच काय, पोटातील आतडी वगैरे
सगळेच दुसऱ्याला दिसू शकत होते.
ते दृश्य अगदीच अश्लील असल्याने.
बीभत्स व किळसवाणे असल्याने,
त्याला
लवकरात लवकत कपडे धुवून, वाळवून
किंवा ओलेच कपडे अंगावर चढवण्याची घाई झाली होती.
घाई संकटाची खाई.
Haste makes waste.
तर घाईमुळे धुता धुता
अचानक त्याच्या हातून
त्याची 'स्किन' निसटली आणि नदीच्या वाहत्या प्रवाहात
लांबवर वाहून जाऊ लागली.
पोहता न आल्याने
व एकुलती एक 'स्किन' वाहून गेल्याने
आता आपल्याला नागडेच राहावे लागणार
नागडेच शहराकडे परतावे लागणार
या जाणिवेने लाकूडतोड्या शहारला
त्याच्या लाल रक्तवाहिन्या अधिक लाल,
तर निळ्या अधिक निळ्या झाल्या.
त्याचे मुठीएवढे लालभडक हृदय धपापू लागले.
चेहऱ्यावर घामाचा थेंब तरारला
हातपाय थंड पडले.
काय करावे ते त्याला सुचेना.
कुठे जावे ते काही केल्या आठवेना.
तो घाबरून प्रथम धाय मोकलून
तर नंतर
नियमित ड्रमबीट्ससारखा हुंदके देत रडू लागला.
ते बीट्स इतके तालबद्ध, रिद््मिक होते
की त्यावर सारा आसमंत थिरकू लागला. नाचू लागला.
जणू सारा निसर्गच -
डिस्कोथेक प्लॅटफॉर्म झाला आहे असे भासू लागले.
त्याच वेळी आकाशातून श्रीभगवान आपल्या सखीसह
कुठूनतरी कुठेतरी जात होते.
हा म्युझिकचा आवाज ऐकून त्यांच्या सखीने हेलिकॉप्टरमधून मान बाहेर काढली.
व खालचे दृश्य पाहून ती किंचाळलीच.
तिने नागडा पुरुष पाहिला नव्हता असे नव्हे.
पण अंगावर 'स्किन' नसलेला नागडा प्रथमच पाहिल्याने
व त्याच्या हुंदक्यांच्या तालावर नाचणारा निसर्ग
प्रथमच पाहिल्याने तिची शुद्ध हरपली.
आपल्या सखीने काय पाहिले,
तिची शुद्ध कशाने हरपली हे जाणण्यासाठी
श्रीभगवानांनीही आपल्या पायाचा डावा अंगठा
चोखण्यासाठी तोंडात घेण्याऐवजी,
विमानातून बाहेर काढला.
माशीच्या गोल डोळ्यासारखा तो अंगठा
३६० अंशात फिरला
आणि पुन्हा विमानात गेला.
श्रीभगवान तिला म्हणाले,
'अगं प्रोलेटॅरिएट, प्रोलेटॅरिएट...'
सखी ताडकन जागी झाली.
प्रथम तिला हा परफ्युम किंवा ब्रेसियरचा नवा ब्रॅन्ड असावा असे वाटले.
पण मग आपण शॉपिंग मॉलमध्ये नसून अवकाशात आहोत;
आणि कुठूनतरी कुठेतरी विहार करायला बाहेर पडलो आहोत
याचे भान तिला आले.
ती म्हणाली, 'तो नागडा, त्वचाहीन मानव...'
श्रीभगवान पुन्हा म्हणाले, 'अगं प्रोलेटॅरिएट, प्रोलेटॅरिएट...'
तेव्हा बहुदा योगसमाधीच्या उच्च पायरीवरचा,
हा नवा मंत्र असावा,
असे समजून तिने हात जोडून मंत्र ग्रहण केला.
श्रीभगवानांच्या पायाच्या डाव्या अंगठ्याचे तीर्थ ग्रहण केले
व लाडिक आवाजात भगवानांना तिने साद घातली;
ती पुढे म्हणाली, '...
'बहुदा त्या नागड्या माणसाला काही दुःख असावे.
त्याच्या अरण्यरुदनावर सारी अवनीच भूकंपासारखी
कंप पावू लागली आहे. नाचू लागली आहे.
तेव्हा हे संगीत तातडीने थांबवण्याची गरज आहे.
तरच हे सुंदर विश्व वाचेल.'
श्रीभगवानांनी यावर क्षणभर डोळे मिटून विचार केला.
अन्तचक्षूंनी विश्वाचा आढावा घेतला.
थोडीफार सॅटलाईट फोटोग्राफीही केली.
नागड्या माणसाच्या
तेही त्वचा नसलेल्या असभ्य माणसाच्या
संगीतापासून आपण निर्माण केलेल्या जगाला धोका आहे
हे त्यांच्या चाणाक्ष, अनुभवसिद्ध डोक्याने ओळखले.
आणखी थोडा विचार करून
त्यांनी काही बटणे दाबून विमानाचे इंजिन बंद केले.
ते अलगद जमिनीवर उतरवले.
आणि श्रीभगवान मग स्वतःच धरतीवर उतरले.
तरीही लाकूडतोड्याटाईप इसमाचे हुंदके,
व निसर्गाचे नाचणे चालूच होते.
भगवानांना एकदा वाटले, सरळ चक्र चालवावे
आणि त्या फाटक्या माणसाचे मुंडके उडवावे.
म्हणजे रडणे थांबेल,
त्यामुळे म्युझिक बंद होईल
आणि निसर्ग ताळ्यावर येईल.
परंतु तसे न करता त्यांनी त्याला विचारले,
'हे फाटक्या मित्रा, काय झालं तुला?'
'तू का रडतोस...? ... तू का कविता करतोस?
गाणं गातोस ...? आणि साऱ्या निसर्गालाच वेठीला धरतोस?
...?'
त्यावर हुंदके देत लाकूडतोड्या म्हणाला,
"हे भगवान, हे देवा पांडुरंगा, मी एक गरीब
लाकूडतोड्या असून, माझं पोट हातावर चालतं.
देवा, माझ्याजवळ अंगावरचा एकच कपडा आहे.
तो एकच एक असल्यामुळे लोक त्यालाच माझी 'स्किन' म्हणतात."
"काय 'जीन्स' म्हणतात?" श्रीभगवान उवाचले.
"नव्हे परमेश्वरा, दीनदयाळा, 'स्किन' म्हणतात"
लाकूडतोड्या पुढे सांगू लागला.
"तर ती एकच असल्याने, ती अंगावरून उतरवून
संध्याकाळी या नदीच्या काठावर मी तिला धुतो.
पुन्हा लवकर अंगावर चढवायची घाई झाल्याने आज
ती माझ्या हातून निसटली आणि प्रवाहात अदृश्य झाली.
आता कुठून आणू मी माझी स्किन?
असा कसा नागडाच जाऊ परत नगरात?
लोक काय म्हणतील?' इत्यादी चिंतांमुळे दु:खी आहे.
कष्टी आहे. म्हणून अनाथांच्या नाथा, मी रडतो आहे."
एका दमात लाकूडतोड्याने आपले दुःख सांगितले.
व पुन्हा त्याचे हुंदके वाढू लागले.
श्रीभगवान त्याला म्हणाले,
"हात्तीच्या, एवढेच ना,
मग मी काढून देतो तुझी जीन्स नदीतून.
माझ्याकडे स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी आहे.
हजार हात आणि दशसहस्र पाय आहेत,
हबल, बबल, सबल, सखोल, स्फटिक आहे.
मशीनरी, बॉम्ब्स म्युझियम्स
आणि पार्लमेन्टदेखील आहे.
देवळं, चर्चेस किंवा मशिदी मदरसे आहेत.
तू कशाला काळजी करतोस?"
एवढे म्हणून भगवान स्वतःच नदीच्या पाण्यात उतरले.
एका डुबकीतच त्यांनी निळ्या रंगाची, नवीकोरी,
लेबलसहित असलेली,
काही ठिकाणी मुद्दाम फाडलेली
डिझायनर जीन्स बाहेर काढली
लाकूडतोड्यासमोर धरली,
ते म्हणाले,
'Look at this Blue Jeans.
Guess. UK'
लाकूडतोड्याने जीन्स हातात घेतली,
निरखली व त्यांना, ती परत देत तो पुटपुटला,
'ही नव्हे माझी...'
वाक्य पुरे होण्याआधीच त्याला हुंदके अनावर झाले.
क्षणभर थांबलेला निसर्ग पुन्हा नाचू लागला.
भगवान म्हणाले, 'Fuck you Man.'
आणि त्यांनी परत नदीत उडी मारली.
सखीला आता गंमत वाटू लागली होती.
अधूनमधून तीही नाचू लागली.
'माय हिप्स डोन्ट लाय' म्हणत नाचू लागली.
भगवान पुन्हा बाहेर आले,
त्यांच्या हातात पुन्हा एक नवीकोरी,
लो राईज,
एका बाजूला उसवलेली, सीटवर डाग पडलेली,
ब्ल्यू डेनिम होती.
ते म्हणाले, 'फाटक्या मित्रा, ही बघ,
तुझीच आता, नवी ह्यूगो बॉस. लिमिटेड एडिशन.'
लाकूडतोड्याने ती डेनिम हातात घेतली.
क्षणभर त्याचे डोळे लकाकले.
म्युझिक बंद झाले. निसर्ग अवघडला.
सखी भांबावली.
पण त्याने पुन्हा डोळे मिटले. हुंदका दिला.
कुशल डी.जे.ने क्षणभर पॉज घ्यावा तसा.
पुन्हा जोरजोरात कर्कश रडगाणे सुरू झाले.
लाकूडतोड्या म्हणाला, 'सॉरी, ही माझी नव्हे.'
श्रीभगवान म्हणाले, 'तुझ्या आईची गांड',
आणि त्यांनी परत नदीत उडी घेतली.
काही क्षणांतच भगवान बाहेर आले.
आता ते चांगलेच थकलेले दिसत होते.
त्यांच्या डोक्यामागे फिरणाऱ्या चक्राची गतीही काहीशी
मंदावली होती.
यावेळी त्यांच्या हातात एक नवी, कोरी करकरीत,
पण जुनीपुराणी दिसणारी,
'टेक्सास' एम्बॉस केलेली,
पितळी बकल असलेली,
काळसर तपकिरी निळसर पांढरी जीन्स होती.
श्रीभगवान म्हणाले, 'मॅन हिअर यू गो; तुझीच ही. अॅन्टिफिट. टेक्सास, यू. एस. मरीन इन गल्फ; चढव अंगावर
... आणि गेट लॉस्ट!'
आणि तुच्छ नजरेने निसर्गाकडे पाहिले.
म्युझिक थांबल्याने सखी चेहेऱ्यावरचा घाम पुसत होती.
निसर्ग सिगारेट ओढत आजूबाजूला विसावला होता.
लाकूडतोड्याने अँटीफिट हातात घेतली.
त्याचा चेहरा आनंदाने फुलला.
पण क्षणभरच.
पाठोपाठ त्याच्या साऱ्या नागड्या शारीरिक आंतररचनेतून
एक पीळदार उसासा बाहेर पडला.
तो म्हणाला, ' व्हाय डू यू डू धिस? ही पण माझी नव्हे.'
सखीसकट सारा निसर्ग पुन्हा नाचण्यासाठी पोझ घेऊ लागला.
ढुंगण वरखाली करत, पायांनी ताल जमवू लागला.
जागच्या जागीच घुमू लागला.
पण श्रीभगवानांनी प्रसंगावधान राखले
एक हात उंचावून त्यांनी निसर्गाला आपल्या जळजळीत
नजरेने रोखले.
सखीला फ्रीज केले
आणि लाकूडतोड्याला स्मितहास्य दिले.
भगवान म्हणाले, 'हे माझ्या फाटक्यातुटक्या मित्रा,
I'm really pleased and happy.
Touched and moved.
कित्येक दिवसांत तुझ्यासारखा सच्चा भक्त पाहिला नव्हता.
मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे.
म्हणून विसर तुझी जुनी अडगळ वेडगळ स्किन.
बक्षीस म्हणून या तिन्ही जीन्स मी तुला देत आहे.
आणि वर एक वरही.'
लाकूडतोड्या म्हणाला, 'तो कोणता महाराज?'
भगवानांनी आता जाणले होते की
निसर्ग काबूत येऊ लागला आहे.
श्रीभगवानांनी अभयमुद्रा धारण केली
आणि ते म्हणाले,
'And there shall be a giant mall,
And there became the Mall.
And there shall be Jeans on Sale.
And there became the Sale of Jeans.
And the God said there shall be happiness
And there became the happiness ...'
लाकूडतोड्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
त्याने तिन्ही जीन्स एकापाठोपाठ एक
लेबलसह अंगावर चढवल्या.
भगवान म्हणाले, 'यापुढे कोणीही राहणार नाही
नागडाउघडा.'
तरी त्याने पुन्हा विचारलेच, 'पण माझं म्युझिक महाराज?'
श्रीभगवानांनी बोट वर केले.
लाकूडतोड्याने वर पाहिले.
दहा दिशांनी उजळत काही गोपुरे वर येताना दिसत होती.
सारे शहर होर्डिग्जच्या सप्तरंगात न्हात होते.
लाकूडतोड्याने एक दीर्घ श्वास घेतला
आणि शांतपणे एका नव्यानेच वर येणाऱ्या,
मॉलच्या उजळलेल्या मनोऱ्याच्या दिशेने तो चालू लागला.
हात जोडून म्हणाला, 'Thank you.'
भगवानांनी किक मारून विमान स्टार्ट केले.
रनवेवर विमान धावू लागले.
खिडकीतून हात बाहेर काढत, बाय बाय करीत
भगवान स्वतःशीच पुटपुटले, 'Fuck you.'
('नांगी गळू लागलेले फुलपाखरू' ह्या लेखाच्या संदर्भात वाचण्यासाठी पुनर्प्रकाशित.)
उणे तारका द्यायची सोय का नाहि?
मला लेखन नाहि आवडलं तर मी सहसा पुढच्या लेखनाकडे वळतो. विशेषतः पहिलीच प्रतिक्रिया अशी देताना हात आखडतो. पण भिकार लेखन कधी अगदीच असह्य होतं आणि निषेध नोंदल्याशिवाय पुढे जाववत नाहि!
छान.
:-) पूर्ण लेख वाचण्याऐवजी नुसती ही कविता वाचली तरी चालली असती असे पूर्ण लेख वाचल्यावर जाणवले. अर्थात लेखही आवडलाच होता पण कलेविषयी भाष्य करण्यासाठी कलेचाच आधार अधिक प्रभावी वाटला इतकेच.
भडकाऊ?
असोच. :-)
नाहीतर काय?
अशा प्रशंसेने कवी (!) पेटून उठतो (= भडकतो) नि आणखी अशाच एक से एक भयाण कविता प्रसविण्यास उद्युक्त होतो, म्हणून 'भडकाऊ'.
(कवी(!)स अशाच आणखी कविता पाडण्या१करिता भडकविणारा प्रतिसाद, या अर्थी.)
('भडकाऊ' हे 'इन्स्टिगेटिव्ह'चे मराठी भाषांतर असावे, अशी आपली आमची समजूत. प्रस्तुत प्रतिसाद कवी(!)स असल्या आणखी कविता करण्यास इन्स्टिगेट करतो, अशीही.)
इत्यलम्|
............................................................
१ (अवांतर:) प्रसविलेली कविता पाडणे हा त्या कवितेचा गर्भपात म्हणता यावा काय?
जबरी कविता. संकल्पच्या
जबरी कविता. संकल्पच्या दुसऱ्या आवृत्तीत पूर्वी वाचली होतीच. वस्तूकरणाच्या व्यापक प्रक्रियेची कविता आहे ही. सद्यकालीन आपल्या त्वचांचं सुद्धा वस्तूकरण होत जाण्याची प्रक्रिया, आपलं असणंचं नष्ट होत जाण्याची प्रक्रिया नोंदवण्याचा एक प्रयत्न आहे. जिथे निसर्गच सिगारेट फुन्क्तोय, आणि ईश्वर केवळ शिव्या नि वस्तूच देऊ शकतो, त्या काळाचं शुभवर्तमान आणखी कसं सांगता येईल?
'And there shall be a giant mall
And there became the Mall.
And there shall be Jeans on Sale.
And there became the Sale of Jeans.
And the God said there shall be happiness
And there became the happiness ...' (ह्याला अर्थात बायबल चा संदर्भ आहे.)
अगं प्रोलेटेरिअट, अगं प्रोलेटेरीअट...तुझी कविता आहे ही!
खरंतर मी कविताशत्रू. ही कविता
खरंतर मी कविताशत्रू. ही कविता ('लाईलाज को क्या इलाज' असं म्हणत का होईना) वाचली. 'नांगी गळू लागलेले फुलपाखरू' हा लेख आणि ही कविता दोन-तीनदा वाचल्यावर काहीतरी नवीन समजल्याचा आनंदही झाला. त्यामुळे 'मिसळपाव' यांची पहिलीच प्रतिक्रिया तीव्र नापसंतीची असली तरीही ती समजू शकते.
'धनुष' यांचा त्या निमित्ताने (उगाच) निषेध. ते फार लिहित नाहीत.
आयला, मला वाटलं, अति लिहिलं
आयला, मला वाटलं, अति लिहिलं म्हणून कुणीतरी टीका करेल. पण लिहित नाही म्हणून टीका?
इल्ले
अर्थ उमगला, पण कविता म्हणून आवडली नाही- "अगं प्रोलेटॅरिएट, प्रोलेटॅरिएट..." सोडून :)
कल्पना चांगली आहे
कल्पना चांगलीच आहे.
एक विचार मनात आला : अशा प्रकारच्या रूपककथांमध्ये वा बोधकथांमध्ये वर्णन किती लांबवायचे आणि कुठे हात आखडता घ्यायचा तो समतोल साधणे फारच कठिण असते. या कृतीत ते जमले आहेच असे माझ्यापुरते तरी स्पष्ट नाही.
अगदी अगदी! +१
अगदी अगदी!
+१
आवडली.
आवडली.
लाकूड्तोड्याला जीन्स
लाकूड्तोड्याला जीन्स मिळाल्याने स्किनची कमतरता भरून निघालीय असा विश्वास देण्यात हा बाजारशरण व्यवस्थेतला भगवान यशस्वी ठरलाय. ( किंवा हा जो यशस्वी ठरलाय त्यालाच आम्ही भगवान बनवून टाकलयं) आता पूर्वी लाखूड्तोड्या फक्त स्किन धुवून घालण्याचाच उद्योग करायचा आता जीन्स ची सवय झाल्यावर नवनवीन जीन्स , त्यांचे सेल, त्यासाठी पैसे मिळवणे वैगेरे वैगेरे उद्योग त्याच्या मागे लागतील आणि हे तो मरेपर्यंत भान विसरून करत राहील. स्किन हरवलेल्या त्याच्या आकांताचा रिदम बनवून त्यावर नाचणारा, सिगरेट प्यायला विसावलेला निसर्ग ही प्रतिमा आवड्ली.
उपमा इंटरेस्टींग वाटल्या, पण
उपमा इंटरेस्टींग वाटल्या, पण कल्पना ठीक आहे.
.
.
.
.
.
.
स्किन काढलेल्या माणसाला घाम कसा काय आला असावा?
लक्षवेधी
येन केन प्रकारे 'लक्षवेधी' पणा करणारे जे असतात त्यांची प्रातिनिधिक कविता(?) वाटली. असं काही लिहून आपण खूप उच्च दर्जाचे साहित्य निर्माण केलंय, असं काही जणांना वाटणं स्वाभाविक आहे. प्र. के अत्र्यांनी फार पूर्वी एकदा 'उद्धव ज. शेळके' या लेखकाचा समाचार घेताना, त्यांना अग्रलेखांत 'उद्धव ज. शेळीके' असे संबोधले होते. जिज्ञासूंनी तो मराठातला अग्रलेख जरुर वाचावा.
...
'मार्मिक' श्रेणी देऊन भागले नाही, म्हणून ही अतिरिक्त पोच.
(असांसदीय शब्दांच्या वापरास सरसकट आक्षेप नाही. तसेही बरेच चमत्कृतिपूर्ण, क्वालिटी अपौरुषेय वाङ्मय मौखिक परंपरेतून ऐकलेले आहे, त्याचा आनंद उपभोगिलेला आहे, अप्रीशिएटविलेही आहे. पण यात दम नाही.)
नेमके! (तेवढा "'प्रकारेण'; 'प्रकारे' नव्हे" हा एकमात्र आक्षेप वगळल्यास.)
शिवराळपणा
हे केल्यावर मग जिज्ञासूंनी काय करावे? तर, पु.भा.भाव्यांनी अत्रे ह्यांच्यावर त्यांच्याच शैलीत 'आदेश'मधून जे दणदणीत लत्ताप्रहार केले होते तेदेखील वाचावे. अत्रे शिवराळ होते म्हणून त्यांना साहित्यिक विषयांत जाण होतीच असं नाही. किंबहुना, अत्र्यांनी एखाद्यावर आगपाखड केल्याचं उदाहरण देऊन कोणत्याही युक्तिवादात फारसं काही सिद्ध होत नाही, एवढंच इथे सांगायचंय.
...
हे जे काही इथे छापून आलेय, ते जर 'साहित्य' असेल, तर 'साहित्या'त मलाही जाण नाही, हे प्रांजळपणे कबूल करतो.१, २ आणि, अत्र्यांनाही जर साहित्यात जाण नसेल, तर 'वुई आर इन ऑगष्ट कंपनी' एवढेच समाधान मानून गप्प बसतो.
.........................................................
१ म्हणजे, त्याबद्दल तशीही शंका नव्हतीच म्हणा, परंतु तरीही.
२ कारण, (पु.लं.नी म्हटल्याप्रमाणे,) शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?
कारण, (पु.लं.नी
कारण, (पु.लं.नी म्हटल्याप्रमाणे,) शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?
खरय. काय करणार?
उद्धव शेळके यांना शेळीके
उद्धव शेळके यांना शेळीके म्हणणारे अत्रे स्वतः किती शेलक्या दर्जाचा विनोद करत असत ते आपल्याला माहित असेलच. मर्ढेकरांवर सुद्धा अश्लीलतेचे खटले भरले गेले होते आणि त्यात न्यायालयीन साक्षीसाठी प्रख्यात गांधीवादी विचारवंत स ज भागवतांना बोलावलं होतं. जिज्ञासूंनी त्यांची ती साक्ष पहावी. खांडेकर हे काही येन केन प्रकारे लक्ष वेधून घेणारे लेखक नाहीत ह्याची प्रचीती त्यांच्या ह्या दिवाळी अंकातल्याच लेखावरून तुम्हाला आली असेलच.
(यावरून आठवले...)
This comment has been moved here.
'काव्य लेखक' १
संजीव खांडेकर यांनी नांगी गळू लागलेले फुलपाखरू हा लेख आधी लिहिला आहे का त्यांची 'लाकूडतोड्याची गोष्ट' उपरोक्त काव्य आधी लिहिली हे निश्चीत सांगता येत नाही. नांगी गळू लागलेले फुलपाखरू हा लेख न वाचता 'लाकूडतोड्याची गोष्ट' काव्य स्वतंत्रपणे वाचता येत असले तरीही काव्याचा आणि काव्य लेखक संजीव खांडेकर यांच्या भूमीकेचा पुरेसा उलगडा केवळ काव्यातून होत नाही, त्यांच सदर काव्य आणि लेख याचे धागे एकमेकांशी एकमेकांशी घट्ट जुळलेले आहे त्यांच्या लेखाचे काळजीपुर्वक वाचन केल्यास लक्षात येते. नांगी गळू लागलेले फुलपाखरू + लाकूडतोड्याची गोष्ट वेगवेगळे दिलेले असले तरीही ते एकाच लेखसंग्रहात एकाच वैचारीक दृष्टीकोणातून आले आहेत, म्हणून नांगी गळू लागलेले फुलपाखरू + लाकूडतोड्याची गोष्ट हा एक काव्य लेख अथवा लेख काव्य आहे असे म्हणावेसे वाटते म्हणूनच संजीव खांडेकर यांचा उल्लेख निव्वळ कवी अथवा निव्वळ लेखक असा करण्यापेक्षा काव्य लेखक असा अधिक योग्य वाटतो.
नांगी गळू लागलेले फुलपाखरू लेख वाचण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात म्हणून निटसा न वाचताच केवळ काव्यच वाचले जाण्याची आणि काव्यास न्याय पुरेसा न्याय न मिळण्याची शक्यता वाटते म्हणून
नांगी गळू लागलेले फुलपाखरू याचा संक्षेप करणे आणि काव्याचा आणि लेखाचा सहसंबंध दाखवण्याचा माझ्या परिने प्रयास करणे असा माझ्या येत्या दोन तीन प्रतिसादातून प्रयास करण्याचा मानस आहे.
असा प्रयास जरुरी आहे का असा प्रश्न सहाजीक पणे पडू शकेल पण त्याचे उत्तर बहुधा उर्वरीत प्रतिसाद प्रयासातून आपोआपच मिळू शकेल अशी आशा आहे.
'काव्य लेखक' - २
नांगी गळू लागलेले फुलपाखरू या लेखाच्या आधारे काव्य लेखकाची भूमीका समजून घेण्याचा प्रयत्न केला असता काव्यलेखकाच्या काही भूमीका स्पष्ट होत जातात.
संजीव खांडेकर म्हणतात "मी स्वतः कलेला समाजपरिवर्तनाच्या चळवळीपासून वेगळे मानत नाही." त्यांचा दृष्टीकोण कलेसाठी कला असा नसून प्रबोधनासाठी कला हि त्यांची भूमीका उघड आहे. बदललेल्या काळात रंजनाच्या क्षेत्रात केवळ कलेलाच मुल्य प्राप्त झालेलय अस नाही तर कलाकारालाही (व्यक्तीला) क्रयमुल्य प्राप्त झाल्याची संजीव खांडेकरांची तक्रार आहेच अर्थात हा वेगळा विषय आहे पण मुख्य म्हणजे त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश प्रबोधन असल्यामुळे कलामुल्य आणि त्यात कुठे उत्कटतेशी तडजोड झाली अथवा कृत्रीमता जाणवल्यास ते मुद्दे वाचकाने गौण गृहीत धरावेत हि कोणत्याही प्रबोधनवादी लेखकाची अपेक्षा असू शकते. या मुद्द्याचा नंतरच्या प्रतिसादात अधिक उहापोह बहुधा करेनच.
काव्य-लेखकाचा मराठी, महाराष्ट्र, राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय इतिहास, तत्वज्ञान , अर्थशाशास्त्र, सामाजिक आणि राजकीय घडामोडींच्या व्यापकपटाशी परिचय आहे १९८०च्या आधीच्या दशकांमध्ये स्वतःला विवीध चळवळींमध्ये झोकून देणारा माणूस, गेल्या तीस एक वर्षात कुठेतरी हरवला आहे त्याचा शोध काव्य लेखक नांगी गळू लागलेले फुलपाखरू लेखातून घेतोय तर त्याची सामाजिक परिणती लाकूडतोड्याची गोष्ट या काव्यातून मांडली जाती आहे.
भांडवलशाहीच्या प्रगतटप्प्याला अभिप्रेत आदर्श अर्थव्यवस्था तर दुसर्या बाजूला मागे पडत चाललेल्या मार्क्सवादी भूमीका या दोन्हींचा काव्यलेखकास यथास्थीत परिचय दिसतो. काव्यलेखक लेखात म्हणतो "पोथीनिष्ठ डावे (जेमसन यांच्या भाषेत Vulgar Marxist) अशा समकालीन कलावंताची समीक्षा करताना बदलल्या काळाचे, दुभंगलेल्या निष्क्रिय व कोणतीच भावभावना न उरलेल्या समाजाचे, भांडवली अर्थव्यवस्थेतल्या 'मनी कॅपिटल मनी' (MCM) या फॉर्म्युल्याने आलेल्या आडाखी अर्थरचनेचे पैलू व पदर लक्षात न घेता नुसतीच टीका करतात हे योग्य नाही." या वरून काव्यलेखक पोथीनिष्ठ डावा नसावा परंतु गेल्या तीसवर्षात झालेल्या बदलांचे मुल्यमापन डाव्या अंगाच्या कुठल्यातरी छटेने होते आहे. अर्थात हे मुल्यमापन केवळ डाव्या चष्म्यातून झाले असण्याची शक्यता आहे म्हणून दुर्लक्षीण्यासारखे नाही कारण झालेला मानवी आणि सामाजिक बदल काव्य-लेखकाने त्याच्या लेख आणि काव्याच्या माध्य्मातून ज्या नेमकेपणाने पुढे आणला आहे ते मार्मिक आणि म्हणून दखल घेण्या जोगे वाटते आहे.
(कदाचित मला हा प्रतिसाद पुर्नसंपादीत करावा लागण्याची शक्यता असल्यामुळे प्रतिसाद स्वतंत्र प्रतिसादाच्या रुपाने दिल्यास आभारी असेन.)
'लाकूडतोड्याची गोष्ट' समजून घेताना (माझ्या मते)
'लाकूडतोड्याची गोष्ट' कवितेतिल लाकूडतोड्याटाईप गरीब इसम एक प्रोलेटॅरिएट म्हणजे रोजंदारीवरील कामगार आहे. "त्याच्यापाशी कपड्यांचा एकच जोड होता. तोही अनेक ठिकाणी फाटलेला. तो एकच एक असल्यामुळे तो कपड्यांनाच 'स्किन' म्हणत असे" या ओळीत तुलना १९८० च्या दशकाआधीच्या कामगार आणि इतर गरीबांच्या स्थितीशी आहे. (संदर्भ: १, २) १९८० च्या आधीही कामगारांची/गरीबांची त्वचा (जखमांमुळे) फाटलेलीच होती, अंगावरची ती जखमांनी फाटलेली त्वचा हेच त्याचे एकमेव कपडे आहेत. (जखमांनी) फाटलेली त्वचा हे त्या कामगाराच्या/गरीबाच्या स्वत्वासाठी वापरलेल रुपक आहे. आता काळाच्या ओघात नदीतून बरच पाणी वाहून गेलय (काळ बदललाय) हि त्याची त्वचा फाटकी असणे जुनीच गोष्ट आहे ती मलीन होते आणि म्हणून तो सतत नव्याने येणार्या नदी प्रवाहातील पाण्याने तो त्याची त्वचाच स्वत्व धुऊन घेण्याच्या प्रयत्नात आहे. हे स्वत्व धुऊन घेणही सोप राहीलेल नाही. त्याला स्वत्व धुऊन घेण्याच काम अत्यंत घाई घाईत उरकाव लागतय जो पर्यंत त्याच स्वत्व धुऊन पुन्हा घालत नाही तो पर्यंत तो केवळ नागडाच नव्हे चक्क त्वचा नसलेला म्हणजे स्वत्वहीन नागडा असतो. उरलं सुरलं स्वत्व पुन्हा परिधान करण्याची घाई एकदिवस त्याच्या अंगलट येते, एकुलती एक 'स्किन' कसबस जपलेल फाटक का असेना स्वतःच स्वत्व वाहून जाते, आता आपल्याला नागडेच म्हणजे स्वत्वाशिवायच राहावे लागणार "या जाणिवेने लाकूडतोड्या शहारला" आणि "तो घाबरून प्रथम धाय मोकलून तर नंतर नियमित ड्रमबीट्ससारखा हुंदके देत रडू लागला. " तो आता नियमित रडू लागलाय कि सोबतच बदललेल्या काळात त्याच्या रडण्यालाही नियमांनी जखडून टाकल्यामुळे त्याला त्याच रडणही तालबद्ध टेवाव लागतय ?
यात एका पेक्षा अधिक अर्थांनी काव्य लेखक उपहास करतो आहे. त्या गरिबाच्या आसमंताला त्याच्या हुंदक्यांशी काही एक देणे घेणे नाही त्याच्या हुंदक्यांनाच त्याच्या भोवतालचा निसर्ग आपल्या रंजनाच माध्यम बनवतोय दुख्खाचाच बाजार बनवतोय. काळ एवढा बदललाय की कुणालाच कशाच काही वाटत नाही. "जीत का मंत्र है, टेक इट इझी पॉलिसी," या ओळींकडे काव्य लेखकाचा निर्देश येथे प्रस्तुत वाटतो. नांगी गळू लागलेले फुलपाखरू लेखात पर्यावरणाच्या राजकारणाचा उल्लेख लेखक करतो त्या उल्लेखातून येणार्या उपहासाची छटा सुद्धा या ओळींना असू शकेल का
सोबत खालील ओळी अभ्यासा
"परंतु गेल्या काही वर्षांत असे काय बरे घडले असावे की विचित्र वाटणारा पिकासो किंवा हुसेन, चित्रे, कोलटकर किंवा त्याही आधीचे मर्ढेकर, तेंडुलकर किंवा ढसाळ असे सगळेच सद्य समाजाला विघातक वाटेनासे झाले? इतकेच नव्हे तर यातील बहुतेक सगळे 'क्लासिक' किंवा 'लोकमान्य व राजमान्य' कला-सौंदर्य-व्यवस्थेत चपखलपणे सामावले गेले! दुसरीकडे समकालीन कलाप्रांतात विरोध व्हावा वा धक्का बसावा असे काही घडताना आपल्याला दिसत नाही. जे जे म्हणून असभ्य होते, धक्कादायक किंवा वाळीत टाकलेले होते - मग पंक असो, रॉक असो, किंवा लैंगिक मुक्ताविष्काराचे दर्शन असो - सारेच काही आता समाजात सहज गिळून विनासायास पचवले जाते. इतकेच नव्हे, असे काही असलेच तर ते विक्रीच्या दृष्टीने (कमर्शियली) यशस्वी तर होतेच; परंतु शासनाच्या वा अन्य अकादमीच्या पुरस्कारालाही प्राप्त होते. जाहिरातक्षेत्राने तर आधुनिकांच्या काळात जे जे वावगे म्हणून हिणवले जाते ते ते आपले मानून सबंध आधुनिकतेचेच एक प्रॉडक्ट किंवा क्रयजन्य उत्पादन करून टाकले आहे. याचे दुसरे उदाहरण म्हणजे वुडस्टॉक फेम जीन्स पॅन्ट्स आणि चे गव्हेराचे चित्र छापलेल्या चड्ड्या, निकर्स आणि ब्रेसियर्ससुद्धा विक्रीला उपलब्ध आहेत. विरोधाला क्रयवस्तू करून तिची विक्री करण्याच्या या 'मार्केट फोर्स'च्या ताकदीला काय म्हणणार?.....
जे जे म्हणून व्यवस्थेला आव्हान देणारे होते त्याचीच व्यवस्था - Canon बनवून - ते पाठ्य पुस्तकापासून रस्त्यावरील दुतर्फा होर्डिंग्जवर रंगवून त्यातील सुप्त विरोध इच्छारूपाला पिळून पिळून रिकामे करण्यात ही व्यवस्था यशस्वी झाली आहे.
......अशा 'स्व'चे स्खलन किंवा पतन झालेल्या, वीर्यपतनानंतर क्षीण झालेल्या लिंगासारख्या, आणि स्वतःतील ऊर्जेचा अभाव जाणवून 'थंड' झालेल्या समाजाला कशाचेच काहीही वाटेनासे होते. जेमसन यांची सुप्रसिद्ध रचना वापरायची झाल्यास ते या अवस्थेला 'Waning of the affect' असे म्हणतात - भावनेचा क्षय, नातेसंबंध, प्रेम, राग, द्वेष अशा साऱ्याच भावना या अवस्थेत नष्ट होऊ लागतात. शब्द गुळगुळीत होतात. ............या सर्व भावनांचे व्यावसायिक व 'कमर्शियल' क्रय वस्तू रूपांतर करण्यासाठी एका बाजूला मदर्स, फादर्स, ब्रदर्स, फ़्रेंड्स अशा सगळ्या नात्यांचे 'डे' साजरे करण्यासाठी व त्याकरता खरेदी-विक्री होण्यासाठी एका स्वतंत्र मार्केटची निर्मिती सद्य भांडवली अर्थव्यवस्थेने केकवरील 'आयसिंग'सारखी मांडली आहे. प्रेम व्यक्त करायचे तर शॉपिंग करा, कंटाळा घालवायचा तर शॉपिंग करा - Shop till you drop अशा घोषणांतून, लैंगिक सुखापासून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आध्यात्मिक भोंगळापर्यंत आणि रामदेव बाबाच्या योगसाधनेपासून डॉ. केगलच्या एक्सरसाईजपर्यंत माणसातील माणूस नष्ट करण्याची, त्याला भूतकाळापासून वेगळे काढण्याच, त्यामुळे भविष्याची कल्पना करण्याची संवेदना नष्ट करण्याची, किंवा सतत वर्तमानातच ठेवण्याची योजना सद्य व्यवस्थेच्या, भांडवलाच्या शेवटच्या अतिप्रगत टप्प्यात आखण्यात आली आहे.
कशाचेच काही न वाटणे ही सर्वात भीषण बाब आहे. मानवी इतिहासात माणसाचे एवढे नीच पतन कधीही झाले नसावे. या फॅशनेबल अलिप्ततेचे (modish detachment) आणि उपरोधिक विडंबनाचे आविष्कार समकालीन (उत्तर-आधुनिक?!) साहित्य व कलांमध्ये आपल्याला वारंवार भेटत राहतात. नव्वदीच्या सुरुवातीला प्रभू देवा याचे 'ब्रेक डान्स'वर केलेले गमतीशीर गाणे
ते गाणे असे होते:
“उर्वशी, उर्वशी… टेक इट इझी उर्वशी -
उंगली जैसी दुबली है।
नही चाहिये फार्मसी
जीत का मंत्र है, टेक इट इझी पॉलिसी,
चार दिन की चांदनी, ये जवानी फॅन्टसी,
उर्वशी … टेक इट इझी उर्वशी.”
विरोध तर बाजूला राहिला, परंतु, 'ठेविले अनंते तैसेची रहावे' किंवा काहीही झाले तरी Take it easy, प्रतिक्रिया नको. प्रतिसाद नको. काहीही घडो; परंतु मातीच्या थंड गोळ्यासारखा पहुडलेला हा समाज ढिम्म हलण्याचे नाव घेत नाही. ..... आणि, मुख्य म्हणजे हाच ढिम्म, निराकार, निर्गुण, गुळगुळीतपणा समकालीन वा उत्तर-आधुनिक..... अनेक मराठी लेखक-कवींच्या साहित्यातून वारंवार जाणवणारी फॅशनेबल संन्यस्तवृत्ती - डिटॅचमेंट
(लेखन चालू, बहुधा मला हा प्रतिसाद पुर्नसंपादीत करावा लागण्याची शक्यता असल्यामुळे प्रतिसाद स्वतंत्र प्रतिसादाच्या रुपाने दिल्यास आभारी असेन.)
लाकूडतोड्याची गोष्ट' समजून घेताना (माझ्या मते) २
माझे आधीचे संबधीत प्रतिसाद : 'काव्य लेखक' ; लाकूडतोड्याची गोष्ट' समजून घेताना (माझ्या मते) १
नांगी गळू लागलेले फुलपाखरू लेखात काव्यलेखक १९८०च्या आधीच्या ध्येयवेड्या चळवळीतील जगातील ध्येयाची विठ्ठलाशी तुलना करत असावा. लेखात काळासोबत झालेल्या बदलांबद्दल काव्यलेखक म्हणतो, "ज्या वाटेवर विठ्ठल भेटेल म्हणून चाललो, ती वाट वाट नव्हती, उलट जे जे त्याज्य मानले, तेच व तेवढेच सत्य आहे की काय अशा तात्त्विक, आयडिऑलॉजिकल, आणि प्रसंगी धार्मिकदेखील गोंधळाच्या वादळात 'संकल्प' पिढीचे तारू अडकले व भरकटलेही." . ह्या बदलाची एकुण व्याप्ती काव्यरुपातून व्यक्त करताना, झालेल्या बदलांचा सामाजिक परिणाम नोंदवताना बदललेल्या काळातील व्यवस्थेने "श्रीभगवान" (ध्येयच) बदलले आहे की "श्रीभगवान" (ध्येय) च बदललेल्या काळातील व्यवस्थेच प्रतिनिधीत्व करतात की, गरीब गुलामास (चळवळीच्या कार्यकर्त्यास) , मालक असलेला "श्रीभगवान" (आजची व्यवस्था) कसेही वागला/ली अपमानीत केल तरी त्याला त्याच काही वाटत नाही. "श्रीभगवान" (व्यवस्था) सुखलोलुपतेत ते ही (पत्नी सोबत नव्हे) कुणातरी सखी सोबत रममाण आहे. सर्व सुविधा आपल्या डाव्या पायाच्या आंगठ्यात सहज समाविष्ट करण्या एवढे तंत्रज्ञान उपलब्ध असून ते सर्वसामान्यांसाठी न वापारता आपल्या पायाचा डावा अंगठा चोखण्यासाठी तोंडात ठेवण्यात व्यवस्था मश्गूल असल्याची कठोर टिका काव्य लेखक नवव्यवस्थेवर करतो आहे. "श्रीभगवान" आणि सखीच यांच जग वेगळ आहे ज्यात सखीला स्वत्व हरवलेला प्रोलेटॅरिएट / गरीब कामगार पुर्ण अनोळखी आहे. प्रोलेटॅरिएट शब्द म्हणजे प्रथमतः प्रथम तिला हा परफ्युम किंवा ब्रेसियरचा नवा ब्रॅन्ड असावा असे वाटते एवढी ती मार्केट फोर्सेसच्या (ब्रॅन्डसच्या) आहारी गेली आहे. पण या विपरीत परिस्थितीतही एकदाच सखीला आणि मग श्रीभगवानांना भान येत पण बदललेल्या काळामुळे या भान येण्याच्याही मर्यादा पुन्हा पुढे येतात.
सखीला समजावताना या विश्वात असे प्रोलेटॅरिएट असतातच अशी किचीत दुर्लक्ष करणारी अगदीच अडचण झाली तर त्याचे मुंडके उडवू इच्छिणारी त्याला मुळासकट संपवू पाहणारी व्यवस्थेची भूमीका आहे, पण विरोधाभासाची जाणीव झाल्यावर, श्रीभगवान दखलतर घेतात.
हा सारा मिजास, मिरवणं आहे. पण मार्केट फोर्सेस नी देऊ केलेली जीन्स सोडून लाकुडतोड्यास त्याचे स्वत्व जपणारी काळासोबत वाहून गेलेली त्याची स्वतःची त्वचा त्यास देण्यास व्यवस्थाशरण श्रीभगवानाकडे हतबल सिद्ध होतात आणि श्रीभगवानने दिलेले कपड्यात (जीन्स मध्ये) लाकूडतोड्यास आपले स्वत्व सापडत नाही म्हणून तो ती जीन्स आपली नाही म्हणून नाकारतो तेव्हा. स्वत्वाचा हट्टलावून धरून आपल्या सुखलोलूपतेच्या वेळेत व्यत्यय आणणार्या लाकूडतोड्यास त्याच्या स्वत्व मागण्याच्या आग्रहामुळे वैतागून संयम सुटून व्यवस्था शेवटी शिव्यांची लाखोली वाहून मोकळी होते नाईलाजाने स्वत्व सोडून नवव्यवस्थेला शक्य असेल ते गरीबांवर लादून मोकळी होते. लाकूड तोड्यासही त्याचे काही वाटत नाही. तीन ब्रॅण्डेड जीन्स दिल्या की लाकुडतोड्याचा विरोधही विरघळून जातो.
तरीही लाकूडतोड्याच्या शरीरातन विरोधाचा उसासा आपसूकपणे बाहेर पडलाच तर व्यवस्था निसर्ग आणि सखीला आपल्या तीक्ष्ण नजरेने दम भरते, लाकूडतोड्याला स्मीत हास्य आणि मिथ्यापण अधिक स्वप्नवत आश्वासने देऊन जिंकून घेते. लाकूडतोड्या व्यवस्थेने देऊ केलेल्या मॉलच्या दिशेने जाताना Thank you. म्हणतो तर व्यवस्था मनाशी Fuck you असे पुटपुटते पण लाकुडतोड्याला त्याचे आता सोयरसुतक उरलेले नाही, तोही थंड होऊन त्याच मार्केटफोर्सेसनी दिलेल्या जीन्सच्या चक्राचा भाग होऊन गेलाय स्वत्व विसरून गेलाय. लेखक We are witnessing the emergence of a new kind of superficiality in the most literal sense या वाक्याकडे निर्देश करतो.
नांगी गळू लागलेले फुलपाखरू लेखात काव्यलेखक म्हणतो
ज्याच्या करता लढायच त्यालाच विवीध आकर्षणात अडकवून मार्केट फोर्सेसनी दुसरीकडे लक्ष वळवल एका अर्थानी संपवला आहे तेव्हा तो काळ मागे पडला त्या चळ्वळी मागे पडल्या आहेत.
नांगी गळू लागलेले फुलपाखरू लेखात या सर्व बदलाची परिणती एक दिवस अधिक हिंसक जगात होईल असे काव्यलेखकास वाटते या बद्दल आजच्या काळात कुणी क्वचितच सहमत होईल. परंतु प्रगत भांडवलशाहीच्या जग संधींच्या दृष्टीने फ्लॅट-सपाट आहे याची लेखक नोंद घेतो, या सपाट जगात एका अर्थाने त्या गरीब कामगारा प्रमाणेच जवळपास प्रत्येक व्यक्ती स्वत्व हरवून बसली आहे. एखाद्या खरेदी करू शकणार्या आणि काम करणार्या रोबोट पलिकडे व्यक्तीच या व्यवस्थेत स्थान नाही या बदललेल्या गंभीर वास्तवाकडे काव्य लेखक यशस्वीपणे निर्देश करतो असे वाटते.
व्यवस्थेच्या तोंडी जे असभ्य शब्द काव्यलेखकाने जाणून बुजून घातले आहेत त्याचा उद्देश स्वत्व हरवलेल्या मशिनीकृत झालेल्या माणसाला पुन्हा एकदा जाग करण्याचा भान देण्याचा आहे हे इथे लक्षात घेतले पाहीजे.
(लेखन चालू, बहुधा मला हा प्रतिसाद पुर्नसंपादीत करावा लागण्याची शक्यता असल्यामुळे प्रतिसाद स्वतंत्र प्रतिसादाच्या रुपाने दिल्यास आभारी असेन.)
नवीन काही देणारी कविता..
संजीव खांडेकरानी कवितेचा विषय,आशय, आणि अवि्षकार असे तिन्ही बाजूनी सातत्याने नवीन प्रयोग केले आहेत, ही कविता त्याचे उत्कृष्ठ उदाहरण.
गंभीर आणि गमतीदार, लाकूडतोड्याच्या रूपककथेवर अनेक नव्या व जून्या कविनी लिहले आहे,ही सर्वोत्तम असे दिलीप चित्रे म्हणाले हेाते, त्याना ती इंग्रजीत करायची होती,पणआजारपणात राहून गेले़ .
आज पुन्हा वाचताना मजा आली.