प्रयोग-परिवार, एक प्रयोगशील चळवळ
संस्कारक्षम वयात, पण आकलनाच्या क्षमता पुरेशा विकसित होण्याआधीच, मिळालेल्या काही मोठ्या विचारांच्या ठेव्याचे पूर्ण मूल्य समजायला बराच काळ जावा लागतो, पण जेव्हा ते समजते तेव्हा आपल्याला माणूस म्हणून घडविण्यात या विचारांचे योगदान किती मोठे होते हेही लक्षात येते. जे.पी. नाईकांनी पाहिलेले मौनी विद्यापीठाचे स्वप्न जरी पूर्ण झाले नाही, तरीही अनेक प्रतिभावान व्यक्ती या स्वप्नाचा भाग असल्यामुळे, याच मौनी विद्यापीठाच्या आवारात अनेक छोट्यामोठ्या विचारशील चळवळी उभ्या राहिल्या. श्रीपाद दाभोळकरांनी उभी केलेली 'प्रयोग-परिवार' ही प्रयोगशील चळवळ इथेच सुरू झाली होती.
लहानपणी दाभोळकर काकांच्या घरच्या बागेत कधी गेलो, तर प्रयोगशाळेत गेल्यासारखे वाटायचे. आम्हांला पूर्वी कधीच न दिसलेल्या गोष्टी तिथे दिसायच्या, मग ते पॅशनफ्रूट नावाचे फळ असो किंवा दीड फूटी झाडाला लगडलेली संत्री असोत. गारगोटीसारख्या ठिकाणी द्राक्षांचा वेलही लावता येतो, किंवा माठात कलिंगड लावता येते हे सारेच आम्हांला अद्भुत प्रयोग वाटत. शेळी पाळणे, ससे पाळणे आणि त्यांच्या विष्ठेपासून खत तयार करणे हे सगळे प्रयोग आपल्या घराच्या आवारात करणारे दाभोळकर काका संशोधकाच्या आमच्या मनातल्या पारंपारिक प्रतिमेला पूर्ण छेद देणारे वाटायचे.
श्रीपाद दाभोळकर | वृंदा दाभोळकर |
विद्यापीठात आणि घरात काकांचे नाव फार आदराने घेतले जायचे, त्यांच्या तासगावातल्या द्राक्षांच्या यशस्वी प्रयोगांबद्दल बोलले जायचे, प्रयोग-परिवाराबद्दल चर्चा व्हायच्या आणि या सगळ्यातून, मूळ गणितज्ञ असलेले काका म्हणजे एक मोठे कृषितज्ज्ञही आहेत हे समजले होते. पण ग्रामीण भागात मी वाढलेली असूनही त्यांच्या कामाचे महत्त्व लक्षात येण्याचा पाचपोच त्या वयात नव्हता.
एकदा शाळेत त्यांचे भाषण झाले होते त्यावेळेस "अजून वीसेक वर्षांनी बहुराष्ट्रीय कंपन्या जगावर राज्य करणार आहेत" असे त्यांनी म्हटल्याचे स्पष्ट आठवतेय, मग घरी गेल्यावर बाबांना प्रश्न की "बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे काय?" बाबांनी मग मला समजेल अशा भाषेत ह्या साबण, टूथपेस्ट वगैरे उत्पादने करणाऱ्या कंपन्या बहुराष्ट्रीय कशा आहेत हे सांगितले होते. या साबणाच्या कंपन्या जगावर कसे राज्य करणार आहेत हे मात्र मला बुचकळ्यात पाडणारे होते. आज विचार केला तर लक्षात येते की त्या वेळी, त्या ठिकाणी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अस्तित्व फक्त याच काही मोजक्या उत्पादनांपुरते मर्यादित होते, पण त्याच काळात भविष्यापुढे असणाऱ्या मोठ्या आव्हानांचे भान गारगोटीसारख्या ग्रामीण भागाला दाभोळकरांसारख्या द्रष्ट्या व्यक्तिमत्वामुळे मिळाले होते. त्यांचे हे वीस वर्षांपूर्वीचे भाकित किती अचूक होते हेही लक्षात येते.
'गच्चीवरची बाग' या विषयावरच्या कार्यशाळेत त्यांनी विचारलेला प्रश्नही आठवतोय, "झाडांना जगायला काय लागते?" त्यावर "माती", "पाणी" या अपेक्षित उत्तरांवर मान डोलावून झाल्यावर कोणीतरी "सूर्यप्रकाश" असे उत्तर दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आलेले समाधानी हसूही आठवतेय. मग त्यानंतर झाडे कशी मातीशिवाय आणि पाण्याशिवायही खूप काळ जगू शकतात, पण प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया हीच कशी झाडांच्या जगण्यासाठी आणि वाढीसाठी कारणीभूत असते हे सांगताना ते आपल्या बागेतल्या झाडांचे दाखले देत. मग कोणालातरी बाहेर धाडून पालापाचोळा गोळा करायला धाडायचे, त्याच पालापाचोळ्याचे विघटन होऊन मग त्यातून सेंद्रिय खत कसे तयार होते ते सांगायचे. या कार्यशाळेनंतर जीवशास्त्र या कंटाळवाण्या वाटणाऱ्या विषयात आपल्याला किती रस आहे हे अचानक लक्षात आले होते.
बांधीव शिक्षणपद्धतीबद्दल दाभोळकर साशंक असत आणि अशा शिक्षणपद्धतीने आपण चौकटीबाहेरचे विचार करण्यास आणि स्वप्रयत्नांनी शिकण्यास अपात्र होत जातो असे त्यांना वाटे. वैज्ञानिकतेभोवतालचे गूढ वलय दूर करून एकमेकांबरोबर वाटलेल्या सहजसाध्य ज्ञानाच्या वाटपाने होत गेलेले शिक्षण हीच प्रयोग-परिवारामागची प्रेरणा होती. कोणीतरी आपल्याला नीरस, ठरीव, साचेबद्ध माहिती देण्यापेक्षा स्वतःच प्रयोगशील होऊन आपली निरीक्षणे इतर प्रयोगशील सभासदांबरोबर वाटून आपल्या माहितीचे, निरीक्षणांवर आधारित स्रोत विस्तृत करण्यावर त्यांचा भर होता. वैज्ञानिक संशोधन ही काही उच्चशिक्षितांची मक्तेदारी नाही, ती काही फक्त प्रयोगशाळांतच करण्याची गोष्ट नाही, अशिक्षित शेतकरीही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करून आपल्या निरीक्षणांच्या आधारावर ठोस संशोधन करू शकतात, आणि त्यांची शेती हीच त्यांची प्रयोगशाळा होऊ शकते हे त्यांनी पुराव्यासह सिद्ध केले होते. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळाआधीच प्रयोग-परिवाराच्या रूपाने प्रयोगशील शेतकऱ्यांचे परस्परसंपर्काचे जाळे निर्माण करून त्याद्वारे त्यांनी अनेक यशस्वी प्रकल्पांची सुरुवात केली. तासगावासारख्या दुष्काळी भागातली यशस्वी द्राक्षशेती असो अथवा बोरांची शेती असो, सौरशेतीद्वारे अधिकाधिक उत्पादन करून पर्यावरणाची पूरक असलेली आणि तरीही शेतकऱ्याच्या समृद्ध करू शकेल अशी प्रयोगशील शेती हेच त्याचे उद्दिष्ट होते.
तसे पाहिले तर औद्योगिक क्रांतीचे मूळ उद्दिष्टही, तंत्रज्ञानाद्वारे स्वतःचा आणि स्वतःच्या समाजाचा विकास हेच होते, पण त्या विकासाच्या कल्पना पूर्णतः खनिजसंपत्तीच्या वापराशी आणि त्याद्वारे दरडोई आर्थिक उत्पादन वाढीशी संलग्न होत्या. हे खनिज संपत्तीचे साठे मर्यादित आहेत आणि औद्योगिक प्रगतीत, वस्तूंचे उत्पादन, नियमन, व्यवस्थापन, वितरण या सर्व टप्प्यांवर मोठ्या प्रमाणावर ऊर्जा वापरली जाते असते हे लक्षात घेतले, तर जो समाज कमीतकमी ऊर्जेत अधिकाधिक संपन्नता मिळवू शकत असेल तो सर्वाधिक समृद्ध समजला जायला हवा असे त्यांचे मत होते. अशी प्रगती मोजायची असेल तर त्यासाठी दरडोई मिळकत हे बरोबर मोजमाप होणार नाही; तर ठरावीक क्षेत्रफळामागे सौरऊर्जेचे सर्वाधिक प्रमाणात स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतलेले रूपांतरण असे त्याचे मोजमाप हवे असे ते म्हणतात. शिवाय या सौरऊर्जेला इंधन म्हणून वापरण्यासाठी खनिज ऊर्जा वापरण्याची गरज नाही; तर निसर्गातच असणाऱ्या आणि निसर्गाचाच भाग असलेल्या वनस्पतींच्या प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेचा स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतलेला उपयोग करून सौरशेती करता येते.
त्यांच्या 'विपुला च सृष्टी' (प्लेंटी फॉर ऑल) या पुस्तकात ते सौरशेतीची संकल्पना हिरिरीने मांडतात. त्यांची समीकरणे, जमिनीच्या चौरस फूट क्षेत्रफळावर पडणारा सूर्यप्रकाश, ठरावीक पाणी, जमिनीतले नत्र आणि त्याच्या आधारे निघू शकणारे एखाद्या वनस्पतीचे सर्वाधिक उत्पादन अशी असतात. दाभोळकर हे मूळचे गणितज्ञ, त्यामुळे शेतीकडे पहायचा त्यांचा दृष्टीकोनही गणितीच होता. सर्वात महाग घटक काटेकोरपणे वापरणे आणि सर्वात स्वस्त घटकाचे अधिकाधिक संश्लेषण करणे हे उत्पादन वाढविण्याचे आणि समृद्धी वाढविण्याचे तत्त्व होते आणि एखाद्या वनस्पतीसाठी हे सर्वाधिक उत्पन्न काय असेल याची समीकरणे त्यांनी त्यांच्या पुस्तकांत मांडली आहेत. त्यांच्या मते बाष्पीभवनाच्या मार्गे गोडे पाणी तयार होण्यासाठी प्रचंड सूर्यऊर्जा वापरली जात असल्यामुळे गोडे पाणी हा एक महाग घटक आहे आणि त्यामुळे तो सांभाळून वापरावा लागतो. त्यासाठी संशोधनाद्वारे, सर्वाधिक उत्पन्नासाठी लागणारे कमीतकमी पाण्याचे प्रमाण ठरवावे लागेल.
वनस्पतींच्या पोषणासाठी लागणारा तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे नत्र. हरितक्रांतीमधे या घटकाला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आणि त्यासाठी रासायनिक खतांची मदत घेतली गेली पण रासायनिक खते वापरण्यात असलेल्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले. एक म्हणजे रासायनिक खतांच्या उत्पादनात महाग खनिज ऊर्जा वापरल्याने ती महाग असतात. दुसरे म्हणजे खनिज ऊर्जेचे साठे मर्यादित असल्याने जसजसे हे साठे दुर्मिळ बनत जातील तसतशी त्यावर आधारित शेती महाग बनत जाईल. तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे रासायनिक खतांच्या उत्पादनात, वितरणात आणि वापरात तयार होणाऱ्या आणि उर्वरित, निसर्गात सोडल्या जाणाऱ्या, घातक घटकांमुळे निसर्गाच्या चक्रातील परस्परसंबंधांच्या सूक्ष्म साखळ्या विस्कळीत होतात. याचे दूरगामी परिणाम अनिष्ट आणि महाग असतात; शिवाय रासायनिक खते वापरून केलेल्या शेतीसाठी जे अतिरिक्त पाणी लागते, तो मुळातच महाग घटक आहे. त्यामुळेच दाभोळकर नत्रासाठी सेंद्रिय खतांचाच वापर सुचवतात, पण हे सेंद्रिय घटक कोणते असावेत, कोणत्या वनस्पतींसाठी कोणते सेंद्रिय घटक अधिक उपयुक्त ठरतात याचं संशोधन करणं गरजेचं ठरतं.
दाभोळकर मॉडेलच्या शेतीमध्ये, शेतीसाठी लागणारे स्रोत आणि उपलब्ध स्रोत यांचं काटेकोर गणित असतं. ते हाडाचे शास्त्रज्ञ होते, त्यामुळे निसर्गाकडून आणि अनुभवाने निरीक्षणे करून शिकण्यावर जरी त्यांचा भर असला, तरी ते पूर्णतः निसर्गावर सर्व काही सोडून देण्याच्या 'ठेविले अनंते' प्रकारच्या 'नैसर्गिक शेती'चे समर्थक नव्हते. निसर्गाच्याच तत्त्वांचा उपयोग करून, पण आपल्या बुद्धिमत्तेचा आणि शास्त्रीय दृष्टिकोनाचा वापर करून, परंपरेपेक्षा वेगळे यशस्वी प्रयोग करून सामाजिक समृद्धीसाठी झटणारी व्यक्ती, खनिज स्रोतांवर आधारित औद्योगीकरणाची समर्थक नसली, तरी पूर्णतः वैज्ञानिकच असते याचे ते उत्तम उदाहरण होते. अर्थात दुष्काळी भागात त्यांच्या दाभोळकर मॉडेलवर आधारित शेती करून संपन्न झालेल्या शेतकऱ्यांकडून त्यांचे देव्हारे माजवले जाण्याचा धोका त्यांच्या आधीच लक्षात आला होता, त्यामुळेच त्यांनी नेहमी प्रयोग आणि ते करण्यात सहभागी झालेले शेतकरी यांना चळवळीच्या केंद्रस्थानी ठेवून विभूतिपूजा होऊ दिली नाही, आणि त्यांचे पाय धरायला येऊ पाहणाऱ्यांना जागीच थांबवले.
असे असले तरी त्यांच्या संशोधनासाठी त्यांना मानसन्मान, श्रेय आणि हजारोंनी अनुयायीही मिळाले. जमनालाल बजाज या प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी असलेल्या दाभोळकरांना 'द्राक्षमहर्षी' म्हणून ओळखले जायचे. वयाच्या पंचाहत्तरीतही त्याचे प्रयोग आणि त्याचा प्रसार हे काम अविरत चालू होते, पण अशाच एका दौऱ्यादरम्यान मलेरिया झाला आणि त्यातच दाभोळकर सर गेले.
त्यांची शेवटची भेट त्यांच्या जाण्याआधी काही वर्षे त्यांना माझ्या लग्नाचे आमंत्रण द्यायला गेले होते तेव्हा झाली होती. त्यांच्या गच्चीवरच्या बागेतली लव्हेंडरची एक फांदी मला देत ते मिश्कीलपणे म्हणाले होते "खरंतर तुला आता लव्हेंडर कशाला द्यायचे... आताशाच तर तुझे लव्ह लाईफ सुरू झालेय." मी तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा लव्हेंडर पाहिले होते तेदेखील कोल्हापुरातच्या त्यांच्या बागेत! पुढे मला बागकामाचा छंद जडल्यावर अनेकदा बागेतल्या यशापयशांची चर्चा करत असताना त्यांची हटकून आठवण व्हायची. अगदी परवापरवा एका मोठ्या हिमवादळानंतरही आलेले मेथीचे मस्त पीक घेत 'झाडांना फक्त सूर्यप्रकाश लागतो' असे मनाशी म्हणताना त्यांची आठवण झाली होती. ते आता असते तर त्यांना अनेक प्रश्न विचारायचे होते. जनुकांतरित बियाणांबद्दल त्यांना काय म्हणायचे होते? बदलत्या हवामानाच्या शेतीवरच्या परिणामांबद्दल ते काय विचार करत असत? रासायनिक खतांशिवाय सौरशेती करून मिळालेली सर्वाधिक अन्ननिर्मिती किती लोकसंख्या पोसू शकेल? निसर्गाच्या गुंतागुंतीच्या पररस्परसंबंधांत असलेले इतर जीवजंतूंचे स्थान दुर्लक्षित करून दूरगामी फायद्याची शेती करता येईल का? पृथ्वीवर उपलब्ध जमिनीपैकी जास्तीत जास्त किती जमीन, पर्यावरणाचा समतोल साधून शेतीसाठी वापरता येईल? 'विपुला च सृष्टी' आहे हे खरेच, पण कोणासाठी आणि किती जणांसाठी? अनेक प्रश्न होते ज्याची उत्तरे आता त्यांच्या पुस्तकांत कुठेकुठे मिळतात ते शोधायचे.
सोशल मीडियाच्या आणि इंटरनेटच्या प्रसाराआधीच त्यांनी उभारलेले प्रयोग-परिवार हे प्रयोगशील चळवळीचे जाळे आता चांगलेच प्रस्थापित आणि विस्तृत झाले आहे. बदलत्या काळाबरोबर आलेल्या हवामानाच्या आणि अर्थकरणाच्या नव्या आव्हानांना पेलण्याची ताकद आता या चळवळीत येवो हीच सदिच्छा.
ऋणनिर्देश: श्रीमती वृंदा दाभोळकर
लेख आणि लेखाचा विषय दोन्ही
लेख आणि लेखाचा विषय दोन्ही आवडले.
होय, मस्त आहे लेख. पण झाडांचे
होय, मस्त आहे लेख. पण झाडांचे अजून फोटो हवे होते बॉ.
लेखाचा विषय आजच्या काळासाठी महत्वाचा आहे
आजही लोकांना वैज्ञानिक संशोधन हे फक्त प्रयोगशाळेत बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून पैसे घेऊनच करायची गोष्ट आहे असे वाटते आणि तसे केल्यास त्या संशोधनाला त्या कंपनीचा नफा हेच एक उद्दिष्ट राहते. दुसरे असे की, सेंद्रिय शेती, सामाजिक सेवा वगैरे म्हंटले की हा माणूस 'पॉट स्मोकिंग हिप्पी' किंवा 'अवैज्ञानिक दैववादी' किंवा 'विकासाच्या विरोधात असलेला' अशी लेबले लावली जातात. श्रीपाद दाभोळकर ही सगळी लेबले खोटी ठरवतात.
लेख
लेख अतिशय आवडला. सविस्तर प्रतिक्रिया लवकरच देतो. सध्या पोचपावती.
लेख अतिशय आवडला, धन्यवाद. हा
लेख अतिशय आवडला, धन्यवाद.
हा लेख आमच्या तीर्थरूपांना, झालंच तर आतिश व अविनाश दाभोळकर यांनाही दाखवतो.
धन्यवाद
ओळख आवडली.
विशेष करुन हा परिच्छेद -
फारच सुरेख ओळख. अनेक गोष्टी
फारच सुरेख ओळख. अनेक गोष्टी माहित नव्हत्या. धन्यवाद!
हल्ली अगदीच अनुल्लेख करण्याइतक्केस्से (दोन कुंड्यांपुरते) बागकाम का होईना असे काही बाल्कनीत करतोय तेच मुळी रुची यांच्यासारख्या बागकामप्रेमी ऐसीकरांमुळे. त्या तसेच इथे अनेकदा झालेल्या जनुकीय बदलांवरील चर्चेच्या पार्श्वभूमीवर वाचल्याने हा लेख अगदी थेट खोलवर पोचला!
छान ओळख.
छान ओळख.
उत्तम
लेख अतिशय आवडला. (जे.पी.नाईक यांच्याबद्दल 'आहे मनोहर तरी'व्यतिरिक्त अलीकडे फारसं कुठे वाचायला मिळालं नव्हतं; त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक लहानमोठ्या चळवणी अजूनही कार्यरत आहेत, हे वाचून बरं वाटलं.)
संस्कारांच्या ठेव्याचे 'बीज'महत्त्व सांगणारं पहिलं वाक्यही मनापासून पटलं.
त्या पार्श्वभूमीवर
देवदासी निर्मूलनाची एक महत्वाची चळवळ प्रा. वास्करांच्या नेतृत्वाखाली गारगोटीत अनेक वर्षे कार्यरत होती. या चळवळीशी जवळून संबंध असलेले साहित्य अकादमी विजेते प्रा. राजन गवस हे गारगोटीच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयात मराठी विभागाचे प्रमुख आहेत. माझा गारगोटीशी गेल्या सात-आठ वर्षात फारसा संबंध राहिला नाहीय पण एकंदरीत मला परिचित असलेल्या सामाजिक चळवळी अजून कार्यरत आहेत की नाही याबद्दल मी साशंक आहे. मध्यमवर्गाचा आर्थिक विकास, नागरीकरण, औद्योगीकरण या गोष्टींपुढे सामाजिक समता वगैरे मूल्यांनी मार खाल्ला आहे हे वास्तव मान्य करायला हवे.
कार्यपरिचयाबद्दल आभार
दाभोळ्करांच्या कार्यपरिचयाबद्दल आभार. ".............निसर्गाकडून आणि अनुभवाने निरीक्षणे करून शिकण्यावर जरी त्यांचा भर असला, तरी ते पूर्णतः निसर्गावर सर्व काही सोडून देण्याच्या 'ठेविले अनंते' प्रकारच्या 'नैसर्गिक शेती'चे समर्थक नव्हते. निसर्गाच्याच तत्त्वांचा उपयोग करून, पण आपल्या बुद्धिमत्तेचा आणि शास्त्रीय दृष्टिकोनाचा वापर करून, परंपरेपेक्षा वेगळे यशस्वी प्रयोग करून सामाजिक समृद्धीसाठी झटणारी व्यक्ती, खनिज स्रोतांवर आधारित औद्योगीकरणाची समर्थक नसली, तरी पूर्णतः वैज्ञानिकच असते............" याच्याशी अगदि सहमत.
"दाभोळकर मॉडेलच्या शेती"चा उल्लेख आहे वर. त्यासंबंधी अजून माहिती कुठे मिळेल? "Plenty for All" बुकगंगावर आहे. त्यात या संबंधी डीटेल्स आहेत का?
हे पटतंयहि आणि नाहिहि. प्रयोगशीलता हवीच पण ठरीव, साचेबध्द माहितीचं मोलही खूप आहे.
धन्यवाद.
'प्लेंटी फॉर ऑल' हे पुस्तक बर्यपैकी संकल्पनात्मक लिखाण आहे जे वाचायला चांगले आहे पण पुस्तक बरेच पसरट आहे आणि एकाचवेळी अनेक संकल्पना मांडल्या गेल्या आहेत. या पुस्तकातून त्यांची वैचारिक पार्श्वभूमी, त्यांच्याबद्दलची वैयक्तिक माहिती, त्यांचे प्रयोग याबद्दल बरेच कळते पण 'दाभोळकर मॉडेल' असे काही समीकरण मिळत नाही. त्यांची इतर मराठीतली पुस्तके (पुस्तिका म्हणणे अधिक बरोबर) जसे गच्चीवरची शेती, आधुनिक द्राक्षलागवड वगैरे त्या त्या विषयांशी संबंधित आहेत.
त्यांचे बरेचसे काम हे शेतकर्यांशी प्रत्यक्ष भेटी-गाठी, एकमेकांचे अनुभव वाटणे, मार्गदर्शन करणे याच्याशी संबंधित होते. उदाहरणार्थ त्यांनी गव्हावर केलेल्या एका प्रयोगाबद्दल मला माहिती आहे. त्यात त्यांनी बियाणांना मातीत कालवून त्याचे पॅलेट करून शेतात ठराविक अंतरावर लावत असत. थोडी माती, त्यात शेणखत, बियाणे एकत्र करून ते गोमूत्रात भिजवायचे, बरोबर इतर काही (जसे मोहरी, मेथी, हरबरे) बियाणेही मिसळायचे. जमीनीत गांडूळ खत घालून मग त्यावर हे गोळे ठेवायचे आणि नंतर फूट आल्यावर नको असलेले मेथी, हरबरे वगैरेची रोपे उपटून टाकायची. अशा प्रकारचे प्रयोग ते शेतकर्यांबरोबर करायचे आणि या पद्धतीमागे शास्त्रीय दृष्टीकोन असायचा.
>>दुष्काळी भागात त्यांच्या
>>दुष्काळी भागात त्यांच्या दाभोळकर मॉडेलवर आधारित शेती करून संपन्न झालेल्या शेतकऱ्यांकडून त्यांचे देव्हारे माजवले जाण्याचा धोका त्यांच्या आधीच लक्षात आला होता, त्यामुळेच त्यांनी नेहमी प्रयोग आणि ते करण्यात सहभागी झालेले शेतकरी यांना चळवळीच्या केंद्रस्थानी ठेवून विभूतिपूजा होऊ दिली नाही
दुष्काळी भागात बरीच वर्षे द्राक्ष घेतो, पण दाभोलकरांचे तासगाव मध्ये फेमस प्रयोग झालेले आत्ताच वाचले. हा त्या न माजलेल्या देव्हारयाचा एक साईड महिमा असेल का? गेल्या पाचेक वर्षात प्रचंड प्रमाणात पसरलेल्या तथाकथित श्री क्षेत्र आदमापूर येथे दुष्काळी भागातले आम्ही लोक वार्षिक वारया करतो. त्या मंदिराच्या मेंढ्या शेतात बसाव्यात म्हणून महीनोन महीने वाट पाहून पैशांचे चढे देणगीरूम लिलाव् ही करतो, पण तिथून जवळच असलेल्या गारगोटीबद्दल काहीच माहिती नसते. ना प्रयोग परिवाराचे नावही ऐकिवात नसते.ते पोटापाण्याशी निगडित असूनही.
तासगावापासून आम्ही फार अंतरावर नाही.
प्रयोगपरिवाराची साईटही उघडत नाहीय आता.
दुष्काळी भागात बरीच वर्षे
दाभोळकर प्रयोग परिवाराचे तासगावातले द्राक्ष प्रयोग साठीच्या दशकातले होते त्यामुळे अलिकडच्या काळात त्याबद्द्ल माहिती नसणे हे स्वाभाविकच म्हणायला हवे. अलिकडेच हा एक लेख वाचण्यात आला, त्यात थोडी माहिती आहे.
थोडे स्पष्टीकरण; दाभोळकर सर गारगोटीत रहात असताना त्यांनी प्रयोग परिवाराची स्थापना केली होती आणि प्रयोग परिवाराचा गारगोटीशी संबंध केवळ इतकाच आहे. त्याचे सदस्य महाराष्ट्राच्या अनेक भागांत पसरलेले आहेत. प्रयोग परिवार ही इंटरनेटच्या उगमाआधी तयार झालेले एक 'माहिती-संपर्क-जाळे' होते त्यामुळे आता इंटरनेटच्या युगात प्रयोग परिवारही अपेक्षितपणे फेसबुकावर कार्यरत आहे. 'दाभोळकर प्रयोग परिवार' या फेसबुक ग्रुपचे तीन-चार हजार सदस्य असावेत. एकमेकांच्या शेतीविषयक समस्या, माहिती, सल्ले वगैरेसाठी (विशेषतः द्राक्षशेतीसाठी) सदस्य हा ग्रुप वापरतात. मी सदस्य आहे आणि मला दर दिवशी पाच-सहा पोस्ट्स तरी दिसतात, त्याचा मला वैयक्तिक काहीच फायदा नसला तरी दाभोळकरांना अपेक्षित असलेले प्रयोगशील शेतकर्यांचे जाळे पाहून बरे वाटते.
प्रतिक्रिया
प्रतिक्रियांसाठी सर्वांचे आभार. सध्या काही कारणाने खूप गडबडीत आहे म्हणून इतकेच पण सर्वांना सविस्तर उत्तरे एक नोव्हेंबरनंतर देईन.