'वांझोटी?' (एक मूळकथा) - भाग १

शेवटचे वाक्य वगळता हा भाग इथे प्रकाशित झाला आहे. यापुढील भाग जे जपमाळकथेहून वेगळे आहेत ते क्रमशः प्रकाशित होतील.

'ही संध्याकाळ लवकरात लवकर संपू दे' अशी मनाशी प्रार्थना करत लूकसने दरवाज्याला हात घातला. अगदी त्या क्षणीदेखिल, असेच उलट पावली परत फिरावे, फडताळातली पोर्ट उघडावी, कालचा बीफ बोविनियॉ गरम करावा आणि हाती घेतलेल्या पुस्तकाच्या पुढच्या प्रकरणाला हात घालावा अशी सुरसुरी त्याला आली होती पण नेमके त्याच क्षणी काचेच्या दरवाज्याजवळ बसलेल्या लुडाचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि तिने त्याला हात केला. आता इथून मागे फिरणे शक्य नाही असे लक्षात आल्यामुळे, एक मोठा श्वास घेऊन त्याने काचेचे तावदान ढकलले.

आत गेल्यागेल्या त्याचे स्वागत करायला लुडा उठून त्याच्यापाशी आली. काही क्षणांपूर्वी तिला काचेतून पाहिले तेंव्हा ती लुडाच आहे हे ओळखायला त्याला दोन सेकंद लागले होते. दरवर्षी या अशा पार्ट्यांना सगळ्या सहकारी महिला चेहेऱ्यावर एवढी पुटे थापून, तंग कपडे घालून, उंच अणकुचीदार बुटांवर कसरती करत समोर येतात, तेंव्हा त्याला नक्की काय बोलायचे हेच समजत नाही. त्यांच्या इस्त्री केलेल्या केसांवर किंवा अवयव मोकळेपणाने प्रदर्शित करणाऱ्या पेहेरावांवर त्यांना अभिप्राय द्यावा, तर ते त्याला अगदीच लंपटासारखं वाटतं, त्यांच्या मेहनतीची दखल न घ्यावी तर ते त्याला फार तुसडेपणाचं वाटतं. त्यामुळे बहुतेक वेळी, 'तू आज छान दिसतेयस' असे काही पळपुटे शब्द, थेट त्यांच्याकडे बघायचे टाळत तो पुटपुटतो आणि तिथून लवकरात लवकर सटकतो.

या लुडाला फक्त दोनच रूपात पहाण्याची त्याला सवय होती; अतिशय कार्यक्षम असलेली ही ऑफिस मॅनेजर, तिच्या फावल्या वेळात तितक्याच कार्यक्षमतेने मुले जन्माला घालते अशी त्याची समजूत होती. ती नवीन फायलिंग सिस्टीमबद्दल बोलत नसते तेंव्हा तिच्या मुलांबद्दल बोलत असते, त्यामुळे तिच्या आजूबाजूला जो कार्यक्षमतेचा आणि मातृत्वाचा गंध दरवळत असतो तो त्याला घाबरवून टाकतो. एरवी तिने त्याच्यासारख्या सड्या पुरुषाकडे फिरकूनही पाहिले नसते, पण परवा मागदाने गळ घातली म्हणून तो मिकीला घेऊन सिनेमाला गेला होता, तिथे ही त्याला तिच्या मुलाबाळांसमवेत भेटली. मग 'तुझा भाचा का हा? किती गोड आहे, तू त्याला घेऊन आलायस हे किती छान आहे' वगैरे झाल्यावर तिने लूकसची गणती आपल्या मित्रपरिवारात केलेली दिसली. आताही संभाषण कोणत्या दिशेने जाते आहे याचा अंदाज आल्यावर तो कोट काढून ठेवण्याचे निमित्त करून तिथून खुबीने निसटला.

गॅरी पावलोविच डेव्हच्या टेबलावर, त्याच्या शेजारीच बसला आहे याचे त्याला अजिबात आश्चर्य वाटले नाही. डेव्हला प्रभावित करायची एवढी सोपी संधी, महत्वाकांक्षी आणि पाताळयंत्री गॅरी सहजासहजी हुकवेल याची शक्यताच नव्हती. त्यामुळे डेव्हच्या प्रत्येक शब्दावर मान डोलावण्याची, त्याच्या प्रत्येक विनोदाच्या प्रयत्नावर मोठयाने हसण्याची संधी तो मुळीच दवडत नव्हता. समोरच बसलेल्या नॅटलीच्या अतिभव्य वक्षांमधली खोलवर भेगही त्याच्या मार्गात येऊ शकत नव्हती. त्या भेगेवर नजर चिकटली होती ती डेव्हची; त्याने एवढयातच बरीच दारू ढोसली आहे हे सरळच दिसत होते. नॅटलीही त्याचे नेहेमीचेच विनोद पहिल्यांदाच ऐकल्यासारखी खुदूखुदू हसत होती.

लूकसला आत्ताच कंटाळा आला, कोणत्या टेबलावर बसले तर संध्याकाळ लवकर संपल्यासारखी वाटेल याचा विचार करत त्याने आजूबाजूला नजर टाकली. विशीतल्या टग्यांच्या टेबलावर बसायचे तर त्यांची भयंकर भाषा सहन करावी लागेल, शिवाय त्यांच्या आग्रहाखातर रात्री पन्नास पब्जमधे जाऊन सकाळी अशक्य डोकेदुखी घेऊन उठायला लागेल याचे भान आल्याने तो पुढे सरकला. मुलेबाळेवाल्यांचे टेबल त्या दृष्टीने ठीक होते पण पूर्ण संध्याकाळभर त्यांची घरगुती संभाषणे तो झेलू शकेल किंवा नाही याबद्दल त्याला खात्री नव्हती. त्याशेजारच्या टेबलावर एकच जागा शिल्लक होती ती श्रीधरन आणि इमॅन्युएलच्या मधोमध. श्रीधरनचे उच्चार खूप लक्षपूर्वक ऐकले की समजतात हे लूकसला अनुभवाने माहित झाले होते, पण इमॅन्युएलच्या खिंकाळल्यासारख्या आणि बेसुमार हसण्याच्या आवाजातून ही एकाग्रता त्याला साध्य होऊ शकेल का याबद्दल तो साशंक होता.

शेवटचे टेबल बऱ्यापैकी रिकामे होते. त्यावर दोन नवीनच रुजू झालेले लोक होते ज्यांची नावे तो विसरला होता आणि त्याच टेबलावर एमी बसली होती. एमीला रुजू होऊन दोनेक वर्षे होऊन गेली, तरी ती अजून कोणत्याच कंपूत सामील झाली नव्हती. कधी दिसली की गोड हसून हॅलो म्हणण्याचे मार्दव तिच्यात असले तरी त्यापलीकडे जाऊन भलत्या चौकश्या करण्याचा गळेपडूपणा तिने आजवर तरी केला नव्हता. लूकसने निर्णय घेतला आणि तो तिच्या टेबलाकडे मोर्चा वळवतो न वळवतो तेवढ्यात पाशवी पावलोविच त्याच्या मार्गात आडवा आला. बहुदा तो त्याचा ग्लास भरायला चालला असताना त्याला एमी दिसली आणि तिच्याशी चार शब्द बोलायला तो तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसला असावा.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाचते आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

परकी नावं आली की मेंदूत गोंधळ उडतो व ट्रॅक रहात नाही. सॉरी पण माझा पास. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...