'वांझोटी?' (एक मूळकथा) - भाग २

भाग १
लुकसला काय करायचे आहे हे जणू अंतर्ज्ञानाने जाणून, पावलोविच नेहमी त्याच्या मार्गात आडवा येतो असे लुकसला वाटल्यावाचून राहिले नाही. मिटींग्जमधे बसल्यावर नेमका आपल्याला हवा असलेला सँडविचचा तुकडा तो नेहमी कसा उचलतो, गडबडीत प्रिंट काढायला जावे नेमका तेंव्हाच पावलोविच तिथे मोठ्ठा गठ्ठा प्रिंट्स काढत, मशीन कसा अडवून बसलेला असतो किंवा आपल्याला हवी असलेली खुर्ची तो नेहमी आधी कसा पटकावतो ह्याचे लूकसला नेहमी आश्चर्य वाटे. आताही त्याला नाईलाजाने टेबलच्या दुसऱ्या बाजूला एका अनामिक नवोदिताच्या शेजारी जाऊन बसावे लागले. पावलोविच बराच वेळ खूप हलक्या आवाजात एमीशी बोलताना पाहून त्याला आश्चर्य वाटले. आपले बोलणे इतरांना कळू नये म्हणून तो खूप हलक्या आवाजात बोलतो आहे हे लुकसला अर्थातच उमजले पण ते दोघे एकमेकांना एवढे चांगले कसे ओळखतात हे मात्र त्याला रहस्यमय वाटले. पावलोविचची देखणी बायको त्याने पूर्वी पाहिली होती आणि कितीही पाताळयंतत्री असला तरी बायकोच्या पाठीमागे इतर बायकांशी लाळघोटेपणा करणाऱ्यातला तो नाही हे लूकसला माहीत होते; त्यामुळेच तर एमीशी तो इतका वेळ काय बोलतो आहे ह्याचे त्याला फारच कुतूहल वाटले.

सामान्य मनुष्य हा सर्वसाधारणपणे खूप अपेक्षितपणे वागतो लूकसचा ठाम विश्वास होता त्यामुळे कोणीही थोडेसे अनपेक्षित वागले की त्याचे कुतूहल जागे होत असे. आताही पावलोविच एमीशी एवढा गुलूगुलू गप्पा मारतोय याची काय कारणे असावीत याच्या शक्यता तो पडताळून पहात होता; अ)तो एमीला पूर्वीपासून ओळखत असावा, उदाहरणार्थ ती त्याच्या शाळेत होती किंवा तिचा सध्याचा किंवा जुना मित्र त्याच्या ओळखीचा असावा किंवा त्याच्या बायकोशी तिचा काही स्नेह असावा वगैरे वगैरे. ब) ते दोघे एकाच प्रकल्पावर काम करत असावेत, पण लूकसला तरी ह्याची अजून काही माहिती नसावी क) ती त्याची दूरची अथवा निकटची नातलग असावी, जुनी शेजारी असावी किंवा पूर्वीच्या ऑफिसमधली सहकारी असावी....आता त्याला थोडी मजा यायला लागली. एमी आणि पावलोविच काय बोलत आहेत ह्याचा रहस्यभेद करायच्या प्रयत्नात ही कंटाळवाणी संध्याकाळ मनोरंजक बनायची शक्यता होती.

त्याला जाणवले की पावलोविच बोलायला लागल्यापासून एमी थोडी उदास दिसत होती, ती तसेही फारसे बोलतच नव्हती. पावलोविच बराच हलक्या आवाजात बोलत होता तरी क्लिनिक, इम्प्लांट, आशेचे किरण असे काही शब्द लूकसपर्यंत पोहोचल्यासारखे वाटले. एमीचा उदास चेहरा पाहून त्याला थोडेसे अपराधी वाटले; कोणीतरी आजारी आहे, एमी दुःखी आहे, पावलोविच नको त्या विषयावर उगीच जास्त ताणून तिची संध्याकाळ नासवतो आहे आणि आपल्याला सहानुभूतीपेक्षा कुतूहल जास्त वाटतं आहे ह्याची थोडी टोचणी त्याला लागली. त्यापेक्षा डेव्ह नॅटलीला त्याचा कोणते नेहमीचा विनोद सांगत असावा याची कल्पना करणे जास्त निरुपद्रवी आहे असे वाटून तो मनातल्या मनात तो खेळ खेळायला लागला. नंतर नॅटली एकटी भेटली असती तर तिला त्याबद्दल सहज छेडून, त्याच्या अंदाजाची पडताळणी करणेही शक्य होते पण त्यामुळेच तो खेळ तेवढा मनोरंजक वाटेना.

लुडा डेव्हपाशी येऊन त्याच्या कानात काहीतरी कुजबुजली आणि डेव्ह आपला टाय थोडा ठीकठाक करत उठला. डोळ्याला चष्मा लावून त्याने आपल्या कोटच्या खिशातून एक कागद काढला. डेव्हच्या वार्षिक भाषणाची वेळ झाली हे ओळखून सगळे शांत झाले आणि डेव्हने घसा खाकरला. लूकसने एमीकडे पाहिले तर तिने सुटका झाल्यासारखा चेहरा केल्यासारखा वाटला, लूकसने हलकेसे स्मित करून तिला थोडी सहानुभूती दाखविल्यासारखे केले.

डेव्हच्या वार्षिक भाषणांची मोठी मौज असते; त्यात कायकाय उल्लेख करायचे याचे त्याने अगदी आधीपासून व्यवस्थित मुद्दे काढलेले असतात. कंपनीची प्रगती, सर्वांचा सहभाग, नवीन प्रकल्प वगैरे मुद्द्यांबरोबरच कर्मचाऱ्यांपैकी कोणाचे लग्न ठरले किंवा झाले, कोणाला मुले झाली, कोणी मॅरेथॉन वगैरे पळण्याचा पराक्रम केला वगैरे असल्या बातम्या त्याने आधीच लुडाकडून मिळवलेल्या असतात. अर्थात भाषणाची वेळ येईपर्यंत बरीच दारू रिचवली गेली असल्यामुळे हे सारे मुद्दे कोणत्याही वाटेल तशा क्रमाने, संगती न पाळता बोलले जातात आणि त्यामुळे त्याचे हे विस्कळीत भाषण नेहेमीच मनोरंजक ठरते. आताही नवीन मिळालेल्या एका प्रकल्पाबद्दल बोलताबोलता त्याची गाडी अचानक त्याच्या मुलीच्या यावर्षी होणाऱ्या लग्नाकडे वळली आणि मग पुन्हा मुद्द्यावर येतायेता अचानक पावलोविचला लवकरच पहिले मूल होणार असल्याच्या बातमीकडे वळली. नेहमी अशा बातम्या सर्वांना आधीच ठाऊक असल्याने त्याचा भाषणात उल्लेख करण्याचे प्रयोजन काय असा प्रश्न पडतो पण आज मात्र पावलोविचची बातमी बहुतेकांना माहीत नसल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरून समजले. लूकसला वाटले की या कामगिरीनंतर पावलोविचने त्याच्या यावर्षीच्या चेकलिस्टवरच्या सगळ्या मुद्द्यांवर टिक केली असावी कारण त्याच्या चेहेऱ्यावर एरवी न आढळणारे कृतकृत्य भाव स्पष्ट दिसत होते.
क्रमश:

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पुभाप्र...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन