मेथड ऍक्ट - ३

मूळ कथा: Method Act, Splix
स्रोत: शेरलॉक, बीबीसी
०१|०२|०३|०४|०५|०६|०७|०८|०९|१०|११|१२|१३|१४|१५|१६|१७|१८|१९|२०

गोष्ट आणि वास्तव यांच्यातली देवाणघेवाण, त्यांतल्या गंमती, गुंते, गोची रंगवणारी ही महत्त्वाकांक्षी गोष्ट मला अतिशय आवडते. भाषांतरातल्या चांगल्या गोष्टींचं श्रेय मूळ लेखकाचं, चुकांच अपश्रेय माझं. दरेक प्रकरणाचं भाषांतर करायला निदान महिनाभर लागेल, याची कबुली आधीच देऊन ठेवते.
***

फ्रिक आणि फ्रॅन्क या दोन वेगवेगळ्या व्यक्ती होत्या की एकाच व्यक्तीने घेतलेली दोन वेगवेगळी रूपे होती हे सांगता येणे अवघड आहे. काही जणांच्या मते त्या दोन निरनिराळ्या व्यक्ती होत्या हे निश्चित. एकाच वेळी त्या दोघांना निरनिराळ्या ठिकाणी पाहिल्याचे अनेक जण सांगत. पण त्यांच्या दिसण्यात लोकविलक्षण साम्य होते, हेही खरेच. काही जणांच्या मते हा जाणूनबुजून लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रकार होता. वेष पालटून, केसांचा टोप लावून फ्रॅकचे रूप घेणार्‍या फ्रिकला त्यांनी पाहिलेही होते म्हणे. काय असायचे ते असो. जाणवत राहावे, पण बोट ठेवून सांगता येऊ नये असे काहीतरी विलक्षण साम्य फ्रिक आणि फ्रॅक यांच्यात होते, तसे ढळढळीत फरकही होते इतकेच मी ठामपणे सांगू शकेन.
- ऍन्थनी एव्हरेट, अगेन्स्ट फिक्शनल रिअलिझम

***

मागील भाग

प्रकरण तिसरे

“शरलॉक? शरलॉक. कसं वाटतंय आता, अं?”

नीट जाग येऊनही बेनेडिक्टनं डोळे उघडलेच नाहीत. तर काय, ही काय फालतूगिरी लावलीय? “मार्टिन, मस्करीची काहीतरी लिमिट असते.”

“कोण मार्टिन? ऊठ रे शरलॉक. ऊठ.”

मार्टिनचाच आवाज होता. बेनेडिक्टनं डोळे उघडले, तर समोर मार्टिन. खाकी रंगाचा टीशर्ट आणि जुनाट निळसर जाकीट. मेकप दिसत नव्हता. धुतला असेल बहुतेक. बेनेडिक्ट कसनुसं हसला.

“हसतोस काय गाढवा? बघू, टेंगूळ आलंय का. कसला जोरात आपटलास...” बोलता बोलता मार्टिननं अलगद शरलॉकच्या डोक्यामागे चाचपून पाहिलं.

“नाही, बहु-” बोलता बोलता शरलॉक एकदम शहारल्यासारखा गप्प झाला. “मार्टिन-”

“अरे कोण मार्टिन? डॉक्टरचं नाव मार्टिन होतं का?” वैतागलेल्या सुरात मार्टिन. बोलता बोलता त्यानं पुन्हा शरलॉकचं डोकं चाचपलं. “नाही, टेंगूळ वगैरे नाहीय. ढुंगणावर आपटलास बहुतेक जोरदार. बसला राहतोस का जरा?”

“डॉक्टर? कोण डॉक्टर?” बेनेडिक्ट एकदम गारठल्या सुरात म्हणाला.

“तोच रे तो, फ्रोलेव मेल्याचं जाहीर करणारा डॉक्टर. असं काय करतोयस तू?” मार्टिनची शंका विरली नसावी. त्यानं पुन्हा शरलॉकच्या डोक्यामागे हात घालत त्याला बसतं करायचा प्रयत्न केला. “ऊठ. ऊठ ना! हलू नकोस पण. श्वास बघू दे धड चालतोय ना. नशीब माझं चिकटला नाहीस तिथे. तुला तरी काय एकेक उपद्व्याप च्यायला! कशाला झक मारायला ती वायर सोलून ठेवलीस? हां, घे श्वास…”

मार्टिनच्या आधारानं बेनेडिक्ट अलगद उठून बसला. “हे बघ, मार्टिन, खरंच-”

“शिट, चेहरा पांढराफटक पडलाय तुझा. हललास तर बघ. आलोच किट घेऊन.” बेनेडिक्टच्या नजरेत रोखून बघत मार्टिन.

भास होतायत आपल्याला. किंवा स्वप्न पडलंय. खरं कसं असेल? मार्टिन मला ’शरलॉक’ म्हणतोय! कसलं दळभद्री स्वप्न आहे हे…. तोच त्याचं लक्ष अंगावरच्या काळ्या ऍप्रनकडे गेलं. नि हा घाणेरडा वास… कसला? मान्य आहे, आहे दळभद्री स्वप्न. पण घाबरून चालणार नाही. आता जाग आलीय ना? आता सगळं धड होईल. पण मग आवाज का कापतोय असा? असो. होतं असं.

“नो जोकिंग.” शरलॉक.

“एक्झॅक्टली. नो जोकिंग. मी मिसेस हडसनना सांगतो ते झेंगट ताबडतोब दुरुस्त करून घ्यायला. आलोच.” बेनेडिक्ट पुढे काही बोलायच्या आत मार्टिन उठला.

बेनेडिक्टला राहवेना. कसाबसा दोन्ही हातांवर जोर देत तो उठला. “हे बघ मार्टिन, फालतूगिरी बास. खरंच बास.”

आता मार्टिनचंही डोकं तापलं असावं. “उठू नकोस म्हटलं ना? खाली बस.” त्यानं शरलॉकला बळंच खाली बसवलं.

“तू मला ’शरलॉक’ का म्हणतो आहेस?”

“हलू नकोस म्हटलं ना?” मार्टिन खेकसला. मग स्वत:शीच, “व्होल्टेज तरी किती होतं च्यायला…”

आता मात्र बेनेडिक्ट पुरता भडकला. मार्टिनला हे असले फालतू बकरे करायची हौस होती. आणि ठीक आहे, कर ना. येते मजा कधीकधी. बेनेडिक्टनं किती वेळा त्याचे असले किडे हसण्यावारी नेले होते. पण हे असं? इतका वेळ? काही काळवेळ? काही सुमार? समोरच्या माणसाचा काही विचार कराल की नाही? “बा-स. माझ्या डोक्यात जातंय. समजलं?”

“ओके, ओके. शांत हो.” मार्टिन समोर बसला. त्यानं शरलॉकची हनुवटी उचलत त्याची बुबुळं तपासली. “बघू ना, डोळे उघड की नीट.”

वैतागत बेनेडिक्टनं मार्टिनचा हात झिडकारून टाकला. “सोड रे-”

पण तो बोलता बोलता एकदम थबकला. काहीतरी चुकतंय. का-ही-त-री गंडलंय. छत असं का दिसतंय? सुर्‍या? नि मार्शल आर्ट्सच्या चांदण्या? ….सालं हे काय आहे तरी काय?

आता त्याच्या छातीत धडधडायला लागलं. युनिटमधले लोक? कॅमेरे? सगळं गायब? गेले तरी कुठे सगळे?

“शांत बसशील का जरा? आपण असेच ’एऍन्ण्डई’त जाऊ. एकदा तिथेच धड तपासून आलेलं बरं. आलोच मी. हलू नकोस.” नि मार्टिन उठून चालता झाला. बेनेडिक्ट आ वासून बघतोय… दडादडा पायर्‍या चढल्याचा आवाज.

सेटला पायर्‍या कुठे असतात? सेटला मुळात वरचा मजला तरी कुठे असतो?

भासच होताहेत आपल्याला. दुसरं काय स्पष्टीकरण आहे नाहीतर? पण अंगावर कपडे तरी त्याचे स्वत:चे कुठे होते? कुणाचे कपडे होते देव जाणे. कशात तरी लडबडलेले कपडे… शी! कसला तो भयानक घाणेरडा भपकारा….

बेनेडिक्टनं खसखसून डोळे चोळले. कपाळावर हात फिरवला. ओके. ओके. शांत हो. दीर्घ श्वास घे. अजब आहे खरं सगळं. पण भ्यायचं कारण नाही. भिऊन काहीएक होणार नाही. शांतपणे, एकेक विचार करायला हवा. साला क्रू गेला कुठे मरायला?

कसाबसा, आकडे मोजत, दीर्घ श्वास घेत बेनेडिक्ट उठला. उठताना त्याला एकदम गरगरल्यासारखं झालं, पण टेबलाचा आधार घेत तो उभा राहिला. टेबलावर नेहमीपेक्षा खूपच जास्त पसारा होता. नि तो भयानक वास - मच्छी सुकत घातल्यासारखा घाणेरडा वास.

मग त्यानं परत वर पाहिलं. छतासारखं छत. आवाज. नेहमीचेच. पण असे आवाज कधीही सेटवर ऐकू येत नाहीत.

असं कसं होईल?

भीत भीत तो खिडकीपाशी गेला. पडदा फडफडत होता. पावसाळी हवेचा वास. पडदा थोडा बाजूला सारत त्यानं खाली गल्लीत डोकावून पाहिलं. रस्त्यासारखा रस्ता. पावसाळी ओला डांबरी रस्ता. गाड्यांचे फर्र फर्र आवाज. दिवे. माणसांचे बोलण्याचे नि हसण्याचे आवाज. ठिपक्याठिपक्याच्या एका छत्रीखालून एकमेकांना चिकटून जाणारं एक जोडपं.

सेटच्या बाहेर कधीही न दिसणार्‍या त्या सर्वसाधारण दृश्यानं बेनेडिक्टची पाचावर धारण बसल्यासारखी झाली. घशाशी आलेली किंचाळी कशीबशी दाबत तो उभा राहिला.

“शरलॉक!”

हाकेसरशी दचकून बेनेडिक्टनं वळून पाहिलं, तर मार्टिन. हातात मेडिकल बॅग आणि रोखून बघणारी चिडकी नजर.

“तुला सांगितलं होतं ना उठू नकोस म्हणून? कधीतरी ऐकत जा की. डॉक्टर आहे मी. पदवीइतकी तरी अक्कल असेल ना मला?” बडबडत पुढे येत मार्टिननं त्याची बॅग कॉफीच्या टेबलावर आदळली. पण कमाल म्हणजे त्याच्या हालचालीत मार्टिनचा नेहमीचा खुशालचेंडूपणा नव्हता. अगदी हुबेहूब जॉन वॉटसनचं बेअरिंग घेतल्यासारख्या नेमक्या-चोख-सैनिकी हालचाली. एकही अधिकउणं पाऊल नाही की हातवारे नाहीत.

“हे काय चाललंय?” बेनेडिक्टचा संतापलेला सवाल.

“तुला शॉक बसलाय.”

“ते माहितीय मला. ते नाही विचारत मी. हे - ’हे’ काय चाललंय? क्रू कुठे आहे? नि छत कुठून आलं सेटला? नि खाली गल्ली कुठली दिसते आहे? काय चाललंय काय? तूच काहीतरी फिरक्या घेतो आहेस-” भडकून बेनेडिक्टला पुढे काय बोलावं सुचेना. कसाबसा त्यानं प्रश्न पुरा केला. “खरं बोल, हो की नाही?”

त्यावर हतबुद्ध झाल्यासारखं करून मार्टिननं फक्त एक सुस्कारा सोडला. “हो, तुझ्या फिरक्या घेतो आहे. तेच काम आहे मला. ऍप्रन काढ नि बस तिथे पुन्हा चक्कर यायच्या आत. कशाला मरायला नाही ते धंदे… मरो. बघत बसू नकोस असा वेड्यासारखा. आधीच माझं डोकं फिरलंय. बस.”

“बाकीचे सगळे कुठे आहेत? नि ’तो’ कुठे गेला?”

“काय बरळतो आहेस शरलॉक?” मार्टिनचा संयम संपला असावा.

“मी. मी कुठे गेलो? मी म्हणजे मी ’मी’ नाही. तो दुसरा ’मी’. तो कुठे गेला?”

मार्टिन बावचळून बघत राहिला. “आता मात्र मला खरोखरच भीती वाटतेय शरलॉक.”

“हो रे बाबा. कळलं. कळलं.” बेनेडिक्टचाही आवाज आता तापला होता. “कळला तुझा प्रॅंक. मजा आली. बास? थोर नट आहेस तू. ’बाफ्ता’ जिंकलेला थोर नट. बास? झालं समाधान? आली मला मजा.”

शिट! ’बाफ्ता’बद्दल इतका कडवटपणा वाटतोय आपल्याला अजून? आता काय वाटेल मार्टिनला? असं कसं बोललो आपण? मार्टिन साला जन्मभर ऐकवेल आता, सोडणार नाही. शिट-शिट-शिट!

“आय मीन - मजा आली. पण आता बास. ओके?” कशीबशी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत बेनेडिक्ट.

मार्टिन थक्क होऊन क्षणभर बघत राहिला. मग एकदम भानावर येत खिशातून फोन काढत म्हणाला, “ओके. ओके. मी ऍम्ब्युलन्स बोलावतोय. प्लीज, खाली बस तिथे. अजून आरडाओरडा नको. प्लीज, उपकार कर माझ्यावर.”

“ऍम्ब्युलन्स? वा! आता ऍम्ब्युलन्स बोलावण्याची नाटकं करणार का? वा वा! त्याची कशी व्यवस्था केलीस पण? असले कॉल्स करून ऍम्ब्युलन्स बोलावलीस, तर तुरुंगात जाशील, माहीत आहे ना?” ताळतंत्र सुटल्यासारखा बरळत बेनेडिक्ट परत खिडकीतून खाली डोकावला.

खाली खरी गल्ली- देवा! कसं शक्य आहे हे?

गर्रकन वळत त्यानं मार्टिनकडे पाहिलं.

“हाय. ऍम्ब्युलन्स हवी आहे. होय.”

“गप्प - गप्प बैस!” बेनेडिक्ट किंचाळला. संतापानं तो रडकुंडीला आला होता. त्याची नि मार्टिनची वाट्टेल तसली मस्करी चालत असे. पहिल्या दिवसापासून त्या दोघांचं जे काही गूळपीठ जमलं होतं, त्यामुळे तो तसली मस्करी सहज हसण्यावारी नेई.

पण हे? हा क्रूरपणाचा कळस होता. नि त्यात ते मगाचचे भास. आपलं डोकं खरंच फिरलंय की काय? बेनेडिक्टला आता शंका कुरतडायला लागली.

“बास रे आता. बास. अती होतंय.” कळवळून तो मार्टिनला म्हणाला.

मार्टिननं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. “होय, मी जॉन वॉटसन बोलतोय. इकडे ऍम्ब्युलन्स हवी आहे. नाही, मला काही नाही झालेलं. माझ्या रूममेटला झालंय. २२१ बी, बेकर स्ट्रीट, डब्ल्यू १.शरलॉक - शरलॉक होम्स. तो-”

“ठेव, ठेव आधी फोन साल्या, ठेव म्हणतो ना!” मार्टिनवर झडप घालत बेनेडिक्टनं त्याच्या हातातला फोन हिसकावून घेतला. मार्टिनशी थोडी झटापट झाली, पण बेनेडिक्टनं फोन हिसकलाच. घाईघाईनं त्यानं आधी फोन बंद केला.

“हुह. शिट.”

मार्टिन हताश. त्यानं नाटकीपणे हात अंगाबाहेर उडवत मोठ्ठा सुस्कारा सोडला. “शाबास. वेल डन. आता पोलीसही येतील. तेच एक राहिलं होतं.”

तेवढ्यात बेनेडिक्टचं लक्ष हातातल्या फोनकडे गेलं. तो मार्टिनचा नेहमीचा काळा आयफोन नव्हता. राखाडी रंगाचा नोकिया. टवके उडालेला. नकळत त्यानं फोनची मागची बाजू पाहिली.

Harry Watson
From Clara
XXX

भीतीनं त्याला एकदम गोठल्यासारखं झालं. सावकाश समोरच्या टेबलावर फोन ठेवत तो कसाबसा पुटपुटला, “लू. लूला जायचंय.” मग श्वास रोखून त्यानं जाऊन बाथरूमचं दार ढकललं.

बाथरूमसारखी व्यवस्थित बाथरूम.

अर्थात. दुसरं काय असायला हवं होतं?

आत शिरून दार लावत तो हताश होऊन दारालाच रेलला.

माझं डोकं नक्की फिरलं आहे.

त्यानं समोरच्या धुरकट आरशात पाहिलं. पांढराफटक चेहरा.

पण दुसरं काय होणार? आधी तो इलेक्ट्रिक शॉक. नि वर मार्टिनचे हे वेडझवे चाळे. माणूस पांढरा पडेल नाहीतर दुसरं काय होईल?

तेवढ्यात दारापाशी मार्टिनचा आवाज आला. “त्यांचा फोन येतोय परत. काय सांगू?”

बेनेडिक्टनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आरशातल्या चेहर्‍यावर त्याची नजर खिळली होती.

आपला चेहरा इतका नितळ कसा?

’फ्रॅंकेन्स्टाईन’च्या मेकपमुळे चेहर्‍यावर काही सूक्ष्म चरे आल्याचं त्याला स्पष्ट आठवत होते.

ते चरे काय झाले? नि त्वचा इतकी नितळ? चेहर्‍यावर कसल्याही मेकपच्या खुणा नाहीत, कॉस्मेटिक्स नाहीत...

त्याचे केसही जसेच्या तसे होते.

खरं म्हणजे दिवसभर केसांना लावलेल्या प्रॉडक्टमुळे संध्याकाळी केसांची पार वाट लागलेली असायला हवी. पण केस अगदी मऊ - आत्ताच न्हायल्यासारखे. अंगावर त्या क्लोनसारखेच कपडे. टीशर्ट, पायजमा, ड्रेसिंग गाऊन, वाशेळा प्लास्टिकचा ऍप्रन.

प्रतिविश्व?

कायच्या काय. कसं शक्य आहे?

बेनेडिक्टनं चेहर्‍यावर पाण्याचे सपकारे मारले. तोंड खसखसून धुतलं. पुन्हा तोंडावर पाणी मारायला त्यानं नळाखाली हात धरला नि ओंजळीत पाणी घेतलं. पण तो थबकला.

नळाला खरं खरं पाणी? सेटवरच्या बाथरूममधे?

हे काही डोकं फिरल्याचं लक्षण नव्हे. मेंदू नीट काम करत असल्याचंच लक्षण. नाहीतर इतके तर्कशुद्ध विचार कुठून सुचायला? पण प्रतिविश्व? हे म्हणजे फार झालं. अगदीच अशास्त्रीय काहीतरी वाटतं प्रतिविश्व वगैरे. हंबग. की असेल शक्य? छे! काहीही काय? अशक्य.

त्याच्या ओंजळीतून पाणी गळतच होतं.

इतक्यात त्याला सायरनचा आवाज ऐकू आला.

“शरलॉक. शरलॉक.” पाठोपाठ दार वाजवल्याचे आवाज. “बाहेर ये. ऍम्ब्युलन्स आली.”

पुन्हा सायरन. पण हा ऍम्ब्युलन्सचा नसावा.

“पोलीसही आले वाटतं. झकास.”

हे साले विचित्र प्रकार आपल्याचसोबत बरे होतात दर वेळी? त्या जेरेमी ब्रेटनी नक्की असला वेडझवा प्रकार अनुभवलेला नसणार. सालं आपलं नशीबच गांडू...

बेनेडिक्टला एकदम वेडगळासारखं हसायलाच यायला लागलं. आपल्याच आवाजानं दचकून भानावर येत त्यानं एकदम ओले हात तोंडावर दाबून धरले.

मूर्ख. भानावर ये. हसतोस काय?

आपणच रंगवलेला शरलॉक जिवंत होऊन आपल्याशी काही मिनिटांपूर्वी बोलत होता की काय मग? नि त्याची नि आपली अदलाबदल- शिट. शिट.

पण काम करायला लागलेला त्याचा मेंदू आता थांबायला तयार नव्हता.

म्हणजे खरा शरलॉक कार्डिफमधे असेल? मार्टिन आणि ऍण्ड्र्यू आणि सू आणि मार्क... बेनेडिक्टला त्या विचारानंच गरगरायला लागलं.

“शरलॉक!”

आता जिन्यावर पावलांचे दडादडा आवाज.

नि म्हणजे शरलॉक आता आपल्या-आपल्या घरी जाणार. नि तिथे- परमेश्वरा!

“मी दरवाजा उघडणार आहे आता, शरलॉक.” पाठोपाठ मार्टिननं दाराशी केलेली खुडबुड. तो आत आलाही.

छे, हा मार्टिन कुठला? हा तर जॉन वॉटसन.

जॉन.

आता आपण चक्कर येऊन इथे पडणार असं बेनेडिक्टला वाटायला लागलं. कसाबसा बेसिनचा आधार घेत तो बरळला, “जॉन.”

“शरलॉक, प्लीज बाहेर चल. मला ओढून न्यायला करू नकोस. पोलीसपण आलेत. पॅरामेडिक्सपण. कृपा करून बाहेर चल. तुला पटणार नाही, मला माहीत आहे. पण तू विचित्र वागतो आहेस. नेहमीपेक्षा जास्तच विचित्र. मला टीबीआयची काळजी वाटतेय. प्लीज, बाहेर चल.”

“टीबीआय?” बेनेडिक्टनं बोलता बोलता मान वर करून आरशातल्या मार्टिनच्या - नाही, जॉनच्या. माय गॉड. जॉनच्या प्रतिबिंबाकडे पाहिलं.

“ट्रॉमाटिक ब्रेन इंजुरी. प्लीज. चल.” त्यानं मागे सरकत दरवाजा उघडून धरला. “चल.” आवाजात काकुळती.

बेनेडिक्टनं दचकून वळत त्याच्याकडे निरखून पाहिलं. हापण याचा अभिनय असेल, तर मानला पाहिजे याला. बेअरिंग सुटत नाही साल्याचं. बाफ्ता यालाच मिळायला हवं होतं. “तुला - तुला काळजी वाटतेय?”

“म्हणजे? काळजी नाही वाटणार? शॉक लागून दीडेक मीटर उडालास तू नि बेशुद्ध पडलास. काळजी नाही का वाटणार?”

“किती वेळ बेशुद्ध होतो मी?”

मार्टिननं - अहं, जॉन. मेंदूनं तत्परतेनं पुरवलेली माहिती. - जॉननं हताश होऊन मान हलवली. “मिनिटभर असेल. पण मिनिट म्हणजे कमी नाही अरे.”

तेवढ्यात हिरव्या गणवेशातली एक बाई तिथे आली. “मिस्टर होम्स? बाहेर येता का तुम्ही? चांगलाच शॉक बसलेला दिसतोय तुम्हांला.”

बेनेडिक्ट बाहेर आला. अजून दोन पॅरामेडिक्स आणि एक पोलीस असे त्याच्याकडे संशयानं पाहत उभे होते.

“हॅलो.”

“आम्ही तुम्हांला हॉस्पिटलमध्ये न्यायला आलोय मिस्टर होम्स. काही सामान बरोबर घ्यायचं आहे का तुमचं? डॉ. वॉटसन आणतील.”

यांच्याशी बोलाचाली करण्यात अर्थ नाही. काय तपासायचंय ते तपासून घ्या म्हणावं. आपल्याला वेड लागलंय अशी शंका येण्याहून ते बरं. कुणास ठाऊक, कार्डिफला परतायचा काहीतरी मार्ग मिळेलही. किंवा खरंच आपल्याला अतिथकव्यानंही भास होत असतील एखाद वेळेस.

बेनेडिक्ट अजूनही आशा टिकवून होता.

“नाही, काही नकोय मला.” एवढं म्हणून बेनेडिक्ट सावध पवित्र्यात गेला. वैतागाचे भाव लीलया चेहर्‍यावर आणत त्यानं थेट शरलॉकच्या स्टाईलनं भिवया किंचित उंचावल्या. मग बोलण्यात शरलॉकचा सराईत, सफाईदार वेग आणणं त्याला अजिबात अवघड गेलं नाही. “मला या सगळ्याची काही आवश्यकता दिसत नाहीय. पण तुम्ही नेहमीसारखे तीन-तीन तास न रेंगाळता वेळेवर पोचायची लायकी दाखवलीत हे बघून बरं वाटलं. मला गोळी वगैरे लागलेली असती, तर मी मेलोच असतो म्हणा. पण नशिबानं तसं काही नसल्यामुळे तुमचं कौतुक करायला हरकत नाही. कीप इट अप.”

शेजारी उभ्या असलेल्या जॉनची चुळबुळ त्याला जाणवली. “शरलॉक. शांत बसशील का जरा?” जॉन कुजबुजला. पण तो चिडलेला वा काळजीनं ग्रासलेला दिसत नव्हता. उलट डोळे हसरे आणि जिवणीच्या टोकाशी खेळणारं हसू.

“सॉरी.” बेनेडिक्टनं विचार न करता म्हणून टाकलं. नि येणारं हसू दाबत त्यानं कसाबसा चेहरा कोरा ठेवला. देवा! हे काय चाललंय काय? मी जॉन वॉटसनबरोबर शरलॉकसारखा खिदळतोय. मला खरंच वेड तर लागलं नसेल?

“ऍप्रन काढता का तो?” त्यातल्या एका पॅरामेडिकनं विचारलं. बेनेडिक्टनं मुकाट ऍप्रन सोडला नि तो नीट शिस्तीत खुर्चीच्या पाठीवर ठेवायला म्हणून तो वळला नि एकदम थबकला.

शरलॉक कसा वागेल अशा वेळी?

शरलॉकला डोळ्यासमोर आणत त्यानं माजोरड्यासारखा ऍप्रन जमिनीवर भिरकावून दिला.

“शाबास.” जॉनचा वैताग.

परफेक्ट.

पोलिसालाही हे सगळं असह्य झालं असावं. तोही वैतागलेला दिसत होता. “मला इथे सगळं ठीक दिसतंय. असा कसा तुम्ही ९९९ ला केलेला फोन कट केलात? अशा वेळी परिस्थिती नेमकी काय आहे ते कळत नाही. त्यामुळे मधेच कट केलेल्या कॉलला उत्तर देण्यासाठी आम्हांला यावंच लागतं. तुम्हांला माहीत नाही का हे? आता आमचा हा वेळ फुकट नाही का गेला? याच वेळात आम्ही इतर कुणाच्या मदतीलाही जाऊ शकलो असतो.” उपदेशाची जोरदार फैर झाडून त्यानं बेनेडिक्ट आणि जॉन दोघांनाही खुन्नस दिला.

“होय, झालं खरं तसं.” जॉननं चुपचाप कबुली दिली. “अपघात होता तो. मी नंतर त्यांचा फोन आल्यावर सांगितलं त्यांना तसं.”

“तरी काय झालं? आमचा वेळ गेलाच ना?” आता पोलीस अजूनच चेकाळला.

तेवढ्यात त्या पॅरामेडिक बाईनं घसा खाकरला. त्यामुळे भानावर येत पोलीस चालता झाला.

बेनेडिक्ट जॉनकडे वळून म्हणाला, “तू येतोस ना बरोबर?”

“म्हणजे काय? अर्थात.” जॉनचा चेहरा अगदी मृदू.

ते बघून बेनेडिक्टच्या घशात एकदम काहीतरी टोचल्यासारखं झालं. असले मित्र सगळ्यांना लाभोत.

*

बेनेडिक्टनं केलेल्या एकविसाव्या शतकातल्या शरलॉकच्या भूमिकेचं उगाच कौतुक झालेलं नव्हतं. शरलॉकचं नाव, जन्मगाव, जन्मतारीख, त्याच्या आईवडिलांची नावं, त्याचा एनएचएस नंबर आणि बाकी बरेच बिनमहत्त्वाचे वाटणारे तपशील बेनेडिक्टनं मुखोद्गत केले होते. ते वापरून सराईतपणे फॉर्म्स भरताना बेनेडिक्ट एकाएकी चमकला.

हे सगळे तपशील मला माहीतच नसते, तर हा घोळ झाला असता का?

मग डोळ्यांची तपासणी. सेन्सरी चाचण्या. मेंदूला काही इजा तर झालेली नाही, हे बघायला सीटी स्कॅन. पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही. त्याला तसा काही त्रासही होत नव्हता. साधी डोकेदुखीही नव्हती. त्यामुळे त्याला पडून राहायला सांगून हॉस्पिटलच्या लोकांनीही हळूहळू काढता पाय घेतला. जॉन तेवढा फक्त शेजारी होता.

बेनेडिक्ट मुकाट पडून राहिला.

केवढं काय काय झालं होतं एवढ्यात. सकाळी जाग आली तेव्हा आपण कार्डिफमधे आपल्या घरात होतो. नि आता? आता लंडनमध्ये हॉस्पिटलात. ऍम्ब्युलन्स. च्यायला. ऍम्ब्युलन्सनं आणलं त्यांनी आपल्याला हॉस्पिटलात. वेडसर साले. नि एवढ्या वेळात… तो… शरलॉक होम्स… तिकडे कार्डिफला गेला असेल… परत जाऊन निस्तरायला पाहिजे ते सगळं. कसं? कसं?

विचार करकरून बेनेडिक्टचं डोकं सुन्न झालं.

हे सालं कायच्या काय झालं.

मग त्याला एकदम वेड्यासारखं वाटून गेलं, स्टीफन हॉकिंगना भेटायची संधी मिळाली होती, तेव्हाच त्यांना प्रतिविश्वाबद्दल विचारून घ्यायला पाहिजे होतं. पण तेव्हा आपण येड्यासारखे ’तुम्हांला भेटायची सुवर्णसंधी मिळेलसं वाटलं नव्हतं,’ वगैरे काहीतरी गाढवासारखे बरळत सुटलो… अर्थात हॉकिंगना उत्तरं द्यायला वेळ मिळेल इतका वेळ नव्हताच. पण तरी… काहीतरी अंदाज आला असता. छ्या!

जॉननं बेनेडिक्टचा हात हातात घेतल्यामुळे बेनेडिक्ट एकदम भानावर आला. शॉक लागलेल्या ठिकाणी कितपत लागलंय ते जॉन तपासत होता. मग एकदम म्हणाला, “शरलॉक, खरं खरं सांग.”

बेनेडिक्ट दचकला. पण त्याच्या चेहर्‍याकडे जॉनचं लक्ष नसावं. तो पुढे म्हणाला, “तू मुद्दामहून नाही ना शॉक लावून घेतलास?”

बेनेडिक्टला काही झेपेचना. “अं? काय?”

“तुला आज नाही ओळखत मी. करशीलही तू असलं काहीतरी. येडचॅप आहेस तू. पण तुला शॉक मात्र खराच बसला. पाहिलं मी.”

“नाही रे बाबा!” आता बेनेडिक्ट चिडलाच. मग घाईघाईनं जीभ चावत त्यानं शरलॉकचं बेअरिंग घेतलं आणि हुबेहूब शरलॉकच्या वैतागलेल्या सुरात म्हणाला, “प्लीज जॉन. याहून बरे कामधंदे आहेत मला.”

“बरोबर.” त्या थंडगार, धारदार आवाजानं दचकून बेनेडिक्टनं खाटकन दाराकडे पाहिलं. कुणीतरी पडदा बाजूला सारून आत येत होतं. “याहून बरे कामधंदे आहेत तुला. उदाहरणार्थ माझा फोन घेणं.”

जॉननं नकळत बेनेडिक्टचा हात दाबला, मग सोडून दिला.

“हॅलो, मायक्रॉफ्ट.”

क्रमश:

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

मस्त जमलाय हा भागही!
पुढचे लवकर टाका ताई!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्यान फिक्शन म्हणजे ना .....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

छान जमलयं ! पण नेहमीचचं तुणतुणं वाजवतो आता.
एक एक भाग लिहायला क्वार्टर घेणार का आता ? Smile
दुसरा भाग डिसेंबरात तर तिसरा मार्चमधे ? संपादकांना सांगून कारणे दाखवा नोटीस देवू काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह! पुढिल भागाची वाट बघावीच लागेल.

==
थोडा छिद्रान्वेशः
किडा शब्द खटकला. मात्र दुसरा पटकन सुचेना.
--
वैयक्तिक कुरकूरः मला मुळ शेरलॉक जुन्या नोकीयाच्या काळातील (जिथे स्कॅनिंग वगैरे आहे) इमॅजिन करायला प्रचंड जड जातेय. खरा शेरलॉक हॉम्स हा काळा चकती फिरवत बोलण्याचा लँडलाइन फोन असलेलाच हवा असे वाटत राहते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इतक्या दिवसानंतर नवीन भाग!!! आता आधीचं पुन्हा वाचावं लागणार आहे मला.. कही असो, हाही भाग मस्तच. फक्त मध्ये इतकी मोठी गॅप नको बै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

मधल्या काळात संपादकांची भारतफेरी असल्यामुळेच हा उशीर झालेला आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि मग काय त्या नोटिशीफिटिशी पाठवाव्यात. Wink

माझं निरीक्षण असं की, करून ठेवलेलं भाषांतर प्रकाशित न करता काही काळानं पुन्हा पाहिलं की त्यात बदल केले जातात आणि ते दर्जाला पूरक असतात. पण दुर्दैवानं एकदा भाषांतर करून झाल्यावर ते मुरत ठेवण्याइतका धीर धरवतोच असं नाही. त्यामुळे या भाषांतरांत मी नंतरही काही बदल करणार आहे, हे नोंदून ठेवते. बदल वेगळ्या रंगाच्या शाईत करीन.

@ऋ
तू बीबीसीचं 'शरलॉक' पाहिलं नाहीयेस का? मूळ शरलॉक माझ्या डोळ्यासमोर त्यातलाच येतो. बग्ग्या आणि पाईप आणि व्हिक्टोरियन लंडनमधला नाही, तर मोबाईल आणि इंटरनेट आणि टॅक्सी वापरणारा. आणि जर तू 'शरलॉक' अजून पाहिलं नसशील, तर - गॉड हेल्प यू नाउ. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अरे मला सांगा,'शेरलॉक'चा 'शरलॉक' होणं ही उच्चाराची फॅशन आहे का?

- (श/शेरलॉक अनभिज्ञ) प्रथमेश

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही, एका जाणकारांनी उद्मेखून सुधारलेली माझ्या उच्चारातली चूक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ताज्या शेरलॉकमध्ये (बेनेडिक्टवाल्या) चांगले स्मार्ट फोन्स आहेत.

नोकियाचे जुने डब्बे असलेली सिरीज नै पाहिलीये

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यातला जॉन टेक्नोमंद आहे. शिवाय फार श्रीमंतही नव्हे. त्याचा फोन त्याच्या बहिणीकडून आलेला सेकंडहॅण्ड आहे. आता कंपनी कुठली आहे ते आठवत नाही. जाऊन बघते. पण त्याचा फोन जुनाट असेल, हे अगदी योग्यच वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नोकीया कर्रेक्टे पण जुना वगैरे नै, चांगला स्मार्ट फोने

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

केला बदल. 'जुनाट'चे दोन अर्थ होऊ शकतात. वापरून जुनाट झालेला आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भात जुना. मी पहिल्या अर्थानं वापरला होता. पण गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे तो शब्द उडवला आहे. 'टवके उडालेला'वरून अर्थबोध होतो आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मध्येच अद्ययावत दिसतंय पण बदल कोणते ते कळत नाहीये. वेगळी शाई वापरणार होतात ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आदरार्थी बहुवचन? :O

खूप बारीकसारीक बदल होते. वेगळी शाई वापरायचा वैताग आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सारे भाग झाल्यावर पुन्हा एकदा सारे भाग वाचायला मजा येईल असे वाटते.
---------------------
ऋ आणि मेघना, तुम्ही भारतातच असता. ही शेरलॉक कोणत्या चॅनेलवर कोणत्या वेळी येते? यायचे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मध्यंतरी भारतातल्या AXN वर तिसरा सिझन विकांताला दाखवत होते.
बीबीसी शेरलॉक चा एका वर्षाआड एकच सिझन येतो आणि एका सिझन मधे ३ एपिसोड असतात (एक एपिसोड साधारण सव्वा ते दीड तासाचा असतो). पहिले तीन सिझन तर प्रदर्शित झालेत (२०१०, २०१२ आणि २०१४ अनुक्रमे) अता पुढचा सिझन २०१६ मधे प्रदर्शित होईल (तो पर्यंत मधे एक स्पेशल एपिसोड दाखवतील ह्या वर्षीच्या डिसेंबरात). त्यामुळे शेरलॉक टीव्ही चैनल वर पहायचं असेल तर २०१६ मधे पहावयास मिळेल, अर्थात ते ही आधी बीबीसी वर प्रसारित होईल आणि मग पुनःप्रसरणाचं वितरण इतर चॅनल वर होईल, त्यातही मग भारताचा नंबर कधी लागतो नी कुठलं चॅनल ही माहिती सध्या तरी गुलदस्त्यातच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बीबीसी इंडियावर आली होती. पण सगळे मिळून ९ एपिसोड्स आहेत. मी सगळे टॉरेण्टवरून उतरवून पाहिले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मेघना - तुम्हाला शेरलॉक आवडत असेल तर Midsomer Murders, Inspector Morse, Lewis, Taggart पण बघा. सर्व टोरंट वर आहेत. तुम्हाला आवडतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुचवणीबद्दल आभार. पण मला सगळ्या तपासकथा आवडतात असं नाही. ’शरलॉक’ तपासकथेहून पुष्कळ निराळी आणि जास्त आहे, म्हणून मला आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आधी ट्राय तर करुन बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0