कुटुंबातले भारा - भाग १

.या मुलाखती एका लोकप्रिय आणि गोड लेखकाबद्दलच्या आहेत. त्या लेखकाचे कुटुंबीयही तसेच. या अंकाच्या काळात त्यांच्याकडून झालेली ही मदत :

"पुस्तकं मिळत नाहीयेत? मी देते की."

"फोटो? जरूर."

"हो, कधीही फोन करा, चालेल!"

"इथल्या इथे कॉपी करून आणता येईल, जरा जुनी प्रत आहे म्हणून फक्त..."

"अच्छा, 'त्या' भाषणाचा संदर्भ... उद्या सांगू?"

"छे छे... अजिबात त्रास नाही गं..."

"उलट तुमचा उत्साह बघून आम्हांला मजाच वाटते!'

असले मस्त लोक.

एरवी गोडगोड आदर्श भासणार्‍या लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या अप्रिय बाजू त्याच्या खाजगी नात्यांच्या तपशिलांतून उघड व्हाव्यात आणि मनातलं चित्र भंगावं, असा आजवरच्या अनुभवांचा एकंदर पॅटर्न. पण भा. रा. भागवतांच्या कुटुंबीयांशी बोलताना लेखक नि माणूस यांच्यातल्या विसंगती मजेशीर प्रकारे उलट्यापालट्या होऊन गेल्या. खाजगी आयुष्यातही कमालीच्या अनाग्रही, गोड, गंमतीदार असलेल्या भा. रा. भागवतांबद्दल – ऊर्फ दादांबद्दल – आणि लीलाताई भागवतांबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी दिलखुलास गप्पा मारल्या.


भागवत कुटुंबीय
डावीकडून : रवी (रवीन्द्र: थोरले चिरंजीव), विद्या (विद्युत: थोरल्या सूनबाई), चंदर (धाकटे चिरंजीव), भारा, चिनू (सरिता: रवी-विद्युत यांची कन्या), रेवती (धाकट्या सूनबाई), लीलाताई (लीलावती: भारांच्या पत्नी)

.
आम्ही या मंडळींना एकत्र भेटलो नाही. त्यामुळे एकेका प्रश्नाच्या छत्रीखाली त्यांची प्रकटनं गोळा करून एकत्र गप्पा मारल्याचा आभास निर्माण करण्याची गुळगुळीत झालेली मुलाखतीय क्लृप्ती इथे टाळली आहे. त्यांची प्रकटनं तेवढी देतो आहोत. प्रयत्न करूनही काही गोष्टींची पुनरावृत्ती टाळता आलेली नाही, म्हणजे ती आवश्यकच म्हणायला हवी!

***
.
रवीन्द्र भागवत, भारांचे थोरले चिरंजीव. हे 'व्हर्नीश' पंथातले. रॉबिन हुडचं भाषांतरही त्यांचं लाडकं. गृहस्थ काहीसे अबोल.

'निळे पाकीट', 'माझा विक्रम', 'वैतागवनातील वाफारे' ही दादांची अगदी सुरुवातीच्या काळातली पुस्तकं. विनोदी लेखनानं त्यांनी लेखनाला सुरुवात केली. त्या काळात ती पुस्तकं किती गाजली याचे तपशील मला माहीत नाहीत. मी तेव्हा फारच लहान होतो. मला त्यांचं आवडलेलं पहिलं पुस्तक आठवतं ते 'रॉबिन हुड आणि त्याचे रंगेल गडी'. (त्याचं कारण, ते मला अर्पण केलेलं आहे.) नंतर मला ज्यूल व्हर्नच्या वैज्ञानिक कादंबर्‍यांचं वेड लागलं. खरं म्हणजे दादा विज्ञानाचे विद्यार्थी नव्हते, ते इंग्रजी साहित्य शिकलेले. झेविअर्स कॉलेजमधून. पण ते सायन्स फिक्शन खूप वाचत असत. त्यांचाही ज्यूल व्हर्न हा आवडता लेखक. त्याची जवळजवळ सगळी पुस्तकं त्यांनी मराठीत आणली आहेत. 'दी बेगम्स मिलियन्स' नावाचं एक पुस्तक इथे मिळत नव्हतं. मी इंग्लंडला चाललो असताना 'तिथे नक्की मिळेल, काही करून शोधून आण.' असं मला त्यांनी बजावलं होतं. शेवटी त्यांना ते इथेच रद्दीवाल्याकडे मिळालं.

रद्दीवाल्याकडून पुस्तकं मिळवणं हा त्यांचा हातखंडाच. ते एक वेगळंच प्रकरण होतं. असंच रद्दीवाल्यांकडे पुस्तकं हुडकताना त्यांना एकदा त्यांनीच भाषांतर केलेलं पुस्तक दिसलं, त्याचाही एक किस्सा आहे. पुस्तक बघून त्यांनी रद्दीवाल्याला विचारलं, "केवढ्याला देणार?" म्हणाला, "बारा रुपये." तर म्हणे, "चल, काहीही काय! त्यावर फक्त दोन रुपये किंमत लिहिली आहे." तर रद्दीवाला उलटा त्यांना पटवायला लागला, "नाही, ते गाजलेलं पुस्तक आहे चिकार. किंमतीवर जाऊ नका..."

शेवटी घेतलं ते पुस्तक!

.

एकदा तर मला बरोबर घेऊन बाहेर पडले. पण पुस्तकांच्या नादात मला विसरून घरी गेले. असले एकेक किस्से. बिपिन बुकलवार म्हणजे त्यांच्या कल्पनेतली व्यक्तिरेखा नव्हती. ते स्वत:च बिपिन बुकलवार होते, असं मला कायम वाटायचं.

तर – मी भरकटलो. कुठे होतो आपण? हां, तर उत्तमोत्तम पुस्तकं वाचायची नि ती मुलांसाठी मराठीत आणायची, याचं वेडच त्यांना. इंग्रजी फिक्शनचं वाचन प्रचंड आणि गोष्ट खुलवून खुलवून सांगायची आवडही. रोज रात्री झोपताना आम्हांलाही गोष्ट सांगायचे. रतीबच असायचा. त्याचंच एक्स्टेंशन त्यांच्या पुस्तकांत झालं. पण वाचली गोष्ट - केलं भाषांतर इतकं साधंसरळ नव्हतं. ज्यूल व्हर्नच्या कादंबर्‍यांची रूपांतरंच घ्या, त्यात चंद्राच्या कला आहेत, तार्‍यांच्या पोझिशन्स, अक्षांश-रेखांशांचे तपशील आहेत. त्याचं मराठीकरण - भारतीयीकरण करायचं, तर त्यातही स्थलानुरूप बदल करायला हवेत. मग त्यासाठी संदर्भ हुडकून ते बरंच वाचन करत. मीही कितीतरी वेळा त्यांच्यासोबत नोट्स काढायला लायब्ररीत गेल्याची स्पष्ट आठवण आहे. संदर्भ शोधून पुरेशी माहिती मिळवल्याशिवाय लिहिणे नाही. ५० सालापासून ५७ सालापर्यंत त्यांनी 'बालमित्र' मासिक चालवलं, त्यात ज्यूल व्हर्नची एक कादंबरी दर अंकात प्रसिद्ध होत असे. त्या गोष्टींना खास अनुप्रासातली नावंबिवं शोधण्यात त्यांचा हातखंडाच होता.

'बालमित्र'च्या नंतरचा काळ फास्टर फेणेचा. अजूनही तुमच्या पिढीतली पोरं फास्टर फेणेवर फार प्रेम करतात. त्यांच्या बोलण्यातून त्यांचं प्रेम लक्षात येतं. पण मी फास्टर फेणेमध्ये फार गुंतलेला नाही. दादांनी ती मालिका लिहिली, तोवर माझं वय ती पुस्तकं वाचण्याचं राहिलं नव्हतं. शिवाय पुढे त्यांनी फास्टर फेणे फार घाईनं लिहून बाजारात आणला असंही माझं मत. त्यांची सर्जनक्षमता त्यात म्हणावी तितकी कसाला लागली नाही. त्यात ज्यूल व्हर्नच्या सायन्स फिक्शनची गंमत नाही. सगळी स्थानिक साहसं. त्यामुळे माझं खरं प्रेम ज्यूल व्हर्नच्या त्या कादंबर्‍यांवरच.

दादांना सिनेमे बघायला खूप आवडायचं. पण ते थेटरात! टीव्हीवर हिंदी सिनेमे सोडून बाकी सगळं काही बघायचे. कितीतरी वेळा आम्ही थेटरातच भेटलो आहोत. तेही चोरून सिनेमाला गेलेले आणि मीही चोरून सिनेमाला गेलेला!

मी इंजिनिअरिंग होस्टेलमध्ये राहत असतानाची गोष्ट. तेव्हा मी नि विद्युतनी लग्न जमवलं होतं. मी २० वर्षांचा नि ती १७ वर्षांची. तेव्हा दादा सकाळी माझ्या होस्टेलला आले. दिवसभर माझ्यासोबत घालवला. आम्ही सायकलवरून इकडेतिकडे भटकलो. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. संध्याकाळी अगदी घरी निघता निघता मला दादांचा निसटता प्रश्न, "काय रे, तुझं नि विद्याचं सिरियस आहे ना?" मी काय बोलणार? "हो," म्हणालो.

घरी जाऊन दादांनी जोरात सांगितलं, "चांगली डिटेल्ड चर्चा केली रवीशी. ही सीम्स टु बी क्वाइट सिरियस अबाउट धिस!"

आमचं लग्न होण्यापूर्वीच त्यांनी विद्युतला 'उडती छबकडी' हे पुस्तक अर्पण केलं होतं. नि त्या अर्पणपत्रिकेवर काय असेल? ती मला पहिल्यापासून 'ए रवी' अशीच हाक मारत असे. त्यावर लोकांच्यात चर्चा होई. पण दादांना ते आवडे. त्यांनी अर्पणपत्रिकेत लिहिलं होतं, 'चि. विद्याला, 'ए रवी'च!'


'उडती छबकडी'ची अर्पणपत्रिका

***
.
.
विद्युत भागवत, भारांच्या थोरल्या सूनबाई. भारांची एक विनोदी कथा ('दत्ता दडेकरचे मंगळसूत्र') सोडली, तर लग्नापूर्वी त्यांनी भारांचं काहीही वाचलेलं नव्हतं.

माझे बाबा पोलिसात. त्यांच्या अनेकदा बदल्या व्हायच्या. त्यामुळे कधी म्युन्सिपाल्टीची शाळा, तर कधी सेवासदन. मुलांना वाचायला आमच्याकडे एक तर नाथमाधवांच्या कादंबर्‍या, 'चांदोबा', नाही तर मग 'श्यामची आई'. "मी तुमचं काहीसुद्धा वाचलेलं नाही" असं लग्नापूर्वी दादांना सांगितलं, तेव्हा त्यांना खूप राग आला होता! पण खरंच होतं ते. माझी पार्श्वभूमी रवीसारखी नाही. आमच्यासारख्या परिघावर राहणार्‍या मराठी मुलांपर्यंत 'बालमित्र' कधी पोचलाच नाही. खेडेगावात तर नाहीच. शहरी, आणि आपण ज्याला 'ब्राह्मणी' म्हणतो अशा, घरांमध्ये दादांची पुस्तकं तीन-तीन पिढ्यांमध्ये वाचली गेली. पण कुठे? दादर, गिरगाव इथला शिक्षित मराठी मध्यमवर्ग, पुण्यातला मराठी मध्यमवर्ग, इथवरच.

माझ्या घरातलं वातावरण निराळं. "होऊन 'टाक' गं बीए. मग चपात्या करायला शीक. मग लग्न करून टाकू." असं आई म्हणायची. तेव्हा सर्वमान्य रीतच तशी होती. संस्कृत नाहीतर मराठी घेऊन बीए व्हायचं, आपली संस्कृती जपायची आणि इंग्लंड अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलाशी लग्न करायचं, असलं काहीतरी ध्येय. म्हणून मी यांच्या घरी गेले, तेव्हा मला मजाच वाटली. कुणीच कुणाला वळण म्हणून लावत नसे! लीलाताई आकाशवाणीत नोकरी करायच्या. रवी, रवीचा धाकटा भाऊ चंदर आणि त्या दोघांच्या मधली मी. आम्ही तिघे मिळून जो दंगा करायचो! पण दादा कधीच रागावले नाहीत. त्यांना पसारा चालायचा, वेडेपणा केलेला चालायचा. लीलाताई यायची वेळ झाली, की मात्र सगळं भरभर कॉटखाली ढकलून देऊन आवरल्यासारखं दाखवायची तारांबळ! खूप मजा यायची. चाळीतलं घर, घरात टीव्ही-फ्रीज-फोन नाही. पण घरात पुस्तकं भरपूर. आणि चुका करायचं भरपूर स्वातंत्र्य. अहोरात्र वाचत बसलं तरी कुण्णी काही म्हणत नसे. ते मला अतिशय मानवलं. मी एम. ए. ला नाव घातलं. मग मला इथे काहीच शिकायला मिळत नाही असं वाटून, मूल हवं, असं म्हणून मी गरोदर राहिले. मधे दोन वर्षांची गॅप घेतली. मग एम. ए. केल्यावर एका मुस्लीम कॉलेजात मी अर्धवेळ शिकवायला जात असे. पैसे मिळण्याच्या दृष्टीनं आनंदच होता. पण दादा कधीही कशाबद्दलही कुत्सितपणे एक वाक्यही बोलले नाहीत. दादा नाहीत, आणि लीलाताईही नाही. उलट मला दादा म्हणायचे, "तू काय काळजी करतेस? मीपण चिक्कार नोकर्‍या सोडल्या गं!" मी भाषाशास्त्र शिकायचं म्हटलं, तर मला लगेच त्याचे कोश आणून दिले. जुनी पुस्तकं जमवायची आहेत? चल जमवू. मग मी पुढे कायम असलेली नोकरी सोडून अनौपचारिक शिक्षणशास्त्रातल्या प्रयोगात शिरले. चिनूला - माझ्या लेकीला - काखोटीला मारून मी बरीच हिंडतही असे. पण गुणात्मक पद्धतीनं आमच्या जगण्यावर त्यांनी कधीही टीका केली नाही. नोकर्‍या बदला, प्रवासाला जा, मित्रांबरोबर गप्पाटप्पा करा, ते कधीही कशाच्याही मधे आले नाहीत. मुळात कुणाबद्दल जजमेंट देणंच त्यांच्या स्वभावात नव्हतं. जीवनातलं सत्य काय ते मलाच कळलेलं आहे, असा ढुढ्ढाचार्यी अहंकार नव्हता. रवी रहस्यकथा नाहीतर विज्ञानकथा वाचायचा. चंदरला खुनाखुनीच्या गोष्टींत मोठा रस. पण त्या प्रकारच्या वाचनाबद्दल त्यांचं काही म्हणणं नसे. आम्ही फार मोकळे वाढलो त्यांच्यासोबत, ते त्यामुळेच. कधी कशाची झाडाझडती देणं हे आम्हांला करावं लागलं नाही. स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद, युवक क्रांती दल, दलित चळवळ... अशा अनेक चळवळींत मी पडले. त्यामुळे आमच्याबद्दल गॉसिप करणारी पत्रंही एकदा कुणीतरी लीलाताईंना लिहिली, तरी लीलाताईंनी नि दादांनीही, कधीही त्याकडे लक्ष दिलं नाही. आपले निर्णय आणि आपली जबाबदारी - आपली जगण्याची रीत आपण शोधायची, असं आम्ही आपोआप शिकत गेलो त्यातून. हे किती लोकांना मिळतं?

अर्थात म्हणून आमच्यात वाद होत नसत असं मात्र नाही. एकदा मी एका प्रसिद्ध अभ्यासक बाईंना घरी जेवायला बोलावलं होतं. दादांच्या कानावर घालायला विसरले होते. तर त्या पाहुण्या येऊन जेवून गेल्यावर कंबरेवर हात ठेवून मला म्हणाले, "घरात कोण येतंऽ, कोण जातंऽ... आम्हांला कुणी सांगत नाही." मी रडूबाई. लागले रडायला. मग दुसर्‍या दिवशी सकाळी माझ्या टेबलावर चिठ्ठी, "सॉरी. मी अगदी टिपिकल सासर्‍यासारखा वागलो!'

अशा माणसावर कसा राग धरणार!

एकदा बरं का, मी जेवायला बोलावलं होतं त्या दोघांना. तेव्हा प्रभात रोडला आमचं स्वतंत्र घर नुकतंच झालं होतं. हुरळल्यासारखंच झालं होतं. दुपारी दादा नि लीलाताई आले. मी तंद्रीत कुठेतरी बाहेर चालले होते. मी मारे विचारलं, "दादा, तुम्ही इकडे कुठे?" तर ते दोघंही जण मला इतके हसले! म्हणाले, "बघ, विसरलीस ना? 'जेवायला या' म्हणाली होतीस की नाही?" वर हा किस्सा हसून हसून सगळ्यांना सांगायचे.


भारा आणि लीलाताई, 'बालमित्र'मध्ये

कोरडी पुस्तकी विद्वत्ता पाजळणे, या एका गोष्टीचा त्यांना राग होता. चिनू लहान असताना ती त्यांच्याकडे असायची नि आम्ही आमच्या व्यापात, तेव्हा ते चिडायचे. तिच्यासाठी कविता केली होती त्यांनी, 'बाबा ऑफीस, आई कॉलेज, वैताग दोघे आणि त्यांचं नॉलेज'!

माझ्या स्त्रीवादी भूमिकेचा मात्र त्यांना राग येत असे. सारखं काय 'अरे'ला 'कारे' करायचं, असं काहीतरी त्यांना वाटत असे. पण मी खूप वाद घालायची. तेव्हाच 'सिमॉन दी बोव्हा' वाचली होती, त्यामुळे डोक्यात ती हवा होती. त्यांना माझ्या स्त्रीवादी भूमिकेनं अगदी वैताग यायचा! त्यांच्या डोक्यात बाईचं रूप हे आईसारखं, खाऊपिऊ घालणारं, प्रेमळ असं होतं; त्याला कारण होतं. त्यांची आई लवकर गेली. ते स्वातंत्र्यलढ्यात विसापूरच्या तुरुंगात असताना त्यांची आई गेली आणि तेव्हाच रवीही झाला. लीलाताईंना फार वाईट वाटत असे त्याचं. दिल्लीला चांगला थाटलेला संसारही सोडून त्यांना परत यावं लागलं. दादा तेव्हा दिल्लीला 'आकाशवाणी'मध्ये बातमीदार होते. गांधींच्या अटकेची बातमी तेव्हा प्रसारित करायची नव्हती, पण दादांनी ती केली. त्यामुळे आपल्याला अटक होणार याचा त्यांना अंदाज होता. त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला आणि मग ते भूमिगत झाले. पुढच्या नोकरीच्या दृष्टीनं त्यांनी आवश्यक ती शिफारसपत्रं मिळवण्याचीही खबरदारी घेतली होती. तेव्हा रवी लीलाताईंच्या पोटात होता. लीलाताई लपतछपत बुरखा घेऊन आगगाडीनं परतल्या आणि दादा भूमिगत झाले. पुढे पकडले गेल्यावर ते एस. एम. जोशींच्या बरोबर विसापूरच्या तुरुंगात गेले. पुढे सत्तेच्या राजकारणात सामील होण्याचा मात्र कंटाळाच आला, असं दादा सांगत असत.

आपण टीन एजसाठीच लिहायचं असं त्यांनी मनाशी ठरवलं असावं. 'गेला कुठे श्रीरंग?' अशी त्यांनी अगदी शेवटी शेवटी लिहिलेली जी गोष्ट आहे, तीही एका टीन एजर मुलावरच लिहिलेली आहे. त्या मुलाला अगदी किशोर वयात काहीतरी भीषण आजार झाला आहे. तो मृत्यूच्या विवरात जातो, पण ते 'कृष्णविवर' नाही. आत प्रकाश आहे, अशी दादांची कल्पना होती. मृत्यू हा शेवट नाही, सुरुवात आहे असं त्यांना त्यात म्हणायचं असावं. पाणी, उंची, प्रकाश अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभूती त्यांनी शेवटच्या आजारात घेतल्या. त्याचं चित्रण त्या गोष्टीत आहे. त्या गोष्टीतून एका प्रकारे त्यांनी मृत्यूचं भय जिंकलं.

ते मनानं कायम टीन एजरच राहिले. माणूस वयानं वाढल्यावर जी लबाडी येते, जबाबदारीची जाणीव येते, किंवा मानमरातबाचा हव्यास येतो, त्याचा त्यांना स्पर्शही झालेला नव्हता. त्यामुळे लीलाताईंवर जबाबदारीचा खूप भार पडला हे आहेच. पण दादांना खरंच अ‍ॅडल्टहूड मनापासून आवडत नसे. मुलांच्यात रमावं. साहसं, स्वप्नं, रोमांचकारी पराक्रम, अशा गोष्टींबद्दल मुलांत मूल होऊन गप्पा माराव्यात, हेच त्यांना अखेरपर्यंत प्रिय होतं. जे जे अशक्य ते शक्य करून दाखवण्याची एक ताकद मुलांमध्ये असते, अशी त्यांची धारणा होती. ते त्याच प्रकारे जगले. त्यांच्या वडिलांनी – आप्पांनीही – एका विशिष्ट वयानंतर त्यात हस्तक्षेप केला नाही. सगळ्यांनी आपापले निर्णय घ्यावेत, अशी एक धारणा त्यांच्या घरात पहिल्यापासूनच आहे. मी आप्पांची नातसून. पण त्यांच्यासाठी कधी मी केक केला, तर त्या शिध्याचा हिशेब विचारून ते त्याहून थोडे जास्त पैसे मला देत. काही बोललं, तर स्पष्टपणे सांगत, "एक पदवीधर व्यक्ती माझ्यासाठी दोन तास राबली, तर तिला त्याचा मोबदला मिळायला नको? हवाच." हा दादांना मिळालेला तर्कशुद्ध वारसा. विज्ञानानं माणसाच्या जन्ममृत्यूचं कोडं नक्की उलगडणार, अशी खातरी असलेली दादांची आशावादी वैज्ञानिकता त्यातून घडत गेलेली असणार.

पण या बरोबरीनं एक गंमतीदार तिढाही होता. त्यांच्या लिखाणात नायिका अजिबात नाहीत. तसं टीन एजर मुलांचं विश्व असूनही भिन्नलिंगी आकर्षणाबद्दल संपूर्ण मौन. बायकांनी बायकांबद्दल लिहावं, पुरुषांनी पुरुषांबद्दल लिहावं, असं काहीतरी त्यांच्या मनात होतं. "दादा, तुमची 'फ्रॅक्चर्ड मॉडर्निटी' आहे!" असं म्हणायचीही मी त्यांना. ते हसून मान्य करत. हे असं त्यांच्याशी विनासंकोच बोलता यावं, अशी मोकळीक आणि पात्रता त्यांच्यामुळेच मिळाली, ही त्या नाण्याची दुसरी बाजू.

अगदी शेवटच्या टप्प्यात ते बरेच आजारी होते. लीलाताईंना जागरणं झेपत नसत. तेव्हा रात्रीची ड्यूटी करायला काही बायका येत. बुरूड, मातंग, मांग जातींच्या त्या कष्टकरी बायका. दादांना झोप येत नसे. ते त्यांच्याशी गप्पा मारत. त्यांचे अनुभव, नवर्‍याचा मार खाणं, खंबीरपणे मुलांची शिक्षणं करणं या सगळ्याबद्दलच्या त्या गप्पा असत. स्वत:च्या शरीराबद्दल आत्मविश्वास बाळगून कणखरपणे उभ्या असणार्‍या स्त्रीचं रूप त्यांना त्या दिवसांत प्रकर्षानं जाणवलं असावं. "तू काय म्हणत होतीस, त्याचा अर्थ मला आता कळला!" असं त्यांनी अगदी मोकळेपणानं मला सांगितलं होतं.

***

शब्दांकनः स्नेहल नागोरी, मेघना भुस्कुटे
चित्रस्रोतः भागवत कुटुंबीय

***
कुटुंबातले भारा - भाग २

***
विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

जबरदस्त झकास! हा अंकाचा हायलाईट आहे!

(अवांतर - फोटोतल्या लोकांचा परिचय देता येईल का?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

फोटोतल्या लोकांचा परिचय देता येईल का?
............धन्यवाद. परिचयासहित लेख अद्ययावत केला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप आवडल्या आठवणी!! छान झालाय लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अगदी म्हणजे अगदीच झक्कास!
मुलाखतींचं शब्दांकन रचना सगळंच उत्तम आहे.

मला दोन्ही मुलाखतींमधला शेवटचे परिच्छेद विशेष आवडले. भागवतांच्या निरनिराळ्या पैलुंवर प्रकाश टाकणारे!
त्यांची स्वातंत्र्ययुद्धातील कामगिरी मला अज्ञात होती. यानिमित्ताने तीही समोर येतेय!

आभार! आता दुसर्‍या भागाची वाट पाहतोय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला दोन्ही मुलाखतींमधला शेवटचे परिच्छेद विशेष आवडले. भागवतांच्या निरनिराळ्या पैलुंवर प्रकाश टाकणारे!

+१

आपल्या मुलांसोबत दंगामस्ती करणारे, आपल्या चुका त्यांच्यासमोर मान्य करणारे लोक कमीच असतात. भा.रांचा हा पैलूही आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लैच मेहनत घेतलीये सर्वांनी. सर्वांचे अनेक आभार आणि अभिनंदनही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भा.रा. भागवत विद्युत भागवतांचे सासरे हे माहित नव्हतं! मी विद्युतबाईंचे लेखन बरेच वाचले आहे, काय आयरनी आहे Smile
मुलाखती खूप आवडल्या. विद्युतबाईंची मुलाखत वाचून इरावती कर्व्यांनी त्यांच्या सासर्‍यांबद्दल लिहीलेला लेख आठवला.

त्यांच्या लिखाणात नायिका अजिबात नाहीत. तसं टीन एजर मुलांचं विश्व असूनही भिन्नलिंगी आकर्षणाबद्दल संपूर्ण मौन. बायकांनी बायकांबद्दल लिहावं, पुरुषांनी पुरुषांबद्दल लिहावं, असं काहीतरी त्यांच्या मनात होतं.

सत्यजीत रायांच्या फेलूदा व इतर किशोर वाङ्मयाला ही हेच लागू आहे. पुढे बाङ्लात सुचित्रा भट्टाचार्य वगैरेंनी मुलींवर आधारित कथा लिहील्या, पण ही fractured modernity त्यांच्यात ही दिसतेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय गोड आहेत या आठवणी. खूप आवडल्या. विद्याताईंनी फार भरभरुन अन उत्कट लिहीले आहे.

मुळात कुणाबद्दल जजमेंट देणंच त्यांच्या स्वभावात नव्हतं. जीवनातलं सत्य काय ते मलाच कळलेलं आहे, असा ढुढ्ढाचार्यी अहंकार नव्हता.

__/\__ हे फार फार आवडलं.

__________

दादांचा निसटता प्रश्न, "काय रे, तुझं नि विद्याचं सिरियस आहे ना?" मी काय बोलणार? "हो," म्हणालो.
घरी जाऊन दादांनी जोरात सांगितलं, "चांगली डिटेल्ड चर्चा केली रवीशी. ही सीम्स टु बी क्वाइट सिरियस अबाउट धिस!"

हाहाहा! हसून हसून पुरेवाट झाली.
____
लीलाताईंचा अन भारांचा फोटो अतिशय मस्त आलाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंच खूप मेहनत घेऊन काढलाय विशेषांक, त्याबद्दल अभिनंदन! आणि असा आगळावेगळा उपक्रम हाती घेऊन पार पाडल्याबद्दल 'भले शाब्बास'!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अन्कवाचन चालू आहे. अफाट परीश्रम घेतल्याचे सहजच जाणवते. मुलाखात अप्रतिम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वांच्या मेहनतीला सलाम, गुणदोषांसमेत केलेली लेखाची मांडणी व कुटुंबातले भारा दोन्ही भावली/ले __/\__.

दादा कधीही कशाबद्दलही कुत्सितपणे एक वाक्यही बोलले नाहीत. दादा नाहीत, आणि लीलाताईही नाही
वाह! हेवा वाटतो अश्या लोकांचा. काश Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0