घृतं पिबेत

असेही दिवस होते की सांजवात तिळाच्या तेलात भिजायची तर निरांजनातल्या फुलवाती साजुक तूपात भिजायच्या. अंबाडीच्या भाजीवरची लसणाची फोडणी तेलात व्हायची तर कढीला चुर्रकार फोडणी तूपातली मिळायची. जवसाच्या किंवा कारळ्याच्या थोड्याशा कोरड्या चटणीला तेलाची जोड असायची तर लसणीच्या तांबड्या लाल तिखटासोबत तेल बरे की रवाळ तूप हा सांप्रदायीक वाद होता.
देव्हार्‍यातला बाळकृष्ण पण लोणी साखरेच्या वाटीवर नजर ठेवूनच आंघोळीला तयार व्हायचा.सोळा सोमवारच्या व्रतानी भोळा शंभो प्रसीद प्रसीद व्हायचा तो लोणकढ्या तुपातल्या चुरम्याच्या लाडवामुळे आणि सत्यनारायणाच्या शिरा दुसर्‍या दिवशी खाल्ला की परब्रह्म जरा जास्तच चांगले प्रकट व्हायचे.बेंबीला चिमटा काढून वर्षभरात अंगारकीचा एखादाच उपास दिवसभर व्हायचा तो संध्याकाळी वाफाळत्या मोदकावर साजुक रवाळ तुपाचा घसघशीत हप्ता मिळावा या आशेवरच.
इडलीसोबत पुडीची चटणी तिळाच्या तेलात पावन होऊन यायची आणि उडदाच्या पापडाची लाटी अंगभर तेलात माखून "गिळा आता" म्हणायची.
सांगायचं होतं ते असं की ही तेलं तूपं म्हणजे कुकींग मिडीयम नव्हती तर पाककृतीचे अ‍ॅक्टीव्ह कांपोनंट असं त्यांचं स्वयंभू अस्तित्व होतं.त्यांच्या स्वादाचा आपापला महीमा होता. अन्न पूर्णब्रह्म होतेच पण त्यानी कसे प्रकट व्हावे त्याचे काही अलिखीत संकेत होतेच.
घरी वापरायचं तूप घरीच कढवलं जायचं आणि तेल आणायला शनीवार वगळता तेलाच्या घाण्या होत्या. लग्न कार्य वगैरे वगळता रोजचं तूप घरीच कढवलं जायचं. लोणी कढवायला घेतलं की वासाची पहीली नोट नको नकोशी आंबुस असायची मात्र सेकंड नोट खमंग तुपाची . तो खमंग दरवळ संध्याकाळपर्यंत घरभर फिरत असायचा. खमंग रवाळ तूप. त्याचे शेवटचे चार थेंब वसूल करण्यासाठी भिंतीला कलतं करून ठेवलेलं पातेलं हातात आलं की बचकभर साखर घालून दत्त दत्त । दत्ताची गाय । गायीचं दूध ।दुधाची साय म्हणत म्हणत बेरी खरवडून पोटात ढकलेपर्यंत चैन पडायची नाही.
पोल्सनचा मस्का आणि पाव "नस्ती थेरं" या सदरात मोडायची.
पण एकाएकी सगळ्या व्यवस्थेचे सांधे बदलले. माणसं वाढली -भुकेची पोटं वाढली आणि अन्न कमी पडायला लागले. आता निवृत्तीच्या वयात असणार्‍या बर्‍याच जणांच्या बालपणीचे हे चित्र आहे.नंतर वेगाने समाजव्यवस्था एकेका दशकात सांधे बदलत गेली .चिंता -क्लेश-दु:ख -दरीद्र देशांतराला गेलीच नाहीत पण माणसं मात्र जगायला घराच्या बाहेर पडली. अस्तित्व तगवून धरण्याची एक न संपणारी लढाई सुरु झाली. कमाई आणि खर्चाची दोन टोकं जुळवता जुळवता घरातली कर्ती माणसं टेकीला आली . स्वस्त साधन स्त्रोताचे शोध सुरु झाले. माल्थस नावाचा एक शहाणा माणूस कधीतरी म्हणाला होता की भूमीतीय गुणोत्तराने वाढणार्‍या प्रजोत्पादनाला अंकगणितीय श्रेणीनी वाढणारे अन्न पुरेसे पडणार नाही. त्यानी कदाचीत अर्थशास्त्राचा विचार केल असेल पण प्राण्यांच्या जिवंत राहण्याच्या दुर्दम्य नैसर्गीक इच्छाशक्तीचा विचार केला नसावा. आठवड्यातले तेलातुपाचे दिवस कमी झाले .
डालडा म्हटल्यावर नाक मुरडणारी माणसं रांगेत उभं राहून डालडा आणायला लागली.
तसं आपल्याकडे डालडा काही नविन नव्हतं पण त्याला सैपाकघरात मान्यता नव्हती पण नंतर हळूहळू तेल किंवा तूप म्हणजे वनस्पती तूप मिळणे हेच परमोच्च भाग्याचे लक्षण आहे हे कळल्यावर असल्या शंका मनात येणेच बंद झाले .
सैपाकघरात एकदा डालडा आला आणि नंतर कायमचा तेथेच राहीला. याचे श्रेय जाते हिंदुस्थान लिव्हरच्या चिवट मार्केटींगला. सुरुवातीला हातगाडीवर स्टोव्ह आणि कढईचा संसार मांडून एक माणूस डालडात पुर्‍या तळून दाखवायचा आणि जमलेल्या गर्दीला आग्रहानी खायला घालायचा.कै.सुधीर फडक्यांच्या आत्मकथनात याचा उल्लेख वाचलासा वाटतो आहे त्यानंतर डालडात बनवायच्या पाककृतींचं पुस्तकं पण आलं .
डालडा म्हणजे काय तर हायड्रोजीनेटेड तेल.
तेलापासून बनवलेलं तूप .म्हणून वनस्पती तूप.
दिसायला साजुक तूपासारखं .
रंगानी आकर्षक आणि चवीनी एकदम बुद्दू.
साधारण तेलाच्या रेणू शृंखलेतल्या रिकाम्या शिटा हायड्रोजनच्या रेणूंनी भरून काढल्या की झालं वनस्पती तूप तयार.
पॅलॅडीयम नावाच्या एका धातूच्या मदतीने हे स्थित्यंतर सहज शक्य होते कारण आकारमानाच्या नऊशे पट हायड्रोजनचे रेणू वाहून नेण्याची क्षमता या धातूत आहे. हायड्रोजीनेशन केल्यावर तेलाचं जे काही होतं त्याला म्हणायचं वनस्पती तूप . त्यात थोडासा बदल करून -जीवनसत्वाची भर घालून हिंदुस्थान वनस्पती मॅन्युफॅक्चरींग कंपनीने पहील्यांदा डालडा भारतात आणलं. नंतर या कंपनीचं नाव हिंदुस्थान लिव्हर झालं.
डालडा ह्या नावाचा मात्र एक वेगळाच किस्सा आहे. सुरुवातीला हे वनस्पती तूप भारतात आयात केलं जायचं डाडा अँड कंपनी मार्फत . लिव्हरला मात्र स्वतःचा मालकी हक्क दाखवायचा होता मग त्यात तडजोड म्हणून एल जोडून डालडा नाव तयार झालं. युनीलिव्हरचा इतिहास मात्र थोडी वेगळी कथा सांगतो . हार्टॉग्ज या कंपनीने १९२६ साली डालडा ह्या नावाची मक्तेदारी घेतली. युनीलिव्हरचा साम्राज्यवाद मोठा की भारतीय प्रजेची भूक (आणि नड )मोठी हे कळायला मार्ग नाही पण डालडा अस्तित्वात आल्यापासून पाच वर्षाच्या आत शिवडीच्या फॅक्टरीत डालडा बनायला सुरुवात झाली. १९३७ साली प्रकाश टंडन नावाच्या एका भारतीयाला बोर्डावर घेऊन लिव्हरनी आपले हेतू स्पष्ट केले आणि त्यानंतर हिंदुस्थान लिव्हरच्या अश्वमेधाचा घोडा अडवायला कुणीच धजावलं नाही.
१९६५ -१९७१ ची दोन युध्दं झाली -सत्तर एकाहत्तर बहात्तरचा ची वर्षे लागोपाठ अवर्षणाची गेली आणि डालडा पण काळ्या बाजारात गेलं . लोकसभेत डालडाच्या वाढत्या भावावर आणि दुर्भीक्षावर अनेक चर्चा झडल्या आणि डालडा रेशन कार्डावर मिळायला लागलं.
राहणीमान बेचव झालं पण तगून राहण्याची गरज त्यापेक्षा मोठी होती .
दादर स्टेशनला उतरल्यावर सामंतांच्या दुकानातल्या काचबंद पेटीतल्या लोण्याच्या प्रचंड आकारमानाच्या गोळ्याकडे बघून सुस्कारा सोडून लोकं पुढे निघून जाताना मी बघीतली आहेत. खानदेश -कोईंबत्तूर -बेळगाव ही लोण्याची घराणी आजही कसाबसा जीव तगवून उभी आहेत.
डालडाच्या स्पर्धेत अनेक नविन ब्रँड आले आहेत .पत्र्याच्या डब्यातलं डालडा प्लॅस्टीकच्या पिशवीत मिळायला लागलं.
नव्वदीच्या नंतर हेल्थ काँशस पिढी मिळवती झाली आणि नव्या मध्यमवर्गीय कुटुंबात डालडाची गरज संपली. कधी न ऐकलेल्या तेलबियांचं तेल घरात आलं . डालडानी पण डालडा अ‍ॅक्टीव्ह या नावाखाली पुन्हा एकदा सैपाकघर काबीज करण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत नव्या सुनांनी आणि नव्या तेलांनी जम बसवला होता. (या नव्या तेलाची जाहीरात करणार्‍या कमनीय बांध्याच्या बाया कदाचीत लिव्हर कंपनीला मिळाल्या नसतील .)
काही वर्षापूर्वी लिव्हरनी डालडा ब्रँड विकून टाकला.
पामच्या झाडाचं चित्र असलेला डालडाचा पिवळा डबा हे कधीच न विसरता येणारे मार्केटींग आयकॉन आहे आणि डालडाच्या रिकाम्या डब्यात रुजलेले तुळशीच्या रोपट्याचे चित्र म्हणजे आपल्या सामाजीक राहणीमानाच्या स्थित्यंतरात कसाबसा जीव धरून राहीलेल्या संस्कृतीचं आयकॉन आहे .
चार्वाकानितीत फारसा फरक पडलेला नाही .
ॠणं कृत्वा आयुष्याला कायमचं चिकटलं आहे पण घृतं पिबेत कधीच विसरून गेलो आहे

field_vote: 
4.2
Your rating: None Average: 4.2 (5 votes)

प्रतिक्रिया

Dandavat deva!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख फार आवडला. काय बोलावं हे न कळल्यामुळे काहीच बोलत नाही. सुन्न झाले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--
सस्नेह,
अदिति
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||

>

विकीपीडीयावर देखील तुम्ही म्हणताय तसाच उल्लेख आहे पण मी लोकसत्तेत असं वाचलंय की डालमिया आणि डागा ही आडनावं असलेले दोन भागीदार डालडा या कंपनीच्या नावास कारण आहेत.

>

मला तर ही चव फार आवडायची. लहानपणी भाजी आवडली नाही की सरळ चपातीवर दोन चमचे डालडा लावून तिचा रोल बनवून खायचा माझा नेहमीचा शिरस्ता. मग कुणीतरी आईला सांगितलं की डालड्याच्या अतिसेवनाने मुलाच्या डोळ्यांचे स्नायू कडक बनतील आणि दृष्टी बिघडेल. त्यानंतर लगेच माझं डालडासेवन बंद झालं. मग आमच्या घरी साजूक तुपाचा वापर सुरू झाला. यातही वारणा वगैरे ब्रॅंडच्या तुपाची चव चांगली असली तरी अमुल व इतर अनेक ब्रॅंडच्या तुपाची चव आमच्या घरी तरी कुणालाच आवडली नाही.

पुढे १९९८ मध्ये मी वेगन आहारपद्धती स्वीकारली आणि पुन्हा डालडाचा वापर सुरू केला कारण साजुक तूप जनावराच्या दूधापासून बनते तर डालडा वनस्पतीपासून. पुन्हा अनेकांनी सांगितलं की हे तर साजुक तुपापेक्षाही अधिक प्राणिज आहे कारण त्यात जनावरांची चरबी आहे. शेवटी कंटाळून कुठल्याही प्रकारचं तूपच वापरणं बंद केलं. आता स्निग्ध घटक मिळविण्याकरिता फक्त सोया किंवा सूर्यफुल तेल व गळितांच्या धान्याचाच वापर आहारात करतो.

>

होय. असा पिवळा डबा नंतर दुसर्‍या पिवळ्या कार्याकरिता वापरला जात असे.

>

ऋणं कृत्वा हे आयुष्याला कधीच चिकटून दिलं नाही. अंथरूण पाहून पाय पसरावे हीच शिकवण आचरणात आणली. घृतं पिबेत हे एका मर्यादित कालखंडात केलं पण आता उत्तम आरोग्याकरिता सोडलंय... कायमचंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

घृतं पिबेत हे माणसं विसरली नाहीत तर तुपासारखं दिसणारं काहीही तूप म्हणून चालवून घेऊ लागली.

हेल्थ कॉन्शसनेसच्या जमान्यात तसेही डालडाच नव्हे तर तूपही बहिष्कृतच.

आमच्या घरातली आठवण म्हणजे कळत्या लहानपणी डालडाच वापरले जाई. घरात येणार्‍या चाळीसगावी दुधातून लोणी तूप काढणे कुणाच्याच बापाला शक्य नसे. पोळीवर वाढण्यासाठी तूप हवे म्हणून तांबेकडून लोणी विकत आणून तूप बनवले जाई.

नंतर काही वर्षांनी आमची परिस्थिती सुधारली असावी आणि त्यामुळे आईने घरात पुन्हा तूप वापरायला सुरुवात केली. तेव्हा नुकतेच वारणा वगैरेचे तयार तूप मिळू लागले होते. ते आणले जात होते. पोळीसाठी मात्र ते तांबेकडून किंवा सामंतकडून लोणी आणूनच तूप केले जाई.

आमच्या काही नातेवाईकांत डालडा खाल्ले जात नसे कारण त्यात चरबी असते अशी अफवा(?) उठली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अगदी रामदास-स्पेशल लेख! बदललेल्या परिस्थितीचं वर्णन वाचताना तुमच्याच एका लेखातलं 'पासष्ट ते सत्त्याहत्तर' खणखणाट आठवून गेलं.

पामच्या झाडाचं चित्र असलेला डालडाचा पिवळा डबा हे कधीच न विसरता येणारे मार्केटींग आयकॉन आहे आणि डालडाच्या रिकाम्या डब्यात रुजलेले तुळशीच्या रोपट्याचे चित्र म्हणजे आपल्या सामाजीक राहणीमानाच्या स्थित्यंतरात कसाबसा जीव धरून राहीलेल्या संस्कृतीचं आयकॉन आहे .
चार्वाकानितीत फारसा फरक पडलेला नाही .
ॠणं कृत्वा आयुष्याला कायमचं चिकटलं आहे पण घृतं पिबेत कधीच विसरून गेलो आहे

_/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख मस्त आहे, एकही वाक्य अनावश्यक वाटत नाही, फारच चपखल. मस्तच.

कुजबुज - अरेरे इथे निम्मी दुनिया उपाशी झोपत होती आणि साजुक तुपाशी खायला मिळालं नाही म्ह्णून "सर्व" समध्यमवर्गियांची कढली, हे कधी सुधारणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जादुई लेख आहे.. वाचल्यावर बरंच काहि बोलावंसं वाटतं काय ते सांगता येणार नाही.
लेखाची जादु डालडा तुपापेक्षाही चिवट आहे.. अनेक दिवस मेंदुला चिकटून बसेल हे नक्कि

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख अतिशय आवडला.

>

येस्स. अजूनही दिसतात का असे डबे? असा डबा बघुनही आता १०-१५ वर्षे होऊन गेली.
लेखामुळे घरचे लोणी आणि आई यांची खूप आठवण आली.... Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख मनापासून आवडला.

आमच्याही घरी डालडाचे डबे डाळींसाठी वापरलेले दिसायचे. पण डालडा खाल्ल्याचं आठवत नाही. आजूबाजूच्या सोसायट्यांमधे डालडाच्या डब्यातली तुळसही दिसायची. आमच्या बिल्डींगीत शेजारच्या आजोबांनी कष्टाने तुळशीवृंदावन आणि इतर अनेक वृक्ष, फुलझाडं, झुडपं लावली आणि जपली होती. आजोबा गेले आणि बाबा, काका या लोकांनी या झाडांकडे लक्ष घातलं. हळुहळू एकेक झाडही वय होऊन, वाळवी लागून आणि सरतेशेवटी बिल्डींग पुन्हा बांधली त्यात गेलं. मागच्या पिढीमागून झाडं गेली, बिल्डींगही गेली तर बालपणाच्या आठवणीही का राहिल्या असा प्रश्न बर्‍याचदा पडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मस्त लेख.

माझ्या आठवणीच्या काळात डालडा प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये विकत आणत असू. डालडा संपल्यावर बरण्या डाळी वगैरे ठेवण्याकरिता वापरत असू. फडताळात काही जुने गंजू लागलेले टिनपाटाचे डबेसुद्धा होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर लेख

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

लेख आवडला..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

इंदिराबाईंच्या समाजवादी राज्यव्यवस्थेत वाढण्याचे भाग्य लाभल्याने डालडाशी चांगला परिचय आहे....
आधी डालडा मोकळ्या दुकानात मिळायचा. पत्र्याच्या टीन मध्ये! कधी लाईन वगैरे लावावी लागत नसे. नंतर मागणी जास्त आणि पुरवठा कमी म्हणून म्हणा किंवा दुकानदारांच्या साठेबाजीमुळे म्हणा लायनीत उभं राहून डालडा मिळण्याची प्रतिक्षा करावी लागायची. विशेषतः दिवाळीच्या आधी!
घरातला मोठा मुलगा असल्याने हे तासंतास लायनीत उभं रहाण्याचं पुण्यकर्म माझ्या नशिबी यायचं. वेळ जाण्यासाठी म्हणुन नगरपालिका वाचनालयातून पुस्तके घेऊन ती लायनीत वाचायचो. वाचनाची आवड ही अशी डालडाच्या (आणि रॉकेलच्या!!) लायनीत लागली!!!:)
नंतर सरकारने रेशनवर वनस्पती तूप द्यायला सुरवात केली. पण तो 'उमदा', 'डालडा' नव्हे! त्याला डालडाचा घरंदाजपणा (?) नव्हता. हे म्हणजे उगाच अलका याज्ञिकने 'आता विश्वात्मके देवे' गाण्यासारखं!!!! लोकं आपण महापरिश्रमाने मिळवलेल्या डालडाच्या डब्याचं कौतुक करायची आणि बढाया मारायची...
"इश्श्य!! फराळ अस्सल डालड्यातला आहे हो, उमद्यातला नाही आणि पामतेलातला नाहीच नाही!! आमच्या ह्यांनी भायखळ्याच्या मार्केटमध्ये जाऊन दिवसभर लायनीत उभं राहून मिळवला हा डालडा!!!", 'ह्यां'च्या सौ.
Smile
डालड्याचा हा तुटवडा बघून काही जणांनी गल्लीत ट्र्क उभा करून रोख पैसे घेऊन लोकांना डालड्याचे पॅकबंद डबे विकले. आनंदाने घेऊन घरी जाऊन उघडल्यानंतर त्या डब्यांत डालडयाऐवजी शेण भरलं आहे असेही प्रसंग घडले!!! काय माणसाची उद्योजकता पहा, डालड्याचा नवाकोरा डबा मिळवायचा/ किंवा उल्हासनगरहून तयार करून घ्यायचा, त्यात आधी शेण जमवून ते भरायचं, पुन्हा डबा सील करायचा आणि कसलाही घाण वास येत नहिये याची विकण्यापूर्वी खात्री करून घ्यायची...
कारण विकतांना पकडला गेला तर मेलाच!!!!
Smile
डालडा शेवटचा खाऊन २५ वर्षे होऊन गेली पण आठवणींची स्निग्धता अजून आहे...
बाकी लेख अस्सल रवाळ, कणीदार आहे, अजिबात पीठ मिसळलेला नाही!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरीचशी विशेषणे वर वापरुन झालेली आहेत. त्यामुळे लेखन फार आवडले, इतकेच म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

डालडा
डाल्डाचा डब्बा संडासात असे, उगा पिवळे काम वगैरे लिहून घाणेरडेपण लपवू नये. (सकाळी मोकळे होण्याआधी ते सगले पिवळे सोने आपण सोबत घेऊन फिरत असतात आपल्याच शरीरात, हे ध्यानात घेणे.= मला जास्त घाण लिहिता येते.)
याव्यतिरिक्त,
वनस्पती तुपाच्या डब्यावर, 'विटामिन ए व डि युक्त' असे छापलेले असे. त्याचा अर्थ किती व काय? याबद्दल कॉमेन्ट अपेक्षित होती इथल्या रिस्पॉन्सेस मधे. असो.
याच डालडाला 'इन्डियन' अल्टरनेटिव वाला सूर्यमुखी कुणी आणला?
विप्रो Wink
हे विप्रो वाले आज कुठे आहेत? अझीम प्रेमजी? अमळनेरवाले?
लाआआआआआआआआआआआआआइ मोट्टा इतिहास आहे या 'वनस्पती' तुपाला. ~विन्क~
आता परत डाक्तरकी पाजळत सांगतो.
ऑक्क्षिजन शिलिंडर तुपाच्या कारखान्यात भरून मिळत असे. याला 'इंडस्ट्रियल' ऑक्सिजन म्हंतात. पण तेच ओटू अनेक 'शेरात' मिळत असे. अन लै पेशंटांचे जीव वाचलेत त्याने. हा इंडस्ट्रियल ऑक्सिजन. - तेलाचं तुप करायला हाय्ड्रोजन लागतो तो - पाण्यापासून इलेक्ट्रिक-सिटी ब्रेकअप (विद्युत अपघटन) करून मिळतो. उरलेला ऑक्सिजन विकतात. ग्यास वेल्डिंग साठी (ऑक्सीअ‍ॅसिटिलिन ज्योत). हाच बर्‍याचदा मेडिकल उपयोगासाठी वापरत असत. या तुपातले ए अन डी विटॅमिन्स हे उत्तम 'सोर्स' होते 'फॅट सोल्युबल' व्हिटॅमिन्स साठी. (ए डि ई के)
आजकाल ते एल्डिएल, व्हीएल्डिएल अन अमुक अन तमुक लै बोकाळलं आहे. असो. मार्केटिंग असतं ते Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लेख आवडला. मला डालडयाचे रूप-गंध-चव कधीच आवडले नाहीत.

डालडाच्या डब्यांवरुन सई परांजपे यांचा 'कथा' हा चित्रपट आठवला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहीले ३ नॉस्टॅल्जिक परीच्छेद फारच आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खास रामदासी स्टाइलमधलं स्मरणरंजन. लेखाच्या गाडीच्या चाकांना शुद्ध तुपाचं वंगण घातल्याप्रमाणे स्मूथ. एकदम मस्का. लेखाचं नाव 'डालडा: एक चिंतन' असं असायला हवं होतं. Smile

व्यवस्था पुन्हा एकदा हळूहळू सांधे बदलो, आणि 'एवढं तूप खाऊ नका' असं सर्वांनाच सांगण्याची डॉक्टरांवर पाळी येवो ही शुभेच्छा.

लेखातील कल्पनाविलास रम्य असला तरी सध्याइतकं तूप कधी स्वस्त होतं असाही प्रश्न लेखाच्या अनुषंगाने पडला. सध्या रुपयाला तीन ग्रॅम तूप मिळतं (चूभूद्याघ्या). भारतातली सुमारे निम्मी जनता दररोज प्रतिमाणशी १०० रुपयांच्या वर खर्च करत असताना दरडोई दिवसातून दहा ग्रॅम तूप खाणं अगदी अशक्य कोटीतलं नाही. त्यापेक्षा अधिक खाऊही नये. २०११ मधली आकडेवारी सांगते की भारतात दरडोई दरवर्षी ३.५ किलो (दिवसाला सुमारे दहा ग्रॅम) लोणीजन्य मेद खाल्लं जातं. एवढ्या प्रमाणात कुठच्या काळात तूप अस्तित्वात होतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे अवांतर अस्थानी असावे.

स्मरणरंजनात्मक लेखात जुना काळ अधिक चांगला होता असे म्हणण्याची पद्धत आहे. तरीही लेखात आधीच्या दूधतुपाच्या सुबत्तेच्या काळाच्या वर्णनात मोठा कल्पनाविलास केलेला नाही असे वाटते.

लेखक आणि बरेच जालसदस्य ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतात त्या वर्गात आधीच्या काळात गावात एकत्र कुटुंबे असताना तुपाची उपलब्धता चांगली असावी. ज्या डालडा काळाचं/वर्गाचं रामदास यांनी वर्णन केलं आहे तो काळ म्हणजे शहरातल्या विभक्त कुटुंबांचा सुरुवातीचा काळ होता ज्यावेळी पगाराचे प्रमाण तुटपुंजे असण्याचा आणि गावातल्या कुटुंबाला पैसे पाठवण्याचे प्रेशर असण्याचा, गावातील आणखी लोकांना शहरात येण्यास मदत करण्याचा काळ होता. त्याही काळात ज्यांचे उत्पन्न अधिक असेल ते लोक डालडा न खाता तूप खातच असतील. पण नवदांपत्यांची विभक्त कुटुंबे असणार्‍या सिंगल इंजिन वर्गाला तूप परवडत नसणार आणि उपलब्धताही कमीच असणार* म्हणूनच डालडाचा स्वीकार झाला असणार.

*घरच्याघरीच लोणी काढून तूप करण्याइतके दूध घेतले जात नसावे आणि त्या चाळीसगाव/आरे दुधाचा दर्जाही मिनिमल असणार. आणि बाहेरून तयार तूप आणण्याइतकी/मिळण्याइतकी सांस्कृतिक प्रगती झालेली नसावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अवांतर तसं अस्थानीच आहे. ललित लेखनाचा आनंद घेताना शास्त्रीय, तार्किक सत्याचे निकष लावणं योग्य नाही. 'पुंगीच्या स्वरांनी मंत्रमुग्ध होऊन नाग डोलायला लागला' या वाक्याबाबत नाग पुंगीचे स्वर ऐकून नाही तर पुंगी हलवण्यामुळे डोलतो अशी तक्रार करण्याने अर्थाचा विचका होतो. म्हणूनच 'अनुषंगाने' असं लिहिलेलं आहे. या विचाराचा विस्तार करण्यासाठी नवीन लेख लिहिणंच इष्ट होईल.

कमअस्सल स्मरणरंजनांत 'पूर्वी कसं सुंदर होतं, आजकाल सगळं पार रयाला गेलं आहे. कलयुग बाबा कलयुग!' असं रडगाणं असतं. त्याचा अतिरेक नको वाटतो. मात्र या लेखात गतकाळातल्या एका पर्वाचं वर्णन आहे. डालडा हे एक प्रतीक आहे, तत्कालीन सामाजिक-मानसिक जडणघडणीचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पार रयाला गेलं आहे.

लयाला गेलं आहे, किंवा रया गेली आहे असा वाक्प्रचार ऐकून होतो. रयाला गेलं आहे : हे प्रथमच आइकले. या बद्दल अधिक विस्ताराने सांगितल्यास माहितीत भर पडेल असे वाटते.

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

बघा, एक शब्द वेगळा वापरून कशा दोन अर्थांच्या छटा आणल्या की नाही? मर्ढेकरांनी जेव्हा 'अब्द अब्द मनी येतं' असं म्हटलं तेव्हा त्यांनीदेखील हीच क्लृप्ती वापरली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्लृप्ती नीट लिहिलंत म्हणून सोडून देतो या वेळी Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-