विश्वाचे आर्त - भाग १२ - सामाजिक डार्विनवाद

विज्ञानाचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो? विज्ञानातून तंत्रज्ञान निर्माण होते. त्या तंत्रज्ञानाचे अनेक फायदेतोटे - मुख्यतः फायदे - आपल्याला दिसत असतातच. अनेक रोगांच्या साथींचे उच्चाटन, माल्थसच्या नाकावर टिच्चून गेल्या पन्नासेक वर्षांत दुष्काळावर मिळवलेला विजय, आंतरजाल आणि मोबाइलमुळे जवळ आलेले जग ही सगळी तंत्रज्ञानाच्या यशांची उदाहरणे झाली. त्या तंत्रज्ञानाला विज्ञानाचाच आधार आहे. पण याहीपलिकडे जाऊन माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीवरच विज्ञानाचा परिणाम होतो. अनेक वेळा तो चांगला असतो. पण काही वेळा तो वाईट असतो. तंत्रज्ञानातून जसा अणुबॉंब तयार होतो, तसंच वैज्ञानिक तत्त्वांचा गैर अर्थ किंवा सोयीस्कर अर्थ काढल्यामुळेही जगावर तितकेच भयंकर दुष्परिणाम होतात. गेल्या काही लेखांत आपण उत्क्रांतीवादाचा आढावा घेतला. या लेखात उत्क्रांतीवादाचा गैर अर्थ काढल्यामुळे विसाव्या शतकाच्या सुरूवातीला विचारसरणी कशी घडली, बदलली हे पाहाणार आहोत.

'सर्वात लायक टिकून राहातो' हा निसर्गनियम आहे. नैसर्गिक निवडीतून घडणाऱ्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा तो परिपाक आहे. मात्र हा निसर्गनियम सरसकटपणे मानवी वर्तनाला लावण्याचा प्रयत्न झाला. त्याची ही थोडक्यात गोष्ट.

१७७६ साली, डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत जगासमोर मांडण्याआधी सुमारे नव्वद वर्षे आधी अॅडम स्मिथने 'वेल्थ ऑफ नेशन्स' हा ग्रंथ लिहिला. त्यात त्याने अर्थशास्त्रीय तत्त्वांचे सर्वात प्रथम मूलभूत विश्लेषण केले. साडेतीनशे वर्षांनंतर आजही त्याचा गाभा लागू आहे. अॅडम स्मिथने आपल्या अर्थशास्त्रीय चर्चेत 'बाजाराचा अदृश्य हात' ही संकल्पना वापरली. अनेक लोकांच्या गरजा, त्यांच्या मागण्या, त्यांची विशिष्ट उत्पादनासाठी विशिष्ट किंमत मोजण्याची क्षमता आणि त्याचबरोबर त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लागणारे कष्ट, आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा यांच्यात समतोल साधण्याचे काम हा बाजाराचा अदृश्य हात करतो. काहीसे नैसर्गिक निवडीसारखंच. कोणी गरीब व्हावे, आणि कोणी श्रीमंत व्हावे हे बाजाराच्या गरजेनुसार आणि वैयक्तिक कौशल्यानुसार ठरते. ज्यांच्याकडे त्या गरजा पूर्ण करण्याचे कौशल्य, साधने असतात त्यांना श्रीमंत होता येते, ज्यांच्याकडे नसतात ते गरीब राहातात अगर बनतात. नैसर्गिक निवडीतही ज्या प्राण्यांकडे तत्कालीन परिस्थितीत तगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात ते तगतात, बाकीचे मरतात. बाजाराचा आणि नैसर्गिक निवडीचा अदृश्य हात सारख्याच पद्धतीने काम करतो. निसर्गात घडणाऱ्या घटना आणि मानवी समाजात घडणाऱ्या घटनांमध्ये इथे साम्य दिसते.

हे सर्व ठीकच आहे. मात्र प्रश्न येतो तो असा - की जंगलात जो नियम प्राण्याने जगावे की मरावे असे ठरवतो तोच नियम मानवी समाजासाठी, नैतिकता म्हणून लागू व्हावा का? अर्थशास्त्र काय, किंवा उत्क्रांतीवाद काय, एकदा वैज्ञानिक सत्य म्हणून मांडले गेल्यावर ते केवळ पुस्तकात राहात नाही. त्याचा आपल्याला सोयीस्कर अर्थ लावून त्याप्रमाणे फायदा करून घेण्यासाठी पुढे येणाऱ्या शक्ती समाजात असतात. या दोन्ही शास्त्रांचा संगम करून घेण्यात काही शक्तिवान घटकांचा फायदा होता. ते म्हणजे नवश्रीमंत - औद्योगिक उत्पादक किंवा कारखानदार. औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या यंत्रयुगात कारखानदारांकडे पैसा एकत्रित होत होता. सधन आणि त्यामुळे शक्तिवान असा एक नवीन वर्ग तयार होत होता. या वर्गाला आपल्या हाती असलेली संपत्ती व सत्ता ही आपल्याला आपल्या कर्तृत्वामुळे मिळालेली आहे, त्यासाठी दुर्बळांचे शोषण करण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आहे असे सांगणाऱ्या तत्त्वज्ञानाची आवश्यकता होती. सामाजिक डार्विनवादाने ती पूर्ण केली.

स्मिथने केलेल्या अर्थशास्त्राच्या मांडणीआधीही 'लेझे फेअर' किंवा फ्री मार्केट - मुक्त अर्थव्यवस्थेचे प्रतिपादक समाजात प्रबळ होते. त्यांच्या मते सरकारने बाजाराच्या कारभारात बिलकुल ढवळाढवळ करू नये, कारण अशा ढवळाढवळीमुळे बाजाराची कार्यक्षमता कमी होते असा युक्तिवाद असे. पण बाजाराचा अदृश्य हात, आणि सर्वात लायक टिकून राहातात हा निसर्गनियम यामुळे या युक्तिवादांना अधिष्ठान प्राप्त झाले. समाजात गरीब लोक का आहेत? याचे सोपे उत्तर म्हणजे जे आळशी आहेत, जे कमी बुद्धीमान आहेत, जे कमी कुशल आहेत, ज्यांच्याकडे श्रीमंत होण्याची क्षमता नाही, लायकी नाही ते गरीब राहातात - हा विचार पुढे यायला लागला, आणि प्रस्थापित व्हायला लागला. यातून श्रीमंत, सत्ताधारी आणि शक्तिवान हे नैसर्गिकरीत्या 'चांगले' आणि गरीब, सत्ताहीन आणि दुर्बळ हे नैसर्गिकरीत्या 'वाईट' किंवा कमी दर्जाचे हा विचार बळावायला लागला. त्यातून अनेक वाईट गोष्टी घडल्या. या मांडणीलाच 'सामाजिक डार्विनवाद' असे सामूहिकरीत्या म्हटले जाते.

युजेनिक्सचा जन्म आणि प्रसार हे त्याचे सर्वात भीषण स्वरूप. युजेनिक्स म्हणजे समाजातल्या वाईटांना पुनरुत्पादन करण्याची संधी नाकारणे, आणि चांगल्यांना अधिक पुनरुत्पादन करण्याची संधी देऊन एकंदरीत समाजाचे गुणधर्म सुधारण्याचा प्रयत्न. हे ऐकायला छान वाटते, पण चांगले कोण आणि वाईट कोण हे कोण ठरवणार? 'आम्ही श्रेष्ठ आणि ते कनिष्ठ' ही वर्णवादी, वंशवादी भावना पूर्वीपासूनच मानवामध्ये आहे. मात्र सामाजिक डार्विनवादातून जेत्यांना आपण केवळ जेते आहोत यापोटी इतरांना कनिष्ठ मानण्याची सबब मिळाली. त्याकाळी पसरत चाललेल्या साम्राज्यवादात ब्रिटिश हे भारतीयांपेक्षा श्रेष्ठ का आहेत, तर ज्याअर्थी ब्रिटिशांनी भारतावर विजय मिळवला त्याअर्थी ते श्रेष्ठच आहेत, त्यांचीच जगण्याची लायकी आहे, त्यांनाच हुकुमत गाजवण्याचा नैतिक अधिकार आहे. अशा प्रकारे स्वार्थ आणि शक्ती यांना इतरांवर हुकुमत गाजवण्याला नैतिक पाठबळ मिळाले. युजेनिक्स ही त्याच्या पुढची पायरी. समाजातले कमकुवत घटक नैसर्गिक निवडीने मरून जातात, आणि केवळ शक्तिवान घटक शिल्लक राहातात हा निसर्गनियम आहे. तेव्हा कमकुवत घटकांना मारून टाकणे, त्यांना गुलाम करणे, त्यांची संपत्ती हिरावणे, त्यांच्यावर सक्तीची नसबंदी करणे, त्यांना इतर 'सशक्त' वर्णियांशी लग्न करायला मनाई करणे अशा प्रकारच्या अनेक घटनांना ऊत आले होते. विसाव्या शतकातल्या पहिल्या दोन-तीन दशकांत अनेक देशांत या प्रकारच्या संशोधनाला आणि त्यानुसार कायदे व कारवाई करण्याला राजमान्यता होती.

युजेनिक्सची कल्पना फ्रान्सिस गाल्टनने - डार्विनच्या चुलतभावाने प्रथम मांडली. समाजाचा जनुक-समुच्चय सुधारण्यासाठी कमकुवत लोकांना पुनरुत्पादन करण्यापासून रोखले पाहिजे हे तत्त्व अनेक देशांनी अंगिकारले. अमेरिका, जर्मनी, स्वीडन यांसारख्या प्रगत देशांनी मंदबुद्धी व गुन्हेगारांना सक्तीची नसबंदी करण्याचे कायदे केले. अमेरिकेत विसाव्या शतकाच्या सुरूवातीपासून ते १९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत सुमारे ६४००० सक्तीच्या नसबंदी झाल्या. या नसबंदींच्या कार्यक्रमाच्या उदाहरणातूनच नाझी जर्मनीने आपला कार्यक्रम राबवण्यासाठी स्फूर्ती घेतली. युजेनिक्समागे एक वर्चस्ववाद होता, तो सरंजामशाही, वसाहतवाद, वर्णवर्चस्ववाद, फॅसिझम आणि नाझीझम यांतून दिसून आला. या सर्व तत्त्वप्रणालींना 'सामाजिक डार्विनवादाचाच' वैचारिक कणा होता. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट - टिकायला लायक टिकून राहातात या तत्त्वाचे रूपांतर 'आम्ही टिकलो, सत्तेत आलो याचा अर्थ आम्हीच श्रेष्ठ आहोत, आणि इतर नालायक आहेत' असा केला गेला होता. जगात कायमच जेते व जित असा भेदभाव होता. सामाजिक डार्विनवादातून त्या भेदभावाला वैचारिक पाठबळ मिळाले. तसे असणे हाच निसर्गाचा नियम आहे, आणि या नियमातूनच आपण जेते असण्यासाठी लायकीचे आहोत असा अभिमान जेत्यांना मिरवता आला.

युजेनिक्स आणि एकंदरीतच सामाजिक डार्विनवादाची विचारसरणी विसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमाराला - दुसऱ्या महायुद्धानंतर मागे पडली. याचे मुख्य कारण म्हणजे हिटलरने ज्यू वंशाची हत्या करण्याचे काम याच युजेनिक्सच्या तत्त्वांखाली केले होते. मानवी हक्कांची घोषणा जेव्हा जगातल्या बहुतेक देशांनी मान्य केली तेव्हा युजेनिक्स वापरण्याचा प्रयत्न करणे हे मानवी हक्कविरोधी ठरवण्यात आले. आणि सुदैवाने तेव्हापासून जगभरात वांशिक हत्याकांडाला मान्यता राहिलेली नाही.

आपल्याला सामाजिक डार्विनवाद्यांचे कुठेतरी चुकले हे मनातून समजते. पण नक्की गल्लत कुठे हे नीट समजत नाही. तगायला लायक ते टिकून राहातात हा निसर्गाचा नियम असेल तर तो मानवी समाजाला का लागू होऊ नये? उत्क्रांतीवादच जर म्हणत असेेल की शक्तीवान टिकून राहातात तर याचा अर्थ त्यांनी टिकून राहावे असा होत नाही का? इथे जो काही गोंधळ आहे तो नीट समजावून घेणे आवश्यक आहे. या दोनमध्ये मुख्य फरक आहे तो 'काय आहे' आणि 'काय असावं' यातला. डार्विनचा उत्क्रांतीवाद 'काय आहे' हे सांगतो. 'काय असावं' हे उत्क्रांतीवाद ठरवत नाही. 'आहे' पासून 'असावं'पर्यंतचा प्रवास हा कुठच्याही ठाम पायावर आधारलेला नाही. ती एक हवेत घेतलेली वैचारिक उडी आहे. निसर्गात अमुकतमुक दिसून येते म्हणजे निसर्गाची तशी इच्छा आहे हे आपणच कुठेतरी मनात गृहित धरतो. आणि मग ती इच्छा आपण स्वतःवरच नियम म्हणून लादून घेतो. खरे तर निसर्गाला इच्छा कसलीच नसते. तगायला लायक तगून राहातो या नियमातही टिकलेला तो चांगला असे म्हटलेले नाही. तो टिकलेला आहे, पुढच्या पिढीत गेलेला आहे इतकंच. तो विशिष्ट गुणधर्म पुढे जावा अशी कुठल्या निर्मात्याची, उच्च शक्तीची इच्छा आहे म्हणून नव्हे.

थोडक्यात, उत्क्रांतीवादाच्या तत्त्वाचा वर्चस्ववाद्यांनी आणि वर्णद्वेष्ट्यांनी आपल्या फायद्यासाठी गैर अर्थ काढून वापर करून घेतला. आपल्या जेतेपदामुळेच आपण जे करतो ते योग्य ठरते असे मानायला नैतिक अधिष्ठान मिळवले. आणि हे झाले याचे कारण म्हणजे उत्क्रांतीवादाने जे आहे त्याचे वर्णन केले तर सामाजिक डार्विनवाद्यांनी सोयीस्करपणे त्यातून काय असावे असा अर्थ काढला. सत्याचा राजकीय, आर्थिक सोयीसाठी अर्थ काढणे हे आजही जागोजागी दिसून येते. इतिहासातल्या उदाहरणांतून समज घेऊन अशी धूळफेक आपण जितक्या लवकर ओळखू तितके बरे.

(मी मराठी लाइव्हमध्ये पुर्वप्रकाशित)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

कारण एक अत्यंत महत्वाचा पैलु हा भाग कव्हर करतो. शिवाय हा अडचणीचा ठरु शकला असताही तुम्ही तो टाळलेला नाही हे तर फारच आवडलं. मात्र तरीही एखाद्याने म्हटलं काय हरकत आहे ना-लायकांची पैदास थांबण्यात वा थांबवण्यात तर त्या विरोधात वा बाजुने जो काय युक्तिवाद मजबुत युक्तिवाद उहापोह व्हायला हवा तसा काही लेखात आढळला नाही. अर्थात तो भाग एथिक्स मध्ये येतो म्हणुन असेल कदाचित. पण तरीही हा भाग फारच आवडला.

हा मुद्दा अडचणीचा वाटतो म्हणून मुद्दामून एक लेख लिहिला. याचं कारण अनेक जण 'सर्व्हायव्हल ऑफ दि फिटेस्ट' या निरीक्षणाचा वापर नैतिक मूल्यासारखा करतात. उत्क्रांती फक्त 'असं घडतं' असं सांगते. सामान्य लोक त्याला 'हे तो श्रींची इच्छा' समजतात, आणि सामाजिक धोरणाच्या मार्गे ती प्रत्यक्षात अाणण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कोणी शास्त्रज्ञाने 'सूर्यात सतत अणुस्फोट होत असतात' हे निरीक्षण सांगावं, आणि कोणीतरी 'अणुस्फोट व्हायला हवेत' असा त्याचा अर्थ काढण्यासारखं आहे. डिस्क्रिप्टिव्ह आणि प्रिस्क्रिप्टिव्ह यांच्यातल्या फरकाबद्दल पुढच्या लेखात अजून थोडं येईल.

ना-लायकांची पैदास थांबवणं किंवा उत्तमांची पैदास वाढवण हे तत्त्वतः चुकीचं नाही. एक उदाहरण घेऊ. गर्भात असलेल्या मुलाला हात पाय निर्माणच झालेले नाहीत असं दिसून आलं, तर तो योग्य वेळेत पाडणं आपल्याला पटू शकतं. किंवा गर्भाची वाढ चांगली व्हावी म्हणून आईने दारू-सिगरेट न घेणं, योग्य ती व्हिटॅमिन्स वगैरे घेणं हे तर निश्चितच योग्य आहे. त्याने जनुकांवर प्रत्यक्ष परिणाम होत नसला तरी त्यांची प्रक्रिया योग्य रीतीने व्हायला मदत होते. पण या काही उघड गोष्टी सोडल्या तर अमुक गुणधर्म असलेली व्यक्ती समाजात जगायला ना-लायक आहे असा शिक्का मारून ती जनुकं पुढे जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करणं मला तरी अमानवी वाटतं. त्यापेक्षा समाजाची शक्ती त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांचा वापर करून घेऊन समाजात सामावून घेण्यासाठी खर्च झाली तर ते अधिक परिणामकारक होईल.

दुसरं असं की लायक आणि ना-लायक यांच्यातल्या कुठच्या गोष्टी निसर्गातून आल्या आणि किती संगोपनातून आल्या हे कसं ठरवणार? समजा जगातल्या सगळ्यांची उंची मोजली आणि विशिष्ट उंचीच्या खालच्यांनी पुनरुत्पादन करायचं नाही असं ठरवलं तर त्यातले किती जनुकांमुळे आहेत आणि किती गर्भात किंवा बालपणी कुपोषण झाल्यामुळे खुरटले आहेत हे कसं समजणार?

एकंदरीत जीन पूल मर्यादित करणं, त्यातल्या जनुकांचं प्रमाण बदलणं हे प्रचंड गोंधळाचं प्रकरण आहे. समजा नव्या तंत्रज्ञानानुसार काही गुणधर्म निवडता आले - म्हणजे माझं मूल सहा फूट उंचीचं होईल अशी व्यवस्था करता आली, तर ती करावी का? डिझायनर जीन्स हेही असंच नैतिक प्रश्नांनी ठासून भरलेलं प्रकरण आहे. कारण त्याच्या पुढचा प्रश्न असा येतो की माझं मूल हे स्त्री न होता पुरुषच होईल अशी व्यवस्था करायला मला परवानगी मिळावी का? उत्तरं सोपी नाहीत.

विज्ञानात सर्वमान्य ठरलेला नियम सामाजिक जीवनामध्ये सर्वमान्य, नैसर्गिक म्हणून सरळसरळ मानता येणार नाही, विज्ञानामधून सामाजिक कायदेकानून शोधण्याची प्रेरणा मिळते असं अजिबातच नाही, याचं हे उदाहरण आवडलं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

डार्विनने वर्णन केलेल्या उत्क्रांतीच्या वर्णनाची तीन तत्त्वे आहेत :
(१) वंशाने पुढे चालणारे नैसर्गिक फरक उद्भवणे
(२) प्रत्येक पिढीत जन्म झालेल्यांची संख्या जिवंत राहाण्याकरिता उपलब्ध साधनांपेक्षा अधिक असणे
जर १+२, तर दर पिढीत निर्वंश मृत्यू पावणारे जीव हे वजाबाकीने अटळ आहे, ते जगणारे/मरणारे कुठले?
(३) तगण्यात सरस नैसर्गिक फरक असलेले जीव मरण्यापूर्वी पुढची पिढी उत्पन्न करतात, आणि तगण्यात कुचकामी असलेले जीव पुनरुत्पादन करण्यापूर्वी मरतात.

पैकी मुद्दा २ हा "सोशल डार्विनियन" लोकांच्या खिजगणतीत नसतो. किंवा सत्य नसतानाही मांडला जातो - "Lebensraum" = "जगण्याकरिता जागा" उपलब्ध नाही अशी हूल नात्झी राजकरण्यांनी उठवली होती, ते खोटे होते - त्यापेक्षा कितीतरी अधिक लोक त्याच क्षेत्रफळात सहज जगत आहेत!
मुद्दा २ चुकीचा असल्यामुळे त्यापुढचा युक्तिवाद "अटळ" राहात नाही, त्यामुळे मुद्दा ३ पोचतच नाही.

मुद्दा (१) वरून कोणाचा खून करायचा, म्हणून (२) कडे डोळेझाक करून मुद्दा (३) सिद्ध ठरवणे, म्हणजे तर्कदोष आहे.

माझ्या मते, मुळातच "सोशल डार्विनिझम" तर्कदुष्ट संकल्पना आहे --
लेखक म्हणतो की "अनेक जण 'सर्व्हायव्हल ऑफ दि फिटेस्ट' या निरीक्षणाचा वापर नैतिक मूल्यासारखा करतात (आणि हे चुकीचे आहे)"
लेखकाचे हे म्हणणे योग्यच आहे, परंतु "सोशल डार्विनिझम"च्या तर्कदोषामुळे काहीसे *अनावश्यकही आहे. (*superfluous म्हणायचे आहे, unnecessary नव्हे.)