नैसर्गिक शेती - भाग ५

नैसर्गिक शेती हा शब्दप्रयोग अलिकडे बराच ऐकण्यात-वाचण्यात येतो. ही नेमकी काय भानगड आहे, आणि त्यातल्या तज्ञ म्हणवणाऱ्या लोकांनीही त्यात कसे वैचारिक गोंधळ घालून ठेवले आहेत, त्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा या टिपणांमधून प्रयत्न करते आहे. या मालिकेतील माहिती ही बव्हंशी माझे वडील डॉ. आनंद कर्वे यांनी गेल्या साठेक वर्षांत केलेल्या कामावर आधारित आहे. कार्यबाहुल्यामुळे जेव्हा वेळ होईल तेव्हा छोट्या छोट्या टिपणांमधून विषय पुढे पुढे नेत राहीन.
...
अनुक्रमणिका: नैसर्गिक शेती - भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८
...

** प्रवासात असल्यामुळे मध्ये बराच वेळ गेला आहे, त्याबद्दल क्षमस्व. **

भाग 4 मध्ये मी निसर्गात मातीतले जीवाणू आणि त्या मातीत वाढणाऱ्या वनस्पती यांमधल्या परस्परावलंबित्वाबद्दल लिहिले होते. जीवाणूंद्वारे वनस्पतींना मातीतील पोषणद्रव्ये उपलब्ध होतात, आणि वनस्पतींच्या जमिनीवर पडणाऱ्या फुले, फळे, पाने, फांद्या इ. जैवभारातून जीवाणूंना कर्बयुक्त अन्न मिळते. शेती म्हणजे निसर्गाच्या रचनेत माणसाने केलेली ढवळाढवळ आहे. या ढवळाढवळीचा परमोच्च बिंदू रासायनिक शेतीत गाठला गेला.

1940च्या दशकात जगाची लोकसंख्या साधारण 2 अब्ज इतकी होती, आणि लोकसंख्यावाढीचा वेग पहाता पुढच्या 30-40 वर्षांत तिची वाटचाल दुपटीच्या दिशेने होण्याची लक्षणे दिसत होती. कित्येक विकसनशील देश आपल्या लोकसंख्येचे पोट भरण्यासाठी अन्नधान्य आयात करत होते. लोकसंख्यावाढीच्या या झपाट्यामुळे सर्व जगासाठी अन्नसुरक्षेची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती भविष्यवेत्त्यांना वाटू लागली. उपलब्ध शेतीच्या उत्पादनात झपाट्याने लक्षणीय वाढ करण्यावर कृषिसंशोधकांनी लक्ष केंद्रित केले. महत्तम उत्पन्न देऊ शकणारी सुधारित संकरित वाणे प्रयोगशाळांतून निर्माण केली गेली. बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्या असा एक नवा व्यवसाय उदयाला आला.

असे निगुतीने बनवलेले आणि महागडे बियाणे जमिनीत लावल्यावर त्याच्यापासून अपेक्षित उत्पन्न मिळण्यासाठी त्या पिकाला आदर्शवत परिस्थिती मिळणेही आवश्यक होते. यासाठी बेभरवशाच्या पर्जन्यचक्रावर अवलंबून रहाणे परवडणारे नव्हते. तसेच पोषणमूल्ये पुरवणाऱ्या जीवाणूंवर आधारित नैसर्गिक व्यवस्थेचे पुरेशी ज्ञान नसल्यामुळे अशा अज्ञात गोष्टीवर अवलंबून रहाणेही धोक्याचे ठरू शकणार होते. त्यामुळे पिकाला वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आवश्यक भरपूर पाणी आणि पोषण मिळण्यासाठी सिंचन व्यवस्था उभी करणे आणि बाहेरून पोषणद्रव्यांनी युक्त खते पुरवणे आवश्यक होऊन बसले. भरपूर उत्पादन देणाऱ्या अशा पिकांचे कीटक आणि इतर भक्षकांपासून तसेच तणापासूनही रक्षण करणे अर्थातच तितकेच गरजेचे होते. कर्मधर्मसंयोगाने यासाठी उपयुक्त रसायने जगभराला पुरवू शकतील असे कारखानेही अस्तित्वात होते, आणि त्यांना त्यावेळी काही काम उरलेले नव्हते.

बऱ्याच जणांना हे माहित नसेल कदाचित, पण कीटकनाशके आणि तणनाशके बनवणाऱ्या जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्या मूळच्या जर्मन कंपन्या आहेत आणि हा योगायोग नाही. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात ज्यू लोकांना मारण्यासाठी जर्मनीतील नाझी राजवटीला लागणारी विषारी रसायने बनवण्यासाठी हे कारखाने उभे करण्यात आले होते. दुसऱ्या महायुध्दानंतर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी या कंपन्यांनी याच रसायनांमधून कीटकनाशके आणि तणनाशके निर्माण केली, आणि जगभरातल्या शेतीचे उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नांना हातभार लावून आपल्या काळ्या इतिहासावर रंगसफेदी केली.

1940च्या दशकात मेक्सिकोतल्या यशस्वी प्रयोगानंतर हरित क्रांती या नावाखाली या शेतीच्या पध्दतीचे लोण झपाट्याने जगभर पसरले. ज्यांना ही खर्चिक शेती शक्य होती, त्यांनी या पध्दतीचा अंगीकार केला. जगभरातील अन्नोत्पादनात या शेतीमुळे कित्येक पटीने वाढ झाली. हरित क्रांतीच्या माध्यमातून लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतानेही अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता साध्य केली, हा या शेतीच्या पध्दतीच्या परिणामकारकतेचा पुरावा दिला जाऊ लागला.

पण शेतीच्या ह्या पध्दतीचे इतरही काही परिणाम झाले. फार विषयांतर करत नाही, पण एक-दोन गोष्टींचा उल्लेख केल्यावाचून रहावत नाही.

भारताच्या बाबतीत धान्यपीक म्हणून सरसकट विंध्य पर्वतराजींच्या उत्तरेला गहू आणि दक्षिणेला तांदूळ अशी विभागणी करून तेवढ्याच पिकांवर लक्ष केंद्रित केले गेले. यामुळे जी पिके विशिष्ट प्रदेशांत मोजक्याच ठिकाणांसाठी तिथल्या जमीन-पाणी-हवामानाला अनुरूप पिके होती, ती या शर्यतीत मागे पडली. उदा. बाजरी, नाचणी, इ. याचे प्रतिबिंब अर्थातच लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीतही पडले. अर्थात काही ठिकाणी ऊसासारख्या नगदी पिकांनी अन्नधान्याच्या सर्वच पिकांना सिंचनाखाली असलेल्या शेतीतून पूर्ण पळवूनच लावले आहे.

बियाणे कंपन्यांच्या वितरकांनी ग्रामीण भागात पूर्वीच्या सावकारांची जागा घेतली, हाही हरित क्रांतीचा एक परिणाम म्हणायला हवा. शेतकऱ्यांच्या हातात पीक बाजारात गेल्यानंतर पैसा येतो. संकरित बियाणांची रासायनिक शेती यशस्वीपणे करायची असेल तर दरवर्षी बियाणे नव्याने घ्यावे लागते, आपल्या पिकातलेच काही धान्य बियाण्यासाठी वापरले तर उत्पन्न कमी येते. बियाण्याच्या जोडीला खते, कीटकनाशके, तणनाशके, इ.चा वेळोवेळी खर्च करावा लागतो. याशिवाय शेतमजूर, ट्रॅक्टर, पाण्याचा पंप, इ. चा खर्च चालू असतोच. मग बियाणे कंपनीचा वितरकच बियाण्याच्या जोडीला इतर आदानांचाही वितरक आणि स्थानिक पातळीवरचा शेतीसल्लागारही बनतो. बियाणे, खते, इ. सर्व विक्री शेतकऱ्याला उधारीवर केली जाते, आणि पीक बाजारात गेले की शेतकऱ्याकडून सव्याज वसुली केली जाते. यात वितरकाला कोणताच धोका पत्करावा लागत नाही, कारण पुन्हा पुढच्या पिकाच्या बियाण्यासाठी शेतकऱ्याला याच वितरकाकडे यावे लागणार असते. मात्र शेतकरी जितकी जास्तीत जास्त खते, कीटकनाशके, तणनाशके, इ. वापरेल तितका यात वितरकाचा फायदा असतो, तसेच ही रसायने विकणाऱ्यांचाही फायदा असतो. यामुळे कधी जाहिरातींचा मारा करून, तर कधी कृषिसंशोधकांना हाताशी धरून दर वर्षी शेतकऱ्याला अधिकाधिक खते, कीटकनाशके, तणनाशके, इ. विकत घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. शासनही वेगवेगळ्या अनुदानांची लालूच दाखवून या प्रयत्नांना हातभार लावत रहाते.

रसायनांचा जमिनीत होणारा वापर जसजसा वाढतो, तसतसे शेतजमिनीतील वनस्पती आणि जीवाणू व इतर सजीव यांच्यातले सहजीवन मोडीत निघते. सुरूवातीला काही काळ यामुळे फारसे काही बिघडताना दिसत नाही. उलट उत्पन्न काही पटीने वाढते. मात्र नंतर हळुहळू पूर्वीइतकेच उत्पन्न मिळवण्यासाठी दरवर्षी जास्त जास्त खते वापरावी लागताहेत असे जाणवू लागते. एका विशिष्ट मर्यादेनंतर खताची मात्रा कितीही वाढवली, तरी उत्पन्न वाढत तर नाहीच, उलट कमी होऊ लागते. उदा. माझे लहानपण पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या परिसरात गेले तिथे 1970-80च्या सुमाराला सहजपणे एकरी शंभर-शंभर टन उसाचे उत्पन्न निघत होते. आता मात्र त्याच शेतकऱ्यांना एकरी तीस-चाळीस टन उत्पन्न मिळाले तरी समाधान मानावे लागते आहे. दरमान्य वापरत असलेल्या कीटकनाशकांना आणि तणनाशकांना पुरून उरण्याची क्षमता कीटकांमध्ये आणि तणांमध्ये विकसित होत गेल्याने या रसायनांची मात्रा आणि फवारणीची वारंवारिता वाढत गेली आहे. अधिकाधिक जालीम विषारी रसायनांचा वापर करावा लागतो आहे.

अर्थात रासायनिक शेतीच्या व्यापकतेमुळे आपल्या अन्नसाखळीतही या रसायनांचा प्रवेश झालेला आहे, आणि त्यांच्या वेगवेगळ्या परिणामांना आपल्याला तोंड द्यावे लागते आहे. याचे सर्वात भयानक उदाहरण पंजाबचे आहे. पंजाबमध्ये कर्करोगाचा प्रादुर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाला आहे. इतके की रोज सकाळी भटिंडाहून बिकानेरला येणाऱ्या आगगाडीचे नावच कॅन्सर ट्रेन पडले आहे. भारतातल्या 19 प्रादेशिक कर्करोग संशोधन केंद्रांपैकी पंजाबला सर्वात जवळ असणारे केंद्र बिकानेरमध्ये आहे. कर्करोगावर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनीच ही 12 डब्यांची आगगाडी भरलेली असते. हरित क्रांतीचा सर्वाधिक फायदा पंजाबमधील शेतकऱ्यांनी करून घेतला. भारताचे गव्हाचे कोठार बनण्याचा मान या राज्याने मिळवला, आणि तिथले अनेक शेतकरीही याद्वारे सधन बनले आहेत. पण आता कर्करोगाच्या भस्मासुराने या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बिकानेरमधील संशोधन केंद्र कर्करोगाच्या या प्रादुर्भावाची कारणे शोधण्यासाठीही संशोधन करत आहे. अपायकारक रसायनांच्या शेतीतील अतिवापराशी याचा संबंध असण्याची दाट शक्यता संशोधक व्यक्त करतात, पण अजून नेमके कारण सांगता येण्याइतकी संशोधनात प्रगती झालेली नाही.

गेल्या काही दशकांत हरित क्रांतीमुळे उत्पन्नात झालेली वाढ ओसरू लागली, आणि रसायनांच्या अतिवापराचे इतर परिणाम पुढे येऊ लागले, त्यामुळे सेंद्रीय शेतीचा विचार पुढे आला. सेंद्रीय शेती आणि रासायनिक शेती यात काय बदल आणि साम्यस्थळे आहेत, ते पुढच्या लेखात.
...
अनुक्रमणिका: नैसर्गिक शेती - भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८
...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

वाचतो आहे. रासायनिक शेती, तिचे दुष्परिणाम, तिचे सुपरिणाम, त्यातून वाढणारं (अथवा फार न वाढणारं) उत्पादन यात मला प्रचंड रस आहे. माझं थोडकं ज्ञान प्रसिद्ध आकडेवारीवर आधारित असल्यामुळे त्या आकडेवारीच्या मागे दडलेली सत्यं उलगडून दाखवलेली आवडतील.

एक संपादक म्हणून - लेखमाला सलग प्रसिद्ध करण्यासाठी त्यातले लेख 'पुस्तकाचं पान' या स्वरूपात प्रसिद्ध करणं ऐसीवर तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे. तुम्ही योग्य ते पुस्तक निवडलं तर ती पानं पहिल्या लेखाच्या खाली एकमेकांना 'जोडलेली' दिसतात. या लेखमालेचं त्या प्रकारात रूपांतर करण्याचा मी प्रयत्न करेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. पुस्तक स्वरूप निश्चितच जास्त उपयुक्त ठरेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

मस्त लेखमाला...

पुभाप्र.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जिथे व्यक्तीपेक्षा विचारांना प्राधान्य तिथेच रहावे.व्यक्तीस्तोम माजले की नाश हा ठरलेलाच.

माहितीपूर्ण लेखांक.

मागचे भाग वाचल्याचा परिणाम -
सध्या आमच्याकडे ओकाच्या झाडांची पानं गळायला सुरुवात झाली आहे. ही पानं गोळा करून, कागदी थैलीत भरली की आपलं काम संपलं असा विचार करत होते. आता प्लास्टीकच्या थैल्यांमध्ये ही सगळी पानं भरून ठेवत आहे. कंपोस्टरात ही पानं भरण्याएवढी जागा नाही, त्यामुळे प्लास्टीकच्या थैल्या. ही पानं आकाराने जरा कमी झाली की हळुहळू कंपोस्टरात तरी सरकवेन किंवा त्या थैल्यांमध्येच सगळं कुजवून अंगणात विखरून टाकेन.
दुसरं, किंचित अन्न असलेलं पाणी बादलीत जमा करून बागेत ओतून द्यायला लागले आहे. (सुदैवाने अजूनपर्यंत मुंग्या दिसत नाहीयेत.) त्यातल्या बारक्या अन्नकणांमुळे जीवाणूंचं पोषण होईल अशी आशा आहे.

(बरेच दिवस पुढच्या भागाची वाट बघत होते; उशीराबद्दल क्षमा केली. :प)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाने कुजण्यापर्यंत वाट पहाण्याची गरज नाही, आहेत तशीच चुरून अंगणात पसरून दिली किंवा मातीत मिसळून टाकली तर जास्त चांगले. किंबहुना या पध्दतीत पानांच्या कमी कचऱ्यातूनही झाडांना पुरेसे पोषण देणे शक्य होते. उरलेला जैवभार इतर कामांसाठी वापरता येतो. या मुद्द्याबाबत अधिक माहिती पुढील लेखांकात येईल.

भारतात रहाणाऱ्यांना अशा वाळक्या पालापाचोळयापासून कोळसा बनवता येईल. इतर ठिकाणी रहाणाऱ्यांना कदाचित स्थानिक नियमांमुळे असे करणे शक्य होणार नाही, पण योग्य साधन वापरत असाल, तर कदाचित परवानगी मिळूही शकेल. गुगलवर बायोचार या विषयावर शोध केल्यास बरीच माहिती उपलब्ध आहे.

कोळसा ही एक बहुपयोगी वस्तू आहे. एरवी निरूपयोगी असलेल्या कचऱ्यापासून कोळसा करणे, हे लाकूड तोडून कोळसा करण्यापेक्षा निश्चितच जास्त निसर्गपूरक आहे. स्वच्छतागृहात, वाहनात, हवाबंद खोल्यांमध्ये कोॆदट वास येऊ नये म्हणून ओडोनिल, अॅंबिप्युअर वगैरे रासायनिक उत्पादने वापरत असाल, तर त्याऐवजी ५०-१०० ग्रॅम कोळशाची पुरचुंडी ठेवली तरी काम भागते. फ्रीजमध्येसुध्दा ५० ग्रॅम कोळशाची पुरचुंडी करून ठेवली, तर एका पदार्थाचा वास दुसऱ्या पदार्थाला लागणे कमी होते. साधारण दर दोनेक आठवड्यांनी पुरचुंडी बदलावी लागेल. अशा रितीने वापरून झालेला कोळसाही बागेत विखरून टाकावा.

कोळसा बनवण्याच्या अनेक सोप्या कृती आहेत. इंटरनेटवर अनेकांचे व्हिडिओ व माहिती उपलब्ध आहे. मी आणि माझ्या वडिलांनी विकसित केलेल्या कृतीच्या व्हिडियोसाठी पहा -
https://www.youtube.com/watch?v=zowFwJ_a0k0&list=PLO9IWBWSV1ah7dPoVwc5T0...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

अधिक माहितीची वाट बघत आहेच.

आमच्या भागात लाईव्ह ओक नावाचे बरेच वृक्ष आहेत. यांची पानं वसंत ऋतूच्या सुरुवातीला गळतात आणि उन्हाळ्यात झाड पुन्हा हिरवं होतं. पुन्हा थंडीच्या आधी निराळ्या झाडांची पानगळ होते. वर्षातले सहा महिने पानगळ होते, उरलेले सहा महिने होत नाही. पानगळ होताना अडचण अशी वाटते की पानांनी जमीन झाकली तर खालचं गवत मरून जाईल. म्हणून काही पानं चुरून तशीच सोडून देते. बहुतेकशी गोळा करते. पानगळ संपल्यावर ही उचललेली पानं पुन्हा जमिनीवर पसरता येतील. हे सगळं अमेरिका नामक सुक्काळात होत असल्यामुळे पानं उचलणं, चुरणं, एकत्र करणं यांसाठी लॉनमोअर प्रकार वापरता येतो. लॉनमोअरची पिशवी तेवढी रिकामी करायला लागते. (तेवढाच वजनं उचलायचा व्यायामही होऊन जातो.)

कालच टोमॅटो, वांगी, मिरच्यांची रोपं लावली. त्या सगळ्या भागात जमिनीवर आच्छादन म्हणून ह्या पानांचा भुगा पसरून देईन.

इंटरनेटवर बऱ्याच ठिकाणी वाचलं की वापरलेल्या कॉफीची पूड जमिनीवर आच्छादन म्हणून आणि फ्रीज, कचऱ्याची पेटी या भागांतले वास अॅडसॉर्ब* करण्यासाठी वापरता येते. या वापराशिवायही वासांचा फार त्रास होत नाही. अमेरिकेत स्टारबक्सात अशी वापरलेली कॉफी देऊन टाकतात. कॉफीच्या वापराबद्दलही लिहाल का?

* अॅडसॉर्ब यासाठी मराठी शब्द आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अॅडसॉर्ब यासाठी मराठी शब्द आहे काय? यासाठी मराठी शब्द आहे काय?
.......Adsorptionसाठी पारिभाषिक शब्दकोशात 'अधिशोषण' असा शब्द आहे.
मला हा चुकीचा वाटतो कारण अ‍ॅड्सॉर्प्शनच्या क्रियेत 'शोषणे' ही क्रियाच नसते; जरी 'अधि' जोडल्याने 'वर, भोवती' असे सूचित केले गेले तरी.
Adsorptionमध्ये एका पदार्थाचे (द्राव, वायू) कण दुसर्‍या पदार्थाच्या (घन, द्रव) पृष्ठभागावर येऊन बसतात नि त्यांचा एक पातळ पडदा/थर तयार होऊन चिकटतो. पण शोषण्याच्या क्रियेतले एकमेकांत गुंतणे, मिसळणे हे कदापि होत नाही. माझ्या मते पारिभाषिक शब्दासाठी 'पृष्ठलेपन' वा वापराच्या मराठीत 'लिंपण' हे शब्द अधिक जवळचे आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोळशाच्या पुरचुंडी विषयी आत्ता प्रथमच कळले. लेखमाला मस्तच आहे. वेळात वेळ काढून आम्हाला ह्या विषयाची माहिती देत आहात त्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उल्का

छान! लेखमाला सुरेख चालु आहे. आभार

अवांतरः
नेमकं आजच बजेट घोषित झालं आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या या घोषणा स्वगतार्ह वाटल्या:

बी-बियाणे तपासणीसाठी देशभरात २ हजार मॉडेल प्रयोगशाळा उभारणारः जेटली

पारंपरिक कृषि विकास योजना, ऑर्गेनिक चेन फार्मिंगसारख्या योजनांसाठी ४०० कोटी रुपयांची तरतूदः जेटली

पाच लाख एकरांवर जैविक शेती करता येईलः जेटली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!