मी आणि शाळेचे Reunion - (भाग ५) पोटाने केला घात

----------------------
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ६
---------------------

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जिम मध्ये गेलो. सहाय्यक तयार होता. गेल्या दीड एक महिन्याच्या मेहनतीने काय फळ दिले ते जाणण्याची उत्सुकता मला देखील होती. कपडे बदलून मापे द्यायला उभा राहिलो. जिममध्ये घुमणारे "अभी तो पार्टी शुरू हुई है " हे गाणे मला माझ्या मनस्थितीचे निदर्शक वाटले. माझा सहाय्यक आला. मापे घेऊ लागला. नोंदवून ठेऊ लागला. मान, छाती, दंड, फोर आर्मस, मांड्या, पोटऱ्या सगळ्यांची मापे इंच दोन इंचांनी कमी झाली होती. म्हणजे अनावश्यक चरबी जाऊ लागली आहे या कल्पनेने मी खूष झालो.

जिम मध्ये घुमणारे गाणे बदलले. कोरस सुरु झाला. "ओ ओ होय … ओ ओ होय … ओ ओ होय …" बाजीरावाचा भूमिकेतील रणवीर सिंघ गाणे म्हणत नाचू लागला.

बजने दे धड़क धड़क
ढोल ताशे धड़क धड़क
भंडारा झिड़क झिड़क मल्हारी

सहाय्यकाने पोटाचे माप घ्यायला सुरवात केली. त्याचा चेहरा पडला. त्याने वर खाली करून दुसऱ्यांदा आणि मग तिसऱ्यांदा माप घेतले. काहीतरी चुकले आहे ते मला कळले. भंसाळीचे बाजीराव नाचत होते. म्हणत होते,

खड़क तड़क भड़क साली
चटक मटक फटक साली
दुश्मन की देखो जो वाट लावली
वाट लावली
वाट लावली
वाट लावली

सहाय्यक म्हणाला, "सर, काही कळत नाही, पण तुमचे पोट दोन इंच वाढले आहे." त्या वाक्याने मला क्षणार्धात तडिताघात या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष अनुभवता आला. मी पिंगा गाणे जास्त आपुलकीने पाहिले आणि दिपिकारूपी सांप्रतकालीन मस्तानीकडे आणि प्रियांकाकडे प्रेमपूर्ण नजरेने पाहिले म्हणून मी इतिहासकालिन पेशवाईचा दुश्मन कसा काय झालो? अटकेपार लावायचे झेंडे घेऊन निघालेले मराठे माझ्या पोटावर का बरे अडखळले असावेत? असे प्रश्न मला पडले. माझे पोट वाढले कसे? याचा विचार करताना सर्व सहाय्यकांचे मत झाले की प्रवेश घेतानाचे वेळी माझी मापे घेण्यात तेंव्हाच्या सहाय्यकाची चूक झाली असावी.

आणि मग मी वजन काट्याकडे गेलो. उत्साह तर ओसरलाच होता. मग खांदे पाडून वजन काट्यावर उभा राहिलो. सहाय्यकाचा चेहरा कसनुसा झाला. फक्त शंभर ग्रॅम ने वजन कमी झाले होते. तो गप्पच राहिला. म्हणजे दीड महिने मी केलेल्या अंग मेहनतीचे फळ दोन इंच वाढलेले पोट आणि शंभर ग्रॅम कमी झालेले वजन असे होते तर. आणि ते कमी झालेले वजनदेखील मी आदल्या दिवशीच्या संध्याकाळी कापलेल्या केसांमुळे असावे अशी दाट शंका येऊन मी अजूनच दु:खी झालो. पण मग केस कापलेच नसते तर हे शंभर ग्रॅम देखील कमी झालेले दिसले नसते हे जाणवून मी संतोषचे आभार मानले.

भंसाळीचे बाजीराव माझी वाट लावून नाचायचे थांबले होते. आता "ओ तू भाग मिल्खा" हे माझे आवडते गाणे लागले पण माझ्या हरलेल्या मनाला ते उभारी देऊ शकत नव्हते. माझा सहाय्यक पण कान कोंडला झाला होता. शेवटी मीच त्याला म्हणालो, बहुतेक माझ्या हाडांचे वजन जास्त असेल. तो हसला. माझा फक्त चेहराच हसला. मी घरी आलो. शाळेतील मुले "हात पाय काडी अन पोट वाढी" असे चिडवतात म्हणून टिळकांनी व्यायाम करून शरीर कमावले त्याची गोष्ट माहित होती. पण त्यांच्याच नावाच्या शाळेतल्या मी, व्यायाम करून हात पाय काडी अन पोट वाढी करून घेतले हे कळल्याने मी हताश झालो होतो. लोकमान्यांना हे कळले तर "मोरेंचे पोट ठिकाणावर आहे काय?" असा काही नवा अग्रलेख लिहितील अशी शंका येउन त्या उद्विग्न मनस्थितीतदेखील मला थोडे हसू आले.

पोटाचे दोन इंच वाढल्याच्या धक्क्यामुळे Reunion ला जायचा उत्साह थोडा मावळला होता. कशाला जायचं स्वतःचं हसू करून घ्यायला? असा विचार मनात बळावत होता आणि बाकीचे आयुष्य आपल्या संथ गतीने चालले होते. अशातंच एका रात्री टी व्ही वर Life of Pi पिक्चर पहात होतो. माझा अत्यंत आवडता शेवटचा सीन चालू झाला. Pi म्हणतो, "रिचर्ड पार्कर मागे वळून न बघता निघून गेला" मग पुढची वाक्ये बोलता बोलता Pi रडतो. Pi ची गोष्ट ऐकणारा Yann Martel चे डोळे पाणावतात. आणि मी सुद्धा प्रत्येकवेळी रडतो. रडता रडता मनात एक गोष्ट नक्की झाली की पोट वाढले असले तरी Reunion ला जायचे. एकदा तरी मागे वळून बघायचे.

----------------------
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ६
---------------------

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

ओहोहो! क्या बात है!

प्रत्येकवेळी रडतो. रडता रडता मनात एक गोष्ट नक्की झाली की पोट वाढले असले तरी Reunion ला जायचे. एकदा तरी मागे वळून बघायचे.

या सकारात्मकतेवरती जान कुर्बान Smile
.

अटकेपार लावायचे झेंडे घेऊन निघालेले मराठे माझ्या पोटावर का बरे अडखळले असावेत? असे प्रश्न मला पडले.

BiggrinBiggrinBiggrin
.

मी घरी आलो. शाळेतील मुले "हात पाय काडी अन पोट वाढी" असे चिडवतात म्हणून टिळकांनी व्यायाम करून शरीर कमावले त्याची गोष्ट माहित होती. पण त्यांच्याच नावाच्या शाळेतल्या मी, व्यायाम करून हात पाय काडी अन पोट वाढी करून घेतले हे कळल्याने मी हताश झालो होतो. लोकमान्यांना हे कळले तर "मोरेंचे पोट ठिकाणावर आहे काय?" असा काही नवा अग्रलेख लिहितील अशी शंका येउन त्या उद्विग्न मनस्थितीतदेखील मला थोडे हसू आले.

हाहाहा कसली हसले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आदल्या दिवशीच्या संध्याकाळी कापलेल्या केसांमुळे असावे अशी दाट शंका येऊन मी अजूनच दु:खी झालो. पण मग केस कापलेच नसते तर हे शंभर ग्रॅम देखील कमी झालेले दिसले नसते हे जाणवून मी संतोषचे आभार मानले.

लोल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0