नात्यांचा जनुकीय पाया

ललित

नात्यांचा जनुकीय पाया

- राजेश घासकडवी

"मी माझ्या दोन सख्ख्या भावंडांचा जीव वाचवण्यासाठी किंवा आठ चुलतभावंडांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार आहे" - जे. बी. एस. हाल्डेन, जनुकशास्त्रज्ञ

बिरबल-बादशहाची एक गोष्ट आहे. बादशहा म्हणतो, “आईचं प्रेम सर्वात श्रेष्ठ.” बिरबल म्हणतो, “स्वतःचा जीव सर्वात जास्त प्रिय.” निवाडा करण्यासाठी ते एका माकडिणीला तिच्या पिल्लाबरोबर एका खोल हौदाच्या मध्यात बांधून ठेवतात. हौदात पाणी भरलं जातं. माकडीण पिल्लाला छातीशी घेते. पाणी छातीपर्यंत येतं तशी ती खांद्यावर घेते. खांद्यावर पाणी येतं तशी डोक्यावर बसवते. पण तिच्याच नाकातोंडात पाणी जायला लागल्यावर सरळ आपल्या पिल्लाला पायाखाली घालते आणि शक्य तितकं उंच होऊन स्वतःचा श्वास जपते.

ही कथा खरी की खोटी हे माहीत नाही. पण त्याने काही फरक पडत नाही. ती आपल्याला आपण आपली नाती याविषयी विचार करायला लावते. एकाच वेळी आईवडील आपल्या मुलांसाठी खस्ता खाताना दिसतात, त्याग करताना दिसतात. आईवडील जाऊ देत - आपली भावंडं, जवळचे नातेवाईक यांना आपल्या आयुष्यात नेहेमीच विशेष स्थान असतं. अडीअडचणीला भावंडं अनेकवेळा पाठीमागे खंबीरपणे उभी राहताना दिसतात. संकटात एकमेकांना हात देतात. पण प्रसंग नक्की जीवावर बेततो तेव्हा नक्की काय होतं? आपल्याला दोन्ही बाजूंची चित्रं दिसतात. पुराच्या पाण्यात पडलेल्या भावंडाला वाचवण्यासाठी उडी घेणारा भाऊ असतो. तर राज्यासाठी एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसणारी भावंडंही इतिहासात सर्वत्र विखुरलेली दिसतात. केव्हा मदत करायची, केव्हा जीव धोक्यात घालायचा, कोणासाठी किती तोशीस लावून घ्यायची याची काही गणितं नसतात.

पण अगदी अचूक गणितं नसली तरी काहीतरी संगती लागते. आईवडील, मुलं आणि सख्खी भावंडं यांमध्ये सगळ्यात जवळीक दिसते. आईवडील मुलं मोठी होईपर्यंत त्यांच्यासाठी अन्न-वस्त्र-निवारा पुरवतात. त्यांच्या आजारपणात रात्रीचा दिवस करून काळजी घेतात. बहुतेक जण आपल्या मुलांकडे तितकंच लक्ष देऊन हे मातृपितृऋण फेडतात. यातूनच जीवनाचं रहाटगाडगं फिरत राहातं. बहीण-भावंडंही एकमेकांसोबत राहातात, मोठी भावंडं लहानांना शिकवतात, आणि मोठी झाल्यावरही हे नातं टिकून राहातं. चुलतभावंडांत त्यामानाने कमी जवळीक दिसते. आणि नात्याने जितकं दूर जावं त्याप्रमाणे जवळीकही सर्वसाधारणपणे कमी होताना दिसते. यामागे नक्की काय कारण आहे?

समाजरचना आणि कुटुंबव्यवस्था ही उघड दिसणारी कारणं आहेत. आईवडील-मुलं-भावंडं एकत्र राहतात. साहजिकच एकत्र वाढल्याने जवळीक निर्माण होते. आईवडील आपल्या मुलाला लहानाचं मोठं होईपर्यंत पाहतात. त्याच्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात भावनिक आणि आर्थिक गुंतवणुक केलेली असते. मुलांनाही आपल्या आईवडिलांबद्दल एक ओढा असतो. अर्थातच त्यांच्यात भांडणतंटे असतात. कधीकधी ती विकोपालाही जातात. पण शंभरातल्या नव्वद-पंच्याण्णवांना आपल्या आईवडिलांपैकी कोणाचा मृत्यू झाला की दुःख होतं. अगदी आपला एक भाग गेल्यासारखं वाटत राहातं. बहीण-भावंडांचीही अशीच कथा. त्यांच्यात लहानपणापासून एकमेकांचे सोबती असल्यामुळे एक जवळीक निर्माण होते. याउलट काका-काकू आणि चुलतभावंडं यांची स्वतंत्र कुटुंबं असतात. अगदी एकत्र कुटुंबांतही घर पुरेसं मोठं असेल तर राहण्याच्या खोल्या वेगवेगळ्या असतात. एकाच मोठ्या जीवाचे स्वतंत्र अवयव असल्याप्रमाणे ही उपकुटुंबं वावरतात. विभक्त कुटुंबांतही एकमेकांशी संबंध, येणंजाणं, आनंदोत्सव एकत्र साजरं करणं, हे असतंच. या सगळ्या एकत्र वा विलग राहण्याच्या पद्धती, सामाजिक रीतीरिवाज ही वेगवेगळ्या प्रमाणात जवळीक दिसण्याची कारणं म्हटली जातात.

पण निव्वळ समाजरचना हे कारण पुरेसं आहे का? किंबहुना अशीच सामाजिक पद्धत का निर्माण झाली? सगळी मुलं सगळ्यांची अशी व्यवस्था का दिसत नाही? मुलं सांभाळण्यात जबाबदारी असते, आणि ती जबाबदारी कोणाला नको असते. फक्त आपल्याच मुलांची जबाबदारी लोक पत्करतात. आणि काही वेळेला तीही नाकारणारे लोक दिसतात. पण हे तरी का? प्रत्येक निरीक्षणाला 'का?' हा प्रश्न विचारत गेलं की आपल्याला समोर असलेलं उघड वाटणारं उत्तर पुरेनासं वाटायला लागतं. आणि जेव्हा आपण असे प्रश्न विचारत, खोलवर खणत जातो तेव्हा आपल्याला कुठेतरी निसर्गनियमांचा अभेद्य कातळ लागतो. जोपर्यंत आपल्या आधार देते आहे अशी वाटणारी, पण भुसभुशीत जमीन असते तोपर्यंत आपल्याला शेवटचं उत्तर सापडलेलं नसतं. कारण त्या जमिनीत आधार देण्याची काही शक्ती असली तरीही तिचा संपूर्ण डोलारा त्या कातळावरच तोललेला असतो.

समाजरचना हे उत्तर पुरेसं नाही असं का वाटावं? माणसाचे अनेक गुणधर्म समाजातून, चालीरीतींतून, मोठ्यांकडून शिकल्याने निर्माण झालेले दिसतात. आपण मराठी भाषा बोलतो, जपानमध्ये जपानी बोलतात, आणि चीनमध्ये मँडरिन. भिन्न समाजांत भाषा भिन्न असतात. याचं कारण म्हणजे भाषेसाठी कुठची चिन्हं वापरतो यामागे निश्चित असा निसर्गनियम नाही. म्हणून जगात जितके समाज तितक्या भाषा दिसतात. तेव्हा विशिष्ट भाषा एखाद्या ठिकाणी का दिसते? या प्रश्नाचं उत्तर 'समाजाची ती भाषा आहे म्हणून' असं देता येतं. मात्र कुठचाही समाज घेतला तरी त्या समाजाला कुठची ना कुठची भाषा असतेच. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येतं की विशिष्ट भाषा ही समाजाने ठरवली गेली असली तरी भाषा बनवण्याची, बोलण्याची, समजण्याची क्षमता ही नैसर्गिक आहे. तिला जैविक पाया आहे. चॉम्स्कीच्या सिद्धांतानुसार जगातल्या सर्वच भाषांना लागू होणारं एक सर्वसाधारण व्याकरण आहे. वेगवेगळ्या भाषांची व्याकरणं ही त्याच मूळ व्याकरणाची विविध रूपं आहेत. याचा अर्थ भाषा ही अन्नाप्रमाणेच माणसाची नैसर्गिक प्रेरणा आहे.

भाषेप्रमाणेच भावना व्यक्त करण्यासाठी चेहेऱ्यावर जे भाव वापरतो - हसणं, रडणं, रागावणं - हे सर्व समाजांत सारखेच आहेत. त्यावरून आपल्याला म्हणता येतं की भावना व्यक्त करण्याची ही चिन्हं आपल्या मनुष्य असण्याचा भाग आहेत. समाजाचा परिणाम ती चिन्हं कुठे, कशी, किती प्रमाणात वापरावी हे ठरवण्यात होतो फारतर.

भाषाक्षमता आणि चेहेऱ्यावरच्या भावांची समानता यावरून जसं आपल्याला त्यांना काहीतरी जैविक पाया आहे असं म्हणता येतं; तसंच आई-वडील-मुलं हे चौकोनी, षटकोनी कुटुंब एकत्र राहाण्याच्या पद्धतीलाही जीवशास्त्राचा आधार आहे. कारण जगात सर्वच समाजांत थोड्याफार फरकाने हे घडताना दिसतं. कोंबडीचं पिल्लू जन्माला आलं की त्याच्या आसपास जे काही हलताना दिसतं त्याच्या पाठीपाठी जातं. हे करण्याची नैसर्गिक ऊर्मी त्यात असते. बहुतेक वेळा ती त्याची आईच असते. पण जन्मतः 'ही आपली आई आहे' अशी संकल्पना त्या पिल्लात नसते. ती मोठेपणीतरी निर्माण होते की नाही हा विवाद्य मुद्दा आहे. मात्र या नात्याची सुरुवात ही अशा जैविक ऊर्मींमधून होते. केवळ सुरुवातीच्या एकत्र राहाण्यातून पुढची जवळीक वाढत जाते. आईने दिलेल्या उबेची सुखदायक आठवण ही तिच्या शरीरस्पर्शाबरोबर आणि वासाबरोबर जोडली जाते. आईने खायला घातलेल्या अन्नाने पोट भरलं की तिचा सहवास रीएन्फोर्स होतो.

थोडक्यात ‘नात्याची ओळख’ अशी काहीशी धूसर कल्पना जन्मजात असते. ती समाजातून शिकतो असं म्हणणं हे अर्धसत्य आहे. किंबहुना समाज या प्रकाराची रचनाच या नात्यांच्या जाणिवेतून उभी राहिलेली आहे. हे केवळ मानवी समाजांतच नाही तर इतर प्राण्यांतही आढळून येतं. कळपाने शिकार करणारे लांडगे आणि जंगली कुत्रे ही कुटुंबंच असतात. टोळीतले वेगवेगळे आठ स्वतंत्र प्राणी असले तरी त्यांच्यात असलेल्या नात्यातून आणि एकमेकांशी केलेल्या सहयोगातून एक हिंस्र आठ तोंडाचा, आठ बाजूंनी हल्ला करणारा प्राणी तयार होतो. आणि प्रत्येक प्राणी वैयक्तिकरीत्या साधू शकेल त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक मोठी शिकार तो कळप करू शकतो. बायसनसारख्या महाप्रचंड प्राण्याभोवती सात लांडगे घोंघावतानाचं चित्र.
लांडगे शिकार

नात्यांच्या ओळखीला काहीतरी जैविक पाया असावा हे यावरून उघड आहे. प्रश्न असा येतो की हा तयार कसा झाला, आणि नैसर्गिक निवडीतून पुढे कसा आला? जन्मल्याबरोबर आई आपलं मूल टाकून देऊन पुढचं मूल तयार करण्याच्या मागे का लागत नाही? बिरबल-बादशहाच्या उदाहरणात बघितलं तसं आई अगदी नाकातोंडात पाणी जाईपर्यंत मूल वाचवण्याची धडपड का करते? आई-मुलाचं नातं जाऊच देत - पण भावंडंही एकमेकांना मदत करताना दिसतात. मोठं संकट कोसळलं की खूप लोक नात्यांपलिकडेही जाऊन एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी, त्यांचं दुःख कमी करण्यासाठी धडपडतात. २६ जुलैला जेव्हा मुंबईत अतिवृष्टी झाली तेव्हा या सामान्य माणसांनी केलेल्या परोपकारांच्या हृद्य कथा आपण वाचलेल्या आहेत. आणि हे जगभर सर्वत्र घडतं. ही परोपकराची भावना मुळात येते कुठून? कारण माणूस किंवा कुठचाही प्राणी दुसऱ्यासाठी त्याग करताना का दिसतो, याचं उत्तर सापडल्याशिवाय नात्यांचं कोडं सुटणार नाही. आणि गंमत अशी की या नात्यांच्या कोड्याच्या उत्तरातच परोपकाराच्या कोड्याचं उत्तर दडलेलं आहे. एका अर्थाने या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण उत्तर बघण्याआधी मुळात प्रश्न समजावून घेतला पाहिजे. नाहीतर जीवशास्त्रात आणि जनुकांत दडलेल्या या उत्तराची मुळं समाजाच्या वेगवेगळ्या भागात किती खोलवर दडलेली आहेत हे आपल्याला दिसणार नाही.

प्रश्न सुरू होतो तो उत्क्रांतीने दिलेल्या मांडणीतून. ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’चं तत्त्व मांडणाऱ्या उत्क्रांतीच्या सिद्धांताला ‘परोपकार येतो कुठून? आणि का?’ हा प्रश्न पूर्वी सतावत असे. का कोणी कोणाला मदत करावी? जर मी एक प्राणी म्हणून जगणार की मरणार यावर आणि यावरच माझं भवितव्य ठरत असेल तर मी माझा जीव इतरांसाठी धोक्यात का घालावा? मी जर कोणाला माझ्या अन्नातला काही भाग दिला तर केवळ त्या देण्याच्या क्रियेतून माझा ‘फिटनेस’ कमी होतो. कारण संपूर्ण स्वार्थी जगात मी कोणाला मदत केली तर त्यांच्याकडून (किंवा इतरांकडून) पुढच्यावेळी मला मदत मिळेलच अशी खात्री नाही. स्वार्थी प्रवृत्ती टोकाला नेल्या तर प्रत्येकच प्राणी आपल्यासारख्या इतर प्राण्यांना ठार मारून खाण्याचा प्रयत्न का करत नाही? त्यातून त्याला अन्न मिळेल, आणि त्याचं अन्न खाऊ शकणारं एक तोंड कमी होईल. इतका उघड फायदा दिसत असूनही आपल्याला दिसणारे बहुतेक प्राणी असं करताना दिसत नाहीत. हे कसं? ही नीतिमत्तेची मूल्यं बहुतांश प्राण्यांमध्ये नैसर्गिकरीत्या का दिसतात? नीतिमत्ता, परोपकार, ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ ही तत्त्वं जनुकीय पातळीवर असतात का? असली तर कुठून येतात? आणि का यावीत?

हे समजून घेण्याआधी जनुकांवर असलेल्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्या. जनुकं मेंदूत बसून दर क्षणी नियंत्रण करत नाहीत. ‘आपल्या वागणुकीत जनुकांचा वाटा मोठा असतो‘ यासारख्या विधानातून काहींना तसा अर्थ प्रतीत होऊ शकत असेल. पण जनुकांचं नियंत्रण हे एखाद्या गाडीच्या ड्रायव्हरप्रमाणे नसतं. जनुकं ही ती गाडी कशी असेल, तिचा आकार केवढा असेल, किती वेगाने जाऊ शकेल, किती पटकन अॅक्सिलरेट होऊ शकेल, वळणं किती सहज घेऊ शकेल, किती स्थिर असेल यासारखे घटक ठरवू शकतात. आणि माणसाचं शरीर हे गाडीसारखं सोपं नसतं - ते कसं वाढतं, त्याला काय अन्न मिळतं यावरून बदलू शकतं. गाडीचा ड्रायव्हर असलेला मेंदूही जनुकांनीच बनवलेला असला तरीही त्याची जडणघडण कशी झाली आहे, तो कुठल्या अनुभवांतून गेलेला आहे यामुळे सगळी गणितं बदलतात. थोडक्यात जनुकांचं आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी असलेलं योगदान अप्रत्यक्ष प्रकारचं असतं.

अशा अप्रत्यक्ष नियंत्रणातून नातेसंबंध तयार करण्याची क्षमता कशी निर्माण होणार? आणि जरी ती होत असेल तरीही त्यातून जनुकांचा ‘फायदा’ काय? फायदा हा शब्द मुद्दामच अवतरणांत आहे, कारण जनुकं काही व्यापार खेळणाऱ्या मुलांप्रमाणे ठरवून खेळी करत नाहीत. त्यांना मेंदू नसतो. हे दोन स्वतंत्र प्रश्न आहेत आणि प्रथम आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊ.

जनुकांचा ‘फायदा’ म्हणजे नक्की काय? विशिष्ट गुणधर्म प्रदान करणाऱ्या जनुकांच्या संख्येची, तो गुणधर्म न देणाऱ्या किंवा कमी प्रमाणात देणाऱ्या जनुकांच्या संख्येच्या तुलनेत वाढ. जिराफांच्या मानेचं (चावून चोथा झालेलं) उदाहरण घेऊ. सहा फूट मान निर्माण करणाऱ्या जनुकांची संख्या, पाच फूट मान निर्माण करणाऱ्यांच्या तुलनेत वाढताना दिसली. म्हणजेच जसजश्या पिढ्या जात गेल्या तसतसं सहाफूटमानी जिराफ पाचफूटमानी जिराफांच्या तुलनेत वाढले. याचाच अर्थ, जिराफांत लांब मानेचा गुणधर्म जास्त प्रमाणात पसरला. यामागे 'उंच झाडांवरचा पाला खाणं' ही परिस्थिती कारणीभूत होती. माणसांच्या बाबतीत 'नातेसंबंध जपण्याचे गुणधर्म' देणारी जनुकं 'नातेसंबंध न जपण्याचे (किंवा कमी जपण्याचे) गुणधर्म' देणाऱ्या जनुकांपेक्षा अधिक का वाढतील?

याचं उत्तर जनुकं ज्याप्रकारे पुढच्या पिढीत जातात त्या यंत्रणेत आहे. प्रत्येक व्यक्तीत तिची जनुकं निम्मी आईकडून आणि निम्मी वडिलांकडून आलेली असतात. मी जर एक स्त्री असेन तर माझ्या मुलीत माझी निम्मी जनुकं आहेत. दोन मुली असतील तर दोघींमध्ये मिळून शंभर टक्के जनुकं पुढच्या पिढीत असतील असं नाही. पण मला जर दहा मुली असतील तर साधारणपणे प्रत्येक जनुकाच्या सुमारे पाच प्रती माझ्या मुलींमध्ये विखुरलेल्या आहेत. त्यातही पुनरुत्पादन करून त्यांच्या अजून जास्त प्रती निर्माण करण्याची क्षमता त्या मुली बाळगून आहेत. म्हणजे 'मी' या व्यक्तीत १०० एकक जनुकीय भांडवल असेल तर ते वापरून, पुनरुत्पादन करून, 'मी' या व्यक्तीने ५०० एकक जनुकीय भांडवल मिळवलेलं आहे. माझी जनुकं वाढवणं हाच माझा उद्देश असेल तर मी स्वतःपेक्षा त्या दहा मुलींना महत्त्व दिलं पाहिजे.

प्रत्येक व्यक्ती काही अर्थातच 'माझी जनुकं कशी वाढतील?' असा विचार करत नाही. जनुकंदेखील 'आपली संख्या कशी वाढेल' असा विचार करत नाहीत. जनुकं फक्त असतात, ती आपल्या अप्रत्यक्ष मार्गांतून शरीरं बनवतात, त्यांना विशिष्ट गुणधर्म देतात, आणि शेवटी जे गुणधर्म त्या शरीरापासून संख्येने जास्त, टिकाऊ शरीरं बनवायला मदत करतात ते गुणधर्म देणाऱ्या जनुकांची संख्या आपोआप वाढते. मी एक व्यक्ती म्हणून 'माझा वंश वाढला, टिकला पाहिजे' असं म्हणते - ती ऊर्मी निर्माण करणारी जनुकं संख्येने वाढतात. मात्र व्यक्तीला, मनुष्याला 'माझा वंश' असा विचार करता येतो. बहुतांश प्राण्यांना तसा स्पष्ट विचार करता येत नाही. तरीही त्यांच्यात आपल्या पुढच्या पिढीची काळजी घेण्याची प्रवृत्ती दिसून येते. जनुकांपासून ते प्राण्याच्या वागणुकीपर्यंत हा प्रवास कसा होतो? याचं मी केवळ संकल्पनात्मक उत्तर देणार आहे.

'ग्रीन बिअर्ड इफेक्ट' किंवा 'हिरवी दाढी दृष्टांत' इथे उपयोगी पडतो. समजा असं एक जनुक (किंवा एक विशिष्ट जनुकसमुच्चय) आहे - त्याचे दोन स्वतंत्र परिणाम होतात. एक म्हणजे ते जनुक ज्यांच्यात आहे त्यांना हिरवी दाढी येते. (हिरवी दाढी हे केवळ प्लेसहोल्डर आहे - इतर सर्वसाधारण प्राण्यांपासून वेगळं उठून दिसणारं, ओळखू येणारं काहीही चालेल.) त्याच जनुकाचा दुसरा परिणाम असा होतो की ते जनुक असलेल्या प्राण्याला हिरव्या दाढीधाऱ्यांना मदत करण्याची प्रेरणा होते. आता हे उघडच आहे की अशा, हिरवी दाढी देणाऱ्या, जनुकांचं प्रमाण इतर जनुकांच्या (काळीदाढीबिनमदत) तुलनेत वाढणार. कारण टोळीने हल्ला करणाऱ्या लांडग्यांचा जसा आठ तोंडांचा प्राणी बनतो तसाच हिरव्या दाढीवाल्यांचा शंभर एकट्या जिवांऐवजी दोनशे हाता-पाया-डोळ्यांचा प्राणी बनतो. या समाजाचा किंवा कुटुंबाचा भाग बनल्याने प्रत्येक विशिष्ट व्यक्तीची टिकून राहाण्याची शक्यता वाढते.

ही सर्वसाधारण मांडणी 'किन सिलेक्शन' किंवा 'भावकी निवड' या नावाने ओळखली जाते. त्याचा गाभा असा की नैसर्गिक निवडीतून जे जीव तयार होतात त्यांच्यात आपलं अस्तित्व धोक्यात घालूनही आपल्या भावंडांचे, आपल्या नातेवाईकांचे जीव वाचवण्याची प्रवृत्ती दिसते. पोळ्याच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव देण्याची मधमाशांची हीच प्रवृत्ती डार्विनने आपल्या 'ओरिजिन ऑफ स्पीसीज'मध्येही मांडली होती. अर्थातच त्यावेळी जनुकांचा आणि त्यांच्या महत्त्वाचा शोध लागलेला नव्हता. या संकल्पनेला तांत्रिक आधार फिशर आणि हाल्डेन (लेखाच्या वर उद्धृत केलेलं वाक्य म्हणणारा हाच) या शास्त्रज्ञांनी दिला.

यामागची मुख्य संकल्पना आहे ती म्हणजे 'नातेनिर्देशांक' (कोएफिशियंट ऑफ रिलेटेडनेस). आपण वर बघितलंच की आई आणि मुलीत हा निर्देशांक ५०% असतो. बाप-मुलगा, बाप-मुलगी किंवा आई-मुलगा या जोड्यांतही हा निर्देशांक ५०% असतो. दोन सख्खी भावंडं घेतली तर त्यांचाही निर्देशांक ५०% असतो. काका-मामा- मावशी-आत्या आणि त्यांच्या पुतण्या-भाच्यांमध्ये हा निर्देशांक २५% असतो. तर चुलत भावंडांमध्ये तो १२.५% असतो. ही आकडेवारी आपल्याला प्रत्यक्षपणे माहीत नसली तरी अनेक बाबतीत आपली वागणूक खरोखरच साधारणपणे या प्रमाणात असते. आपल्या भावंडांसाठी जितका त्याग करतो त्याच्या सरासरी एक चतुर्थांश त्याग आपण आपल्या चुलत भावंडासाठी करू, असं भावंडनिवडीतून आपल्याला समजतं. ही आकडेवारी आपण स्वतः मोजू शकत नसलो तरी साधारणपणे त्यात तथ्य आहे हे जाणवतं. सर्वसाधारणपणे जवळच्या नातेवाइकांशी आपले जितके संबंध, लागेबांधे असतात त्यांपेक्षा कमी लागेबांधे दूरच्या नातेवाइकांशी असतात हेही दिसतं. भावकी निवडीच्या सिद्धांतामुळे त्याचा जनुकीय पाया कळून येतो.

अशा प्रकारे जनुकीय नातेनिर्देशांकाचा वापर इतरही ठिकाणी केला गेलेला दिसतो. उदाहरणार्थ कोणी कोणाशी लैंगिक संबंध ठेवावेत याबाबतच्या कल्पना. आपल्याला ज्ञात असलेल्या जवळपास सर्व समाजांत जुन्या काळपासून आई, वडील व सख्खी भावंडं यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणं हे निषिद्ध मानलं गेललं आहे. अनेक धर्मांमध्ये हे करण्यासाठी कठोर शिक्षाही आहेत. म्हणजे नातेनिर्देशांक जर ५०% असेल तर लैंगिक संबंध ठेवू नयेत हा मानवी समाजांच्या नीतीमत्तेचा भाग झालेला आहे. जसजसा हा निर्देशांक कमी होत जातो तसतशी ही बंधनं ढिली होत जाताना दिसतात. उदाहरणार्थ, काही समाजांत मामा-भाचीचं लग्न करायला संमती असते किंवा तशी पद्धतही असते. कारण मामाशी असलेला निर्देशांक २५% आहे. काही समाजांत चुलत भावंडांशी लग्न चालू शकतं. पण त्यापलिकडे गेलं - म्हणजे निर्देशांक १०% च्या खाली गेला की हे निषेध गळून पडताना दिसतात.

यामागचं जनुकीय कारण काय? तर अगदी जवळच्या नातेवाइकांत लग्न केल्याने दोषजनक, रिसेसिव्ह जीन्स एकत्र येण्याची शक्यता वाढते. रिसेसिव्ह जनुकं अशी असतात की जर ती आई आणि वडिलांकडून दोघांकडूनही आली तर संततीत दोष निर्माण होतो. आता एखाद्या व्यक्तीत असं दोषजनक जनुक असेल तर जितका जनुकीय निर्देशांक अधिक तितकी जास्त शक्यता जोडीदारांतही तेच दोषजनक जनुक असण्याची असते. म्हणजे त्यातून निर्माण होणारी संतती दोषपूर्ण असण्याची शक्यताही जास्त. त्यामुळे अशा जोड्या टाळण्याची ऊर्मीही जनुकीय आहे. संशोधनांती हे सिद्ध झालेलं आहे की एकाच घरात वाढलेल्या पण कुठचंच नातं नसलेल्या स्त्री-पुरुषांना एकमेकांविषयी लैंगिक आकर्षण कमी वाटतं. याला 'वेस्टरमार्क इफेक्ट' म्हणतात. कोंबडीच्या पिलाला जशी जन्माच्या वेळी आसपास हलणारी वस्तू आई वाटते, तशीच आपल्या अत्यंत जवळ आपल्याबरोबर वाढणारा मुलगा किंवा मुलगी हे आपल्याला भाऊ किंवा बहीण वाटतात. हे भाऊ-बहीणपण आणि त्यातून उद्भवणारं लैंगिक अनाकर्षण हे निश्चितच जनुकीय आहे.

थोडक्यात हिरवी दाढी हा विशिष्ट शारीरिक गुणधर्म नाही. तर 'आपल्यासारखेपणा' किंवा 'आपल्याजवळचेपणा' या प्राण्यांच्या वाढीच्या काळातल्या जाणीवांतून हा गुणधर्म जोखला जातो. जे जन्मापासून आपल्या जवळ असतील ते आपले भाऊ-बहीण-आई-वडील. जे तितके जवळ नसतील, तरीही सतत आसपास असतील ते आपले काका-मामा-आत्या-मावश्या-लांबचे नातेवाईक. आपलं कुटुंब आणि आपला कबिला. ती आपली टोळी. पुरातन काळापासून मानवाच्या शंभर-दोनशे लोकांच्या टोळ्या या विस्तृत कुटुंबांसारख्याच होत्या. कारण कितीही टाळलं तरी त्याच त्याच जनुकांचा पुन्हा पुन्हा सहयोग होऊन प्रत्येकच जण एकमेकांशी काही ना काही नात्याने जोडलेला असे. त्यांच्यात कदाचित चुलतभावंडापेक्षा किंचित कमी अशा जनुकीय निर्देशांकाने नातं असे. त्यामुळे स्वतःला जपण्यापेक्षा टोळीला जपणारे गुणधर्म देणाऱ्या जनुकांची वाढ झाली. आणि त्याचे परिणाम आपल्याला जागोजागी दिसतात.

ख्रिश्चन धर्मातल्या दहा धर्माज्ञांमधली एक आहे ती - 'डोंट कव्हेट दाय नेबर्स वाइफ अँड हिज अदर प्रॉपर्टी'. तुमच्या शेजाऱ्याच्या मालकीची गोष्ट (ज्यात त्याची बायकोही आलीच) असेल तर तिचा हव्यास धरू नका. गमतीची गोष्ट अशी आहे, की हे फक्त तुमच्या शेजाऱ्याबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे गावात, तुमच्या आसपास राहाणाऱ्यांसाठीच ते लागू आहे. टोळीने राहाणाऱ्या मनुष्यांत जी नैतिकता होती तिचंच हे विस्तृत स्वरूप आहे. आपल्या लोकांबरोबर चांगलं वागा, असा हा संदेश आहे. आपण, एकत्र राहाणारे हे कुठल्यातरी पातळीवर एक आहोत, आणि एकत्र सलोख्याने वागावं. पण बाहेरच्यांना काय प्रकारे वागणूक द्यावी याबद्दल अर्थातच अवाक्षरही नाही. कारण कायमच, प्रत्येक गट 'आपण' आणि 'इतर' या दृष्टिकोनातून जगाकडे बघत आलेला आहे. या 'इतर'पणापोटीच अमेरिकेत काळ्यांना गुलाम करणं गोऱ्यांना शक्य झालं. आणि हिटलरला आख्खा जर्मन समाज ज्यूंच्या विरोधात उभा करता आला. र्वांडामधल्या तुत्सी आणि हुतू यांच्यातलं वैरही याच भावनेतून निर्माण होतं.

या 'आपण व इतर' भावनेची जोपासना करण्यासाठी अनेक धर्मांनी, समजांनी 'हिरव्या दाढीचा दृष्टांत' पुढच्या टोकाला नेलेला आहे. शीख लोकांनी फेटा, दाढी वापरून आपली ओळख वेगळी केलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला दुसरा शीख ओळखू येतो, तसाच प्रत्येक शिखाला दुसरा शीख ओळखू येतो. ब्राह्मणांनी आपली शेंडी ठेवण्याची परंपराही याच जातकुळीतली.

आपल्यांवर प्रेम करण्याची भावना आणि इतरांचा दुस्वास करण्याची भावना, दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला आईचं मुलासाठी खस्ता खाणं, एकमेकांसाठी जिवावर उदार होणं या मानवी स्वभावाच्या उच्च बाजू दिसतात. याउलट दुसऱ्या बाजूला अस्मितांचा अभिमान बाळगून दुसऱ्या जमातीचा खातमा करण्याची प्रवृत्तीही दिसते. नात्यांचे हे विरुद्ध पैलू आपल्या समाजजीवनाचा अविभाज्य भाग आहेत. या दोन्हींचा पाया आपल्या जनुकांत आहे.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

अन्न मिळवण्याच्या प्रक्रियेत बाधा येणार नाही असं वाटतय तोपर्यंतच नातीगोति टिकतात. सजिवांच्या निरनिराळ्या प्रवृत्ती आहेत त्यांत क्रमवारी आहे आणि नाती टिकवणे शेवटी असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्याकडे जी मांजर आहे ती तिच्या पिलांना विशिष्ट वयापर्यंत अगदी जपते. आपल्यातले खाणे त्यांना देणे वगैरे. पण नंतर मात्र तिला आणि पिलांना कॉमन खाणे खातले असेल तर पिलांना हुसकावून लावते आणि स्वतः खाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सजिवांच्या निरनिराळ्या प्रवृत्ती आहेत त्यांत क्रमवारी आहे आणि नाती टिकवणे शेवटी असावं.

हे इतकं सोपं नसतं. प्रत्येक प्रवृत्तीबाबत प्रत्येकच व्यक्ती एका नॉर्मल डिस्ट्रिब्यूशनवर कुठेतरी असते. आपल्या पोटचं अन्न तोडून आपल्या मुलांना खायला देणाऱ्या आया असतात. तसंच लोक, आपले नातेवाईक मेले तरी चालतील, मला भरपूर सगळं हवं म्हणणारेही असतात. पुरात वाहाणाऱ्या कोणासाठीतरी नदीत उडी मारणारेही असतात. एकूणात, परोपकारभावना आणि स्वार्थ यांचं प्रमाण प्रत्येकात वेगवेगळं असतं. अनेक वेळा स्वार्थी असण्याचा तात्पुरता फायदा असतो आणि लॉंग टर्ममध्ये तोटा होतो. तसंच, परोपकार करण्यात, नाती जपण्यात तात्पुरता तोटा असतो, तर लॉंग टर्म फायदा. हीही गणितं नसतात, आणि नेहेमीच तशी उत्तरं येत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख छान आहे. पण घासुगुर्जींच्या इतर उत्क्रांतीवाल्या लेखांइतका भारी वाटला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लेख आवडला.
काहि प्रश्न आहेत नंतर विचारेन..!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वतःच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीबद्दल विशेषतः लहान मूल, अत्यंत वात्सल्य आपोआप दाटून येतं हे अनुभवलेले आहे. तब्बल ११ वर्षांनी जेव्हा भारतात गेले होते तेव्हा माझ्या भावाचा मुलगा पाहून काय वाटले ते सांगताच येणार नाही. हे असं वात्सल्य सर्व लहान बालकांबद्दल वाटत तर नाहीच पण परदेशी लहान बालकांबद्दल अजिबातच वाटत नाही.
.
मला पूर्वी खरच भीती वाटे आपल्या बाळाबद्दल आपल्याला प्रेम वाटले नाही तर? Sad पण बाळ झाल्यावरती हा प्रश्न पार मी विसरुन गेले आणि मुलीच्या प्रेमात सपशेल आपटल्याचे आठवते.
.
मला एक प्रश्न जरुर पडतो काही लोकांमध्ये वात्सल्य भावना फार प्रबळ का असते. काहींच्यात तिची कमी का आढळते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुत्र्याला रक्ताचा वास येतो.एकाच नात्याच्या रक्ताचा म्हणायचय.उदा० चुलतभावाच्या कुटुंबाने कुत्रा पाळायचं ठरवून शोध सुरु केला ( ते योग्य पेडिग्री,वयाचं पिल्लु वगैरे.)तो येईपर्यंत मुलगा ,नवरा परदेशात गेले. मुलगा जेव्हा आला तेव्हा कुत्र्याने वास घेऊन आनंदाने उड्या मारल्या अंगावर त्याच्या. नवरा आल्यावर भुंकुन हैराण केले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मधुरा च्या प्रश्नावरुन काही वर्षांपूर्वी वाचलेल्या एका पुस्तकाची आठवण झाली . "GOD WANTS YOU DEAD" हे शीर्षका इतकेच वेधक पुस्तक ऐसी वरील बऱ्याचजणांनी वाचलेले असणार. पण तरीही त्यातील खूप आवडलेली संकल्पना इथे पुन्हा मांडतो. BIOLOGICAL जनुके SELFISH असतात आणि सजीवांना आपल्या तालावर नाचवतात यात आता काही संशय राहिलेला नाही हे खरेच. पण मनुष्य प्राण्याला याहून प्रबळ एक वेगळी प्रेरणा असू शकते.

आपले विशिष्ट शारीरिक गुणधर्म पसरवण्या इतकेच आपले विचार, श्रद्धा, सत-असत च्या कल्पना अधिक अधिक लोकां मध्ये रुजावी अशी इच्छा मनुष्य प्राण्या मध्ये उत्पन्न होऊ शकते. खास करून ज्यांना स्वतःची ओळख शारीरिक गुणधर्म पेक्षा विचारा वरून व्हावी असे वाटत असेल त्यांना.

अश्या ओळखीचे वर्णन IDEOLOGICAL जनुके असे करता येईल. माणसाचे अधिकतर गुणधर्म असेच असत असावेत. कधी ते विचारांती घडलेले असतील तर बहुतेकदा निव्वळ संस्कारांनी - BRAIN WASHING नी. रोचक बाब हि की IDEOLOGICAL जनुक प्रसंगी BIOLOGICAL जनुका च्या हिताच्या विरोधातहि काम करेल आणि वरचढ ठरेल.

एखाद्या ध्येयासाठी प्राण गेले तरी चालतील अश्या भूमिकेत माणसे याच कारणाने जाऊ शकतात. आणि जनुकांमध्ये काहीही साधर्म्य नसणाऱ्या लोकांच्या अतिशय कडव्या संघटनाही उभ्या राहू शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यालच मी meme relatedness म्हनतेय. आपले विचार टिकावेत अशी एक उर्मी असते जशी जनुकांची असते . ज्याचे आणि आपले विचार सारखे आहेत तो आपला मित्र होतो त्याच्यासाठी माणूस आपले रिसोर्सेस खर्च करतो . कारण त्यातून ते विचार टिकणार असतात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Evolution आणि species behaviour हा विषय फारच गूढ आहे. जसं आपल्याला विश्वाबद्दल (Universe) फार कमी माहिती आहे तसंच एकूण species बद्दल पण तशी बरीच गुपितं अजून उलगडलेली नाहीयेत.

article छान लिहिलंय. मराठीत टेक्निकल गोष्टी वाचताना त्रास होत होता, पण तुम्ही बऱ्याच concepts चा सेटप सोप्प्या शब्दात मस्त केलात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

........जनुकंदेखील 'आपली संख्या कशी वाढेल' असा विचार करत नाहीत. जनुकं फक्त असतात, ती आपल्या अप्रत्यक्ष मार्गांतून शरीरं बनवतात, त्यांना विशिष्ट गुणधर्म देतात, आणि शेवटी जे गुणधर्म त्या शरीरापासून संख्येने जास्त, टिकाऊ शरीरं बनवायला मदत करतात ते गुणधर्म देणाऱ्या जनुकांची संख्या आपोआप वाढते..........

ईथपर्यंत कळलं.

पण त्यानंतरच्याच परिच्छेदात, हिरव्या दाढीचा दृष्टांत सांगताना, तुम्ही म्हंटलंय की;

.....त्याच जनुकाचा दुसरा परिणाम असा होतो की ते जनुक असलेल्या प्राण्याला हिरव्या दाढीधाऱ्यांना मदत करण्याची प्रेरणा होते......

पण ही अशी प्रेरणा का होते? जनुकानी विचार का/कसे बदलतात ? याबद्दल, या लेखाच्या मुळातल्या प्रश्नाबद्दल मात्र अजून काही माहिती नाहीये. What did I miss? की शीर्षकातल्या "जनुकीय पाया"चा संदर्भ ही प्रेरणा जनुकीय आहे, कुठल्या अध्यात्मिक शक्तीतून आलेली नाहिये असा आहे?

जनुकांमुळे शारिरीक बदल होतात हेही अगदी molecular levelपर्यंत उमजतं(च) असं नाही. पण निदान प्रोटिन्स वेगळी तयार होतात, प्रोटीन्सची रचना बदलते वगैरे बर्‍याच परिणामांचं आकलन झालेलं आहे. पण ".....रीसेसिव्ह जीन्स टाळण्याची उर्मीही जनुकीय आहे....." यातल्या या उर्मीबद्दल, ती कशी होते याबद्दल या लेखात काही कळेल अशी अपेक्षा होती.....आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

पण ही अशी प्रेरणा का होते? जनुकानी विचार का/कसे बदलतात ?

जनुकं विचार करत नाहीत, त्यांना प्रेरणा नसतात. त्यांना फक्त रासायनिक गुणधर्म असतात ज्यायोगे गर्भवाढीच्या प्रक्रियेत ते फरक करतात. खरंतर 'त्यांच्यामुळे फरक पडतो' असं म्हणायला हवं.

पण अशी, परस्परपूरक गुणधर्म देणारी जनुकं एकत्र येऊन त्या जनुकसमुच्चयाचं एक जोड-जनुक बनण्याची शक्यता खूप असते. ग्रीन बीअर्ड इफेक्टचं उदाहरण द्यायचं झालं तर काही विषारी फुलपाखरांचं देता येईल.

काही फुलपाखरं विषारी असतात. ती खाल्ल्याने भक्षक पक्षी मरतात. पण नुसतं विषारी असल्याचा फायदा त्या फुलपाखराला नाही. किंवा जे जनुक ते विष निर्माण करतं त्याला फायदा नाही. कारण पक्षी मेल्याने त्या जनुकाच्या संख्येत फरक पडत नाही. मात्र त्या फुलपाखराच्या अंगावर काही विशिष्ट बटबटीत ठिपके निर्माण करणारं जनुक या विषारी जनुकाच्या सोबत आलं तर प्रचंड फरक पडतो. पक्षी अशी फुलपाखरं न खायला 'शिकतात'. म्हणजे त्या पक्ष्यांत असा पॅटर्न त्याज्य, किळसवाणा वाटायला लावणाऱ्या जनुकांचा प्रादुर्भाव होतो. आणि मग विषारी-ठिपकेदायक जनुकं ही एकत्रितरीत्या त्या जातीच्या फुलपाखरांत पुढे जातात.

".....रीसेसिव्ह जीन्स टाळण्याची उर्मीही जनुकीय आहे....." यातल्या या उर्मीबद्दल, ती कशी होते याबद्दल या लेखात काही कळेल अशी अपेक्षा होती.....आहे!

उर्मी ही रीसेसिव्ह जीन टाळण्याची नसते. उर्मी ही 'एकत्र राहाणाऱ्यांत लैंगिक आकर्षण कमी प्रमाणात निर्माण होण्याची' असते. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला इन्सेस्ट टॅबू दिसतात. सर्वच समाजांत इन्सेस्ट टॅबू इतके समान आहेत की त्यांचा जनुकीय पाया असलाच पाहिजे असं म्हणता येतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चॉम्स्कीच्या सिद्धांतानुसार जगातल्या सर्वच भाषांना लागू होणारं एक सर्वसाधारण व्याकरण आहे. वेगवेगळ्या भाषांची व्याकरणं ही त्याच मूळ व्याकरणाची विविध रूपं आहेत.

हा सिद्धान्त प्रथमदर्शनी (आणि द्वितीयदर्शनीदेखील) पटण्यासारखा आहे. पण यामध्ये एक अडचण अशी की चॉम्स्कीने पन्नासेक वर्षांपूर्वी हा सिद्धान्त मांडला तेव्हापासून सुरू झालेला ह्या ‘सर्वसाधारण व्याकरणा’चा (universal grammar) चा शोध फारसा यशस्वी झालेला दिसत नाही. मानवी भाषांमधलं वैविद्ध्य इतकं मोठं आहे की त्या सगळ्यांची व्याकरणं एकाच साच्यात बसवणं फार अवघड होऊन बसतं. तशी ती अगदी बसवायचीच झाली तर साचा इतक्या विसविशीत रबराचा करावा लागतो की मग त्यात काहीही बसेल. त्यामुळे असाही एक विचारप्रवाह बळावला आहे की ह्या युनिवर्सल ग्रामरचा शोध सोडून द्यावा, कारण जर ते खरोखरीच अस्तित्वात असतं तर एव्हाना सापडलं असतं. शिवाय ‘युनिवर्सल ग्रामर म्हणजे काय’ यावर खुद्द चॉम्स्कीने त्याची मतं इतक्या वेळा बदललेली आहेत की घोळ फार वाढला आहे. तेव्हा नक्की कशावर विश्वास ठेवावा ते कळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

काही गुंतागुंतीच्या संकल्पनांची चांगली ओळख करून दिलेली आहे.
नातेतगाऊ उत्क्रांती (किन सिलेक्शन एव्होल्यूशन) हे नि:स्वार्थी स्वभाव उद्भवण्याची यंत्रणा असू शकते.
अन्य मुद्देही चांगले समजावून सांगितलेले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’चं तत्त्व मांडणाऱ्या उत्क्रांतीच्या सिद्धांताला ‘परोपकार येतो कुठून? आणि का?’ हा प्रश्न पूर्वी सतावत असे. का कोणी कोणाला मदत करावी? जर मी एक प्राणी म्हणून जगणार की मरणार यावर आणि यावरच माझं भवितव्य ठरत असेल तर मी माझा जीव इतरांसाठी धोक्यात का घालावा? मी जर कोणाला माझ्या अन्नातला काही भाग दिला तर केवळ त्या देण्याच्या क्रियेतून माझा ‘फिटनेस’ कमी होतो. कारण संपूर्ण स्वार्थी जगात मी कोणाला मदत केली तर त्यांच्याकडून (किंवा इतरांकडून) पुढच्यावेळी मला मदत मिळेलच अशी खात्री नाही. स्वार्थी प्रवृत्ती टोकाला नेल्या तर प्रत्येकच प्राणी आपल्यासारख्या इतर प्राण्यांना ठार मारून खाण्याचा प्रयत्न का करत नाही? त्यातून त्याला अन्न मिळेल, आणि त्याचं अन्न खाऊ शकणारं एक तोंड कमी होईल. इतका उघड फायदा दिसत असूनही आपल्याला दिसणारे बहुतेक प्राणी असं करताना दिसत नाहीत. हे कसं? ही नीतिमत्तेची मूल्यं बहुतांश प्राण्यांमध्ये नैसर्गिकरीत्या का दिसतात? नीतिमत्ता, परोपकार, ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ ही तत्त्वं जनुकीय पातळीवर असतात का? असली तर कुठून येतात? आणि का यावीत?

--

आपल्यांवर प्रेम करण्याची भावना आणि इतरांचा दुस्वास करण्याची भावना, दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला आईचं मुलासाठी खस्ता खाणं, एकमेकांसाठी जिवावर उदार होणं या मानवी स्वभावाच्या उच्च बाजू दिसतात. याउलट दुसऱ्या बाजूला अस्मितांचा अभिमान बाळगून दुसऱ्या जमातीचा खातमा करण्याची प्रवृत्तीही दिसते. नात्यांचे हे विरुद्ध पैलू आपल्या समाजजीवनाचा अविभाज्य भाग आहेत. या दोन्हींचा पाया आपल्या जनुकांत आहे.

(१) मानवाच्या सर्व कृत्या एकत्र केल्यात व त्यांचे वर्गीकरण केलेत तर त्यातल्या बहुतांश (म्हंजे सर्व नव्हे) कृत्या ह्या Competition and Cooperation या दोन पैकी किमान एकात बसतील.

(२) उरलेल्या कृत्यांपैकी एक महत्वाची म्हंजे - withdrawal - म्हंजे ना Competition ना Cooperation. उदा. आत्महत्या, मृत्यु. ( दुसरी महत्वाची म्हंजे - subjugation / coercion - जे प्रजातंत्रात कठिण असते.)

(३) Cooperation हे किमान काही प्रमाणावर परार्थकेंद्री आहे असं मानलं आणि Competition ही स्वार्थ स्वहितकेंद्री आहे असं मानलं तर बहुतांश कृत्या Cooperation च्या बाजूच्या असतील.

(४) पण स्वार्थ स्वहितकेंद्री वागणूक ही एकतर आजचे स्वार्थ स्वहित जपण्यासाठी असते किंवा उद्याचे Cooperation मिळवण्यासाठी केलेली तरतूद (संपत्ती) असते. तसेच आजचे स्वहित जपण्यासाठी केलेली स्वहितकेंद्री कृति ही उद्याचे स्वहित जपण्यासाठी व उद्याचे Cooperation करण्यासाठीची तयारी असे ही म्हणता येईल.

(५) सरतेशेवटी - Competition in a market is competition for the right to cooperate. - असं आर्ग्युमेंट प्रा. पॉल रुबिन यांनी केलेलं आहे.

म्हंजे व्यक्ती ही जी काही Competition (स्वहितकेंद्री कृति) करते त्यातली बहुतांश (सर्व नव्हे) Cooperation (परार्थकेंद्रीच) साठीच असते असं म्हणता येईल.

सबब मानवाने मानवाला स्वार्थ व परार्थ ह्याबद्दल कोणतेही लेक्चर देऊ नये. Leave people alone.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सबब मानवाने मानवाला स्वार्थ व परार्थ ह्याबद्दल कोणतेही लेक्चर देऊ नये. Leave people alone.

ओके Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही वाक्यं आणि शब्द साधारण बरोबर वाटताहेत, पण या सगळ्याचा 'मानवात परोपकार करण्याची ऊर्मी असते. त्या ऊर्मीचा फायदा होवो न होवो, आपल्या आसपासच्यांना मदत करण्याची जवळपास भुकेसारखीच गरज असते. याचा पाया जनुकीय आहे.' या निष्कर्षाशी संबंध काय? आणि हे लेक्चर देणं वगैरे कुठून आलं? माणूस हा एकच प्राणी आहे जो लेक्चरं झोडू शकतो. पण इतर प्राण्यांनाही किन सिलेक्शन थियरी लागू पडते. त्यांच्यातही परोपकार भावना दिसते. हे निरीक्षण आहे. ते डिस्क्रिप्टिव्हवरून प्रिस्क्रिप्टिव्हवर कसं पोचलं?

जनुकीय फायदा आणि व्यक्तिगत फायदा यात गल्लत होते आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण या सगळ्याचा 'मानवात परोपकार करण्याची ऊर्मी असते. त्या ऊर्मीचा फायदा होवो न होवो, आपल्या आसपासच्यांना मदत करण्याची जवळपास भुकेसारखीच गरज असते. याचा पाया जनुकीय आहे.' या निष्कर्षाशी संबंध काय?

जर परोपकारी वृत्तीला जनुकीय पाया असेल तर मानव परोपकारी सुद्धा वागेल आणि जर जनुके स्वहितकारी वागणूकीस प्रेरक असतील तर स्वहितकारी वागेल.

माझं म्हणणं हे आहे की आजची स्वहितकारी कृत्ये ही सुद्धा भावी परोपकारी वागणूकीच्या सुप्त उद्देशानेच केलेली असतात.

व म्हणून आजच्या स्वहितकारी वा परोपकारी या दोन वागण्यातला बॅलन्स मानवाचा मानवाला ठरवू द्यावा. मॅनेज करायचा यत्न करू नये.

हे माझे मत आहे. मतं ही अनेकदा प्रिस्क्रिप्टिव्ह असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझं म्हणणं हे आहे की आजची स्वहितकारी कृत्ये ही सुद्धा भावी परोपकारी वागणूकीच्या सुप्त उद्देशानेच केलेली असतात.

तुम्ही कुठच्यातरी वरच्या सिस्टिमॅटिक पातळीबद्दल बोलत आहात असं वाटतं. लेखात दावा असा आहे की असले काही ज्ञात, उघड, उद्देश नसले तरीही माणूस व अनेक प्राणी परोपकारी वागतात. तसं वागणं ही गरज व्हावी इतकी ऊर्मी जनुकांनी निर्माण केलेली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर - मला भूक लागते म्हणून मी खातो. त्यात 'मी जर खाल्लं तर माझी वाढ होईल आणि त्यातून मला फायदा होईल' वगैरे विचार नसतो. माणूस कदाचित असा विचारही करू शकत असेल. मात्र बहुतांश प्राण्यांना भूक भागवण्याची आंतरिक ऊर्मी असते. माणसालाही असते. तशीच परोपकारी वागण्याची ऊर्मी माणसात असते.

ऊर्मी आहेत, किंवा काही उद्देशाने काही गोष्टी केल्या जातात म्हणून त्या मॅनेज करू नयेत हे कसं काय? हिंसा ही ऊर्मी आणि उद्देश या दोन्हींमधून येते. मग हिंसा मॅनेज करू नये का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऊर्मी आहेत, किंवा काही उद्देशाने काही गोष्टी केल्या जातात म्हणून त्या मॅनेज करू नयेत हे कसं काय? हिंसा ही ऊर्मी आणि उद्देश या दोन्हींमधून येते. मग हिंसा मॅनेज करू नये का?

मॅनेज करू नयेत असं म्हणण्या ऐवजी मॅनेज नाही केल्या तरी फारसं काही बिघडणार नाही असं म्हंटलं तर कसं वाटतं ? पटणेबल आहे का ? नसेल पटत तर माझ्यासमोर दोन पर्याय आहेत - (अ) मुद्दा मागे घेणे, (ब) सोडून देणे.

-

हिंसा हा मुद्दा वर मी (२) मधे अंतर्भूत केलेला होताच की. फक्त मी शब्द Coercion हा वापरला. तो स्पर्धा वा सहकार्य या दोन क्याटेगरीत फिट्ट बसत नाही असा माझा समज आहे. म्यानेज अवश्य करावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजच्या स्वहितकारी वा परोपकारी या दोन वागण्यातला बॅलन्स मानवाचा मानवाला ठरवू द्यावा. मॅनेज करायचा यत्न करू नये.

ही मॅनेजरगिरी नक्की कोण करतंय असा प्रश्न पडतो? परोपकार, परस्परकल्याण इत्यादी गोष्टी बहुसंख्य माणसांना मान्य असतात. हे माझं म्हणणं नाही, ३७ निरनिराळ्या संस्कृतींचा अभ्यास करून उत्क्रांतीय मानसशास्त्राचा अभ्यास केलेल्या संशोधकांचं म्हणणं आहे.

अर्थशास्त्रातल्या ठराविक पोथीत ते बसत नसेल तर ती पोथी सध्याच्या माणसांसाठी फार उपयुक्त नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे माझं म्हणणं नाही, ३७ निरनिराळ्या संस्कृतींचा अभ्यास करून उत्क्रांतीय मानसशास्त्राचा अभ्यास केलेल्या संशोधकांचं म्हणणं आहे. अर्थशास्त्रातल्या ठराविक पोथीत ते बसत नसेल तर ती पोथी सध्याच्या माणसांसाठी फार उपयुक्त नाही.

(१) गब्बर ची ती पोथी आणि तुमचे ते संशोधन ?
(२) ३७ संस्कृत्यांचा अभ्यास करणारे ते संशोधक (व म्हणून ग्राह्य) आणि गब्बर जे म्हणतोय ते अर्थशास्त्रीय आणि फक्त अर्थशास्त्रीयच पोथीतलं ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही मॅनेजरगिरी नक्की कोण करतंय असा प्रश्न पडतो? परोपकार, परस्परकल्याण इत्यादी गोष्टी बहुसंख्य माणसांना मान्य असतात.

जर परोपकार, परस्परकल्याण इत्यादी गोष्टी बहुसंख्य माणसांना मान्य असतात तर मग त्याच्याबद्दल बलप्रयोगी कायदे करून ते राबवायची गरज काय ? उदा. pre-existing medical conditions असलेल्या व्यक्तीला ज्यांना हेल्थ इन्श्युरन्स विकायचा नाही त्यांना तो विकण्याची जबरदस्ती का केली जावी ? एखाद्या बालकाच्या pre-existing medical conditions ह्या जनुकीय असू शकतात की नाही ? असल्यास - त्या बालकाचा हेल्थ इन्श्युरन्स आम्ही करणार नाही असं म्हणणार्‍या इन्श्युरन्स कंपनीला बळजबरीला तोंड द्यावे लागावे का ? ( बालकाचे पालक पैसे देणार आहेत हे माहीती आहेच) - पण पैसे देत असूनही आम्ही तुम्हाला आमचे प्रॉडक्ट विकणार नाही असं म्हणणार्‍या कंपनीबद्दल मी बोलतोय.

व हे कायदेकरणार्‍यालाच व राबवणार्‍यालाच मॅनेजर म्हणता येईल की नाही ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'मानवात परोपकार करण्याची ऊर्मी असते. त्या ऊर्मीचा फायदा होवो न होवो, आपल्या आसपासच्यांना मदत करण्याची जवळपास भुकेसारखीच गरज असते. याचा पाया जनुकीय आहे.

म्हणुनच तो अर्थ काय बेंबीचा लेख आणि हा लेख काँट्रॅडिक्टरी वाटले. त्या लेखात ज्या भावना दिसल्या त्या या जनुकीय पायाच्या एकदम विरोधात आहेत. हे कसं? का ही जनुकीय उर्मी कॉमन नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

खरं तर अर्थ काय बेंबीचा आणि नात्यांचा जनुकीय पाया या लेखांत परस्परविरोधी काही नाही. हा मुद्दा तितका सोपा नाही, त्याला अनेक पदर आहेत. त्यातले काही थोडक्यात मांडतो.

- पहिला मुद्दा असा की माणसाची सगळीच वागणूक जनुकांनी प्रोग्राम केल्याप्रमाणे होत नाही. त्यामुळे बांधणारी नाती असतात पण लोक त्या नात्यांचा गैरवापर करतानाही दिसतात, हेही होणारच.
- जनुकीय दृष्टीकोनातून पाहिलं तरीही मी एक व्यक्ती म्हणून मोठा झाल्यावर माझी गुंतवणुक आईबापांमध्ये करण्यात जनुकीय फायदा नाही. कारण ते पुनरुत्पादन करून माझी जनुकं पुढे नेऊ शकत नाहीत. याउलट माझी गुंतवणुक माझ्या मुलांत करणं ही माझ्या जनुकांच्या दृष्टीकोनातून फायद्याची गोष्ट आहे. मात्र मी वयस्क झालो की मलाही हेच लक्षात ठेवायला हवं.
- ज्या काळी जनुकीय बदल घडले, त्या काळात आईवडील इतके जगत नसत. त्यामुळे जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत पुनरुत्पादन करायचं आणि असलेल्या मुलांचं संगोपन करायचं ही स्ट्रॅटेजी कार्यरत होती. मुलांनी मग त्यांच्या मुलांकडे पाहायचं.
- आईवडील आणि मूल यांच्यातलं 'भांडण' इतर प्राण्यांतही दिसतं. नुकत्याच जन्मलेल्या पिल्लाला आईवडील पोसत राहातात. पण काही काळापर्यंतच. पिल्लू मोठं झालं की त्याने घरट्याबाहेर पडावं, म्हणजे आईवडिलांना पुढच्या पिल्लाची तयारी करता येते. यासाठी अनेक पक्ष्यांमध्ये त्या मोठ्या पिल्लाला हाकलून लावावं लागतं. सस्तन प्राण्यांत आई पिल्लाला दूध द्यायचं थांबवते. या प्रक्रियेला इंग्लिशमध्ये वीनिंग म्हणतात. या प्रकारच्या संघर्षाला उत्क्रांतीचाच पाया आहे. आईवडील म्हातारे झालेले असताना त्यांनी मुलांवर अवलंबून राहाण्याची अपेक्षा ठेवणं आणि मुलांनी ती नाकारणं हे याच संघर्षाचं उलटं स्वरूप आहे.
- मानवी समाजात नुसतंच मुलांना नाही, तर इतरांना कोणाला आपलं किती कर्ज आहे, आणि त्यांनी किती परतफेड केली हे मोजण्याची, आठवणी ताज्या ठेवण्याची जास्त अचूक पद्धत आहे. मानवांकडे ते बोलून दाखवण्याचीही पद्धत आहे. त्यामुळे आपल्याला हे संघर्ष जास्त प्रकर्षाने जाणवतात.

-

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपलं भावंडांबद्दल प्रेम आणि आई-वडिलांबद्दल प्रेम हे वेगळं आहे असं आता वाटत आहे. बरोबर? भावंड जगण्यात माझे (?) जीन्स पुढं जाण्याचा चान्स आहे पण आई-वडिलांबाबत तसं नाही.

ज्या काळी जनुकीय बदल घडले, त्या काळात आईवडील इतके जगत नसत. त्यामुळे जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत पुनरुत्पादन करायचं आणि असलेल्या मुलांचं संगोपन करायचं ही स्ट्रॅटेजी कार्यरत होती. मुलांनी मग त्यांच्या मुलांकडे पाहायचं.

हा मुद्दा एकदम पटला. ३०-३५वर्ष आयुर्मान असताना म्हातारे आई-वडील अशी सिचुएशन आधी फार कवचित येत असावी.

अजून विचार करतो आहे. सविस्तर उत्तराबद्दल पुन्हा धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !