खेळ
खेळ
- नीधप
लेडिजबायकांसाठी आणलेली भिकार पोर्ट वाइन हातात घेऊन संहिता अमाप कंटाळून बसली होती. पोर्ट वाइनचा ग्लास तिच्या हातात खुपसला गेला तेव्हापासून तिला कंटाळा आला होता. आपण हिच्यासाठी वेगळी बायकांची दारू आणलीये त्यामुळे आपण होस्ट म्हणून एकदम ढिंग्च्यॅक्क आहोत अशा खुशीत राजोपाध्येने पाऊच फोडून तिचा ग्लास भरून दिला होता.
बाहेर गच्चीवर हेमंत, निनाद, राजोपाध्ये, राजोपाध्येचे दोन साडू आणि इतर पुरुष मंडळी बायकोला घाबरणं, विविध ठिकाणच्या बायका, त्यांची शरीरयष्टी आणि त्यांचं चारित्र्य, बॉसची लफडी, आपापल्या नोकरीत आपण मारलेले मायक्रोस्कोपिक तीर इत्यादींवर टिपिकल हास्यविनोद करत खिदळत होती. ग्लासेस भरलेले होते, भरले जात होते. स्वैपाकघरातून चकण्याचे गरम गरम पदार्थ, पंधरा मिनिटाला एक ताट या वेगाने बाहेर जात होते.
संहिता आणि निनाद तिथे पोचले तेव्हा नेहमीच्या सवयीप्रमाणे संहिताही निनादबरोबरच बाहेर बसली होती. पाच दहा मिनिटं झाल्यावर पुरुष मंडळी थोडी अस्वस्थ झालेली दिसली आणि तेव्हाच ज्योतीने - हेमंतच्या बायकोने - संहिताला स्वैपाकघरात बोलावलं. ती आत गेली. बाहेरचा ताण थोडा सैल झाला असावा कारण परत हास्यविनोद चालू झालेले संहिताने ऐकले.
ती आत गेली. पाठोपाठ पाच मिनिटात राजोपाध्ये एक पाऊच घेऊन आला. 'एक ग्लास दे गं.' त्याने बायकोला फर्मावलं. तिने तळणी सोडून पटकन एक ग्लास त्याला आणून दिला. "लेडिजबायकांना आमची ड्रिंक्स चालणार नाहीत आणि जोक्सही. ह्यॅ ह्यॅ ह्यॅ! हे घ्या तुमचं ड्रिंक." असं म्हणत राजोपाध्येने पोर्ट वाइनचा एक पाऊच उघडून ग्लासात ओतून तिच्या हातात तो ग्लास कोंबला. तो कोंबताना 'बाहेर पुरुषांच्यात येऊ नका. इथेच बसा!' हे त्याने नक्की मनातल्या मनात म्हटलं असणार अशी संहिताला खात्री होती. तिला कंटाळा आला.
आतमध्ये राजोपाध्येची बायको, तिच्या बहिणी, हेमंतची बायको ज्योती आणि इतर काही बायका विविध पदार्थ बनवण्याच्या किंवा पोरांना खायला घालायच्या, त्यांना गच्चीवर जायला अटकाव करण्याच्या, दामटून झोपवण्याच्या कामात होत्या. ज्योतीने चखण्याच्या काही पदार्थांनी भरलेली एक डिश तिच्याकडे सरकवली. ज्योती सोडून तिची कोणाशीच ओळख नव्हती. संहिता सोडून कुणाच्याही हातात ग्लास नव्हता. सगळ्या बायकांपैकी कोण, काय, इत्यादी विचारून जरा वातावरण मोकळं करायचा संहिताने प्रयत्न केला; पण एका शब्दाला अर्ध्या शब्दाचं उत्तर असा थंडा रिस्पॉन्स मिळाला. शेवटी तिने ग्लासातल्या द्रव्याचा एक घोट घेतला आणि त्याची गोडमिट्ट चव घालवायला पनीरचा एक टिक्का खाऊन टाकला.
राजोपाध्येच्या बायकोचं तेव्हाच तिच्याकडे लक्ष गेलं. "पनीर एकदम मस्त मिळालं आज. आमच्या ओळखीचे आहेत ना, त्यांची डेअरी आहे. तिथून आणलंय." संहिताने तिला इंटरेस्ट असल्यासारखी मान हलवली आणि पुढे काय करायचं ते न कळून अजून दोन घोट घेतले.
"हेमंतच्या शाळेतल्या मित्राचा बंगला आहे. राजोपाध्ये नाव त्याचं. यावर्षी थर्टीफर्स्टसाठी हेमंत तिकडे बोलावतोय आपल्याला."
"कशाला? नेहमीसारखा इथेच ये म्हणावं त्याला."
"ज्योतीला तिथे जायचंय!"
"ओह! पण बाकीचे कोण लोक असतील रे?"
"आपल्याला काय करायचंय? आपण दोघं आणि हेमंत असला की बास्स झालं की."
हे तर खरंच होतं. या तिघांचं एक मस्त गूळपीठ होतं. संहिता-निनादच्या घरात तिघांच्या गप्पांच्या मैफिलीवर मैफिली झडायच्या. कधीमधी ज्योतीपण असायची. गेल्या चार वर्षांपासून हेमंतसकट काही अगदी जवळचे चार-पाच जण संहिता-निनादच्या घरी असायचे एकतीस डिसेंबरला. गप्पा, कविता, गाणं, बासरी अगदी चैन चालायची. चारही वर्षं ज्योतीने काही ना काही कारण काढून टाळल्याचं संहिता आणि निनादच्या लक्षात आलं होतं. नाक खुपसणं नको म्हणून हेमंतशी हा विषय दोघांनीही काढला नव्हता. यावर्षी हेमंत ज्योतीच्या इच्छेप्रमाणे करायचं म्हणतोय तर तसं करू, असं म्हणून त्यांनी राजोपाध्येकडे जायचं ठरवलं.
बाहेर पुरुषमंडळींच्या हास्यविनोदाला ऊत आला होता. आतमध्ये सर्व बायका खुसफुसत होत्या. त्यांच्या खुसफुशीचा उगम मात्र संहिताच्या हाती लागत नव्हता. पाचेक वेळा प्रश्नार्थक चेहरा करून झाल्यावर संहिताने नाद सोडून दिला. समोरच्या डिशमधल्या चिवड्यातला एकेक शेंगदाणा, डाळं वेचून ती खात बसली. अचानक खुसफुस वाढल्याचं लक्षात आलं. संहिताने तळणीच्या दिशेने बघितलं. तिच्याकडे बघूनच खुसफुस वाढली होती. "तुला जेवायला देऊ का? पुलाव तयार आहे गरम गरम. जेवून घे. म्हणजे त्रास होणार नाही." ज्योती पाठ केल्यासारखं एका दमात म्हणाली.
गुळचट पोर्ट वाइनचे जेमतेम ३-४ घोट मूळभर तळणाबरोबर पोटात गेल्यावर, संहिताला चिवड्यातले दाणे वेचताना पाहून, सर्व बायकांनी तिला चढली असावी असा स्पष्ट समज करून घेतलेला होता. त्या सगळ्या एकाच वेळी संहिताच्या डोक्यात गेल्या. इथे ती एकटी दुराचारी होती आणि बाकी सदगुणी स्त्रियांचा कळप होता.
असाच बराच वेळ गेला. अजून काही घोट, अजून तळण, आपल्या दुराचारीपणासकट संहिताने गिळले. "तुमची पार्टी कधी?" उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून तिने ज्योतीला विचारलं. अचानक कोणीतरी स्टॅच्यू म्हणल्यासारख्या सगळ्या प्रश्नार्थक स्तब्ध झाल्या. "अगं हीच पार्टी आहे!" ज्योतीने प्रचंड समजुतीच्या स्वरात सांगितलं. "ही? तुम्ही तर सगळ्या कामंच करताय की!"
"आम्हाला नै बै दारू बिरू पिऊन खिदळत बसायला आवडत. आमच्या मजेच्या कल्पना वेगळ्या आहेत." राजोपाध्येच्या बायकोची एक बहीण फणकारली. "काय आहेत तुमच्या मजेच्या कल्पना?" संहिताला मनापासून विचारावसं वाटलं पण ती गप्प बसली. प्रत्येकीने क्षणभर आपल्या मजेच्या कल्पनेची स्वप्नं बघितली. कोणीच काही बोललं नाही. विचित्र शांततेत काही वेळ गेला.
'डिशमध्ये काही नाहीये इथे. लक्ष नाहीये का कोणाचं?' बाहेरून राजोपाध्येची आरोळी आली. राजोपाध्येची बायको दचकली आणि जागच्याजागी वळली. कुणीतरी कुठल्यातरी पदार्थांनी पटकन एक ताट भरलं. ताट घेऊन राजोपाध्येची बायको बाहेर जायला निघणार तेवढ्यात तिरीमिरीत संहिता उठली. ताट हातात घेतलं. चिवड्याच्या, चिप्सच्या पुड्या उचलल्या आणि कोणाला काही समजायच्या आत बाहेर गेली.
दिसलेल्या रिकाम्या जागेत जरा जोरानेच तिने ताट ठेवलं, पुड्या ठेवल्या. "ह्या पुड्या, डिशमधलं संपलं की त्यातून आपलं आपण काढून घ्या." एवढं म्हणून संहिता वळली आणि आत निघाली.
"चढलीये तुला. सीन करू नकोस." हेमंत अचानक संहिताच्या जवळ येऊन म्हणाला. "हेमंत? चार घोट पोर्ट वाइनचे फक्त... आणि लगेच? सिरीयसली? यू नो मी बेटर!" संहिता महा वैतागली. उठून तिथे येण्याशिवाय निनादला गत्यंतरच नव्हतं. "खूप कंटाळवाणं चाललंय हे निनाद! निघूया, प्लीज!" निनादने नेहमीप्रमाणे सगळं समजल्यासारखी मान डोलावली. ती दोघं निघाली तिथून.
"दोन मिनिटं थांब. मी तुझ्याबरोबर येतेय संहिता." ज्योतीलाही आपण हे का बोललो, कसं बोललो कळलं नाही. "मग आधीच सांगायचंस ना? तुला इथे यायचं होतं म्हणून मी या दोघांना पण खेचलं इथे." हेमंतच्या तोंडून दबत्या आवाजात का होईना, निसटलंच.
"पार्टी सोडून तुम्ही चाललात काय?" राजोपाध्येची बायको काहीच घडलेलं नसल्यासारखी ज्योतीला म्हणाली. ज्योती आतल्या खोलीकडे पर्स आणायला वळली. राजोपाध्येच्या बायकोने हेमंतकडे बघितलं. हेमंतने खांदे उडवले. "तुम्ही एंजॉय करा. आम्ही निघतो." हेमंत राजोपाध्येच्या बायकोला आणि राजोपाध्येला म्हणाला. संहिता ते बघत होती. हेमंतच्या निरोप घेण्यात माफी मागण्याचा सूर आहे की काय असं संहिताला वाटलं.
संहिता आणि निनाद कारमध्ये जाऊन बसले. ज्योती आणि हेमंत त्यांच्यानंतर १० मिनिटांनी आले. "आम्हाला घरीच सोड." शक्य तितका राग दाबून ठेवायचा प्रयत्न करत हेमंत म्हणाला.
"का? मला त्यांच्याबरोबर जायचंय."
"एवढे वेळा या दोघांना टाळलंस आणि आजच काय नडलंय?"
"मला जायचंय!"
"ठीके सध्या आमच्या घरी चला. तिथे भांडा. गाडीत बसून किती वेळ भांडणार?" निनादने नेहमीप्रमाणे समजुतीचा स्वर लावला. रथ हलला. संहिता घुश्श्यात होती आणि निनाद संत असल्याने शांत होता. अत्यंत, म्हणजे टाचणीटाकू वगैरे शांततेत गाडीतला प्रवास झाला.
हातपाय धुणं, कपडे बदलणं, पाणीबिणी असले सगळे उपचार पार पडले. निनादने कपाटातून नेहमीच्या ब्रॅण्डची बाटली काढली. ज्योतीला विचारलं, तिने मानेनेच नको म्हणून सांगितलं. मग निनादने तिघांचे ग्लास भरले. जरावेळ चौघेही हॉलमध्ये बसले. निश्चल, दबा धरलेली शांतता चौघांना विळखा घालून बसली.
लांब कुठे तरी फटाके वाजले, पलीकडच्या बिल्डींगमधून 'हॅपी न्यू इयर!'चा गजर ऐकू आला. घरातल्या वातावरणाला जरा हायसं वाटलं. चौघांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आपापल्या ग्लासमधल्या द्रव्याचा, पाण्याचा एकेक घोट घेतला आणि परत विचित्र शांतता पसरली.
"चला, नवीन वर्ष सुरू झालं. एकदाचं सेलिब्रेशन संपलं. झोप आलीये. मी जाऊन झोपते. उद्या सकाळी भेटू." संहिता बराच वेळ जे वाक्य मनात घोकत होती ते एकदाचं तिने बोलून पूर्ण केलं. ग्लासमधल्या पेयाचा शेवटचा उरलेला घोट संपवला आणि उठली.
"अरे वा! तुझ्यामुळे सगळा घोळ झाला आणि तू आता झोपते म्हणून कलटी मारणार!" हेमंतच्या शब्दांनी दबा धरून बसलेली शांतता खळ्ळकन फुटली. संहिता वळली, तिला तिखट शब्दात काहीतरी उत्तर द्यायचं होतं पण वळल्यावर हे सगळं निरर्थक आहे असं तिला वाटायला लागलं आणि "ठीक आहे, तसं समज हवं तर!" एवढंच तिच्या तोंडून बाहेर पडलं.
"बस थोडा वेळ. अशी कंटाळलेली, वैतागलेली नको जाऊस झोपायला." संहिताचा हात धरून तिला परत बैठकीवर बसवत निनाद म्हणाला. संहिताला पर्याय उरला नाही. "मला आज तरी मी कशी वाईट, मी चुकीचं वागले हे ऐकत बसण्यात इंटरेस्ट नाहीये निनाद! आता पुरे. प्लीज!"
"सवयच नसेल ना कुणी तुला वाईट वगैरे म्हणलेलं ऐकून घ्यायची?" ज्योती शांतपणे पण पुरेशा धारदारपणे म्हणाली. यावर काहीतरी जहरी उत्तर द्यावं यासाठी संहिताचा मेंदू तयारी करत होता. पण हेमंत तर येईल त्या उत्तरावर झडप घालून फाडून टाकायला दबा धरल्यासारखा बसलेला दिसला. मग तिने अत्यंत खोटारड्या आवाजात उत्तर दिलं. "मला पी पी पिऊन माकडचाळे करता नाही आले, वेडंविद्रं वागता नाही आलं? किती कुचंबणा झाली माझी माहितीये का? आणि तुम्ही मलाच बोला!" यावर निनाद ओठांच्या कोपऱ्यातून मंदपणे हसत होता.
"झालं! असं तिरकं विचित्र बोललं की झालं!" हेमंतला तेवढा तरी मुद्दा मिळालाच.
"एरवी तर माझ्या तिरक्या बोलण्याची मजा वाटते तुला. आज काय झालं?"
"तिरकं बोललं की सगळं बरोबर का?"
"मग गोड गोड बोलू का?" संहिता साधारण धमकीच्या स्वरातच म्हणाली...
"नको.. गोड बोलण्याचा त्रास नको!" निनाद हसत हसत म्हणाला. हेमंतचाही नाईलाज झाला. शेवटी येत असलेलं हसू त्याने दाबलं नाही.
ज्योतीला काय चाललंय तेच कळेना. 'पाच मिनिटांपूर्वी ही आपल्या प्रश्नात अडकली होती आणि अचानक सगळं तिसरीकडेच गेलं. हेच होतं नेहमी यांच्याबरोबर. जरा मी बोलायला बघितलं की यांचा विषय कुणीकडेच निघून जातो. सगळं आपल्याभोवती कसं काय फिरवून घेते संहिता?' ज्योती इरिटेट झाली होती. त्याच अवस्थेत ती काही मिनिटे विचार करत राह्यली. कशानेतरी तिची तंद्री मोडली तेव्हा गप्पा वेगळ्याच वाटेवर गेलेल्या होत्या.
"तुम्हाला कोणाला भूक लागलीयं? मला जाम भूक लागलीये."
"काय मागवूया?"
"निनाद, आपल्या घराच्या आसपास रात्री दीड-दोन वाजता काही मिळत नाही.. काय मागवणार?"
"तुझ्या घरात काही नसेलच चकणा टाइप."
"अबरचबर ठेवणं बंद केलंय मी. नको ते हादडलं जातं उगाच."
"मग संहिता काहीतरी करत का नाहीस तू? की येतंच नाही तुला काही? की अबरचबरबरोबर गरजेच्या वस्तूही ठेवणं बंद केलंयस?" ज्योती संभाषणात उतरली.
"सगळं आहे. सगळ्यांना जे आवडेल असं, पटकन होईल असं सोपं काहीतरी करते. भाज्या चिराचिरीला मदत करा मात्र."
"चला.. "
"घरी कधी स्वतः उठून पाणी पण घेत नाहीस आणि इथे भाज्या बिज्या चिरणं, डायरेक्ट?" ज्योती वैतागलीच.
"केलं नाही तर ही संहिता उपाशी ठेवेल"
"आणि घरी काय? ज्योती आहेच्च, काही झालं तरी घालेलच जेवायला? टिपिकल नवरा आहेस रे तू... " अचानक संहिताचा फटकारा आला.
त्यावर हेमंतने काहीतरी सारवासारव केली. 'ज्योती कशाला आलीये इथे?' असं त्याला दोन अडीच वेळा तरी वाटून गेलं. संहिताशी आपलं वैर आहे की संहिता आत्ता आपल्या बाजूने बोललीये ह्या बुचकळ्यात ज्योती डुंबू लागली.
"बरेच दिवसांपासून मला एक गोष्ट खटकतेय ज्योती. मी कधी हेमंतला विचारलं नाही. पण आज दोघंही आहात समोर म्हणून विचारते. तू सुरुवातीला यायचीस हेमंतबरोबर आमच्याकडे. मग बंद का केलंस?" संहिताने कांदा परतताना अतिशय सहज विचारलं.
'हिने आत्ता हा विषय काढायला नको होता.' असं निनाद, हेमंत आणि ज्योती तिघांनाही वेगवेगळ्या कारणांसाठी वाटलं...
"तुला उत्तर माहिती आहे संहिता." ज्योती शक्य तितका राग, वैताग, दुखावलेपणा काबूत ठेवत म्हणाली.
"नाही मला उत्तर माहिती नाहीये. काही शक्यता वाटून गेलेल्या आहेत पण उत्तर माहीत नाहीये"
"इतक्या दिवसांत मला कधी नाही विचारलंस. मग आजच का?"
"इतक्या दिवसांत तुम्ही दोघं एकावेळेला, समोर येण्याची आजचीच वेळ. एरवी तुला मी विचारणार, मग तू काहीतरी सांगणार, मी त्यावर प्रतिक्रिया देणार... सगळंच तिच्या अपरोक्ष. गॉसिपच की ते."
"गॉसिपचा तुला प्रॉब्लेम आहे?" हेमंतने हसण्यावारी न्यायचा क्षीण प्रयत्न केला.
"तो मुद्दा नाहीये सध्या."
"काय उत्तर देणं अपेक्षित आहे तुला, संहिता? मी येत नाही याचं कारण माझ्यातच आहे असं सांगत तुला क्लीनचिट हवीये का?"
"क्लीनचिट? नाही. मी क्लीनच आहे. पण जे काय समज-गैरसमज असतील ते समोर बसून सोडवावेत असं मला वाटतं."
"त्याने काय होईल? माझे सगळे समज गैरसमज असल्याचं तुम्ही मला पटवून दिल्यानंतर मी काय करणं अपेक्षित आहे?"
"नंतरचं कशाला? सध्या तुझे काय समज आहेत ते तू मला सांगणं एवढंच अपेक्षित आहे. तेही तुझी इच्छा असल्यास. नसल्यास आपण विषय बदलू. गाणी ऐकू, पावभाजी खाऊ, झोपी जाऊ."
"तुला सगळं सोपं वाटतं संहिता?"
"सोपं करावसं वाटतं."
"विषय बदला." हेमंत नाराजीच्या स्वरात म्हणाला.
"तू नवीन काय लिहिलंस ते ऐकव हेमंत." निनादने तत्परतेने गाडी वळवायचा प्रयत्न केला.
हेमंतच्या कविता वाचणं, ऐकणं हा एक तिघांच्यातला आनंदाचा भाग होता. निनादच्या दोन चित्रपटांमध्ये हेमंतची गाणी होती. त्यातलं एक संहिताने गायलं होतं.
"हम्म, ही एक नवीन आहे, नुकतीच लिहिलीये." हेमंतने कविता म्हणायचा स्टान्स घेतला. खाकरून घसा साफबिफ केला आणि योग्य स्वरावर सेट केला. सादरीकरणास योग्य असं शरीराचं डिझाइन तयार केलं. एक हात उचलून अंगठा आणि तर्जनी जुळवून, मान तिरकी करून डोळे मिटले...
ज्योतीला फिसकन हसायला आलं. हेमंतची जुळवून आणलेली तंद्री बिघडली.
"हसण्यासारखं काय आहे? कळत नाही तर गप्प रहात जा ना. कळत नाही याचं प्रदर्शन केलंच पाहिजेस का?"
हेमंत बराच वेळ विविध कारणांवरून धुमसत होता. केव्हापासून कोंडून ठेवलेली वाफ अशी ज्योतीवर बाहेर निघाली. समूहात घाणेरडी शांतता पसरली. ज्योती आधी चिडली, मग दुखावली, मग हताश झाली, मग सावरली आणि संहिताला म्हणाली.
"मिळालं उत्तर, मी का येत नाही त्याचं?"
"मी नको येऊ म्हणालो नव्हतो. तुझं तूच ठरवलंयस."
"त्याला कारण तूही आहेस ना. मी कशी वागतेय सगळीकडे, याच्यावर सतत वॉच असतो तुझा. तुला पटणार नाही असं मी काही करायचं नाही. माझ्या कुठल्याही बोलण्याने तुला माझी लाज वाटू शकते. मग घरी आल्यावर दोषारोप, कोर्टात उभं केल्यासारखे वितंडवाद. कंटाळा येतो मला."
"ओळखतात लोक मला. तू कशी वागतेस यामुळे माझी इमेज बिघडते."
"नक्की किती लोक ओळखतात असं वाटतं तुला हेमंत?" अचानक निनादचा प्रश्न आला.
"ओळखतात रे. कुठेही गेलं तरी तुम्ही अमुकतमुक ना? असं विचारायला येतात लोक. आपण कसंही वागलं तर नाही चालत. त्याचा इश्यू होतो उगाच"
"तिला काय वेड लागलंय का कसंही वागायला? काहीही!" हे बोलणं म्हणजे आगीत तेल ओतणं हे लक्षात येऊनही न राहवून संहिता बोललीच.
हेमंत शब्द जुळवत काही क्षण गप्प झाला. कारण काहीही असो, संहिताने हेमंतला फटकारणं हे ज्योतीला फारच गमतीचं वाटलं. कितीही प्रयत्न केला तरी फिस्स्कन हसू बाहेर पडलेच.
"हे बघ.. हे बघ.. काही कारण नाही काही नाही.. उगाच बावळटासारखी हसते ही कुठेही!"
"हो हसते मी. घरातला तू आणि बाहेरचा दिखावा यातला इतका टोकाचा फरक मला हसायला भाग पाडतो. संहितासारख्यांची उदाहरणं देऊन, त्या बायका असं करत नाहीत हे तू सांगितलंयस अनेकदा. पण मी त्या लेव्हलला जाऊ शकणार नाही. "
"माझ्यासारख्या? म्हणजे नक्की कश्या? त्या लेव्हलला जाऊ शकणार नाहीस म्हणजे कुठली लेव्हल?"
"जाऊदे हा विषय!"
"नाही ज्योती जाऊदे नाही. मला कळूदे तरी माझ्यासारख्यांची काय लेव्हल आहे ती." संहिता शांतपणे म्हणाली.
ज्योती थोडक्यात आणि थेट आणि चपखल असे शब्द शोधत होती. हेमंतशी वाद होत असे तेव्हा संहितासाठी वापरलेले सगळे शब्द तिला आत्ता अजिबात वापरायचे नव्हते.
"बिंधास्त, दारूडी, अतिशहाणी, लोकांना आपल्या मनाप्रमाणे नाचवणारी, दिखाऊ वगैरे वगैरे... लिस्ट बरीच मोठी आहे!" हेमंत कुजकं हसत म्हणाला. ज्योतीला काय बोलावं कळेनासं झालं. सर्व जण तिच्याचकडे बघत होते. काहीतरी उत्तर द्यावंच लागणार होतं.
"असं सगळं मी संहिताबद्दल म्हणते त्यामुळे मी किती वाईट वगैरे चर्चा सुरू करायला हरकत नाही आता तुम्हाला!"
"म्हणजे थोडक्यात मी, माझी कंपनी तुला आवडत नाही. आपली मैत्री होऊ शकत नाही, एवढंच कारण आहे तू येणं बंद करायला?" हे इतकं साध्या लेव्हलला आणल्याचं ज्योतीला तसं आवडलं नव्हतं पण त्यात खोटंही काही नव्हतं. सगळ्या चिडचिडीच्या फुग्याला टाचणी लागून फुस्स झाल्यासारखं ज्योतीला झालं.
"करेक्ट संहिता, तेवढंच तर खरं कारण आहे. बाकी सगळी नाटकं!" हेमंतने आपल्या चिडचिडीला धार आणली परत.
"मग असूदेत की. ज्योतीला संहिता आवडलीच पाहिजे, त्यांची मैत्री झालीच पाहिजे असं कुठंय?" संत निनाद उवाच
निनादच्या संतपणाची वरकरणी लागण करून घेतली असली तरी संहिता थोडी का होईना खट्टू झालीच होती सर्व विशेषणं ऐकून. मी अशी आहे हे का वाटतं तुला? मी इतकी वाईट आहे? वगैरे प्रश्न आकांताने विचारावेत, ‘मी नाहीये गं अशी’ असं कळवळून सांगावं ज्योतीला अशा बऱ्याच नाट्यमय इच्छा झाल्या तिला. पण ती गप्पच बसून राह्यली.
मला संहितासमोर मठ्ठ, कमी वगैरे असल्यासारखं वाटतं, तिच्या व्यक्तिमत्वाचं दडपण येतं, ती ज्या सहजपणे सगळ्यांच्यात वावरते ते मला जमत नाही याचा त्रास होतो, ती कलाकार, कलेमध्ये करीअर करणारी आणि आपण नवऱ्यासाठी आपल्या कलेचा गळा दाबून खर्डेघाशीचा जॉब पत्करलेल्या; त्यामुळे आपलं अनुभवविश्व तोकडं पडतं तिच्यापुढे वगैरे अनेक गोष्टी ज्योतीच्या मनात होत्या; पण या सगळ्यात कुठेतरी संहिताबद्दल कौतुक दडलेलं होतं; त्यामुळे ज्योतीने ह्या गोष्टी कधी हेमंतसमोरही बोलून दाखवल्या नव्हत्या. बराच वेळ कुणीच काही बोललं नाही.
"म्हणजे आता समज, गैरसमज दूर झालेत का?" संत निनाद यांनी तहाची बोलणी सुरू केली. संहिता खट्टू झाल्याचं त्याला दिसलं होतं. एवढा वेळ संहिता सगळं शांतपणे घेतेय म्हणजे लवकरच विजांचा कडकडाट आणि झालंच तर ढगफुटी वगैरेही होणार हे भविष्य त्याला दिसत होतं. त्याच्यापुढे काय हेही तो जाणून होता आणि त्याला ते टाळायचं होतं.
"झाले असतील तर आता काय मी आणि ज्योतीने हातात हात घेऊन, एकमेकींच्या गळ्यात पडून बट्टी घ्यायची आहे का?"
"कसल्या विनोदी दिसाल तुम्ही दोघी असं करताना!"
"म्हणूनच करणार नाही आहोत!"
"का विनोदी का दिसू? संहितासारखी बाई मला मैत्रीचा हात पुढे करतेय म्हणून?" ज्योती प्रयत्न करूनही फणकारा मोड सोडू शकत नव्हती.
"संहितासारखी म्हणजे काय? दारूडी, अतिशहाणी, लोकांना आपल्या मनाप्रमाणे नाचवणारी, दिखाऊ? अजून काय?" सप्पकन वार केल्यासारखे संहिताचे प्रश्न आले. ज्योती काहीही बोलायला जाणार तेवढ्यात निनादने हातानेच सगळ्यांना थांबवलं.
"नको थांबवूस या दोघींना निनाद.. आज विषय निघालाच आहे तर एकदा होऊन जाऊदेत!"
"ओहो.. आता लक्षात आलं.. हलकट इसमा, आम्ही दोघी भांडलो तर तुझ्या इगोला गुदगुल्या होणारेत... खड्ड्यात जा नाही भांडत.." वरवर हसत हसत पण तरी मगाचच्याच धारदारपणे संहिता बोलती झाली. ज्योती संहितावर चिडायचं की हेमंतवर यात कन्फ्युज झाली होती.
"आता ही शाब्दिक कापाकापी पुरे करा. एवढीच हौस आहे एकमेकांना दुखवायची, तर जे काय आहे मनात ते तसंच्यातसं बोलायची, आणि नंतर ते अॅक्सेप्ट करायची, आणि त्याच्या परिणामांना सामोरं जायची तयारी आहे?"
"काय बोलतोयस तू?" हेमंत चिडीला आला होता.
"या बोचकारणं एपिसोडनंतर तुम्ही दोघं एकमेकांशी कसे असाल तुमच्या घरात? केलायस विचार याचा?"
"ती तयारी, तो विचार तुलाही करावा लागेल निनाद!" संहिता एकेक अक्षर पुरेशा ठामपणे ठरवून उच्चारत गेली.
"मी?"
"हो तू! मी, हेमंत, ज्योती तिघांपुरतंच नाहीये हे. तुला असावंच लागेल." निनाद विचार करत गप्प बसला.
"येऊदेत मग सगळ्याच मा़ंजरी पिशव्यांच्या बाहेर..." ज्योती उद्गारली.. एव्हाना तिला तिच्या इन्सिक्युरिटीज उघड्या होण्याचं काहीच वाटेनासं झालं होतं. निदान पाच मिनिटे तरी गेली असतील एका अवघड शांततेत.
"मला ज्योती आवडत नाही. मला हेमंत आवडतो पण फक्त कवी आणि मित्र म्हणून. पण ज्योतीला आमच्याबद्दल संशय असावा त्यामुळे ज्योती येत नाही. माझ्यावरून ज्योती आणि हेमंतमुळे तणाव निर्माण होत असावा, हे लक्षात आल्यापासून मी त्याला आपणहून कुठे बोलावणं, फोन करणं वगैरे सगळं बंद करून टाकलं. कारण हेमंतच्या कविता, त्याची चित्रं, चित्रं बघण्याची दृष्टी एवढ्याच परिघापुरती माझी त्याची मैत्री होऊ शकते. पण त्यापलिकडे जाऊन एक माणूस म्हणून मला तो आवडत नाही किंवा प्रियकर वा जोडीदार म्हणून हेमंतचा मी कधी विचारही करू शकत नाही. ज्योती हेमंतच्या आयुष्यात नसती किंवा निनाद माझ्या आयुष्यात नसता तरीही मी हेमंतचा असा विचार करू शकले नसते. ही इज जस्ट नॉट माय टाइप.”
”ज्योतीला संशय तरी येतो, पण हेमंत संदर्भानेच काय इतर चटका मटेरियल मित्रांच्या संदर्भानेही निनादला माझा संशय येत नाही. तितपतही विचार करावासा वाटत नाही माझा याच्याबद्दल मात्र… असो! आता तुमच्या मनात माझ्याबद्दल जे आहे तेच सिद्ध होईल अशा प्रकारे याचं सबटेक्स्ट काढता येईलच. पण हे एकदाच सांगून टाकल्याने मला बरं वाटलंय."
स्वतःचा प्रामाणिकपणा संहिता कशी कॅश करते हे निनादला परत एकदा जाणवलं. खरंतर संहिताच्या इतर सगळ्या गोष्टींपेक्षा या लख्ख खरं बोलण्यानेच निनाद तिच्या प्रेमात वगैरे पडला होता. अर्थात त्याच्या चौकटीत राहून प्रेम.
"चटका मटेरियल? आणि मी तुझ्या टाइपचा नाही? कोण समजतेस तू स्वतःला?" हेमंत बालिश चिडचिडीची कंटिन्युटी अज्जिबात सोडत नव्हता.
"ती कोणीही समजेल पण तुला का फरक पडावा?" ज्योतीने बोचकारण्याची संधी सोडली नाहीच.
"जास्त शहाणपणा करू नकोस!"
"का? खरं आणि जे वाटतं ते बोलायचं ठरलंय ना?"
"खरं!" हेमंत प्रचंड तुच्छतेने हसला.
"हो खरं. मला संहिता आणि तुझ्याबद्दल संशय नाहीये हेमंत. तू तिच्या प्रेमात असण्याबद्दल खात्री आहे. तुला संहिताचं फॅसिनेशन आहे. तिचं बोलणं, वागणं, तिची कला सगळ्याचं... फॅसिनेशन आणि अंगावर येणाऱ्या तिच्या प्रामाणिकपणाचं फॅसिनेशन तुला सगळ्यात जास्त आहे. संहिता तुला प्रेयसी म्हणून हवीशी असते, पण ती तुझी बायको होऊ शकत नाही कारण ती तुझ्या डोक्यातल्या टिपिकल भारतीय बायकोच्या व्याख्येत बसणारी नाही हे तू जाणतोस. आणि त्यामुळेच तुला मी बायको म्हणून हवी असते. सुरुवातीला एकटी ब्रेडविनर असूनही घरातलीही सर्व जबाबदारी सांभाळणारी, गोतावळ्याला खुश ठेवणारी, वगैरे.”
“आता तू स्थिरस्थावर झाल्यावर तुला बायकोने स्वतःला मेंटेन्ड ठेवलेलं नाही, मेंदूच्या कक्षा रुंदावणारं काही तिच्याकडे नाही, हे दिसायला लागलंय आणि खुपायला लागलंय. तुझ्या कलेची सगळी बाळंतपणं निस्तरण्यात, भाजीभाकरी कमावण्यात आणि सासरघरच्या ज्याचीत्याची मर्जी राखण्यात बायकोला या सगळ्या गोष्टींसाठी वेळ आणि उसंत मिळाली नाहीये, हे तू विसरतोस.”
“तुला आता मी बदलायला हवीये पण ती तुझ्या सोयीने. तुझ्याबरोबर असताना मी प्रेझेंटेबल आर्म अॅक्सेसरी असणं तुला हवंय, म्हणून मी मेंटेण्ड असायचंय. तुझ्याबरोबर वावरताना मी मठ्ठ वाटले तर तुझी इमेज गडबडेल म्हणून आणि तेवढ्यापुरत्याच मी मेंदूच्या कक्षा रूंदावायच्यात.”
“तुला समाजात मिसळताना मी संहिता असायला हवं आहे पण घरामध्ये ज्योतीच्या रोलमध्ये कणभर चूक होता कामा नये. मी संहिताकडे येणं सोडलं कारण मला इथे आणण्याचा तुझा एकमेव उद्देश मी संहिताची कॉपी करावी असा होता. आणि मला संहिता आवडत नाही याच्या अनेक कारणांपैकी हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे."
ज्योती थकून थबकली...
"आणि बाकीची कारणं?" संहिताने न राहवून विचारलं. ज्योती संहिताकडे बघत बसली काही क्षण.
"मी पण तुला हेच विचारते संहिता. तू मगाशी म्हणालीस ज्योती आवडत नाही. त्याची कारणंही कळूदेत मला. मग आपोआपच माझी कारणंही येतील बाहेर." त्यापेक्षा आपण एकमेकींना आवडत नाही हे मान्य करून पुढे जावं हे बरं असं एकाचवेळी दोघींना वाटलं.
ज्योतीच्या कधी नव्हे ते इतक्या स्पष्ट बोलण्याची हेमंतला अपेक्षा नव्हती. राग वगैरे आलाच होता त्याला नेहमीप्रमाणे पण त्याबरोबरच ज्योतीने आपल्याला फार जास्त करेक्ट ओळखलेय याची जाणीव त्याला जास्त त्रास देत होती. ज्योतीने केलेल्या विधानांचा प्रतिवाद कसा करावा हे त्याला समजत नव्हतं.
समूहात विचित्र शांतता होती काही क्षण.
"अरे बोला काहीतरी!" निनादने कोंडी फोडली.
"तू बोल ना मग..." संहिताच्या या उद्गारावर निनादचे डोळे क्षणभर संतापून मग शांतता धारण करते झाले.
"मी काय बोलणार यामध्ये?"
"या ग्रुपचा तू भाग आहेस. माझ्या आयुष्याचा भाग आहेस."
"हो पण हे जे तुम्ही बोलताय ते तू, ज्योती आणि हेमंत यांच्यातलं आहे!"
"परत एकदा.. माझ्या आयुष्याचा भाग आहेस तू!"
"हो पण त्या भागाचा या सगळ्या गुंत्याशी काही संबंध नाहीये."
"नाहीये? नक्की?"
"अजिबात नाहीये. आपल्यात जे आहे त्याचा ज्योती आणि तू एकमेकींना आवडण्या-न-आवडण्याशी काहीच संबंध नाही."
"आणि हेमंत?"
"नाही. त्याचाही नाही. हेमंत आणि तुझ्यातल्या मैत्रीचाही आपल्या नात्याशी काही संबंध नाही. तुमच्या दोघांच्यात मैत्रीपलिकडे फार काही घडू शकत नाही. आणि चुकून काही घडलंच तर ते क्षणिक उबळ यापलिकडे नसेल, कारण तेवढं तुम्ही एकमेकांना सहनच करू शकणार नाही याची खात्री आहे मला." एका हलक्या स्माइलसकट निनादने वाक्य पूर्ण केलं.
"ही खात्री मोडण्यासाठी तरी मला हेमंतशी सनसनाटी अफेअर करावंसं वाटतंय!" संहिता फणकारली.
"बी माय गेस्ट.. मला आता काहीही प्रॉब्लेम नाही!" ज्योती हसत हसत म्हणाली.
"बघ. नंतर चिडचिड करशील नाहीतर." वातावरण निवळतेय या समजुतीने हेमंत संहिताच्या खांद्यावरून हात टाकल्यासारखे करत हसत हसत ज्योतीला म्हणाला.
संहिता सोडून सगळेच जरा सैलावले. संहिता फक्त निनादकडे बघत होती.
"तुझी अशी खात्री का आहे की आपलं नातं कधीच बिघडणार नाही? कशावरून मी जे काय करेन ते केवळ 'क्षणिक उबळ' असंच असेल? क्षणिक उबळ जे म्हणतोस असं काही घडलं तर त्याबद्दल तुला जराही त्रास होणार नाहीये? जराही वाईट वाटणार नाहीये? इतका संत आहेस तू?" निनाद चेहऱ्याची रेषाही हलू न देता तिच्याकडे बघत होता. अचानक त्याच्यावर आलेल्या स्पॉटलाइटने त्याला भयंकर अवघडल्यासारखं होत होतं.
"एकदा बघायचंच आहे मला तुला खरंच काही होतं की नाही ते. एकदा करणारच आहे खरंखुरं अफेअर!" त्याची पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह प्रतिक्रिया सहन न होऊन संहिता खरोखरीची संतापली.
ओह, असं आहे तर! निनाद वगळता कुठलीच व्यक्ती संहिताच्या गाभ्याला हात घालू शकत नाही म्हणजे संहिताला दुखवायचं तर निनाद हा फोकस असायला हवा असं ज्योतीच्या मनात आलं आणि मग तसं मनात आल्याबद्दल तिला स्वतःची लाजही वाटली.
"लेटस फेस इट संहिता... तुला निनादशिवाय कोणी सहन करू शकत नाही. तुझ्या थोड्याफार प्रेमात मी पण होतो एकेकाळी, अजूनही आहे पण तुझ्याशी मैत्री असण्यात जेवढी मौज आहे तितकेच अवघड आणि कष्टप्रद आहे तुझ्याशी मैत्रीच्यापुढचं नातं असणं. निनादचं तुझ्यावर अशक्य प्रेम आहे म्हणूनच केवळ तो हे झेलू शकतो." हेमंतने बऱ्याच गोष्टींचा वचपा काढल्यासारखं विधान केलं.
"ज्योतीला दुसरा कुणी आवडला तर तुला राग येईल हेमंत?"
"हा काय प्रश्न आहे?"
"नाही सांग ना!"
"अर्थातच!"
"ज्योती, तू मला आवडत नाहीस याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. तुझा मत्सर वाटतो मला. कधीही, कुठेही जा; तू बरोबर असलीस किंवा नसलीस; तरी तुझ्याकडे लक्ष असतं हेमंतचं. माझ्या आयुष्यात माझ्या शेजारी बसलेला असला तरी निनादचं लक्ष वेधून घेणं याइतकी अवघड गोष्ट दुसरी कुठलीही नाहीये. बुद्धीचे, कलेचे, कर्तृत्वाचे मारलेले तीर निरुपयोगी आहेत. प्रेम नावाचं प्रकरण, एकदा पूर्वी व्यक्त करून झाल्यावर, आणि मॅरेज रजिस्ट्रारसमोर केलेल्या सह्यांनी शिक्कामोर्तब करून झाल्यावर, परत पायात येऊ द्यायचं नाही हे तत्त्व त्याच्या हाडीमाशी खिळलंय. एखादी गोष्ट जिंकेपर्यंतच त्या गोष्टीचं महत्त्व. जीत महत्त्वाची. वस्तू नाही. वस्तूने काहीही करावं. नो फरक. एकदम संत अटिट्यूड!"
असं नाहीये. मी संत नाहीये. मी चुत्या आहे. संहिता माझ्यावर अमाप प्रेम करते पण तिला कधीतरी माझा कंटाळाही येऊ शकतो ही भीती वाटते मला. तिच्या क्षणिक उबळींनी मला प्रचंड मोठा फरक पडला नाही तरी वाईट नक्कीच वाटेल. पण त्याने आमच्यातल्या नात्यावर परिणाम झाला आणि क्षणिक प्रकरण क्षणिक राह्यले नाही तर काय याची मी कल्पना करू शकत नाही. घाबरतो मी त्या अवस्थेला. असं काय काय निनादच्या मनात येऊन गेलं. ते त्याच्या डोळ्यातही क्षणभर चमकलं आणि तो क्षण संहिताने नेमका पकडला असावा असं निनादला वाटलं.
संहिता दुखऱ्या नजरेने निनादकडे पहात राह्यली. निनादने एकदा तिच्याकडे, एकदा जमिनीकडे, एकदा शून्यात, एकदा ज्योतीकडे, एकदा हेमंतकडे, वगैरे पाह्यलं. "असं काही नाहीये!" हे तीन शब्द एका उगाचच्या हसूबरोबर दिशाहीन भिरकावून दिले.
’ही कट्टर स्त्रीवादी वाटायची ना नेहमी!’ ज्योतीच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर चमकून गेलं. संहिताने डोळ्याच्या कोपऱ्यातून तेही टिपलं असावं खरं, पण तरी ती नुसतीच श्वास घेत बसली.
असं बरंच काही खरं, खोटं, वरवरचं, तळातलं त्यांनी एकमेकांबद्दल बोलून घेतलं. उघड किंवा मनातल्या मनात. अखेरीस खिडकीतून येणाऱ्या पहाटेच्या उजेडाने या पार्टीतून त्यांची सुटका केली.
एका नात्याची कोंडी फुटल्यासारखं झालं होतं, तर एका सुंदर नात्याच्या तळातलं असुंदर वर आलं होतं. नवीन वर्षाचा पहिला सूर्य उगवला होता.
प्रतिक्रिया
कथा आवडली. पण पात्रांची नावं
कथा आवडली. पण पात्रांची नावं आर टू क्लोज फॉर कम्फर्ट
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
खणखणीत अभिवाचन करावं अश्या
खणखणीत!
काही मित्रांनी मिळून अभिवाचन करावं अश्या तोडीची कथा आहे!
चोख!
स्वगतः आज ऐसीवाल्यांनी लावलंय काय! आता फक्त मिलिंदची कविता वाचायची शिल्लक आहे ती भारी असणारच!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मनोव्यापारांची गुंतागुंत
मनोव्यापारांची, सुप्त इच्छा आकांक्षांची बरीच गुंतागुंत असलेली कथा सुंदर रंगवली आहे. मला निनादचे व्यक्तीमत्व सर्वात आवडले. अगदी बॅकग्राऊंडला असणार्या त्याचे विचार फक्त शेवटी समजतात. आणि एकदम चटका लाऊन जातात.तो, खूप प्रेम करतो संहीतावर आणि अॅकम्प्लिश्ड आणि आधुनिक संहीतावर प्रेम करण्याच्या त्याच्या काही डिफेन्स स्ट्रॅटेजीज आहेत.
.
आता हेमंत - इगोटीस्ट, स्वतःला अखिल विश्वाचे केंद्र समजणारा निदान तसे होण्याची इच्छा धरणारा, कलाकार , स्वामित्व गाजवणारा पुरुष आहे. मला आवडला नाही.
.
संहीता आणि ज्योती म्हणजे त्या चायनीज यिन-यांग चिन्हासारख्या आहेत. काळ्यात थोडेसे शुभ्र तर पांढर्यात थोडेसे काळे. एकमेकींचं थोडं थोडं परस्परात सापडणार्या. इंग्रजी ८ आकड्यासारख्या. अगदी भिन्न वर्तुळात असलेल्या, भिन्न व्यक्तीमत्व पण मानसिक प्रतलावर किंचीत जुडलेल्या. ऑल्टर इगोज ऑफ इच अदर.
.
आता विचार करा हेमंत-संहीता जोडी कशी वठली असती. तर ती कल्पनाही अशक्य कोटीतील वाटते. याउलट निनाद-ज्योती जोडी निदान शक्यता तरी वाटते.
कथा
कथा अतिशय आवडली.
पारंपरिक सामाजिक रूढी, बंधनं, रीतीरिवाज, लिंगाधारित असमानता, जेंडर रोल्स च्या ठराविक आणि अन्याय्य व्याख्या यांच्या पलिकडे आल्यानंतर जो प्रदेश लागतो त्या प्रदेशात कथा घडते. एका अर्थाने राजोपाध्ये यांच्याघरातली पार्टी म्हणजे तो प्रदेश होय. कथेतल्या प्रमुख पात्रांचं ती पार्टी सोडून येणं हे एका अर्थाने रुपकात्मक आहे.
तर या "बंधनांपलिकडच्या" प्रदेशांत सुद्धा नात्यांचं पॉलिटिक्स कसं असतं, एकमेकांबद्दल खरंखरं काय ते बोलू शकल्यानंतरसुद्धा एकमेकांना जखमा आपण कशा करतो ते छान आलेलं आहे. या दृष्टीने हे थोडं माणसांना जीवजंतूंसारखं मायक्रोस्कोपखाली घालून ते कसे बिहेव करतात ते पाहाण्यासारखं आहे. आणि एक पोलिटिकल् स्टडी म्हणून याकडे पाहता येईल. जुनाट रीतीरिवाज, पॅट्रिआर्कीची जोखडं पार करून आपण इथवर आलो तरी "हेल इज द अदर पीपल" हे राहातंच, हे या कथेमधे छान आलेलं आहे.
कथेमधे नाट्यगुण आहेत हे म्हणणं म्हणजे अगदीच जे सूर्यप्रकाशाइतकं स्चच्छ आहे तेच परत सांगण्यासारखं होईल.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
मस्त
कथा छानच आहे. प्रत्येकाचे मनोव्यापार इतक्या उच्च स्तरावर व्यक्त केलेत. तेंडुलकरांच्या 'शांतता' ची आठवण आली. फक्त एकच अस्वस्थता होती मनांत, कथा वाचताना. कथेतल्या संहितेचा वास्तवाशी काहीच संबंध नाही, हे मनाला पटवणे फार त्रासदायक वाटत राहिले!
+१
कथेत ते नाव आवडले नाही
नावातही बरंच काही आहे.
बुद्धीमान आणि स्वतंत्र विचारांच्या स्त्रीबद्दल आणि तिच्या मातीच्या पायांबद्दलही 'हे असं-असं आहे' इतकं सहज-स्पष्ट लेखन जालावर कितीसं मिळणार! त्यातही तिचं नाव संहिता असल्यामुळे आणखी आवडलं.
कथा फारच आवडली. सध्या एवढंच. बाकी सवडीने.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जोडप्यांमधील बोचकारणारे संवाद
जोडप्यांमधील बोचकारणारे संवाद वाचताना Who's Afraid of Virginia Woolf? हे नाटक हमखास आठवले.
पुन्हा जरा नीट वाचत आहे, म्हणजे कथानकांची गुंतागुंत नीट समजू येईल.
तोवर ही पोच.
वा!
वा!
- नी
कथा फारच गहरी आहे. त्यातले
कथा फारच गहरी आहे. त्यातले व्यक्तिमत्त्वं पटकन समजत नाहीत. पण कुठेतरी वाचक ह्या चौघांपैकी आपण कोण ह्याचा शोध घेत राहत असणार. आणि त्यातच ही कथा जिंकते.
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life
पूर्वप्रकाशित आहे का? तिन एक
पूर्वप्रकाशित आहे का? तिन एक वर्षापूर्वी वाचली होती कुठेतरी.
सर्व अभिप्रायांबद्दल
सर्व अभिप्रायांबद्दल आभार.
पात्रांच्या नावांबद्दल चर्चा होतेय तर त्याबद्दल थोडेसे.
ज्या प्रकारच्या व्यक्तिरेखा सुचत जातात त्यांना त्यांच्या व्यक्तिरेखेला धरूनच नावेही सुचतात. कुणा एका ओळखीच्यावर व्यक्तिरेखा बेतून, परत त्याच व्यक्तीचे नाव त्या व्यक्तिरेखेला ठेवायचे हे गमतीशीर आहे. ओळखीतल्या, माहितीतल्या माणसांवर फिक्शनल व्यक्तिरेखा बेतायचीच असेल तर त्या खर्या व्यक्तीचा थांग लागू नये म्हणून लेखनात व्यक्तिरेखेचे नाव बदलणे हे सर्वप्रथम केले जाईल ना? अगदी डंब लेखकही ते आधी करेल. मी डंब लेखक यापासून थोडी पावले दूर आहे अशी माझी खात्री आहे. तस्मात या कथेतली संहिता ही आपल्या सुप्रसिद्ध संहितावर बेतलेली नाही.
माझ्या जवळच्या वर्तुळात ज्योती वा निनाद नावाचे कुणी नाहीत. हेमंत नावाचे भरपूर मित्रगण आहेत आणि सर्व वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर तेही कुणी कुणा याच नावाच्या लोकांवर बेतलेले नाहीत.
पण जेव्हा व्यक्तिरेखा आकार घेते तेव्हा व्यक्तिरेखेला योग्य बसेल असं नाव सुचणं/ शोधणं गरजेचं असतंच. त्यामुळे व्यक्तिरेखांसाठी योग्य नावांच्या याद्या करणे व त्यातून एकदम चपखल ते निवडणे ही प्रक्रिया होतेच.
संहिता नाव आवडले नाही असे म्हणताय ते मुळात नाव म्हणूनच आवडत नाही असे असेल तर तुम्ही त्या म्याडमशी पंगा घेताय हो..
व्यक्तिरेखा आवडली नाही. तर होऊ शकतं असं. सगळेच सगळ्यांना कायमच कुठे आवडतात ना!
अनु राव,
या कथेचा पहिला खर्डा मायबोलीवर लिहित गेले होते. ४ वर्षांपूर्वी सुरू करून दीडेक वर्षापूर्वी मायबोलीवरच पूर्ण केला होता. आताचा हा तिसरा ड्राफ्ट आहे.
- नी
कथा आवडली
अंकाच्या संकल्पनेशी संबंधित अतिशय महत्वाची कथा, खूप आवडली. यशस्वी-अयशस्वी-सामान्य-अब्युजिव्ह-मोडकळीला आलेल्या, अशा कोणत्याही नात्यांच्या मुळाशी खणत गेलं तर हातात काहीतरी अनपेक्षित लागण्याची शक्यता असते हे अधोरेखित करणारा.
ओळखी-अनोळखी
आत्ताच आदूबाळ यांची याच अंकातली कथा वाचून झाल्याने असेल कदाचित; पण इथे या लिखाणात बर्याच गोष्टी स्पष्ट करून, नीट मांडामांड करून सांगितल्या आहेत असं वाटलं (तुलना होते आहे त्याबद्दल क्षमस्व). पण हा अर्थातच माझ्या वैयक्तिक आवडनिवडीचा भाग.
नात्यांतल्या अशा नीट ओळखलेल्या पण दबून ठेवलेल्या गोष्टी उघड करून विचारताना, स्वतःशी कितीतरी वेळा तेच तेच बोलले असले, तरी दुसर्याशी उघडपणे बोलताना माणसांना बरेचदा नीट काही मांडताच येत नाही, अशक्य घुसमट होते. मग माणूस कितीही 'सुलझा हुवा', 'इन्टुक' वगैरे असला तरी. ती घुसमट संवादांत पकडणं आव्हान असतं. त्या संवादांतच - मग सत्य काही असलं तरी - अहंकारांच्या हारजितीच्या शक्यता निर्माण होतात. ते सगळं संवादांतून दाखवायचं नसेल तर प्रसंगातील इतर वर्णनांतून ते वाचकापर्यंत पोहोचवणं निर्णायक ठरतं. ते इथे निसटलंयसं वाटत राहिलं.
काही दिवसांनी आणखी एकदा वाचून पाहेन काही वेगळं वाटतंय का ते. पण आत्ता तरी - हे लेखन काटछाट करून आणखी गोळीबंद हवं होतं - असं वाटतं.
कथेच्या शीर्षकावरून नि आशयावरून आठवण झाली म्हणून एक सुचवू का? या वर्षीच आलेला 'पेरफेत्ती स्कोनोश्यूती' हा इतालियाचा चित्रपट अवश्य पाहावा.
थोडं सहमत.
नेमकं. त्यामुळे एकमेकांना नागडं करणारे संवाद थोडेसे खोटे वाटले. पण बाकी कथा एकदम सॉल्लिड.
आणि विशेषांकाला पर्फेक्ट साजेशी आहे.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
नात्यांतल्या अशा नीट
याबद्दल थोडा सहमत थोडा असहमत.
मी या कथेकडे कथा म्हणून पाहाण्यापेक्षा एक संवादिका-नाटक-एकांकिका म्हणून पाहातो. प्रसंग व घटनांपेक्षा संवादांमधून; मनातले दाबून ठेवलेले विचार जाहीर करण्यातून होणाऱ्या आघातांतून कथा पुढे सरकते. त्यामुळे या कथेचं एकांकिकेत रूपांतर केलं तर सादरीकरणातून अजून प्रभावी होईल अशी मला खात्री वाटते.
नाटकांमध्ये अशा प्रकारच्या मोनोलॉग्सना काहीशी परवानगी असते. म्हणजे एरवी जे नैसर्गिक वाटत नाही, ते डिसबिलिफ सस्पेंड करून मान्य करून घेण्याची प्रथा आहे. त्यासाठी प्रेक्षकाची मानसिक तयारी असते. म्हणून खऱ्या-खुऱ्या माणसांचे खरेखुरे संवाद यापेक्षा तुटक आणि नैकरेषीय झाले असते हे मान्य असलं तरीही इथे ती सलगता, आणि मोकळेपणा चालून जातो असं मला वाटतं.
कथा अर्थातच आवडली.
मुख्य नायिका जरी स्त्रीवादी किंवा स्त्रीपुरुषसमानतावादी किंवा वैनबीन पिणारी आधुनिक म्हैला असली तरीही याचा अर्थ असा होत नाही की तिच्या हृदयाच्या जागी एक कोरडा दगड बसवून ठेवलेला आहे. किंबहुना आधुनिक विचारांची असल्यामुळे या गुंतागुंतीचे पीळ वेगळे आहेत हे दाखवून देण्यात लेखिकेला यश मिळालेलं आहे.
आभार!चित्रपट नक्की बघेन. पण
आभार!
- नी
वाचली ... आवडली
घरोघरी तोच आणि तस्साच शिण ..
तुम्ही चित्रपटाची/ दूरदर्शन मालिकेची कथा,पटकथा खूप चांगली लिहाल नक्कीच. अत्यंत ओघवती लेखनशैली आहे.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||