अद्भुत

कविता

अद्भुत

लेखक - मिलिन्द

सबंध रात्र तुम्हाला जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजने आपल्या
सशक्त खांद्यांवर उचलली दिसेल. तो पूल जमिनीला
टेकतच नाही कुठे, आकाशात तरंगणारे ते धिप्पाड शिल्प
बघून तुमचाही पृथ्वीशी संबंध क्षणकाळ तुटतो,
काय असेल तिकडे पलीकडे? कोणते यक्ष, कोणत्या पऱ्या
स्वर्गातली संध्याकाळ सजवायला तयार होत असतील?
पुष्पवृष्टी कुठे होऊ घातली असेल? कोणत्या भाग्यवानाचा
आज सत्कार होणार असेल? (असा सत्कार होतो का?
त्यासाठी तुम्हाला काय करावे लागते?)

खालून काळसर हडसन नदी वाहातच असते, पलीकडे
मानववस्ती पेटलेली दिसते, मोठमोठे पडाव माती-गाळ उकरत
फिरत असतात संथपणे, नदीकिनाऱ्याने कष्टकऱ्यांचा मेळा
दमून घरच्या वाटेवर असतो. त्यातले अनेक ब्रिजच्या
पलीकडे राहतात, सहजपणे ब्रिज पार करतात - खांद्यावर
आपली आयुधे घेऊन -रोज या ब्रिजवरच्या गर्दीने जीव जातो राव !
सकाळी-संध्याकाळी, जादूच्या काळीही
सर्व अद्भुत त्यांच्यासाठी भाकरी होऊन येते.
पण पंचवीस वर्षांनी त्यांच्यातल्याच एकाचा मुलगा
अशीच गाडी कडेला लावून ब्रिजकडे अनिमिष डोळ्यांनी
टक लावून पहात उभा असेल. (गाडीत गर्ल फ्रेंड
हा नक्की काय बघतो आहे इतका वेळ या विचारात त्रस्त असेल .)
त्याची वाट बघायला मी तयार आहे.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet