चुका (केल्यावर) होतच राहणार!

लेख

चुका (केल्यावर) होतच राहणार!

लेखक - प्रभाकर नानावटी

To err is human

"

माणसाच्या हातून चुका होतात यात वावगं काही नाही. परंतु त्याच-त्याच चुका पुन्हा-पुन्हा करणाऱ्या माणसाला मूर्खांच्या यादीत समाविष्ट करावं, असं वाटल्यास नवल नाही. माणूस प्राणी उत्क्रांत होत एक समजूतदार, बुद्धिमान प्राणी बनला आहे असं स्वतःबद्दल म्हणवून घेतो. आजची परिस्थिती माणसांच्या बुद्धी-क्षमतेत वाढ होण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. सकस आहार, सुदीर्घ आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा, माहिती, तंत्रज्ञानाची झेप, आव्हानात्मक आणि गुंतागुतीच्या बौद्धिक समस्या, बिनधोक काम इत्यादींमुळे माणूस आणखी जास्त बुद्धिमान, प्रतिभावान, सर्जनशील व्हायला हवा होता. परंतु परिस्थिती अगदीच उलट असून माणसं जास्तीत जास्त प्रमाणात मूर्खपणाचे प्रदर्शन करत आहेत. समाजाला कलाटणी देऊ शकणारी, ध्येयधोरणं ठरविणारी उच्चपदस्थ माणसंच चुका करू लागल्यास समाजाला फार मोठी किंमत द्यावी लागते. त्यांची एखादी क्षुल्लक चूक संपूर्ण समाजाला वेठीस धरू शकते. त्यामुळे जबाबदारीच्या पदांवर असणाऱ्या माणसांनी आणि पर्यायाने सगळ्याच लोकांनी कमीतकमी चुका कराव्यात ह्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. चुकीचे मूळ मूर्खपणात दडलेलं आहे. हा मूर्खपणा आता व यानंतर न परवडण्यासारखा झालेला आहे.

त्याच-त्याच चुका (पुन्हा) होता कामा नये, असं अपराधीपणाच्या भावनेतून वाटू शकतं. तरीही, शहाणे म्हणवून घेणाऱ्या कित्येकांनी घोडचुका केल्या आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. खरं पाहता, मानवी बुद्धिमत्तेचा विकास कसा होत गेला याचा अभ्यास केला जातो, त्याचप्रमाणे माणसं मूर्खासारखं का वागतात, याचाही अभ्यास करायला हवा. परंतु मानवी बुद्धिमत्तेच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या, मूर्खपणाचा अभ्यास म्हणजे वेळेचा निव्वळ अपव्यय, असा समज मानसतज्ञांचाही असतो. आपल्या हातून होणाऱ्या चुका त्या विशिष्ट क्षणी आणि त्या परिस्थितीत उद्भवलेल्या मूर्खपणाची निष्पत्ती असते; त्याकडे फार गांभीर्याने बघावं, असं ह्या विषयाबद्दल समजलं जात नाही. आपण सामान्यपणे आइन्स्टाइन, मोझार्ट, बर्ट्रांड रसेल, हॉकिंगसारख्यांच्या शोधात असतो. मूर्ख काय, कुठेही हजारोंनी सापडतील! परंतु प्रतिभावंताचं तसं नाही. बुद्धी नसणारे म्हणजे प्रयोगशाळेत वापरात येणाऱ्या उंदरासारखे. असले काय नि नसले काय; दोन्ही सारखेच!

मूर्खपणाची समस्या

ही मूर्खपणाची जुनाट समस्या वरचेवर डोकं काढत आहे आणि त्याचे काही नवीन कंगोरे सापडत आहेत. यानंतरच्या काळात मूर्खपणाला क्षमा नाही! मूर्खपणाचा अभ्यास आता शास्त्र बनू पाहत आहे. या जगाची धुरा सांभाळणाऱ्यांच्यात जास्त बुद्धीमत्ता असते, हे समाजाने मान्य केलं आहे. बुद्धीमत्ता जास्त असलेल्यांच्या हातातच सत्ता एकवटल्यामुळे त्यांची साधी चूकसुद्धा जीवघेणी ठरत आहे. सत्ताधाऱ्यांच्या मूर्खपणातून घडणारी क्षुल्लक चूकसुद्धा आपल्या व्यवहारावर दीर्घकालीन दुष्परिणाम करण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांची चूक - हवं तर मूर्खपणा म्हणू - वेळीच लक्षात आणून देण्याची गरज भासत आहे.

एक मात्र खरं की अव्यावहारिक, विसंगत वा तद्दन मूर्ख कल्पना कोणाच्या डोक्यात येणं म्हणजे त्यांची बुद्धीमत्ता फारच कमी, हा एक गैरसमज आहे. मुळात बुद्धिमत्ता, विवेक वा तर्कशुद्ध विचार यांचा एकमेकाशी काही संबंध नाही. तुम्हाला एखाद्या विषयात जास्त गुण मिळाले किंवा एखाद्या विषयात तुम्ही प्रवीण आहात, याचा अर्थ दुसऱ्या विषयातही तुम्ही तितकेच हुशार आहात असा होत नाही. महत्त्वाचं म्हणजे मूर्ख वा अविवेकी विचारांपासून कुणालाही सुटका नाही. मेंदूला विचारांती कृती करण्याची सवय लागल्यास व त्याप्रमाणे मेंदू प्रशिक्षित होत गेल्यास कमीत कमी चुका होण्याची शक्यता वाढते. परंतु आपण विवेकी विचार करण्याच्या सवयीऐवजी जास्तीत जास्त डिग्र्या मिळवण्याच्या मागे लागतो. परीक्षेतील जास्त गुण मिळवणं वा स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण होणं वा अत्युच्च पदवी प्राप्त करणं म्हणजेच जास्त प्रतिभा, शहाणपण, विवेक ही मनोधारणा सर्वसामान्यांत रुजलेली असल्यामुळे स्वत:ला शहाणे समजणारे कुठल्याही विषयावर भाष्य करण्यास मोकळे असतात. यामुळे समाजाची फार मोठी हानी होऊ शकते. वैयक्तिकरित्यासुद्धा हे धोकादायक ठरू शकेल. बुद्धिमत्ता जास्त असो वा नसो, तर्कशुद्ध विचार न करणारे गोत्यात आल्याची अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील. (फक्त त्यांचा गाजावाजा होत नसल्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची!)

तर्कशुद्ध विचार व कृती

मोठ्या व/वा जबाबदारीच्या पदावर असलेल्यांचा मूर्खपणा तर जास्त धोकादायक ठरतो. बँकिंग व्यवहारातील उच्चपदस्थांकडून तर्कशुद्ध विचार व कृती करण्याची अपेक्षा असते. परंतु हेच तज्ज्ञ तारतम्य न बाळगता, उत्स्फूर्तपणे नको तिथे गुंतवणूक करत गेल्यास बँक बुडायला (आणि त्यामुळे लाखो खातेदारांना फटका बसायला) वेळ लागणार नाही. हेच विधान सत्तेवर असलेल्या राजकीय नेत्यांनासुद्धा लागू होऊ शकतं. राजकारण्यांनी (तथाकथित) विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे किती नुकसान होऊ शकते याची अनेक प्रत्यक्ष उदाहरणं आपल्या अवती भोवती हजारोंनी सापडतील. त्यामुळे बुद्धिवंत म्हणवून घेणाऱ्यानी व सत्तेची धुरा सांभाळणाऱ्यांनी विनम्रपणे आपल्या चुका कबूल कराव्यात व (शक्यतोवर) चुका करणं टाळावं; यातच समाजाचं व देशाचं हित आहे. पुढच्यांनी अशा चुकांवर मात करण्यासाठी काही उपाय योजना शोधाव्यात. निर्णयप्रक्रिया बिनचूक होण्यासाठी एखादी सक्षम यंत्रणा उभी करावी. गंमत म्हणजे आजकाल एकटी-दुकटी व्यक्ती महत्त्वाचे निर्णय घेत नाही. निर्णयप्रक्रियेत अनेक तज्ज्ञ सामील होत असतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यांतून आणि चर्चेतून निघालेल्या निष्कर्षांवरून निर्णय घेतले जातात. तरीही चूक कशी काय कुणाच्याही लक्षात येत नाही, हे एक न सुटणारं कोडं आहे. म्हणूनच ऑस्कर वाइल्डला, मूर्खपणाव्यतिरिक्त दुसरे कुठलेही पाप (sin) नाही, असं म्हणावंसं वाटलं असेल.

'मादाम बोव्हारी' ह्या कादंबरीसाठी प्रसिद्ध असणारा कादंबरीकार, गुस्ताव फ्लोबेर (https://en.wikipedia.org/wiki/Gustave_Flaubert) ह्याने म्हटलेलं होतं, "पृथ्वीला मर्यादा आहे, पण मूर्खपणाला कसलीही मर्यादा नाही." मूर्खपणाबद्दल एक कादंबरीच लिहायला सुरुवात केली - बोव्हार आणि पेकुशे (Bouvard et Pécuchet). त्यात दोन कारकून जगातलं सगळं ज्ञान पचवायला निघतात. स्वतःच्याच चुका आणि कमतरतांमुळे ते स्वतःचा पराभव कबूल करतात. "त्यांना मूर्खपणा काय हे समजतं, पण ते मूर्खपणा सहन करू शकत नाहीत", असं वर्णन फ्लोबेरने केलं आहे. दुर्दैवाने ही कादंबरी लिहून पूर्ण होण्याआधीच, वयाच्या ५८व्या वर्षी फ्लोबेर गेला. त्या कादंबरीबरोबर प्रसिद्ध करण्यासाठी त्याने मूर्ख वर्तनाची मोठी यादी तयार केली होती. याचा मोठा कोश बनवण्याचं काम राहून गेलं. ते काम स्वतंत्ररीत्या पूर्ण केलं डच तज्ज्ञ माथिस फान बोक्सेलने. त्याने पाच वर्षं खपून मूर्खपणाचा कोश - Encyclopedia of Stupidity- बनवून १९९९ साली प्रकाशित केला. त्यात त्याने काही चक्रम संशोधनांची उदाहरणं दिलेली आहेत; "चुंबनाच्या घनतेचं मोजमाप", "वाऱ्यांमुळे बेरजांमध्ये होणारे बदल" किंवा "देवाचा पृष्ठभाग", इत्यादी.

मूर्खपणाच्या कोशाला करमणूकमूल्य असल्याचं ह्या उदाहरणांवरून दिसतं. त्या तुलनेत, दासबोधात लिहिलेली मूर्खलक्षणं हे तत्कालीन रूढीप्रथांचं सपक आणि जजमेंटल वर्णन वाटतं. उदाहरणार्थ, ही लक्षणं पाहा : "जन्मला जयांचे उदरीं । तयांसी जो विरोध करी", "सखी मानिली अंतुरी", "संगेंविण विदेश करी", "वामहस्तें प्राशन करी" ह्यात कालातीत मूर्खपणापेक्षा त्या काळातल्या अभिजनांच्या नीतीमत्तेचं वर्णन अधिक आहे.

मूर्खपणाच्या मर्यादा व बलस्थान

माणसांच्या मूर्खपणाच्या मर्यादा व बलस्थान शोधणे हाच एक मूर्खपणा वाटल्यामुळे असेल, बुद्धिमत्तेच्या पंक्तीच्या (intelligence spectrum) दुसऱ्या टोकाला असलेल्या या विषयाचा अभ्यास कदाचित कुणीही केला नसेल. बुद्धिमत्ता चर्चेचा, अभ्यासाचा विषय होऊ शकतो; मूर्खपणा नव्हे. परंतु बुद्धिमत्तेच्या या स्पेक्ट्रमने काही प्रश्न उभे केले आहेत. मानव प्राणी homo sapien म्हणून उत्क्रांत होत असताना मेंदू मोठा होत गेला व मानव प्राणी बुद्धिमान झाला; हे खरं असल्यास एव्हाना संपूर्ण मानववंश बुद्धिमान का झाला नाही? सर्वच्या सर्व माणसं, समान बुद्धीवान, प्रतिभावंत का झाली नाहीत? शहाणीसुरती माणसं मूर्खपणाचे प्रदर्शन का करतात? अल्पमती असलेल्यांचासुद्धा मानवी अस्तित्वासाठी हातभार लागला असावा की काय? कमी बुद्धी असलेल्यांनी शहाण्यांवर मात तर केली नसेल ना? ... वगैरे, वगैरे. अशा प्रकारच्या प्रश्नांची यादी नक्कीच वाढवता येईल.

बुद्धी-गुणांक

खरं पाहता, आपlI बुद्धिमत्ता मोजण्याचे विश्वासार्ह असं कोणतंही मापन आपल्याकडे उपलब्ध नाही. साधारण गेल्या १०० वर्षांपूर्वीपासून बुद्धी-गुणांकावरून (IQ – Intelligence Quotient) बुद्धिमत्ता मोजण्यात येत आहे. त्या मापनात अनेक उणिवा आहेत, तरी त्याचाच वापर अजूनही होत आहे. सामान्यपणे सरासरी बुद्धी-गुणांक ८० ते १३०च्या दरम्यान असतो, असं समजलं जातं. वयाच्या सोळाव्या वर्षी बुद्धी-गुणांक सर्वात जास्त असतो. बुद्धी गुणांकात जनुकांचा फार मोठा वाटा आहे असं समजलं जातं. तरीसुद्धा बुद्धी-गुणांकांचा आणि आपल्या अविवेकी वर्तनाचा, अविचाराचा वा अतार्किक कृतींचा एकमेकांशी काही संबंध नाही, असं तज्ज्ञ मानतात. तुम्ही काही बाबतीत फार बुद्धिमान आणि इतर काही बाबतीत एकदम बुद्धू असण्याची शक्यता जास्त आहे. शहाण्यांच्या मूर्खपणातून घडलेल्या चुकांचा आढावा घेतल्यास समाजाला मोठ्या आपत्तींमधून का जावं लागतं, याची नक्कीच कल्पना येईल. २००८ सालचं आर्थिक अरिष्ट हे एक, अलीकडचं मासलेवाईक उदाहरण ठरू शकेल. म्हणूनच मूर्खपणाचा स्वतंत्ररीत्या अभ्यास केल्यास काही तरी हाती लागेल असं काही अभ्यासकांचं मत आहे.

बुद्धिमत्ता व मूर्खपणा या गोष्टी परस्परविरोधी आणि दोन टोकांच्या आहेत, ही कल्पना अगदी अलीकडची आहे. १५ -१६ व्या शतकातल्या रेनेसाँच्या कालखंडापर्यंत मूर्खपणाचं अस्तित्व स्वतंत्र होतं. मूर्खपणा ही दैवी देणगी आहे, हा समज दृढ होता. काहींना त्यात गर्व, हट्टीपणा, अट्टाहास व नक्कल यांची झाक दिसत होती. अठराव्या शतकाच्या मध्यात मूर्खपणाची बरोबरी सुमार बुद्धिमत्तेशी करण्यात आली. हा काळ पिढ्यान्‌पिढ्या सत्ता भोगणाऱ्यांऐवजी बूर्ज्वांच्या, मध्यमवर्गाच्या हातात सत्ता जाण्याचा होता. तर्क, विवेक यांना या प्रबोधनकाळात उच्चस्थान मिळू लागलं. प्रत्येकाला आपलं नशीब आजमावण्याची संधी प्राप्त झाली.

>b>पठडीबाहेरचा विचार

आधुनिक काळात माणसाची क्षमता बुद्धिमत्तेशी व पर्यायाने बुद्धी-गुणांकाशी जोडली जात आहे. अमूर्त वा अफलातून, पठडीबाहेरचा विचार करण्याच्या क्षमतेसाठीसुद्धा हेच परिमाण वापरलं जात आहे. 'बुद्धी-गुणांक १२० च्या जवळपास असल्यास कॅल्क्युलस सोडवण्यात फार कष्ट पडणार नाहीत; १०० असल्यास थोडेसे श्रम घेऊन शिकता येईल; ७० असल्यास बापजन्मी तुम्हाला कॅल्क्युलस येणार नाही,' ही मानसिकता रूढ असून हीच मोजपट्टी सर्व क्षेत्रात सर्रासपणे वापरली जात आहे.

इंटेलिजेन्स स्पेक्ट्रमवर काटा कुठे आहे, यास अनेक घटक कारणीभूत आहेत. आपण जिथे वाढलो ते वातावरण, आपलं शिक्षण, आहार हेही घटक बुद्धी-गुणांक कमी जास्त होण्यास कारणीभूत ठरू शकतात. एकाच घरात वाढलेल्या दोन व्यक्तींच्या बुद्धी-गुणांकांतल्या फरकाचं मूळ शोधल्यास त्यांच्यातल्या जनुकीय गुणविशेषाकडे बोट दाखवता येईल. आणि हा फरक ४० टक्क्यांपर्यंत असू शकतो. जनुकीय वा परिस्थितीजन्य फरक आपल्या मेंदूच्या वाढीवर परिणाम करू शकतात. मेंदूतील वायरिंग बदलू शकतात. चाणाक्ष मेंदूतील न्यूरॉन्सच्या वैशिष्ट्यपूर्ण जोडणीमुळे मेंदूचं नेटवर्किंग जास्त क्षमतेने कार्य करू शकतं. अशा व्यक्तींची 'वर्किंग मेमरी' जास्त तीक्ष्ण असू शकते. समस्यांना उत्तरं शोधण्यासाठी लागणारे डावपेच ते उत्तम प्रकारे हाताळू शकतात. मेंदूतील न्यूरल कनेक्शन्समुळे मेंदूची जैविक रचना कार्यक्षमपणे, तल्लखपणे काम करत असते.

परंतु कार्यक्षम मेंदूच्या उत्कृष्ट रचनेसाठी माणसाला जबरदस्त किंमत द्यावी लागलेली असणार. अन्यथा आपण सर्वच जण बुद्धीवंतांच्या पंक्तीत जाऊन बसलो असतो! बुद्धिवंत लोक विषण्णतेचे बळी असण्याची शक्यता असते. आत्महत्या करण्याकडे त्यांचा कल अधिक प्रमाणात असतो. मात्र यासंबंधात अजूनही पुरेसा अभ्यास झालेला नाही. याबद्दल फारच तुटपुंजी माहिती उपलब्ध आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धात जास्त बुद्धिमान असलेले सैनिक व अधिकारी यांच्या मृत्यूचं प्रमाण तुलनेने इतरांपेक्षा जास्त होतं. कदाचित इतर अनेक घटकही यास कारणीभूत ठरत असावेत.

त्याचप्रमाणे माणसागणिक बुद्धीतील फरकाचं कारण, मेंदू उत्क्रांत होत असताना त्या काळच्या आव्हांनाना तोंड देण्यासाठी होत गेलेल्या जनुकीय ड्रिफ्ट, हे सुद्धा असू शकतं; आपल्या बुद्धिमत्तेचं रहस्य म्हणजे सातत्याने उत्परिवर्तित (Mutation) होत असलेली सुमारे २०० ते ५००० जनुकं असं मानणारा शास्त्रज्ञांचा एक गट आहे. ज्यांच्या जनुकांचं उत्परिवर्तन होताना, बुद्धिमत्ता आली नाही ते लोक टिकून राहिले नाहीत असं ह्या गटात समजलं जातं. पण 'जनुकीय ड्रिफ्ट' गटाचं मत आहे की समाज म्हणून आपण जसे उत्क्रांत होत गेलो तसतसे 'बुद्धीयोग्य' उत्परिवर्तन न झालेले लोकही टिकून राहिले.

सरासरी बुद्धिमत्तेत वाढ

एक मात्र खरं की आपल्या पूर्वजांची बुद्धिमत्ता किती होती, कशी होती याचा अंदाज घेणं आता शक्य होणार नाही. मात्र सरासरी बुद्धिमत्ता वाढतच आहे याबद्दल दुमत नसावं. मुळात मेंदूच्या उत्क्रांतीबद्दल विधान करताना अलिकडे होत असलेल्या या विषयातील संशोधनांचाही विचार करावा लागेल. माणसाच्या वैचारिक क्षमतेचे अनेक आयाम असून वाचनदोष (dyslexia), शिक्षण वा संस्कृतीमुळे बुद्धी-गुणांकात फार मोठा फरक जाणवू शकतो. अंदमानमधल्या आदिवासाींनी एखादी बौद्धिक चाचणी विकसित केली तर आपण त्या चाचणीत कदाचित 'नापास' होऊ. ७०-८० बुद्धी-गुणांक असलेल्या व्यक्तीचं चार-पाच भाषांवर प्रभुत्व असू शकतं. अगदी सामान्य कुवतीची व्यक्तीसुद्धा हजारो लोकांची, लाखो रूपयांची लूट करू शकते. (असं एक उदाहरण ब्रिटनमध्ये होऊन गेलं.) जास्त बुद्धी-गुणांक असलेले लोक विवेकीपणाने वा तर्कशुद्धपणे वागतीलच याची कुणीही खात्री देऊ शकत नाही. अनेक वैज्ञानिकांना हवामान बदलाचे दुष्परिणाम खोटे वाटतात. यामुळेच आयक्यू हे बुद्धिमत्तेचे ढोबळ मापक आहे, असं फारतर म्हणता येईल.

मूर्खपणाच्या उदाहरणांचा पाठपुरावा करताना फ्लोबेर निराश झाला असेल, अशी एक वदंता आहे. वैज्ञानिकांच्या मते मूर्खपणा ही एक अवैज्ञानिक संकल्पना आहे व त्याविषयी जास्त विचार करण्याची गरज नाही. परंतु फ्लोबेरने मूर्खपणाची जंत्रीच प्रस्तुत केल्यामुळे फान बोक्सेल ह्या माजी वैज्ञानिकाला मूर्खपणा म्हणजे नेमकं काय याचा शोध घ्यावासा वाटला. शहाण्या व्यक्तींमधल्या काही लोकांच्या मूर्खपणामुळे समाजात उलथापालथ होऊ शकते, समाजाचं नुकसान होऊ शकतं हे फ्लोबेरने ठासून सांगितल्यामुळे अभ्यासक या विषयाकडे लक्ष देऊ लागले. भावना व बुद्धिमत्ता यांचा अभ्यास करणाऱ्या रिचर्ड निसबेट ह्या मानसशास्त्रज्ञाने कित्येक बुद्धिवंत तद्दन मूर्ख असतात असं विधान केलं आहे, ते खरं वाटू लागतं.

या विरोधाभासाचं नेमकं काय कारण असावं? प्रिन्सटनच्या डॅनियन काहनीमन आणि आमोस ट्रेव्हर्स्कीच्या मते माणूस हा रॅशनल प्राणी आहे, हेच मुळात चुकीचं विधान आहे. आपला मेंदू जेव्हा एखाद्या माहितीवर प्रक्रिया करत असतो तेव्हा दोन वेगवेगळ्या पद्धती कार्यरत होतात. बुद्धी-गुणांक चाचण्या यातल्या विश्लेषक किंवा तार्किक बुद्धिमत्तेचं मापक आहे. आपली जाणीव कशा प्रकारे समस्यावर उत्तर शोधते, या संबधीचे काही आडाखे एका पद्धतीत अंतर्भूत असतात. परंतु दुसरी पद्धत पूर्णपणे बुद्धीला वर्ज्य करून उत्स्फूर्ततेला उच्च स्थान देते.

उत्स्फूर्तता

खरं पाहता ही उत्स्फूर्तताच मानवी उत्क्रांतीत भरपूर फायदेशीर ठरत गेली. माहितीच्या डोंगराखाली दबलेल्या या प्राण्याला उत्स्फूर्ततेतून शॉर्टकट्स मिळायला लागले; त्यामुळे समस्यांच्या व आपत्तीच्या जंजाळातून सहीसलामत सुटका होऊ लागली. 'मला वाटतं' (गट फीलिंग) अशा प्रकारे निर्णय घेत गेल्यामुळे हे करू की ते, किंवा ते उत्कृष्ट की हे, असं 'हॅम्लेट'मधल्या भुतासारखे प्रश्नांच्या तावडीत न सापडता, अत्युत्कृष्ट नसलं तरी चालेल, परंतु कठीण प्रसंगातून बाहेर पडता यायला हवं, एवढ्यावरून मनुष्य कृतीशील झाला आणि 'मला वाटतं' ही भावना बहुतेक वेळा फलदायी ठरली.

परंतु आपल्याला जे 'वाटतं' ते दर वेळी कामी येईलच याची खात्री कुणी देऊ शकणार नाही. काही प्रसंगांत ते ठीक आहे असं वाटत असलं तरी त्याची चिकित्सा न केल्यास आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही. व ही चिकित्सा न करणं किंवा करता न येणं यातूनच मूर्खपणाची सुरुवात होते. मी रुळलेल्या वाटेवरून जात असून ही पारंपरिक कृती मला योग्य ठिकाणी पोचवते, असं निर्देश करणारं एखादं बटण आपल्या मेंदूत नाही. त्यामुळे मेंदूला चिकित्सकपणे विचार करण्यात प्रशिक्षित करावंच लागेल. मेंदूतल्या न्यूरॉन्सना ट्रेनिंग देऊन तरबेज करावंच लागेल.

मुख्य म्हणजे यात बुद्धी-गुणांकाचा कुठेही संबंध येत नाही. कदाचित बुद्धी-गुणांकाचा या कामी उपयोगही होणार नाही. मानवी मूर्खपणा समजून घेण्यासाठी व हा मूर्खपणा कशा प्रकारे, कुठे प्रकट होतो व याला प्रतिबंध करण्यासाठी नेमके काय करायला हवे यासाठी आता आपल्याला वेगळी व्यवस्था करावी लागेल. एखादं नवीन मापन शोधावे लागेल.

विवेक-गुणांक - RQ

कॅनडास्थित तज्ज्ञांचा एक गट बुद्धिमत्तेला छेद देणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करत असून, हा गट Rationality Quotient (विवेक-गुणांक - RQ) या एका नवीन मापनाचा अभ्यास करत आहे. त्यांच्या मते मनात उभारणाऱ्या संदिग्धतेचं मापन यातून करता येऊ शकतं. उदाहरणार्थ, राहुल स्मिताकडे बघत आहे. स्मिता प्रकाशकडे बघत आहे. राहुल विवाहित आहे व प्रकाश अविवाहित आहे. या माहितीवरून कोणी विवाहित व्यक्ती कोणत्याही अविवाहित व्यक्तीकडे बघत आहे का? या प्रश्नाचं उत्तर 'हो', 'नाही' किंवा 'काही सांगता येत नाही', ह्यांपैकी एक मिळेल. बहुतांश लोक मात्र 'सांगता येत नाही', हेच उत्तर देण्याच्या पावित्र्यात असतात. डोक्याला काही ताण न देता चटकन देता येणारे तेच एकमेव उत्तर असू शकेल. परंतु थोडा विचार केल्यावर नेमकं उत्तर - होय - नक्कीच देता येईल. विचार करण्याची तसदी घेण्यास सहजपणे कुणीही तयार होत नाहीत.

समस्येला योग्य उत्तर शोधताना बुद्धीचा वापर करत समस्येचं विश्लेषण करण्याबरोबरच, कृतीशील होताना किती धोका पत्करावा याचीसुद्धा जाणीव विवेक-गुणांक करून देत असतो. काही प्रसंगांत, कितपत धोका पत्करावा, हे उपलब्ध असलेल्या माहितीवरूनसुद्धा कळू शकतं. जुगार खेळताना आपण(च) जिंकणार, यावर आपला पूर्ण भरवसा असतो. अशा प्रकारची खात्री वैवाहिक जीवनात वा घटस्फोटाच्या प्रसंगी देता येत नाही. RQ कमी असल्यास तुमचे सर्व हिशोब चुकतच जातील. धोक्याची कल्पना येत नसल्यामुळे घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात व आपण गोत्यात येतो.

हा विवेक-गुणांक (वा नीरक्षीरविवेकबुद्धी) किती आहे याचा अंदाज घेता येईल का? IQ प्रमाणे RQ उपजत आलेल्या जनुकांतून, वा तुम्ही वाढलात त्या वातावरणातून, वा तुमच्यावर झालेल्या संस्कारांतून येत नसतो. इतर कुठल्याही घटकांपेक्षा संपादन केलेलं ज्ञान, ज्ञानाच्या साहाय्याने प्राप्त परिस्थितीचं केलेलं विश्लेषण, विश्लेषणाच्या निष्कर्षातून बांधलेले कृतीचे आडाखे व या कृतीशीलतेला कारणीभूत ठरणारी जाणीवच तुमच्यात नैसर्गिकरीत्या किती RQ आहे हे सांगू शकेल. जास्त RQ असणारे जाणीवपूर्वक कृती करतात व ही कृती करण्यासाठी त्यांच्याकडे अनेक पर्यायी मार्गांचा साठा असतो. उत्स्फूर्ततेने घेतलेल्या निर्णयाबद्दल प्रश्न विचारण्याची सोय यात असते. त्यावरून योग्य निर्णय घेणं शक्य होतं. तुम्हाला काय माहीत आहे, काय माहीत नाही, वा कितपत माहीत आहे या गोष्टीवरून तुम्ही निष्कर्ष काढू शकता व कृती करू शकता.

परंतु हा जास्त RQसुद्धा, नियंत्रणाच्या बाहेर असलेल्या प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरेल की नाही, याबद्दल शंका आहेत. काही कठीण प्रसंगांत फक्त आपलीच तयारी असून उपयोगी ठरत नाही; अवतीभोवतीची परिस्थितीसुद्धा थोडीफार अनुकूल असावी लागते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे भावनेचा अतिरेक योग्य निर्णय घेण्यास अडसर ठरतो. भयगंड, दुःख, वेदना, चिंतातुरता ह्यांमुळे वर्किंग मेमरी गुंतागुंतीची बनते. नवीन काही सुचत नाही. त्यामुळे समस्येचा विचार करण्यावर मर्यादा येतात. अशा वेळी आपला मेंदू शॉर्टकट म्हणून रुळलेल्या वाटेवर जाण्याचा प्रयत्न करायला लागतो. ही रुळलेली वाट अपेक्षित एवढी आशादायक नसल्यास माणूस फसतो. नंतर पश्चात्ताप करून घेण्याची वेळ येते. बहुतेकांची स्थिती हीच असते.

काही अभ्यासकांच्या मते मूर्खपणाला उत्तेजन देण्यासाठी आर्थिक व्यवहार करणाऱ्या व्यापारी संस्था सदैव तयारीत असतात. अशा प्रकारच्या व्यापारी संस्था जास्त बुद्धिमत्ता असलेल्यांचा कसा वापर करतात यावर प्रबंध लिहिणाऱ्या संशोधकांना आपापले प्रबंध फाडून टाकावे लागले. कारण ज्या क्षेत्रांचा अभ्यास करून या बुद्धीमान व्यक्ती आलेल्या असतात, त्या क्षेत्रांशी व त्यांच्या प्रत्यक्ष कामकाजाशी काहीही संबंध नसतो. कार्यात्मक मूर्खपणा (Functional Stupidity) म्हणून हेटाळणी करत त्यांच्याकडून कुठले तरी भलतेच काम करून घेतले जात असते. कॉर्पोरेटचा दबाव, धोका पत्करण्यास वाव नसणं व रुळलेल्या मार्गावरूनच जाण्याचं बंधन असल्यामुळे अनेक संशयास्पद व्यवहार होतात व त्यातूनच डोलारा कोसळू लागतो. सर्व संबधित अत्यंत चतुर (smart) असूनसुद्धा व्यवहारातील धोका स्पष्टपणे सांगण्यास कोणीही पुढे येत नाही. एखाद-दुसरी आली तरी काहीबाही सांगून तिला गप्प बसवलं जातं. ज्यांच्यापाशी सत्ता आहे त्यांची अरेरावी चालते. त्यामुळे शहाणेसुद्धा तार्किकतेला बाजूला सारून मूर्खपणाला साथ देतात. आर्थिक घोटाळ्याचे चटके सामान्य माणसाला बसत असल्यामुळे या मूर्खपणाला क्षमा नाही, असंच म्हणावं लागतं. मुळात कॉर्पोरेटमध्ये भरती करताना त्यांचा RQ मोजण्याचं कुठलंही मापन नाही. चाचण्या कशा घ्याव्यात, याचा एकही निकष नाही. त्यामुळे तिथे मनमानी होते. निदान त्यासाठी तरी 'मूर्खपणाचा' अभ्यास करणे गरजेचे ठरेल.

हा अभ्यास आपल्यासारख्या सामान्य लोकांनासुद्धा काही मार्ग दाखवू शकेल. निदान धंदेवाईकपणे फसवणूक करणाऱ्याचे आपण बळी पडणार नाही हेही नसे थोडके!

संदर्भः
१. न्यू सायंटिस्ट, २ एप्रिल २०१३
२. I’m with stupid
३. It's Stupidity, Stupid: You Can Look It Up

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

मुर्खपणातुन मिळणार्‍या आनंदाचे मूल्यमापन कसे करणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मुर्खपणातुन मिळणार्‍या आनंदाचे मूल्यमापन कसे करणार?

स्वतःच्या की दुसर्‍यांच्या ?

लेख आवडला. पण मूर्खपणा हा काळाच्या कसोटीवर उतरेपर्यंत तरी सापेक्ष असावा, असे वाटते. मागे एकदा, माझ्यावर अविरत संकटे कोसळत होती तेंव्हा मी हतबल झालो असलो तरी निराश झालो नव्हतो. अशा वेळेस, एका परिचिताने, तुम्ही नास्तिक आहात आणि देवाचे काही करत नाही, म्हणून तुमच्या बाबतीत असे होते, असे सुनावले होते. आता या वक्तव्याचा मी सहज प्रतिवाद करु शकलो असतो. पण मी गप्प बसणे पसंत केले. या प्रसंगात तो परिचित बोलला ते मूर्खपणाचे की माझा नास्तिकवाद मूर्खपणाचा ? रॅशनल क्वोशंट कुणाचा जास्त ? माझा की त्याचा ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतःच्या की दुसर्‍यांच्या ?

दोन्ही
>>या प्रसंगात तो परिचित बोलला ते मूर्खपणाचे की माझा नास्तिकवाद मूर्खपणाचा ? रॅशनल क्वोशंट कुणाचा जास्त ? माझा की त्याचा ? <<
हितचिंतक मूर्खपणाचे बोलले तरी त्यांचा हेतु हा तुमच अहित करण्याचा नसतो. आपली चिडचिड होते हा भाग निराळा. आणि आयुष्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरे थोडीच मिळतात. कधी कधी आपल्याच प्रतिमेत आपण अडकून बसतो व मुक्त होण्यासाठी अस्वस्थ होतो. आपण प्रतिमेला सोडत नाही व प्रतिमा आपल्याला सोडत नाही.
रॅशनल क्वोशंट जाउ द्या हो सर्वायवल इन्स्टिंक्ट महत्वाचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

विचारंच्या पद्धतीत फरक हा मूर्खपणा ठरतो एकमेकांस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात बुद्धिमत्ता, विवेक वा तर्कशुद्ध विचार यांचा एकमेकाशी काही संबंध नाही.

हे वाक्य बरोबर वाटत नाही. काही बेसिक बुद्धीमत्ता असल्याशिवाय तर्कशुद्ध विचार आणि कदाचित विवेक पण शक्य होइल असे वाटत नाही.

बँकिंग व्यवहारातील उच्चपदस्थांकडून तर्कशुद्ध विचार व कृती करण्याची अपेक्षा असते. परंतु हेच तज्ज्ञ तारतम्य न बाळगता, उत्स्फूर्तपणे नको तिथे गुंतवणूक करत गेल्यास बँक बुडायला (आणि त्यामुळे लाखो खातेदारांना फटका बसायला) वेळ लागणार नाही. हेच विधान सत्तेवर असलेल्या राजकीय नेत्यांनासुद्धा लागू होऊ शकतं. राजकारण्यांनी (तथाकथित) विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे किती नुकसान होऊ शकते याची अनेक प्रत्यक्ष उदाहरणं आपल्या अवती भोवती हजारोंनी सापडतील.

हा फारच भाबडेपणाचा विचार झाला. बँकर्स आणि राजकीय नेते सर्व कृती विचारपूर्वक च करतात. विचार कोणाचा करतात ही वेगळी गोष्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे शेजारचे चित्र मूर्खपणाची कल्पना स्पष्ट करते.
माझ्या माहितीप्रमाणे बुद्धीमत्तेमध्ये Analytical, Pattern, Musical, Physical, Practical, Inter-personal, Intra personal असे अनेक प्रकार आहेत. रूढ अर्थाने IQ हे मोजमाप विश्लेषक बुद्धीमत्ता (Analytical Intelligence) मोजण्यासाठी वापरले जाते. परंतु इतर प्रकारच्या बुद्धीमत्तेचे मापन त्या त्या क्षेत्रातील तज्ञ किंवा जनसामान्यातील त्यांची लौकिकता यावरून ठरते. त्यामुळे गावसकर, तेंडूलकर, लता मंगेशकर, अमजद अली खान, मनमोहन सिंग, अमर्त्य सेन, अब्दुल कलाम इ.इ. यांचे त्या त्या क्षेत्रातील स्थान वादातीत असले तरी ते इतर प्रकारच्या क्षेत्रात श्रेष्ठ ठरतील याची खात्री देता येत नाही.
आपल्या राजकीय नेत्यांची बुद्धीमत्ता Inter-personal, Intra personal सदरात मोडत असल्यामुळे ते प्रचंड बहुमताने निवडून येतात. आणि त्यांच्या हातात सत्तेची सूत्रे सोपवली जातात. त्यामुळे त्यांनी घेतलेले (धोरणात्मक वा इतर) निर्णय त्या त्या काळाशी सुसंगत वाटत असले तरी त्याच्या दूरगामी परिणामांचे विश्लेषण होत नाही व खोलवर जाऊन ते विचार करत नाहीत. (म्हणूनच कदाचित त्यांना मदत करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञांची फौज तयार असते. परंतु तज्ञांच्या मतांना दुर्लक्षित करून लोकानुनय करणारे नेतेच जास्त प्रमाणात असतात.) हवामान बदलासंबंधीच्या तज्ञांचा धोक्याचा इशारा धुडकावून टाकण्यात याच नेत्यांचा मूर्खपणा कारणीभूत ठरत आहे व त्याचे दुष्परिणाम आपण भोगत आहोत, हे नाकारता येत नाही. काही प्रमाणात या नेत्यांचा स्वार्थ असेलही. परंतु योग्य सल्ला नाकारणे हा मूर्खपणाच असतो.
त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्रातील बीनकौंटर्सच्या दूरदृष्टीच्या अभावामुळेच २००८सालची जागतिक मंदी आली होती, हे वकूब नसलेल्यांच्या हातात सत्ता दिल्यामुळे काय होऊ शकते याचे हे अलीकडील ठळक उदाहरण आहे. त्यामुळे नीरक्षीर विवेक बुद्धी मोजणाऱ्या Rational Quotientची नितांत गरज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राहुल स्मिताकडे बघत आहे. स्मिता प्रकाशकडे बघत आहे. राहुल विवाहित आहे व प्रकाश अविवाहित आहे. या माहितीवरून कोणी विवाहित व्यक्ती कोणत्याही अविवाहित व्यक्तीकडे बघत आहे का? या प्रश्नाचं उत्तर 'हो', 'नाही' किंवा 'काही सांगता येत नाही', ह्यांपैकी एक मिळेल. बहुतांश लोक मात्र 'सांगता येत नाही', हेच उत्तर देण्याच्या पावित्र्यात असतात. डोक्याला काही ताण न देता चटकन देता येणारे तेच एकमेव उत्तर असू शकेल. परंतु थोडा विचार केल्यावर नेमकं उत्तर - होय - नक्कीच देता येईल.

या प्रश्नाचं उत्तर होय कसं आलं? समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

स्मिता एकतर विवाहित आहे किंवा नाही. असल्यास ती प्रकाशकडे बघते आहे याने उत्तर होय येतं. नसल्यास राहुल तिच्याकडे बघतो आहे यामुळे उत्तर होय येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्र... समजलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विचारलेला प्रश्न विवाहित व्यक्ती कोणत्याही अविवाहित व्यक्तीकडे बघत आहे का? हा होता.
व त्याचे उत्तर "होय" हवे. कारण विवाहित असो वा नसो कुठलीही व्यक्ती कुठेही बघू शकते व त्यात काही गैर नाही.

यात "काही सांगता येत नाही" हे उत्तर अपेक्षित नाही.

त्याचप्रमाणे "नाही" या उत्तरामागे कुठलाही तर्क नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकच चूक परत परत करणारा तो मूर्ख .. पण जेव्हा त्याला तो करतोय ते चूक आहे हे माहीती असेल तर अथवा मान्य असेल तर ना?

मला मूर्खपणा हा सापेक्ष असावा असे वाटते. एखाद्याला जो मूर्खपणा वाटतो, तो इतरांसाठी कदाचित तसा नसतो.

मूर्खपणाचा आणि बुद्धी कमी/जास्तं असण्याचा काही सबंध नाही हे मात्रं पटले.

दासबोधात लिहिलेली मूर्खलक्षणं हे तत्कालीन रूढीप्रथांचं सपक आणि जजमेंटल वर्णन वाटतं. उदाहरणार्थ, ही लक्षणं पाहा : "जन्मला जयांचे उदरीं । तयांसी जो विरोध करी", "सखी मानिली अंतुरी", "संगेंविण विदेश करी", "वामहस्तें प्राशन करी" ह्यात कालातीत मूर्खपणापेक्षा त्या काळातल्या अभिजनांच्या नीतीमत्तेचं वर्णन अधिक आहे.

मला वाट्तं आपण जो आज मूर्खपणा म्हणतो तो ही आजच्या काळानुरुपच/ आजच्याच नैतिकतेनूसारच ना? म्हणजे आज आपण जी मूर्खलक्षणे म्हणतो ती काळ सापेक्षच असावीत बहुदा.

आय. क्यू, आर. क्यू प्रमाणेच एक ई. क्यू सुद्धा असतो ना? त्याचा या मूर्खता मापनात वापर केला जात नाही का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

खास नानावटी स्टाइल लेख. नेहमीप्रमाणे आवडलाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0