वाढदिवस

कथा फ्लॅश फिक्शन

वाढदिवस

लेखक - मेघश्री

सकाळी विकास जागा झाला तेव्हा सूर्य बराच वर आला होता. खरं तर उठून फिरायला जायची वेळ होऊन गेली होती. पण आज सुस्तीच आली एकदम. मग त्याने ठरवलं – आज व्यायामाला सुट्टी. चालतं एक दिवस. नाहीतरी आजचा दिवस खास आहेच की.
वीणाला मात्र ते पटणार नाही. पहाटे लवकर उठून ती नेहमीसारखी तिच्या हॉस्पिटल ड्यूटीला निघून गेली होती. पण संध्याकाळी जिमला जाणार म्हणजे जाणारच!

घरात एकदम सामसूम होती. त्या शांततेत बाहेरचे कसकसले आवाज चरे ओढत होते. कोणाच्या बाईकची फुरफुर. स्कूल बसचा हॉर्न. भाजीवाल्याच्या आरोळ्या. पण त्याच्या ते गावीही नव्हतं.
आळस देत तो उठला आणि रमतगमत निघाला. वाटेवरच एका मोहक सुवासाने मन तरारून गेलं. "पाईनअॅपल केक!" तो स्वत:शीच म्हणाला आणि त्याची पावलं किचनच्या दिशेने खेचली गेली. बघतो तर किचन प्लॅटफॉर्मवर एका सुरेखशा डिशमध्ये वीणाने तीन छोटे गोल केक रचून ठेवले होते. आणि मध्ये एक इवलीशी मेणबत्ती.
"सो कूल!" म्हणत त्याने एक केक उचलून तोंडात टाकला. मऊशार लुसलुशीत पाईनअॅपल केक अलगद तोंडात विरघळला. अर्थात वीणाची ती स्पेशलिटीच होती म्हणा. मेणबत्ती एकच का, मनात आलं त्याच्या. पण वीणा कधी कधी अशा गुगल्या टाकते आणि आपल्याला वेळ लागतो समजायला हे त्याला माहीत होतं.
बाजूला चार चिमुकली कार्ड्स होती. वर तिने स्वत: काढलेली नाजूक चित्रं आणि आत वाढदिवसाच्या शुभेच्छा !
तीन केक्स – एक मेणबत्ती – चार कार्डस ..

उजळल्या चेहर्‍याने तो बाहेरच्या खोलीत आला. तोंडावर केकची गोडसर चव अजून रेंगाळत होती. लगेचच त्याची नजर वेधून घेतली ती मधोमध ठेवलेल्या कॉफी टेबलने. वीणाला आवडलं म्हणून किती लांबून आणलं होतं ते खास गाडी करून. त्याच्यावर दिमाखदार पिवळ्या लिलीचं एक देखणं फूल. त्यांची आवडती पिवळी लिली. तीही एकच.
तीन - एक - चार - एक - वा! आता संदेहच उरला नाही.
बाजूला केशरी रंगाच्या कागदात छानपैकी पॅक केलेलं एक पुडकं. त्यात काय असणार याचा अंदाज आता त्याला आला - आणि तो खराही निघाला.
त्याच्या आवडत्या लेखकाची पाच पुस्तकं. त्यातलं एक तर एकदम ताजं – परवाच प्रसिद्ध झालेलं.

पाच झाला, पण पुढचा मोठा अंक ती कशी काय मॅनेज करणार? कल्पनेनेच त्याला हसू फुटलं. मुद्दाम इकडे तिकडे बघत त्याने अख्ख्या घराला एक फेरी मारली.
काहीच नाही? इथेच थांबली वीणा? आपल्या जिभेवर तर कितीतरी पुढचे अंक नाचतायत. मनोमन नाराज होत तो किचनमध्ये परत आला.
केक घ्यावा आणखी एक? की आपले कॉर्नफ्लेक्सच बरे? तंद्रीत त्याने कपाटाचं दार उघडलं आणि आपला बाऊल भरून घेतला. दूध, बेदाणे घालून सजवून तो डायनिंग टेबलपाशी आला.
तिथे दोन इयरिंग्जच्या खाली तिची नोट होती. "मी नऊ वाजेपर्यंत येतेय."
दोन - नऊ? चुकली की काय? अशी कशी चुकेल? आपली बायको आहे ती –
मग त्याच्या लक्षात आलं, ते नऊ आणि दोन असं धरायचं -
ब्राव्हो! त्याने लगेच तिला दाद देऊन टाकली! तिच्या वाढदिवसाला घेतलेली ती हिर्‍याची इयरिंग्ज. आणि नऊ वाजता. म्हणजे आज लवकर येतेय. आपल्यासाठी. आजच्या दिवसासाठी.

मस्तच! आपण घरात कोणत्या क्रमाने हिंडणार हेही माहीत आहे तिला! अर्थात शाळेपासूनची आपली मैत्री, आणि मग शिकायला किती दूर दिशांना गेलो दोघे तरी कसं कसं टिकवून ठेवलेलं प्रेम. लग्नानंतर देखील कामानिमित्त फिरतच असायचो आपण. ती तिच्या मेडिकल स्पेशलायझेशनसाठी आणि आपण आपल्या संशोधनासाठी. तरी जेव्हा जेव्हा एकत्र असतो तेव्हा पूर्ण वाचून ठेवलंय तिने आपल्याला.
तिच्या वाढदिवसाला इकडे आपण हवालदिल होऊन जातो एकदम. रेस्टॉरंट, स्पा, ज्वेलरी अशा रूढ, रटाळ गोष्टींच्या पुढे आपलं डोकं सरकतच नाही. म्हणजे एवढं आंतरराष्ट्रीय मानाचं एबल प्राइझ मिळो की देशोदेशींच्या कॉन्फरन्सेसमध्ये सन्मान होवो, या बाबतीत आपण माठच राहिलो.
ती मात्र गेल्या कित्येक वर्षांच्या संसारात दर वेळी अशा काही कल्पना लढवते की ...

कॉर्नफ्लेक्स खाता खाता तो तिच्या आठवणीत हरवून गेला. किती जीव आहे आपल्यावर.
विचारात किती वेळ निघून गेला, समजलंच नाही त्याला -
दरवाज्याचा आवाज आला तेव्हा एकदम दचकला तो. कोण? वाजले किती?
तेवढ्यात वीणा किल्लीने दार उघडून आत येत म्हणाली, "वाढदिवसाच्या शुभेच्छा, विकास!"
दोघांचेही चेहरे खुलले. आकाशी रंगाच्या ड्रेसमध्ये किती छान दिसत होती वीणा. काळेपांढरे केस थोडे विस्कटलेले. डोळ्यावर वयानुसार आलेला चश्मा. तोही तिच्या आवडीचा, स्टायलिश. साठीला आली तरी तिचं तेज अजून तसंच होतं – झळझळीत.

"माय डियर गर्ल, मानलं तुला!" बोलताना त्याचा आवाज भरून आला.
ती गळ्यातच पडली त्याच्या.
"वीणा, काय कूल केलास यावेळी वाढदिवस! नऊ आणि दोनसाठी तर तुला कुठे ठेवू असं झालंय."
"मग! हा वाढदिवस आहेच तसा कूल आणि स्पेशल! एबल प्राइज मिळवणार्‍या एका सुप्रसिद्ध गणितज्ञाचा वाढदिवस आहे ना आज?"
तिचा सूर खट्याळ असला तरी त्यामागचा अभिमान लपत तव्हता.
तो समाधानाने हसला. ती अधिकच लगटली.
"आणि ते एबल प्राइझ म्हण, की बाकीचे कोणकोणते पुरस्कार म्हण. ते कशासाठी मिळालेत तुला? पायसाठीच ना? मग मला नको का त्याच्यावर कडी करायला?"
ह्या अशा बोलण्यात कोण हात धरणार तिचा? तिच्या धबधब्यासामोर शांतच रहायचं, हे अनुभवाने शिकला होता तो. काही न बोलता त्याने सावकाश तिच्या केसांवरून हात फिरवला. ती आणखी लाडात आली.
"पायचं गूढ कोडं भले तू उकललं असलंस, तरी तुला पायची कोडी घालणारी पण आहे म्हणा इथे कोणी!"
मग विकासची सहा बोटं अलगद आपल्या पाच बोटांत गुंफून घेत वीणाने त्याच्या नजरेला नजर भिडवली.
ही गम्मतही आवडली त्याला. त्याने मान डोलावून तिच्या कल्पकतेला प्रसन्नपणे प्रतिसाद दिला, तशी किंचित हसत ती त्याच्या कानात पुटपुटली,
"विकास, तिसर्‍यांदा म्हणते – एकोणसाठाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!"

**

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

क-ल्प-क!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0