अनुवाद कार्यशाळा अनुभव

गेल्या काही वर्षांपासून भारतीय भाषांतील तसेच परदेशी भाषांतून मराठीत ललित साहित्यकृती अनुवादित करण्याचे प्रमाण वाढले आहे. याचाच अर्थ अनुवादित साहित्याला मागणी आहे. आणि तसे अनुवाद करण्यासाठीही बरेच जण पुढे येत आहेत. तसे पहिले तर अनुवाद करणे काही नवीन नाही. संस्कृत साहित्याचे मराठीत, इंग्रजीत तसेच इतर भाषांत अनुवाद, रुपांतर, आणि इतर रूपांमध्ये होतच आहे. कित्येक क्लासिक साहित्यकृतींचे, जी युरोपियन, रशियन भाषांतून इंग्रजीत अनुवादित केली जात आहेत. तसेच गेल्या काही वर्षांपासून, खाजगीकारण, उदारीकरण, जागतिकीकरण(खाउजा) यामुळे भारताकडे परकीय संस्था बाजारपेठ म्हणून पाहू लागल्या, तसे तसे, त्यांच्या उत्पादनाच्याशी निगडीत मजकुराचे मराठी तसेच इतर भारतीय भाषांत अनुवाद करण्याचे प्रमाण वाढले आहे, सॉफ्टवेअर क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात, जाहिरात क्षेत्रात अनुवाद करण्याचे प्रमाण वाढले आहे. मी देखील काही वर्षांपासून कन्नड भाषांतून मराठी काही निवडक साहित्य कलाकृतींचे/लेखांचे, स्वान्त-सुखाय, विषयाची आवड म्हणून, हौसेकरिता, अनुवाद करतोय. एक पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे. त्याबद्दलचे अनुभव मी एका अनुवादाची कहाणी यात लिहले आहे.

ललित साहित्याच्या अनुवादाला वाढती मागणी लक्षात घेवून, अनुवादाची गुणवत्ता वाढण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून, महाराष्ट्र साहित्य परिषद(मसाप) आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यात एका अर्ध-दिवसीय अनुवाद कार्यशाळेचे आयोजन केले गेले. उमा कुलकर्णी, भारती पांडे, रविंद्र गुर्जर इत्यादी सारखे ज्येष्ठ, अनुभवी अनुवादक-साहित्यिक मार्गदर्शन करणार होते, म्हणून मी त्याला हजर होतो. अनुवादाशी संबंधित कार्यशाळा, आणि काही छोटे-मोठे अभ्यासक्रम देखील आहेत. मी अजून पर्यंत तश्या अभ्यासक्रम किंवा कार्यशाळा यांना उपस्थित राहिलो नव्हतो हेही एक कारण होते.

ही कार्यशाळा पुण्यातील नुकतेच शतक पार केले अश्या प्रसिद्ध स. प. महाविद्यालयात, तेही तेथील तितकेच प्रसिद्ध ज्ञानेश्वर सभागृहात होते. मसापचे मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविकात नोंदवले की ह्या सभागृहात हा कार्यक्रम होतो आहे, हे औतिच्यपूर्ण आहे, कारण ज्ञानेश्वर हे आद्य अनुवादकच होते, कारण त्यांनी भगवद्गीतेचा संस्कृत मधून प्राकृत/मराठी मध्ये भावानुवादच केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसिद्ध हिंदी साहित्यिक, तसेच अनुवादक, दामोदर खडसे होते. त्यांनी त्यांच्या भाषणात अनुवादासंबंधी बरेच मुद्दे मांडले. भाषेवरील प्रभुत्व, दोन्ही भाषा ज्या ठिकाणी बोलल्या जातात त्या जागेची भौगोलीक, संस्कृती पार्श्वभूमी माहिती असेल तर संदर्भांचे भाषांतर सहज आणि पटेल असे होईल. त्यांनीच एकूणच अनुवादकाकडे प्रगल्भता हवी यावर जोर दिला. त्यांनी इंग्रजीमध्ये फ्रेंच भाषेतून कित्येक शब्द आले आहेत याची माहिती दिली. वेगवेगळे शब्दकोश, संगणकाची मर्यादित मदत आवश्यक आहे. संगणकाद्वारे केलेले भाषांतर(computer assisted translation-CAT) अजून खुपच प्राथमिक स्थितीला आहे. असे संगणकीय भाषांतर आणि शब्दकोश शब्दासाठी पर्याय देतात, पण योग्य तो पर्याय वापरण्याचा विवेक अनुवादकाकडेच असतो, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यशाळेचे ढोबळ स्वरूप असे होते की तीन वक्त्यांची भाषणे, त्यानंतर प्रश्नोत्तरे, आणि शेवटी चर्चा, ही अनुवादाची वाटचाल: आव्हाने आणि समस्या यावर होता.

त्यानुसार पहिल्या वक्त्या म्हणून उमा कुलकर्णी यांनी त्यांचे अनुवाद-क्षेत्रातील अनुभव कथन केले. त्यांचे कन्नड कथा आणि कादंबऱ्या मराठी आणण्याचे काम प्रसिद्धच आहे. त्यांनी प्रामुख्याने देशी भाषांतील अनुवादासंबंधी मुद्दे मांडले. सुरुवातच त्यांनी नवख्या अनुवादकांना अनुवादासंबंधित करार जो प्रकाशक आणि मूळ लेखक, यांच्यात असतो त्याबद्दल आणि इतर तत्सम बाबतीत मार्गदर्शन केले. त्यांनी कन्नड आणि मराठी भाषेतील अनुवादाचे गमतीदार प्रसंग, अनुभव नमूद केले. भाषिक, प्रांतिक भेद कसा आहे, आणि कसा सारखा आहे याचे त्यांनी स्पष्टीकरण केले.

प्रसिद्ध अनुवादिका भारती पांडे यांचे त्यानंतर श्रोत्यांशी संभाषण झाले. त्यांनी मराठी, इंग्रजी दोन्ही पुस्तकांचे भाषांतर, तसेच स्वतंत्र साहित्य निर्मिती केली आहे. त्यांनी अनुवादाला दुय्यम स्थान अजूनही आहे याची खंत प्रकट केली. अनुवादकाला मूळ कलाकृतीशी प्रामाणिक राहावे लागते. स्वतःचे विचार, नैतिक मूल्ये अनुवाद करताना आड येवू देऊ नयेत. अनुवाद आणि रुपांतर यात फरक कसा ते त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. त्यांनी Pearl Buck च्या The Good Earth या कादंबरीचे भाषांतर न करता, भारतीयीकरण केले, रुपांतरीत केले. त्यांनी त्यांच्या इतर पुस्तकांचे जसे की अरुण शौरी यांच्या इंग्रजी भाषेतील, आणि क्लिष्ट विषयावरील पुस्तकाचे, तसेच ओशो रजनीश यांच्या एका पुस्तकाच्या अनुवादाचे अनुभव वाटले.

शेवटी कित्येक प्रसिद्ध इंग्रजी कादंबऱ्यांचे अनुवादक म्हणून अनेक वर्षे काम करत असलेले रविंद्र गुजर यांचे मार्गदर्शन लाभले. Godfather, Papillon, Second Lady, Sicilian वगैरे कादंबऱ्या त्यांनी मराठी आणल्या आणि त्या तुफान गाजल्या. ४०-५० वर्षांपूर्वी अनुवाद करताना काय काय अडचणी येत असत, त्यातून कसे निभावले याची कहाणी त्यांनी सांगितली.

त्यानंतर कार्यक्रमाचा शेवटच्या भागात एक चर्चासत्र आयोजित केले होते. रविंद्र गुजर यांनी समन्वयक/संवादक म्हणून भूमिका बजावली. संस्कृती प्रकाशनच्या तसेच मसापचा पदाधिकारी सुनिताराजे पवार यांनी प्रकाशकाची, पांडुरंग कुलकर्णी यांनी वाचकाची, आणि विजय पाध्ये यांनी ललित साहित्यकृतीव्यतिरिक्त भाषांतर क्षेत्रातील व्यावसायिक या नात्याने आपापली भूमिका मांडली. सुनिताराजे एकूणच प्रकाशकाच्या दृष्टीने अनुवादाचे क्षेत्र कसे विस्तारात चालले आहे, मागणी किती आहे या बद्दल सांगितले. त्याचबरोबर त्याचे महत्व, काम करण्याच्या पद्धती, काही कायदेशीर बाबी यावर प्रकाश टाकला. पांडुरंग कुलकर्णी यांनी अनुवादित साहित्य वाचनाचे त्यांचे अनुभव आणि प्रवास कथन केले. तर विजय पाध्ये यांनी त्यांचे तांत्रिक दस्तावेजांचे भाषांतर, त्याचे क्षेत्र यावर प्रकाश टाकला. त्यांचा याच विषयावर एक लेख मी पूर्वी ‘भाषांतरमीमांसा’ या पुस्तकात वाचला होता. त्यातील मुद्देच त्यांनी परत मांडले. त्या क्षेत्रातील काम करण्याची पद्धत कशी आहे, कोणती पथ्ये पाळावीत, तसेच मानधनाच्या मुद्द्यावर देखील प्रकाश टाकला. मी वर म्हटल्याप्रमाणे, हे क्षेत्र आणि त्यातील संधी वाढतच आहेत. शब्दाला शब्द आणि त्याला पैसे असा कारभार असतो. मी संगणक क्षेत्रात असल्यामुळे आणि आमच्या software productचे भाषांतराचे काम करवून घेण्याची जबाबदारी मी निभावल्यामुळे मला ते काय सांगताहेत हे समजत होते(त्या अनुभवाबद्दल लिहायचे आहे कधीतरी, पाहुयात)

साधारण १०० च्या आसपास अनुवादोछुच्क, अनुवादोत्सुक कार्यशाळेला हजर होते. ही कार्यशाळा मला विशेष भावली नाही. मसापने ही कार्यशाळा आयोजित केल्यामुळे अपेक्षा अशी होती की फक्त ललित साहित्यकृतीच्या अनुवादाचा विचार केला जाईल. तांत्रिक भाषांतर क्षेत्रांचा यात समावेश करण्याची गरज नव्हती. ते क्षेत्र आणि त्यातील गोष्टी ह्या इतर संस्था हाताळतायेत, आणि ते अगदी व्यावसायिक पद्धतीने काम चालू आहे. ललित साहित्यकृतीच्या अनुवादाचे क्षेत्र ही एक मुळात कला आहे, पण त्याला काही तंत्र, पथ्य देखील देखील आहे. ललित साहित्यकृतीच्या अनुवादाच्या क्षेत्रात गुणवत्ता वाढली पाहिजे, त्यावर जास्त लक्ष केंद्रित करावयास हवे होते. काही प्रात्यक्षिकांचा देखील समावेश करायला हवा होता. असो, हा पहिलाच प्रयत्न होता. पुढील कार्यशाळा ह्या सर्व गोष्टींचा विचार करेल अशी अशा आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet