अकलेचे कांदे

ललित

अकलेचे कांदे

- प्रसाद खां

सुशिक्षित मध्यमवर्ग, आणि त्यात सवर्ण-उच्चजातीय यांचं तरल भावविश्व आणि नाजुक, संवेदनशील भाव भावनांवर रोड रोलर फिरवणाऱ्या या फेसबुक पेजचा तीव्र णिषेध! मला विडंबन आणि विनोदी शैलीत लिहिलेलं वाचायला आवडतं याचा पत्ता झुकरबर्गला कुठून लागला ते जगन्नियंत्या फेसबुकच्या देवतांना किंवा इंजिनिअर्सनी लिहिलेल्या अल्गोरिदम्सना माहीत, पण परवा अचानक हे पेज पुढे आलं.

अरे वा! विसंगत चित्र आणि चपखल आणि सुसंगत शीर्षकं यांची झिंग येणारी कॉकटेल केलेल्या, उपरोध ठासून भरलेल्या मीम्स दिसताहेत या पानावर. मस्तच. मजा येणार वाचायला. मीम्समध्ये जो sarcasm, उपरोध असतो, आणि फुलटू टोमणेबाजी असते ती फारच आवडते आपल्याला. पण हे टायटल जरा खटकतंय - Just Savarna Things म्हणजे काय? "आमच्या"वर विनोद करत आहेत की काय ते?

शंकेची पाल खरं तर तेव्हाच चुकचुकली होती, पण मी ती पालीसारखी झटकली. कारण, मी तर जात मानतच नाही. आणि खरं सांगायचं तर जात-पात आता संपलेलीच आहे. कोणीही ब्राह्मण नाही, कोणीही दलित नाही, सगळ्यांना आम्ही सारखं वागवतो. सगळे लोक 'माणूस' याच जातीचे आहेत. मी तर त्यापुढे असं म्हणीन, की जर सगळे सारखे तर यांना ऍट्रॉसिटीचा कायदा कशाकरता हवा? या अशा कायद्यांमुळेच ग्रामीण भागातलं वातावरण बिघडलं आहे, पूर्वी सगळे कसे नीट, आपापल्या वस्त्यांमध्ये राहत होते. कधी भांडण नाही की तंटा नाही. काय आहे, या अशा कायद्यामुळे काहीही झालं तरी आमचीच चूक असं म्हणणार तुम्ही. उग्गाच कायतरी .." असं काहीतरी म्हणणार तेवढयात ही पोष्ट पुढे आली -

आम्ही जात मानत नाही

आम्ही जात मानत नाही

हो हो, .. ठीक आहे. सरकारी नॅशनल क्राईम रिपोर्टींग ब्युरो NCRB सारख्या सरकारनेच प्रसिद्ध केलेल्या आणि इतर ठिकाणी उपलब्ध असलेल्या डेटाचा अभ्यास करून इंडिया स्पेंडचा रिपोर्ट वाचलाय बरं का मी. ऍट्रॉसिटी विरोधी कायदे असूनही या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचं प्रमाण इतर गुन्ह्यांपेक्षा अर्ध्याच्या जवळ आहे, गुन्हे नोंदवून घेण्याचं प्रमाणही फार कमी आहे हे सगळं माहिती आहे आम्हाला. पण ते ग्रामीण आणि मागास भागात असणार. इंडिया स्पेंडच्या लेखात असं म्हटलं आहे की या गुन्ह्यांचं खरं कारण लोकांच्या मनात असलेला जातीयवाद आहे.

पण जातीयवादी खरे तर तेच आहेत. 'ते' त्यांच्या जातीयवादी राजकीय पक्षांनाच मत देतात. तसल्या गलिच्छ वस्त्यांमधे राहतात. ते आमच्यासारखे कष्ट करून, शिकून, मेहनत करून समाजाच्या मुख्य प्रवाहात का येत नाहीत? अशी काहीतरी प्रतिक्रिया लिहायला माझी बोटं शिवशिवली. मी हा महत्त्वाचा मुद्दा तिथे हिरीरीने मांडायला जाणार होतो, पण तेवढ्यात दुसरं पान दिसलं

ते आमच्यासारखे कष्ट करून, शिकून, मेहनत करून समाजाच्या मुख्य प्रवाहात का येत नाहीत?

मुख्य प्रवाह

मनात म्हटलं, आम्हाला इतकं अडाणी समजताय की काय? दलित मुख्य धारेत येण्याच्या मार्गातला मोठा अडथळा सवर्ण लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला भेदभाव आहे. आमच्या युनिव्हर्सिटीजमधे मार्क देण्यात, वेगेळेपणाच्या वागणुकीतून, कमी लेखण्यातून, उघड आणि लपलेला दोन्ही प्रकारचा पक्षपात आहे. अजूनही जागा भाड्यानं देतांना जात-धर्म लोक बघतात, चांगल्या वस्तीत दलित आणि मुस्लिम लोकांना घरं मिळायला त्रास होतो हे सगळं माहीत आहे मला.

पण तरी, ते कसचे समाजाच्या मुख्य प्रवाहात येणार आहेत? काहीही. चौदा एप्रिलला पाहिलंत का? सगळे फुकट, तिकीट न काढता झुंडीनं येतात, सगळीकडे घाण करून ठेवतात. काही सिव्हिक सेन्स नावाचा प्रकार नाही या लोकांना. ट्रॅफिकचे किती वांदे होतात आमच्या एरियात. सगळं फुकट हवं यांना. यु नो, असलं काही पाहिलं की वाटतं आपल्याकडे हुकुमशाही यायला हवी. या लोकांना त्याशिवाय काही शिस्तच लागणार नाही.

तुमचे आसपासचे, नातेवाईक, मित्र यांना तुम्ही असं म्हणतांना ऐकलं आहे की नाही? असणारंच. खरं सांगायचं तर यात काही चूक नाही, फक्त सगळे लोक इतकं स्पष्ट लोक बोलत नाहीत आजकाल. पण आपल्याला कुणाचा डर नाय! आमचं असं आहे, जे खरं ते बोलणार. कधीही कोणाचं लांगूलचालन करणार नाही. स्वाभिमानी आणि देशभक्त. तर सांगायचा मुद्दा हा की याचीही खिल्ली उडवणारी पोष्ट या ठिकाणी दिसली - काही विचार आहे का नाही या लोकांना? उचलली जीभ आणि लावली टाळ्याला!

ट्रॅफिक चे किती वांदे होतात आमच्या एरियात

ट्रॅफिक

हा एवढा मोठा उरूस भरतो त्याच्याकडे इतकं दुर्लक्ष आम्ही करतो याची कसली हेटाळणी करताय? ज्या सार्वजनिक जागा इतर दिवशी दलितांचं स्वागत करत नाहीत, त्या जागा आंबेडकर जयंती साजरी करणारी जनता भरून टाकते. माणूसपण नाकारल्या गेलेल्या आपल्या पीडित, गरीब, असहाय्य माणसांच्या साठी जो परदेशात सुखानं राहायचं सोडून परत आला, (आणि हो, "आम्हाला" माणूस बनवण्यासाठीही तो आला - हे कोणतं प्रेम होतं या मातीवर त्या वेड्या माणसाचं, कोणती जिद्द होती दगडावरची पेरणी करण्याची?), पीडित, शोषित, मोडून पाडलेल्या लोकांना स्वतःचं माणूस असण्याचे आत्मभान दिलं, आणि न्यायाची, समानतेची मागणी करण्याची, त्याकरता शिकून, संघटित होऊन संघर्ष करण्याची हिम्मत दिली, अशा माणसाला आपला बाप - आणि ज्याच्या शिक्षणात आणि कार्यात बाधा येऊ नये म्हणून ज्याची पत्नी अर्धपोटी राहिली, जिने गरीबी स्वीकारली, अनेक त्याग केले, तिला आपली माय म्हणणारे लोक त्यांची प्रेमाने आठवण करतात, एकमेकांना भेटतात, त्यांची दिंडी-पताका पुढे नेण्याचा संकल्प करतात … तर हे सगळं ते आज कशाकरता करतात हे काही समजत नाही. पंढरपूरच्या वारीला जसे बिनडोक्याचे लोक, मेंढरांसारखे काही विचार न करता लोंढ्यांनी जातात तसंच हेही. आपल्याकडे अशिक्षित लोकांमधे अंधश्रद्धा फार आहेत. तिथे फुलं-हार यांच्यापेक्षा कितीतरी जास्त पुस्तकं विकली जातात हे असेलही. पण या लोकांनी, खरं सांगू, डॉ. आंबेडकरांचा देव करून ठेवला आहे.

सन्मानाने जगायला शिकवलं म्हणून आम्ही बाबासाहेबांना देवापेक्षा मोठं समजतो वगैरे ठीके. पण आंबेडकरांच्या अनुयायी म्हणवणाऱ्या लोकांना आंबेडकरांचे विचार तरी समजले आहेत का? कुठेतरी, कोणीतरी, पुतळ्याची विटंबना केली असं कळल्यावर या लोकांनी बसेस जाळल्या. अशी पब्लिक प्रॉपर्टीची नासधूस करणं आंबेडकरांना चाललं असतं का? अशा गोष्टीं घडलेल्या आंबेडकरांना कधीही आवडल्या नसत्या. असं म्हणतोय न म्हणतोय तर पुढे हे पान आलं. काय त्रास आहे हा!

आंबेडकरांच्या अनुयायी म्हणणाऱ्या लोकांना तरी आंबेडकरांचे विचार समजले आहेत का?

रोहित, आंबेडकर

तर ते जाऊद्या... खरं सांगायचं तर हे लोक फार उदोउदो करतात आंबेडकरांचा. घटना लिहिली म्हणतात त्यांनी. त्यांनी काय स्वतः लिहिली होती का घटना? आंबेडकर फक्त ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते. खरं तर भारताच्या घटनेचा मसुदा तयार केला बी. एन. राव यांनी. आय. सी. एस. ऑफिसर होते, रँग्लर होता होता राहिलेले, हुशार चित्रापूर सारस्वत ब्राह्मण होते, ब्रह्मदेशच्या घटनेचा मसुदा सुद्धा त्यांनीच तयार केला होता. जोतिबा फुल्यांना सुद्धा ब्राह्मणांनी आर्थिक मदत केली होती, शाळा काढायला जागा दिली होती, तसंच हे. मुख्य काम केलं दुसऱ्यांनी, आणि उदोउदो यांचा झाला. पुढचं पान त्यामुळे डोक्यातच गेलं!

खरं तर भारताच्या घटनेचा मसुदा तयार केला बी. एन. राव यांनी

बी एन राव

बरं, बरं. ते असूदे. आंबेडकर तरी स्वतः बुद्धिमान होते. माझ्यापेक्षा कैकपट श्रीमंत असलेले एससी-एसटीचं रिझर्वेशन घेतात, हे सगळं रिझर्वेशन संपूर्ण बंद केलं पाहिजे. हे चूकच आहे. यात देशाचं मोठं नुकसान होतंय. अन्याय आहे हा. असं म्हणतोय न म्हणतोय तेवढयात ही पोस्ट पुढ्यात येऊन आपटली.

माझ्यापेक्षा कैकपट श्रीमंत असलेले एससी एसटी चं रिझर्वेशन घेतात, हे सगळं रिझर्वेशन संपूर्ण बंद केलं पाहिजे!

रिझर्व्हेशन आरक्षण

अशा एक-दोन अपवादात्मक केसेस वर एखाद्या सरकारी धोरणाचं यश अपयश ठरत नसतं, आरक्षणाचे धोरण शैक्षणिक मागासलेपण कमी करण्यात अतिशय प्रभावी ठरलं आहे हे काय नवीन सांगताय आम्हाला? ते माहीत आहे सगळं मला. पण हे लोक फक्त कॅटेगरीतून नोकऱ्या मिळवतात. माझं म्हणणं आहे की दिलंय ना त्यांना आरक्षण शिक्षणात, मग एकदा शिक्षण झाल्यावर सरकारी नोकऱ्यांमधे कशाला पाहिजे आरक्षण? शिक्षण झालं की सगळे एक पातळीवर येतात. आहे का त्यांच्या अंगात मेरिट? मेरिट असतं ना तर नोकऱ्यांमधे रिझर्वेशन ची गरजच काय होती? अशा संपूर्णपणे तर्कसंगत, आणि न्यायला धरून असलेल्या विचारांचीसुद्धा या पेजवर थट्टा होते?

हे लोक फक्त कॅटेगरीतून नोकऱ्या मिळवतात, नाही तर आहे का त्यांच्या अंगात मेरिट?

मेरिट आहे का?

मग हे असं किती दिवस चालायचं? आमच्या अनेक पिढ्या अगोदरच्या पूर्वजांनी केलेही असतील अत्याचार (खरं तर माझ्या स्वतःच्याच बाबतीत सांगायचं झालं तर माझे पूर्वज इतके गरिबीत होते की त्यांनी कोणावर अत्याचार केले असतील यावर माझा विश्वासच बसत नाही) - पण समजा अगदी आपण धरूनही चाललो की त्यांनी केले असतील अत्याचार, मग त्याची शिक्षा आम्हाला का?

शिक्षा आम्हाला का?

हे खटकलंच.. म्हटलं, हे फार वैयक्तिक होतंय. अशी काही बापजाद्यांपासून मोठी संपत्ती मला मिळाली नाही. आम्ही जे काही मिळवलं आहे ते सगळं कष्ट करूनच मिळवलं आहे. त्यांच्यातले राजकीय नेते बघा. केवढी बेहिशोबी मालमत्ता असते त्यांच्याकडे. आणि तरीही त्यांना दलित म्हणायचं? आजच्या घडीला खरे पीडित आम्हीच आहोत. निरनिराळ्या तऱ्हेने "आमच्यावर" अन्याय होतो आहे.

आजकाल खरं तर सवर्ण समाजाच्या लोकांवरच अन्याय होतो आहे.

अन्याय

वाटलंच. अगदीच predictable. "जेव्हा मक्तेदारीची सवय असते तेव्हा समानता असणं हाच अन्याय वाटतो", वगैरे म्हणणारच हे लोक. इतके ब्राह्मण आर्थिक परिस्थितीने गरीब असतात. खरं तर सध्या ब्राह्मणांनाच रिझर्वेशनची गरज आहे. आता उलट जातीयवाद त्यांच्याकडून होतोय आणि ब्राह्मणांवर अन्याय होतो आहे! असं म्हणतो तोच ही पुढची पोस्ट दिसली -

खरं तर सध्या बाह्मणांनाच रिझर्वेशनची गरज आहे

ब्राह्मणच दलित

मग रिझर्वेशनमुळे कसा काही लोकांवर अन्याय होतो हे मी स्वतः पाहिलेलं आहे. ते काय खोटं आहे? रिझर्वेशनवर टाइम लिमिट हवी. रिझर्वेशननेच जर कायम जागा भरायच्या असतील तर गुणवत्ता, मेरिट मिळवण्यासाठी कोणी प्रयत्नच करणार नाही, मेहनत घेणार नाही. हे रिझर्वेशन आहे ना, म्हणूनच आमच्या मुलांना इथे संधी नाहीत. मग आमची चांगली मुलं सगळी परदेशात जातात आणि हो, तिथे उत्तम तऱ्हेने चमकतात, पुढे येतात. इथे काय आहे आमच्यासाठी? तिथे परदेशात असली रिझर्वेशनची थेरं नाहीत. त्या कुबड्या नसतांना बघा त्यांच्यापैकी कोणी आमच्यासारखं यश मिळवू शकतंय का. रिझर्वेशनमुळेच जातीयवाद आहे. असे अनेक बिनतोड, मुद्देसूद विचार माझ्या डोक्यात गर्दी करायला लागले असतांना हे पेज नजरेखाली आलं, आणि माझा फ्यूज फक्त उडायचा राहिला ...

फ्यूज

… तेव्हा जातीयवाद फार मोठा प्रश्न आहे आज देशापुढे. जात नाही म्हणतात ती जात. तर ही जात काही जाणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. पण जातीयवाद जायलाच पाहिजे. त्याकरता आयडेंटिटी आधारित राजकारण थांबलं पाहिजे.

जात काही जाणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. पण जातीयवाद जायलाच पाहिजे

जात जाणार नाही.

असली डोक्यात गेली ना ही पोष्ट! म्हणजे काय आम्हाला कार्यकारणभाव समजत नाही असं समजतात काय हे लोक? जात आहे म्हणून जातीयवाद आहे हे काय आम्हाला माहीत नाही असं समजतात का हे लोक? त्याचं काय आहे, आम्ही प्रॅक्टिकल दृष्टीनं बघतो सगळ्या गोष्टींकडे. असं त्यांच्यासारखं भावनिक होऊन आणि संतापून काय प्रश्न सोडवता येणार आहे त्यांना? आता आहे आमचं डाव्या पुरोगामी पक्षाचं नेतृत्व उच्च जातीतलं. त्याला काय करणार? खरा प्रश्न हा आहे की जातीचं राजकारण करणारे छद्म-आंबेडकरी हे नवउदार आर्थिक धोरणाच्या समर्थकांच्या हातातलं बाहुलं झाले आहेत. पुरोगामी, आणि डावे पक्ष हेच खरे दलितांचे कैवारी. पण यांना हे कळण्याची कुवतच नाही. हे सगळं पुरोगामी आणि डावे पक्ष संपवण्याचं एक कारस्थान आहे. कधी कळणार यांना?

कधी कळणार त्यांना

आणि दलितच हिंदुत्वाचे फुट सोल्जर्स झालेले आहेत. त्यांच्यामुळेच भारत पुरोगामी दिशेकडून प्रतिगामी दिशेकडे वळला आहे. डॉ. ... नाव सांगत नाही, पण आमच्यापैकीच आहेत. विद्यापीठात सोशॉलॉजीच्या प्राध्यपिका आहेत, अनेक पेपर्स प्रसिद्ध झाले आहेत त्यांचे. त्यांनी याबद्दल संशोधन करून एक पेपर प्रसिद्ध केला आहे. मग? असतोच आम्ही बुद्धिवंत. ते गुप्ते काय म्हणाले होते? तिथे जातीचाच लागतो. म्हणजे ते ऐकून गुदगुल्या झाल्या होत्या अगदी मनाला, पण कम ऑन, आजकाल असं बोलायचे दिवस राहिले आहेत का? बिचाऱ्याला खूप लोक बोलले - पोस्ट डिलीट करावी लागली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे, खरं आपण बोलतो याबद्दल. मग इथे काय झालं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं? असं स्वतःशी म्हणत असतांना हे बघायला लागलं!

दलितच हिंदुत्वाचे फुट सोल्जर्स झालेले आहेत.

दलिता फुट सोल्जर्स

यावरही ते हसतात? परवा यावर आमच्या विद्यापीठात एक परिसंवाद ठेवला होता, दलित आयडेंटिटीने निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांवर उत्तम चर्चा झाली. त्यांच्यापैकी कोणी होतं का पॅनलवर विचारताय? छे छे, आमच्या पॅनलवर आम्ही अभ्यासू संशोधक बोलावतो. असलं प्रचारकी बोलणारे लोक चर्चा पुढे नेऊ शकतच नाहीत. त्यांना विषयाची त्रयस्थपणे बघण्याची, तटस्थपणे विश्लेषण करण्याची स्किलच नाही.

प्रत्यक्ष अनुभवातूनच फक्त दलित आयुष्याचं आकलन होऊ शकतं यावर माझा अजिबात विश्वास नाही. आमचा होम हेल्पर - हो, होम हेल्पर. मी नोकर म्हटलंय का? तो आमच्या घरातला मदतनीस आहे. तो ना, निरक्षर आहे. सगळं सांगावं लागतं. आम्ही अगदी घरच्यासारखं वागवतो. असले नोकर वगैरे शब्द नाही वापरत मी. अगदी कसंसंच, आपण एखाद्या गुलामाला राबवून घेतोय असं वाटतं नोकर म्हटलं तर. असल्या सरंजामशाही मानसिकतेवर अगदी माझ्या आजोबांच्या काळापासून घणाघाती टीका आमच्याकडे होत आली आहे. आजोबा संघात जायचे तरीही! आणि वडील तर पक्के कॉम्युनिस्ट. त्यामुळे असल्या गोष्टींबद्दल मला अगदी लहानपणापासून बाळकडू मिळालेलं आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. या आमच्या होम हेल्परकडून मला "त्यांच्या" जगण्याची पूर्ण माहिती आहे, आणि त्यामुळे मी या विषयावर अगदी संपूर्ण अधिकारवाणीने बोलू शकतो. नाही का? त्याला मी म्हटलं की तुमच्या आंबेडकरी जनतेनी कधी आंबेडकर वाचलेत तरी का? आंबेडकरांचे विचार काही कळलेच नाहीत या कानठळ्या बसवणाऱ्या डीजेवर नाचणाऱ्या, खळ्ळ-खटॅक करणाऱ्या, दारू पिऊन दंगा करणाऱ्या 'जय भीम'वाल्यांना. यावर त्याने हसून साजरं केल्यासारखी मान डोलावली. काय म्हणणार यावर? किती त्याला समजलं असेल याबद्दल शंकाच आहे. मी डॉ. आंबेडकरांचं लिहिलेलं काय वाचलंय? अं .. मध्ये अरुंधती रॉयचं पुस्तक आलं होतं, ते थोडंसं वाचलं. काय सडेतोड, पॉवरफुल भाषेत लिहिते ना ती? आणि एस. आनंदचे लेख पण मला प्रचंड आवडतात. मागे 'जय भीम कॉम्रेड' डॉक्युमेंट्री पहिली होती. शाहीर घोगरे डाव्या पक्षातून बाहेर पडले तेच चुकलं त्यांचं. नाहीतर अशी वेळ आली नसती...

तर विद्यापीठातल्या, अगदी समाजशास्त्राच्या संशोधनाबद्दलही, फक्त दलितांनीच दलित आयुष्याबद्दल लिहावं हा फॅसिस्ट आग्रह मुळातच मला अमान्य आहे. कारण, संशोधनातलं मेरिट हीच आमची मुख्य क्रायटेरिया असते…

संशोधनातलं मेरिट हीच आमची मुख्य क्रायटेरिया असते.

संशोधनाचा क्रायटेरिया

हे शेवटचं पेज पाहिलं मात्र, आणि मला या फेसबुक पेजकर्त्या लोकांच्या खोडसाळपणाबद्दल आणि त्यांच्या विखारी विचार करण्याबद्दल अगदी काहीही शंका उरली नाही. असल्या बुद्धिभेद करणाऱ्या लोकांवर खरं तर कायद्यात शिक्षा ठेवायला हवी होती. शार्ली एब्दोच्या वेळेस मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जोरदार समर्थन जरूर केलं होतं. पण काही लिमिट असते असल्या गोष्टींची. त्यामुळेच मी या पेजवर फेसबुकनं बंदी आणावी अशा मताचा आहे. हे पेज रिपोर्ट केलंच पाहिजे.

मी लिहायला बसतो, "प्रिय फेसबुक ऍडमिन ..."

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

काही बाण टार्गेट सोडून थोडे इकडेतिकडे गेलेले आहेत पण एकूण धमाल आहे. यातली बरीच वाक्ये गप्पांमधे ऐकू येतात त्यामुळे वाचताना मजा आली. एक दोन ठिकाणी सरकॅजम आणि खरे मत यातील रेषा धूसर झाली आहे त्यामुळे पटकन कळत नाही. लेखकाचे ओव्हरऑल मत लक्शात घेउन त्या मताची वाक्ये खरी आहेत व बाकीचे उपहासाने लिहीलेले आहे हे आपण समजावून घ्यावे लागते काही ठिकाणी.

मात्र एकूण लेख मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक दोन ठिकाणी सरकॅजम आणि खरे मत यातील रेषा धूसर झाली आहे त्यामुळे पटकन कळत नाही.

इतकं, की लेखकच बुचकळ्यात पडलाय असं वाट्टं. लेख बेसिकली त्या रेषेशी कबड्डी खेळतोय.

हा एवढा मोठा उरूस भरतो

हा परिच्छेद रेषेच्या अलिकडे आहे, आणि बाकी सगळा लेख पलिकडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

भन्नाट पान आणि त्याची तितकीच चटकदार ओळख. विनोद केला की अनेकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार मिळतो...

जातीयवादच हाकलून लावला की जाती नष्ट होतील हे तर भारीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त दलित अन् सवर्णच चर्चा का? बाकी कांद्यांची चांगली अक्कल काढलीय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

चुकलात, दलित आणि सवर्ण नाही तर दलित आणि ब्राह्मण असा फोकस आहे. बाकी कुणी अस्तित्वातच नसते, ते ऑनर किलिंग वगैरे करणारे मंगळावर राहतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

ते फेसबुक पान किती अपूर्ण आहे, याची जाणीव इथल्या प्रतिसादांमधून होत्ये.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो ना! "बाईलाच म्हारक्या करायला लावता" सारखे प्रतिसाद त्याची खूपच जाणीव करून देतात.

पुरावा पहा खाली.

http://www.aisiakshare.com/comment/139326#comment-139326

कोणाला कशाचं

Permalink Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on शनिवार, 10/09/2016 - 18:21.
तुम्हाला अमेरिकेचं अप्रूप! मी म्हटलं असतं, शेवटी बाईलाच असल्या म्हारक्या करायला लावता! Tongue
‌मार्मिक0माहितीपूर्ण0विनोदी0रोचक0खवचट0अवांतर0निरर्थक0पकाऊ0
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्रतिसाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं