हक़ीक़त को लाए तख़य्युल से बाहर!

संकल्पना


हक़ीक़त को लाए तख़य्युल से बाहर!

- सलील वाघ

दाभोळकरांची हत्या झाली तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात पुष्कळच म्हणावा इतका फरक आहे. आपल्या समाजात, निवडणुका, आंदोलने, दंगली वगैरेंचा काळ सोडला तर बहुसंख्य सर्वसामान्य नागरिक हे विचारसरणीबाबत जवळपास उदासीन (न्यूट्रल) म्हणावे असे असतात आणि अगदी थोडे (दहावीस टक्के किंवा त्यांहूनही कमी) नागरिक दोन टोकांच्या विचारसरणीचे असतात. दाभोळकरांची हत्या धक्कादायक तर होतीच; शिवाय ती अनेक अर्थाने चक्रावून टाकणारीही होती. डाव्यांच्या दृष्टीने पाहिल्यास दाभोळकर हे सौम्य डावे म्हणावे लागतील. कारण त्यांची कार्यशैली ही भडक, बटबटीत, आगपाखडू नव्हती. दाभोळकर हे दिखाऊ काम करणारे नव्हते. त्यांचे काम मूलभूत स्वरूपाचे होते. किंबहुना कार्यकर्त्यांनी अतिसंवेदनाशील, विवाद्य विषयांना हात न घालता किंवा सावधपणे हात घालत विवेकाधिष्ठित व्यक्तिंची सामाजिक वीण कामासाठी बांधावी असा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे दाभोळकर हे त्यांच्या आजूबाजूच्या समकालीन वैचारिक सहोदरांपेक्षा वेगळे उठून दिसत. देव आहे का नाही? धर्म, धर्माची प्रतीके कशी वाईट आहेत, हिंदू धर्माचा इतिहास म्हणजे फक्त अन्यायाचा काळाकुट्ट इतिहास, धर्मातल्या यच्चयावत प्रथा कशा वाईट्ट आहेत यांप्रकारच्या टोकाच्या आततायी भूमिका जाहीरपणे घेणे दाभोळकरांनी वेळोवेळी टाळलेले दिसते. त्याचप्रमाणे चटकदारपणा, चटपटीतपणा टाळून विज्ञानाधिष्ठित हजरजबाबीपणाने समाजाला सामोरे जायची दुर्मीळ शैलीही दाभोळकरांनी अंगी बाणवलेली होती. विवेकी व्यक्ती कोणत्याही विचारांच्या गटात असो, ती कुठेही असली तरी विवेकशीलच असते आणि विवेक हा दांभिकतेचा शत्रू असतो. मराठी समाजाची रचना इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की अनेक लोक राजकीयदृष्ट्या उजवीकडे झुकलेले असले, तरी सामाजिकदृष्ट्या डावीकडे झुकलेले आढळतात, ते यामुळेच. याच्या उलट राजकीयदृष्ट्या डावीकडे झुकल्यासारखे वाटणारे अनेक लोक वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात बायकांना डोक्यावर पदर घ्यायला लावणारे संकुचित परंपरापाळू असतात. त्यामुळेच दाभोळकरांच्या कामाविषयी सर्वसाधारण शिक्षित उच्चमध्यमवर्ग, मध्यमवर्ग आणि निम्नमध्यमवर्गांमध्ये राजकारणनिरपेक्ष आदर होता तो त्यांच्या संयत, मुद्देसूद आणि प्रक्षोभक वितंडवाद टाळण्याच्या विज्ञाननिष्ठ शैलीमुळे! याहून थोडी(च) जहाल शैली असलेले कॉम्रेड पानसरे हेही त्यांच्या कामामुळे आदराला पात्र असलेले असे मोठे व्यक्तिमत्त्व होते. मुख्य म्हणजे, अण्णा हजारे किंवा रामदेवबाबा स्टाईल गवगवा आणि स्टंटबाजी न करताही आपल्या तत्त्वज्ञानाला प्रमाण मानून समाजात काम करता येते याची हे दोघेही मिसाल होते.

महाराष्ट्रातल्या सुशिक्षित वर्गाला दाभोळकर गेल्या अनेक दशकांपासून परिचित होते आणि त्यांच्या हत्येने हा वर्ग चक्रावून गेला; हबकून-हादरूनही गेला. सर्वपक्षीय राजकारण्यांच्या त्या काळातल्या प्रतिक्रिया आठवून पाहिल्या तर राजकीय नेतेही गडबडल्यासारखे झाले होते असे दिसून येते. त्यानंतर हळूहळू दाभोळकर हे ज्या संस्था-संघटनांचे वैचारिक विरोधक होते, त्या संस्थांची नावे मीडियाकडून पुढे आणली जाऊ लागली आणि त्यांच्यावरल्या कारवाईची शक्यताही सुचवली जाऊ लागली. पृथ्वीराज चव्हाण हे तेव्हा मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री होण्याआधी ते केंद्रात पंतप्रधान कार्यालयाचे खाते सांभाळत होते. पंतप्रधान कार्यालयाचा कारभार सांभाळणार्‍याला सगळ्यांच्या कुंडल्या ठावूक असाव्या लागतात. त्यामुळे अनेक पाताळयंत्री कारस्थानांना कसे पुरून उरायचे असते याचे काही पक्के धडे त्यांनी तिथे गिरवले असणार. मीडियाच्या आणि भलत्या लोकांच्या बाळबोध बकाव्यात न येता त्यांनी या संस्था-संघटनांवर कोणतीही आततायी कारवाई केली नाही. त्यामुळे पुढची राजकीय अस्थिरता टळली आणि त्यांची खुर्चीही टिकली! तथाकथित उजव्या संघटनांबाबत घाईगडबडीने धरपकड अन् कारवायांचा सपाटा लावला असता, तर सुक्यासोबत ओलेही जळून वैचारिक विद्वेष वाढला असता.

या घटनेनंतर ज्या चर्चा होत होत्या, त्यातल्या एका दूरचित्रवाणी-चर्चेत संभाषणाच्या ओघात दाभोळकरांच्या मुलाने - हमीदने एक वाक्य उच्चारले होते, की 'डॉ. दाभोळकर हे अंधश्रद्धा निर्मूलन करणारे एक कार्यकर्ते होते; ते काही कुणी मसीहा नव्हते!' आपल्या चळवळीला इतके बुद्धिनिष्ठ आणि ‘डाउन-टू-अर्थ’ वैचारिक संस्कार देणाऱ्या दाभोळकरांमुळे त्यांच्या पश्चातही चळवळ आपला तोल घालवून बसली नाही. या हल्ल्यामुळे अंधश्रद्धाविरोधाचा आवाजही अजिबात कमी झाला नाही. उलट 'अंनिस'च्या चळवळीविषयी एक सार्वत्रिक मान्यता आणि सहानुभूती निर्माण झाली; चळवळ नामोहरम झाली नाही. दाभोळकर आणि पानसरे हे मोठा जनाधार असलेले जननेते नव्हते. विचारी लोकांचा समूह हाच त्यांचा आधार होता. विचारी लोकांवर त्यांचा प्रभाव असणे किंबहुना कोणत्याही विचारी जनसमूहाची मान्यता असणे, हे कुणाला डाचत होते का? दाभोळकरांची हत्या पचवण्यासाठी तपासयंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी पुढच्या हत्या झाल्या का? पोलीसचौकी हाकेच्या अंतरावर असताना हल्लेखोरांचे धाडस झाले याचा अर्थ पोलिसातलेच कुणी फुटीर भाडोत्री हल्लेखोर आहेत का? या हत्या, 'अंडरवर्ल्ड'मधल्या टोळीला सुपारी देऊन केल्या गेल्यात का? की ह्या हत्या करणारे शत्रूराष्ट्रातले कुणी प्रशिक्षित भाडोत्री कमांडो आहेत? गुन्हा करून परत लोकांत मिसळून जाण्याइतक्या सामान्य चेहेऱ्यामोहोऱ्याचे हे गुन्हेगार आहेत का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उभे राहिले. पुण्यात जक्कल-सुतार-शहा-चांडक या टोळीने चाळीसेक वर्षांपूर्वी जोशी-अभ्यंकर कुटुंबियांचे क्रूर हत्याकांड केले होते. तेव्हा पुणे हे पेठापेठांचे लहान शहर होते. त्या हत्याकांडानी शहर ज्या पद्धतीने हादरून गेले, तसेच दाभोळकरांच्या हत्येमुळे हादरून जात आधुनिक पुणे सुन्न झाले.

ह्या हत्या जसजशा झाल्या, तसतशा उजव्या संघटना बदनाम होत गेलेल्या दिसतात. संशय, आरोप-प्रत्यारोपांच्या रणधुमाळीत उजवे आणि डावे या दोघांचाही कडवेपणा वाढत गेलेला आणि विवेक हरपत चाललेला दिसला. हल्लेखोरांच्या सूत्रधारांना हेच हवे असेल का? डाव्यांना अश्या पद्धतीने उचकवायचं, की त्यांनी सतत ग्लोबेल्सनीतीने उजव्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं पाहिजे, आणि उजव्यांना इतकं बेभान, संवेदनाहीन बनवायचं की त्यांनी आउट-ऑफ-अँगर हत्यांचे उदात्तीकरण करून त्यांची अप्रत्यक्ष भलावण करावी.. डाव्यांना इतकं आगीत तेल ओतल्यासारखं भडकावून द्यायचं, की ते उजव्यांना शब्दजर्जर करून भ्रामक राष्द्रवादाच्या आहारी जायला भाग पाडतील. सामाजिक विद्वेष इतका पराकोटीला गेला पाहिजे, की मूळ मुद्दा आणि हत्यांच्या धागेदोऱ्यांच्या शोधाकडे पूर्ण दुर्लक्ष व्हावे, आणि द्वेष ही एकमेव भावना मनात ठाण मांडून बसावी. एखाद्या देशाची सामाजिक बांधणी विस्कटवून टाकणे हे त्या देशावर लष्करी, व्यापारी किंवा अतिरेकी हल्ल्यांपेक्षाही जास्त नुकसानकारक ठरू शकते. भारताच्या बाबतीत असे कुणी करते आहे का? विचारसरणी ही मानवजातीने जन्माला घातलेली, मानवनिर्मित गोष्ट आहे. विचारसरणीने मानवजात निर्माण केलेली नाही. विचारसरणी माणसासाठी आहे; माणूस विचारसरणीसाठी नाही. माणसापेक्षा, त्याच्या आयुष्यापेक्षा आणि मानवतेपेक्षा विचारसरणी मोठी आहे का? जगातल्या कोणत्याही विचारसरणीला मर्यादा असतात. मानवी अस्तित्व, मानवी अधिकार, मानवी मूल्ये आणि मानवाची प्रतिष्ठा ही कोणत्याही धर्मापेक्षा वा विचारधारेपेक्षा वरच असायला हवी. भारतीय समाजाला मतभेदांनिशी एकमेकांचा आदर करत जगणे अशक्य व्हावे यादृष्टीने एखादी यंत्रणा काम करते आहे का? आपापसात राजकीय, सामाजिक, वैचारिक मतभेदांसहित एकमेकांसोबत सुखदुःखाचे अनेक क्षण वाटून घ्यायला जो वाव होता, तो वाव आपल्यापासून कोणी हिरावून घेतेय का? आपल्या समाजात संवादाच्या जागाच उरू न देणे, त्या संवादाच्या जागाच ताब्यात घेणे यासाठी काही पद्धतशीर प्रयत्न होतो आहे का? जर होत असेल, तर तो धोका अतिरेकी, अणुबाँब, हायड्रोजन बाँब, जैवरासायनिक अस्त्रे यांच्याइतकाच गंभीर आहे. एखाद्या देशाला, समाजाला दुबळे करण्याच्या अनेक पद्धती असतात. त्यातलीच एखादी पद्धत इथे आजमावली जात आहे का? भारतीय समाज, इथला गावगाडा, इथली हलाखी-गरीबी, इथले बारा महिने चोवीस तास चालू असणारे सतराशेसाठ उत्सव, इथला निसर्ग, इंडॉलाजी वगैरे अभ्यासण्यासाठी इथल्याच अनेक एनजीओंचे बोट धरून अनेक देशी-परदेशी अभ्यासक भारतात वावरतात. काही मंडळी छायाचित्रण-शिष्यवृत्ती, प्रवास-अभ्यासवृत्तीच्या नावाखाली संशयास्पद फिरत असतात. खासगी कंपन्यांतर्फे अनेक सीएसआर अॅक्टिव्हिटीज इथल्या समाजात थेट राबवल्या जातात. आजच्या सुपरभांडवलशाहीच्या काळात अनेक भांडवलदारांना भारतीय समाजात खोलवर शिरून माहिती, विदा मिळत असतो. भारतीय समाजरचनेची, इथल्या अंतर्विरोधांची इत्थंभूत माहिती त्यांच्याद्वारे गोळा केली जाते का? दाभोळकर आदिंच्या हत्यासत्रात बळी पडलेल्या व्यक्तींचे सामाजिक स्थान, त्यांचा वावर, त्यांचा दिनक्रम यांची इतिहासभूगोलासह बिनचूक माहिती हल्लेखोरांना कशी मिळत जाते?

कोणालाही धर्माच्या किंवा देवाच्या बाबतीत न उचकवता समाजात काम करणाऱ्या आणि राजकीयदृष्ट्या उजवीकडे झुकलेल्या वर्गालाही सामाजिकदृष्ट्या डावीकडे वळवणाऱ्या दाभोळकरांसारख्या कार्यकर्त्यांपासून ते अत्यंत राजकीय, कर्कश, भडक आणि स्फोटक पद्धतीने व्यक्त होत कडव्या डाव्यांना अतिकडवे बनवणार्‍या आणि सौम्य डाव्यांना उजवीकडे ढकलणाऱ्या पत्रकार गौरी लंकेशपर्यंत हा पुणे-कोल्हापूर-धारवाड-बंगळुरू असा या धिक्कारण्याजोग्या हत्यासत्राचा धक्कादायक प्रवास झालेला आहे. यात सगळ्यात महत्त्वाचा समान धागा म्हणजे तपासयंत्रणांना दिलेल्या हुलकावण्या! तथाकथित उजवे आणि आणि तथाकथित डावे आपापले अभिनिवेश म्यान करून तपासयंत्रणांना त्यांचे काम एकाग्रपणे, पूर्ण क्षमतेनिशी करू देतील, तर ह्या हल्ल्यांचे गारदी, आनंदीबाई, राघोबा आणि इंग्रज या सगळ्यांपर्यंत पोहोचणे आपल्या गुप्तचरांना शक्य होईल. किंवा जर तिथवर पोहोचले असतील, तर पुरावे उभे करणे आणि कायदेशीर कारवाई करणे शक्य होईल. आपल्याला खरोखरच लोकशाही हवीय की ध्रुवीकरण? हे आपणच ठरवाचे आहे आणि त्याप्रमाणे वागायचे आहे!

तख़य्युल म्हणजे काल्पनिक, आभासी गोष्ट

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

अत्यंत संयत, बऱ्याच बाजूनी विचार करून आढावा घेणारा लेख. म्हणून महत्वाचा .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिवाळी येण्यापूर्वी आणि आल्यावर जाणवलेला मोठा फरक,
एखाद्या मोठ्या वक्त्याच्या सभेत तो येईपर्यंत लोकल पुढारी भाषणे करतात, त्याने श्रोते कावून गेलेले असतात आणि एकदम तो फर्डा वक्ता येतो आणि जोरदार भाषण करतो. तसं आता वाटतंय. वाचनाची मोठी मेजवानी समोर आहे, आणि वेळही भरपूर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0