किरण नगरकर मुलाखत : भाग २ । मिथकं आणि समकालीन वास्तव

संकल्पना

किरण नगरकर मुलाखत : भाग २ । मिथकं आणि समकालीन वास्तव

- ऐसीअक्षरे

भाग १ । जडणघडणीविषयी
भाग ३ । Storytellers are liars

ऐसी : आज आपण 'बेडटाईम स्टोरी' ह्या तुमच्या नाटकापासून सुरुवात करू. वास्तव किंवा सत्य काय आहे, याकडे मिथकामधून बघण्याचा तो एक इंटरेस्टिंग प्रयत्न आहे. त्याच्या प्रस्तावनेत तुम्ही म्हटलंय, (व्हिएतनाम युद्धाच्या काळात) मी जेव्हा 'टाईम' आणि 'न्यूजवीक' वाचत होतो; नंतर मी जेव्हा हो चि मिन्ह आणि चे गव्हेराबद्दल वाचलं तेव्हा माझ्या डोळ्यांवरची झापडं उडाली. नाटक लिहिण्यामागची ती प्रेरणा होती, असं तुम्ही म्हणाला आहात.

नगरकर : त्यातला माझा राग सर्वप्रथम माझ्यावरच आहे. माणसानं अज्ञानात किती राहायचं, याला सुमार असला पाहिजे! त्याबद्दल आलेली ती प्रतिक्रिया होती.

आता ह्या नाटकाविषयी बोलायचं तर, मला अत्यंत वाईट वाटतं. माझ्या मते हे नाटक अतिशय रेलेव्हंट आहे. पुण्या-मुंबईत, महाराष्ट्रातल्या इतर गावांमध्ये, भारतामध्येही, कोणालाही असं वाटलं नाही की हे नाटक करावं. आता जे आपल्या देशात आणि परदेशात जे सुरू आहे, त्यात या नाटकाचं महत्त्व आहे. आपण सगळे शुद्धीत आहोत का कोमात गेलो आहोत, असा प्रश्न आहे.

मला आधी नाटकातल्या 'एकलव्या'बद्दल बोलायचं आहे. उदाहरणार्थ, दलित किंवा आदिवासींनी त्या नाटकाचा पहिला अंक कधीही कसा वाचला नाही? खरं तर त्याचं महत्त्व माझं मलाच बरंच उशिरा समजलं. त्यात एक टाळीचं वाक्य आहे, आणि ते चांगलंच आहे, पण त्याच्या पल्याड कुणी गेलेलं नाही.

एकलव्याची गोष्ट कोणी तरी आई, आजी, वडलांनी सांगितली असेल; मला कोणी पहिल्यांदा सांगितली, हे मलाही आठवत नाही. ती कथा सांगितली जाते ती गुरू-शिष्य परंपरा असावी, ती अशी असावी हे सांगण्याकरता. पण त्यात कुणाच्याही हे लक्षात येत नाही की एकलव्य संपूर्णतः स्वयंप्रकाशी, self-made होता. हा खूप मोठा विषय आहे.

दलितांकडे बघण्याची आपली दृष्टी तुच्छतेची असते. आपण फक्त बोलतो - 'बोलाची कढी बोलाचा भात'. एकलव्य किती थोर माणूस होता, याकडे आपण बघितलेलंच नाही. तो गुरूशिवाय, गुरूच्या पलीकडे जाऊ शकला. अर्जुन अप्रतिम धर्नुधर असेल, त्याबद्दल शंका नाही; पण त्याचं एक कारण असं की त्याला अप्रतिम गुरू होता. एकलव्याला कोणीच नव्हतं. त्याच्याकडे फक्त मूर्ती होती, तिनं त्याला काहीच शिकवलं नाही, तो आपला आपण शिकला. हा एक मुद्दा झाला. पण, दलित आणि आदिवासींशी आपण फार घाणेरडे वागलो आहोत. नक्षलवादी म्हणून आपण त्यांच्यावर वाट्टेल ते अन्याय करतो. त्यांनी नक्षलवादाकडे वळण्याचं कारण आपण आहोत. त्यांची भूमी आपण बळकावली, त्या बायकांवर बलात्कार केले, त्यांना जगण्याची मुभाच दिली नाही आपण.

निवडणूक आली की दलितांची आठवण होते. आदिवासींची तेवढीही आठवण नाही. दलितांशी आपण कोणीही सरळ बोलू शकत नाही. त्यांनाही बहुतेक जाणीव आहे की खरं न बोललेलं बरं आहे. 'एकलव्य' नाटकात मी त्यांच्या वतीनं लिहिलं आहे, पण याची त्यांना जाणीवच नाहीये.

आंबेडकर हा थोर माणूस. निःसंशय. तसे नेहरू आणि गांधीही; मतभेद होणं गरजेचं असतं, त्याचा फायदा होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. थोडं धार्ष्ट्यानं बोलायचं तर तसं माझंही मत आहे. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला खरा, पण दलितांनी धर्मांतर केल्यावरही आंबेडकरांनाही देव करण्याचा प्रयत्न केला. हे तर धर्मांतराच्या हेतूलाच विरोध करणारं आहे. कारण, बुद्धानं देवाचा संदर्भ कधीच घेतलेला नाही. आपण सगळेच हे विसरतो.

आपण दलितांना पिढ्यान्‌पिढ्या वाईट वर्तणूक दिलेली आहे. आरक्षणाची आवश्यकता मला समजते. पण, आता स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षं होत आली. दलितांचे पुढारी आणि त्यांच्याबद्दल अत्यंत सहानुभूती बाळगणाऱ्या लोकांची हे मांडण्याची हिंमत आहे का, की आता आपण एकलव्याला आपलं दैवत मानूया. तो जसा स्वयंप्रकाशी होता तसं आपण बनायचं का? स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि हे सगळे किरण नगरकरसारखे, दलितेतर लोक आहेत त्यांना धडा शिकवायचा का? अत्यंत एकाग्रतेनं अभ्यास करायचा आणि लोकांना दाखवायचं की 'तुम्ही ९९% मिळवले का, मी १०९% मिळवले'.

पण, बोलताना अतिशय सांभाळून बोलावं लागतं. आणि मग मोकळेपणा राहात नाही. 'आंबेडकर आणि नेहरू' हे 'शंकर्स वीकली'मधलं कार्टून एनसीईआरटीच्या पुस्तकातून काढून टाकावं लागलं. म्हणजे, देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे कार्टून्ससाठी मासिक होतं. त्यात सगळ्यांची थट्टा करता यायची. थट्टा केली तर ती लागणारच. मलाही कधी तरी माझी थट्टा मर्मी लागते. परंतु, ही विनोदबुद्धी आता लोकांना सहन होत नाही. मग ते (पूर्वी चाललेलं) कार्टून पुस्तकातून काढून टाकावं लागलं. हे प्रगल्भ होण्याचं लक्षण नाही, बालिशपणाचं आहे.

पुन्हा एकलव्याकडे वळू. आपली गुरू-शिष्य परंपरा काय तर गुरूनं मागावं आणि एकलव्यानं मानावं. म्हणजे आपण (सवर्ण) किती हुशार, चलाख आणि घाणेरडे लोक आहोत! आपल्याला ह्याच परंपरेचं दैवतीकरण करायचं आहे! म्हणूनच, माझ्या नाटकात एकलव्य कायमच विनयशील असतो. तो द्रोणाचार्यांचा कधीही अपमान करत नाही. पण त्याचा आत्मसन्मान कायमच जिवंत असतो. आपण स्वतः कोण आहोत, याची त्याला चांगली कल्पना आहे. तो 'यथा गुरू तथा गुरूदक्षिणा' असं अत्यंत विनयशीलपणे, पण खरं वागतो. 'तुम्हाला अंगठाच हवाय ना? मग हा घ्या, मी तुम्हाला मातीचा अंगठा देतो.' मला मूळ गोष्टीतल्या द्रोणाचार्यांचा संताप येई. पण त्यात ते लिहिणाऱ्याची थोरवी आपण विसरतो. मानवी स्वभावाचं त्यानं किती अचूक निरीक्षण केलं होतं. लेखकाला केवढं आत्मभान असणार! हाच मुद्दा मी गेल्या भागात रामायणाविषयी बोललो होतो. सीतेला त्यागणाऱ्या रामाबद्दल आपल्या मनात संताप असतो.

ह्या अंगठ्याच्या प्रसंगाव्यतिरिक्त नाटकात समकालीन प्रसंग आहेत. अर्जुन आणि एकलव्य त्यात वैद्यकीय विद्यार्थी आहेत. एकलव्य रिझर्व्ह कॅटेगरीतला. भारतीयांना हे पटणार नाही, पण कृष्णवर्णीयांबद्दलही आपली वृत्ती अत्यंत नालायकपणाची आहे. किरण नगरकरांचा त्यात सहभाग नाही असं नाही, पण किरण नगरकरांना त्याची जाणीव आहे; त्यामुळे मी त्या वृत्तीशी सतत झगडत असतो. मार्टीन ल्यूथर किंग, मंडेलांबद्दल मला खूप आदर आहे. अमेरिका आणि बाकीच्या जगानं द. आफ्रिकेची तळी जेव्हा उचलली होती, म्हणजेच मंडेलांना जेव्हा विरोध चालवला होता, तेव्हा या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून मंडेलांना मदत करणारा कोण होता, फिडेल कॅस्ट्रो! आपण कितीही कॅस्ट्रोला दोष दिला, तरीही मंडेला हे कधीच विसरले नाहीत. अमेरिका हे कधीही मान्य करणार नाही. पुढे त्यांनी मंडेलांबद्दल दृष्टीकोन फिरवला. यातून मला सांगायचंय ते असं, आपले दोष आणि आपल्यातल्या त्रुटी आधी मान्य करावे लागतात. काळे लोकच काय, आसामी आणि इतर इशान्येच्या लोकांशी आपण कसे भयंकर वागतो! अर्थात, हे सगळं मी माझा दोष म्हणूनच पाहतोय. मी माझ्याकडे बोट दाखवतोय.

तर माझ्या नाटकात अर्जुन आणि एकलव्य हे वैद्यकीय विद्यार्थी. अर्जुन एका बाईबरोबर झोपतो, खरं तर त्यात विशेष काहीच नसतं. दोघेही प्रौढ असतात. पण अर्जुनासोबत एकलव्य असल्यामुळे लोकांना त्याच्यावरही संशय येतो. अर्जुनाच्या बाबतीत 'मला काय त्याचं' असं लोक म्हणतात. पण एकलव्य म्हणताच संपूर्ण वातावरण आणि न्यायदान यात फरक पडतो. आणि ते एकलव्याच्या मागे लागतात.

असंच द्रौपदीच्या बाबतीतही मी केलं. म्हणजे महाभारतातला प्रसंग आणि समकालीन प्रसंग.

ऐसी : बरोबर. द्रौपदीला पाच भाऊ वाटून घेतात हा प्रसंग तुमच्या नाटकात आहे, त्यात धर्मराजाच्या तोंडी असं काही तरी वाक्य आहे की 'सत्य हे काळाची बटीक असते' किंवा 'सकाळचं आणि संध्याकाळचं सत्य निराळं आहे'; थोडक्यात त्याला असं म्हणायचंय की सकाळी तू स्वयंवरात अर्जुनानं जिंकलेली बाई होतीस; आता तू कुंतीनं आमच्यात वाटलेली बाई आहेस. त्यावर द्रौपदी म्हणते, “तू मूर्खासारखं काही बडबडू नकोस.” म्हणजे, तू जर माझ्याकडे आकर्षित झाला असशील तर मला तसं सरळ सांगितलंस तर ते मला खरं आणि अधिक चांगलं वाटलं असतं आणि मी त्याचा विचार केला असता. एकूणातच त्यातले पुरुष सोयीस्कररीत्या सत्य काय आहे ते मांडत राहतात. आणि द्रौपदी सतत पुरुषांना कापत राहते.
हा सगळा धागा, ज्या पद्धतीनं सत्य या कल्पनेकडे तुम्ही बघता, ते फार इंटरेस्टिंग वाटतं. तुम्ही त्याबद्दल काय म्हणाल?

नगरकर : आपल्याला कोणी स्त्री आवडली तर तसं स्पष्ट सांगणं फार कठीण जातं. हे फक्त मराठी लोकांत आहे का काय हे मला माहीत नाही. Hypocrisyवर आपला copyright आहे!

आता तेंडुलकरांनी 'घाशीराम कोतवाल'सारखं नाटक लिहिलं त्यावरही आपण गदारोळ उठवला. एक तर ते तुफान मनोरंजक नाटक होतं. त्याचं सादरीकरणही सुंदर होतं. हे अगदी ब्रॉडवेच्या नावाजलेल्या नाटकांशी स्पर्धा करण्यासारखं थोर नाटक लिहिलं. तिथेही इतकं मर्म असलेली नाटकं फार कमी असतात. त्यातली टीका रास्त आहे.

बोलताना मला आठवलं, मी एकदा ऑपेरा हाऊसला काही तरी बघायला गेलो होतो. स्वातंत्र्यानंतर कधी तरी गोंडलच्या महाराजांनी ऑपेरा हाऊस विकत घेतलं होतं. तर तिथे त्यांच्या नावाची घोषणा झाली, 'महाराजा ऑफ गोंडल'. आता तुम्ही पाहा : नेहरूंनी आणि मुख्यतः पटेलांनी राज्यं कधीच खालसा केली. परंतु, मुंबईत राहून, शिकलेले असलो तरीही राजेराण्यांची आपल्याला गरज भासते. हे सगळं संपलं, आपण स्वातंत्र्य मिळवून लोकशाहीत राहतो; तरीही आपल्याला हे हवं आहे. त्यांतल्या बहुतेकांकडे नैतिक अधिष्ठानही नाही.

ब्रिटिश आपल्याकडे व्यापारासाठी आले. हळुहळू त्यांची सत्ता वाढत गेली. व्हिक्टोरिया राणीनं या राजेरजवाड्यांच्या शेरवानीवर एक बिल्ला मारला की हे लोक खुश. १८५७नंतर ह्या लोकांनी असा विचार केला नाही की आता आपण एकत्र येऊन ब्रिटिशांना बाहेर काढलेलं बरं. ही आत्मजाणीव आपल्याला तेव्हा झालेली नव्हती, आजही नाही. आजच्या विरोधी पक्षांनाही ही समज नाही की आपण वेगळेपणा सोडून एकत्र आलं पाहिजे. १८५७ साली जे झालं, ते पुन्हा घडतंय. हे कसले महाराजे!

पुन्हा मुद्द्यावर यायचं तर महाभारतातही असेच राजे-महाराजे होते. पण जाणीव असलेले.

मला मान्य आहे की पुरुष या प्राण्याची गोची आहे. समजा कोणी सुंदर, कर्तबगार स्त्री आहे. नगरकरचं तिच्यावर प्रेम आहे. नगरकर जर तिला स्पष्टपणे म्हणाला, “You are looking very lovely today.” तर माझ्या प्रामाणिकपणामुळे इतरांच्याच भावना दुखावतील. तिच्याबरोबर झोपायचं आहे, असं न म्हणताही! समाजाचा अलिखित नियम असा की सरळ, प्रामाणिकपणा असला तरीही असं काही बोलायचं नाही. एखादा सुंदर चाफा, किंवा झाड दिसलं तरीही “माय गॉड, काय वड होता!” असंही बोलायचं नाही. माझ्या मते, झाडं sensual असतात. आणि ती थोरही असतात; बोधिसत्त्वच असतात. ती आपल्यावर किती उपकार करतात; आपण त्यांना सतत खाली पाडत असतो. त्यांच्या सौंदर्याला तुलना नाही. हीच गोष्ट स्त्रिया आणि पुरुषांबद्दल. आपल्यात छोटेपण (निरागसता) आल्याशिवाय हे लक्षात घेता येत नाही. द्रौपदीही धर्माला हेच म्हणत्ये, की स्पष्ट सांगायचं होतंस.

मला आवडो न आवडो; मी मराठी आहे; त्यामुळे माझ्या लोकांवर टीका करणं, स्वतःवरच टीका करणं मला महत्त्वाचं वाटतं. माझ्यातही हा खोटेपणा नक्कीच असणार. त्याच्याशी लढायचा मी प्रयत्न करतो आणि माझ्यात ती सचोटी आणण्याचा मी माझ्यापरीनं प्रयत्न करतो.

द्रौपदी त्या नाटकात लोकांना धारेवर धरते. वस्त्रहरणाच्या प्रसंगात ती कृष्णाला धारेवर धरते. “इतका वेळ तूही बघतच होतास”, असं काहीसं वाक्य तिच्या तोंडी आहे. ते नाटक लिहिलं तेव्हा मी तरुण होतो; आतासुद्धा मला फार समज नाही. नाटकातली भाषा फार तिखट आहे; पण त्यात शिवीगाळ नाहीये.

लागूंच्या घरी नाटकाचं वाचन झालं; ही गोष्ट १९७७ची. आणीबाणीत मी ते लिहिलं. त्या काळात हे नाटक फार महत्त्वाचं होतं; कारण जे काही घडतंय त्यात तुमचा-माझा हात आहे हाच त्याचा विषय आहे. पण लगेच आणीबाणी संपली. मग मला वाटलं, “ हे नाटक कशासाठी लिहिलं! आता याचं काय महत्त्व!” परंतु, जे नवं सरकार आलं, त्यातल्या तिघांना पंतप्रधान बनायचं होतं. किती सहन केल्यानंतर ही अविश्वसनीय सुवर्णसंधी मिळाली. पण त्याचं महत्त्व किंवा त्याचा अर्थ आपल्या भारतीय लोकांना समजला नाही. लगेच भांडाभांडी आणि पुन्हा निवडणुका, आणि बाई परत आल्या!

मला हे आता समजायला लागलं आहे, पण तेव्हा (म्हणजे नाटकाच्या वाचनाच्या वेळी) कळलं नव्हतं, की माझ्यावर काही लोकांचा तेव्हा रोष होता. का? कारण माझी कादंबरी भागवतांनी छापली. मला कल्पनाही नव्हती की 'सत्यकथे'चा एक ग्रूप आहे आणि त्यांच्या विरोधकांचा गट आहे. पाटणकर भागवतांकडे बोलले नसते तर 'सात सक्कं त्रेचाळीस' आलीच नसती. कुणालाच ती नको होती. लागूंकडे झालेल्या नाटकाच्या वाचनाच्या वेळेस भागवतही होते. भागवत अत्यंत गोरे; ते अधूनमधून लालबुंद होत होते. ते इतके चिडले होते! नंतर त्यांनी मला धारेवर धरलं होतं. “तुम्हाला काही गोष्टींचा गंध नाही. भीष्म पितामह किती थोर होते, याची तुम्हाला कल्पना नाही.” द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस ते गप्प बसतात ना!

आता, भागवत SIESमध्ये मराठी विभागाचे प्रमुख होते. मीही तिथे एक वर्ष शिकवलं. त्यामुळे 'सात सक्कं'च्या आधीही माझी आणि त्यांची ओळख होती. त्यांना मी सरच म्हणायचो. कोणाबरोबर मतभेद झाला याचा अर्थ त्यांच्याशी आदरानं बोलायचं नाही असा नाही, ही समज मला तेव्हाही होती. मला त्यांच्याबद्दल अकृत्रिम आदर होता, आहे. नंतर, ['ककल्ड'ला] जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा ते म्हणाले, मराठीमध्ये परत लिहायला लागा! पण, त्या दिवशी ते मला लागूंच्या समोर बोलले होते ते मनात राहिलं माझ्या. शिवाय, सरांचा आणि माझा एके ठिकाणी एक मूलभूत मतभेद आहे.

'ककल्ड'मध्ये जेव्हा मी 'बृहन्नडा' हे पात्र लिहिलं त्याचं श्रेय भागवतांना आहे. महाराजकुमार आणि बृहन्नडा हे एकमेकांच्या विरोधात आहेत प्रतिस्पर्धी. महाराजकुमाराची सावत्र आई कर्मावती आणि तिचा मुलगा विक्रमादित्य या ऐतिहासिक व्यक्ती आहेत. कर्मावती आणि विक्रमादित्य महाराजकुमाराविरुद्ध खेळत असलेल्या डावपेचांमागची बुद्धी बृहन्नडाची आहे. राज्य विक्रमादित्याकडे यावं ह्यासाठी हे चालू आहे. तर बृहन्नडा कर्मावतीशी आणि विक्रमादित्याशी अत्यंत एकनिष्ठ आहे. पुस्तकात असंही कळतं की विक्रमादित्य आणि बृहन्नडाचे लैंगिक संबंधही आहेत. कालांतराने त्याला असं समजतं की बृहन्नडा हा सर्वार्थाने तृतीयपुरुषी (eunuch) नाही. बृहन्नडावर जी काही शस्त्रक्रिया झाली होती ती संपूर्णपणे यशस्वी झाली नव्हती. राजवाड्यातल्याच एका बाईशी त्याचे संबंध आहेत आणि त्याच्यापासून तिला दिवस गेले आहेत. जेव्हा सगळे पुष्करला ब्रह्मदेवाच्या देवळात गेलेले असतात तेव्हा विक्रमादित्य बृहन्नडावर चाकूनं जीवघेणा हल्ला करतो. महाराजकुमाराला हे जेव्हा समजतं तेव्हा तो एका भिल्ल वैदूला बोलावतो शोधतो. उपचारांनीं बृहन्नडा बरा होतो, पण आपल्यावर हा हल्ला कोणी केला हे तो कधीही महाराजकुमाराला सांगत नाही. आता, महाराजकुमार सुज्ञ असतो त्यामुळे तो आरोपांकडे लक्ष देत नाही.

आणि याच ठिकाणी भागवतांचा आणि माझा मतभेद समोर आला. तुमची एकनिष्ठा, बांधिलकी ही एखाद्या परिवाराप्रती असावी की तुमच्या तत्त्वांशी असावी असा तो प्रश्न आहे. उदाहरणार्थ : पितामह भीष्मांची एकनिष्ठा परिवाराप्रती होती. समोर एवढं महाभारत घडत असतानाही भीष्मांची कुटुंबाप्रती असलेली निष्ठा ढळली नाही. मला हा मूलभूत संघर्ष मांडायचा होता. त्यामुळे माझ्या पुस्तकात बृहन्नडाला शेवटी उमजतं की बांधिलकी तत्त्वांशी असावी. असेच, 'बेडटाइम स्टोरी'मध्ये माझ्या महाभारतालासुद्धा खूप फाटे फुटतात.

ऐसी : आपल्या रोजच्या जगण्यापासून ते आसपास घडणाऱ्या राजकीय-सामाजिक घटनांपर्यंतच्या वास्तवाला तुम्ही तुमच्या लेखनात ('रावण अँड एडी', 'ककल्ड' आणि 'बेडटाईम स्टोरी' ) एका वेगळ्या प्रकारे भिडता. मिथकं आणि वास्तव. तुम्ही मिथकांमधून वास्तवाकडे बघता आणि वास्तवातून मिथकांकडे बघता. तर असं करण्यामागे काय प्रेरणा आहे?

नगरकर : खरं तर या प्रश्नासाठी मी 'ऐसी अक्षरे'चा खूप आभारी आहे. मराठीमध्ये माझ्या लेखनाकडे या नजरेतून कोणी पाहिलं नव्हतं. आपल्याकडे मिथकांकडे बघण्याची एक ठराविक साचेबद्ध पद्धत आहे.

याचंही कारण माझ्या जडणघडणीत सापडेल. माझ्याकडे लहानपणापासून फारशी पुस्तकं नव्हती. माझ्या तोळामासा प्रकृतीची चिंता करण्यात, त्याची काळजी वाहण्यात आईवडील मग्न असत. आजी नव्हती. त्यामुळे ही मिथकं लहानपणी आपल्यापर्यंत पोचण्याचे सगळे पारंपरिक मार्ग बंद होते. माझ्याकडच्या मिथककथांचा साठा थोडासाच होता. तीच डोक्यात कुठेतरी शिजत राहिली. वेगवेगळ्या अर्थाचे पदर सुटत गेले.

उदाहरणार्थ, शंकर विषप्राशन करतो हे मिथक बघा. समुद्रमंथनातून विष बाहेर येतं, आणि त्याचं सेवन करायला कोणी तयार नसतं. शेवटी शंकर पुढे येतो आणि विषप्राशन करतो. यावर मी एक निबंध लिहिला होता. त्यात मी म्हटलं होतं की माझ्यासाठी हा शंकर म्हणजे कलाकारासाठीचं रोल मॉडेल आहे. प्रत्येकानं आपल्याला हवं ते करावं. त्यामुळे इतरांविषयी मी बोलणार नाही, पण माझ्याबद्दल सांगायचं तर, लेखकानं काय करायला हवं ह्याबद्दल माझ्यासाठी कुणी हीरो असेल, तर तो हा शंकर. आणि हे म्हणताना, मी अज्ञेयवादी आहे हे विसरू नका.

निबंध लिहिल्यानंतर जवळजवळ वीस वर्षांनी माझ्या डोक्यात विचार आला, की 'शंकर विषप्राशन करतो' या घटनेमुळे मिथकात सुष्ट-दुष्टांची विभागणी होते. त्याआधी सगळे एकमेकांसारखेच होते. सगळ्यांचं लक्ष्य एकच होतं - अमरत्व. हे लक्ष्य तुमच्याआमच्यासारख्या लोकांचंच आहे. पण 'देव आणि दैत्य' हे दोन वेगवेगळे समाजगट मिथकात शंकर विषप्राशन करण्याच्या घटनेआधीच अस्तित्त्वात आहेत! म्हणजे मिथकात 'ते आणि आपण' ('Us' and 'Them' or 'The Other') ही मनुष्यप्राण्याला असलेली मूलभूत प्रेरणा ती कळीची घटना घडण्याआधीपासून आहे. देव दैत्यांना 'ते' समजतात, आणि दैत्य देवांना 'ते' समजतात. हीच तर शोकांतिका आहे. समाजात विविध कारणांमुळे पडलेली फूट आपण पाहतो - त्याच्यामागे ही मूलभूत मानवी प्रेरणा आहे. देव-दैत्यांच्या मिथकानं त्यावर भाष्य केलं आहे. म्हणजे किती चलाख लोकांनी हे मिथक तयार केलं आहे! असंच शूर्पणखेच्या गोष्टीत दिसेल. 'The Other' ही संकल्पना समजून घेण्यासाठीच आपण राक्षस तयार केले. पण आपण ते अजूनही मान्य करायला तयार नाही आहोत. आपल्याला हे आकळून घ्यायचंच नाही आहे. हीच तर शोकांतिका आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, दलित… आपल्याला ज्यांच्यामुळे असुरक्षित वाटतं त्यांना आपण 'दैत्य' करून टाकतो. ह्यातच मिथकांचं समकालीन महत्त्व आहे.

हे मिथक आवडायचं अजून एक कारण म्हणजे यातून शंकराची थोरवी दिसते. मी काही भाविक माणूस नाही - अज्ञेयवादी आहे. तरीही हे मिथक मला मोहिनी घालतं. समुद्रमंथनातून चौदा रत्नं येतात. अमृत आणि हलाहल विष दोन्ही त्यातच येतात. ज्याने कोणी हा प्रसंग रंगवला आहे त्याने दृश्यरचना एकदम नेमकी केली आहे. अमृतकलशाआधी हलाहल विष येतं. लौकरात लौकर हलाहल विषाची काहीतरी विल्हेवाट लावली नाही तर त्या विषाच्या संपर्कात येऊन अमृताचंही विष होऊन अमृत निष्प्रभ होईल. पण इतका वेळ अमृतासाठी कडाकडा भांडणारे देव किंवा दानव यांपैकी कोणीही हलाहल प्राशन करायला पुढे येत नाही. पण शंकर पुढे येतो आणि ते विष पिऊन टाकतो. हा एक बेफाम सीक्वेन्स आहे! त्याचा कंठ निळा होतो. (अर्थात नंतर तो अमृतही पितो, नाहीतर त्याचा देहान्त तिथेच झाला असता. शेवटी तोही अमृतप्राप्ती व्हावी म्हणूनच हे सगळं करत होता!) एका अर्थी त्याने देव आणि दानव दोघांवरही अनंत उपकार केले आहेत. पण शंकराची थोरवी अशी, की पुढे कधीही तो याची वाच्यता करत नाही, बढाई मारत नाही.

तिसरं मला याचा संबंध कलानिर्मितीशी लागतो. म्हणजे शंकराकडे पाहिलं तर त्याने विष आणि अमृत दोहोंचं सेवन केलेलं आहे. आणि शिव निळा का होतो, तर त्यानं ते दोन्ही आत्मसात केलंय. 'ककल्ड'मध्ये एक कविता आहे : तुम्ही अमृत आणि विष दोन्ही प्यायलं नसेल तर तुम्हाला दोन्हींतला फरकच कळणार नाही (“No telling if poison and ambrosia are the same unless you savour them both”). तेव्हा, कुठच्याही कलेकडे वळायचं असेल तर दोन्ही बाजू माहीत हव्यात. तुम्ही कलाकार म्हणून जेव्हा 'ते' आणि 'आपण' चितारता, तेव्हा तुम्हाला दोन्ही पचवायला (assimilate and internalise) लागतं. नाही तर त्याचा हिंदी सिनेमातला उथळसा 'व्हिलन' होईल. तुम्ही आणि मीच व्हिलन असतो! व्हिलनचं चित्रणही प्रामाणिकपणे करायला हवं. म्हणून समुद्रमंथनाचं मिथक मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं.

मिथकं किती प्रभावी असतात हे मला वारंवार जाणवतं. त्याला मी लेखक म्हणून पुरेसा न्याय देऊ शकत नाही असंही वाटतं. किंबहुना समाज म्हणून आपण मिथकांकडे जास्त गंभीरपणे बघायला हवं. आपण गोष्ट म्हणून ऐकतो आणि पुढे सरकतो. विषासारखं मिथकही भिनत जातं. त्याच्याकडे पुन्हापुन्हा जायला हवं.

'ककल्ड'च्या अंतभाषणात ('आफ्टरवर्ड'मध्ये) मी म्हटलं आहे, की मला हे पुस्तक कधी लिहायचंच नव्हतं. कारण मीरा माझी शत्रू! मीरा क्लीशे झालेली आहे. मीरेचं सगळं लक्ष कृष्णाकडे. आणि लिहिताना मला वाटतं की मी ज्या पात्राबद्दल लिहितो आहे त्यानं माझ्याकडे बघावं, त्याचा-माझा संवाद असावा. पण मीरेकडून तसा काहीच प्रतिसाद येईना. पण मी जसाजसा लिहीत गेलो तशीतशी मीरा मला शिकवत गेली. लिहायला सुरुवात करण्याआधी मी काय लिहिणार हे मला माहीतच नव्हतं. मला मीरेबद्दलचा एकच प्रसंग लक्षणीय वाटला होता - महाराजकुमार स्वतःला निळ्या रंगात रंगवून घेतो तो. मनाशी विचार केला - लिहिलं तर हा प्रसंग नक्की लिहीन.

मीरेचं मेवाडचं कुलदैवत 'एकलिंगजी' - म्हणजे चार शिरांचा शंकर. मग हा कृष्ण मधूनच कुठून आला? कादंबरीत 'टेन्शन' निर्माण करण्यासाठी याचा वापर करता येईल का? महाराजकुमाराचं पात्र तोपर्यंत आत्मसात झालं होतं. महाराजकुमाराबद्दल विचार करताना जाणवलं, की श्रीकृष्ण हा तर महाराजकुमाराचा गुरू! श्रीकृष्णाला महाराजकुमाराइतका योग्य शिष्य शोधून सापडला नसता. महाराजकुमारानं हे पूर्णतः आत्मसात केलं होतं, की लढाई करायची नाही! लढाई करायची तर जिंकण्यासाठीच करायची. नाहीतर करायची नाही! शक्य तितके शत्रूसैनिक टिपायचे, आणि आपलं नुकसान कमीतकमी ठेवायचं. हा गीतेतला राजधर्म आहे. पण महाराजकुमाराचं दैवत जेव्हा तुम्ही श्रीकृष्ण ठरवता, तेव्हा संपूर्ण राजपूत धर्मालाच तुम्ही उलटंपालटं करता! राजपुतांचा धर्म काय, तर कारण असो-नसो, लढाई करा. जिंकलात तर ठीक, हरायला लागलात तर बायकांसकट जोहार करा. तर टेन्शन कसं निर्माण होतं, की हा माणूस कृष्णाला आणि गीतेला मानतो, पण ज्या देवाला महाराजकुमार इतका मानतो, त्याच देवाबरोबर त्याच्या बायकोचं लफडं चालू आहे! म्हणून ती तीन वादळी वाक्यं येतात: We were that rarest of couples. Even after years of marriage, we were madly in love. I with her, and she with somebody else. एका अर्थी हा 'ककल्ड'चा सारांश आहे.

पुस्तकात पुन्हापुन्हा कृष्णाचं विश्लेषण येतं. आणि त्यातून एक मुद्दा निघतो : अनेक सामाजिक दबावांखाली दडपल्या गेलेल्या, ग्रासलेल्या भारतीय समाजाला श्रीकृष्णाचं मिथक इतकं जवळचं का वाटतं? सोळा हजार स्त्रियांबरोबर एकाच वेळी अफेअर करणारा हा देव आहे, आणि त्या सोळा हजार स्त्रियांपैकी प्रत्येकीचा स्वतःचा असा वेगळा कृष्ण आहे. याचा अर्थ, भारतीय समाजातली कोणतीही स्त्री मनोमन श्रीकृष्णाबरोबर अफेअर करू शकते. प्रत्येकीला स्वतःचा कृष्ण मिळतो; मग नवरा कसाही असो! ह्याउलट, पुरुषांना या कृष्णाचं आकर्षण वाटण्यामागचं कारण हिरोवर्शीप! हपापलेल्या मनातल्या सुप्त इच्छेची पूर्ती!

क्रमशः

भाग ३ । Storytellers are liars

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

राजपुतांचा धर्म काय, तर कारण असो-नसो, लढाई करा.

हास्यास्पद आकलन. याला नक्की पुरावा काय? नगरकरांची बखर, पान ४२०?

बाकी ते "दि अदर्स" ही संकल्पना तर कुठलाही धर्म अस्तित्वात येण्याअगोदरपासून असतेच. अगदी आदिवासी टोळ्यांमध्येही असते. त्याला शोकांतिका म्हणण्याने नक्की काय साध्य होतं ते कळालं नाही. त्या संकल्पनेची काही रॅमिफिकेशन्स तापदायक आहेत पण तिचे मूळ सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टमध्ये आहे. तेव्हा काटे टोचतात म्हणून गुलाबाचे रोप तोडण्यापैकी हा प्रकार आहे. एकूणच विचारप्रक्रिया रोचक आहे म्हणायची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या प्रतिसादात तुमचा अनुभव, इतिहास-संशोधनातून आकळलेलं ज्ञान आणि सबाल्टर्न स्टडीजबद्दल आपण केलेलं चिंतन स्पष्ट दिसत आहेच. तरीही माझ्या अल्पमतीला समजलेल्या दोन गोष्टी मांडू इच्छिते.

नगरकर म्हणतात -

'The Other' ही संकल्पना समजून घेण्यासाठीच आपण राक्षस तयार केले. पण आपण ते अजूनही मान्य करायला तयार नाही आहोत. आपल्याला हे आकळून घ्यायचंच नाही आहे. हीच तर शोकांतिका आहे.

संकल्पना समजून घेण्यासाठी काही मिथकं रचणं (याच मिथकांबद्दल नगरकरांना आपुलकी असल्याचं त्यांच्या बोलण्यातून दिसत राहतं) आणि तरीही संकल्पनेचं आकलन पूर्ण नसणं या दोन्हींमध्ये फरक आहे. आकलन पूर्णतया करून घेत नाही, किंबहुना आकलन करून घेण्याचा विचारही नाही, याला नगरकर शोकांतिका म्हणतात. (आकलन करून न घेण्याच्या वृत्तीबद्दल इथे आणखी काही बोलण्याची गरजच दिसत नाही. पुन्हा एकदा 'अनुभूती' हा शब्द वापरावा लागेल, नकारात्मक संदर्भात!)

उत्क्रांती हे वर्णन आहे, फतवा नव्हे; description आहे, prescription नाही. उत्क्रांतीला फतवा किंवा prescription मानून लोक त्यानुसार आचरण करतात, आपल्या instinctsच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाहीत याला नगरकर शोकांतिका म्हणत आहेत.

बाकी 'धर्म' या शब्दाचा नगरकरांनी काय अर्थानं वापर केला आहे, याबद्दलही चिंतन करणं इष्ट.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जी प्रेरणा आजवर उपयोगी ठरली त्याप्रमाणेच समाज वागणार. हे शोकांतिका वगैरे कढ काढण्याचे काम साहित्यिकांचे, आणि त्यांनी ते चोखपणे केलेलेच आहे. ते जर बिनकामी ओव्हर द टॉप वाटत असेल तर सांगणे अवश्य वाटते म्हणून सांगितले. ओकॅम्स रेझर जिंदाबाद.

बाकी धर्म म्हणजे वे ऑफ लाईफ ही व्याख्या घेऊनही "कारण असो वा नसो" हे शेपूट पूर्णत: रिगरचा अभाव दर्शवतं. त्यातनं नगरकरांचं आकलन उघडं पडलंय हे स्पष्ट आहे. त्यामुळे

या प्रतिसादात तुमचा अनुभव, इतिहास-संशोधनातून आकळलेलं ज्ञान आणि सबाल्टर्न स्टडीजबद्दल आपण केलेलं चिंतन स्पष्ट दिसत आहेच.

ह्या वाक्यातून "करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे" याचे उत्तम प्रत्यंतर आले. तेव्हा त्याशी अजून एकनिष्ठ रहा आणि मनोरंजन करा, यावेगळे काय सांगणे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मात्र भारतीय परंपरेबद्दल उदयन वाजपेयी म्हणतात की आपली परंपरा तर या उत्क्रांतीच्या रेट्याच्या पुढे गेली. त्यांचेच (भाषांतरित) शब्द -

भारतात एक विशेष गोष्ट आहे की आपण प्रतिमांना वास्तवापेक्षा अधिक वास्तविक मानतो. उदाहरणार्थ, विभाव हा शब्द तुम्हाला माहीत असेलच. नाट्यशास्त्रात रसनिष्पत्तीसाठी विभाव महत्त्वाचा समजला जातो. विभावाची परिभाषा काय आहे? विभाव काय आहे? ही एक खास प्रकारची गोष्ट आहे, म्हणजे विशेष प्रकारचा भाव, विशेष प्रकारचं अस्तित्व आहे. जेव्हा एखादी गोष्ट किंवा पात्र नसतानाही ते असतं, तेव्हा असतो तो विभाव. म्हणजे कृष्ण, राम, अॅना करेनिना हे सगळे लोक झालेले नसूनही आहेत. ते आपल्या रोजच्या आयुष्याचा हिस्सा आहेत. आपल्याकडे विभावालाच भाव समजण्याची प्रवृत्ती आहे. म्हणजे, जो राम झालेला नसूनही आहे, तो विभाव आहे. तरीही आपण आपले त्यांची जन्मभूमी निश्चित करण्याच्या प्रयत्नात असतो. रामाची जन्मभूमी निश्चित होताच, म्हणजे त्या क्षणीच, विभाव भावात परिवर्तित होईल. मग त्यामागे संस्कृतीची जी कल्पना आहे, ती संपून जाईल.

.
.
.

आपल्या आधुनिक शिक्षणानं आपल्याला पारंपरिक व्याख्येनुसार अशिक्षित केलेलं आहे. आपण अशिक्षित असल्यामुळे होतं काय, तर त्यात जे सूचित केलेलं आहे, ते आपल्याला समजत नाही. एवढी साधी गोष्ट मला कळली ह्याचा मी एवढा गाजावाजा करतोय त्याचं कारणच हे आहे, की मी अशिक्षित आहे!

वाजपेयींचं भाषण, जेवढा विचार करत जात्ये तेवढं आवडत जातंय. काय थोर माणूस आहे हा!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राम नामक दैवी राजा खराच झाला होता यावर लाखोंची श्रद्धा आजही आहे. त्यामुळे त्याची जन्मभूमी जर निश्चित झाली तर त्याबद्दलचा भक्तिभाव संपेल हेच मुळात महाविनोदी आहे. बेसिकमध्येच लोच्या असला की अशा शोकांतिका तयार होतात.

उदा. भांडारकर इन्स्टिट्यूटने महाभारताची एक "क्रिटिकल" एडिशन तयार केली म्हणून त्यात नसलेल्या परंतु अन्य आवृत्त्यांमधल्या सर्व कथांबद्दलचे प्रेम आटले का? माझे स्मरण बरोबर असेल तर द्रौपदीवस्त्रहरणाचा अतिप्रसिद्ध प्रसंग भांडारकर आवृत्तीत नाही. त्यामुळे लोकांनी तो प्रसंग त्यांच्या इमॅजिनेशनमधून कटाप केला का? याचे उत्तर द्या मग पाहू काय आहे अन काय नाही ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

राम नामक दैवी राजा खराच झाला होता यावर लाखोंची श्रद्धा आजही आहे. त्यामुळे त्याची जन्मभूमी जर निश्चित झाली तर त्याबद्दलचा भक्तिभाव संपेल हेच मुळात महाविनोदी आहे. बेसिकमध्येच लोच्या असला की अशा शोकांतिका तयार होतात.

त्यामुळे लोकांनी तो प्रसंग त्यांच्या इमॅजिनेशनमधून कटाप केला का?

वाजपेयींचा विभावाचा मुद्दा समजलेला नाही, एवढंच म्हणतो आणि खाली बसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रतिमांना अधिक वास्तविक मानतो हेच मुळात वेस्टर्नाईझ्ड चष्म्यातलं आकलन आहे. सर्वसामान्यासाठी ते सत्यच असतं. थिअऱ्यांचा चष्मा उतरवून विचार केला तर कळेलही पण ते अब्रह्मण्यम आहे हे माहितीये. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रतिमांना अधिक वास्तविक मानतो हेच मुळात वेस्टर्नाईझ्ड चष्म्यातलं आकलन आहे. सर्वसामान्यासाठी ते सत्यच असतं.

प्रतिमांना अधिक वास्तविक मानतो == सर्वसामान्यासाठी ते सत्यच असतं.
तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय?

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

मला नेमकं असं म्हणायचंय की सर्वसामान्य माणसाला त्या गोष्टी प्रतिमा आहेत हेच मान्य नसतं. त्याच्या लेखी त्या सत्यच असतात. "हे खरेतर आभासी आहे तरी आम्ही मानतो" वगैरे कोणी म्हणत नाही. "हे खरे आहे किंवा होते असे आमचे मत आहे" असे म्हणतात.

तुमच्या इक्वेशनमधील दोन्ही बाजूंच्या धारणांचे धारक वेगवेगळे आहेत. एल एच एस हे विचारवंताचं आकलन आहे. तितकाच मुद्दा आहे. तोही लोकांना झेपत नाही म्हणजे हाईट झाली.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सर्वसामान्य माणसाला त्या गोष्टी प्रतिमा आहेत हेच मान्य नसतं. त्याच्या लेखी त्या सत्यच असतात.

हेच वाजपेयी म्हणत आहेत, तर मग?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भारतात एक विशेष गोष्ट आहे की आपण प्रतिमांना वास्तवापेक्षा अधिक वास्तविक मानतो. उदाहरणार्थ, विभाव हा शब्द तुम्हाला माहीत असेलच. नाट्यशास्त्रात रसनिष्पत्तीसाठी विभाव महत्त्वाचा समजला जातो. विभावाची परिभाषा काय आहे? विभाव काय आहे? ही एक खास प्रकारची गोष्ट आहे, म्हणजे विशेष प्रकारचा भाव, विशेष प्रकारचं अस्तित्व आहे. जेव्हा एखादी गोष्ट किंवा पात्र नसतानाही ते असतं, तेव्हा असतो तो विभाव. म्हणजे कृष्ण, राम, अॅना करेनिना हे सगळे लोक झालेले नसूनही आहेत. ते आपल्या रोजच्या आयुष्याचा हिस्सा आहेत. आपल्याकडे विभावालाच भाव समजण्याची प्रवृत्ती आहे. म्हणजे, जो राम झालेला नसूनही आहे, तो विभाव आहे. तरीही आपण आपले त्यांची जन्मभूमी निश्चित करण्याच्या प्रयत्नात असतो. रामाची जन्मभूमी निश्चित होताच, म्हणजे त्या क्षणीच, विभाव भावात परिवर्तित होईल. मग त्यामागे संस्कृतीची जी कल्पना आहे, ती संपून जाईल.

"झालेले नसूनही आहेत" हा काय प्रकार आहे नक्की मग? सर्वसामान्यांची मान्यता की त्याबद्दलचं वाजपेयींचं आकलन? सर्वसामान्य कधी "झालेले नसूनही आहेत" असे म्हणत नाहीत, तेव्हा हे वाजपेयींचं आकलन आहे हे तर उघडच आहे.

आणि या आकलनाचा निष्कर्ष जे खालील वाक्य:

रामाची जन्मभूमी निश्चित होताच, म्हणजे त्या क्षणीच, विभाव भावात परिवर्तित होईल. मग त्यामागे संस्कृतीची जी कल्पना आहे, ती संपून जाईल.

ते तर महाविनोदी आहे. लोकांच्या मनातला भावच कळाला नाही हे स्पष्टच आहे. अनेकांच्या मते रामजन्मभूमीच्याच जागेवर बाबराने मशीद बांधली. हे कैकांच्या लेखी सत्य आहे. रामाची भक्ती करताना लोकांच्या मनात हे असतेच की तो अयोध्येत जन्माला आला वगैरे वगैरे. त्यांच्या मनात ऑलरेडी ती जागा निश्चित आहे. ती जर अधिकृतपणे निश्चित झाली तर भक्तिभाव संपेल असे मानणे म्हणजे लोकमानस काय आहे हे समजलेच नसल्याचे लक्षण आहे. याला या थिअरीखेरीज कसलाच आधार नाही.

अशा अनेक जागा आहेत जिथे घडलेले प्रसंग फक्त त्याच ठिकाणी झाले असे म्हणतात, उदा. कुरुक्षेत्र, द्वारका, मथुरा, अयोध्या, लंका, कैलास पर्वत वगैरे. जर उद्या कसलेतरी संशोधन होऊन त्याने जर त्यावर शिक्कामोर्तब वगैरे झाले तर लोक फक्त एवढेच म्हणतील की बघा, आम्ही अगोदरपासून जे सांगत होतो ते तुम्ही आत्ता मान्य केलंत. त्याचा भक्तिभावावर प्रतिकूल परिणाम होईल वगैरे सब झूठ आहे कारण ऑलरेडी काउंटरएग्झांपल्स आर अप्लेंटी. सर्वसामान्यांना या संशोधनामुळे काहीही फरक पडणार नाही. भक्तिभावाची संगती वगैरे लावत बसणारे फक्त गोंधळतील की आपल्या थेरीप्रमाणे लोक का वागत नाहीत म्हणून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"झालेले नसूनही आहेत" हा काय प्रकार आहे नक्की मग?

नाट्यशास्त्राचा ह्याला संदर्भ आहे. आणि 'लोकांना काय आणि का भावतं?' हे उलगडण्यात नाट्यशास्त्राला रस आहे. आणखी टंकायचा कंटाळा आला. जाऊ देत. कधी तरी प्रत्यक्ष भेटीत वगैरे बोलू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणजे शेवटी सामान्य लोकांची धारणा फाट्यावरच मारली. वाटलंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'लोकांना काय आणि का भावतं?' हे उलगडण्यात नाट्यशास्त्राला रस आहे.

त्यामुळे असं -

नाट्यशास्त्र वगैरे म्हणजे शेवटी सामान्य लोकांची धारणा फाट्यावरच मारली.

नसून सामान्य लोकांना काय आणि का आवडतं, हा नाट्यशास्त्राचा आस्थाविषयच आहे. तिथे भरतमुनींना काही तरी मूलभूत गवसलं होतं. त्यामुळे भारतीय लोककलांपासून हिंदी सिनेमापर्यंतच्या लोकप्रिय कलाकृतींची भारतीय जनमानसाशी काहीएक संगती लावणं शक्य होतं. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

संगती लावा काय पाहिजे ती, पण मग असे निष्कर्ष म्हणजे उदाहरणार्थ आवरा आहेत. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किंवा राहुल पुंगलिया ज्याला वैज्ञानिक गर्व म्हणत आहेत, तो दिसत आहे. (लेखाचा दुवा)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि अशा तऱ्हेनं, नगरकरांचं साहित्य वाचणं आलं. हीच का तुमची दिवाळी!

नगरकर किती मस्त 'पिकले' आहेत. वय वाढावं तर असं. बाकी सगळं आकलन, मतं, साहित्य, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्यावरही, हा माणूस किती शांत, समंजस आणि समाधानी आहे, हे जाणवत राहतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुलाखतीतुन जाणवणारे सतत् आत्मपरीक्षण करणारे प्रांजळ नगरकर
माझ्यातही हा खोटेपणा नक्कीच असणार. त्याच्याशी लढायचा मी प्रयत्न करतो आणि माझ्यात ती सचोटी आणण्याचा मी माझ्यापरीनं प्रयत्न करतो.

भारतीयांना हे पटणार नाही, पण कृष्णवर्णीयांबद्दलही आपली वृत्ती अत्यंत नालायकपणाची आहे. किरण नगरकरांचा त्यात सहभाग नाही असं नाही, पण किरण नगरकरांना त्याची जाणीव आहे; त्यामुळे मी त्या वृत्तीशी सतत झगडत असतो.

गुरु शिष्य परंपरें सदर्भातील नगरकरांचे हे विधान किती सत्य आहे

आपली गुरू-शिष्य परंपरा काय तर गुरूनं मागावं आणि एकलव्यानं मानावं. म्हणजे आपण (सवर्ण) किती हुशार, चलाख आणि घाणेरडे लोक आहोत! आपल्याला ह्याच परंपरेचं दैवतीकरण करायचं आहे!

याचा साधा पुरावा म्हणजे आजच्या अगदी आजच्या घडिला ही सर्वात महत्व्याचा तोही स्पोर्ट मधीलच पुरस्कार्
द्रोणाचार्य अवॉर्ड हा गुरु या नावालाच काळिमा असलेल्या द्रोणाचार्याच्या नावाने दिला जातो
https://en.wikipedia.org/wiki/Dronacharya_Award
शिवाय अर्जुन अवॉर्ड ही आहेच्
https://en.wikipedia.org/wiki/Arjuna_Award

मग नगरकर जे म्हणतात्
आपल्याला ह्याच परंपरेच दैवतीकरण करायच आहे
हे दैवतीकरण करण्याच काम किती चलाखपणे कुशलतेने शांतपणाने सातत्याने चालु आहे अगदी आजपर्यंत
आणि एकाच्याही मनात हा प्रश्न उद्भभवत नाही कि किमान ज्या व्यक्तीच्या पात्राच्या प्रतिकाच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो
ती त्या ला लायक साजेशी आहे की नाही ? प्रतिक जरी मान्य केलं तरी ते प्रतिकं ही योग्य आहे का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

किरण नगरकरांच्या स्वत:च्या वाचनाचा युट्युब वरील् दुवा
https://www.youtube.com/watch?v=GqKct_lT6tA

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

नगरकर, तुम्ही या रचना लिहिल्या आणि त्यावर उघडपणे भाष्य मुलाखतीतून प्रांजळपणे व्यक्त केलंत. तुम्ही मिथकांमधून वास्तवाकडे बघता आणि वास्तवातून मिथकांकडे बघता.यावर साहित्यकृतीतून विचार सूचित करत जाणे ही कला आहे. कलाविष्कारावर टीका करणे वेगळे आणि वेगळी कलाच सादर करणे वेगळे. तुमचे प्रयोग धाडसी आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब्रिटिश आपल्याकडे व्यापारासाठी आले. हळुहळू त्यांची सत्ता वाढत गेली. व्हिक्टोरिया राणीनं या राजेरजवाड्यांच्या शेरवानीवर एक बिल्ला मारला की हे लोक खुश. १८५७नंतर ह्या लोकांनी असा विचार केला नाही की आता आपण एकत्र येऊन ब्रिटिशांना बाहेर काढलेलं बरं. ही आत्मजाणीव आपल्याला तेव्हा झालेली नव्हती, आजही नाही. आजच्या विरोधी पक्षांनाही ही समज नाही की आपण वेगळेपणा सोडून एकत्र आलं पाहिजे. १८५७ साली जे झालं, ते पुन्हा घडतंय. हे कसले महाराजे!

हि तुलना कै च्या कै आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

मला त्यातून लागलेला अर्थ असा -

सत्तेवर कोणी का असेना, विरोधकांचीही, विरोधी पक्षांचीही, काही जबाबदारी असते. १८५७चे मूठभर वगळता, विरोधक कर्तव्यच्युत झाले आहेत. त्यांच्याकडे नैतिक अधिष्ठान नाही. आणीबाणीनंतर नव्हतं आणि आजही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि अडाण्यासारखी काहीही तुलना केली तरी टाळ्या वाजवणारी प्रजाही आहेच. मजाच एकूण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं