'द वॉंटिंग सीड' - लेखक : अँथनी बर्जेस

संकल्पना

'द वॉंटिंग सीड' - लेखक : अँथनी बर्जेस

- नंदा खरे

चौथ्या-पाचव्या शतकातला वाद

एक समाज उदार धोरणांनी चालवला जाणारा. शासन-व्यवस्था मानते की माणसं मुळात दुष्ट, पापी नसतात. आपली वाट निवडू शकतात. जरा शिक्षणानं, मार्गदर्शनानं शहाणपण, एकोपा, सहकार्य, यांतलं सामर्थ्य त्यांना कळतं. थोडे निघतात नाठाळ, पण सौम्य पोलीसगिरीनं, या दंडव्यवस्थेनं वाटेवर आणता येतं. समाजधुरीण नियोजनावर, सामाजिक एंजिनीयरिंगवर भर देतात. आपल्या कृती सर्वांना समजावून देत राहतात. हे पुरेसं आहे यावर धुरीणांचा विश्वास आहे.

वेगळ्या विचारांचे शासक-प्रशासक वेगळे समाज घडवतात. ते मानतात की देवानं हे विश्व कसं चालेल ते ठरवून दिलं आहे; नियत केलं आहे. माणसं या नियतीला आव्हान देतात, जे मूळ पाप आहे. नियोजन वगैरे झूट आहे, पापी आहे; कारण ते नियतीत फेरबदल करू धजतं. देव-धर्म नेहमीच सामाजिक यंत्रणांच्या वरचे असतात. आता देवानंच माणसामाणसांत फरक केले आहेत, तेव्हा सहकार्य, एकोपा वगैरेंचं कौतुक नको. ईशकृपेची आस धरावी. ठेविले अनंते तैसेचि राहावे. चित्ती असो द्यावे समाधान. हाच सन्मार्ग आहे.

इसवीसनाच्या चौथ्या-पाचव्या शतकांत या दोन दृष्टिकोनांमध्ये घमासान भांडणं उभी जाहली. आदम-हौव्वांनी ज्ञानवृक्षाचं फळ खाणं हे मूळ पाप, original sin पुढच्या माणसांनाही चिकटतं की नाही? ईशकृपा, divine grace या संकल्पनेवर कितपत अवलंबून राहायचं? माणसांना ईहा-स्वातंत्र्य, free will असते, की जग कठोर नियतिवादानं, determinismनंच समजून घेता येतं? आजही ख्रिश्चन, ख्रिश्चनेतर लोकांना पडणारे, छळणारे हे प्रश्न. पेलॅजियस (Pelagius, इ. स. ३६०-४१६) हा उदारपंथाचा समर्थक आणि ऑगस्टाईन ऑफ हिपो (Augustine of Hippo, इ. स. ३५४-४३०) हा मूल पाप-ईशकृपा मानणारा. वाद वाढून विकोपाला गेला. ऑगस्टाईननं पोपच्या मागे तगादा लावला की पेलॅजियसला पाखंडी, धर्मद्रोही, heretic घोषित केलं जावं. पोप काही बधेना. पण त्यानं ऑगस्टाईनला संतपद देण्याची, बीअॅटिफिकेशनची (beatification) प्रक्रिया सुरू केली. लवकरच तो संत ऑगस्टाईन झाला, तर पेलॅजियस बीअॅटिफाय न होता साधा संन्यासी, monk राहिला; ख्रिस्ती धर्माच्या सांदीकोपऱ्यांतला.

बराच काळ गेला. पेलॅजियसच्या काही कल्पना मानणारा प्रॉटेस्टंट पंथ घडला आणि बहरला. सामाजिक, राजकीय, अर्थविषयक विचार धर्मापासून सुटे होत गेले. अठराव्या शतकातल्या औद्योगिक क्रांतीनं सारी समीकरणंच बदलली. चौथ्या-पाचव्या शतकांत अकल्पनीय असलेली लोकशाही ही अर्थराजकीय व्यवस्था घडली. पेलॉजियस-ऑगस्टाईन वाद मात्र नवनव्या संदर्भांसह टिकून राहिला.

मळसूत्री 'चक्रनेमिक्रम'
अँथनी बर्जेसच्या (Anthony Burgess, 1917-1993) 'द वाँटिंग सीड' (The Wanting Seed, Heine mann, 1962) या कादंबरीत पार्श्र्वभूमीला ऑगस्टाईन-पेलॅजियस वाद आहे.

स्थळ आहे इंग्लंड, काळ आहे 'भविष्यातला'. माणसांची संख्या प्रचंड झालेली आहे. चाळीस आणि जास्त मजल्यांच्या इमारतींमध्ये सगळी घरं, कार्यालयं, शाळा, इस्पितळं रिचवलेली आहेत. तरीही महानगरं वाढताहेत. लंडनला जायची गरज नाही, कारण टिपकागदावर शाईचा डाग पसरावा तसं लंडनच तुमच्याकडे येतं आहे! मध्यवर्ती पात्र आहे ट्रिस्ट्रॅम फॉक्स (Tristram Foxe), ज्याला आपण यापुढे 'ट्रिस' म्हणू. तो इतिहासाचा शिक्षक आहे, हायस्कूलातला. विद्यार्थ्यांना तो सांगतो, पेलॅजियन विचार प्रबळ असतात. तेव्हा समाज 'पेलफेज' (Pelphase) या स्थितीत असतो. पण लवकरच त्या स्थितीतून समाज ऑगस्टाईनच्या विचारांच्या 'गसफेज'मध्ये (Gusphase) जातो. मध्ये एक अनागोंदीची 'इंटरफेज' (Interphase) येते. पुन्हा संक्रमणावस्थेच्या इंटरफेजमधून समाज पेलफेजमध्ये जातो. हे चक्र वारंवार फिरत राहते. दर आवर्तनासोबत समाज जरा जरा बदलत जातो.

(इथे मला जरा अडचण जाते. ट्रिस आणि त्याच्या तोंडून बोलणारा बर्जेस, हे या क्रियेसाठी 'स्पायरल' (spiral) हा शब्द वापरतात. केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाची 'स्टूडण्ट्स मॉडर्न डिक्शनरी' 'स्पायरल'च्या अर्थासाठी 'शंकुसदृश, नागमोडी, मळसूत्राकार, नागमोड, सर्पिल, सर्पचक्र' हे शब्द देते. मला यांपैकी 'सर्पचक्र' वगळता सर्व शब्द ठार चुकीचे वाटतात! 'मराठी विश्वकोश, खंड १८, परिभाषा संग्रह' हा शब्दच देत नाही! पण helix, हेलिक्स या शब्दासाठी ढवळे शब्दकोश 'spiral' हा इंग्रजी आणि 'पेच' हा मराठी शब्द देतो. विश्वकोश मात्र 'मळसूत्र, मळसूत्री चक्र, सर्पिल' हे शब्द देतो. एखादा बिंदू दोन मितींमध्ये चक्राकार फिरतानाच तिसऱ्या मितीत जरा जरा वर किंवा खाली जाणं, याला इंग्रजीत 'helical' आणि मराठीत 'मळसूत्री', हेच शब्द नेमके ठरतात. स्पायरल, सर्पिल, शंकूसदृश, नागमोडी, यांपैकी एकही शब्द योग्य नाही. नाग-साप वेटोळं घालून बसतात तो आकार 'स्पायरल', आणि ते चालतात ती वाट नागमोडी, हे दोन्ही अर्थ इथे लागू पडत नाहीत. या संदर्भात एक किस्सा सांगतो. भाषाशास्त्री अशोक केळकरांना मी असल्याच एका भौमितीय इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द विचारला. त्यांनी प्रतिशब्द सांगितला आणि पुढे म्हणाले, "पण तुला हे का माहीत नाही ते कळलं का? कारण आहे की मराठी संभाषितात, discourse मध्ये ती संकल्पनाच वापरली जात नाही!" तर आपण बर्जेसचे वरचा सगळा 'बाल की खाल' प्रकार मांडू दिल्याबद्दल आभार मानून पुढे जाऊ!)

गोष्ट-पेलफेज

बर्जेस हा विसाव्या शतकातला मोठा इंग्लिश लेखक, आणि सोबत संगीतकारही. त्याची 'क्लॉकवर्क ऑरेंज' ही कादंबरी एक वेगळी भाषा घडवते. तिच्यावर आधारित चित्रपटही बराच गाजला. ती कादंबरी आणि 'द वाँटिंग सीड' दोन्ही १९६२ सालीच प्रकाशित झाल्या. 'द वाँटिंग सीड'ची गोष्ट अशी :

ट्रिस आणि त्याची पत्नी बिअॅट्रिस-जोअॅना (Beatrice-Joanna, यापुढे बी-जे) यांचं मूल नुकतंच वारलं आहे. अपार लोकसंख्येच्या काळात अशा मृत्यूंकडे, ''चला, या निमित्तानं जमिनीत नव्यानं फॉस्फरस जाईल'', अशा निर्घृण तऱ्हेनं पाहिलं जातं. सरकार 'समाचार' उर्फ condolence नगद पैशांत चुकता करते! लोकसंख्येच्या दबावामुळे समलिंगी व्यवहारांना समाजमान्यता, राजमान्यता आहे. उत्तेजनही आहे. काही जण तर स्वतःला खच्ची करून (castrate) घेऊन 'कॅस्ट्रो' या माननीय पदाला पोचतात (१९६२ हा इंग्लंड-अमेरिकेला फिदेल कास्त्रो पोटशूळ देत असतानाचा काळ आहे!) ट्रिसचा सख्खा भाऊ डेरेक समलिंगी आहे, आणि 'अप्रजनन-क्षमता' खात्यात (Ministry of Infertility) उच्चपदावर आहे. ट्रिस शाळेत पदोन्नतीची वाट पाहतो आहे. ती बढती दुसऱ्याला जाते, एका समलिंगी माणसाला; कारण ट्रिस अनेक भावंडांपैकी एक आहे, बहुप्रसवतेची 'आभा' असलेला.

डेरेक खरा पूर्णपणे समलिंगी नाही. तो बी-जेशी लफडंही करतो आहे! तर मूल गमावलेली बी-जे एका दिवशी प्रियकर डेरेक आणि खिन्न, 'अॅल्क'वर तर्र झालेला ट्रिस अशा दोघांशीही रत होते. लवकरच तिला सकाळी उलट्या होऊ लागतात, आणि तोवर ट्रिस डेरेकविषयीच्या मत्सरानं ग्रस्त होतो. संतुलन घालवून तो एका त्याच्याशी असंबद्ध मोर्चात ओढला जातो, आणि तुरुंगात जातो.

गोष्ट-संक्रमणावस्था

तेव्हा जग दोन महासंघांमध्ये विभागलेलं असतं; एन्स्पन (Enspun. इंग्लिश स्पीकिंग यूनियन) आणि रुस्पन (Ruspun. रशियन स्पीकिंग यूनियन). पण या संघांमध्ये तुरळक सीमावर्ती चकमकी वगळता शत्रुत्व असं नसतं. एकूणच एकोप्यानं, सहकार्यानं वागताना फार हिंस्र होता येत नाही माणसांना.

पण एवढ्या प्रचंड संख्येच्या माणसांना अन्न पुरवणं अवघड होत असतं. मांसाहारावर तर बंदीच असते, पण वनस्पतीही टिकवणं-साठवण-वितरणाच्या सोयीसाठी पुनर्रचित (reconstituted) रूपातच विकल्या जात असतात. याचा परिपाक म्हणजे एक गोळी, 'नट' (nutritional unit) नावाची! पण परिसर या एकांगी वाढीने जायबंदी होत असतात. वेगवेगळ्या पिकांवर रोग येत असतात. माणूस बहरतो आहे, पण इतर निसर्ग मात्र 'मोहोर सगळा गळुनि जातसे। कीड पिकांवर सर्वत्र दिसे॥' अवस्थेत असतो.

आपलं गरोदर असणं लवकरच दिसू लागेल; डेरेक जबाबदारी घेणार नाही, आणि ट्रिस हरवलेला आहे. बी-जे आपल्या बहिणीच्या शेतकरी कुटुंबात जायचं ठरवते. बहीण, तिचा नवरा शॉनी, दोन मुलं, हे शेती अडखळल्यानं त्रस्त असे एका डुकरिणीच्या नियमित पिल्ले देण्यावर जगत असतात. बहीण आणि तिच्यापेक्षाही शॉनी बी-जेला आश्रय देतात. ती भरल्या दिवसांची असताना डुकरीण मात्र जंत होऊन आजारी पडते. शॉनीची मुलं तिला कोंबड्यांची अंडी खाऊ घालतात, आणि ती चक्क सुधारते. शॉनी उत्साहानं मेहुणीचं बाळंतपण करतो; दोन जुळे मुलगे होतात! नावं अर्थातच डेरेक आणि ट्रिस्ट्रॅम अशी ठेवली जातात. बाहेरच्या जगानं मात्र एक क्रूर वळण घेतलेलं असतं. अन्नाचा तुटवडा अत्यंत तीव्र झाल्यानं लोक नरमांसभक्षक होऊ लागतात. अपघातानं मेलेली, भांडणांमध्ये मेलेली, भांडणं काढून मारलेली माणसं रस्तोरस्ती जाहीररीत्या भाजून खाल्ली जाऊ लागतात. अशातच ट्रिस तुरुंग फोडून बाहेर पडतो, आणि बी-जेच्या शोधात तिच्या बहिणीच्या घराकडे जायला लागतो. डेरेक बी-जेच्या हालचाली जाणून असतो, आणि तो पोलीस पाठवून तिला आणि नव्या बाळांना 'मागवून' घेतो. एक उपपरिणाम म्हणजे बहिणीचं घर उद्ध्वस्त होतं!

ट्रिसला जाणवतं की पेलफेज संपून संक्रमणावस्था सुरू झाली आहे. ख्रिस्ती धर्मात प्रतीकात्मक रूपात येशूचं रक्त-मांस खाण्याचे विधी आहेतच. आता थेट नरमांसभक्षणातून धर्म नव्यानं फोफावू लागतो. ट्रिसला एकटा शॉनीच भेटतो, आणि स्वतःच्या कुटुंबाची वाताहत, बीजे-जुळ्यांना पळवणं वगैरे घटना सांगतो.

सुन्न झालेला ट्रिस काहीसा अनवधानानं फसवला जाऊन सैन्यात जबरीनं भरती (conscript) केला जातो. रूस्पन संघाचा एक तुकडा चिन्स्पन (चायनीज स्पीकिंग यूनियन) नावानं फुटून निघतो. जग पुन्हा अनेक देशांत विभागलं जाणारसं दिसू लागतं. पण कोणालाच 'स्वदेशासाठी लढण्याचा' अनुभव नसतो. ट्रिससोबतचं सैन्य 'शत्रू'शी लढायला पाठवलं जातं. डबाबंद रेशनवरच्या चिनी खुणा आत मानवी मांस आहे असं सांगत असतात. ट्रिसची एक बहीण चीनमध्ये असल्यानं त्याला डब्यावरचा लेबलचा अर्थ कळतो.

युद्धभूमीभोवती काटेरी तारांचं कुंपण असतं. मध्ये दोन खंदकांमधून 'आपण' आणि 'ते' लढत असतात. तंत्र असं की ठरावीक वेळी दोन्हीकडून 'हल्लाबोल' करायचं, आणि मग युद्ध चालवणारे येऊन मेलेल्या सैन्याचा 'प्रथिनसाठा' पुढच्या प्रक्रियेसाठी घेऊन जाणार. ट्रिस मेल्याचं सोंग करतो, कोणाला सुचणार नाही अशा दिशेनं शत्रूकडे पळत जातो, 'सफाई कामगारा'ला मारून त्याचे कपडे चोरतो, आणि पुढे आयर्लंडमधल्या रणभूमीपासून निघून लंडनला पोचतो.

गोष्ट-गसफेज

ट्रिसला कळतं की बी-जे आणि मुलं डेरेकच्या आश्रयाला गेली आहेत. तो तिथे जाऊन बी-जेला सामोरं जायचं ठरवतो. पण तेव्हा बी-जे आयुष्याचे अर्थ शोधत सागरतीरावर फिरायला गेलेली असते. डेरेक नव्या 'प्रजनन मंत्रालयात' उच्चाधिकारी असतो. गुंता न सुटताच बर्जेस कादंबरी संपवतो.

वाँटन-वाँटिंग

कादंबरीचं नाव बर्जेसनं एका लोकगीताच्या ध्रुपदावरून 'द वाँटन सीड' वरून घेतलं आहे. वाँटन (wanton) म्हणजे खेळकर, बागडणारा, विलासी, स्वच्छंदी, आनंदी, रंगेल, व्यसनी, कामी (कामोत्सुक), निर्हेतुक.. हुश्श! सगळी विशेषणं उदारमताच्या पेलफेजमध्ये शासक वर्गाला नावडती! हो! पेलॅजियसचा उदारमतवाद माणसांकडून फार अपेक्षा ठेवतो. त्यांनी 'नीट' वागावं. ठरीव मर्यादांमध्येच 'खेळकर'पासून 'कामी'पर्यंतचा अर्थपट स्वीकारावा. 'निर्हेतुक'तर कधी होऊच नये!

बरं, हा उदारमतवाद धड समतावादीही नाही! बी-जेला पुत्रशोकाच्या वेळी सल्ला दिला जातो की ''झालं ना आता एक मूल? मग आता ते प्रजनन 'खालच्या' लोकांवर सोड!'' बर्जेसनं wanton चं wanting केलं. त्याचं 'बीज' जरा 'उणं' आहे, 'कमी पडणारं' आहे. ते बियाणं, बेणं अमर्याद अंकुरू दिलं तर आपत्ती ओढवते. तेव्हा स्वेच्छेनं बेणं मर्यादित करा, नाहीतर ईशकृपेवर भरवसा ठेवा! तर बर्जेस उदारमताचा कर्मठपणा, कर्मठ धार्मिकतेतलं स्वातंत्र्य आणि स्वच्छंदीपणा, अशा भलभलत्या छटा उकलून दाखवतो आहे. प्रकाशन होण्याच्या गहन शीतयुद्धकाळात पुस्तक यशस्वी होणं अवघडच होतं.

त्यातनं इंग्लंड-अमेरिका तसेही 'ते प्रजनन वगैरे' खालच्या लोकांवर, 'तिसऱ्या' जगावर सोडून होते. बर्जेसचं लंडन बहुवंशीय, मिश्रवंशीय आहे. ते तसं होत आहे, हे बर्जेसनं सांगणं आज लोकांना पटेलही (इथे 'पटेल'वर श्र्लेष नाही!) पण पन्नासेक वर्षांपूर्वी ते लोकांना आवडणं शक्य नव्हतं.

आणि वर त्याच वेळी प्रकाशित झालेल्या 'क्लॉकवर्क ऑरेंज' वर चित्रपट निघाला, तोही 'बहुचर्चित'. एकूण परिणामांत 'द वाँटिंग सीड' खूपच मागे पडलं.

उंदीर

बर्जेस काही बाबतींमध्ये द्रष्टा होता, पण सोबतच त्यानं हे कल्पनेनं रेखलेलं जग गंभीररीत्या अपूर्णही आहे. अशा युटोपियन-डिस्टोपियन कादंबऱ्यांमध्ये 'आजच्या' जगापासून 'ते' जग कसं घडलं हे तुटक रेषेनं तरी दाखवायचं असतं. बर्जेस त्याचं पेलफेजमधलं आढ्यताखोर 'मायबाप सरकार' कसं घडलं ते सांगत नाही. पुढे गसफेजमध्येही शासन-व्यवस्था मात्र तशीच का राहते, हेही तो सांगत नाही. त्याचं इंग्लंड जगभरातल्या वंशांच्या खिचडीसारखं आहे, खूपसं एका भरपूर व्याप्तीच्या मध्यमवर्गानं भरलेलं आहे, पण 'खालचे' वर्ग आहेत तसे 'वरचे' वर्गही असणारच. बर्जेसचा डेरेक फॉक्स उपमंत्री आहे. त्याचा भाऊ शाळामास्तर आहे. अर्थातच वर्ग वेगळे आहेत, पण बर्जेस तसं सूचितही करत नाही. असं सांगतात की बर्जेसला हे पुस्तक म्हातारपणी, फुरसतीनं लिहायचं होतं. पण त्यानं ते लिहिलं असणार १९६०-६१मध्ये, वयाच्या त्रेचाळीस-चव्वेचाळीसच्या टप्प्यावर; मृत्यूच्या बत्तीस-तेहेतीस वर्षं आधी. ही घाई का केली तेही कळत नाही.

पण बर्जेसचं द्रष्टेपण मात्र त्या १९६२ सालच्या प्रकाशनानं ठसतं! जॉन बंपास कॅल्हून (John Bumpass Colhoun 1917-1995) हा नेमका बर्जेसचा समकालीन प्राणिवर्तन शास्त्रज्ञ.

त्यानं काही मर्यादित 'विश्वां'मध्ये उंदीर-प्रजा कशा कशा वाढतात यावर काही प्रयोग केले. यांतला १९६८चा 'विश्व-२५' (universe 25) प्रयोग प्रसिद्ध आहे. एक २.७ मी. चौरस १.४ मी. उंच 'विश्व' घडवलं गेलं प्रत्येक बाजूला चार उभे जाळीचे बोगदे होते. त्यांतून राहण्यासाठीच्या जागा (फ्लॅट्स!) अन्न-पाणी पुरवठा वगैरेंकडे जाता येत असे. या विश्र्वात चार नर, चार मादी उंदीर सोडले गेले. उंदीर सुरक्षित होते. अन्नपाणी पुरेसं होतं. जागा, अवकाश सोडला तर प्रजा-वाढीला मर्यादाच नव्हती. आणि अवकाश थेट ३८४० उंदरांना पुरेसा होता. सुरुवातीला संख्या-वाढ वेगवान होती. दर ५५ दिवसांना संख्या दुप्पट होत ३१५ व्या दिवशी ती ६२० झाली. मग मात्र संख्या-वाढीचा वेग झपाट्यानं मंदावला आणि दुप्पट व्हायला ५५ ऐवजी १४५ दिवस लागू लागले. अखेर ६००व्या दिवशी जन्मलेला उंदीर हा शेवटचा 'टिकाऊ' उंदीर ठरला, आणि तेव्हा एकूण २२०० उंदीर होते. (आठाच्या २७५ पट!) या ३१५ ते ६०० दिवसांमधल्या काळात समाजव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. समलिंगी व्यवहार वाढले. 'दूधपित्या' बाळांना घराबाहेर काढलं जाऊ लागलं. बाळांना प्रौढ उंदीर इजा करू लागले. सबळ उंदीरही आपली जागा, आपल्या माद्या यांचे रक्षण करण्यात कमी पडू लागले. माद्या आक्रमक झाल्या. सक्षम नसलेले उंदीर एकमेकांवर हल्ले करू लागले, पण त्यांचा हल्ला भोगणारे उत्तरंही देईनासे झाले. ६०० व्या दिवसानंतर सक्षम नर ना एकमेकांशी भांडत, ना माद्या गाठून समागम करत. ते फक्त खात, झोपत आणि स्वतःची चाटूनपुसून साफसफाई करत (यांना जखमांचे व्रण नसल्याने 'सुंदर-प्रजा', the beautiful ones, म्हटले गेले! प्रजनन पूर्णपणे बंद पडलं, आणि लोकसंख्या घटत जाऊन अखेर उंदीर उरलेच नाहीत! एकूण प्रयोगावरचा निबंध कॅल्हूनने १९७२ साली प्रकाशित केला, 'सीड' नंतर दहा वर्षांनी!

या प्रकाराला 'वर्तनी खड्डा', Behavioral Sink या संदर्भात एस्थर इंग्लिस-आर्केल (Esther Inglis-Arkel) हिचा 'उंदरांनी खाजगी स्वर्गाचे भयावह कुनस्थान कसं केलं'. (How Mice Turned Their Private Paradise Into a Terrifying Dystopia) हा लेख मननीय आहे. ती म्हणते की जुन्याच प्रयोगांचे नव्याने अर्थ लावणं मूळ प्रयोगांपेक्षा सध्याच्या विचारव्यूहांचं जास्त आकलन घडवतं! तसे जर असेल तर बर्जेस जास्तच प्रमाणात द्रष्टा ठरतो, की त्याने कॅल्हूनचे निष्कर्ष दशकभर आधी तर 'वर्तवलेच', पण थेट आजच्या धारणाही पन्नास-पंचावन्न वर्षं आधीच 'मांडल्या'!

संख्या की उपलब्धीचं वाटप?

लोकसंख्यावाढीचे दर, एखाद्या परसिराच्या लोकसंख्या सांभाळायच्या क्षमता वगैरेंभोवती बरंच गणित रचलं गेलं आहे. कोलाहलशास्त्रात (Chaos Theory) लोकसंख्या हा महत्त्वाचा तपास मानला जातो. पण ते शास्त्र, त्याचं गणित वगैरेंमध्ये मानसिक बाबी तपासायची सोय नाही. वनस्पती, कीटक, सूक्ष्मजीव वगैरेंच्या अभ्यासांत ते गणित नेमकं ठरतं. उंदीर, माणसं, अशा 'मनं' असलेल्या जिवांमध्ये मात्र गणित काही मर्यादांमध्येच नेमकी उत्तरं देतं. जसं, विश्व-२५ मध्ये जेमतेम ५७% क्षमता गाठूनच उंदीर-लोकसंख्या उद्ध्वस्त झाली, तीही अपत्यप्रेम, प्रजननाची इच्छा, बंधुभाव वगैरे गमावण्यातून. अन्न-पाणी, वाढण्यासाठी अवकाश वगैरे असतानाच उंदीर संपले.

विश्व-२५ हे आपलं मानवी विश्व आहे का? खात्री नाही. इंग्लिस-आर्केल नोंदते, ''एक ताजा अभ्यास नोंदतो की विश्व-२५ एकूण पाहता फार दाटीचं नव्हतं. राहण्याच्या जागांना एकच दरवाजा होता. आक्रमक नरांनी त्या जागांमध्ये किती उंदीर राहणार यावर नियंत्रण ठेवलं, म्हणून इतर विश्र्वातली दाटी वाढली, तर सुंदर प्रजा सामान्यांपासून सुटी पडली. प्रश्न लोकसंख्येचा नसून न्याय्य वितरणाचा होता, असा युक्तिवाद करता येईल.'' जर हा युक्तिवाद मान्य केला तर ट्रंप-ब्रेक्झिट प्रकार सुंदर प्रजेची इतरांना वाटा न देण्याची वृत्ती अधोरेखित करतो. स्वयंपूर्ण 'गेटेड कम्यूनिटीज' आज भारतीय महानगरांमध्येही नवीन नाहीत. दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका इथे तर त्या आजच त्या त्या जागच्या सुंदर प्रजेला संरक्षण देताहेत.

म्हणजे मनुष्यजात धोक्यात आहे; मग लोकसंख्या जास्त मारक की संपत्तीचं अन्याय्य वाटप जास्त धोकादायक याचा कापूस तज्ज्ञ पिंजतीलच!

field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

सुंदर लेख, धन्यवाद!

ट्रिस एनस्पन सैन्यातून लढत असताना त्याला चिनस्पन सैन्याचा खाण्याचा डबा कसा काय मिळतो? तसंच, ही लढाई आयर्लंडमध्ये कशी काय होते?

विश्व - २५ प्रयोग भारी आहे! लोकसंख्येची अनियंत्रित वाढ --> अन्याय्य संपत्तीवाटप --> अराजक अशी कारण-परिणाम साखळी असावी का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सुंदर लेख! आवडला.
विश्व - २५ प्रयोगही भारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

विचारात पाडणारा लेख. आता पुस्तक मिळवावे लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

६०० व्या दिवसानंतर सक्षम नर ना एकमेकांशी भांडत, ना माद्या गाठून समागम करत. ते फक्त खात, झोपत आणि स्वतःची चाटूनपुसून साफसफाई करत (यांना जखमांचे व्रण नसल्याने 'सुंदर-प्रजा', the beautiful ones, म्हटले गेले! प्रजनन पूर्णपणे बंद पडलं, आणि लोकसंख्या घटत जाऊन अखेर उंदीर उरलेच नाहीत! एकूण प्रयोगावरचा निबंध कॅल्हूनने १९७२ साली प्रकाशित केला, 'सीड' नंतर दहा वर्षांनी!

चिल्ड्रेन ऑफ मेन हा विलक्षण सिनेमा आठवला. यातही संपुर्ण मानवजातीत १८ वर्ष प्रजनन पुर्णपणे बंद पडलेलं असतं, मग एक बाई प्रेग्नंट होते.
लेख जबरदस्त आहे प्रयोगही विलक्षण आहे. सुंदर प्रजा हा शब्द तर अंगावरच येतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love