सदानंद रेगेंच्या कविता

कविता

सदानंद रेगेंच्या कविता

- सदानंद रेगे (देवापुढचा दिवा)

निरर्थालाहि अर्थ येऊं पहात होता…
(अल्बेर कामू यांच्या स्मृतीस.)

त्या दिवशी अचानक
असें काय झालें?
तुझ्या मोटारीचें डोकें
अकस्मात् कसें फिरलें?
अचानक...
अकस्मात्...
अघटित...
अपघात...
निरर्थालाहि कांही अर्थ येऊं पहात होता.
पण तो झाला भस्मसात्...

तुला विचारलें तर तूं कांही बोलत नव्हतास.
चुरगाळलेल्या बगळ्यासारखा मान टाकून बसला होतास.
गांठाळत चाललेल्या रक्ताच्या नुक्त्यावर
एक डांस तेवढा गूं गूं करीत होता.

म्हटला तर या साऱ्याला अर्थ होता.
म्हटला तर कांहीच नव्हता.
नुसता ॲब्सर्ड काळोख...

---

पुलावरच्या मुली
(एडवर्ड मुंक)

दबा धरून राहिलेल्या अवकाशानं
हा डोह पार ढवळून काढला आहे.

ओळखीचं आसमंत...
या मुलींनाही कुठं पाहिल्यासारखं वाटत आहे.

आतां तर त्या प्रतीक होऊन उभ्या आहेत
काळ्या डोहांत नजर हरवून...

समाधिस्थ आकार...
लफ्फेदार पिंगा घालणारा उत्तरवारा.

झोंपाळ्यावरील रेषा
कुंचल्यावर आकाशपाताळ टिपणाऱ्या...

वस्त्रगाळ प्रकाश...
प्रेतासारखा थंडगार.

असं एकाकीपण... असं एकाकीपण
या इथल्याच पुलावर....

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)