Loving Vincent - गिमिकाच्या पलीकडे

हा चित्रपट रहस्यपट नाही; अगदी व्हिन्सेंटच्या खुनाचा तपास, असा वरवरचा पदर असला तरीही. या लेखनात त्या असल्यानसलेल्या रहस्याचा भेदही केलेला नाही. तेव्हा चित्रपट बघण्याआधी लेखन वाचायला हरकत नसावी. चित्रपट बघण्यासाठी व्हॅन गॉच्या चित्रांची, चित्रशैलीची किंवा एकंदर चित्रकलेबद्दल फार माहिती, आकलन असण्याचीही आवश्यकता नाही. शब्द आणि त्यासोबत येणाऱ्या प्रतिमा आणि काही प्रमाणात संगीत या गोष्टी एकत्र समजत असतील, तर जरूर चित्रपट पाहा.

व्हिन्सेंट व्हॅन गॉ हा चित्रकार असल्याचं बहुतेक सगळ्यांना माहीत असेल. त्याला बायपोलर विकार असल्याचंही अनेकांना माहीत असेल. मला माहीत नव्हतं ते तो ठरावीक लोकांना खूप पत्रं लिहीत असे. बायपोलरमधून होणारे त्रास आणि विक्षिप्तपणा असूनही त्याची काही लोकांशी खूप चांगली नाती निर्माण झालेली होती. तो त्याचा भाऊ, थिओला पत्रं लिहायचा, तसंच एका पोस्टमनशीही त्याची मैत्री होती; नियमितपणे पत्रं पाठवण्याइतपत त्यांची मैत्री होती.

पोस्टमन रुलां
पोस्टमन रुलां

चित्रपट सुरू होतो ते पोस्टमनचा मुलगा, वडलांच्या इच्छेखातर आणि स्वतःच्या इच्छेविरोधात या थिओ, व्हिन्सेंटच्या धाकट्या भावाला पत्र द्यायला. तेव्हा व्हिन्सेंट गेल्याला एक वर्षं झालेलं असतं. व्हिन्सेंटनं स्वतःला गोळी घालून आत्महत्या केली, हे तोवर त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यांनी मान्य केलेलं असतं. पण पोस्टमनला प्रश्न असतो, 'सहा आठवड्यांपूर्वीच तो आनंदात असल्याचं त्यानं कळवलं आहे, मग असा माणूस आत्महत्या करेलच कशासाठी!' पोस्टमनचा मुलगा आर्मां थिओला शोधायला निघतो; त्या प्र‌वासात त्याला नवा व्हिन्सेंट भेटतो; त्यात त्याला स्वतःचाही शोध लागत जातो.

गरम डोक्याचा आर्मां रुलां (Armand Roulin) आधी व्हिन्सेंटला रंग पुरवणाऱ्याला भेटतो. तिथून तो व्हिन्सेंट ज्या गावात शेवटच्या काळात राहिला तिथे जातो. त्या गावात व्हिन्सेंटला एक दर्दी डॉक्टर ज्याच्याशी पुढे त्याची मैत्री होते, त्याची हुशार, प्रेमळ, सुंदर आणि अबोल मुलगी, जरा करड्या शिस्तीची त्यांची हाऊसकीपर, गावातलं बेड अँड ब्रेकफास्ट चालवणारी मुलगी, स्थानिक नदीकिनारी होड्या भाड्यानं देणारा मासेमार, गावातली पोरं, शेतकरी, गावातला दुसरा डॉक्टर अशी पात्रं त्याला भेटतात. ही पात्रं व्हिन्सेंटच्या आयुष्यात येतात, तशीच आर्मांच्या आयुष्यातही येतात. या सगळ्या लोकांची चित्रं व्हिन्सेंट व्हॅन गॉनं काढली आहेत. ती सगळी इथे लावत नाही, पण गूगल करून आणि/किंवा विकीपीडीयाच्या दुव्यांवरून शोधता येतील.

बेड अँड ब्रेकफास्ट
बेड अँड ब्रेकफास्टच्या या खोलीत व्हिन्सेटनं आपले शेवटचे महिने काढले.

या प्रवासात आर्मां व्हिन्सेंटमध्ये आणखी अडकत जातो. 'सहा आठ‌वड्यांपूर्वी ठीकठाक असणारा व्हिन्सेंट अचानक स्वतःला का मारून घेईल', हा वडलांनी विचारलेला प्रश्न त्यालाही टोचत राहतो. वेगवेगळे लोक त्याला, नक्की काय घडलं असेल याचे तुकडे पुरवत जातात. त्यात सत्य काय आणि मत काय, यांची सरमिसळ होत जाते. हा घटनाक्रम घडून एक वर्ष उलटून गेलेलं आहे; त्यांनाही अर्थात सगळ्या गोष्टी सरळ लक्षात राहणं कठीण; शिवाय व्हिन्सेंटबद्दल आणि संबंधित इतर लोकांबद्दल त्यांची मतं, भावना या गोष्टीही त्यात अडकणार.

डॉक्टरची मुलगी मार्गरित गॅशे हिची आर्मां काहीशी उलटतपासणीच घेत असतो. अतिशय नितळ मनाची मार्गरित आर्मांला विचारते, "व्हिन्सेंट कसा मेला यात तुला एवढा रस आहे, तो कसा जगला हे तू बघतोयस का?" माझ्या मते, चित्रपटाचा हा उत्कर्षबिंदू आहे; हे त्याचं सार आहे. व्हिन्सेंट कसा जगला. त्यानं काय पाहिलं, कसं चितारलं. आर्मां ते पाहतो का, शिकतो का, असे प्रश्न चित्रपट उभा करतो आणि काही अंशी त्यांची उत्तरंही देतो. निदान मला तरी हे प्रश्न पडले, आणि काही अंशी उत्तरं मिळाली.

इथे 'राशोमान'ची आठवण होणं अपरिहार्य. १८९०मध्ये जो मनुष्य मेला, त्याचा खून झाला की त्यानं आत्महत्या केली, हे आता महत्त्वाचं नाही. त्याच्या आजूबाजूला काय होतं, हे आता महत्त्वाचं.

पियानो वाजवणारी मार्गरित गॅशे
व्हॅन गॉनं चितारलेली, पियानो वाजवणारी मार्गरित गॅशे

मात्र, हातानं चितारलेली चित्रं हे माध्यम वापरून चित्रपट बनवणं मला थोडं गिमिकी वाटतं. विशेषतः पार्श्वभूमीची चित्रं काही प्रसंगांत खूप हलतात, तेव्हा ते हाय-फ्रिक्वेन्सी बदल अंगावर आले; त्यातून काही सुचवायचं होतं, असंही नाही. चित्रपट-आस्वादक म्हणून ही चित्रं हातानं काढल्येत का अॅनिमेशन करून, याच्याशी मला घेणंदेणं नसतं; पण चित्रपटाच्या सुरुवातीलाच '१०० लोकांनी ही चित्रं हातानं काढली आहेत' म्हटलं की नक्की कुठे लक्ष वेधून घ्यायचं आहे, असा प्रश्न पडतो. तेवढ्या एक-दोन तक्रारी वगळता, चित्रपट आवडला. चित्रपट बघितल्यावर लगेचच धागा काढण्यासाठी हात सुरसुरले नाहीत, एवढा आवडला.

बारके तपशील चित्रपटात चांगले उचलले आहेत, याचं मला समजलेलं उदाहरण म्हणजे लोकांचे इंग्लिश बोलण्याचे उच्चार. डॉक्टर आणि त्याची मुलगी यांची बोलण्याची पद्धत उच्चभ्रू आहे. बेड अँड ब्रेकफास्टवाली सामान्यांचं इंग्लिश बोलते. ब्रिटिश इंग्लिश ऐकायची सवय असेल तर या तपशिलांमधली गंमत जरूर ऐका.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

विंन्सेंट आणि ( पिकासो) यांची चरित्र मराठीतच वाचायला मिळाली ते माधुरी पुरंदरेमुळे. हे चित्रकार जगताना घटना घडत जातात तसेच चित्रं काढत जातात. त्यांचं कुणावर प्रेम असतं,दुरावले की तसे रंग चित्रांत बदलतात. दु:खी असताना काढलेली काळा आणि निळ्यांतही उत्तम चित्र असू शकतात हे जगाला कळलं॥
हीच गोष्ट संगितकारांचीही असते. बिथोवन/बेथवन च्या सिंफनीइतकेच कुणा इलिझासाठी लिहिलेली छोटीशी धून सर्वसामान्यांच्या मनावर राज्य करते.
महान कलाकार कधी सोप्याशा गोष्टींतून महानपणा सिद्ध करतात. कारण सोपं करणं हेच अवघड असतं. लहानांसाठी हान्स अँडरसन कथा असोत,नाचरे मोरा असो वा जिंगल बेल्स गाणं असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लिहिलय.
पिच्चर पहावा म्हणतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी हा चित्रपट प्रथम पाहिला तेव्हा फक्त 'विन्सेन्ट फान् होख़च्या शैलीत चितारलेला चित्रपट' इतकंच त्याबाबत वाचून गेलो होतो. होख़ची अनेक चित्रं अनेकदा पाहिली असली नि त्याच्या थिओसोबतच्या पत्रव्यवहाराबद्दल माहीत असलं, तरी त्याचं नक्की आयुष्य काय होतं याबाबत मला काहीही माहिती नव्हती. अजूनही फार माहीत नाही.

हा चित्रपट म्हणजे आर्माँचा, पत्र पोचवण्याबाबतच्या उदासीनतेपासून ते विन्सेन्टच्या मृत्युगूढाच्या शोधात विन्सेन्टच्या आयुष्यात गुंतत जाण्याचा प्रवास आहे. विन्सेन्टच्या आयुष्याबद्दल माहीत नसतानाही चित्रपटातल्या काही प्रसंगांमुळे मी खिन्न खालो, भावनावश झालो.. विशेषत: थिओ असलेले प्रसंग..

प्रश्न उरतो तो हा, की गोष्ट सांगण्यासाठी विन्सेन्टच्या चित्रांची शैली का वापरली असावी, वा चित्रपट क्लृप्तीपलीकडे गेला का ?
माझ्यासाठी या शैलीने काय केलं, तर क्षणोक्षणी विन्सेन्टच्या डोळ्यांना भवताल कसं दिसत असावं याची व्यवस्थित चुणूक दाखवली. एखाद्या दृक गोष्टीचा प्रत्यय (दृकप्रत्ययवाद - Impressionism) विन्सेन्टला कसा येत असावा याची झलक. गोष्ट तर विन्सेन्टच्या मृत्यूबद्दल आहे; त्याच्या कलेबाबत नाही. तर मग ज्या गोष्टीकरता तो नावाजला ती गोष्ट केंद्रस्थानी नसल्याने (वा न ठेवल्याने) पार्श्वसंगीताप्रमाणे विन्सेन्टची कला वाहत ठेवली आहे. गोष्टीतल्या वर्तमानात विन्सेन्टची शैली तर भूतकाळासाठी करडे रंग वापरत वास्तववादी शैली अशा दोन शैलींत विभागणी केल्याने विन्सेन्टचं वर्तमानातलं अस्तित्व उजळ, उठावदार पिवळ्या निळ्या रंगांतून कायम जाणवत राहिलं, नि त्याला विपरीत अशी त्याच्या मृत्यूची गोष्ट!

चित्रपट पाहिल्यावर मी मुद्दाम कल्पना करून पाहिली, की हा चित्रपट थेट चित्रीकरण करून दाखवला असता तर काय परिणाम झाला असता? तर माझ्यासाठी तरी चित्रंशैली अधिक प्रभावी ठरली. मी हा चित्रपट दुसर्‍यांदा पाहण्यामागे हे ताडून पाहणं हे एक कारण होतं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पार्श्वसंगीत. माझ्यासाठी ते या चित्रपटाचा परिणाम अनेक पटींनी वाढवणारं होतं. त्यासाठीही मी तो दुसर्‍यांदा पाहिला, ऐकला.

एकदा तरी मोठ्या पडद्यावर पाहण्याजोगा (नि ऐकण्याजोगा) चित्रपट.
पडद्याजवळून पाहा अशी शिफारस.

------------------------------------------------

काही न समजलेल्या, पटलेल्या गोष्टी -
चित्रपटाच्या सुरुवातीलाच '१०० लोकांनी ही चित्रं हातानं काढली आहेत' म्हटलं की नक्की कुठे लक्ष वेधून घ्यायचं आहे, असा प्रश्न पडतो
.....खरं आहे. ही माहिती जाहिरातीत एक वेळ ठीक, पण चित्रपटात घालणे टाळायला हवे होते.

तपशील चित्रपटात चांगले उचलले आहेत, याचं मला समजलेलं उदाहरण म्हणजे लोकांचे इंग्लिश बोलण्याचे उच्चार
.....नेमकी हीच गोष्ट मला डाचली नि कळली नाही. विन्सेन्ट जेव्हा आर्ल (Arles) या फ्रान्समधल्या ठिकाणी वास्तव्याला आला तेव्हा त्याची जोसेफ रुलाँ या पोस्टमनशी मैत्री झाली. जोसेफ, त्याचा मुलगा आर्माँ हे दोघेही फ्रेंच. मग त्यांचे उच्चार अगदी ब्रिटिश - आयरिश फरक जाणवेल इतके टक्क कळणारे होते नि आश्चर्य वाटायला लावणारे होते. हे का ते तेव्हा कळलं नाही. नंतर विकीवर कामं करणार्‍या नटांची माहिती पाहिली तर दिसलं, की जोसेफ आणि आर्माँचं काम (नि आवाज) अनुक्रमे आयरिश आणि ब्रिटिश नटांनी केलं आहे.
डॉ. गॅशे हेही 'ओवेर सुर वाज़' (Auvers-sur-Oise) या ठिकाणी राहणारे फ्रेन्चच होते. त्यांचं काम करणारा जेरोम फ्लिन हा ब्रिटिशच ('गेम ऑफ थ्रोन्स'मधला ब्रॉन !). त्यालाही ब्रिटिश उच्चार टाळता आले नाहीत.

० आणखी एक न कळलेली बाब म्हणजे विन्सेन्टचं काम करणारा नट विन्सेन्टसारखा दिसत नाही. एक तर या चित्रपटासाठी अभिनय उत्तम येण्याची गरज नव्हती कारण प्रत्येक चित्रचौकट हातांनी रंगवली आहे. त्यामुळे विन्सेन्टसारखी दिसणारी, यथातथा अभिनय येणारी व्यक्ती चेहरा रंगवण्याच्या संदर्भासाठी चालली असती. (विन्सेन्टऐवजी मला जेरार्ड बटलरची आठवण अधिक येत राहिली. ;))

----------------

अवांतर भर :
पीबीएस वाहिनीवरील विन्सेन्टच्या कान कापून देण्याच्या घटनेतली सत्यासत्यता तपासणारा एक लघुपट :
http://www.pbs.org/wnet/secrets/van-goghs-ear-full-episode/3357/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वॅन गॉख अखेरीस ज्या अर्लेस गावी राहात होता तेथे एका पबवजा दुकानात बसून तो आपली स्केचेस काढीत असे. ती काढण्यासाठी पबच्या मालकाने त्याला आपले हिशेब लिहिण्याचे एक कोरे पुस्तक दिले होते. वॅन गॉखच्या मृत्यूनंतर ते स्केचबुक पबच्या मालकाकडे आले आणि ह्याच्याकडून त्याच्याकडे असे त्याचे अनेक वेळा हस्तान्तरण होऊन अखेर त्या जागेच्या नव्या मालकाकडे ते येऊन पोहोचले. वॅन गॉखचे ते स्केचबुक आहे हेच विस्मृतीत गेल्यामुळे ते असेच अनाथ अवस्थेत पडून होते. अखेर Bogomila Welsh Avcharov नावाच्या वॅन गॉख-तज्ज्ञ बाईंनी त्याचा छडा लावून त्यावर 'Vincent Van Gogh - The Lost Arles Sketchbook' अशा नावाचे पुस्तक लिहिले. ते अलीकडे वाचण्यात आले होते त्याची आठवण झाली.

ह्या पुस्तकातून आणि वॅन गॉखची नवी चित्रे सापडल्याच्या दाव्यातून कलाक्षेत्रात वाद सुरू झाला आहे. त्याची अद्ययावत स्थिति येथे पाहता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>मात्र, हातानं चितारलेली चित्रं हे माध्यम वापरून चित्रपट बनवणं मला थोडं गिमिकी वाटतं.<<

>>खरं आहे. ही माहिती जाहिरातीत एक वेळ ठीक, पण चित्रपटात घालणे टाळायला हवे होते.<<

हे गिमिकी असेल का? शक्यता नाकारता येत नाही, पण हँड-पेंटेड तंत्र हे ॲनिमेशनचं पारंपरिक तंत्र आहे. ग्डान्स्क इथे चित्रपटाचं बरंचसं काम झालेलं आहे, ही माहितीसुद्धा माझ्यासाठी रोचक आहे, कारण विसाव्या शतकातला बराचसा काळ सोव्हिएत रशिया आणि पूर्व युरोप इथे जगातलं सर्वोत्तम ॲनिमेशन होत असे. उदा. झाग्रेबचं नाव ॲनिमेशनच्या जगात महत्त्वाचं आहे. चेक ॲनिमेशनही खूप प्रसिद्ध आहे. ह्या देशांतल्या हँड-पेंटेड आणि क्ले-पपेट, स्टॉप मोशन वगैरे प्रकारच्या ॲनिमेशनचे अनेक चित्तवेधक नमुने मी पूर्वी पाहिलेले आहेत.

शिवाय, जेव्हा डिजिटल तंत्रानं ॲनिमेशन करणं सर्वमान्य आहे त्या आताच्या जगात अशी माहिती देणं मला चुकीचं वाटत नाही. किंबहुना, डंकर्क पारंपरिक फिल्मवर चित्रित करण्याचा नोलनचा निर्णय किंवा हँड-पेंटेड तंत्र वापरून आज ॲनिमेशन करणं हे निर्णय गिमिकी असोत नसोत, ते हेतुपुरस्सर घेतलेले असतात. कारण सर्रास कुणीच ते तंत्र आता वापरत नाही. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि त्याला अधिक खर्चही येतो. त्यामुळे मला ही माहिती मौलिक वाटते आणि प्रेक्षकांना ती द्यावी असं माझं मत आहे.

या तंत्राचा एक रशियन नमुना -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पण गिमिक असेल तरी प्रॉब्लेम काय आहे? गिमिकांची बदनामी थांबवा.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

"चित्रपटाच्या सुरुवातीलाच '१०० लोकांनी ही चित्रं हातानं काढली आहेत' म्हटलं की नक्की कुठे लक्ष वेधून घ्यायचं आहे, असा प्रश्न पडतो"-
यात मला काही प्रॉब्लेम वाटला नाही. कम्प्युटर मुळे आज अनेक गोष्टी सहज होतात आणि त्यामुळे सामान्य मनुष्याला हातानं काय कमाल होऊ शकते याची कदाचित पूर्वीपेक्षा कमी जाणीव आहे, ती जाणीव करून देण्याचं काम ही ओळ करते असं मला वाटतं. तसेच एका चित्रकाराच्या शैलीच्या अगदी जवळ जाणारी चित्रं हातानं काढण्याचं कौशल्य एखाद दुसऱ्या कलाकाराकडं असणं समजू शकतो , पण इतक्या मोठ्या प्रमाणावर जर असं अनोखं होत असेल , आणि कलेच्या ( पेंटिंग आणि चित्रपट दोन्ही ) क्षेत्रात ही घटना पहिल्यांदाच घडते आहे , तेव्हा त्याची जाणीव प्रेक्षकाला करून देणं हे या ओळीचं काम आहे ! नुसती ही ओळ वाचून या प्रोजेक्ट चा आवाका , त्यातल्या आव्हानांची कल्पना मी करू शकलो.

चिंतातुर जंतू यांनी फार सुरेख मुद्दा उपस्थित केला आहे. पूर्व युरोपीय देश आणि त्यांची ऍनिमेशन मधली कामगिरी. या संदर्भात माझी अत्यंत आवडती झाचारोवानं ओवुवेक - अर्थात जादूची पेन्सिल याची एक झलक पहा ! स्टोरीटेलिंग आणि ऍनिमेशन दोन्ही प्रतलांवर अप्रतिम पोलिश सिरीज आहे ही ! ( https://www.youtube.com/watch?v=drAraNFt3y4 )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

लेख आवडला. गॉगचा वाढदिवस बायपोलर डे म्हणुन साजरा होतो - मला वाटतं तूच मला हे सांगीतलं होतस.
अजुन एक ६ महीन्यापूर्वी हसरा-खेळता मनुष्य आत्महत्या करेल असे वाटत नाही असे एक पात्र म्हणते . परंतु असे आपण अठामपणे सांगू शकत नाही. व्यक्ती चे आयुष्य ६ महीन्यात इकडचे तिकडे होऊ शकते. स्पेशली सिव्हीअर डिप्रेशनसारखी व्याधी ( खरं तर आधिव्याधी मधील आधि) झपाट्याने बळी घेऊ शकते. खलास करुन टाकते.
माईंड यु - मी सिव्हीर शब्द वापरलेला आहे, टोकाचे अवसाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तू चित्रपट पाहाच. तुला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जंतू, सर्व_संचारी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल असहमत. वेळ झाला की लिहेन.
तूर्तास - माहिती देण्याबद्दल आक्षेप नाही. ती कुठे, कधी दयायची याबाबत असहमती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमती/असहमती बाजूला असो. सर्व_संचारी आणि जंतू यांनी आपापल्या सवडीनुसार या विषयावर स्वतंत्ररीत्या आपली मतं मांडावीत अशी विनंती. मतपरिवर्तन करून घेण्यासाठी मी सिद्ध आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शुक्रिया ! ३_१४ विक्षिप्त अदिती
वास्तविक काहीच दिवसांपूर्वी मी " तुटलेला कान , ऍबसिन्थ ... " असा एक लेख लिहिला आहे. याच चित्रपटा शी संबंधित ! त्याचा दुवा आधी दिला तर चालेल का ? ( http://www.aisiakshare.com/node/6329 )
आत्ताच घरी आलो , रात्र बरीच झाली आहे, आणि उद्या दिवसभर रिहर्सल मध्ये जाईल !तेव्हा आत्ता त्यामुळे प्रामाणिक पणे आता मला इतकंच सांगता येईल, की " १०० ( पेक्षा जास्त ) पेंटर्स नी या फिल्म साठी काम केलं आहे" या लाइनीचा मला चित्रपट पाहताना अजिबात अडथळा झाला नाही, उलट त्यानं चित्रपट पाहण्यासाठी एक भूमिका मिळाली. आणखी एक गोष्ट अशी की मी हा चित्रपट पोलिश मध्ये पहिला, पोलिश चित्रकारांनी केलेल्या ( पोलिश चित्रकार आणि त्यांची चित्राची समज फार भारी आणि वेगळी आहे हे मी स्वानुभवावरून सांगतो ) आपल्या अत्यंत लाडक्या ( कदाचित दैवत स्वरूप च) चित्रकाराला त्याच्या कामाची त्याच्या मृत्यूनंतर अशी पोचपावती दिली यानेच मी खूप भारावून गेलो होतो !
ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी हा चित्रपट आवर्जून पहावा ! शुभ रात्री !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

मी तर म्हणत्ये की हवं तर दोन-चार महिने घ्या आणि तपशिलात लिहा. पोलंडमधली पार्श्वभूमी, तुम्ही काय बघितलं आहेत, तुम्हाला गोष्टी कशा दिसतात, स्थानिकांची मतं निराळी असतात का, असंही काही. घाई अजिबातच नाही, पण या विषयाला फुटतील तेवढे फाटे फोडून लिहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.