भ्रष्टाचार

(हा लेख गेल्यावर्षी गणपती येण्याच्या तोंडावर लिहिला होता.)

लहानपणीची एक गोष्ट आठवली. उन्हाळ्याच्या सुट्टीत, झोपण्याआधी माझ्या आजोबांना, आम्ही ७-८ नातवंडे गोष्टीसाठी आग्रह धरत असू. नेहमी ते चांगली गोष्ट सांगत. पण कधी त्यांना कंटाळा आला असेल तेव्हा त्यांची गोष्ट अशी चालू होत असे.

"एकऽऽऽ होता राजा. काय होता?"
"राजाऽऽऽ" आम्ही पिलावळ ओरडत असू.
"मगऽऽऽऽऽ एक होता?"
"राजाऽऽऽ"
"आणि ऽऽऽऽऽऽऽ एक होता राजा"
मग आम्ही नातवंडे चिडत असू. पण ती गोष्ट कधीच संपत नसे. फिरून फिरून ती पून्हा "एक होता राजा" वरच येत असे. 'अण्णा हजारे ऑगस्ट मध्ये पून्हा उपोषण सुरु करणार' ही बातमी वाचून मला ही गोष्ट आठवली. या भ्रष्टाचाराचंही तसंच नाही का? तो सुरू तर होतो, पण त्याचा शेवट कधी दिसेल कुणास ठाऊक? कसाही असला तरी भ्रष्टाचार जगाला नवीन नाही. लालच हा मनुष्याच्या स्वभावाचाच एक भाग आहे. आदिमानवाने ही कशाच्यातरी स्वरूपात, कुणालातरी लाच दिलीच असेल.

जगभरात आपल्याला त्याची कितीतरी उदाहरणे सापडतात. अमेरिकेत Watergate scandal पायी प्रेसिडेंट Nixon ना राजीनामा द्यावा लागला होता. बोफोर्स प्रकरणामध्ये राजीव गांधींचे नाव गुंतले गेले होते. सुरेश कलमाडींना Commonwealth Games च्या अफरातफरीमध्ये जेल मध्ये सुद्धा टाकलंय. अफगाणिस्तान मधले सरकार तर एवढं भ्रष्ट आहे की त्याची वर्तमानपत्रात दररोज नवीन बातमी असते. Rupert Murdoch सारख्या powerful माणसाच्या अनेक कंपन्यांनी, त्यांच्या भ्रष्ट कार्यशैलीने, अगदी ब्रिटनच्या पंतप्रधानांपासून रॉयल कुटुंबालाही धाकात ठेवले होते. याच ब्रिटिशांनी, तेव्हाच्या भारतातल्या छोट्या मोठ्या राजांना लालच दाखवूनच भारतावर कब्जा केला होता. आज आपल्याला त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळालंय पण भ्रष्टाचारापासून कुठे मिळालंय? उलट स्वातंत्र्यानंतर भ्रष्टाचार वाढतच चाललाय!

जन लोकपाल विधेयकामुळे IAC (India Against Corruption) च्या नेत्यांना, भ्रष्टाचारासाठी कुणावरही, अगदी पंतप्रधानांवरही कारवाई करण्याचा अधिकार मिळू शकतो. गेले ४२ वर्षे त्या विधेयकाला राज्यसभेत मान्यता मिळाली नाही, याचा अर्थ इतकी वर्षे आपल्याकडे राज्यसभेत निम्म्यापेक्षा जास्त नेते भ्रष्ट आहेत असा आपण घ्यायचा का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

बारावीनंतर कॉलेज अॅडमिशनसाठी domicile certificate घेताना किती नाकीनऊ येते हे आपल्याला माहीत आहे. अगदी जन्म, मृत्यूचा दाखला घेतानाही तुम्हाला लाच द्यावी लागते. या भ्रष्टाचारामुळे कितीतरी NRI लोकांना भारतात परत जाण्याची इच्छा होत नाही. त्याच्या विरुद्ध बंड करण्याची हीच वेळ योग्य नाही का? जेव्हा जगभर सोशल मेडिया द्वारे अन्यायाविरुद्ध उठाव होत आहेत, ज्याच्यामुळे तरुण वर्गाला पटकन त्यांचे मत मांडण्यास, संघटना स्थापन करण्यास वाव मिळत आहे. त्या औद्योगिक क्रांती (Technological Revolution) च्या युगाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. अण्णा हजारेंनी पूर्वीही उपोषणे केली होती, पण एप्रिल मधल्या त्यांच्या उपोषणाला, जसा संपूर्ण भारतातून प्रतिसाद मिळाला होता तसा पूर्वी नव्हता मिळाला. Facebook मुळे निमिषार्धात हजारो लोकांचा पाठिंबा त्यांना मिळाला होता.

एवढं सगळं झालं तरी, जन लोकपाल विधेयक भक्कम करण्याकरता, अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली जमलेले समाजसेवक आणि सरकार यांच्यामध्ये जूनमध्ये झालेली चर्चा यशस्वी झाली नाही. तेव्हा अण्णा हजारेंनी ऑगष्ट मध्ये पुन्हा उपोषण करण्याचे जाहीर केले आहे. बघूया त्याचे काय होते ते? भ्रष्टाचाराचे निर्मुलन करणे इतके सोपे नाही. इंग्रजांना देशाबाहेर काढण्यास जवळजवळ १०० वर्षे लागली. ते तरी परकीय होते. हा भ्रष्टाचार आपल्यातलाच आहे. ती माणसाचीच एक प्रवृत्ती आहे, एक विकार आहे. त्याचे पूर्णत: निर्मुलन करणे शक्य नाही, पण ते नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. भारतात नसबंदी, पोलिओच्या मोहिमा जशा देशभर राबवल्या जातात, तसेच काहीसे भ्रष्टाचाराबाबतही सरकारने करायला हवे. जेव्हा गावा गावात भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम आणि तो आढळल्यास होणार्‍या शिक्षेची जाहिरात होईल तेव्हा सर्वसामान्य नागरिकही जागृत होईल. टि. व्ही वर शाहरुख खान, अमिताभ बच्चन येऊन त्याच्याबद्दल सांगू लागतील तेव्हा त्यांचे अनुयायीही त्याचे अनुकरण करतील. भ्रष्ट लोकांना, बाबा रामदेव म्हणतात तसे एकदम फाशी देणे शक्य नाही, पण अण्णा हजारेंनी , दारुड्या लोकांना अद्दल घडविण्यास राळेगण सिद्धीत केले, तसे भर रस्त्यावर खांबाला बांधून ठेवायला काय हरकत आहे? कदाचित शिक्षेपेक्षा, भर समाजात झालेल्या त्या अपमानाने लोकांवर थोडा वाचक बसेल!

थोडक्यात लाच देणे घेणे ही सहज सोपी गोष्ट नसून तो एक गुन्हा आहे; हेच सामान्य माणसाच्या मनावर बिंबायला हवे. आपल्या दुर्दैवाने, गणपतीने जसा, पृथ्वीला फेरा घालण्याऐवजी, स्वतःच्या आईवडीलांना फेरा घालून पैज जिंकली होती, तसा काही शोर्टकट आपल्याजवळ नाही. पण अण्णांची लढाई अगदी गणपती येण्याच्या तोंडावर सुरु होतेय, तेव्हा बघूया विघ्नहर्ता गणपती काही मदत करतोय का?

पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि रस्त्यावर पोलिसाने पकडल्यावर १०० रुपयात काम नाही झाले म्हणून तुम्हीच तक्रार करू नका म्हणजे झाले!

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)