बाबुरावपेंटर

जलवाहिनी

रंगपंचमी

लक्ष्मी

चित्रकार अन्वर हुसैन यांनी काढलेलं स्केच

मिस्त्री चित्र काढताना

मिस्त्री शूटिंग करताना

इतकी वर्षं इथं राहूनही बाबूराव पेंटर हे नाव किंवा त्यांच काम ऐकूनच माहीती आहे. त्यांची चित्रं कधी पाहीलीच नव्हती. बाबूराव पेंटर म्हणजे कोल्हापूराची शान असणाऱ्या नावांपैकीतलं एक. पण आम्हाला माहीती असलेलं ते वेगळंच. म्हणजे त्याचं असं की आमची शाळा पेटाळ्यात, मिस्त्रींचं घरपण पेटाळ्यातच! आमच्या शाळेच्या शेजारीच त्यांचं घर आहे. आम्ही त्या घरात जाऊन बागडूनही आलो. त्या घरात कायम अंधार असतो, म्हणजे अजूनही असतो. पण तिथं जायला मला आवडायचं. अजूनही त्या घराच्या आसपास असायला आवडतं मला. सोबतची पोरं पोरी भूताचं घर म्हणायचे त्या घराला कारण तिथं अंधार आणि कवडसे पडून त्यात तरंगणारे धूळीचे कण धुक्यासारखे दिसायचे. खेरीज तिथं खाली एक दोन कुठलेतरी मोठे मोठे पुतळे मोठा कपडा टाकून झाकून ठेवलेले, आणि इझल पण होते ज्यावर कागद किंवा कॅनव्हास काहीच लावलेलं नव्हतं. विशेष गम्मततीची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडं हलणारे प्रचंड मोठे इजल होते. यामुळं एकदा तिथं जाऊन लपंडाव खेळताना एक मुलगा अक्षरशः ओरडत, किंचाळत, बोंबा ठोकत बाहेर आला होता. पण मला आवडायचं तिथं. मी तर एकदा हलक्या पावलांनी तिथं वरच्या मजल्यावर पण गेले होते. तिथं एक बाई होत्या काहीतरी काम करत मी त्यांना काहीवेळं पाहून, खालून माझ्या नावानी हाका मारायला सुरुवात झाल्यावर पळून गेले. पण नंतर तिनचारवेळा परत गेले, पैकी एकदा त्या बाई परत दिसल्या यावेळी त्यांनीही पाहीलेलं मला आणि आता त्या ओरडणार असं वाटून मी धाड् धाड् जिना उतरून येताना चप्पल तुटलेली अशी काहीतरी वेडगळ आठवणही आहे. आणि नंतरच्यावेळीमात्र त्या बाईंनी मला एक लिमलेटची गोळी दिली मी वरच्या मजल्यावर जाण्याआधीच. हे इतकं असूनही ते घर कोणाचं आहे हे माहीत नव्हतंच! आमच्या घरी विचारल्यावर भूताचं घर असंच सांगत असू आम्ही. नंतर तिथं जाणं बंद झालं. कारण असं काही विशेष नाहीच पण बंद झालं इतकंच! काॅलेजला जायला लागल्यावर समजलं की ते घर बाबूराव पेंटरांचं आहे.
ही माझी बाबुराव पेंटरांसंदर्भातली आठवण आहे.

आमच्या शाळेशेजारी एक 'गोल सर्कल' आहे त्यात एक बाबुराव पेंटरांनी तयार केलेल्या कॅमेऱ्याची प्रतिकृती आहे. आमच्या लहानपणी ती तेवढीच होती आता तिथे त्याच्यासोबत काही म्युरल्सही आहेत. खरंतर उत्तम असं असणारं ते काम काहीसं दुर्लक्षित राहिलेलं आहे.
भारतातला लिओनार्दो म्हण्टलं जायचं बाबुराव पेंटरना. मिस्त्री घराण्यातच कला आहे. वडीलांकडूनच बाबुराव पेंटरनी चित्रकला आणि शिल्पकला शिकायला सुरूवात केली. गंधर्व नाटक कंपनीसाठी पडदे रंगवण्याचं - नेपत्थ्यात वापरले जातात ते पडदे रंगवण्याचं काम बाबुराव पेंटर करत असत. त्यांच्या या कामामुळं ते कलाक्षेत्रात ओळखले जाऊ लागले.
१९१७-१८ च्या सुमारास त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची (MFC) स्थापना केली आणि त्याच कंपनीमार्फत त्यांनी 'सैरंध्री' हा स्त्री पात्रं असणारा पहीलावहीला सिनेमा बनवला. या सिनेमाबद्दल असं ऐकलं आहे की यातील कीचकवधाचा जो सीन आहे ती इतका प्रभावी आहे की तो पाहताना काही प्रेक्षक घाबरून किंचाळत तर काही प्रेक्षक बेशुद्धही पडले होते. इतक्या प्रभावीपणे त्यांनी हा सीन चित्रित केला होता. मग नंतर हा सीन सिनेमातून वगळण्यात आला आणि तेव्हापासून ब्रिटीश सरकारने 'सेन्साॅर'पद्धतीला सुरुवात केली.
फ्लॅशबॅक हा प्रकारही चित्रपट क्षेत्रात रूढ केला तो बाबुराव पेंटरांच्या या महाराष्ट्र फिल्म कंपनीनेच. 'सावकारी पाश' नावाचा हा मूकपट होता ज्यात फ्लॅशबॅक प्रकार वापरला. ह्या मूकपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे परदेशी चित्रपट प्रदर्शनात पाठवलेला हा भारतातला सर्वात पहीला चित्रपट होता. त्याकाळी तंत्रज्ञान इतकी प्रगत नव्हतं की अंधारात चित्रिकरण करता येईल.
"सिंहगड" नावाच्या सिनेमात रात्र आहे असा एक प्रसंग चित्रित करायचा होता. आणि बाबुराव पेंटरांना अगदी नैसर्गिक वाटेल असंच ते दृश्य हवं होतं. म्हणून धाडस करून त्यांनी रात्रीच त्या दृश्याचं चित्रण करायचं ठरवलं. पण कॅमेरा वगैरे गोष्टी इतक्या विकसीत नव्हत्या यावर तोडगा म्हणून त्यांनी रस्त्यावर दारूगोळ्यातली दारू - गनपावडर पसरून शूटिंगच्यावेळी ती पेटवून देऊन तेवढ्याच प्रकाशात बाकी मिट्ट असणाऱ्या आंधारात ते शूटिंग केलं आणि त्यांना हवा तसा इफेक्ट मिळवला.
या महाराष्ट्र फिल्म कंपनीतून करियरला सुरूवात करणारे दिग्गज म्हणजे व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल, पृथ्वीराज कपूर, मास्टर विनायक, बाबुराव पेंढारकर, मास्टर विठ्ठल, ललिता पवार, वगैरे.

चित्रकला, शिल्पकला, कॅमेरा तयार करून चित्रिकरण करणे, रंगांसंबधी आणि रंग मिश्रणासंबंधी कसलंही विशेष शिक्षण न घेता प्रचंड माहिती असणारे आणि त्या संदर्भात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये काही व्याख्यानं देणारे बाबुराव पेंटर, कलामहर्षी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांची चित्रं १९३० पासून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई मध्ये आहेत. त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांची शिल्पं आजही इथं कोल्हापूरात बघायला मिळतात. आज आमच्या कलापुरातल्या ह्या महर्षीचा जन्मदिवस.

कलामहर्षी बाबुराव पेंटर यांची काही चित्रं आणि फोटो;

-पहिलं चित्र, 'जलवाहिनी' तैलरंगात काढलेलं हे चित्र.
-दुसरं चित्रं, 'रंगपंचमी' हेही तैलरंगात काढलेलं चित्र, हे चित्र औंधच्या संग्रहालयात पहायला मिळतं, याचबरोबर तिथे 'वटपूजा', 'रूपगर्वीता' , 'देवळात जाताना' यासारखी काही चित्रंही पहायला मिळतात.
-तिसरं चित्र 'लक्ष्मी' हे चित्र फाळके फॅक्टरीसाठीचं होतं. हेही तैलरंगातीलं चित्र आहे. हे चित्र कोल्हापूर म्युझियममध्येही पहायला मिळतं.
-शेवटचं जे चित्र आहे ते चित्रकारमित्र अन्वर हुसैन यांनी काढलेलं बाबुराव पेंटर यांचं अप्रतिम स्केच आहे.
-हा फोटो बाबुराव पेंटर फाळके फॅक्टरीसाठी लक्ष्मीचं चित्रं काढत असतानाचा आहे.
-आणि हा फोटो मिस्त्री त्यांनी स्वतः तयार केलेल्या कॅमेऱ्यानी शूटिंग करत असतानाचा आहे.

~अवंती

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान आहे लेख. पण चित्रं किंवा लिंक्स नाही दिसत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण चित्रं किंवा लिंक्स नाही दिसत.

ती फक्त पुण्यवान लोकांनाच दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(येशू मेला सगळ्यांच्या पापांसाठी.) आता सगळ्यांचं पुण्य वाढलंय का पाहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही.

- (पापी) 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला क्रोममध्ये दिसतंय, पण फायरफॉक्समध्ये दिसत नाहीये. कदाचित हा गूगलचा चावटपणा असावा. गूगलमध्येही ऐसीच्या आयडीनं लॉगिन करूनच दिसतंय; प्रायव्हेट टॅब उघडली तर गायब.

अवंती, तुझ्या फेसबुकवरून फोटो डकवलेत. आता येशूचं बलिदान कारणी लागलं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्याचे लोक पुण-या-चे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो ब्लॉगवर टाका, पब्लिश करून लिंक्स काढा.
( ब्लॉग साठी खोटा/पर्यायी जिमेल वापरता येतो.)
लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो दिसत नाहीयेत, त्यामुळे कशाबद्दल बोलत आहेत काही कळत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवंती, अदिती धन्यवाद.
पापी कोण ?
-- ऐसीकृपे पावन जाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

**गूगलचा चावटपणा असावा.**

परवा मिपाच्या धाग्यावरही ( नेदरलँड) हाच प्रकार झाला. दहापैकी नऊजणांना फोटो दिसत नव्हते. उगाच पापपुण्याची टोचणी.
शेअरिंग लिंक फर योर वेबसाइट नियमांमध्ये अदितीचा ऐसीअक्षरे आइडी बसतो. आणि तिचा क्रोम ब्राउजर सिंक केलेला असल्याने तिथे दिसतात फोटो.
हे स्पष्टीकरण बरोबर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा, कलामहर्षींचे नाव आले, बरे वाटले.
आमचे कॉलेज शिक्षण त्यांच्याच चिरंजीवाच्या म्हणजेच रविन्द्र मेस्त्रींच्या संस्थेत. कलानिकेतन महाविद्यालय, कोल्हापुर.
त्यांचे दुसरे चिरंजीव अरविंद मेस्त्री कलानिकेतनचे प्राचार्य होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अग्नी-कोल्हा वापरतोय, एक पण चित्र दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0