पुन्हा जंतर मंतर: : भाग १

'नरेन्द्र ट्रॅक्टरसे कुचला गया; सोनवणे जिंदा जला दिया गया' हे वाचून मला कुठल्यातरी टी.व्ही. मालिकेची माहिती दिसते आहे असं वाटलं होत. पण लागोपाठ दोन तीन दिवस तोच निरोप येत राहिल्यावर मी तो नीट वाचला. त्यातून लक्षात आलं की तो 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' कडून आलेला निरोप आहे आणि दुसरं म्हणजे २५ मार्चला 'जंतर मंतर' वर एक दिवसाच लाक्षणिक उपोषण आहे. अनायासे तो रविवार होता आणि मी दिल्लीत असणार होते; त्यामुळे जायच ठरवलं.

साधारणपणे साडेदहाला मी पोचले तोवर आधीच भरपूर गर्दी जमली होती. मागच्या वेळी 'जंतर मंतर' वर पोलिस होते पण ते निवांत होते. याहीवेळी ते निवांत होते पण सावध होते - त्यामुळे सुरक्षा तपासणीतून जावं लागलं - ज्याबद्दल माझा कधीच आक्षेप नसतो. एप्रिल २०११ मधलं 'जंतर मंतर'वरचे उपोषण आणि ऑगस्ट २०११ मधलं रामलीला मैदानावरचं उपोषण हे दोन्ही मी काहीसं जवळून, म्हणजे त्यात थोडी सहभागी होऊन पाहिलं होतं. रामलीला मैदानाने तर माझा भ्रमनिरास केला होता. त्यानंतर मुंबईत फार कमी प्रतिसाद मिळाल्याचंही पाहिलं होतं. तरीही मी यावेळी परत जायच ठरवलं कारण भ्रष्टाचार हा माझ्याही मते एक मोठा सामाजिक मुद्दा आहे. शिवाय आधीच्या चुकांमधून आंदोलन काही शिकलं आहे की नाही हे पाहण्याचीही उत्सुकता होती.

यावेळच वातावरण एकदम वेगळं होत हे प्रथमदर्शनीच लक्षात आलं. एप्रिल २०११ मधल वातावरण भाबडं आणि उत्साही होतं. त्यावेळी जो तो स्वतंत्रपणे काही ना काही करत असे. तिथे पाठीशी 'भारतमातेच' चित्र होतं आणि व्यासपीठ छोटं होतं. रामलीला मैदानावर वातावरण जास्त आक्रमक आणि काहीसं धोरणी होतं. अण्णा तोवर 'दुसरे गांधी' झालेले होते आणि 'मै अण्णा हूं' अशी टोप्या आणि टी शर्ट यांचा सुळसुळाट होता. दोन्ही ठिकाणी घोषणाबाजांचा सुकाळ होता. 'जीत के कगार पर हम है' अशी भावना होती, काहीसा उद्दामपणा होता. जमलेली गर्दी म्हणजे आंदोलनाला पाठबळ असा साधा हिशोब तेव्हा होता. संसदेने अधिवेशन बोलावलं म्हणजे झालंच आता काम अशी मानसिकता होती.

यावेळीही 'मै अण्णा हूं' टोप्या आणि टी शर्ट होते पण त्यांची संख्या तुलनेने कमी होती. घोषणाही फार अंगावर येणा-या नव्हत्या - माफक होत्या - ज्या वातावरणनिर्मितीसाठी आवश्यक होत्या. गीतेही मोजकीच होती - दिवसभरात फक्त चार (किंवा पाच फार फार तर). व्यासपीठावर सगळे एकत्र बसले होते आणि मुख्य म्हणजे व्यासपीठाच्या भिंतीवर दोन तिरंगा आणि काही शहीदांचे फोटो होते. हे शहीद कोण - या प्रश्नाचे उत्तर तसं मला आलेल्या एस. एम. एस. मधे होतच म्हणा!

कार्यक्रमाची सुरुवात या शहीदांना श्रद्धांजली वाहून झाली. त्यानंतर गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवल्याने मारल्या गेलेल्या शहीदांची ओळख करून देण्यात आली. या प्रत्येक व्यक्तीवर एक मिनिटाची फिल्म केली होती (कोणी ते माहिती नाही) ती दाखवून मग त्या व्यक्तीच्या कुटुंबियांपैकी एकजण अधिक तपशील देत होता. हा सगळा कार्यक्रम अंगावर काटा आणणारा होता. राज्यांच्या सीमा ओलांडून लोक भ्रष्टाचाराविरुद्ध लढताहेत आणि शासन कोणत्याही पक्षाचे असो, त्याची किंमत कार्यकर्ते मोजत आहेत हे चित्र विषण्ण करणारं होतं.

होळीच्या दिवशी (८ मार्च २०१२) बेकायदेशीर खाणकामाविरुद्ध आवाज उठवणारा पोलिस अधिकारी नरेन्द्र कुमार ट्रॅक्टर अंगावर घालून मारला जातो; सत्येन दुबे (२८ नोव्हेंबर २००३) राष्ट्रीय महामार्गातील भ्रष्टाचार पंतप्रधान कार्यालयाला 'माझे नाव गुप्त ठेवा' अशी विनंती करत कळवतो. त्यावेळी केंद्रात वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एन. डी. ए. चे सरकार होते आणि बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे. तरीही पंतप्रधान कार्यालयातून हे पत्र 'फुटते' आणि दुबे यांची हत्या होते. लखनौ आय. आय. एम. मधून पदवी घेतल्यावर मंजूनाथ इंडियन ऑईल मध्ये काम स्वीकारतो आणि तेलात भेसळ पकडताना २७व्या वर्षी (१९ नोव्हेंबर २००५) गोळ्या घालून मारला जातो.

अमित जेटवा हा गुजरातमधील 'माहिती अधिकाराचा' कार्यकर्ता. सौराष्ट्रातल्या बेकायदेशीर खाणकामाबद्दल त्याने रीतसर तक्रार नोंदवली होती. २० जुलै २००९ रोजी कोर्टासमोर गोळ्या घालून त्याचा जीव घेण्यात येतो. आंध्र प्रदेशातील सीतारामपूर भागातील सोला रंगा राव हा तीस वर्षांचा पोलिओग्रस्त तरूण. गावातील विकास कामासाठी किती पैसे आले आहेत अन ते कसे खर्च झाले आहेत हे कळावे म्हणून 'माहिती अधिकारा'अंतर्गत तो अर्ज दाखल करतो, त्यापायी त्याला १५ एप्रिल २०१० रोजी जीव गमवावा लागतो. त्याला सळईने मारहाण झालेली दिसते. झारखंडमधला ललितकुमार मेहता रोजगार हमी योजनेतील घोटाळे उघडकीस आणतो आणि त्यालाही १४ मे २००८ या दिवशी मारण्यात येते. झारखंडमधल्या कामेश्वर यादवची याच गोष्टीसाठी ७ जून २००८ रोजी हत्या होते. याच राज्यातल्या नियामत अन्सारीने आपले प्राण असेच गमावले.

बेगुसराय (बिहार)मधल्या शशिधर मिश्राची तर रोजगार हमी घोटाळे उघडकीस आणले म्हणून त्याच्या घरासमोर त्याला गोळ्या मारून त्याची चाळणी केली गेली ती १४ फेब्रुवारी २०११ या दिवशी. पुण्याचे 'माहिती अधिकार' कार्यकर्ते सतीश शेट्टी (१३ जानेवारी २०१०) आणि कोल्हापूरचे दत्ता पाटील (२६ मे २०१०) यांच्या हत्यांची आपल्याला माहिती आहेच. महेन्द्र शर्मा, विश्राम ढुढिया, तामिळनाडूचा सतीशकुमार, उत्तर प्रदेशातले डी.पी. सिंग ... एकामागून एक घटना आणि त्यातले साम्य जाणवत होते. एक जण कोणीतरी घोटाळा शोधून काढतो, संबंधितांना त्याचा कायदेशीर जाब विचारला जातो आणि शेवटी तो स्वतःचे प्राण गमावतो. जाणारा तर गेला पण भ्रष्टाचाराचा भस्मासूर मात्र तसाच कायम आहे. यातल्या अनेक खटल्यांचे निकाल लागणं तर सोडून द्या, आरोपीही अद्याप सापडलेले नाहीत. लोकपाल' कायदा असता तर या लढणा-या कार्यकर्त्यांना संरक्षण देता आले असते, निदान काही जीव तरी वाचले असते - अशी संयोजकांची हळहळ अनेकांना स्पर्श करून गेली आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढणे हे फक्त तिरंगा लहरवत 'वंदे मातरम' म्हणण्याइतके सोपे नाही याची जाणीव जमलेल्या लोकांना होते आहे असं त्यांच्या संवादावरून, त्यांच्या विचारमग्न चेह-यांवरून जाणवलं मला. या शहीदांच्या घरच्यांची हिंमत खरच दाद देण्याजोगी होती. ललितकुमारची पत्नी जेव्हा म्हणाली, "मी तर या एका आशेवर जगतेय की ज्यासाठी माझ्या पतीला प्राण द्यावा लागला, त्या भ्रष्टाचाराचा कधीतरी नाश होईल ..." तिच्या या जिगरबाज शब्दांनी तिथे जमलेले लोक क्षणभर निस्तब्ध झाले.

मी मागेही म्हटले होते तसे दिल्लीच्या एरवी अतिशय आक्रमक आणि स्त्रियांशी गलिच्छ वागणा-या गर्दीचा मला आणखी एक चांगला अनुभव आला. लोकांच्या एकत्र येण्याचे कारण जर चांगले असेल तर लोक आपणहोऊन चांगले वागतात हे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. सात तास मी एकटी स्त्री अनोळखी लोकांच्या गर्दीत होते पण मला काहीही त्रास झाला नाही. सहा सात तास एकत्र बसल्यामुळे आसपासच्या लोकांशी थोडी ओळख झाल्यासारखे वाटायला लागले होते. साधारण संध्याकाळी पाचच्या सुमारास माझ्याशेजारी एक पुरुष येऊन बसला तेव्हा त्याला मात्र मला 'नीट बसा तुम्ही' असं सांगायला लागलं. माझ हे वाक्य ऐकून शेजारच्या अनेकांनी त्याच्याकडे पाहिलं. तिस-यावेळी मी पुन्हा तेच त्या गृहस्थाला सांगितल्यावर अचानक माझ्या पुढे बसलेला दुसरा एक पुरुष त्याला म्हणाला, "ते बघा, तुम्हाला हात करताहेत." त्या गृहस्थाने त्या दिशेला वळून पाहिलं तर कोणीच नव्हत. त्यावर माझ्या पुढचा पुरुष त्याला म्हणाला, "ते बघा, ते चहाच्या टपरीकडे गेले ते, पोलिसांच्या आड आहेत ते त्यामुळे तुम्हाला दिसत नाहीत ते. जा तुम्ही तिकडे." मग हा माणूस उठून तिकडे गेल्यावर मागचा एक पुरुष पुढे सरकला. तो गृहस्थ परत आला तरी त्याला आता ती जागा परत मिळणार नव्हती. मग पुढचा माणूस माझ्याकडे पाहून हसून म्हणाला, "बसा आता तुम्ही निवांत. तो पिऊन आला होता, पण त्याला आता पळवून लावलय आम्ही." त्याच्या या हुषारीच मला मनापासून कौतुक वाटलं.

उत्तरेत वावरताना कवींना एक वेगळा मान असल्याच जाणवतं. कविता लिहून सामाजिक क्रांती घडवून आणायची स्वप्नं आजही इथले कवी पाहतात. या कवींना स्वतःच्या रचना अत्यंत तालासुरात गाता येतात हे आणखी एक विशेष. कुमार विश्वास या तरूण कवीची 'होठों पे गंगा हो, हाथों मे तिरंगा हो' ही रचना तिथं जमलेल्या लोकांना बेभान करायला समर्थ होती. 'जंतर मंतर कब तक' अशी कोणत्यातरी वाहिनीवर चर्चा चालू असल्याचे सांगून तो म्हणाला, "याच उत्तर सोप आहे: भ्रष्टाचार जब तक, जंतर मंतर तब तक” - यावर लोकांनी उस्फूर्त पाठिंबा दिला त्याला. अजमेर जिल्ह्यातल्या शहनाझ राजस्थानी या आणखी एका कवीने 'वंदे मातरम' या घोषणेसह सुरुवात केली आणि 'मी ही घोषणा देतोय याच अनेकांना आश्चर्य वाटत असेल' हेही सांगितल. क्षणभर थांबून पुढे तो म्हणाला, "मै मुसलमान हूं, मगर हिन्दुस्थानी मुसलमान हूं" - अशी वाक्य एरवी ऐकताना काही वाटत नाही; पोकळ वाटतात ती - पण त्या समुहात बसून ऐकताना त्या वाक्याने समुहात किती उर्जा पेटवली ही अनुभवण्याचीच गोष्ट आहे. 'कुछ भी हो जाये, हमको ये तस्वीर बदलनी है' या त्याच्या कवितेवर मग सगळेजण डोलत होते. सामाजिक आंदोलनांत कलेचा माध्यम म्हणून उपयोग करणं हे काही नवीन नाही आपल्याला - पण इतिहासाचा वारसा पुढे न्यायला नवीन पिढीतही तितके समर्थ कलाकार आहेत हे जाणवून बर वाटलं.

मागच्या वेळी आपण लढाई तर जिंकली पण तहात हरलो, ही जाणीव 'टीम अण्णा'ला अखेर एकदाची झाली आहे हे पुढच्या काही तासांत त्यांच्या बोलण्यावरुन लक्षात आलं. उपोषण दिल्लीत असल्यामुळे अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांचे समर्थक मोठया संख्येने तिथे आले असणार हे स्वाभाविक आहे. पण किरण बेदी आणि केजरीवाल यांच ज्या पद्धतीने लोक स्वागत करत होते, त्यावरून त्या दोघांवर झालेल्या आरोपाला निदान दिल्लीच्या जनतेने तरी फारशी किंमत दिलेली नाही हे स्पष्ट झालं. त्या दोघांच बोलणं ऐकून मला हे आंदोलन आता योग्य दिशा पकडतय असं वाटलं; कारण आंदोलन दीर्घ काळ चालवावं लागणार आहे, त्यासाठी नुसती भावनिक एकता पुरेशी नाही तर आपले विचार जुळले पाहिजेत, चर्चा आणि अभ्यास केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं.

लेख फार मोठा होतोय म्हणून इथे थांबते सध्या. कदाचित थोड लिहीन आणखी पुढच्या भागात.

field_vote: 
4.75
Your rating: None Average: 4.8 (4 votes)

प्रतिक्रिया

वाचतो आहे. वर्तमानपत्रांतल्या बातम्यांमध्ये आंदोलनासाठी कोण आले, किती आले, मोर्चा कुठे अडवला, वगैरे खोगीरभरती असते. त्यात आंदोलनाचा आत्मा हरवतो. तिथलं वातावरण थोडं इथे उलगडून दाखवल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कदाचित थोड लिहीन आणखी पुढच्या भागात.

कदाचित का, नक्की लिहाच असा आग्रह करते. त्या निमित्ताने आम्हा अनिवासींना सद्ध्याच्या तिथल्या वातावरण / परिस्थितिची खरी माहिती मिळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'थेट' लेख! आवडला!
मी भ्रष्टाचारविरोधी असलो तरी फारसा अण्णांच्या टीमच्या बाजूने नाहि. मात्र हा आखोदेखा हाल हुरहुर लाऊन गेलाच! व्हिसलब्लोअरची परिस्थिती वाईट आहे हे निर्विवाद (त्यासाठी लोकपालच हवा ही मागणी काहिशी अनाकलनीय).. मात्र तरीही गेल्यावेळी हिट विकेट झालेली टिम अण्णा या इनिंगमधे कसे खेळते ते बघायचे!

तुमचेही जे पटते तिथे प्रत्यक्ष सहभाग घेण्याबद्दल कौतूक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

होळीच्या दिवशी (८ मार्च २०१२) बेकायदेशीर खाणकामाविरुद्ध आवाज उठवणारा पोलिस अधिकारी नरेन्द्र कुमार Tractor अंगावर घालून मारला जातो; सत्येन दुबे (२८ नोव्हेंबर २००३) राष्ट्रीय महामार्गातील भ्रष्टाचार पंतप्रधान कार्यालयाला 'माझे नाव गुप्त ठेवा' अशी विनंती करत कळवतो. त्यावेळी केंद्रात वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एन. डी. ए. चे सरकार होते आणि बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे. तरीही पंतप्रधान कार्यालयातून हे पत्र 'फुटते' आणि दुबे यांची हत्या होते. लखनौ आय. आय. एम. मधून पदवी घेतल्यावर मंजूनाथ इंडियन ऑईल मध्ये काम स्वीकारतो आणि तेलात भेसळ पकडताना २७व्या वर्षी (१९ नोव्हेंबर २००५) गोळ्या घालून मारला जातो.

अमित जेटवा हा गुजरातमधील 'माहिती अधिकाराचा' कार्यकर्ता. सौराष्ट्रातल्या बेकायदेशीर खाणकामाबद्दल त्याने रीतसर तक्रार नोंदवली होती. २० जुलै २००९ रोजी कोर्टासमोर गोळ्या घालून त्याचा जीव घेण्यात येतो. आंध्र प्रदेशातील सीतारामपूर भागातील सोला रंगा राव हा तीस वर्षांचा पोलिओग्रस्त तरूण. गावातील विकास कामासाठी किती पैसे आले आहेत अन ते कसे खर्च झाले आहेत हे कळावे म्हणून 'माहिती अधिकारा'अंतर्गत तो अर्ज दाखल करतो, त्यापायी त्याला १५ एप्रिल २०१० रोजी जीव गमवावा लागतो. त्याला सळईने मारहाण झालेली दिसते. झारखंडमधला ललितकुमार मेहता रोजगार हमी योजनेतील घोटाळे उघडकीस आणतो आणि त्यालाही १४ मे २००८ या दिवशी मारण्यात येते. झारखंडमधल्या कामेश्वर यादवची याच गोष्टीसाठी ७ जून २००८ रोजी हत्या होते. याच राज्यातल्या नियामत अन्सारीने आपले प्राण असेच गमावले.

बेगुसराय (बिहार)मधल्या शशिधर मिश्राची तर रोजगार हमी घोटाळे उघडकीस आणले म्हणून त्याच्या घरासमोर त्याला गोळ्या मारून त्याची चाळणी केली गेली ती १४ फेब्रुवारी २०११ या दिवशी. पुण्याचे 'माहिती अधिकार' कार्यकर्ते सतीश शेट्टी (१३ जानेवारी २०१०) आणि कोल्हापूरचे दत्ता पाटील (२६ मे २०१०) यांच्या हत्यांची आपल्याला माहिती आहेच. महेन्द्र शर्मा, विश्राम ढुढिया, तामिळनाडूचा सतीशकुमार, उत्तर प्रदेशातले डी.पी. सिंग ... एकामागून एक घटना आणि त्यातले साम्य जाणवत होते. एक जण कोणीतरी घोटाळा शोधून काढतो, संबंधितांना त्याचा कायदेशीर जाब विचारला जातो आणि शेवटी तो स्वतःचे प्राण गमावतो. जाणारा तर गेला पण भ्रष्टाचाराचा भस्मासूर मात्र तसाच कायम आहे.

यातल्या अनेक खटल्यांचे निकाल लागणं तर सोडून द्या, आरोपीही अद्याप सापडलेले नाहीत.

Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजेश, माझ्या मते प्रसारमाध्यमं एका विशिष्ट दृष्टिकोनातून घटना पाहतात आणि पोचवतात (जे स्वाभाविक आहे). त्यामुळे कधीकधी (खरं तर बरेचदा) अशा विषयांबाबत, सामाजिक आंदोलनाबाबत मत बनवताना आपण त्यात सहभागी होण्याने आपला स्वतःचा दृष्टिकोन तयार होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात व्यक्ती म्हणून माझेही पूर्वग्रह, आवडी-निवडी, मूल्य.. यातून माझे मतही दिसते तितके तटस्थ नसते खरे तर - हेही आहेच.

ऋषिकेश, जन लोकपालबाबत माझ्याही मनात शंका आहे. पण इतके लोक जर भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवताना मारले जात असतील तर काहीतरी गंभीरपणाने करायची गरज आहे. या घटना एकेकटया समोर येतात तेव्हा आपण पुरेसे निर्ढावलो असल्याने त्याची तीव्रता जाणवत नाही. पण त्यादिवशी एका वेळी २५ लोकांचे 'असे' मृत्यू पाहताना; त्यांच्या मागे उरलेल्या त्यांच्या घरच्या साध्यासुध्या माणसांना पाहताना मात्र (ते कदाचित एक धोरण असेल आंदोलनाचे अशी टीकाही होऊ शकते त्यावर) फार अस्वस्थ वाटलं - स्वतःची लाजही वाटली मला. म्हणजे यासाठी मी काहीच करत नाही याची.

व्हाईट बर्च, सहज आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे पंचवीस (किंवा त्याहूनही अधिक) लोक मारले जाणं आणि लोकपाल यांचा फारसा सेंद्रिय स्वरूपाचा संबंध आहे असे दिसत नाही. अगदी जनलोकपालसारखी मूर्ख व्यवस्था अंमलात आली तरीही या पंचविसांची सुरक्षा होणार नाही. जखम आणि इलाज यांच्यात जे नाते लागते, ते नाते टीम अण्णाला समजलेले दिसत नाही, किंवा समजूनही ती त्यात पडत नाहीये.
आंदोलन चालू राहील. त्याला शुभेच्छा.
तुमचे लेखन नेहमीप्रमाणेच चांगले झाले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोडक सर, 'जन लोकपाल' म्हणजे जादूची कांडी नाही याच भान आंदोलनाला जितक्या लवकर येईल तितकं बरं याविषयी दुमत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला असे म्हणवत नाही इतका मनाला भिडला.
कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून गप्प बसायची सोय नसती तर काय केलं असतं असा विचार मनात आला आणि हे आंदोलनकर्ते अगदीच चुकीचे नाहीत हे पुन्हा कळले.
धन्यवाद. पुढच्या भागाची वाट पाहत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नगरी निरंजन, आपण फारच निर्ढावलो आहोत आणि जे काय करायच ते दुस-यांनी करावं - त्यातल्या चुका फक्त आम्ही दाखवून देऊ - अशी एक मानसिकता झाली आहे आपली अनेकांची. त्यातून बाहेर पडणं - सामूहिक बाहेर पडणं (त्यात सगळे नसतील पण निदान 'क्रिटीकल मास' असेल)- आवश्यक आहे नाहीतर २५ ची यादी वाढतच जाईल आणि प्रश्न तसाच राहील शिल्लक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडलाच (?). २५ लोकांचा अशा प्रकारे अंत होणं खेदजनक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिति, खेदजनक तर खरच!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. अशा लेखांना साधारण दोन प्रकारचे प्रतिसाद येतात. एकतर 'अण्णा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' या धर्तीच्या 'देश उबल रहा है, जरुर कुछ बदलाव होगा' अशा 'टाटा टी' स्वरुपाचे भाबडे प्रतिसाद आणि दुसरे 'कसली आंदोलने करता? तुम्हाला मूळ मुद्दा तरी कळला आहे काय? अशा स्वरुपाचे खवचट प्रतिसाद. काल नक्षल समस्येवर टीव्हीवर चाललेल्या चर्चेत ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार सामिल झाले होते. इतर लोक नक्षल समस्येची उत्तरे काय या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करत असताना द्वादशीवार मात्र 'अरे मूर्खांनो, तुम्हाला हा प्रश्नच कळालेला नाही... आधी आम्हा पत्रकारांना विचारा की प्रश्न काय आहे आणि मग करा तुमच्या चर्चा न फिर्च्या' अशा आशयाचे बोलत होते. लोकशाहीच्या या स्तंभाची ही भूमिका मला कळालेली नाही. पत्रकारितेच्या व्यवसायात जीवन अगदी जवळून बघितले जात असल्याने माणसे अशी कडवट होत जातात, की मुळात असलेला कडवटपणा पत्रकारितेच्या व्यवसायामुळे अधिक फुलून येतो ( 'Money does not change people; it magnifies what is already there) हे (मला तरी) ठाऊक नाही. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

सन्जोप राव, पारिस्थिती इतकी गुंतागुंतीची आहे की कोणा एकाकडे (एकीकडे) एकदम बरोबर उत्तर असेल अशी अपेक्षा करणं चुकीच आहे. पण आपण सरसकट उत्तर शोधायला बघतो त्यामुळे अनेक लोकांच ऐकूनही घेतलं जात नाही साध! इथ मी द्वादशीवारांबाबत नाही बोलत कारण मला त्यांच्याबद्दल खूप कमी माहिती आहे - पण असं घडत तेव्हा माणसं कडवटपणे बोलताना दिसतात. अर्थातच पत्रकारांना सगळं कळतं हासुद्धा एक गैरसमजच!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थातच पत्रकारांना सगळं कळतं हासुद्धा एक गैरसमजच!!

आईगं... इतकं कटू सत्य असं नसतं हो लिहायचं! Wink काय सांगू तुम्हाला आता...
ते जाऊ दे... तुम्हाला हे कसं कळलं ते सांगा की एकदा. किश्शांच्या स्वरूपात. मस्त मजा येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आतिवास, तुम्ही आंदोलनाची एक बाजू डोळ्यासमोर आणली जी प्रसारमध्यमांतून कधीच समोर येत नाही.
आपण म्हणतो की कोणीतरी पुढाकार घ्यायलाच हवा; पण पुढाकार घेणार्‍यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढवला जात असेल किंवा जिवंत जाळलं जात असेल तर आता कोणी पुढाकार घ्यावा असं म्हणायलाही धीर होत नाही. भ्रष्टाचाराची कीड इतकी खोलवर पसरलीये की हे असे थोडेही तपशील मिळाले की हताश व्हायला होतं.

अवांतरः अर्थातच पत्रकारांना सगळं कळतं हासुद्धा एक गैरसमजच!!
अरेच्चा! हा आमचा गैरसमज आहे का? पण श्रामोंना बघून तर आम्हाला तो योग्यच समज वाटायचा Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

अवांतरः अर्थातच पत्रकारांना सगळं कळतं हासुद्धा एक गैरसमजच!!
अरेच्चा! हा आमचा गैरसमज आहे का? पण श्रामोंना बघून तर आम्हाला तो योग्यच समज वाटायचा (डोळा मारत)

दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं...
डोळा मारू नकोस गं... त्रास होतो. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं...

म्हणजे पत्रकार लोक सामान्य माणसाची फसवणूक करतात, असं का?

डोळा मारू नकोस गं... त्रास होतो.

काय त्रास होतो? डोळा दुखतो का? वयोमानानुसार काळजी घेत जा आता Blum 3

स्वगतः डोळा मारायची स्मायली कॉपी केली की (डोळा मारत) असं लिहून येतंय... सगळ्या स्मायल्या कॉपी करून पाहिल्या पाहिजेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं...

म्हणजे पत्रकार लोक सामान्य माणसाची फसवणूक करतात, असं का?

मी सर्वज्ञानी नाही. त्यामुळं मी असं विधान केलेलं नाही. मी त्याची जबाबदारी घेणार नाही. Smile

डोळा मारू नकोस गं... त्रास होतो.

काय त्रास होतो? डोळा दुखतो का? वयोमानानुसार काळजी घेत जा आता

खिक्... हेच अपेक्षीत होतं. मंडळ आभारी आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्मिता, एकटयाने पुढाकार घेणा-यांची काय गत होते हे पुन्हपुन्हा दिसून आलयं - आता कदाचित संघटित प्रयत्नांची वेळ आली आहे असं वाटतं. कीड खोलवर पसरलीय हे खरच आहे!!

('ट्रॅक्टर' शब्द सापडला मला तुमच्यामुळे. अजूनही टंकता नाही येत तो, आता सरळ हाच तिकडे डकवते Smile )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बातमी असूनही भाषेतील अगत्यामुळे काळजास भिडली. सुरेख कथन !
बाकी आता आता भ्रष्टाचाराविरुद्ध जाग्रुती होऊ लागली आहे. दिशा सापडायला वेळ लागणार. पण सुरुवात झाली आहे हाच दिलासा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्नेहांकिता, आभार. प्रवास गुंतागुंतीचा असल्याने आंदोलन चाचपडणं अपरिहार्य आहे - आपण थोडा धीर (पेशन्स) ठेवला पाहिजे. मला अनेकदा जाणवतं की 'टीम अण्णा'कडून लोक चमत्काराची अपेक्षा करत आहेत. पण असे चमत्कार प्रत्यक्ष जीवनात घडत नाहीत (चमत्कार घडतात असं वाटतं तेव्हा त्यामागे ब-याच घडामोडी झालेल्या असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"....त्या दोघांच बोलणं ऐकून मला हे आंदोलन आता योग्य दिशा पकडतय असं वाटलं; कारण आंदोलन दीर्घ काळ चालवावं लागणार आहे."

~ सविता, खुद्द तुम्हाला [तिथे प्रत्यक्ष हजर असल्यामुळे] असे वाटते हे या लेखाचे उत्तम सार आहे. अन्यथा आपल्याकडील उथळ प्रवृत्तीच्या मिडियाने जितक्या जोमाने या आंदोलनाच्या पहिल्या अवस्थेला उचलून धरले तितक्याच वेगाने त्याचा 'फियास्को' कसा झाला यावरही तावातावाने आदळाआपट करून [ठरलेली ती चीड आणणारी ऑनलाईन मतमोजणीही स्क्रीनवर दाखवून] 'टीम अण्णा कशी चुकली' याचा लसावी काढण्यात मग्न झाली होती. पण बेदी आणि केजरीवाल यानी आपण अशा आरोपापुढे झुकलेलो नाही हेच या कृतीतून दाखविले ते योग्य होय.

विज्ञानामुळे प्रसारमाध्यमे वाढली हे एक सुचिन्ह मानले गेले होते, पण त्याचा परिणाम आजकाल अनेकांच्याबाबतीत ज्ञानापेक्षा अज्ञान, सौजन्यपेक्षा उद्धटपणा यांच्या वाढीत झालेला दिसतो. टीम अण्णाला हे निश्चित माहीत असणार. त्यांच्याभोवती वृत्तपत्रे, साप्ताहिके, नियतकालिके, आकाशवाणी व डझनावारी वाहिन्यांचे जाळे अशारितीने गुंफण्यात आले आहे की उपोषणाच्या ठि़काणी एखादी 'खार' जरी तुरतुरत शेजारील झाडावर चढू लागली तरी वाहिन्यांच्या अतिउत्साही जीन्सधारी शलाका त्याची कारणमीमांसा केजरीवाल बेदीला विचारतील. त्यामुळे आता टीमच्या सदस्यांवरच आपण किती आणि कुणासमोर 'क्रांती' बाबत बोलायला हवे याचे भान ठेवण्याची वेळ आली आहे.

"....भावनिक एकता पुरेशी नाही...."
~ घोडे पेंड खाते ते इथेच सविता. अण्णांनी आंदोलन छेडले व ते यशस्वी करून दाखविले ही भावना आणि त्यायोगे अवतीभोवती जमलेल्यांत निर्माण झालेली एकता दिल्ली-अजगराला जागे करण्यास पुरेशी नाही. ते होईल फक्त मतदानाच्या पेटीतून. ती जागृती जर झाली नाही तर मग अशा एक नव्हे डझनावारी उपोषणांनी टीमला अपेक्षित असलेल्या क्रांतीकडे एक पाऊलही जाणार नाही.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशोक पाटील, कुणालाही डोक्यावर बसवायची, देव बनवायची आपल्याला घाई असते आणि ते काम 'विचारपूर्वक' बरेचदा केलेले नसल्याने अशा व्यक्तीच्/गटाच अपयशही माणसं मनापासून आनंदाने पाहताना दिसतात. मीडिया शेवटी इथल्या माणसांचाच - त्यामुळे त्याच्याकडून वेगळं काही निदान मला तरी अपेक्षित नाही.

नुसती भावनिक निष्ठा असेल, तर ती संपण पण सोपं असतं - याच भान आंदोलनाला मुंबईतल्या अनुभवानंतर आलेलं दिसतय. प्रश्न दिसतो त्याहून गुंतागुंतीचा आहे हे समजून घेण्याची सुरुवात झालेली दिसते आहे हे माझ्या मते चांगलं लक्षणं आहे. प्रत्यक्षात काय होते पुढे ते पहावे लागेल - नुसती बघ्याची भूमिका न घेता आपण काही करू शकतो का याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे असे मात्र वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0