ब्रह्मे- एकोणिसाव्या शतकात!

संकल्पना

ब्रह्मे- एकोणिसाव्या शतकात!

- ज्युनियर ब्रह्मे

(ज्युनियर ब्रह्मेलिखित ‘ब्रह्मेघोटाळा’ या पुस्तकातील एक संक्षिप्त वेचा. ब्रह्मेंची परंपरा पाठीमागे नेत एकोणिसाव्या शतकातले ब्रह्मे कसे होते, याचा घेतलेला हा एक छोटासा धांडोळा.)

'माझा प्रवास' हे गोडसे भटजींंचे प्रवासवर्णन सोडले तर मराठीत बरीच वर्षं चांगल्या प्रवासवर्णनाची वानवा होती. प्रवासाच्या नावाखाली लोक काहीही दडपून लिहायचे. 'यमुनापर्यटन' हे प्रवासवर्णन असेल असं वाटणारं पुस्तक चक्क विधवाविवाहावरची कादंबरी निघाली. पुढं पु. ल. देशपांडेंपासून अनिल अवचटांपर्यंत (व्हाया मीना प्रभू) अनेकांनी प्रवासवर्णनं लिहायचा अयशस्वी प्रयत्न केला. हे लोक अशी प्रवासवर्णनं का लिहितात याचा शोध घेतला असता त्याचं मूळ आमच्या पणजोबांनी लिहीलेल्या प्रवासवर्णनात आहे हे लक्षात आलं. समस्त लेखकांनी माझे पणजोबा 'सुंदरोजी विष्णू ब्रह्मे' यांच्यापासून स्फूर्ती घेतल्याचं लक्षात येतं.

सुंदरोजी विष्णू ब्रह्मे हे मराठीतले एक जुनाट प्रवासवर्णनकार. हे स्वतः एक संशोधक, लेखक, वाचक (आपल्याच लिखाणाचे), समाजसुधारक (अबलांचा उद्धार, दुसरं काय असणार?), द्रष्टे आणि रद्दीवाले तर होतेच, शिवाय ते ब्रह्मेही होते. केवळ त्यांचं पागोटं उशाला घेऊन झोपल्यामुळं त्यांचा पुतण्या (म्हणजे माझे चुलत-आजोबा) हे कालांतराने मोठे संशोधक झाले. पणजोबांना संशोधनकार्यानिमित्त इंग्लंड आणि अमेरिकेत जावं लागलं होतं. त्याचं त्यांनी सविस्तर प्रवासवर्णन लिहून ठेवलं आहे. परंतु काळाच्या ओघात ते हस्तलिखित न हरवल्यानं नाईलाजानं त्याचा काही भाग येथे प्रसिद्ध करावा लागत आहे.

"तत्प्रमाणे आम्ही सर्व वालुकेश्वराचे दर्शन घेऊन आगबोटीत सवार झालो. सांप्रतकाळी आपले एथें समुद्रावर पुंडावकी, चोरी यांचे भय अधिक. अचानक जहाजावर हमला करून लुटून नेण्याने त्यांनी मोठाच गहजप मांडला आहे. तरी सरकारने अशा बोटींवर ज्यांना काही मौल्यवान चीजवस्तू, द्रव्ये यांची नेआण करावयाची आहे त्यांना बोटींवर तोंपा ठेवणेस परमानगी दिली आहे. आमची बोट ग्रेत वेस्तर्न न्यावीगेषण कम्पनीची असून तिजवर तोंपा आणि बात्तेऱ्या असलेकारणे कोणाची हिमत होणे नाही. याउप्पर आमचे बोटीचा क्यापटन याने हाणरेबल लार्ड कर्णवालीस साहेबमजकुरांच्या मध्यस्थी करून एक सोजीरांची पलटण बोटीवर आणवली आहे. आमच्या बोटीचा विलायतेला जाणेचा मार्गही गुप्त राखणेत आला आहे. हा सगळा कडेकोट बंदोबस्त कशासाठी ऐसे पुसले तर सोन्यारुप्याहून मूल्यवान असा कोणी हुशार संशोधक गुप्तरूपाने बोटीवरून जात आहे ऐसे ऐकणेत आले. मीही संशोधनाचे कामी हयातीची कैक वर्षे घालीवली असलेकारणे त्याला भेटण्याची इच्छा मजच्या मनात उत्पन्न झाली.

मी लागलीच बोटीवर त्या दैवी पुरुषाचा शोध सुरु केला. विलायतीला जाणारी एक बोट पाहिली की एथें सृष्टीत कितीक प्रकाराची मनुष्यें राहतात याचा विस्मय वाटल्यावाचून राहत नाही. लांब कोट घातलेले पोर्टूगिझ् पाद्री, कवाईतीचा लाल कोट आणि निळी पाटलोण घातलेले सोजीर, गोल ह्याट आणि काळा कोट घालणारे विलायती हापिसर हेतर असतातच; त्याजशिवाय उंची चौकड्यांचा मंदिल बांधणारे मध्यप्रांती, गोल बसकी टोपी घालणारे मारवाडप्रांती शेठीये, पायघोळ लुंगी नेसून ती गुढघ्याशी बांधणारे मद्रदेशी, टोपी न घालणारे पण डोईला तेल लावणारे आणि डोळ्यांना आरशी लावणारे बंगप्रांती भद्रलोक, शंकुसारख्या उंच टोपीवाले पारशी, अर्धी गोल टोपीवाले दाढीदीक्षित यहुदी, गोल टोपीवाले मुसलमान, सुवर्णरंगी डिज्जाइनच्या उंच टोपीवाले बोहरी, उत्तरप्रांती पगडीवाले शीख, थाळीसारख्या मोठ्या टोप्या घालणारे आणि सुंभासारख्या मिशावाले चीनी, याशिवाय अघळपघळ चक्री पागोटेवाले देशीबंधू, पुणेरी पगडीतले भामटे, नुसताच वेडावाकडा रुमाल बांधलेला कोणी गावठी तमासगीर अशी भलीमोठी जत्रा कांपाच्या मैदानावर भरते तत्सम चित्र दृष्टीस पडते. ह्या असल्या भाऊगरदीतून कुणी एक मनुष्य हुडकून काढणे म्हणजे ब्रह्मदेवासही असाध्य कार्य. परंतु जे काम सामान्य माणसाने सहजि उरकत नाही ते करणे हेच आम्हां ब्रह्मेंनां प्रमाण.

केवळ अतार्किक बुद्धी असणे इतक्या माहितीवरून कुणीएक मनुष्याचा थांगपत्ता लागणे दुस्तरच. प्रथम असा कुणी मनुष्य गोऱ्या माणसांत असावा असा मी कयास बांधिला. त्याला शोधण्याकरिता मी वेषांतराचा आधार घेतला. बोटीच्या धोबीखान्यातून मूळ मालकांच्या परवान्यावाचून मिळवलेली काळी अर्धी तुमान, खाकी बिनबटनांचा सदरा, तांबडा कोट, त्याला साजेशी फरक्याप अशा वेशांतराने मी जसे इंग्रज लोकांतून असा बेमालूम मिसळून गेलो की जैसे की पाण्यात दूध. मी कुणी काळा नेटीव आहे याची पुसट शंकाही कोणाच्या मनांस आली नाही. रात्रप्रहरी जेव्हा युरोपीय लोकांचा चेंडूनाचाचा, ज्याला ते लोक बालडांस म्हणतात त्याचा, कार्यक्रम सुरु असताना मी तेथे अवचित प्रवेशकर्ता झालो. ते मला पाहून दोन स्त्रिया किंकाळी फोडत मूर्च्छित पडल्या, बाकी कैकजणी माझ्या एका दृष्टीक्षेपात कासावीस झाल्या. कुणी एका गोऱ्या दयाळू व्यक्तीने याउप्परअधिक मनुष्य हानी होऊ नये म्हणून मला 'सुन्दरोजी, कृपा करून तुम्ही बाहेर जाल का?' (यू सुव्वर, गेट औट ऑफ धिस रूम, ऑर आय विल किक यू औट) अशी पृच्छा केली. त्याला मान देत (म्हणजे माझी मानगूट हाती देत) मी बाहेर पडलो. ह्या अशा असंस्कृत इंग्रज अधिकाऱ्यांत कोणी संशोधक असणार नाही याची मजला खातरजमा झाली.

युरोपीय लोकांत मिसळून जाणे जितके सोपे तितकेच एतद्देशियांत जाणे अवघड आहे यांचा प्रत्यय मजला सत्वरि आला. समस्त एतद्देशीय बंधू म्हणजे ज्यांची केवळ गौरनर व्हावे ऐसी योग्यता परंतु ते काळाच्या अज्ञात गतीमुळे जे सुंबाचे दोरे वळायच्या कारखान्यात कारकुनी करतात ऐसें तें नमुनें. त्यातही विलायतेस जाणारे तद्दन एतद्देशीय म्हणजे इंग्लंदाला पोहोंचताच विक्तुरीया राणीच्या जामदारखान्याची किल्ली आपणांस प्राप्त होणेची आहे अशा आविर्भावात इतस्ततः वावरत असतात. अशा लोकांत अलौकिक बुद्धिमत्ता असणारा मनुष्य शोधणे अवघड कारण की अशी अप्रतिम बुद्धी आपल्या ठायीठायी वसते असा समस्तांचा समज. तरीही मी नेटानं या लोकांत शोध सुरु केला. बोटीवरल्या नेटीवांत जरी देशातल्या भिन्नप्रांती लोकांची सभा असली त्यातील महाराष्ट्री लोकांतच हा चमत्कारी मनुष्य असणार हे नक्की होते.

यापैकी एकजण बोटीवर मोठाली बुके घेऊन वाचत असतां मला आढळला. हाच तो मनुष्य की काय असे समजून मी त्याची बारकाईने चवकशी आरंभली. इंग्रज सरकारनी लोकांचे धनवित्त सुखरूप राखावे ह्या इच्छेने जी पैशांची पेढी बाम्बे इलाख्यात उघडली आहे, जिला इंग्रज लोक सेविंगब्यांक म्हणतात, तिचा तो कोणी मोठा हापिसर होता. त्याच्या पेढीत रोजचा हजार-बाराशे रुपये जमा-खरचांचा कारभार होतो. मोठमोठाले शेठीये आणि अंमलदार आणि इंग्रज हपिसर यांचे या पेढीत खाते आहे असा मजकूर प्राप्त झाला. परंतु दोन पळे वार्तालाप करताच हा कुणी हुशार मनुष्य नव्हे याची मजला खातरजमा झाली. केवळ दुज्या कुणाचे पैसे गुंतवणे आणि बुडविणे यांस अपार बुद्धीपेक्षाही अप्रतिम मूर्ख मनुष्याची गरज असते असे माझे अनुभवांती मत झाले आहे, हा मनुष्य त्या मताची पुष्टी करणाराच निघाला.

आणखी एक साहेबी पोशाखातील मनुष्य मजला आढळून आला. डोळ्याला जाड भिंगाची आरशी, डोक्यावर भलेथोरले चक्री पागोटे, छपरी मिश्या यांजमुळे हा मनुष्य कुणी शिक्षक असावा असा माझा अंदाज होता. आणि तो बरोबर निघाला. मशारनिल्हे गृहस्थ मुंबईस एका कालिजात बीये पदविपात्र शिक्षक असून यम येचा कागद देणेसाठी विलायतेस चालला होता. एकुणात कुणालाही कःपदार्थ समजण्याची वृत्ती आणि काही न वाचताही भारंभार बोलण्याची हातोटी यामुळे हे नक्कीच थोर प्रोफेश्वर असणार याची खात्री झाली. परंतु मला जो अचाट बुद्धिमत्तेचा मनुष्य अपेक्षित होता त्या बुद्धिमत्तेचा प्रोफेश्वरसाहेबमजकुरांशी दुरान्वयानेही संबंध नव्हता. त्याच्याशी संभाषण करून त्याची मते जाणून घेता मला अचंबा वाटला. ब्रह्मदेव लोकांस विद्या देतो परंतु तिजला स्वर्गात विसरून येणे ही खरोखरीच मोठी अचंब्याची गोष्ट आहे.

दुसरा एक कोणी चित्रविचित्र यंत्रे बोटीवर घेऊन आला होता. पाकेटवाचाच्या आकारातील वाचापासून घोडागाडीएवढे थोरले घड्याळ पाहता या मनुष्यात अनेक उत्तमोत्तम गुणांचा संचय असूनही ते केवळ घड्याळ बनविण्याच्या छंदापायी व्यर्थ गेले हे कोणासही उमजले असते. आपल्या माणसांत ही प्रवृत्ती विशेषकरून सहसा आढळते. एखादा गुण किंवा अवगुण असेल तर त्यालाच चिकटून राहणेची आपली कूपनलिकेतल्या बेडकाची वृत्ती. तर सदर माणसाचा कोटांत घड्याळ बनवण्याचा कारखाना, ज्याला फ्याक्तुरी म्हणतात, तो उपस्थित केला असून एथें उत्तमोत्तम युरोपि घड्याळांच्या नकला हुबेहूब बनवितात. यंत्रकामाची मजची आवड, तिने याचवेळी उचल खाल्ली. मलाही यंत्रकलेत अभिरुची असून विविध आकारांची यंत्रे मी बनविली आहेत. यातील एक अद्भूतोत्तम यंत्र म्हणजे यांत्रिक घोडा. कोळशाच्या वाफेच्या एञ्जिनाने चालणारे हे यंत्र दोन चक्रांवर चालते. यांस पुढे जाण्याचा इशारा करणारी तरफ, ज्यांस अक्षील्रेतर म्हणतात आणि अचानक सत्वर घोडा थांबवणेची सोय, बिरेक यांची जोडणूक आहे. समोर लगामाऐवजी ह्यानदल आणि रिकिबीऐवजी प्यानदल आहे. एकदा अर्धा मण कोळसा ओतून हा यांत्रिक घोडा चालू केला की तो शांतपणे सहल करत वीस मैल दौड सहजा करतो. याबद्दलची माहिती मी त्यांस विशद केली. परंतु घड्याळजींस याची बराबर चावी लागली नाही. कोणी भूत पाहावे तसे तो मजकडे भकास नजरेने पाहात राहिला. अर्थात ज्याचे ध्यानीमनी निवळ घड्याळ सोडून दुजे काही नाही असा हा मनुष्य होता.

यानंतर आणखी एक इसम माझ्या दृष्टीस आला. भेंडाची ह्याट, परीटघडीचे करवतकाठी शुभ्र रेशमी धोतर, टेलकोट आणि पायी हिंगळासारखा लालभडक जोडा असा साहेबी पोशाकाचा थाट असलेल्या त्यांस कोणी काय काम करता असें पुसले असता तो तोंडातून चीरुट काढीत हिंदुस्त्रियालीष्ट असे वाकड्या तोंडाने ठसक्यात उत्तरत असे. त्याचा नक्की कसचा कारखाना आहे हे पुसले तर त्याने मजला उत्तर दिले ते फारच मनोरंजक होते. प्रस्तुत समयी सरकारने आपल्या एथें चोरचिलटांचे भय फार म्हणून सोन्यारुप्याची नाणी टांकसाळीत छापणे कमी केले आहे. त्याऐवजी नव्या युगाचा मंत्र म्हणून सरकारने कागदी पैका, ज्याला ते प्रामिसरीनोटा असे म्हणतात, त्या बाजारात आणविल्या आहेत. ह्या नोटा केवळ ब्यांका आणि पेढ्या आणि सरकारी त्रेझऱ्या यांत वापरल्या जात असलेकारणे भामट्यांना आळा बसला आहे. सदरहू गृहस्थ अशा नोटांचा कारखाना चालवित होते. ह्या कामी त्यांनी सरकारशी सुप्त स्पर्धा चालवली असलेने त्यांना गुप्तरितीने हा कारखाना चालवावा लागे. परंतु एका वेळेस त्याने चुकून दोन रुपयेंची नोट छापणेऐवजी दोन आण्यांची नोट छापवली होती. आता आपलेकडचे लोक इतके संशयी की सरकारच्या नोटेवरपण ती खोटी असेल की कसे असे म्हणून भरौसा न ठेवणारे. शिवाय त्या नोटेवर नजरचुकीने हिंदुस्थानच्या राणीऐवजी ब्रह्मदेशाच्या राजाचे चित्र छापले होते. त्यामुळे ह्या नोटा इंगलंडास नेऊन सरकारजमा करुन त्याऐवजी पौंड घ्यावे अशा विचाराने त्याने विलायतेस प्रस्थान केले होते. थोडक्यात आत्यंतिक दुर्लभ अशा बुद्धिमत्तेचा वारसा त्याला लाभला होता, परंतु त्याची आम्हां भारतीयांना किंमत नसल्याचे त्याचे शल्य जाणवले. उत्तमोत्तम गुणांची चहा करण्याची वृत्ती आम्हां भारतीयांत कधी रुजणार? मजकडेही मी लावलेल्या शोधांची जंत्री होती, ती मी त्यास वानगीदाखल दिली- जसे की मेजावर ठेवायचे छपाईयंत्र- तैपरैटर, एका क्षणात चित्रे काढणारा यांत्रिक चित्रकार- फोटुक्यामिरा इत्यादिकांचीही माहिती वर्णली. परंतु घरगुती कोंबडीला वरणाची चव लागते अशा अर्थाची हिंदुस्थानी भाषेंत एक म्हण आहे यांचा मजला प्रत्यय आला. ज्यातुन तात्कालिक फायदा होत नाही अशा शोधांची त्याला काडीमात्र परवा नव्हती. अर्थात, मजचा शोध असणारा मनुष्य हा नव्हता.

प्रवासाच्या चाळीस दिवसांतील अठ्ठावीस दिवस सरले तरी मजला त्या अपार बुद्धीमान मनुष्याचे नखही दृष्टीस पडले नव्हते. हा मनुष्य कुणी भूतप्रेत असलेप्रमाणे गायब झाला की काय ऐसे मनी आले.

एके रात्री मी भोजनोत्तर शतपावलीसाठी साजेशी जागा शोधत बोटीच्या देकवर फिरत असतां एक अतीव सुंदर हिंदी स्त्री मजच्या पाहण्यात आली. एकाकी स्त्री दिसलेस तिजला क्षेमकुशल पुसिले पाहीजे यांचे संस्कार मुळीहूनच मजवर असलेनें मी तिजला पुसले.

त्यावर तिने सांगितलेली हकीकत मोठी चमत्कारीक होती. ही स्त्री तिच्या सखीसोबत काही कारणें इंग्लंदास जात असते वेळी तिची सखी आकस्मिक बोटीवरुन गायब झाली, ती पाण्यात पडली की हवेंत अंतर्धान पावली ते कुणास ठाऊक. अचानक सर्व वित्त नाहीसे झाल्याने चित्त सैरभैर होऊन आता जलसमाधी घ्यावी या इराद्याने ती देकावर आली होती. आत्महत्या करणें म्हणजे पाप असलेकारणें तिला यापासून परावृत्त करणेसाठी मी हरयुक्ती तिचे मन वळवायचा यत्न चालवला. तिने माझ्या शिफारसींकडे दुर्लक्ष करत उडी घेण्यास उत्तम जागा कोणती असे मला पुसले.

देकाच्या टोकांवर उभे राहून ती उडी मारण्याच्या तयारीत असतां मी धाडस करुन तिच्या बाहूंना पकडून तिजला खाली खेचले. तोच दुरून देकाचे दार उघडून दोन मनुष्यें लगबगीने मजकडे धांवत येताना माझ्या दृष्टीस पडलें. दोघे जसे नजीक पावलें तसे मजला त्या दोहोंची ओळख पडली. त्यांतील एक गौरनराचा सकरतारी वुईलयम सॅण्डर्समजकूर यांची माझी चांगलीच जानपछान होती. कैकदा गौरनरसाहेबांच्या वाड्यात भेट झाली असले कारणे ही ओळख झाली होती. त्यांच्या बराबरचा मनुष्य ही कुणी बोटीवरचा अधिकारी असावा असे त्याच्या सफेद कोटावरुन प्रतित होत होते. त्या मनुष्याने "एक्षकूज मी" (मला क्षमा करा) असे म्हणत त्या स्त्रीला माझ्यापासून दूर केले. आणि तिला क्यापटनच्या खोलीकडे ओढत नेणे चालवले.

सॅण्डर्ससाहेबांनी मला अभिवादन करत बोटीवर असले प्रकार करणे आपणांसारख्या संभावित इसमांस शोभत नाही आणि सहसा कुणा परक्या व्यक्तीशी गैररीतीची वर्तणूक ठेवू नका, कुणी परकीय हेर या बोटीवर वावरत असू शकतो अशी सूचना मजला केली. इंग्रज लोकांच्या असमयी दक्षतेचा मला हा असा आकस्मिक प्रत्यय आला.

त्यानंतर चार रोजांनी पुन्हा एकदा ती स्त्री रात्रीच्या डिनरच्या समयी मला भेटली. आसपांस कुणी नाही याची खातरजमा झाल्यावर तिने मजला देकावर बोलाविले. तेथें पोहोंचतास ती डोळ्यात आंसवे आणून रडू लागली. अधिक चवकशी करता प्राप्त झाले की तिच्या सखीसोबत बोटीच्या प्रवासाच्या भाड्याचा कागद गायब झाला आहे. इंग्लंदास उतरते वेळी बोटीवरील हरएक मनुष्याची भाडेपावती तपासून पाहतात आणि तो जर नसेल तर त्यांस पोलिसांच्या ताब्यात दिले जाते. याउप्पर त्यांचा निवाडा इंग्लिश कोडतांत इंग्लिश कायद्यानुसार लावला जातो. तरी भाड्याचा एकांदा कागद मजसाठी मिळेल याची तजवीज कराल का असे तिने मजला विनवले.

संकटग्रस्त स्त्री पाहून ज्याचे हृदय विरघळत नाही असा हिंदुस्थानी माणूस विरळाच. मी छातीवर हात ठेवून मजकडून शक्य तितकी मदत नक्कीच करेन याचा भरवसा तिला देत आश्वस्त केले. परंतु, लंदनशहराच्या धक्क्यास बोट लागणेची वेळ झाली तरी तिजकरिता तिकीट पैदा करणे माझेचेने झाले नाही. लंदन शहरास बोट लागली आणि उतारु उतरु लागले तेव्हा शेवटी मजला एक युक्ती सुचून मी तिच्याकडे गेलो. तिजकडे जातेच मी तिच्या सामानाचा एक मोठां पेटारा निवडून तो तिजला रिकामा करणेस सांगितले. तो रिकामा करताच, मी स्वतः त्यात बसलो आणि माझे तिकीट तिजला देंऊन तो पेटारा कुलूपबंद करुन बाहेर गेल्यावर माझी सुटका कर असे तिंस सांगितले. परंतु तो पेटारा माझ्या अपेक्षेपेक्षाही बराच छोटा होता. तेव्हा तिने मजला अंगावरची काही आभूषणे काढून ठेवण्यास सुचविले. तदनुसार, मी माझे सोन्याचे सलकडे, भिकबाळी, पाकीटवाच इत्यादिक माझ्या उपरण्यांत बांधून तिजकडे सोपवले. पागोट्याची अडचण होत असलेने तेही काढून बोडकाच त्या पेटाऱ्यात बसलो.

इकडे, बोटीवर क्यापटनची माणसे प्रत्येकाचे तिकीट तपासून पाहात असतां तिजकडे तिकीट आढळून आलेने तिंस उतारु लोकांच्या यादीत उभे राहण्याची परमानगी मिळाली. येपावेतों, मी गायब झालेचे आढळून आल्याने बोटीवर मोठीच धांदल चालली होती, सगळी सोजिरांची पलटन मजला धुंडाळणेकामी लागली होती (हे वर्तमान मज कालांतराने प्राप्त झाले). कालोपगतिने ती स्त्री तोंवर बोट धक्क्याला लागल्याने पेटाऱ्यासह लंडन शहराच्या धक्क्यावर प्रवेशकर्ती झाली. एक फैंटन बोलावून तिने त्यात आपले सामान चढवणे चालवले.

इतका वेळ एका जागी बसून राहिल्याने माझ्या अंगाला घाम येऊन त्याचे पाणी गळू लागले. किमान आपल्या मिश्यातरी वाळवाव्यात असा विचार मनी करुन मी पेटाऱ्याला हवां येणेसाठी जी भोंके पाडली होती त्यातून मी माझ्या मिश्या बाहेर सरकावून दिल्या.

तोंच बाहेर आलेल्या मिश्या पाहून एका गोऱ्या स्त्रीस कुणी सांपवैगेरे प्राणी पेटाऱ्यात आहेंसे वाटून ती मोठी किंकाळी फोडून बेशुद्ध पडली. बाजूस उभ्या असणाऱ्या तमासगिरांनी एकच गिलका करुन तो पेटारा उघडविला. पेटारा उघडल्यावर त्यातून मला बाहेर आलेले पाहताच गोऱ्या स्त्रीचे नातेवाईक तिस मुखत्यार राहून मजशी वाद घालून चौकीत जाऊ असे धाकटदपशा करु लागले. त्यांना संतोष व्हावा आणि तिजची नुकसानभरपाई म्हणून मी मजकडील कोटाच्या अस्तरात लपवलेला पैका मी त्यांस देऊ केला. शेवटी चार हजारांच्या प्रामिसरी नोटांवर त्यांचे समाधान पावले.

इकडें मजला पेटाऱ्यात दडवणारी स्त्री क्यापटनच्या माणसांनी आणि सॅण्डर्ससाहेबांनी तिजला अकस्मात छापा घालून जेरबंद करुन पकडून नेले होते. तिजसोबत तिचा एक साथीदार होता, तोमात्र निसटून गेला. अधिक चवकशी करता ती स्त्री फरान्सची हेर असल्याचे साक्ष झाले.

अशा प्रकारे, माझ्या जीवावर बेतलेले संकट निवळ चारसहस्र रुप्यांवर भागले. येणे कामी सकरतारी सॅण्डर्स साहेब आणि क्यापटन जान म्याकदोनल्ड यांचे कठीण परिश्रम साध्य झाले तरी त्या स्त्रीकडून फसले जाणेची खंत मजच्या मनी झाली.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

शेवटपर्यंत नक्की काय होणार, याचा अंदाज आला नाही. त्यामुळे मजा आलीच. पण एकंदर सगळी वर्णनंही फारच मजेशीर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मस्तच ! आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लय भारी!
एकाच गोष्टीत, टायटॅनिक, आग्र्याहून पलायन वगैरे, ऐतिहासिक घटनांची आठवण करुन दिलीत, शिवाय अनोख्या शैलीमुळे, शेवटपर्यंत गुंतवून ठेवल्याबद्दल आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0