Cold Blooded - ५

हवालदार माधोसिंग चांगलाच वैतागला होता!

गेल्या दोन रात्रींपासून वसंत विहार परिसरातल्या एका बंगल्यावर नजर ठेवण्याच्या कामगिरीवर त्याची नेमणूक करण्यात आली होती. रात्री नऊ वाजल्यापासून तो या ड्यूटीवर हजर झाला होता. सुरवातीचे दोन तास त्याने फूटपाथवर चकरा मारत घालवले होते. कंटाळा आल्यावर तो गाडीत येऊन बसला होता. आदल्या दोन रात्रीही त्याने त्या बंगल्यावर पहारा ठेवलेला होता. पहिल्या दिवशी तिथे येण्यापूर्वी बंगल्यात राहणार्‍या माणसाचा फोटो कोहलींनी त्याला दाखवला होता. गेल्या दोन रात्रीत त्या माणसाव्यतिरिक्तं कोणीही आलं-गेलेलं त्याने पाहिलेलं नव्हतं. बंगल्याचा मालक रात्री दहा - साडेदहापर्यंत बाल्कनीतल्या झोपाळ्यात बसलेला असतो आणि मग रात्री झोपून जातो हे गेल्या दोन रात्रीच्या अनुभवामुळे त्याच्या लक्षात आलं होतं. आजही रात्री साडेदहाच्या सुमाराला तो माणूस आत निघून गेला होता आणि त्यानंतर वरच्या बेडरुममधला लाईट बंद झाला होता!

माधोसिंगने आपल्या रिस्टवॉचवर नजर टाकली. रात्रीचा एक वाजून गेला होता. अद्याप किमान सहा तासतरी त्याला तिथेच बसून राहवं लागणार होतं. टाईमपास म्हणून त्याने कानात हेडफोन घातला आणि मोबाईलवर गाणी ऐकण्यास सुरवात केली, पण दोन - तीन गाणी ऐकल्यावर डोळ्यावर झापड येऊ लागल्याने त्याने गाणी बंद केली आणि बरोबर आणलेला थर्मास उघडला. गरमागरम चहाचे दोन घोट घशाखाली उतरल्यावर त्याच्या डोळ्यांवरची झोप पार उडाली. त्याच्या थर्मासमध्ये आणखीन कपभर चहा शिल्लक होता, पण गेल्या दोन रात्रींच्या अनुभवाने पहाटे साडेचार - पाचच्या सुमाराला पुन्हा चहाची तलफ येईल हे त्याला माहीत होतं. थर्मासचं झाकण लावत असतानाच त्याने सहज बंगल्याकडे नजर टाकली आणि तो एकदम चमकला....

वरच्या बेडरुममधला दिवा लागला होता!

माधोसिंग एकदम सावध झाला आणि बंगल्यावर नजर रोखून बसला. बेडरुमच्या खिडक्यांवर असलेले पडदे ओढलेले होते, त्यामुळे आत काय चाललं आहे हे त्याला दिसण्याचा प्रश्नच येत नव्हता, पण तरीही वरच्या बेडरुममध्ये काहीतरी गडबड आहे असं त्याला वाटत होतं. बंगल्यात राहणारा माणूस मध्येच झोपेतून उठला होता याबद्दल तर त्याला काही शंकाच नव्हती. काही कामानिमित्त त्याचा बाहेर पडण्याचा तर विचार नसेल? रात्रंभरात तो बंगल्यातून बाहेर पडला तर त्याचा पाठलाग करावा अशी कोहलींची स्पष्ट सूचना होती. त्यामुळे माधोसिंग कोणत्याही क्षणी कार सुरु करुन निघण्याच्या तयारीत बंगल्यावर नजर रोखून बसला होता.

दहा - पंधरा मिनिटांनी अचानक बंगल्याचं मुख्यं दार उघडलं गेलं!

एक माणूस तीरासारख्या बाहेर पडला आणि बंगल्याच्या फाटकाच्या दिशेने धावला!
फाटक उघडण्याच्या भानगडीत न पडता त्याने गेटवर चढून बाहेर रस्त्यावर उडी मारली आणि धूम ठोकली!

हा प्रकार पाहताच माधोसिंग घाईघाईने गाडीतून बाहेर पडला आणि मधला रस्ता ओलांडत बंगल्याच्या फाटकाशी आला. त्या माणसाला पळालेला पाहून तिथे पोहोचण्यास त्याला अर्ध मिनिटही लागलं नव्हतं. वेगाने धावत सुटलेल्या त्या माणसाची आकृती पुढच्या गल्लीत वळलेली त्याच्या नजरेला पडली होती! माधोसिंग धावतच त्या गल्लीच्या तोंडाशी पोहोचला. आपल्या हातातल्या प्रखर टॉर्चचा उजेडात त्याने गल्लीतला कोपरान् कोपरा उजळून काढला, पण गल्लीत शिरलेला तो माणूस हवेत विरुन जावं तसा अदृष्यं झाला होता!

मागे फिरुन तो पुन्हा बंगल्याच्या फाटकापाशी आला. अद्यापही वरच्या बेडरुममधला लाईट तसाच चालू होता. याचा अर्थ बंगल्यात राहणारा माणूस अद्यापही जागा आहे हे उघड होतं. बहुधा बंगल्यात एखादा चोर घुसला असावा आणि अचानक मालकाला जाग आल्यामुळे तो पळून गेला असावा! पण आपण बंगल्यावर नजर ठेवून असताना तो आत घुसलाच कसा? पुढच्या बाजूने तर तो आलेला नाही हे नक्की! कदाचित बंगल्यामागच्या भागातून तो आत घुसला असावा! काय असेल ते असो, सध्या तरी तो पळालेला आहे एवढं मात्रं नक्की! तो चोर असेल तर बंगल्याच्या मालकाने पोलीसांना फोन केलाच असणार! अनायसे आपण इथे आहोतच तर खात्याची इतर माणसं येईपर्यंत आपणच थोडी चौकशी करावी!

फाटकाची कडी उघडून माधोसिंग आत शिरला आणि बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचला. डोअरबेलचं बटण दाबताच आत मंजुळ स्वरात उमटलेली सुरावट त्याच्या कानी आली. दरवाजा उघडण्याच्या अपेक्षेने तो वाट पाहत होता. सुमारे मिनिटभराने त्याने पुन्हा बेल वाजवली. पुन्हा तीच सुरावट तयच्या कानावर आली, पण दरवाजा मात्रं उघडला गेला नाही! दरवाजापासून काही पावलं मागे सरकून त्याने बेडरुमकडे नजर टाकली. अद्यापही बेडरुममधला लाईट चालू होता. बंगल्याचा मालक तर जागा आहे, पण मग दार का उघडत नाही हे त्याला समजत नव्हतं! पुन्हा दरवाजा गाठून त्याने डोअरबेल दाबली, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. दोन - तीनदा बेल वाजवूनही कोणीही दार उघडत नाही हे लक्षात आल्यावर त्याने सरळ दरवाजा ठोकण्यास सुरवात केली.

"दरवाजा खोलो! हम पुलीस है!"

अस्सल पोलीसी आवाजात माधोसिंगने मोठ्याने आवाज दिला, पण त्याला कोणाचीही चाहूल लागली नाही! चार - पाच वेळा हाच प्रकार झाल्यावर त्याने पुन्हा बेल वाजवून पाहिली, पण बंगल्याचा मालक दार काही उघडत नव्हता! आता मात्रं माधोसिंग चांगलाच गोंधळला. बंगल्याचा मालक आत असूनही दार का उघडत नाही? आपण पोलीस असल्याचं स्पष्टपणे सांगूनही तो काहीच का बोलत नाही? त्याचं काही बरंवाईट तर झालं नाही? त्या पळून गेलेल्या माणसाने तर त्याला काही केलं नाही?

माधोसिंग पुन्हा फाटकापाशी आला आणि बंगल्याच्या प्रवेशद्वारावरची नजर न हटवता त्याने मोबाईलवरुन फोन लावला. काही क्षणांतच कोहलींचा आवाज त्याच्या कानात शिरला.

"सरजी, मै माधोसिंग बोल रहा हूं....."

********

मोबाईलच्या रिंगने रोहितला जाग आली तेव्हा आपण क्षणभर कुठे आहोत हेच त्याच्या लक्षात येईना! झोपाळलेल्या डोळ्यांनीच त्याने मोबाईलच्या स्क्रीनवर नजर टाकली तो त्याला कोहलींचं नाव दिसलं. पहाटेचे साडेतीन वाजले होते. या वेळेस कोहलींचा फोन? काय झालं असावं? अखिलेश तर सापडला नसेल?

"हॅलो! रोहित प्रधान हिअर! बोला कोहली.... "

"सरजी....."

"व्हॉ SSS ट.... " फोनवरचं बोलणं ऐकून रोहितच्या डोळ्यावरली झोपेची धुंदी खाड्कन उतरली, "आर यू शुअर कोहली....."

"बिलकूल सरजी! मी आता तिथेच आहे......"

"माय गॉड! कोहली, मी शक्यं तितक्या लवकर दिल्लीला येतो आहे.... "

कोहलींना मोजक्याच सूचना देत रोहितने फोन कट् केला आणि काही क्षण तो स्तब्धं बसून राहिला. असं काही होईल हे त्याला अजिबात अपेक्षित नव्हतं. गेल्या तीन - चार दिवसांत सिमला - रोहरू - मंडी इथे केलेल्या तपासावरुन अखिलेश आणि श्वेता यांनीच रोशनीला सिमल्याहून मंडी इथे आणलं होतं हे स्पष्टं झालं होतं. मंडी पोलिसांना सापडलेला हाडांचा सापळा रोशनीचाच असावा याबद्दल त्याची जवळपास खात्री पटलेली होती. त्याच्या दृष्टीने या सगळ्याचा मास्टरमाइंड जवाहर कौल हाच होता. त्यानेच द्विवेदींना खेत्रपालच्या हॉस्टेलचा पत्ता दिला होता आणि तिथे त्यांची श्वेताची गाठ पडली होती. अखिलेश आणि श्वेता यांचा कौलशी संबंध सिद्ध करण्याच्या दृष्टीनेच त्याने कोहलींना कौलच्या फोन आणि मोबाईलचं कॉल रेकॉर्ड मिळवण्याची सूचना केली होती, पण अगदी अखेरच्या क्षणी त्याचे मनसुबे धुळीला मिळाले होते.

जवाहर कौल राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता!

********

रात्रीचा एक वाजून गेला होता.....

दिल्लीतल्या वसंत विहार परिसरात नीरव शांतता होती. ऑक्टोबरचा महिना असल्यामुळे वातावरणात चांगलाच उष्मा जाणवत होता. रस्त्यावरुन वेगाने जाणारी एखाद - दुसरी कार वगळली तर रस्तेही अगदी निर्मनुष्यं होते. रात्रीची वेळ असल्याने सर्वजण निद्राधीन झालेले होते. अत्यंत सधन आणि उच्चभ्रू लोकांचं इथे वास्तव्यं होतं. केंद्र सरकार, एअर इंडीया आणि रिझर्व बँकेतील उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या वसाहती या भागात होत्या. चाणक्यपुरी परिसराला लागूनच असल्याने पन्नासवर वेगवेगळ्या देशांच्या वकीलाती इथे होत्या. त्यामुळे अनेक परदेशी नागरीकांचाही इथे सतत राबता होता. या सर्व वकिलातींना सुरक्षा व्यवस्था पुरवणं आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेणं याची जबाबदारी दिल्ली पोलीसांवर होती, त्यामुळे इथल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी सदैव जागरुक असत.

वसंत विहारच्या टोकाला असलेल्या बंगल्यांच्या कॉलनीतल्या लहानशा गल्लीतून तो अंधाराचा फायदा घेत लपत-छपत चालला होता. कोणताही आवाज होणार नाही याची काळजी घेत आणि बंगल्यांच्या भिंतींना जवळपास चिकटूनच तो पुढे सरकत होता. त्या परिसरात असलेली उच्चभ्रू वस्ती आणि तिथे असलेली सुरक्षाव्यवस्था याची त्याला पूर्ण कल्पना होती. एखाद्या बंगल्याच्या वॉचमनच्या किंवा उशिरापर्यंत जागत असणार्‍या बंगल्यातल्या लोकांच्या आपण दृष्टीस पडलो तर ते निश्चितच पोलीसांना खबर देतील आणि मग आपले हाल कुत्रा खाणार नाही याची त्याला कल्पना होती, पण तरीही जीवावर उदार होवून तो तिथे आला होता.

अत्यंत सावधपणे कोणाच्याही नजरेस न पडता तो जवाहरच्या बंगल्याच्या मागच्या फाटकापाशी आला. फाटकाचं लोखंडी दार कडी-कुलूप लावून बंद केलेलं होतं. कुलूप उघडण्यात वेळ न घालवता त्याने एकवार चौफेर नजर फिरवली आणि फाटकावर चढून अगदी अलगदपणे तो आत उतरला. जमिनीला पाय लागताच क्षणार्धात फाटकाच्या भिंतीआड होत त्याने अंधारात तिथेच बसकण मारली. काही मिनिटं तिथे बसून राहिल्यावर कोणताही धोका नाही याची पूर्ण खात्री पटताच तो उठला आणि बंगल्याच्या मागच्या दारापाशी आला. दोन दिवसांपासून त्याची बंगल्यावर नजर होती. ते दार त्याने आधीच हेरलं होतं.

बंगल्याचं पाठचं दार उघडं असलेलं पाहून तो क्षणभर घुटमळला. हा आपल्यासाठी सापळा तर नाही?

काही सेकंद विचार केल्यावर अखेर कमालीच्या सावधपणे त्याने आत पाऊल टाकलं. काही गडबड झालीच तर कोणत्याही क्षणी माघार घेत पळून जाण्याची त्याची तयारी होती, पण तसं काहीच झालं नाही. मागच्या पॅसेजमधून तो हॉलमध्ये आला आणि एकदम जमिनीला खिळल्यागत जागच्याजागी उभा राहिला.

वरच्या मजल्यावर दोन माणसांच्या जोरजोरात बोलण्याचा आवाज त्याच्या कानावर येत होता.
एक बंगल्याचा मालक असणार यात कोणतीच शंका नव्हती, पण हा दुसरा माणूस कोण होता?
तो बंगल्यात कधी शिरला? आणि कोणत्या मार्गाने? मागचं दार त्यानेच उघडलं होतं का?

एकापाठोपाठ एक प्रश्नं झरझर त्याच्या डोक्यात येत होते. वरच्या मजल्यावरच्या दोघांचा आवाज आता टिपेला पोहोचला होता. एकदम दोघांपैकी एकाचा विव्हळण्याचा आणि पाठोपाठ धडपडल्याचा आवाज त्याच्या कानावर आदळला. बहुतेक दोघांच्या भांडणाचं रुपांतर मारामारीत झालं असावं याची त्याला कल्पना आली. सुमारे तीन - चार मिनिटं धुमश्चक्री सुरु होती. या परिस्थितीत आपण नेमकं काय करावं हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. आलो त्या मार्गाने परत जावं आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा बंगल्यात घुसावं किंवा वरची हाणामारी संपण्याची वाट पाहत तिथेच लपून राहवं आणि हाती घेतलेली कामगिरी उरकूनच बाहेर पडावं या दुविधेत तो सापडला होता.

त्याचा निर्णय होण्यापूर्वीच अचानक वरचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला! त्याबरोबर तो एकदम भानावर आला आणि प्रतिक्षीप्त क्रियेप्रमाणे त्याने जिन्याखालच्या जागेत दडी मारली. श्वास रोखून आणि अंधारात डोळे फाडून पुढे काय होतं ते तो पाहू लागला.

एक माणूस जिन्यावरुन धावतच खाली उतरला होता आणि आणि बंगल्याच्या मुख्य दाराकडे धावला होता...
मुख्य दाराला असलेली कडी काढून त्याने दार उघडलं आणि बाहेर धूम ठोकली....
त्याच्यापाठोपाठ बंगल्याचा मालक धडपडत खाली उतरला आणि दाराच्या दिशेने गेला....
बाहेर पळालेल्या माणसाला तो शिव्यांची लाखोली वाहत होता....
दार बंद करुन त्याने कडी लावली आणि मागे वळून तो जिन्याच्या दिशेने दोन पावलं पुढे आला....
आपल्या मानेला डास चावल्यासारखं त्याला जाणवलं....
एक जबरदस्तं कळ त्याच्या डोक्यात गेली आणि एकदम शक्तीपात झाल्यासारखा तो खाली कोसळला....
त्याचे प्राण कंठाशी आले होते....
जिन्याखालून बाहेर आलेला माणूस थंडपणे त्याच्याकडे पाहत होता!

जेमतेम मिनिटभरात बंगल्याच्या मालकाची हालचाल पूर्णपणे थंडावली!

बरोबर नेलेल्या टॉर्चच्या प्रकाशात मालकाची कोणतीही हालचाल दिसून येत नाही याची खात्री झाल्यावर त्याने सावधपणे आणि तितक्याच जलदगतीने पुढची कृती केली. मालकाच्या हातात असलेल्या रिव्हॉल्वरकडे लक्षं जाताच क्षणभर तो थरारुन गेला. संधी मिळाली असती तर त्याने आपल्याला गोळी घालण्यास कोणताही अनमान केला नसता याबद्दल त्याला शंका नव्हती! त्याच्या हातातलं ते रिव्हॉल्वर उचलून त्याने आपल्या जॅकेटच्या खिशात टाकलं आणि आलेल्याच मार्गाने बंगल्याच्या मागच्या दारातून तो बाहेर पडला आणि गेटवरुन उडी मारुन गल्लीतल्या अंधारात मिसळून गेला.

हवालदार माधोसिंग त्यावेळेस बाजूच्या गल्लीत जवाहरच्या घरातून पळालेल्या माणसाला शोधत होता....

********

पहाटे पाच वाजता सब् इन्स्पे. देवप्रकाश केसची फाईल आणि एका टॅक्सीवाल्यासह रोहितच्या हॉटेलवर पोहोचले होते. रोहित त्यांची वाटच पाहत होता. कोहलींकडून जवाहरच्या मृत्यूची बातमी कळताच त्याने इन्स्पे. खत्रींना फोन करुन त्याची कल्पना देत शक्यं तितक्या लवकर आपली दिल्लीला जाण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. रुम चेक-आऊट करुन त्याने देवप्रकाशनी आणलेली फाईल ताब्यात घेतली आणि घाईघाईतच त्यांचा निरोप घेत त्याने टॅक्सीवाल्याला थेट दिल्ली गाठण्याची सूचना दिली. देवप्रकाशनी त्याला सॅल्यूट ठोकलेला पाहून हा कोणीतरी बडा पोलीस अधिकारी असावा याची टॅक्सीवाल्याला कल्पना आली, त्यामुळे हायवे गाठून त्याने दिल्लीचा मार्ग धरला. परंतु पहाडातून कोरलेला अरुंद आणि वळणावळणाचा रस्ता आणि वाटेतल्या लहान-मोठ्या गावांमध्ये लागणारा ट्रॅफीक यामुळे घाट उतरुन कालका गाठेपर्यंत त्याला अडीच तास लागले होते. कालका ओलांडल्यावर टॅक्सी भरधाव निघाली खरी, पण चंदीगड बायपास आणि करनाल इथे लागलेल्या ट्रॅफीकमुळे दिल्लीचं सीआयडी ऑफीस गाठायला त्याला दुपारचे दोन वाजले होते.

कोहली नुकतेच जवाहर कौलच्या घरातलं तपासकाम आटपून सीआयडी ऑफीसमध्ये परतले होते. रोहितने तो पोहोचेपर्यंत कोणतीही वस्तू तिथून हलवू नका म्हणून बजावलं होतं. त्याच्या सूचनेप्रमाणे त्यांनी कोणत्याही गोष्टीला हात लावलेला नव्हता, परंतु जवाहरचा मृतदेह तिथे ठेवणं शक्यंच नव्हतं त्यामुळे मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा आटपून त्यांनी तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला होता. रोहित संध्याकाळपर्यंत सिमल्याहून परत येईल या अपेक्षेने ते निवांत होते, पण तो एवढ्या लवकर तिथे येवून धडकलेला पाहून ते चकीतच झाले. केसचे पेपरवर्क पूर्ण करण्याचं काम आपल्या एका सहकार्‍यावर सोपवून ते रोहितसह पुन्हा बाहेर पडले.

वसंत विहार भागात एका बंगल्यात जवाहर राहत होता. आठ महिन्यांपूर्वी मेघनाचा मृत्यू झाल्यापासून तो एकटाच इथे राहत होता. सकाळी सातच्या सुमाराला एक कामवाली येऊन साफसफाई करुन जात होती. तिच्या पाठोपाठ साडेसातच्या सुमाराला एक म्हातारी स्वयंपाकीण येऊन दोन्ही वेळचं जेवण आणि सकाळचा नाष्टा बनवून जात असे. जवाहरला फुलझाडांचा बराच शौक असावा. त्याच्या बंगल्याभोवती खूप फुलझाडं लावलेली होती. त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी एक माळी ठेवलेला होता. बागेची निगा राखणं आणि दिवसभर बंगल्याची पहारेदारी करणं अशी दुहेरी जबाबदारी तो सांभाळत असे. संध्याकाळी सहाच्या सुमाराला तो आपल्या घरी निघून गेला की दुसर्‍या दिवशी सकाळी सातपर्यंत संपूर्ण बंगल्यात जवाहर एकटाच उरत असे.

जवाहरच्या बंगल्यात प्रवेश करण्यापूर्वी रोहितने बंगला आणि त्याभोवतालची बाग काळजीपूर्वक नजरेखालून घातली. बंगल्याच्या चारही बाजूने तारांचं कुंपण घातलेलं होतं. रस्त्याला लागून असलेलं मुख्य फाटक मजबूत लोखंडी सळ्यांचं बनलेलं होतं. फाटकातून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला गॅरेज होतं. गॅरेजमध्ये जवाहरची होंडा सिटी उभी होती. बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच प्रशस्तं व्हरांडा होता. व्हरांड्यात दोन प्रशस्तं इझी चेअर्स ठेवलेल्या होत्या. मागच्या बाजूला वरच्या मजल्यावर असलेली प्रशस्तं बाल्कनी खालूनही दृष्टीस पडत होती. या बाल्कनीत एक वेताचा झोपाळा टांगलेला दिसत होता. चारही बाजूंना असलेली बाग चांगलीच बहरलेली दिसत होती. जवाहरचा माळी आपलं काम निष्ठेने आणि अगदी प्रामाणिकपणे करत होता हे सहजच कळू शकत होतं. बंगल्याच्या अगदी मागच्या टोकाला एक लहानसं दार दिसत होतं. या दाराच्या अगदी सरळ रेषेतच बंगल्याच्या कुंपणात एक लहानसं लोखंडी फाटक होतं. माळी आणि स्वैपाकीण, कामवाली यांचा येण्याजाण्याचा हा मार्ग असावा. त्या गेटपाशी पांढर्‍या रंगाने मार्कींग केलेलं पाहून कोहलींना तिथे काहीतरी सापडलं असावं याची त्याला कल्पना आली. बंगल्याभोवती दोन प्रदक्षिणा घातल्यावर तो बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आला. कोहलींनी पुढे होत दाराला लावलेलं सील उघडलं आणि दोघं आत शिरले.

आत शिरताच सर्वात प्रथम रोहितचं लक्षं वेधून घेतलं ते हॉलमध्ये जमिनीवर करण्यात आलेल्या पांढर्‍या रंगाच्या मार्कींगकडे. जवाहरचा मृतदेह तिथेच पोलिसांच्या नजरेस पडला होता हे उघड होतं. त्या जागेचं निरीक्षण केल्यावर त्याने कोहलींच्या मोबाईलमधला जवाहरच्या मृतदेहाचा फोटोही तपासला. जवाहरचा मृतदेह दरवाजापासून चार - पाच फूट अंतरावर उताण्या स्थितीत पडलेला होता. बराच वेळ ती जागा आणि फोटो यांची सांगड घालत नेमकं काय झालं असावं याचा अंदाज घेण्याचा तो प्रयत्नं करत होता. हॉलमधल्या इतर सामानावरुनही अधूनमधून त्याची नजर फिरत होती. प्रत्येक गोष्टं जागच्या जागी दिसत होती. एकाही गोष्टीला धक्का लागलेला नव्हता. एका कोपर्‍यात असलेला बारही त्याच्या नजरेने टिपला होता.

"ऑलराईट कोहली, गो अहेड! काय झालं?"

कोहलींनी हवालदार माधोसिंगला त्याच्यासमोर उभं केलं. आदल्या रात्री नऊ वाजल्यापासून जवाहरच्या बंगल्यावर नजर ठेवण्याच्या कामगिरीवर त्याची नेमणूक करण्यात आलेली होती. त्यानेच या घटनेची खबर कोहलींना दिली होती.

"रात्रीचा दीड वाजला असेल साब..." माधोसिंग सांगू लागला, "मी गाडीत बसून बंगल्यावर नजर ठेवून होतो. वातावरण अगदी सुनसान होतं. अचानक बंगल्याच्या वरच्या बेडरुमचा दिवा लागला. खिडकीवर पडदे ओढलेले होते, त्यामुळे आत कोण होतं आणि काय चाललं होतं हे काही कळू शकलं नाही साब! पंधरा - वीस मिनिटांनी एकदम एक माणूस बंगल्याचं मुख्य दार उघडून धावत बाहेर आला आणि फाटक उघडण्याच्या भानगडीत न पडता वर चढून उडी टाकून पसार झाला. मी गाडीतून उतरुन गेटपाशी पोहोचण्यापूर्वीच तो पुढच्या गल्लीत वळून गायब झाला. मी त्याच्यापाठोपाठ गल्लीत धावलो, पण तोपर्यंत तो पार दिसेनासा झाला होता. पुन्हा परतून मी बंगल्याच्या फाटकापाशी आलो. काहीतरी गडबड झाल्याची मला शंका आली होती, त्यामुळे फाटक उघडून मी आत आलो आणि डोअरबेल वाजवली पण कोणीच दार उघडलं नाही. तीन - चार वेळा डोअरबेल आणि दार वाजवूनही कोणी बाहेर येत नाही म्हटल्यावर मी कोहलीसाबना फोन केला. ते आल्यानंतर आम्ही दार उघडून आत गेलो तेव्हा तो मेलेला सापडला!"

"माधोसिंग, एक सांगा, तुम्ही इथे आलात त्यानंतर जवाहर व्यतिरिक्तं त्याच्या बंगल्यात कोणी आलं होतं?"

"नहीं साब!" माधोसिंग नकारार्थी मान हलवत म्हणाला, "रात्री अकरापर्यंत मी समोरच्या फूटपाथवर राऊंड मारत होतो. त्यानंतर मी गाडीत येवून बसलो. एक मिनिटभरही माझी नजर बंगल्यावरुन हटलेली नव्हती. मी कोणालाही आत गेलेलं पाहिलं नाही."

"कोणीतरी आत नक्कीच आलं होतं माधोसिंग!" रोहित शांतपणे म्हणाला, "तो दुसर्‍या गेटमधून आला असावा किंवा कंपाऊंडच्या भिंतीवरुन आत उतरला असावा, प्ण आला होता हे निश्चित! एनी वे, कोहली, आत आल्यानंतर तुम्हाला जवाहर इथे पडलेला दिसला?"

"बिलकूल ठीक सरजी! माधोसिंगचा फोन येताच मी अर्ध्या - पाऊण तासात इथे पोहोचलो. पुन्हा एकदा डोअरबेल वाजवून आणि दार ठोकूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा मी कौलच्या घरची लॅन्डलाईन आणि त्याचा मोबाईल असे दोन्ही नंबर डायल केले. लॅन्डलाईनची रिंग वाजत असलेली आम्हाला ऐकू येत होती, पण मोबाईल वरच्या मजल्यावर असल्याने त्याचा आवाज आला नाही. आम्ही पुढचं दार उघडण्याचा प्रयत्नं केला, पण ते आतून लॉक होतं. आत शिरण्याचा मार्ग शोधत आम्ही मागच्या दाराशी आलो तो ते नुसतंच लोटलेलं आढळलं. त्या दारातून मी आत आलो तो टॉर्चच्या प्रकाशात कौल इथे पडलेला दिसला. मग पुढचं दार उघडून मी इतरांना आत घेतलं. तो आटपल्याचं लक्षात येताच मी कंट्रोलरुमला आणि तुम्हाल फोन केला सरजी!"

रोहितचे विचार वेगाने धावत होते. कोहलींनी त्याला साडेतीन वाजता फोन केला होता. त्याच्या पाच - दहा मिनिटं आधी ते आत शिरले असं गृहित धरलं तर सव्वा तीन ते तीन वीसच्या सुमाराला ते मागच्या दारातून आत शिरले असावे. त्यापूर्वी त्यांनी पुढचं दार उघडण्याचा प्रयत्नं केला होता आणि जवाहरला फोनही लावला होता. याचा अर्थ तीनच्या सुमाराला कोहली बंगल्यावर पोहोचले होते. त्यापूर्वी पाऊण तास माधोसिंगने त्यांना फोन केला असेल तर दोन ते सव्वादोनच्या दरम्यान जवाहरच्या बंगल्यात घुसलेल तो आगंतुक पुढच्या दाराने बाहेर पडून गेटवरुन उडी मारत पसार झाला होता असा अंदाज बांधता येत होता.

"मागच्या गेटपाशी तुम्हाला काय सापडलं? केवळ प्रिंट्स ऑर समथिंग एल्स?"

कोहलींनी उत्तरादाखल आपल्या खिशातून एक प्लॅस्टीकची पिशवी बाहेर काढली. त्यात असलेली वस्तू पाहून क्षणभर रोहितचे डोळे विस्फारले, पण दुसर्‍याच क्षणी त्याने स्वत:ला सावरलं.

ती वस्तू म्हणजे एक अगदी लहानसं रिव्हॉल्वर होतं!

"प्रिंट्स?"

"कोणाच्याही प्रिंट्स मिळालेल्या नाहीत सरजी!"

रोहितने दीर्घ श्वास घेतला आणि बारकाईने आणि अत्यंत सावधपणे त्या रिव्हॉल्वरचं निरीक्षण करण्यास सुरवात केली. आकाराने ते जेमतेम तळहाताएवढंच होतं. त्याची नळी इतकी बारीक आणि निमुळती होती, की त्यात नेमक्या कोणत्या प्रकारच्या गोळ्या भरल्या जात असतील याची कल्पनाही करणं अशक्यं होतं. कोणत्याही रिव्हॉल्वरला असतो तसा या रिव्हॉल्वरलाही बारीकसा ट्रिगर होता. इतकंच नव्हे तर त्या रिव्हॉल्वरला बारीकसं मॅगझिनही असल्याचं दिसत होतं. त्याने अत्यंत काळजीपूर्वक ते मॅगझिन उघडून त्यावर नजर टाकली. मॅगझिन पूर्णपणे रिकामं होतं. ते मॅगझिन पाहताच तो कमालीचा गंभीर झाला. काय झालं असावं याची त्याला कल्पना आली होती.

काही क्षण त्या मॅगझिनचं आणि रिव्हॉल्वरचं काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर रोहितने ते मॅगझिन बंद केलं. ट्रिगरला अजिबात धक्का लागणार नाही याची काळजी घेत त्याने ते रिव्हॉल्वर पुन्हा त्या प्लास्टीकच्या पिशवीत बंद केलं.

"कोहली, जवाहरचा मृत्यू कशामुळे झाला असावा? तुमचा काही अंदाज?"

"मालूम नाही सरजी! पीएम रिपोर्टमध्ये आपल्याला कारण कळेलच, पण एक मात्रं नक्की, त्याची कोणाशी तरी मारामारी झाली होती आणि त्यात त्याची चांगली धुलाई झालेली असावी असा माझा अंदाज आहे! त्याच्या अंगावर बर्‍याच ठिकाणी मारहाणीचे वळ उमटलेले होते. वरच्या मजल्यावर त्याची बेडरुम आहे तिथेच ही झटापट झाली असं मानण्यास जागा आहे सरजी, कारण तिथलं बरचसं सामान इकडे तिकडे फेकलेलं दिसत आहे. बंगल्यात जो कोणी घुसला होता, तो मागच्या दारानेच आत शिरला होता. या दाराचं कुलूप फोडलेलं आहे. आम्हांला मागच्या पॅसेजमध्ये, जिन्यावर आणि वरच्या बेडरुममध्ये चिखल लागलेल्या बुटांचे प्रिंट्स मिळालेले आहेत! इतनाही नहीं सरजी, तसेच प्रिंट्स या हॉलमध्ये आणि पुढच्या दाराबाहेरही मिळालेले आहेत! आम्ही मिळालेले सर्व प्रिंट्स मार्क केले आहेत!"

"कोहली, तुम्ही पुढच्या दारातून आत आलात तेव्हा ते दार आतून लॉक नव्हतं तर फक्तं लोटलेलं होतं. आत तुम्हाला जवाहरची डेडबॉडी दिसली आणि तुम्ही पुढचं दार उघडून माधोसिंग आणि इतरांना आत घेतलंत, करेक्ट? तुम्ही पुढचं दार उघडलत तेव्हा त्याला नुसतंच लॅच लॉक होतं, का कडी घातलेली होती?"

"लॅच होतं आणि कडीही घातलेली होती सरजी!" कोहली आठवत म्हणाले.

रोहितने त्यांच्याकडे पाहून फक्तं स्मितं केलं. हॉलमधून दोघं मागच्या पॅसेजमध्ये आले. मागचं दार पोलिसांनी सील केलेलं होतं. दारापाशी आणि पॅसेजमध्ये चिखलाने भरलेले बुटांचे ठसे उमटले होते. खडूने तिथे मार्कींग करण्यात आलं होतं. रोहितने अत्यंत काळजीपूर्वक ते ठसे नजरेखालून घातले आणि मागे वळून तो वरच्या मजल्यावर जाणार्‍या जिन्यापाशी आला. जिन्याच्या खालीही चिखलाने भरलेले ठसे उमटलेले दिसत होते. घरात जो कोणी शिरला असावा तो इथे आधी इथे दबा धरुन बसला असावा असा सहजच अंदाज करता येत होता. दोघं जिन्याने वर आले तसं कोहलींनी पुढे होत जवाहरच्या बेडरुमचं दार उघडलं. अक्षरश: एखाद्या वादळात सापडल्यावर व्हावी तशी बेडरुमची अवस्था झाली होती. एक भलं मोठं ब्लँकेट जमिनीवर पडलेलं होतं. बेडवरची चादर अस्ताव्यस्तं पसरलेली होती. दोन - तीन उशा इतस्तत: फेकून दिल्यागत विखुरलेल्या होत्या. एका भिंतीत बसवलेला मोठा आरसा फुटून काचांचा सडा पडलेला होता. एका कोपर्‍यात व्हिस्कीची फुटलेली बाटलीही पडलेली होती. बेडरुमची एकंदर अवस्था पाहता जे काही झालं होतं, ते इथेच झालं होतं हे सहजपणे कळून येत होतं.

"इथे तर चांगलीच धमाल झालेली दिसते आहे!" रुममधून बाहेर येत रोहित म्हणाला, "रुममध्ये तुम्हाला काही सापडलं?"

"येस सर! कार्ट्रीजेसचा बॉक्स सापडला! .३३ कॅलिबर! रिकामी गन केसही मिळाली, पण माझ्या माणसांनी सगळं घर पालथं घालूनही गन मात्रं मिळाली नाही! घरात घुसलेला माणूस ती उचलून पळाला असावा सरजी! बंगल्याच्या मागच्या गार्डनमध्ये मिळालेलं रिव्हॉल्वर हे .३३ च्या बुलेट्स झाडणारं रिव्हॉल्वर असूच शकत नाही सर! "

रोहित काहीच बोलला नाही. जवाहरसारख्या लफडेबाज आणि बदमाश माणसाकडे रिव्हॉल्व्हर आणि कार्ट्रीजेस असणं अगदी सहज शक्यं होतं. प्रश्नं होता तो म्हणजे त्या रिव्हॉल्व्हरचं त्याच्याकडे लायसन्स होतं का?

दोघांनी वरच्या मजल्यावर असलेल्या इतर खोल्याही बारकाईने नजरेखालून घातल्या. जवाहरच्या बेडरुमव्यतिरिक्त वर आणखीन दोन बेडरुम्स होत्या. त्यापैकी एका खोलीत त्याने आपलं ऑफीस कम स्टडीरुम बनवलेली दिसून येत होती. दुसरी खोली बहुतेक स्टोरेज रुम म्हणूनच वापरण्यात येत होती. अनेक गोष्टींचा तिथे भरणा होता, पण त्यात महत्वाचं असं काहीच आढळलं नव्हतं. पॅसेजच्या टोकाला असलेलं दार बाल्कनीत उघडत होतं. बाल्कनीत झोपाळ्याव्यतिरिक्तं दोन वेताच्या खुर्च्या आणि वेताचंच लहानसं टेबल होतं. वरची पाहणी आटपून दोघं खाली आले.

"जवाहरच्या घरी काम करणारी मेड सर्व्हंट, कुक आणि त्याचा माळी यांच्याकडून काही कळलं?"

"नो सर! कालचा दिवस त्यांच्यासाठी अगदी नॉर्मलच होता. सर्वजण नेहमीप्रमाणे आपापलं काम आटपून गेले होते. माळी संध्याकाळी सहा वाजता गेला तेव्हा जवाहर नुकताच घरी परतला होता. तो अजिबात टेन्स वाटत नव्हता असं माळ्याचं म्हणणं आहे. पर एक बात आहे सरजी.... आपल्याशी बोलताना आपण कधीच सिमल्याला गेलो नाही असं जवाहर म्हणाला ते खरं असावं! दरवर्षी मेघना सिमल्याला गेल्यावर जवाहर जवळपास रोज कुठल्या तरी पोरीला रात्री घरी आणत असे असं त्याच्या मेडचं स्टेटमेंट आहे. मेघनाचा मृत्यू झाल्यानंतर तर अनेक पोरी राजरोसपणे इथे येत असतात असंही त्या मेडकडून कळलं आहे!"

"इज इट? तरीच सिमल्याला त्याला पाहिल्याचं सांगणारा एकही माणूस मला भेटला नाही. इनफॅक्ट तो कधीच रोशनीच्या शाळा - कॉलेजात किंवा हॉस्टेलवर आलेला नाही असंच तिथल्या रेक्टर्सचं म्हणणं आहे!"

कोहलींशी बोलत असतानाच रोहित बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या दारापाशी आला. त्याच्या सूचनेनुसार कोहलींनी जवाहरचा मृतदेह वगळता एकाही वस्तूला हात लावलेला नव्हता. अगदी मागच्या दाराचं फोडलेलं कुलूपही तिथेच ठेवलेलं होतं. त्या फोडलेल्या कुलुपाकडे पाहत त्याने विचारलं,

"कोहली, अखिलेशचा पत्ता लागला?"

"अखिलेश.... सॉरी सरजी, पण तो अद्यापही आमच्या हाती लागलेला नाही. सफदरजंग स्टेशनवरुन गायब झाल्यापासून तो दिल्लीत कोणाला दिसलेला नाही. आमचे सगळे इन्फॉर्मर्स त्याच्या मागावर आहेत पण.... " बोलताबोलता कोहली एकदम मध्येच थांबले आणि त्याच्याकडे पाहत त्यांनी विचारलं, "सरजी, अखिलेश तर इथे आला नसेल? माधोसिंगने ज्या माणसाला पळून जाताना पाहिलं तो अखिलेश तर नसेल? त्यानेच या कौलची गन पळवली नसेल?"

"इथे एकूण दोन माणसं आली होती कोहली!" रोहित गंभीरपणे म्हणाला तसे कोहली त्याच्याकडे पाहतच राहिले.

"दोन माणसं सरजी?"

"ऑफकोर्स कोहली! इथे आलेली दोन्ही माणसं मागच्या दारातूनच आत घुसली यात काहीच डाऊट नाही, कारण पुढच्या दारावर माधोसिंगची नजर होती. त्या दोघांपैकीच एकाला माधोसिंगने पुढच्या दारातून पळून जाताना पाहिलं आणि दुसरा मागच्या दारातून बाहेर पडून गेटवर चढून निसटला! गेटवर चढताना या दुसर्‍या माणसाच्या खिशातूनच तुम्हाला मिळालेलं रिव्हॉवर पडलं असावं!"

"पण सर, असंही असू शकेल की इथे एकच माणूस आला असेल आणि ते रिव्हॉवर मागच्या गेटवरुन उडी मारुन आत येताना त्याच्या खिशातून पडलं असेल?"

"कोहली, तुम्ही घरात सापडलेल्या बुटांच्या प्रिंट्स केअरफुली चेक केल्यात तर माझं माझ्या बोलण्याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल! वरच्या मजल्यावर जाणारा जो जिना आहे, त्या जिन्यापाशी आणि पायरीवर वर जाणार्‍या प्रिंट्स आणि जिन्याखाली असलेल्या प्रिंट्स पूर्णपणे वेगळ्या आहेत! अर्थातच त्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बुटांमुळे झालेल्या आहेत. या प्रिंट्स जवाहरच्या बुटांमुळे झालेल्या असणंच शक्यं नाही! याचा अर्थ घरात घुसलेल्या माणसांच्या त्या प्रिंट्स असणार! आता एकच माणूस दोन वेगवेगळ्या प्रकारचे बूट घालू शकतो हे मान्यं केलं, तरी एकाच वेळी बुटांच्या दोन पेअर्स घालणं एका माणसाला तर शक्यंच नाही! दॅट इटसेल्फ इंडीकेट्स इथे दोन माणसं आली होती! दुसरी गोष्टं म्हणजे ते रिव्हॉल्वर गेटवरुन आत येताना पडलं असतं, तर तुम्हाला ते गेटच्या बाहेरच्या बाजूला सापडलं असतं! पण रिव्हॉल्वर गेटच्या आता सापडलं याचा अर्थ ते आतल्या बाजूने गेटवर चढून जातानाच पडलं असलं पाहिजे!"

कोहलींनी चिखलात माखलेल्या बुटांच्या ठशांचं निरीक्षण केलं तेव्हा रोहितचा तर्क अचूक असल्याची त्यांना कल्पना आली.

"इथे आलेल्या दोन माणसांपैकी एक अखिलेशच असण्याची शक्यता जास्तं वाटते!" रोहित म्हणाला, 'ज्या पद्धतीने हे कुलूप फोडलेलं आहे आणि कडी उखडलेली आहे ते एका एक्सपर्ट हाऊसब्रेकरचं काम आहे यात शंका नाही! आय अ‍ॅम शुअर, घरात मिळालेल्या सगळ्या प्रिंट्स तुम्ही उचलल्या असतीलच! स्वत: जवाहर आणि त्याचे नोकर सोडले तर इतर कोणाच्या प्रिंट्स मिळतात का ते नीट तपासून पाहा. इन् केस अनआयडिंटेफायेबल प्रिंट्स मिळाल्या तर अखिलेशच्या प्रिंट्स त्यांच्याशी टॅली होतात का हे आधी चेक करा. रोशनीची हत्या अखिलेश आणि श्वेता यांनीच केली आहे! आय हॅव नो डाऊट अबाऊट इट! तिच्या खुनाचा मास्टरमाइंड हा जवाहरच होता याबद्दलही मला पक्की खात्री आहे. श्वेता आधीच मेली आहे आणि आता हा जवाहर.... उरला फक्तं अखिलेश.... कोहली, दिल्ली एनसीआर आणि आजूबाजूच्या सगळ्या राज्यांत अ‍ॅलर्ट जारी करण्याची व्यवस्था करा. त्याच्या गावी - मधुबनी पोलिसांनाही अ‍ॅलर्ट पाठवा. अखिलेश पाताळात लपून बसला तरी आपल्याला सापडला पाहिजे. या सर्व प्रकरणाचा खुलासा केवळ तोच करु शकतो!"

जवाहरच्या घरुन बाहेर पडताना रोहितला कसली तरी आठवण झाली.

"कोहली, जवाहरच्या फोन्सचे कॉल डिटेल्स मिळाले?"

"जी सरजी! गेल्या दोन महिन्यात त्याच्या घरी, ऑफीसमध्ये आणि मोबाईलवर आलेल्या सर्व कॉल्सचे डिटेल्स मिळालेत."

"एक काम करा, त्या लिस्टमधला प्रत्येक नंबर कोणाच्या नावावर आहे आणि जवाहरला फोन आला तेव्हा तो कोणत्या एरीयात होता ही सर्व इन्फॉर्मेशन मागवून घ्या! आय नो हे काम थोडं किचकटपणाचं आहे, पण त्याला पर्याय नाही! उद्या सकाळपर्यंत हे डिटेल्स आपल्याला मिळाले तर उत्तम! मेघनाच्या भावाचा काही पत्ता लागला?"

"जी सरजी! सुरेंद्र वर्मा पूर्वी दिल्लीतच राहत होते, पण गेल्या काही वर्षांपासून ते रोहतक इथे सेटल झाले आहेत. दिल्लीत त्यांची ऑटोमोबाईलची मोठी शोरुम आहे. त्याव्यतिरिक्तं त्यांच्या मालकीची दोन रेस्टॉरंट्सही आहेत!"

"इंट्रेस्टींग! एक काम करा कोहली ...."

********

"अरे भैय्या जरा रिक्षा बाजूमें रोकना!"

मागे बसलेल्या पॅसेंजरचा आवाज आला तसा रिक्षावाला एकदम चपापला!

वास्तविक अपरात्री एवढ्या लांबचं भाडं मिळाल्यामुळे तो खुशीतच होता, पण अचानक रिक्षा बाजूला थांबवण्याची सूचना आल्यामुळे तो चांगलाच हादरला होता. रात्री-अपरात्री पॅसेंजर म्हणून रिक्षा एंगेज करुन निर्जन स्थळी ड्रायव्हरला लुटण्याच्या घटना झालेल्या त्याच्या कानावर आलेल्या होत्या. आज बहुतेक त्याची पाळी आली होती!

"अरे भाई, मुझे पेशाब करना है! ब्रिजपर रोकोगे तो भी चलेगा!"

आता मात्रं रिक्षावाला वैतागला! ह्याला खरोखरच लागली असेल आणि आपण रिक्षा न थांबवल्यामुळे याने रिक्षातच केली तर मालक आपल्या नावाने खडे फोडेल हे त्याला व्यवस्थित माहीत होतं. नाईलाजाने ब्रिजवर असलेल्या एका दिव्याच्या खांबापाशी त्याने रिक्षा उभी केली. रिक्षा थांबताच मागे बसलेला पॅसेंजर खाली उतरला आणि ब्रिजच्या फूटपाथवर चढून आपला कार्यक्रम आटपू लागला! रिक्षावाला बारीक नजरेने त्याच्याकडे पाहत होता. रिक्षाचं इंजिन चालूच होतं. काही कमीजास्तं झालंच तर कोणत्याही क्षणी रिक्षासह तिथून धूम ठोकायची हे त्याने मनोमन ठरवलं होतं!

त्या पॅसेंजरचं मात्रं रिक्षावाल्याकडे लक्षंही नव्हतं. आपला कार्यक्रम आटपल्यावर त्याने दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या पँटच्या डाव्या खिशात हात घालून एक लहानशी डबी काढली आणि पुलाखालच्या नाल्यात फेकून दिली. डबी फेकल्यावर उजव्या खिशातली वस्तू काढण्यासाठी त्याने खिशात हात घातला, पण ती वस्तू त्याच्या हाताला लागेना! ती वस्तू गेली तरी कुठे? त्याला काही कळेना! सगळा खिसा उलटापालटा करुनही तो जे काही शोधत होता ते त्याच्या हाती लागत नव्हतं. घाईघाईने त्याने आपले सगळे खिसे तपासून पाहिले, पण तरीही ती वस्तू काही त्याच्या हाती लागली नाही! कदाचित रिक्षात तर पडली नसेल?

जवळजवळ धावतच तो रिक्षाच्या दिशेने आला. तो रिक्षात बसताच ड्रायव्हरने रिक्षा त्या जागेवरुन पुढे काढली. तो पॅसेंजर सीटवर आणि पायाखाली चाचपून ती वस्तू शोधण्याचा प्रयत्नं करत होता, पण.... असं कसं शक्यं आहे? ती वस्तू गेली तरी कुठे?

"क्या हुवा साब? कुछ गिर गया क्या?" रिक्षावाल्याने रस्त्यावरची नजर काढून न घेता विचारलं.

"हां, मेरे मोबाईलका कव्हर!"

तो माणूस मोबाईलच्या उजेडात ते कव्हर शोधण्याचा आकांती प्रयत्नं करत होता, पण काही केल्या त्याला ते सापडत नव्हतं!

********

रोहित अत्यंत गंभीर चेहर्‍याने डॉ. विक्रम सोळंकींच्या ऑफीसमध्ये त्यांच्यासमोर बसला होता. डॉ. सोळंकी सुमारे पंचावन्न वर्षांचे असावेत. एक अत्यंत निष्णात फॉरेन्सिक डॉक्टर म्हणून देशभरात त्यांचा नावलौकीक होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते दिल्ली युनिव्हर्सीटीत फॉरेन्सिक मेडीसीनचे तज्ञ प्रशिक्षक म्हणूनही काम करत होते. जगभरातील अनेक देशांमध्ये फॉरेन्सिक क्षेत्रात काम करणार्‍या शास्त्रज्ञांशी त्यांचा नियमित संपर्क होता. खासकरुन फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी हे त्यांच्या अभ्यासाचं आणि संशोधनाचं क्षेत्रं होतं. डॉ. भरुचांशी त्यांची अनेक वर्षांची व्यक्तीगत मैत्री होती. केवळ डॉ. भरुचांच्या शब्दाखातर आपल्या अत्यंत व्यस्तं कार्यक्रमातून आणि संशोधनातून वेळ काढून या केसमध्ये लक्षं घालण्याचं त्यांनी मान्यं केलं होतं.

जवाहर कौलचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट सकाळीच आला होता. जवाहरच्या मृतदेहावर आढळलेले वळ पाहून त्याला चांगलीच मारहाण झाली असावी हा कोहलींचा अंदाज अचूक ठरलेला होता. त्याचे दोन दात पडलेले होते. डाव्या पायाच्या नडगीलाही चांगलीच दुखापत झालेली होती. परंतु यातल्या एकाही फटक्यामुळे त्याचा मृत्यू होणं शक्यं नव्हतं. एकही फटका वर्मी बसलेला नव्हता. पोस्टमॉर्टेम करणार्‍या डॉ. दुबेंनी आपल्या रिपोर्टमध्ये तसं स्पष्टपणे नमूद केलं होतं. जवाहरच्या मृत्यूचं जे कारण त्यांनी नमूद केलं होतं हे होतं कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट! आणि त्यामुळेच कोहली पार गोंधळून गेले होते.

.... आणि रोहित गंभीर झाला होता!

या केसमध्ये उघडकीला आलेला हा तिसरा मृत्यू होता.....
रोशनीचा तर सरळसरळ खूनच करण्यात आला होता. अखिलेश, श्वेता आणि जवाहर तिघंही या कटात सामिल होते!
रोशनीच्या मारेकर्‍यांपैकी श्वेताचा मृतदेह वरळी सी फेसवर सापडला होता. तिचा मृत्यू कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टने झाला होता!
.... आणि आता जवाहरच्या मृत्यूचंही जे कारण समोर आलं होतं ते होतं कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट!

या प्रकारामुळे गोंधळलेल्या रोहितने मुंबईला डॉ. भरुचांना फोन करुन मदत करण्याची विनंती केली होती. त्याच्याकडून हा सगळा प्रकार कळल्यावर डॉ. भरुचाही कोड्यात पडले होते. बर्‍याच विचाराअंती त्यांनी रोहितला डॉ. सोळंकींची भेट घेण्याची सूचना केली होती. इतकंच नव्हे तर डॉ. सोळंकीना फोन करुन त्यांनी विनंतीही केली होती. डॉ. सोळंकींनी त्यांचं सगळं बोलणं ऐकून श्वेताचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट त्यांना पाठवण्याची सूचना केली होती. डॉ. सोळंकीनी श्वेता आणि जवाहरचे पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट्स किमान तीन वेळा अत्यंत बारकाईने वाचून काढले होते. अखेर जवळपास तासाभराने त्यांनी दोन्ही रिपोर्ट्स बाजूला ठेवले तेव्हा त्यांचा चेहरा अगदी निर्विकार होता.

"ऑलराईट मि. प्रधान! व्हॉट कॅन आय डू फॉर यू?"

"यू कॅन सिंपली कॉल मी रोहित सर!" रोहित म्हणाला, "आय अ‍ॅम शुअर मिस् रोशनी द्विवेदीच्या हत्येपासून ही केस सुरु झाली आहे. तिच्या हत्येच्या कटात सामिल असलेल्या श्वेता आणि जवाहर यांचीही डेथ झाली आहे तर तिसरा - अखिलेश तिवारी - सध्या अ‍ॅबस्काँडींग आहे. श्वेता आणि जवाहर या दोघांचाही मृत्यू कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टने झाला असं पोस्ट मॉर्टेममध्ये समोर आलं आहे आणि त्यामुळेच मी पूर्णपणे कन्फ्यूज्ड आहे! आय हॅव नो डाऊट व्हॉट सो एव्हर अबाऊट डॉ. दुबे ऑर डॉ. भरुचा ऑर देअर पीएम रिपोर्ट सर, पण एकाच केसमध्ये आणि ते देखिल मर्डर केसमध्ये दोन संशयितांचा कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टने मृत्यू होतो हा निव्वळ योगायोग आहे हे मानायला मी तरी तयार नाही! फॉर अ‍ॅन इन्स्टंस्, जवाहरच्या बाबतीत हे शक्यं आहे असं मानलं तरी श्वेता वॉज हार्डली २३ - २४... एवढ्या कमी वयात कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट होवू शकतो? अद्याप समोर न आलेलं काहीतरी समान सूत्रं या दोन्ही मृत्यूंच्या मागे असावं असा मला संशय आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे सर!"

"रोहित, कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट कशामुळे होतो याची तुला काही कल्पना आहे?"

"अगदी थोडीफार सर! पण तुमच्याकडून पुन्हा ऐकायला आवडेल!"

"गुड!" डॉ. सोळंकी स्मितं करत म्हणाले. "अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट इज अ मेडीकल टर्म. ही टर्म केवळ हार्ट कंडीशन - हृदयाची स्थिती दर्शवते. परंतु त्या स्थितीचे कारण दर्शवत नाही."

"म्हणजे हार्ट अ‍ॅटॅकच ना सर?"

डॉ. सोळंकींनी स्मित केलं. हा प्रश्न त्यांना जणू अपेक्षितच होता.

"हा एक कॉमन गैरसमज आहे. हार्ट अ‍ॅटॅक आणि कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट या दोन्ही टर्म्स जनरली खूप व्हेगली आणि एकमेकांत मिसळून वापरल्या जातात. मोअर ऑफन दॅन नॉट, या दोन्ही टर्म्सचा एकमेकाशी गोंधळ केला जातो.

हार्ट अ‍ॅटॅक ही हृदयविकारांच्या संबंधात फार ढोबळपणे वापरली जाणारी कॉमन टर्म - लूजली युज्ड लेमॅन टर्म आहे. नो स्पेसिफीक डेफीनेशन. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू किंवा एकदम आलेला अडथळा (करोनरी आर्टरीमध्ये निर्माण होणारे ब्लॉक्स) व त्यामुळे होणारी ऑक्सिजनची कमतरता, यामुळे हृदयाच्या स्नायुचा मृत्यु होणे (कार्डीयॅक इन्फार्क्शन), हृदयाचे काम अनियमित होणे (अर्‍हिदमिया) अथवा हृदय बंद पडणे (कार्डिअ‍ॅक अरेस्ट); यापैकी एक किंवा अनेक होऊ शकते. या सर्वांसाठी आणि कित्येक इतर संबंधित/असंबंधित गोष्टींसाठी हार्ट अ‍ॅटॅक ही कॉमन टर्म वापरली जाते. या कॅटॅगरीतल्या सर्व प्रकारच्या - लाईट ते सिव्हीअर - आजारांना मिळून शास्त्रीय परिभाषेत इस्केमिक (ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेला) हार्ट डिसिज असं म्हटलं जातं. रेग्युलर मेडीकल चेकअपमध्ये व्हेन्स किंवा रक्तवाहिन्यांमध्ये असलेले ब्लॉकेजेस डिटेक्ट करता येतात. अँजिओप्लास्टी करुन हे ब्लॉकेजेस दूर करणं शक्यं आहे. इन शॉर्ट हार्ट अ‍ॅटॅकचे सिम्पटर्म्स डिटेक्ट होणं आणि त्यावर उपाय करणं शक्य आहे.

कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट इज अ हार्ट कंडीशन. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे वरकरणी निरोगी वाटणार्‍या हृदयाच्या व्हेन्सचे अचानक तीव्र आकुंचन (करोनरी स्पाझम) झाल्यामुळे, त्यांच्यातील रक्तप्रवाह पूर्णपणे बंद होऊन, हृदयाचे काम बंद पडणे (कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट) शक्य असते. हार्ट अ‍ॅटॅकची परिणीती कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टमध्ये होवू शकते. हृदयक्रिया बंद पडली की हृदयाला होणारा रक्तपुरवठा बंद पडतो. साहजिकच हृदय इतर अवयवांना आणि मुख्यतः मेंदूला रक्तपुरवठा करु शकत नाही. मेंदूला ऑक्सिजन न मिळाल्याने बहुतेकदा माणसाची शुद्ध हरपते आणि आणि काही मिनीटांमध्येच मृत्यू होतो. वन थिंग दॅट कॅन लीड टू धिस इज एक्सेसिव्ह स्मोकींग. अर्थात इतर काही प्रकारच्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे न झालेल्या - नॉन इकेस्मिक - हार्ट डिसीजमुळेही कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट इज पॉसिबल. इट इज अ मेडीकल इमर्जन्सी! कोणतेही सिम्पटम्स न दिसताही ती अचानक येऊ शकते. "

रोहितच्या डोक्यात वेगळेच विचार फिरत होते. काही क्षण गेल्यावर त्याने विचारलं,

"अ‍ॅज पर माय नॉलेज सर, कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट इंड्यूस करता येतो राईट? आय मीन, अमेरीकेसारख्या देशात कॅपिटल पनिशमेंट देताना जे लिथल इंजेक्शन दिलं जातं, त्यात ज्या व्यक्तिला कॅपिटल पनिशमेंट दिली जाते त्याचा मृत्यू अखेर कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टनेच होतो ना?"

"यू हॅव फेअर अमाऊंट ऑफ नॉलेज रोहित! आय अ‍ॅप्रिशिएट दॅट! लिथल इंजेक्शनमध्ये वापरलेल्या ड्रग्जच्या परिणामामुळे श्वसनक्रीया बंद पडून - रेस्पिरेटरी अ‍ॅरेस्ट आणि त्यापाठोपाठ कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टने गुन्हेगाराचा मृत्यू होण्यातच होते. लिथल इंजेक्शनमध्ये पेन्टोबार्बिटल, पॅन्क्रॉनियम ब्रोमाईड आणि पोटॅशियम क्लोराईड ही तीन ड्रग्ज मुख्यत: वापरली जातात. अर्थात ही केमिकल्स सामान्यं माणसांना सहजासहजी पाहायलाही मिळत नाहीत. जगभरातील सर्वच देशांमध्ये अत्यंत कडक कायदे अस्तित्वात आहेत. एक पेन्टोबार्बिटल म्हणजेच सोडीयम थिओपेन्टल हे अ‍ॅनस्थेटीक असल्याने हॉस्पिटल स्टाफ आणि फार्मसिस्ट यांना सहजपणे अ‍ॅक्सेसेबल आहे."

सोडीयम थिओपेन्टल....
रोहितच्या नजरेसमोर तो मोहक चेहरा क्षणभर तरळला.... ती सगळी केसच ....

"या केमिकलचे ट्रेसेस ऑटॉप्सीमध्ये आढळतात सर? सोडीयम थिओपेन्टल सापडतं, पण बाकीची दोन केमिकल्स?"

"इट डिपेन्ड्स! ही ड्रग्ज शरीरात गेल्याची वेळ आणि प्रमाण आणि त्यानंतर किती काळाने ऑटॉप्सी केली जाते यावर ते गणित अवलंबून आहे. अमेरीकेत गुन्हेगाराला एक्झीक्यूट केल्यावर - मृत्यूदंड दिल्यावर - लगेच ऑटॉप्सी केली जाते, त्यामुळे नॅचरली ही ड्रग्ज ऑटॉप्सीमध्ये आढळून येतात. पण मृत्यूनंतर काही काळ मध्ये गेला आणि ऑटॉप्सी केली तर मात्रं या केमिकल्सचे ट्रेस आढळतीलच असं नाही. जनरली स्पिकींग, बॉडी डिकंपोजीशनला सुरवात झाल्यानंतर ऑटॉप्सी केल्यास ट्रेस लागण्याची शक्यता खूप कमी असते. वन इम्पॉर्टंट फॅक्टर टू कन्सिडर इज इफ द सब्जेक्ट हॅज अ मेडीकल कंडीशन, फॉर एक्झॅम्पल, एखाद्या माणसाला किडनीचा आजार असेल तर जनरली हेल्दी माणसापेक्षा उशिरा ऑटॉप्सी केली तरीही ही केमिकल्स ट्रेस होतात. अनदर फॅक्टर इज कोर्स ऑफ नेचर अ‍ॅन्ड वेदर! हवामानाच्या परिणामामुळे बॉडी डिकंपोजीशनची प्रक्रीया उशिरा सुरु झाली तर दॅट नीड्स टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन!"

डॉ. सोळंकी शक्यं तितक्या सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्नं करत होते, पण तरीही त्यातली बरीचशी माहिती रोहितच्या डोक्यावरुन जाणार याची त्यांना कल्पना होती.

"नाऊ कमिंग बॅक टू युवर केस, या दोन्ही डेडबॉडीजची ऑटॉप्सी विदीन अ‍ॅक्सेप्टेबल टाईमफ्रेममध्ये झालेली आहे, आणि तरीही त्यांच्यात यापैकी कोणत्याही केमिकलचे ट्रेसेस आढळलेले नाहीत."

"आय अ‍ॅग्री सर, पण या केसमधल्या सगळ्या डेव्हलपमेंट्सचा विचार केला तर श्वेता आणि जवाहर यांचा मृत्यू नैसर्गिक आहे हे पटत नाही. एव्हरीथिंग जस्ट डझ नॉट अ‍ॅड अप.... समथिंग इज मिसिंग समव्हेअर! प्लीज डोन्ट गेट मी रॉंग, बट कॅन आय मेक अ रिक्वेस्ट? डॉ. दुबेंच्या नॉलेजवर किंवा सिक्ल्सवर मला कोणताही डाऊट नाही, बट विथ ड्यू रिस्पेक्ट टू हिम, तुम्ही पुन्हा एकदा जवाहरच्या बॉडीची ऑटॉप्सी कराल प्लीज? एक सेकंड ओपिनियन म्हणून? प्लीज सर!"

रोहितने अत्यंत आर्जवी स्वरात प्रश्नं केला. क्षणभरच डॉ. सोळंकींच्या चेहर्‍यावर नापसंतीची छटा उमटली, पण दुसर्‍याच क्षणी त्यांचा चेहरा पूर्वीप्रमाणेच निर्विकार झाला. काही क्षण विचार करुन ते म्हणाले,

"अ‍ॅज पर प्रोफेशनल एथिक्स, खरंतर मला हे पटत नाही रोहित, पण या केसबद्दल तुझ्याप्रमाणे माझ्याही मनात काही प्रश्न उभे आहेत ज्याची उत्तरं मिळणं माझ्यादृष्टीने महत्वाचं आहे, सो आय विल डू इट! उद्या सकाळी मी माझ्या कामाला सुरवात करेन."

"थँक्स अ लॉट सर!"

डॉ. सोळंकींच्या ऑफीसमधून बाहेर पडल्यावर रोहितने पोलीस हेडक्वार्टर्स गाठून कमिशनर त्रिपाठींची भेट घेतली. रोशनीच्या हत्येसंदर्भात आपण सिमला आणि मंडी इथे केलेल्या तपासाची त्याने थोडक्यात त्यांना कल्पना दिली. श्वेता आणि जवाहर दोघांचाही कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टने मृत्यू झाल्याबद्दल आपल्याला आलेली शंका बोलून दाखवत त्याने जवाहरच्या मृतदेहाचं पुन्हा पोस्टमॉर्टेम करण्याची परवानगी मागितली. डॉ. सोळंकींचं नाव ऐकताच कमिशनर साहेबांनी एक प्रश्नंही न विचारता होकार दिला. त्रिपाठींच्या ऑफीसमधून तो बाहेर पडला तेव्हा कोहली त्याची वाटच पाहत होते.

"सरजी, हा कौलच्या घरी सापडलेल्या फिंगरप्रिंट्सचा रिपोर्ट!" कोहलींनी एक फाईल त्याच्या हातात दिली.

"डिटेल रिपोर्ट मी नंतर पाहतो कोहली. फॅक्ट्स काय आहेत?"

"सरजी, कौलच्या घरी तो स्वत: आणि घरी रोज येणारा माळी, कुक आणि मेड सर्व्हंट यांच्या प्रिंट्स मिळाल्या आहेतच, पण अखिलेशच्याही प्रिंट्स सापडल्या आहेत. मागच्या दाराचं फोडलेलं कुलूप आणि कडी, दाराचं हँडल, जिन्याचा कठडा आणि पुढच्या दाराचं हँडल आणि पुढचं मेनगेट या सर्व ठिकाणी अखिलेशच्या प्रिंट्स मिळाल्या आहेत!"

"अखिलेशने मागच्या दाराचं कुलूप फोडलं, आणि कडी उखडून तो आत घुसला हे त्याच्या प्रिंट्सवरुन स्पष्टं होत आहे. वरच्या मजल्यावरच्या कौलच्या बेडरुममध्ये जाताना किंवा खाली उतरुन येताना त्याने जिन्याचा कठडा पकडला असणार त्यामुळे तिथेही त्याच्या प्रिंट्स आल्या आहेत. बंगल्याचं मेन डोअर उघडून तो बाहेर पळाला आणि त्यानंतर गेटवर चढून उडी टाकून पसार झाला! आय अ‍ॅम शुअर कोहली, तुमच्या हवालदाराने त्या रात्री ज्या माणसाला पळताना पाहिलं तो अखिलेशच होता! एनिथिंग एल्स?"

"या सगळ्यांपासून वेगळी अशी एक प्रिंट कौलच्या बंगल्यात मिळाली आहे सरजी! ज्या मागच्या दरवाजातून अखिलेश आत घुसला होता त्याच दरवाजाच्या आतल्या बाजूच्या हँडलवर ही प्रिंट आढळली आहे. ही प्रिंट आमच्या रेकॉर्डवर नाही, पण मी ती सेंट्रल डेटाबेसमध्ये क्रॉसचेकींगसाठी पाठवली आहे. एक - दोन दिवसांत आपल्याला त्याचा रिपोर्ट मिळेल सरजी!"

"दॅट कन्फर्म्स माय थिअरी! फिंगर प्रिंट्सच्या रिपोर्टवरुन जवाहरच्या घरात एकूण दोन माणसं शिरली होती आणि त्यापैकी एकजण मागच्या दाराने सटकला होता हे सिद्धं होत आहे! हा दुसरा माणूस मागचं दार उघडून पळून गेला आणि त्याचवेळी त्याची प्रिंट हँडलवर उमटली! धिस गेट्स इव्हन मोअर कॉम्प्लीकेटेड नाऊ! जवाहरच्या घरात शिरलेली ही दुसरी व्यक्ती कोण? त्याचा जवाहरच्या मृत्यूशी काही संबंध आहे का?"

"कहीं ऐसा तो नहीं सरजी... कौलने रात्री एखादी बाई घरी आणली असेल आणि त्याची आणि अखिलेशची मारामारी झालेली पाहून आणि कौलला अचानक आलेला हार्ट अ‍ॅटॅक पाहून ती पळून गेली असेल?"

"लॉजिकली, तुम्ही म्हणता तसं घडलं असणं शक्यं आहे कोहली, पण या केसमध्ये तसं झालेलं नाही! फॉर द व्हेरी सिंपल रिझन, कोणती मुलगी पुरुषाचे बूट घालून घरात शिरेल? आणि ते देखिल मागच्या दाराने? चिखलाचे स्पष्टं ठसे उमटत? नो सर! आय डोन्ट थिंक सो!"

बोलतबोलत रोहित आणि कोहली हेडक्वार्टर्समध्ये असलेल्या बॅलॅस्टीक एक्सपर्ट जोसेफ फर्नांडीसच्या ऑफीसमध्ये आले. फर्नांडीसना आपल्या येण्याचं प्रयोजन सांगून रोहितने ते रिव्हॉल्वर त्यांच्यासमोर ठेवलं. देशी कट्ट्यांपासून ते भारी बनावटीच्या विदेशी रायफल्स रोजच्या पाहण्यात असलेले फर्नांडीसही ते लहानसं रिव्हॉल्वर पाहू चकीत झाले. कोहली आणि रोहित दोघांनाही तिथेच थांबण्याची त्यांनी सूचना दिली आणि त्याने दिलेला धोक्याचा इशारा लक्षात घेत ते उठून आतल्या रुममध्ये गेले. ते रिव्हॉल्वर पूर्णपणे उघडून त्याचं काम कसं चालतं हे नीट समजून घेण्यास त्यांना मोजून चाळीस मिनिटं लागली होती.

"मि. प्रधान, इतकी वर्ष मी बॅलॅस्टीक एक्सपर्ट म्हणून काम करतो आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गन्स मी हँडल केल्या आहेत, पण बुलेट्सच्या ऐवजी नीडल फायर करणारी अशी गन मी पहिल्यांदाच पाहिली आहे. धिस इज समथिंग टोटली युनिक! ही गन ऑर्डरप्रमाणे मुद्दाम बनवून घेतलेली आहे. असं मॅगझिन आणि फायरींग पिन मी तरी कधी पाहिलेली नाही. आय मस्ट से, ज्या कोणी माणसाने ही गन बनवली आहे.... ही इज अ रियल आर्टीस्ट!"

"ही गन कुठे वनवून घेतली असावी असं तुम्हाला वाटतं मि. फर्नांडीस?"

"उत्तर प्रदेशात बरेली आणि आझमगड, बिहारमध्ये सिवन या जिल्ह्यात अनेक अवैध शस्त्रनिर्मितीचे कारखाने आहेत मि. प्रधान! पण ज्या पद्धतीने ही गन बनवलेली आहे, खासकरुन मॅगझिन आणि फायरींग पिन, त्यावरुन हे काम कलकत्त्यात झालेलं आहे यात शंका नाही! गिव्ह मी वन डे मि. प्रधान! उद्या मी तुम्हाला अशी गन बनवू शकणार्‍याचा कलकत्त्यातला कॉन्टॅक्ट देवू शकेन!"

"मि. फर्नांडीस, या गनमध्ये कोणत्या प्रकारच्या बुलेट्स वापरल्या गेल्या असाव्यात?"

"बुलेट्स?" फर्नांडीस स्मितं करत म्हणाले, "मि. प्रधान, तुम्ही कधी इअर पिअर्सिंग गन बद्द्ल ऐकलं आहे?"

रोहितने नकारार्थी मान हलवली.

"बहुसंख्य वेस्टर्न कंट्रीजमध्ये इअर पिअर्सिंग करण्यासाठी एक खास प्रकारची गन वापरली जाते. खासकरुन मॉल्समधल्या ज्वेलरी शॉप्समध्ये ही गन असतेच असते! ह्या गनमध्ये कार्ट्रीज म्हणून इअररिंगच वापरली जाते! तुम्हाला मिळालेल्या या गनचं मॅगझिन पाहिल्यावर या गनमधून इंजेक्शनची किंवा त्यापेक्षा मोठी अशी नीडल फायर होत असणार हे मी सेंट पर्सेंट शुअरली सांगू शकतो! ऑफकोर्स द शॉट मस्ट बी फायर्ड फ्रॉम अ पॉइंट ब्लँक रेंज फॉर दॅट टू बी इफेक्टीव्ह! यू नो व्हॉट आय मिन?"

रोहित कमालीचा गंभीर झाला. फर्नांडीसनी केलेल्या खुलाशावरुन त्या रिव्हॉल्वरमधून अत्यंत घातक परिणाम करणारं एखादं केमिकल किंवा विष लावलेली सुई झाडून जवाहरचा खून करण्यात आला असावा याबद्दल त्याला आता कोणतीच शंका उरली नाही! पण मग ऑटॉप्सीमध्ये कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट झाल्याचं निदान कसं झालं?

हेडक्वार्टर्समधून बाहेर पडल्यावर रोहितने दिल्लीचं गव्हर्मेंट हॉस्पिटल गाठलं आणि डॉ. दुबेंची भेट घेतली. जवाहरचा मृत्यू कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टनेच झाला आहे यावर डॉ. दुबे ठाम होते. त्याने थोडक्यात केसची पार्श्वभूमी त्यांना समजावून सांगितली आणि जवाहरच्या मृतदेहाचं पुन्हा एकदा पोस्टमॉर्टेम करण्याबद्दल त्यांना कल्पना दिली. खुद्दं डॉ. सोळंकी या केसमध्ये लक्ष घालत असून ते स्वत: पोस्टमॉर्टेम करणार आहे हे कळल्यावर डॉ. दुबे आश्चर्याने थक्कं झाले. त्यांनी काही आक्षेप घेणं तर दूरच राहिलं, उलट डॉ. सोळंकींनी पोस्टमॉर्टेममध्ये आपल्याला सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी देण्याची रोहितने त्यांना विनंती करावी म्हणून त्यांनी त्यालाच गळ घातली!

रात्री बेडवर पडल्यापडल्या त्याचं विचारचक्रं सुरु होतं....

श्वेता आणि जवाहर यांचा मृत्यू कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टनेच झाला आहे याबद्दल कोणतीच शंका नव्हती....
सोडीयम थिओपेन्टल फार मोठ्या प्रमाणात दिल्यास कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट होतो हे आधीच्या केसमध्ये त्याने अनुभवलं होतं....
परंतु पोस्टमॉर्टेममध्ये त्याचे ट्रेसेस आढळून येतात....
कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट घडवून आणणारं आणि पोस्टमॉर्टेममध्ये डिटेक्ट न होणारं एखादं केमिकल वापरलं असेल तर?
असं एखादं केमिकल खरंच अस्तित्वात असेल का?
असलंच तर ते अखिलेशसारख्या सामान्य गुन्हेगाराच्या हाती कसं लागलं? त्याला कोणी दिलं?
एखादा केमिस्ट? फार्मसिस्टही?
हे केमिकल कसं आणि किती प्रमाणात वापरावं हे ज्ञान केमिस्ट किंवा फार्मसिस्टलाच मिळू शकतं!
या केसमध्ये केमिस्ट्री आणि फार्मसीशी संबंधीत एकूण तीन व्यक्ती होत्या....
रोशनीने केमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं, पण तिचा खून झालेला होता.
रेशमी केमिकल इंजिनियर होती.
चारुलता फार्मसिस्ट होती.
या दोघींपैकी कोणी ते ड्रग अखिलेशला सप्लाय केलं नसेल?
पण अखिलेशचा या दोघींशी काय संबंध होता?
अखिलेश जवाहरच्या घरी गेला होता हे सिद्धं होत होतं, पण त्यानेच जवाहरला मारलं होतं का?
त्या रिव्हॉल्वरमधून अत्यंत जहरी असं केमिकल लावलेली सुई मारून?
तसं असल्यास श्वेतालाही त्यानेच मारलं होतं का?
श्वेताचाही मृत्यू कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टनेच झाल्याचं निष्पन्न झालं होतं!
का जवाहरने श्वेताचा मृत्यू घडवून आणला होता म्हणून अखिलेशने त्याला मारलं?
रोशनीच्या हत्येचा मास्टरमाईन्ड म्हणून द्विवेदींनी तर जवाहरचा खून घडवून आणला नव्हता?
जवाहरच्या घरी सापडलेली ती दुसरी प्रिंट कोणाची आहे? त्याचा जवाहरच्या मृत्यूशी काय संबंध आहे?
आणि सर्वात महत्वाचं.....
त्या रिव्हॉल्वरच्या मॅगझिनमध्ये एकूण दोन चेंबर्स होती...
एका चेंबरमधल्या सुईने जवाहरचा मृत्यू झाला असं मानलं तर दुसरी सुई कुठे होती?

********

क्रमश:
--------------
या भागात आलेल्या हार्ट अ‍ॅटॅक आणि कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट संबंधीच्या शास्त्रीय माहितीसाठी डॉ. सुहास म्हात्रे यांचे विशेष आभार.
काही चुकीची माहिती आली असल्यास तो दोष सर्वस्वी माझ्या आकलनशक्तीचा आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)