बा विदूषका!

संकल्पना

बा विदूषका

- राजीव नाईक

विदूषक

बा विदूषका
तुझे अफाट उपकार अफिट आहेत
हसवलंस, समजवालंस, रडवलंस
अंजन घातलंस, फटके मारलेस, उजेड दाखवलास
आम्हाला म्हणता येत नव्हतं ते तू बोलू शकलास
सांगू धजलास
मुख्य म्हणजे तू निरागस राहिलास
तुझी टिंगल टवाळखोर नव्हती
तू स्वार्थीच नव्हतास
आताआतापर्यंत

खऱ्याचं व्रत होतं तुझं आणि तशी सवयही होती तुला
तोंड झाकायला नव्हे तर अहं लपवायला घेतलास वेश
तोही बावळ्याचा
तू शहाणा होतास, पण शाणपत्ती नव्हती तुझ्या विचारात
तू फटकळ होतास, पण सरबत्ती नव्हती तुझ्या भाषेत
तुझ्यात ममत्व होतं, कळकळ होती
विनोद तुझं अस्त्र होतं, ढाल नव्हती
तुला वचपे नव्हते काढायचे
तुला सूड नव्हते उगवायचे
तू प्रांजळ होतास, तू निर्व्याज होतास
तू विद्वान तर होतासच
त्यात तुझं तत्त्वज्ञान पक्वं होतं आणि तर्क घट्ट
तू कुशल होतास, पारंगत होतास
तुझं आंगिक मार्मिक आणि वाचिक मर्मभेदी होतं
तू जगलर नव्हतास
तू वावदूक नव्हतास
तू कसला होतास अरे
तुझी रूपं बेसुमार आणि अवतार अगणित
सोंगं रंगवायचास, शंका काढायचास
तुझे दूरचे नातलग खादाड असतील
तू मात्र जगण्यापुरतं बेताचंच खायचास
तू शहाणा असायचास, शहाणा समजायचा नाहीस स्वतःला
तू चिडायचास ते व्यवस्थांवर, व्यक्तीवर नाही
तू आधी स्वतःला इवलासा करायचास
मग मोठ्यांना वठणीवर आणायचास
मला सगळं कळतंय मूर्खांनों ऐका माझं, असा तुझा आव नव्हता
मलाही कळतंय ते का समजून घेत नाही तुम्ही, एवढाच तुझा भाव होता
ह्या पेशात ईगो असणं हे महापाप आहे
त्याचं स्वत्व समूहाचा अंशमात्र असण्यात आहे
ह्याबद्दलची तुझी जाणीव अगदी निखालस होती

'शहाणे होण्यापूर्वीच म्हातारे होण्याचा तुम्हाला अधिकार नव्हता'
किंवा
'ह्या देवतांमध्ये काही तथ्य नाही'
असे तुझे उद्गार अनेकांच्या उरात सामावलेत...
...तुझी दिशाहीन दुडूदुडू चाल थेट
आणि
तुझं बेभान सुसाट पळणं नियंत्रित
वाटत आलं आहे अनेकांना
बाकी कित्येकदा वेळच्या वेळी तिथच्या तिथे
जसं हवं तसं बोलण्याच्या तुझ्या हजरजबाबी सवयीमागे
गृहीत असे प्रतिभा, बहुश्रुतता आणि अभ्यास
तू जीभ उचलून टाळ्याला लावू शकायचास लागलीच
कारण तुझं सुहृदय सतत असे धगधगत
आणि मानुषी मेंदू मोजत असे नेहेमी
निव्वळ माणूस होणं मोलाचं होतं तुला
शहाणपण हा त्याचा एक भाग मात्र होता
तू आंगठा दाखवायचास टेंभा न मिरवता
तू खूप प्रेमळ होतास संतांसारखा
सर्वज्ञ नव्हतास देवासारखा

पण
तरीही लाडक्या, वेल्हाळा, केवढं दिलेल्या
माझ्या सख्यासोबत्या विदूषका
आता ये

तशी तुझी नेहेमीच गरज राहील असं येईल म्हणता म्हणा
पण तुझं मिश्कील तेज
आटलं चार्ली आजोबांच्या आणि दादू बाबांच्या पश्चात
तुझा काळाशी झालेला करार आटोपला असावा
संभवत राहा पुन्हा एखाद्या युगाने कळवळून हाक मारली तर
पण
ये आता
सरळ बोलता येतं आता आम्हाला
आमचं आम्हीच बोललं पाहिजे
तुझ्या बेफिकिरीचा नाही तर तुझ्या बेमुर्वतपणाचा वारसा
चालवायला हवा आम्ही आता
तुझी रीत तुझीच
तुझी जाणीव घेतली पाहिजे आम्ही आता
तुझे चाळे तुलाच शोधतात
तुझं ब्रीद जपलं पाहिजे आम्ही आता
तुझ्या कोलांट्या तुलाच लखलाभ
तुझा नेम जमवला पाहिजे आम्ही आता
आडपडदा, शालजोडी, नथीतले तीर आता कशाला
जर फाडता येईल पडदा
मारता येईल पैजारा
आणि सोडता येतील बाण

आमचे आम्हाला
आता का तिरकं का नाही थेट
आता का लपून का नाही प्रकट
आता का नाही मंडन टोमणा टाळून
आता का नाही पुरावा टवाळी अव्हेरून
ह्या विनोदाने टाकावा मुखवटा आता चेहरा व्हावा बोलका
ह्या विडंबनाने सोडावं छद्म आता विधानाने व्हावं निःसंदिग्ध
ह्या विसंगतीने सांडावा सल आता तर्क व्हावा तब्बल
आता नाही गरज मुखवटे चढवून आगीभोवती नाचून
कुणाला अंगात आणायची
आपलंच मन आणि मेंदू आणि देह पुरतो ना
लागत नाहीत आता आत्मेबित्मे
आवाहत नाही आता आपण
व्हावा संचार कुणाचा तरी आपल्यात म्हणून
मुखवट्यांचं टोळ्यांमधलं टोटमकाम संपलं की रे आता
आम्ही चढवले तर रूपकात्मकच चढवतो मुखवटे
जसे टोळ्यांबरोबर गेले हे रंगीतसंगीत मुखवटे आणि अंगरंगलेप
तसं आता ह्या शतकात तरी नको का व्हायला
बा विदूषका
तुझं निर्गमन

टोळ्यांना जसा मुखवटा कामी आला अनाकलनीय कवेत घ्यायला
तसंच विदूषका तू
ठरलास कैवारी ह्यात्याशाहीतल्या बंडावत्या कलावंतांचा
(ठरलास का पण?)
सरंजामी सामंतांवर बसले असतील तुझे वाक्‌घण
(बसले ना पण?)
पण आता ह्या भले तथाकथित खुल्या काळातही
तुलाच केलं पाचारण
तर तुझ्यामुळेच प्रवेशतील सरंजामशाही परिपार्श्वक
ह्या एकविसाव्या शतकात व्यसनं देखील बदलली
आणि तू कसा रे अजून इथे जिथल्या तिथे
खरंच माझ्या मोगाच्या विदूषका
ये आता

आता माझं मीच भलंबुरं बघायला हवं
खरं तर आमचं आम्हीच
आता शेरे नकोत हवेत प्रश्न सोलीव
आता मस्करी नको व्हायला हवं थोडं गंभीर
आता कोडी नकोत करायला हवा आता उलगडा
नाही नाही अजिबात होणार नाही आम्ही करुणव्यग्र
एकविसाव्या शतकाची शोकात्मिका रचायचा नाही किंचितही मानस
पण रोखठोक बोलताबोलता कोरडे झालो
इतरांचे दोष दाखवता दाखवता आत्मरत झालो
माझंच खरं म्हणता म्हणता स्वतः खोटे झालो
तर उत्तू मातू नीतीच फाडून खाऊ
म्हणून ये आता
तुझ्या खेरीजही आम्ही हसू हसवू
ह्या परिस्थितीला सामोरायला नको तुझी मदत आता
बा विदूषका

मित्रा, जिवलगा, अंतर्याम्या
आमचं आम्हालाच निस्तरू दे आता
जरा निवांत विसाव
कदाचित फार काळ नाही
पण तरी आता ये
बा विदूषका

***

विदूषक
ताजा कलम :
नाही नाही नाही नाही. थांब थांब थांब. विसर विसर. ऐक. चुकलो अरे. पार माकलो. रामा शिवा गोविन्दा झाला माझा. दगड्या धोंड्या मसण्या झाला. अक्कल गहाण पडली रे, मती नाठी, बुद्धी नाहीशी झाली. माज आला, माद चढला. उतलो, मातलो, तोंडाला येईल ते बकलो. माफ कर, जाऊ दे सोड. रुसत, रागवत नाही का कुणी आपल्या माणसावर? येड्यागत बोललो रे, पार माती खाल्ली. थोबाडीत मारून घेतो, कान पकडतो, दंडवत घालतो - क्षमा कर, ये ये ये अरे, ये रे बाबा ये. धाव रे धाव आता. बाबा करतो, पुता करतो; आजोबा, या हो आता. आधी बकलो, आता भाकतो. गंजली तलवार, जरा काढ धार. हवं तर मार, फटकार. झालीय धरणी ठाय, होत चालला आहे निरुपाय. दया कर, लेकरं तार. आता ये सत्वर आणि जरा निस्तर. ये वेगेवेगे. नाही नाही, तसं नाही. आम्ही नाही पळत, पोबारत; नाही हातपाय गाळत. नाही झाकत, नाही झटकत - पण तू ये. तू अस बाबा. आता आयता नको लाभूस, दर्शन नको देऊस - आम्हा प्रत्येकात ये. टपकू नकोस, उगव. सगळं कोमेजण्याआधी हरेकाच्या आतून उमल. आम्हाला सांभाळ. जप, आम्ही जग जपलं तर जपले जाऊ आपोआप हे आहेच. पण, तुझा तोरा, ताठा तीच आमची मिरास, मिजास. तू ये. माझ्या शोन्या, लाडक्या, तुझी अलाबला घेतो रे बंधो, पण आता लागलीच ये रे. ये, बा विदूषका!

***

नव अनुष्टुभ्, मार्च-एप्रिल २०१८मध्ये पूर्वप्रकाशित

रेखाचित्रे : अजित अभंग

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)