‘कमला’चे दोन शेवट

’कमला’चे मुखपृष्ठ(पूर्वसूचना: ह्या लेखात ‘कमला’ ह्या नाटक आणि चित्रपटाच्या कथेचा गोषवारा सांगितलेला आहे.)

तेंडुलकरांचं ’कमला’ नाटक १९८१ साली रंगमंचावर आलं. तेव्हा ‘सखाराम बाईंडर’ आणि ‘घाशीराम कोतवाल’ येऊन जवळ जवळ दशक उलटून गेलेलं होत. विजया मेहतांच्या भाषेत सांगायच तर ‘कमला’ हे तेंडुलकरांच्या ‘वृत्तपत्रीय सनसनाटीपणाचा वास’ असलेल्या नाटकांपैकी एक नाटक. त्यानंतर तीन वर्षातच तेंडुलकरांनीच पटकथा लिहिलेला ‘कमला’ हा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला. चारुशिला साबळे, लालन सारंग, विक्रम गोखले आदी मंडळींची कामे रंगभूमीवर बघण्याची माझी संधी हुकली. पण यु-ट्यूबमुळे शबाना-दिप्ती नवल ह्यांनी साकारलेल्या भूमिका बघायला मिळाल्या. नाटकाचा चित्रपट करताना कथेमध्ये फेरफार होणं स्वाभाविक आहे. पण कमलाच्या बाबतीत ते अगदी मर्यादित स्वरूपात केलेले दिसतात. काहीवेळा संवादातला एखाद-दुसर्‍या वाक्याचा बदल काहीतरी नवीन जागा दाखवून जातो. आणि नाटककाराला काय सांगायचे ते अधिक स्पष्टपणे दिसायला लागते. तसं काहीस ह्या दोन्ही ’कमला’च्या शेवटच्या संवादांकडे बघताना मला जाणवले. हे संवाद कुठले? आणि त्यात मला काय दिसले? हे मांडण्याचा हा प्रयत्न.

‘कमला’ची कथा थोडक्यात अशी: आपला देश कसा मागासलेला आहे हे पुराव्यानिशी दाखवून देण्यासाठी तरुण आणि महत्त्वाकांक्षी पत्रकार जयसिंग जाधव (विक्रम गोखले, मार्क झुबेर) बिहारला जातो आणि मनुष्यविक्रीच्या एका बाजारातून एका आदिवासी बाईला अडीचशे रुपयांना विकत घेऊन आपल्या दिल्लीतल्या घरी आणतो. ती बाई म्हणजेच कमला (चारुशीला साबळे, दीप्ती नवल). दुसर्‍या दिवशी मोठी पत्रकार परिषद बोलावून तमाम जनतेला आणि सरकारला हालवून जागे करणे हा त्यामागील उद्देश. पत्रकार परिषद आटोपून आल्यानंतरच्या रात्री कमला आणि जयसिंगची पत्नी सरिता (लालन सारंग, शबाना आझमी) दोघींनाही झोप लागत नाही. तेव्हा त्या गच्चीत बसून गप्पा मारू लागतात. त्यात कमला सरिताला विचारते - आपको कितनेमें खरीदा? ह्या प्रश्नाने गडबडलेली सरिता जेव्हा स्वतःकडे बघायला लागते तेव्हा तिला आपणही जयसिंगच्या हातचे गुलाम असल्याची जाणीव होते. ती इतकी तीव्र असते की ती दुसर्‍या दिवशी घर सोडायला निघते. त्यावेळी त्यांच्या घरी भेटायला आलेले तिचे काका (कमलाकर सारंग, ए. के. हंगल) तिची समजूत काढतात आणि पटवून देण्याचा प्रयत्न करतात की सगळे पुरूष असेच असतात. सरिता तात्पुरता का होईना घर सोडायचा निर्णय रद्द करते.

नाटक आणि चित्रपटाच्या शेवटच्या भागात घडलेला सरिता आणि काकांजीमधील संवाद नाटकाच्या गाभ्याला स्पर्श करतो. नाटकातला संवाद असा: (संक्षिप्त रुपाने)

सरिता: माणूस मोठा होतो तर तो मोठा माणूस का नाही होत? त्याचा ’मालक’ का होतो?
काकासाहेब: सरिता, तू विचारते आहेस त्या प्रश्नांना उत्तर एकच आहे. तो तसाच आहे. म्हणून तो ’पुरुष’ आहे. आणि म्हणून या जगात ’पुरुषार्थ’ आहे.
सरिता: सरिता, तू तुझ्या मालकामागून मुकाट्याने जा. असं जाणं हाच तुझा धर्म आहे.
काकासाहेब: त्रासदायक असलं तरी हे खरं आहे. जग चालायचं असेल तर संसाराचा गाडा चालला पाहिजे आणि तो चालायचा तर हे असंच चाललं पाहिजे.
सरिता: पुरुषार्थ करण्याचा हक्क काय तो पुरुषालाच काय म्हणून? त्याला एक वेगळं इंद्रिय दिलं आहे म्हणून? बाईसुध्दा पुरुषार्थ करु शकते.
काकासाहेब: त्याला पुरुषार्थ म्हणत नाहीत.
सरिता: पुरुष करतो तो पुरुषार्थ. मग त्यानं लोकांची भांडी घासली तरी तो पुरुषार्थ.
काकासाहेब: असं आहे.... पुरुषाची गोची काय होत नसते? तेव्हा त्यालाही ती गिळावीच लागते.

हा संवाद संपतो तोच जयसिंग पार्टीवरून परत येतो. आणि बातमी येते की दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांनी सूत्रे हलवल्यामुळे जयसिंगला नोकरीवरून बडतर्फ केले आहे. हे सहन न होऊन तो सैरभैर होतो आणि काहीबाही बरळायला लागतो. तेव्हा काकासाहेब सरिताला म्हणतात, "ही पुरुषाची गोची. पुरुषार्थाचीसुध्दा. समजलं?"

आता हाच संवाद हिंदी चित्रपटात कसा आला आहे ते बघुया:

सरिता: आदमी बडा होके बडा आदमी क्यों नही बनता? मालिकही क्यों बन बैठता है?
काकाजी: इसलिये की पुरुषका अहंकार बहोत शक्तीशाली होता है. एक कमजोर पुरुषकाभी. प्रकृतीका नियम है ये, बेटी.
सरिता: इसलिये इसका पैदायिशी हक है की कमसे कम एक औरतको तो गुलाम बनाही ले.
काकाजी: ठीक कहती है, बेटी. लेकीन अकेला जयसिंगही नही, सभी पुरुष ऐसे होते है. अब रहा सवाल तुम्हारी गुलामीका. मै पुछता हूं, क्या जयसिंग गुलाम नही? अपने अहंकार, अपने इच्छाओंका? अगर गौरसे देखे तो पुरुष वो गुलाम है जो अहंकारका नकाब ओढके अपने आपको मालिक समझ बैठा है.

वरवर पाहता ह्या दोंन्ही संवादांतला मुख्य प्रश्न स्त्रीची गुलामगिरी आणि पुरुषाचा स्त्रीवरचा मालकी हक्क ह्या गोष्टींशी निगडीत आहे असे वाटते. विशेषतः मराठी नाटकातला संवाद बघून तसे वाटते. ‘पुरुषार्थाची गोची’ मध्ये काहीतरी सांगण्याचा प्रयत्न होतो. पण त्याचा अर्थ फारसा स्पष्ट होतो असं वाटत नाही.

हिंदी चित्रपटातला संवाद थोड्याशा वेगळ्या वळणाने जातो. आपण गुलाम आहोत, पण नेमके कुणाचे? नवर्‍याचे, परिस्थितीचे का आपल्या इच्छा-आकांक्षांचे? आणि इथे काहीतरी वेगळ दिसायला लागतं असं मला वाटतं. तेंडुलकर इथे स्त्रीचा बंदिवास किंवा पुरुषाचा पुरुषार्थ याच्या पलिकडे जाऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताहेत. ते माणसाच्या मुक्ततेबद्दल काहीतरी सांगताहेत. माणूस हा अहंकाराचा मुखवटा धारण केलेला गुलाम आहे आणि तो स्वतःला मालक समजून जगतो आहे. आणि हे जर खरच तसं असेल तर ते जितक जयसिंगला लागू आहे तितकच ते सरितालाही लागू आहे.

सरिताची आत्तापर्यंतची धडपड काय आहे? तर आपण समाजाने निर्माण केलेल्या ‘चांगली पत्नी’ ह्या प्रतिमेस पात्र ठरावे. आणि ह्या प्रतिमेशी आपली सतत तुलना करत राहणं हाच जणु एक पिंजरा बनला आहे ज्यात सरिता बंदिस्त आहे. अशा अवस्थेत सरिता जयसिंगबरोबर राहत असली काय किंवा नसली काय, काहीतरी बनण्याची प्रक्रिया अव्याहत चालूच राहणार. सरिता घर सोडून गेली आणि एकटी राहायला लाजली तर पिंजऱ्याच्या भिंतींचा रंग बदलणार. विवाहित स्त्रीची प्रतिमा जाऊन तिथे कदाचित मुक्त स्त्रीची प्रतिमा येणार. पण काहीतरी बनण्याची धडपड तशीच राहाणार.

जशी सरिताला कमला भेटते तशी आपल्यालाही ’कमला’ भेटत असते आणि आपल्या आयुष्यातल्या बंदिस्तपणाची जाणीव करून देत असते. आपले नातेसंबंध किंवा आपली नोकरी अशावेळी पिंजऱ्यासारखी वाटायला लागते. त्या बंदिस्ततेचं खापर आपण एखाद्या व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर फोडत असतो. पण ‘कमला’ असं दाखवण्याचा प्रयत्न करते आहे की आपल्याला बंदिस्त करणारा पिंजरा हा आपल्या आतच आहे. तो आपल्याला दिसतोय का? हा खरा प्रश्न आहे. कदाचित आपण कुठल्या पिंजऱ्यात नेमके बंद आहोत हे दिसणं ह्यातच पिंजऱ्यापलीकडील जगाशी ओळख होण्याची सुरुवात असू शकेल.

संदर्भ:
१. विजय तेंडुलकर, कमला, नीलकंठ प्रकाशन, तिसरी आवृत्ती, १९९३.
२. विजया मेहता, झिम्मा: आठवणींचा गोफ, राजहंस प्रकाशन, चौथी आवृत्ती २०१३, पान १८५.
३. https://en.wikipedia.org/wiki/Kamla_(film)
४. https://www.youtube.com/watch?v=oU2z_0pL2qg (स्थळाला भेट: १० फेब्रुवारी २०१९).

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नव्याने तेंडुलकरांच्या “कमला”ची आठवण काढलीत व ती सर्वांना सांगितलीत याचा आनंद वाटला.
कमला नाटकातल्यापेक्षा कमला चित्रपटातील काका या पात्राकरवी आलेले पुरुषाच्या गोचीचे स्वरूप उघड करणारे संवाद निश्चितच अधिक टोकदार आहेत.
“माणूस हा अहंकाराचा मुखवटा धारण केलेला गुलाम आहे आणि तो स्वतःला मालक समजून जगत आहे” ही व्यापकपणे सर्वांना अंतर्मुख करणारी जाणीव चित्रपट देतो हे खरे आहे.
“आपल्याला बंदिस्त करणारा पिंजरा आपल्या आतच आहे” हा शेवटच्या परिच्छेदातील निष्कर्षही नेमका व्यक्त झाला आहे.
मात्र सरिताच्या आयुष्याचा चालू किंवा दुसरा कोणताही पट हे तिच्या गुलामीचंच दुसरं एखादं रूप असेल हा निष्कर्ष थोडा अतिरंजित वाटतो. यात तिची अंतःप्रेरणा व काहीतरी करण्याची धडपड ही तिच्या ठायी केवळ एक मानक गाठण्याची तळमळ आहे या कारणासाठी अर्थहीन ठरत नाही. जगण्याची चौकट प्रत्येकाभोवती पडतेच. तिचे सातत्य वा मोडतोड यात व्यक्तीचा सजग सहभाग किती, त्यात बेरकी हिशेबीपणा आहे की माणूस म्हणून समृद्ध होताना झालेले (मत)परिवर्तन आहे हा भाग महत्त्वाचा आहे असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिक्रिया आवडली. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाटक बघितलेले नाही, त्यामुळे त्याबद्दल काही बोलणे अनुचित ठरेल, परंतु वर काढलेला निष्कर्ष पटला.

आपण सारेच चौकटीत बांधलेले असतो. परवाच गिरीश कुलकर्णी यांचे एक आर्टिकल वाचले, त्यात तो असेच काहीतरी सांगतोय.. चौकट आपल्याला इतक्या लहानपणापासून दिलेली असते की ती चौकट मोडणारे पण खरेतर एका वेगळ्या चौकटीतच ती मोडत असतात असे काहीसे म्हणत होता..
थोडेसे विस्कळीत असले तरी काहीसे इथे पण असेच लागू होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. गिरीश कुलकर्णी यांचा लेख वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0